ब्रम्मा

Primary tabs

पराग देशमुख's picture
पराग देशमुख in जनातलं, मनातलं
28 Jan 2017 - 11:26 am

निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत. माझ्या नाळेशी जोडून असणारा विशाल पाषाण समूह पहिला कि मला मी सर्व व्यापी वगैरे असल्याचा भास होत असे पण, माझ्या मुळ पाषाणाने मला स्वप्नांच्या मागे जाण्याच पाठबळ जरा जबरदस्तीनेच दिल आणि मी या प्रवाहात पडलो.

तसा प्रवाहाला सोडून नव्या रस्त्याने जाण्याची माझी हौस जन्मजात, (माझ्या जन्म दिवसापासून अक्षरशः सूर्य सुद्धा दक्षिणायन संपवून पुन्हा उत्तरेकडे चालू लागतो म्हणे.)पण अधुन मधून येणारे पावसाळे आणि ओढे, झरे, नद्या, नाले व पाझरांना येणारे उमाळे मला स्थितप्रज्ञ होऊ देतील तर शपथ.
संसार म्हटला कि भोग भोगण हे आलच. मागील विशेषतः १० वर्षात माझ्या डोक्यावरून बरच पाणी वाहून गेल. प्रवाहाच्या जोरान आणि तारुण्याच्या होर्यान, मूळ प्रांतातून परक्या प्रांतापर्यन्तची मजल मी मारली असली तरी आतून असणार कोरडेपण जरा बोचतच होत.

आमच्या या धक्का-धक्कीच्या जीवनात इतर गोट्यांशी संग न जडला तरच नवल. टवके अनेक उडाले पण ते प्रवाहाचा भाग म्हणून आणि ज्या संगमरवरी निरागसतेवर आमचं मन जडल तिथे कुल प्रतीष्ठेच्या गर्त्याचे भय असल्याने भावना पोचायच्या तेंव्हा नि पोचायच्या तिथे कधी पोचल्याच नाहीत. कालांतराने दुय्यम चमक म्हणजे गुणवत्ता समजण्याची चूक केली आणि हि साथ दीर्घ काळाची मैत्री बनून राहील असे वाटले पण ती गारगोटच निघाली; मग काय कायमच्या घर्षणातून ठिणग्या उडाल्याही आणि विझल्याही; त्याची जाणीव शेजार्यांखेरीज प्रत्यक्ष पाण्यालाही झाली नसणार हे ओघाने आलच.
जी ओरड भावनांची, तीच स्वप्नांची. स्वकर्माने स्वर्ग पदाला जाण्याची स्वप्न मला वारसा म्हणून मिळालीत तेंव्हा काही तरी करून आयुष्याचे सोने करण्याचा मानस उराशी बाळगून मी जीवनगंगेच्या आधाराने पैलतीराचा प्रवास मार्ग कंठत आहे असे म्हणणे वावगे ठरले नसते पण आमच्या हर हुन्नरी स्वभावाने आम्हाला “मंजील से ज्यादा सफर कि चाहत…” मग काय निघलो आम्ही दर्या खोर्याने उनाडक्या करीत. तिथे कोण येणार आमची विचारपूस करावया, ब्रम्हदेव? नाही म्हणायला पाण्यावर उठणाऱ्या वलय रंगाची चित्रे काढून कुण्या एखाद पोरा-सोराच्या चेहऱ्यावर चवली पावलीचे स्मित वाटत आलो एव्हडेच काय ते माझे संचीत.

आमच्या नशिबाला गंडकी वगैरे पुण्य तीर्थ आल असत तर एखाद्या यज्ञोपवीत धारण केलेल्या, पापभिरू आणि ईश्वर लीन ब्रम्ह वृंदाने तिसर्या डुबकी अंती प्राणपणाने घट्ट मुठीत धरून मला “शाळीग्राम” म्हणून यथाविध देवघरातील स्थान दिले असते कदाचीत पण आमच्या मराठवाड्यातील नद्या नाल्यांच्या गाठीशी तेव्हडे पुण्य बांधलेले नाही.

एका पाषाणदेहीचा हा रसभंग कमी होता कि काय, त्यात भर म्हणून आम्ही दुय्यम दर्ज्याचे पाषाण ठरवले गेलो म्हणून तर टाकीचे घाव सोसण्याचे बळ यांचे अंगी नाही हा शेरा बसलेला, तेंव्हा शिल्प म्हणून नावाजले जाणेही दुरापास्तच.

काही स्वप्नांवरती नशीब, तर काही स्वप्नांवर कर्म असे सुप्कीचे घाव घालत असताना मला मात्र त्याच्याशी काडीचे सोयरे-सुतक उरले नव्हते. स्वप्नांवरून माझा विश्वास उडालाच होता कि माझ्या आयुष्यात नवी उलथापालथ झाली.

