पाऊस असा...
मुंबईत पाऊस पडतोय. मुंबईचा म्हणून ओळखला जाणारा पाऊस पडतोय. पागोळीची सुरावट सुरू आहे बराच वेळ... एका सुरात... पागोळीला अजून तरी शहराचं वावडं नाही, मुंबईचं वावडं नाही. त्यामुळे ती आहेच... परळ भागातला हा म्हटलं तर मध्यवर्ती, म्हटलं तर शांत असा भाग. इमारतीखाली, आजुबाजूला पावसाचा चिकचिकाट, रस्त्यावर साचलेलं पाणी, शाळेतून परतणारी मुलं, त्यांना न्यायला आलेल्या, पावसामुळे खोळंबलेल्या आया, किरकोळ विक्रेते, त्यांचे ठेले, भज्यांचा खमंग दरवळ, वाफाळत्या चहाच्या हाका, त्या ओढीने गर्दी करणारी कोंडाळी...

