फणा
(कवि कुसुमाग्रज उर्फ तात्यासाहेब शिरवाडकर यांची माफी मागून)
ओळखलत का सर मला, दारात आला कोणी
केस नव्हते विस्कटलेले, डोळ्यात नव्हते पाणी
क्षणभर बसला, नंतर हसला, बोलला छाती काढून,
‘इनकम टॅक्सची धाड आली, गेली मान वाढवून’
कैदाशिनीसारखी नुसती कागदी घोडी नाचली,
सारी खाती गोठविली, स्वीस बँक मात्र वाचली.
कॅश वेचली, लॉकर सील केली, दागिणेही नेले
गादीखाली म्हणून प्रॉपर्टीचे पेपर तेवढे वाचले
वकीलाला घेउन संगे सर आता लढतो आहे
एकेक मुद्दा काढतो आहे, चिखलफेक करतो आहे