संगीत सम्राट तानसेन यांचे समाधीस्थळ.

संगीत रत्नाकरमधे सांगितलेल्या कथेवर तानसेन आणि त्यांच्या घराण्याचा विश्वास होता. सारंगदेवाने म्हटले आहे की मार्ग संगीत हे खुद्द ब्रह्मानेच जन्माला घातले आहे आणि ते सामवेदातून लोकापुढे आले. यालाच सामवेदामधे नादविद्या म्हटले आहे. नाद हा ब्रह्माचाच एक अवतार आहे असे मानत. म्हणूनच नादाला नादब्रह्म असेही संबोधत. शंकराकडून या विद्येचे प्रथम ग्रहण पार्वती आणि सरस्वती यांनी केले आणि मग सुरु झाली एक परंपरा. यानंतर ही विद्या ग्रहण केली त्या त्या काळात गणपती, नारद आणि मारूती यांनी. गंधर्व, किन्नर इ. जमातींनी ही विद्या नारदांकडून ग्रहण केली.
नारदाच्या संगीत शिक्षणाची एक मजेशीर हकिकत अदभुत रामायणामधे दिली आहे.
शंकराकडून संगीतविद्या ग्रहण केल्यावर नारदाला त्याच्या ज्ञानाचा अतोनात गर्व झाला होता. त्याच्या ते लक्षात आणून देण्यासाठी श्रीविष्णूने नारद ऋषींना स्वर्गात नेले. तेथे एका विशाल महालात पाऊल टाकताच जे दृष्य नारदमुनींना दिसले त्याने त्यांच्या अंगावर काटा उभा राहिला. तेथे अनेक स्त्री पुरूष वेदनेने विव्हळत पडले होते. काहींचे पाय तुटले होते तर काहींचे हात. आपण चुकून नरकात तर आलो नाही ना असे नारदाला वाटले. या सगळ्यांची ही अवस्था कशी काय झाली ? कोण आहेत हे ? असे नारदाने श्रीविष्णूला विचारले. त्यावर श्रीविष्णूंनी जे उत्तर दिले की हे सगळे राग आणि रागिणी आहेत. पृथ्वीतलावर नारद नावाचा एक गायक त्यांच्या जीवाशी खेळला त्यामुळे त्यांची ही अवस्था झाली आहे. खुद्द शिवशंकरजीच येऊन, त्यांनी रागांची आळवणी केली तरच ते पूर्वपदावर येतील.
तानसेनाने या संगीताचे जे शिक्षण दिले त्यात पौराणिक गोष्टींचा बराच वापर केलेला आढळतो. त्याच शिक्षणात संगीत तज्ञ भरतऋषी, मातंग, सारंगदेव आणि कालिनाथ यांचाही उल्लेख केलेला आढळतो. मला याच्यातील फक्त सारंगदेव हेच माहीत आहे आणि तेसुद्धा संगीत रत्नाकरामुळे. तसेच हनुमानाची कथा यात नंतर घुसडलेली दिसते कारण तसा उल्लेख पुराणांमधे मी ऐकलेला नाही. असल्यास जाणकारांनी प्रकाश टाकावा.
तानसेनाने शिव आणि हनुमान यांना माता समजून या देवतांचे स्वभाव व गुण या रागात आहेत असे प्रतिपादन केले. असे कसे हे मला उमगलेले नाही. भैरव, मालकोश (मालकंस), हिंदोल, श्री, मेघ आणि दीपक या रागांचे स्पष्टीकरण त्याने या देवतांचे उदाहरण देऊन केले असे म्हणतात. त्या काळात राग ( पुरूष) रागिणी ( स्त्री) व पुत्र ( रागांचे पुत्र) याप्रकारे रागांचे वर्गीकरण करण्यात आले. अर्थात नवनवीन रागांना यात समाविष्ट करण्यात अडचण येऊ लागल्यामुळे या पद्धतीचा नैसर्गिक मृत्यू झाला व त्याची जागा “थाट” यांनी घेतली.
बसत खान आणि वज़ीर खान यांनी हे सगळे शास्त्रात बसवण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते यशस्वीही झाले. त्यांनी मेल ही संकल्पना मांडली. मेल म्हणजे आताचे थाट. थाट म्हणजे स्वरसमूह. राग निर्माण करण्याची क्षमता असलेले सात स्वर एका विशिष्ट पद्धतीत रचून त्यातून कर्णमधूर व मनाला / आत्म्याला भावणार्या रचनांना त्याप्रकारचा थाट म्हणतात. १२ थाट/मेल आहेत असे त्या काळात मानले जाई. आता १० थाटच माहीत आहेत किंवा वापरले जातात. या दोघांनी मुख्य सहा रागांचे सहा मुख्य मेल असा सिद्धांत मांडला. त्यांनी राग, रागिणी यांच्यातील साम्य किंवा फरक हा मेलांमधील तसेच वादी, संवादी स्वरातील फरकावर अवलंबून असतो असाही सिद्धांत मांडला.
वादी स्वर : एखाद्या रागातील सर्वात जास्त महत्वाचा स्वर. हा अर्थातच त्या रागाच्या रचनेत सगळ्यात जास्त वापरला जातो. यालाच अंशस्वर असेही म्हणतात.
संवादी स्वर : मुख्य स्वराबरोबर वापरल्या जाणार्या स्वरांना संवादी स्वर म्हणतात. नावाप्रमाणे या स्वरांना वादीशी संवाद साधावा लागतो, कारण तसे झाले तरच ते यशस्वीरित्या वापरता येतात. तसे नाही झाले तर संगीत बेसूर होण्याची शक्यता असते.
या १२ मेलच्या सिद्धांतानंतर त्यात बदल केला तो पंडीत भातखंडे यांनी.
श्री. भातखंडे.

