काय मिळवायचय तुम्हाला ?.........४

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
7 Mar 2011 - 8:18 pm

तिच्या डोळ्यात पाणी तरळल्याचा भास झाला मला. का खरंच होतं ते ?............

“अगं ऐकतरी ! आज सकाळी जोशीसाहेब माझ्या अगोदर प्लॅंटमध्ये आले होते. प्लॅट बंद करायचा म्हणत होते ते.”
तिच्या चेहर्‍यांवरचे भाव भराभर बदलत गेले. तिच्या चेहर्‍यावर बालिश उत्सुकता पसरली.
“खरंच बंद करणार आहेत का ते ? अगदी बरे होईल !”
“हो ना परिस्थिती फारच वाईट आहे.”
“त्यांच्याशी पुढच्या नोकरीच्या जागेविषयी बोललास का काही ? इथल्यापेक्षा चांगल्या गावात जाऊ बाबा आता. कंटाळा आला इथे.”
मला हसावं का रडावं ते कळेना. “नाही, मी त्या विषयावर त्यांच्याशी काहीच बोललो नाही. माझी नोकरी इथेच आहे आणि मी इथेच राहणार आहे.”
“नाही म्हणजे, हा प्लॅंट जर बंद होणार आहे तर आपण कुठे जाणार हे कळायलाच पाहिजे ना ! तुला नाही वाटत का उत्सुकता ?”
“अगं ते नुसते बोलत होते. एवढा मोठा प्लॅंट कोण बंद करायला निघालंय ?”
“हात्तीच्या ! मला वाटलं इथून सुटका होईल !”
मी तिच्याकडे रोखून बघितले. “खरंच तुला इथून बाहेर जायचे आहे. हो ना ?”
“हो. हे काही माझे गाव नाही. तुझे आहे. तुला या गावात रहायला आवडते हे नैसर्गिकच आहे. मला तसं वाटत नाही हे पण नैसर्गिकच आहे. नाही का ?”
“स्मिता आपण इथे येऊन फक्त सहाच महिने झालेत अगं !”
“मग काय कमी आहेत का ते ? माझ्या ओळखीचे इथे कोणीही नाही. ना मित्र ना ओळखी. कसा वेळ घालवू मी इथे? बोलायला फक्त तूच आणि तूही सगळा वेळ तुझ्या कामातच असतोस.”
“का माझ्या घरचे आहेत ना ?”
“हो चांगले आहेत ते, पण तुझ्या आईबरोबर एक तास जरी काढला तरी मला वेड लागायची वेळ येते. त्यापेक्षा जास्त वेळ नाही काढू शकत मी त्यांच्याबरोबर. सहा महिने नाही, सहा वर्षे काढल्यासारखी वाटताएत मला.”
“मग आता काय करु म्हणतेस ? मी काही इथे स्वत:हून आलेलो नाही. त्यांनीच मला इथे पाठवले. नशीब माझे.”
“तू केव्हापासून नशिबाच्या गोष्टी करायला लागलास ?”
“हे बघ, मला काही तुझ्याशी भांडत बसायला वेळ नाही.”
आता मात्र तिच्या डोळ्यातून पाणी ओघळले.
“बरं जा तू आता. मी एकटीच बरी आहे इथे. नेहमीसारखी.” तिच्या बोलण्यातील कटूता मला चांगलीच जाणवली.
मी काहीच न बोलता, तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि गप्प उभा राहिलो.
डोळ्यातील पाणी थांबल्यावर ती मागे सरकली आणि म्हणाली “जाऊ देत रे, तुला जावे लागणारच असेल तर तू तरी काय करणार ? जा तू.!
“ए आपण उद्या जाऊया का ?”
“बरं, उद्याचं उद्या बघू”
“मी जरा तुझ्यासाठी फ्रीजमधे काही आहे का ते बघते.”
मी आत्तापर्यंत जेवणाचे पार विसरुन गेलो होतो.” राहू देत ! मी आता जातानाच काही मिळतंय का ते बघतो.”

गाडीत बसून ती सुरु करेपर्यंत माझी भूक पार मेली होती.

आम्ही नवापूरला आल्यापासून स्मिताला इथे राहणे अवघडच वाटत चाललंय. नवापूरचा विषय निघाला की झालीच चिडचिड चालू आणि मग वाद. माझ्या गावाला उगीचच नावं ठेवलेली मलाही आवडत नाहीत.
माझा जन्म तर नवापूरचाच त्यामुळे मी इथे आरामात होतो. सगळे रस्ते मला पाठ आहेत. चांगली हॉटेल्स, रेस्टरॉं, ढाबे, दारूचे गुत्ते, बाजार, सगळे मला तोंडपाठ आहे. कुठे जायचे आणि कुठे जायचे नाही हे पण मला माहीत आहे. माझ्या गावाला माझ्या मनात एक खास स्थान आहे. त्यात काही चूक आहे असे मला तर वाटत नाही. १८, कमी नाही, १८ वर्षे राहिलोय मी इथे.

