फलीत

कहर's picture
कहर in जे न देखे रवी...
9 Jun 2018 - 8:41 pm

पाळते तू टाळतो मी ही जगाची रीत का
जी बनवणाऱ्यास होता भेटला प्रेषित का

काय त्या सांजेस त्याचे शब्द होते संपले
अर्धवटसे वाटते आहे मला हे गीत का

भंगले याच्यात काही खंगले याच्यात काही
दंगले होते जयात ही ती अघोरी प्रीत का

नाक डोळे ओठ कुंतल वर्णिले गेले किती
नाद नाही हो जयाविन कान दुर्लक्षित का

घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन
अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का

खोडले तव नाव आणि वाचली कविता पुन्हा
तीच कविता भासते आहे अशी विपरीत का

बंदी झाली बंदी गेली वाढली किंमत जरा
जे खिशाला परवडेना ते म्हणू जनहित का

उतरता उन्माद कळले एकटाच रणांगणी
मित्र नाही आप्त नाही ही म्हणावी जीत का

ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे
शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का

घटना आरोप मोर्चा बातमी भाषणे नि चर्चा
सावकाश विसरण्याचा तोच क्रम नियमित का

पाहणी केली तयांनी साक्ष घेतली नोंदवून
काढले फोटो.. निघाले.. पुढे लालगी फीत का

धुण्याआधी थाळीे तू घे तपासून एकदा
त्यात कृष्णाच्या नावाचे उरले आहे शीत का

अग्नीत प्रवेशताना वदे रामास सीता
जपले शील तुझ्यास्तव हे त्याचे फलीत का

gajhalgazalमराठी गझलकवितागझल

प्रतिक्रिया

गझल बरीच गुंतागुंतीची वाटली. का कुणास ठाऊक.

ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे
शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का

हा शेर आवडला.

एस जी म्हणतात त्याप्रमाणे खरंच गुंतागुंत वाढली आहे . माफ करा पण मी आपली गझल खालीलप्रमाणे जुळवली आहे आणि देत आहे . राग मानू नका , हलकेच घ्या

ओळ आहे खूप साधी वाच अन सोडून दे
शोधते आहे तयातील अर्थ तू गर्भित का

इथपर्यंत मला आवडली पण पुढे थोडी सैल झाली म्हणून मी खालील प्रमाणे जशी मला योग्य वाटली तशी बनवली आहे . राग नसावा ..

अर्थ साधा मीही साधा भासतो का वेगळा
इशारे कळूनही तुजला आज मी अपरिचित का

बीज बोता अंकुर फुटले वृक्ष त्याचा जाहला
लगडली फळे विखारी हेच त्याचे फलित का

सिद्धेश्वर विलास पाटणकर

आपल्या निर्भेळ प्रतिसादासाठी धन्यवाद. काही शेर लयीत आणण्यासाठी नक्की प्रयत्न करेन. वरील प्रतिसाद वाचून एक नवीन शेर सुचला
दूर तू अन दूर मी राहिली कुठली कमी
भेट ना घडे या जन्मी ही अंतरे शापित का

खिलजि's picture

12 Jun 2018 - 1:11 pm | खिलजि

वा खुप छान ...

घाव सोसून देव होतो वेदनेतून हो सृजन
अन दुःखी होताच मन जन्म घे संगीत का

वा...

मदनबाण.....
आजची स्वाक्षरी :- मागू कसा मी अन् मागू कुणा,माझी व्यथा ही समजावू कुणा... :- भिकारी