त्यांनीच १० थाटांची संकल्पना मांडली व तीच आता सर्वार्थाने रूढ आहे. आपल्याला माहीतच आहे की पंडीत भातखंडे यांनी वज़ीर खान यांच्याकडे काही काळ तालीम घेतली होती. त्या काळात त्यांनी त्यांच्याकडून बरेच संगीत अवगत केले. विशेषत: धृपद.
सम्राट अकबराच्या दरबारातील एक रत्न म्हणून आपल्याला तानसेन माहीत आहे पण अबू फज़लने तो भरतऋषींनंतरचा हिंदुस्थानात होऊन गेलेला सगळ्यात थोर असा संगीतकार व गायक होता असे नमूद केले आहे आणि असे अकबराचेही मत होते असे म्हटले आहे. तानसेन स्वत: गुरू शिष्य परंपरा मानणारा होता आणि तो अवधचे बाबा रामदास आणि वृंदावनचे स्वामी हरिदास यांना गुरू मानायचा. हे दोघेही संगीताला शंकराचा अवतार मानायचे आणि हनुमानाला ते संगीत लोकांपर्यंत पोहोचवायचे काम स्वत: शंकराने सांगितले आहे असे मानायचे. अर्थात तानसेनचेही शेवटपर्यंत तेच म्हणणे होते. तो जरी अरेबिक आणि पर्शियन संगीताच्या संपर्कात आला होता तरीही.
मागे म्हटल्याप्रमाणे भारतीय संगितावर प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष अरेबिक, इजिप्त व ग्रीक संगिताचा प्रभाव पडला होता तो तानसेन यांच्या गायनावर ही पडला नसता तर नवलच. हा प्रभाव पडला त्यांचे एक अध्यात्मिक गुरू पीर मुहम्मद गौस, जे ग्वाल्हेरला असायचे, त्यांच्याकडून.
पीर मुहम्मद गौस यांचा दर्गा.-