अर्थात नवापूरविषयी काही चुकीच्या कल्पना माझ्या मनात मुळीच नव्हत्या. ते एक सामान्य गिरणगाव आहे. त्यातून हामरस्त्यावर फिरताना कोणालाच काही विशेष बघण्यासारखं काही आढळत असेल असं वाटत नाही. आत्ता आजूबाजूला नजर फिरवल्यावर क्षणभर मलाही तसेच वाटले. कारखाने सोडले तर इतर गावांसारखे एक सामान्य गावच आहे नवापूर. नवीन नवापूरात नवीन वस्ती, एवढंच. एक दोन नवीन मॉल मात्र झालेत.

नवापूरच्या मध्यवस्तीत तर परवा परवापर्यंत अगदीच भकास वाटायचे. जुने पडके वाडे, रिकामी दुकाने, चाळी, काही विचारु नका. रेल्वेलाईनवरचे गाव, पण एखादीच ट्रेन जायची या ट्रॅकवरुन. याच रस्त्याच्या टोकाला नगरपालिकेची नवीन इमारत दिमाखात उभी आहे. धुरकट आकाशाच्या पार्श्वभूमीवर तेवढी एकच इमारत उठून दिसते. १०/१५ वर्षांपूर्वीच बांधून पूर्ण झाली ती. मला आठवले, त्या निमित्ताने आमच्या अग्नीशामकदलाने एक नवीन आगीचा बंब घेतला होता. कारण दिले होते- जुन्या बंबांनी एवढे उंच पाणी जाणार नाही. मनात आले, ते अजूनही त्याला आग लागण्याची वाट बघत असावेत. त्या कल्पनेने मला हसू आले. ही इमारत नवापूरचा मानबिंदू होती, मागच्या वर्षांपर्यंत. मागच्या वर्षी पालिकेचे दिवाळे निघणार होते तेव्हा त्यांनी एक मोठी पाटी त्या इमारतीच्या पार वरच्या टोकाला लावली आहे “विकणे आहे” आणि त्याखाली त्यांनी एक फोन नंबर पण दिला आहे. ते आर्थिक संकट टळलं पण बावळटांनी अजून ती पाटी काढलेली नाही. या हमरस्त्यावरुन त्या पाटीकडे बघितले की असे वाटते सारे गावच विक्रीस काढले आहे की काय, फार काही खोटं नाहीए ते, परिस्थिती तशीच होती आणि तशिच आहे.

माझ्या कामाला जाण्याच्या रस्त्यावर एका मोठ्या कारखान्याची भिंत लागते. कारमधून जाताना १० मिनिटे ती भिंत संपत नाही म्हणजे तो कारखाना किती मोठा असेल बघा ! तारेचे कुंपण आणि त्याच्या आत जवळजवळ १ ते २ एकर सिमेंटचे कार पार्किंग दिसते. त्याला आता भरपूर भेगा पडल्या आहेत आणि त्यातून वाळलेल्या गवताचे पुंजके बाहेर आले आहेत. गेल्या पंधरा वर्षात इथे कोणी गाडी लावली आहे की नाही कोणास ठाऊक ! त्या कुंपणाची भिंत आता रंगहीन आणि धुरकट झाली आहे. एका ठिकाणी काळ्या रंगाच्या पट्ट्याखाली नीट बघितलंत तर त्या कंपनीचे नाव अजूनही दिसते.
“नवापूर मिल.”

ती कंपनी येथील प्लॅंट बंद करुन गुजरातमधे कुठेतरी गेली आहे. त्यांनी हा कटू निर्णय युनियनच्या कटकटींना कंटाळून घेतला होता. युनियन त्यांना सोडणार नाही आणि ५ वर्षात सगळे खटले पुन्हा उभे राहतील असे युनियनचे पुढारी सांगत फिरत होते पण ५ वर्षात काय उलथापालथ होणार हे कोण सांगू शकतंय ? नवापूर मिल्सला मात्र तिकडे कमी पगारात माणसे मिळाली असणार आणि या युनियनच्या कटकटींपासून मुक्ती.

थोडक्यात काय नवापूरात आता या मिलचा भलामोठा सांगाडा, बेकारांची फौज आणि दिवाळखोरीची अवस्था याखेरीज काय उरले आहे ?