माझी अस्तित्व असणारी नदी शहरा शेजारून वहिली असती तर मोठ मोठ्या यंत्राद्वारे उपसा करून मला आणि माझ्या काही साथीदारांना नेल असत पण आम्ही म्हणजे गांधीजीच्या जगणे विसरलेल्या धोरणानुसार “गावाकडे चला …”हा नारा जपत होतो तेंव्हा आम्हाला न्यावया चतुश्पादांची मोठी वरात घेऊन आलेले गवंडी महाराज घमेल्यांच्या पळीने सूर्य नारायण एतत गोलार्धाची रजा घेईस्तोवर घरून आणलेल्या पोत्यात आमची आचमन देत राहिले.
घुसमटून गेलेल्या माझ्या सारख्या अनेकांचे डोळे जेंव्हा उघडले तेंव्हा ते माझ्या बरोबर चाळन्यांच्या परीक्षांमधून पुनःश्च नापास होऊन तळाशी हताशपणे पडून होते. “ठेविले अनंते…” उक्ती आमच्याकडून आचरणात आणली जात असताना समोरील दृष्याने आयुष्याचे ब्रम्हज्ञान सहज गळी उतरविले.
आजवर भिन्न जाती आणि पिंडाचे म्हणून एकमेकांच्या जीवावर उठलेल्या अनेकांना तो गवंडी त्याच पाण्याच्या मदतीने सिमेंटच्या मिश्रणात एकजीव होईपर्यंत घोटात होता.जे आजवर विभागलेले होते ते आता माझ्याच कुळातील सान-थोरांना एकत्र जोडण्याचे काम करणार होते.

पाहता पाहता बारवाकाठ्च्या त्या पिंपळ वृक्षाचा कातीव पार बांधून झाला. आयुष्यात ज्या आशावादावर मी आजवर जगात आलो तो संपतच आला होता कि अचानक त्या गवंड्याची नजर मजवरी जडली. मी प्रार्थना करतच होतो कि, “मला पायरीचा दगड म्हणून तरी लाऊ दे, माझ्या अस्तित्वाचे सोने होईल” तेव्हड्यात काळ-सर्पाच्या पूजेतील कलशाप्रमाणे कपाळ नि छातीशी तीनदा लाऊन तो ओरडत सुटला “मला ब्रम्मा गावला… S, मला दगडामंदी ब्रम्मा गावला ….SS”

आश्चर्याने विस्फारलेल्या डोळ्यांपुढून सारी स्वप्न क्षणांत तरळून गेली. शाळीग्राम, देवपण, टाकीचे घाव नि अजोड शिल्पाचे स्वप्न सार काही… एका क्षणात… इतर गोट्यांच्या ठोकरींनी नि पाण्याच्या प्रवाहाच्या थपडांनी अंगावर जन्मभर उठलेल्या वळांवर देवाने एकदाची फुंकर घातली.
जाती-पातीच राजकारण मी किंवा माझ्या कुळातल्यानी कधीच केल नाही पण आता मात्र या सार्या विचारांच्या परीक्षेची परिसीमा झाली होती. गरीब, श्रीमंत, सोवळ्यातील, बिगर सोवळ्यातील आणि पुरोगामी असणार्यांचीही मजवरी श्रद्धा जडली होती. सण-वार, जावळ, लग्न, जागरण गोंधळ आणि उद्घाटनालाहि नारळे फुटू लागली.

इथवरही माझ काही म्हणण नव्हत. मी नेहमीच सर्वांसाठी चांगल मागत आलो होतो त्यामुळे लोकांच्या समस्यांसाठी देवाची करून भाकणे माझ्यासाठी नित्याचेच होते. पण कुण्या एका आमिराचे, मुलगा होण्याचे स्वप्न पूर्ण होणे म्हणजे एक निम्मित झाल आणि आता नवस-सायासांना सुरुवात झाली. ज्याची स्वप्नही पहिली नाहीत अशी सुगंधी चंदन आणि शेंदुराची, पुटच्या पुट मजवर चढू लागली.

जो तो मज जवळ येऊन आपली दुखणी मांडू लागला. त्यांच्या डोळ्यातील वेडी आशा पहिली कि आशावादाची कीव यायला लागली. लोकांच्या श्रद्धेच आता ओझ वाटायला लागल पण गावच्या सुखापुढे मला माझ्या वैचरिक विवंचनेचा विसर पडत असे.

असाच एकदा गावचा गवंडी आजारी पडला, सार्या गावाने मला साकड घालण्याच ठरवल. साऱ्यांनी दुवा मागितली पण ऐन साकड्याआधीच गवंडी गावाला कायमच सोडून गेला. तेव्हड्यात कोणी पोरग ओरडल, “ब्रम्मा कावला असणार… “माझ्या काळजात चर्रर्र झाल.