तानसेन हा स्वत: एका बनारसी गौड
ब्राह्मणाचा मुलगा होता आणि त्याला स्वामी हरिदास यांनी नादब्रह्मविद्या प्रदान केली तर ग्वाल्हेरच्या या पिराने त्याला सुफी संप्रदायाची आणि त्या तत्वज्ञानाची ओळख करून दिली. जरी त्याने एका मुसलमान स्त्रीशी लग्न केले असले तरीही त्याने वैदिक परंपरा सोडल्या नव्हत्या आणि त्या पाळण्यात त्याला कसल्याही अडचणी आल्या नाहीत. त्याच्या जीवनात व संगीतात त्याने वेद, भक्तीरस आणि सुफी संगीत याचा मेळ घालून त्याने संगीत व स्वत:चे जीवन अशा उत्तुंग पातळीवर पोहोचवले की त्याच्या जवळपास जाणे केवळ अशक्य आहे. या प्रभावामुळे त्याच्या रचनांमधे जसे हिंदू देवदेवता आल्या तसेच प्रेषित मोहम्मदही आले. वज़ीर खान यांनी या सुफी प्रभावाबद्दल काय म्हटले आहे ते बघू -
" संगीताची सुरवात ही एका पक्षामुळे झाली असे पर्शियन दंतकथा सांगते. या पक्षाचे नाव होते मौसिकार. याच्या चोचीला सात भोके होती आणि याचा वापर करून तो सात स्वर काढायचा. याच स्वरापासून सा..रे..ग.. हे सात मूळ स्वर निर्माण झाले."
पर्शियन आणि अरब विद्वान हे ग्रीक तत्ववेत्ता व गणिती पायथागोरसला संगीतावरचे पहिले पुस्तक लिहिणारा मानतात. पायथागोरसने त्याचे संगीतावरचे पहिले पुस्तक ५०० बी.सी मधे लिहिले, ते होते “ मौसिकी”. ग्रीक भाषेत मौ म्हणजे हवा आणि सिके म्हणजे गाठ. मौसिके याचा अर्थ होता हवेत गाठ मारणे. याचा संदर्भ बहुतेक फुंक मारून वेगवेगळे स्वर काढणे हा असावा. कल्पना नाही. या पुस्तकामुळे पर्शियन आणि अरेबियन लोक संगीताला मौसिकी म्हणत. पायथागोरस हा सांख्यवादी होता आणि त्याने भारतात येऊन संगिताची मुलभूत तत्वे आत्मसात केली होती असेही म्हणतात व त्यावरही अनेक लेख आपल्याला सापडतील.
तानसेनच्या परंपरेमधे अजून एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख सापडतो. तो म्हणजे अरस-ता-तालीस.
अरस-ता-तालीस

हा अरस-ता-तालीस म्हणजे दुसरा कोणी नसून आपण ज्याला आरिस्टॉटल म्हणतो तोच. याला तीन अरब शिष्य होते त्यांची नावे ज्यांचा उल्लेख सापडतो ते होते हकीम सुखरात, हकीम बोखरात आणि हकीम जालिनूस.
पर्शियाचा राजा मरून रशीद याच्या काळात या वरील तीन हकिमांची परंपरा एका थोर संगीततज्ञाने पुढे चालवली. त्याचे नाव होते कुंदी.
हरून अल रशीद
याने पायथागोरसचे हे लेखन अरेबिकमधे भाषांतर केले आणि पर्शियन शास्त्रज्ञ अबू अली सिना (ज्याला पाश्चात्य देशात एव्हिसेना म्हणून ओळखले जाते) याने या सगळ्याचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला.
हरून अल् रशीद

खलिफा हरून अल् रशीद जेव्हा बगदादवर राज्य करत होता, तेव्हा संगितावर आलेली बंधने झुगारून संगिताच्या क्षेत्रात आनेक रत्ने झळकली. उदा. सायेब, अशिब, तायिब, नासीर, इब्राहीम मुसली अणि इसाक बीन इब्राहीम. ग्वाल्हेरच्या पीर साहेबांना वर उल्लेख केलेल्या संगीततज्ञांच्या परंपरेतून संगीताचे धडे मिळाले व तानसेन यांच्या परंपरेत याच काळात त्यामुळे अरेबिक संगिताचा शिरकाव झाला.
हज़रत महोम्मद गौस यांच्याच काळात हे होत होते असे समजायचे काही कारण नाही. उत्तर भारतातील संगितावर तुर्कस्तानच्या संगिताचा प्रभाव पार शक आणि हुणांपासून पडत आला होता. तुर्कस्तानचे संगीत हे पर्शियाच्या संगीताला जवळचे होते. पठाण जेव्हा दिल्लीवर राज्य करत होते म्हणजे जेव्हा मुहम्मद तुघलक राज्य करत होता, त्या काळाच्या आसपास खुस्रोने दिल्ली दरबारात पर्शियन संगीत पेश केले.
अमीर खुस्रो.