सहा महिन्यांपूर्वी या कारखान्यात जायची मला वेळ आली होती तेव्हा आम्ही आमच्य़ा ग्रुपसाठी गोदामासाठी जागा शोधत होतो. मी नवापूरचा असल्यामुळे मीही त्यांच्याबरोबर गेलो होतो. दहा वर्षांअगोदरची गोष्ट. (आणि माझ्या मनात अजून एक कारण होते. न जाणो मला पुढेमागे जास्त जागा लागली तर ? स्वप्नाळू होतो ना मी तेव्हा ! हे सगळे आठवून माझी मलाच लाज वाटली.) आत पाऊल टाकताच तेथील शांतता एकदम माझ्या अंगावर आली. इतकी शांतता मी स्मशानभूमीतही कधी अनुभवली नव्हती. आमच्या पावलांच्या आवाजाची आम्हालाच भिती वाटत होती. त्यातील सगळी मशिन्स काढली होती. नुसत्या भिंती आणि फरशा. असं वाटत होतं ज्या हजारो माणसांनी येथे घाम गाळला त्यांचा शाप घेऊन ही वास्तू उभी आहे. बंद पडलेला कारखाना बघायला लागणं हे मागच्या जन्माचं एक पाप आहे आणि धाडस आहे आणि ते करायला मनाचा मोठा खंबीरपणा लागतो आणि मिळते काय तर मनाची एक भयंकर पोकळी.

आत्ता या रस्त्याने जाताना ते सर्व आठवून आणि ३ महिन्यानंतर आपली पण अवस्था अशीच होणार या कल्पनेनेच अंगावर सरसरुन काटा आला. खरंतर मी या असल्या निराशावादी विचारांच्या अगदी विरुध्द आहे. तसा परिस्थितीला शरण जाणार्‍यांपैकी मी नाही . पण येथून दर वर्षाला एक कंपनी बंद तरी पडत होती किंवा बाहेर तरी जात होती. हजारो कामगार बेकार होत होते. कधी थांबणार हे सगळे, कोणास ठाऊक. आता आमची पाळी दिसतेय !

मला गुप्ताग्रूप ने येथे आणले तो दिवस आठवला. स्थानिक वर्तमानपत्रात त्या दिवशी खास लेख छापून आला होता. माझ्या छायाचित्रासकट. जरा जास्तच होतं ते ! पण खोटं कशाला बोलू ? खूष झालो होतो मी तेव्हा. आता छापून आले तर काय लिहीतील ते ? पळपुटा म्हणतील मला. मला तर आता असं वाटायला लागलंय, मी माझ्या मित्रांचा, गावाचा, कामगारांचा, त्यांच्या कुटुंबियांचा विश्र्वासघात करतोय. माझी मान शरमेने खाली गेली.

त्याच अपराधी मनाने मी प्लॅंटमधे पोहोचलो. वाटेतच पवार दिसला. आजच्या धावपळीने त्याचे वजन निश्चितच घटले असणार. PNQ– च्या जवळ तो उभा राहून काहीतरी बघत होता. त्या कामगाराबरोबर त्याचा बहुधा वाद चालला होता. मग एकदम तो विरुध्द दिशेने चालायला लागला. त्याला मी हाक मारली पण एवढ्या आवाजात त्याला काय ऐकू जाणार ? मग मात्र मी चक्क दोन बोटं तोंडात घालून एक सणसणीत शिट्टी मारली. पण व्यर्थ. शेवटी धावत पळत जाऊन त्याला गाठले. धापा टाकत त्याला विचारले “काय होणार का दुरुस्त हे ?”
“प्रयत्न चालू आहेत.”
“पण करु शकणार आहे का ते आपण ?
“आम्ही सर्व तर्हे ने प्रयत्न करुन बघतोय”
“आज ती ऑर्डर जाणार आहे का नाही ?”
“बहुतेक जाईल”
मी मग PNQ कडे माझा मोर्चा वळवला. खोलल्यावर ते अजूनच मोठे वाटत होते. आमच्या कारखान्यातील सगळ्यात महागडे CNC मशीन आहे ते. त्याला जांभळा रंग दिला होता. का ते विचारु नका. एका बाजूला त्याच्या कॉंप्यूटर कंट्रोलचे युनिट होते. त्यावर लाल, पिवळे, हिरवे, नारंगी दिवे चमकत होते. त्याच्या समोरच त्याचा काळा कीबोर्ड आहे. एकंदरीत दिसायला ते मशीन फारच सेक्सी होते. त्याच्या मध्यभागी जॉमधे धरलेल्या स्टेनलेस स्टीलच्या पत्र्यावर त्याचं डौलदार काम चालायचं. त्यातून जे तुकडे उडायचे ते दोन यांत्रिक हात साफ करताना दिसत होते. त्यावरच हिरवट रंगाच्या कुलंटच्या चिळकांड्या उडत होत्या. चला मशीन तर चालू झाले आहे.