कधी नव्हे तर माझ्या मनाला पाझर फुटला, गहिवर दाटला तसं आतलं कोरडेपण विरत चालल्याचं जाणवल.सार्या गावाला ओरडून सांगावस वाटलं,” नाही रे, मी रागावलो नाही रे. हि एकी, हे आपलेपण मलापण हव हवस वाटू लागलय. माझापण जीव तुटतो रे चांगल माणूस गेल की …” पण माझा आवाज त्या सुगंधी चंदानाच्या पुटातच कोंडून राहिला.

मयतीच्या गर्दीने आणि दाटलेल्या हुंदक्यांनी गवंड्याच्या आयुष्याचे सोने झाले. अंधार पडू लागल्याची जाणीव झाली तसं लोकांनी गवंड्याला खांद्यावर उचलला आणि सत्य असणार्या रामनामाच्या गजरात गवंड्याच्या जीवनाचा सर्वात मोठा सोहळा सुरु झाला.

दाटून आलेल्या आभाळाकडे मी रडवेल्या डोळ्यांनी पहिले आणि कडाडणाऱ्या विजांतून देव माझ्यावर हसत असल्याचा भास झाला. नदिच्या ज्या तीरावारून गवंडी बुवांनी मला उचलून आणले त्याच तीरावर मावळत्या सूर्याच्या साक्षीने गवंड्याने शेवटच्या प्रवासाला प्रयाण केले.
मराठवाड्यातील माझ्या मूळ पुरुषाने बारवाच्या या वाडीकडे पाहून हात जोडले तसा मला देवपणाचा खरा अर्थ उमगला. पिंपळाच्या पारावर चेतनाहीन झालेला ब्रम्हा हात आणि मन उघडून आशीर्वाद देत होता. आसमंतात केवळ ब्राम्हणाचा मंत्रघोष घुमत होता.

“नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः । न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥ “
——— —————— ————————— —————————— ————————————— मुकुंद.(पराग देशमुख.)

धर्मवाङ्मयकथामुक्तकभाषासाहित्यिकसमाजप्रवासविचारलेखप्रतिभा

प्रतिक्रिया

जव्हेरगंज's picture

28 Jan 2017 - 11:53 am | जव्हेरगंज

अतिषय संदर!!!!

ज्योति अळवणी's picture

28 Jan 2017 - 11:33 pm | ज्योति अळवणी

मस्त

संदीप डांगे's picture

29 Jan 2017 - 1:59 pm | संदीप डांगे

सलाम परागभौ, काय लिहिलंय.. मस्त! लिहित राहा.

पराग देशमुख's picture

30 Jan 2017 - 7:18 pm | पराग देशमुख

जव्हेरगंज, ज्योति अलवनि, संदीप डांगे...आभार
तस खूप जून लिखाण आहे हे... पूर्वीची माझी हि शैलीजड वाटते, आता मात्र सध्या शब्दात खूप काही बोलून जाणार्या दिग्गजांचा हेवा वाटतो.
साध लिहिता यायला हवं... मिपाच्या साथीने ते जमेलच म्हणा...

अनिरुद्ध.वैद्य's picture

1 Feb 2017 - 8:38 am | अनिरुद्ध.वैद्य

आवडलं मनोगत!! पण ब्रम्मा म्हणजे नेमकं काय?

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 8:59 am | संदीप डांगे

देवळात असलेला नारळ फोडण्याचा दगड. विदर्भात काही भागात हा शब्द प्रचलित आहे.

पराग देशमुख's picture

1 Feb 2017 - 11:43 am | पराग देशमुख

ब्रम्मा म्हणजे पारावर, महिरपीत, बांधावर, वेशीवर शेंदूर फासून तयार केलेला देव. जो अमूर्त आहे, ज्याला सार्वभौम असा इतिहास नाही, स्थानपरत्वे ज्याची कथा बदलत जाते तो. मूळ शब्द ब्रम्हदेव. म्हसोबा, बिरोबा, मुंजा अशा इतर संदर्भाने येणाऱ्या अनेक संबोधनाने गर्मीण भागात ओळखला जातो.

संदीप डांगे's picture

1 Feb 2017 - 12:19 pm | संदीप डांगे

अर्र्देवा... मी काही भागात नारळ फोडण्याच्या जागेला ब्रम्मा म्हणतांना ऐकलंय. माझं कन्फुजन झालं बहुतेक. म्हणजे जिथे ब्रह्मा आहे तिथे नारळ फोडायची जागा केली असल्याने हा गोंधळ झाला असावा.

पैसा's picture

1 Feb 2017 - 7:32 pm | पैसा

खूपच छान आणि वेगळं लिखाण!!