त्याने पर्शियन पद्धतीचे संगीत दरबारात आणले आणि त्याला नाव दिले कव्वाली. हे जे पर्शियन संगीत होते याचा पाया होता १२ मौकामिस (मुख्य राग), २४ सुभास (रागिनी) आणि ४८ गुस्सा (उपराग). हिंदुस्तानी आणि पर्शियाच्या मिलापामधून त्याने अनेक नवीन राग निर्माण केले असे म्हणतात.
अमीर खुस्रोच्या काळातील अजून एक थोर संगीततज्ञ आपल्याला सिनेमामुळे माहीत आहे आणि तो म्हणजे बैजू बावरा.
बैजू बावरा

यांनी संस्कृत संगीतातील प्रबंध गायकीचे ध्रुपद गायकीत रुपांतर केले. बैजू बावरा हे राग आणि रागिणीचे फार मोठे तज्ञ होते. दुर्दैवाने पठाणांच्या सरकारी/दरबारी कव्वाली पद्धत रुजू झाल्यामुळे ध्रुपदाला तेथे अजून स्थान मिळाले नव्हते.
पठाणी सत्तेचा अंत झाल्यावर ग्वाल्हेरचे राजा मानसिंग तोमर यांनी स्वत:च्या दरबारात चार थोर गायक/वादक नेमले. त्यांची नावे होती भाम, चर्जू, धुंडीवर आणि चंचल. संगीत नायक अशी पदवी देऊन त्यांना दरबारी मानाच्या जागा दिल्या. याच वेळी या चौघांमुळे कव्वाली हा प्रकार मागे हटवून ध्रुपद गायकीने आपले महत्व परत प्रस्थापित केले. ग्वाल्हेरचे पीर गौस हे राजा मानसिंगचे चांगले मित्र होते आणि जरी पर्शियन संगीत येथे रुजवण्यामधे त्यांचा महत्वाचा सहभाग असला तरीही ध्रुपद गायकी आणि भक्तीमार्गाचा त्यांचा चांगला अभ्यास होता आणि ते त्याचे पुरस्कर्तेही होते.
राजा मानसिंग तोमर -

वृंदावन येथे स्वामी हरिदास हे बैजूबावरा यांच्या ध्रुपद गायनाची पद्धत वापरत असत पण त्यात त्यांनी अतोनात गोडवा भरला होता. तीच पद्धत ते शिकवतही असत. त्यामुळे तानसेनच्या संगीतात ध्रुपद गायनाचाही शिरकाव झाला. एवढेच काय पीर घौस यांनीही तानसेनला ध्रुपद गायन शिकण्यासाठी व गाण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन दिले.
सम्राट अकबर.