मी सुस्कारा सोडला.

नशिबच म्हणायला हवे. एवढे काही झाले नव्हते त्या मशीनला. पण आत्ता ४-३० ला त्या कंपनीचा माणूस गेला होता म्हणजे आता दुसरी पाळी चालू झाली होती.

आमच्या असेंब्ली शॉपमधील प्रत्येक माणसाला आम्ही ओव्हरटाईमला थांबवून घेतले होते. खरंतर ते कंपनीच्या सध्याच्या धोरणाविरुध्दच होतं. आता हा खर्च कुठे टाकायचा हा प्रश्न होताच. पण सध्यातरी सगळे माफ आहे ! कारण ४२४२७. आत्तापर्यंत मार्केटींग मॅनेजरचे चार फोन येऊन गेले. त्यांचं डोकं त्या जोशीसाहेबांनी फिरवलेले असणार. त्याचे बील तो करणार आहे नां ! काहीही करुन हा माल आज रात्री जायलाच पाहिजे, त्याशिवाय गत्यंतर नाही.

आता यापुढेतरी काही गडबड होऊ नये म्हणून मनातील मनात देवाची प्रार्थना करत होतो. त्या मशीनवरचा एक कॉंपोनंट संपला की एक माणूस तो घेऊन सब असेंब्लीच्या भागात घेऊन जात होता. तेथे मग सबअसेंब्ली झाल्यावर दुसरा माणूस ती घेऊन शेवटच्या असेंब्लीशॉपमधे जात होता. कुठली कार्यक्षमता आणि कसलं काय ! असे हाताने कॉंपोनंटची ने आण करुन दर माणशी उत्पादन गुणोत्तराची पार वाट लागली असणार. पवारांनी एवढी माणसे आणली कुठून हेच समजत नव्हते. मी तर माझ्या प्लॅंटमधे एवढी माणसे प्रथमच बघत होतो.

मी जरा नीट बघितल्यावर माझ्या अजून एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे बर्‍याचशा खात्यात, ज्याचा काहीच संबंध या कामाशी नव्हता, त्या खात्यातही काहीच काम चालले नव्हते. कारण पवारांनी प्रत्येक खात्यातील काही माणसे या कामासाठी काढून घेतली होती. एकंदरीत सगळीकडे बोंबाबोंब होती. ही ऑर्डर अशा पध्दतीने पूर्ण करायची माझी मुळीच इच्छा नव्हती.

पण चला ऑर्डर पूर्ण होऊन माल तर अखेर चाललाय ! नॉट बॅड !

घड्याळाकडे नजर टाकली त्यात रात्रीचे ११.०० वाजून गेले होते. लोडींग अनलोडींगच्या रॅम्पवर आम्ही उभे होतो. ट्रकचा मागचा दरवाजा ड्रायव्हरने लावला. शांतपणे चालत जाऊन तो त्याच्या जागेवर बसला आणि त्याने तो अगडबंब ट्रक चालू केला, ब्रेकवरचा पाय काढला आणि हळूहळू तो ट्रक अंधारात दिसेनासा झाला. मी पवारकडे वळलो आणि त्याला म्हणालो
“अभिनंदन पवार”
“धन्यवाद ! फक्त हे मी कसे जमवले तेवढे मात्र विचारू नका”
“ठीक आहे. पण आता आपल्याला जेवायला जायला हरकत नाही.”
पवारांच्या चेहर्‍यावर मला वाटतं आजच्या दिवसातलं पहिलंच हास्य पसरलं.