अकबराचे जे सर्व धर्मांना सामावून घ्यायचे धोरण होते, त्यानुसार त्याने तानसेनला त्याचा संगीताचा गुरू म्हणून नेमले. लक्षात घ्या, त्या काळात गुरूचे महत्व वादातीत असे. अकबराने तानसेनला आपल्या दरबारातही जागा दिली आणि त्याचवेळी त्याला गुरूपदही दिले. ही नाती त्या दोघांनी कशी निभावली असतील हे ते दोघेच जाणोत. तानसेन अकबराचा गुरू असल्यामुळे दरबारात ध्रुपद गायनाचे महत्व आता खूपच वाढले आणि ते सर्वोच्च संगीत मानले जाऊ लागले. या काळात अकबराने त्याच्या दरबारात ’ती’ प्रसिद्ध नऊ रत्ने नेमली आणि त्यांना मानाच्या जागा दिल्या. याच सुमारास तानसेनने अनेक नवीन रागांची भर घातली. त्यातील काहींची नावे आपल्या परिचयाची आहेत – दरबारी कानडा, दरबारी तोडी, मियाँकी मल्हार, सारंग इ. इ. त्याने जवळवळ १००० ध्रुपदे रचली. ( मला वाटते सध्या जो शब्द “ध्रुवपद” आहे तो यावरूनच आला असावा.) याच्यातील बरीच देवदेवतांचे स्तवन करणारी होती तर काही राजांची स्तुतीगीते होती. या सर्व संगीतात वेदांत, भक्तीरस आणि सुफी संगीताचा सुरेख संगम आढळतो. सध्या जी सुफी गाणी आपल्याला ऐकायला मिळतात त्यात आपल्याला याचा थोडासा भास होईल.
ध्रुपद गायन हे मुख्यत: मंदिरात देवासाठी केले जात होते त्यामुळे त्याचा मूळस्वभाव हा फारच गंभीर होता. तानसेनने त्यात गमक आणि मिंड इ. गोष्टी वापरून ते गाणे अधिक रंगतदार केले आणि त्यामुळे ते जनसामान्यात लोकप्रिय झाले. अकबराच्या पाठिंब्यामुळे त्याने लवकरच ध्रुपद्गायनाची शाळा चालू केली. रबाब मधून रुद्रवीणा/सरस्वती वीणा तयार करण्यात त्याचे महत्वाचे योगदान होते असे म्हणतात पण मला वाटते हे तितकेसे बरोबर नसावे कारण वीणा त्याहूनही प्राचीन आहे असे वाटते. नशिबाने त्याच्या वंशजांनी आणि शिष्यांनी त्याची ही थोर संगीताची परंपरा चालू ठेवून आपल्यावर आणि आपल्या येणार्या पिढ्य़ांवर उपकारच करून ठेवले आहेत. त्याच्याच काही वंशजांनी रचलेले काही राग बघा – बिलासखानी तोडी, तिलककामोद, पुरियाकल्याण, कौशिकीकानडा इ. इ....
या वंशजांनी आणि शिष्यांनी गौहर बानी –शांतरस जो सुमधूर शांत स्वरांनी उत्पन्न केला जायचा, डागोरबानी – श्रुंगार रस – जो गमकांनी आणि वक्रताना घेऊन उत्पन्न केला जायचा, खंडरबानी-करूण रस- जो स्वरात जलद कंपने आणून उत्पन्न केला जायचा, नौहरबानी-वीररस – जो या स्वरांवरून त्या स्वरावर जात मोठ्या तडफेने गात उत्पन्न केला जायचा याची परंपरा चालू ठेवली आणि त्यात भरही घातली. उत्तर हिंदुस्थानात जी वाद्ये तयार होत गेली तीही याच चार पद्धतींना अनुसरूनच झाली. उदा. वीणा, रबाब, सुरसिंगार आणि सतार. शाह सदारंग हा तानसेनचाच वंशज होता असे मानले जाते, त्याने ख्याल गायकीचा पाया रचला.
वीणा.

रबाब

सुरसिंगार

सतार

थोडक्यात आपण असे म्हणू शकतो की सध्या जी संगीताची घराणी आपल्याला दिसतात आणि जी अभिमानाने आपली परंपरा चालवतात त्या सर्वांचे मूळ तानसेनच्या घराण्यात आहे.
क्रमशः
जयंत कुलकर्णी.
पुढच्या भागात या सर्व वाद्यांचे आवाज आपण ऐकणार आहोत. म्हणजे आपल्या लक्षात येईल की वाद्ये कशी बदलत गेली किंवा त्यांचा गंभीर स्वभाव म्हणजे काय......
प्रतिक्रिया
21 Dec 2011 - 5:03 pm | मन१
वाचतोय.
21 Dec 2011 - 6:16 pm | चित्रा
लेख अतिशय आवडला. लेखातील दंतकथा गंमतीदार आहेत!
धन्यवाद.
21 Dec 2011 - 7:57 pm | अन्या दातार
गमक आणि मिंड म्हणजे काय नक्की?
शेवटी सतार या शीर्षकाखाली अकबराचे चित्र चुकीने डकवले आहे. अमजद अली खान यांच्या हातात बघितलेली सतार अकबरासारखी नक्कीच दिसत नाही ;)
लेख नेहमीप्रमाणेच रोचक व माहितीपूर्ण. :)
21 Dec 2011 - 10:30 pm | रामपुरी
अमजद अली खान यांच्या हातात बघितलेली सतार ???
इथे कुणीच बघितलेली असेल असं वाटत नाही. :) :) :) ते सरोद वाजवतात
21 Dec 2011 - 11:38 pm | अन्या दातार
Oops!
गलतीसे मिस्टेक हुआ भाई! नेमके आता संपादित करता येत नसल्याने इथे सुधारत आहे.
अमजद अली यांच्याजागी पं. रविशंकर असे वाचावे :)
24 Dec 2011 - 3:26 pm | जयंत कुलकर्णी
काही उदाहरणे - (एवढी चांगली नाहीत पण दिली आहेत)
गमक :
खटका :
अजून नंतर देईन.
21 Dec 2011 - 9:40 pm | विकास
लेख एकदम आवडला! माहितीपूर्ण.
तानसेनच्या परंपरेमधे अजून एका व्यक्तिमत्वाचा उल्लेख सापडतो. तो म्हणजे अरस-ता-तालीस.
हे नक्की कुठे ते समजले नाही.
22 Dec 2011 - 8:43 am | जयंत कुलकर्णी
ज्या लेखकाच्या लेखावर हा लेख आधारीत आहे ते रामपूर घराण्याचे होते. आपल्याला माहीत असेल की रामपूर दरबाराचे राजगायक हे तानसेनचे रक्ताचे वंशज होते आणि त्यांच्याकडे अनेक जूनी हस्तलिखिते होती, ती आजही तेथे आहेत (असे प्रस्तूत लेखकाने म्हटले आहे) व त्या लेखकाने बघितली आहेत .... त्यात हा उल्लेख आहे...असे समजते...
21 Dec 2011 - 10:07 pm | यकु
वाचनीय.
मौसिकी - म्युझिक अशी उत्पत्ती आहे का?
21 Dec 2011 - 11:45 pm | विनोद१८
श्री. जयन्तराव कुलकर्णी,
अप्रतीम ज्ञाननवर्धक लेखमाला....
धन्यवाद
विनोद१८
22 Dec 2011 - 12:18 am | अर्धवटराव
संगीत खरोखरच एक सरीता आहे जी भूत-वर्तमान-भविष्य अशी अखंड वाहत राहते. हा प्रवाह फार सुंदर रितीने वर्णन करताहेत जयंतराव.
फारच सुंदर.
अर्धवटराव
22 Dec 2011 - 12:53 am | वाहीदा
कुलकर्णीसर,
पीर मुहम्मद घौस यांच्या ऐवजी ते पीर मोहम्मद गौस असे आहे
कारण ग हे अरेबिक अल्फ़ाबेट "गएन" वर आधारित आहे
मौसिकी वर मी ही काही लेख लिहीले आहेत तुम्हाला जरुर वाचायला देईन
असो बाकी लेख उत्तम !
22 Dec 2011 - 8:59 am | जयंत कुलकर्णी
चूक सुधारली आहे. अशी कशी काय झाली चूक..................? माफी करावी.....
22 Dec 2011 - 1:08 pm | प्रास
आमच्या चूका सुधारण्यासाठी आम्हाला संपादकांपाठी धावावं लागतंय आणि चूक तुमची तुम्हीच सुधारली म्हणता तर परा म्हणतो ते छुपे संपादक तुम्हीच तर नाही? ;-)
(कृ. ह. घे. :-)
बाकी लेखमाला वाचतोय. आता त्यावर विचारही करेन.
:-)
22 Dec 2011 - 5:42 pm | जयंत कुलकर्णी
नाही. मी छूपा संपादक नाही ! खात्री बाळगा.
22 Dec 2011 - 6:45 am | स्वाती२
माहितीपूर्ण लेख आवडला.
22 Dec 2011 - 8:27 am | प्रचेतस
सुंदर लेख.
पुढच्या भागाची वाट पाहातोय.
22 Dec 2011 - 1:02 pm | मूकवाचक
सुंदर लेख. पुढच्या भागाची वाट पाहातोय.
22 Dec 2011 - 5:23 pm | मिसळलेला काव्यप्रेमी
अत्यंत माहितीपूर्ण लेख...
पुढील भागाची अतुरतेने वाट पहात आहे.
23 Dec 2011 - 12:17 am | पैसा
सोबतची छायाचित्रंही फार मोलाची आहेत.