त्याच्याच गाडीतून मग आम्ही बाहेर पडलो. बरीचशी हॉटेल्स तोपर्यंत बंद होत आली होती. नदीवरचा पूल ओलांडून आलो तरी एकही हॉटेल उघडे दिसेना. मग मात्र मी पवारला मी सांगतो तिकडे गाडी घ्यायला सांगितली आणि नवापूरमिलचा रस्ता पकडला. मधेच एका रस्त्यात डावीकडे वळून जवळजवळ गावाबाहेर आल्यावर झोपडीसारख्या दिसणार्‍या हॉटेलच्या समोर पवारला गाडी थांबवायला सांगितली.
“बरोबर आहे ना जागा ?” त्या हॉटेलचा एकंदरीत अवतार बघून पवार म्हणाला.
“गावात सगळ्यात चांगली भाकरी येथेच मिळते या ! पवार घाबरु नका.” मी म्हणालो.
“आणि तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही याची खात्री, मी देतो तुम्हाला.”
आत गेल्यावर एका कोपर्‍यातील टेबल आम्ही पकडले. गल्ल्यावरच्या जाफरने मला लगेच ओळखले आणि तो माझ्याकडे बघून हसला आणि आमच्याकडे यायला निघाला.
“ही जागा कशी काय माहिती बुवा तुम्हाला ?”
“माझी पहिली बिअर मी येथेच प्यायलो” मी हसून म्हणालो आणि गंमत म्हणजे याच टेबलावर !”
“तुम्ही बिअर उशीरा प्यायला चालू केली का तुम्ही येथीलच आहात ?” पवार हसत म्हणाला.
“या येथून पलिकडे दोन इमारतींनंतरच्या गल्लीत मी लहानाचा मोठा झालो. माझ्या वडिलांचे पलिकडेच वाण्याचे दुकान होते. आता १५ वर्षानंतर बदल्या होत होत परत येथे आलोय.”
“अरेच्चा ! तुम्ही येथलेच आहात हे माहीत नव्हते मला.”
तेवढ्यात जाफर बिअरचे भरलेले मग घेऊन आला.
बारच्या मागे बोट दाख्वून जाफर मोठ्याने हसत म्हणाला. “हे अब्बाजाननी त्यांच्यातर्फे पाठवले आहेत ! विसरले नाहीत अजून तुला ते.”
मी मान उंच करुन बघितले आणि हात हलवला. म्हातारा अजून मस्त टवटवीत आहे.

पवारने ग्लास उंचावला आणि म्हणाला ’चिअर्स ! ४१४२७ साठी.”...........

जयंत कुलकर्णी.

जर याचा कंटाळा आला तर पुढेमागे ही लेखमाला बंद करायचा हक्क लेखक राखून ठेवत आहे.

कथासमाजजीवनमानतंत्रअर्थकारणअर्थव्यवहारगुंतवणूकशिक्षणविचारअनुभवमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

पाषाणभेद's picture

7 Mar 2011 - 8:27 pm | पाषाणभेद

तुमचे नवापुर कोठे आहे? मला जे नवापुर माहित आहे तेथे असली मिल वैगेरे काही नाही.

जयंत कुलकर्णी's picture

7 Mar 2011 - 8:30 pm | जयंत कुलकर्णी

हे काल्पनिक आहे !

:-)
यातले सगळेच काल्पनिक आहे....

मस्त वर्णन मजा येतेय.
.......

उपास's picture

8 Mar 2011 - 2:09 am | उपास

कुलकर्णी साहेब,
गोल्डरॅट यांच 'द गोल' वाचायला घेतल्यासारखं वाटतय.. छान सुरुवात :)

नगरीनिरंजन's picture

8 Mar 2011 - 9:37 am | नगरीनिरंजन

दारूचे गुत्ते हे पब्जचं भाषांतर आहे का? =)) =)) आवडलं.

५० फक्त's picture

8 Mar 2011 - 10:01 am | ५० फक्त

मस्त झालाय हा भाग, कधी उत्पादन क्षेत्रात काम करायचा अनुभव घेतला नाही, पण त्यातली घालमेल आणि त्याचे कुटुंबावर होणारे परिणाम फार छान लिहिलेत तुम्ही.

असं करा, तुम्ही लिहित रहा आम्ही वाचत राहु.

ढब्बू पैसा's picture

8 Mar 2011 - 10:51 am | ढब्बू पैसा

मजा येतेय वाचायला. व्यक्तिरेखांचं भारतीयीकरण मस्त जमलंय :)

प्रास's picture

8 Mar 2011 - 11:46 am | प्रास

व्यक्तिरेखांचं भारतीयीकरण

आपल्या तर आत्ता कळलंय, असं काही होतंय ते, कारण मी तर त्यांना भारतीयच मानत होतो......

जयंतजी, लिखाण थांबवायचं नाव काढू नका.......

बचेंगे तो और भी पढेंगे...... :-)

मस्त!
लिखाण थांबवायचं नाव काढू नका.

गामा पैलवान's picture

9 Apr 2016 - 12:25 pm | गामा पैलवान

जयंतराव,

कथेने मस्त वेग पकडलाय. फक्त ते ४२४२७ झालंय तिथे ४१४२७ हवं होतं. पुऱ्या प्लांटाचा प्रश्न आहे म्हणून ऑर्डर नंबरची जरा काळजी वाटली! ;-)

आ.न.,
-गा.पै.