काय मिळवायचंय तुम्हाला ?

जयंत कुलकर्णी's picture
जयंत कुलकर्णी in जनातलं, मनातलं
28 Feb 2011 - 6:14 pm

नेहमीप्रमाणे डौलदार वळण घेत माझी गाडी मी फाटकातून आत घेतली आणि समोर बघितल्यावर माझा पाय एकदम ब्रेकवर गेला आणि गाडी कचकन थांबली. ते बघून रखवालदार पळतपळत आला आणि सलाम करत उभा राहिला. काच खाली करत मी फक्त एका मोठ्या मर्सिडिजकडे बोट दाखवले.
“साहेबांची नवीन गाडी आहे साहेब.”
मी गुपचुप गाडी सुरु केली आणि गिअर टाकला.
जोशी साहेबांशिवाय माझ्या जागेवर गाडी लावायची असते. जणूकाही इथे गाडी लावून सगळ्या जगाला त्यांना सांगायचे असते की ते माझे साहेब आहेत. व्हाईस प्रेसिडेंट ना. साला, एवढं वय झालं पण इगो काही कमी होत नाही या माणसाचा. चरफडत मी त्या गाडीच्या शेजारी माझी गाडी लावली. मनातल्यामनात त्या मर्सिडीजला एक लाथ घातली आणि त्या नंबरप्लेटवर नजर टाकली. नंबराच्या वर लिहिले होते “नंबर १”. च्यायला ठीक आहे तुला कंपनीचा सी.ई.ओ व्हायचंय ! पण नंबरप्लेट ......नकळत मला हसू आले. आपण पण तो प्रयत्न करतोच आहोत की. घोडामैदान अजून बरेच दूर आहे. आणि आता तर जरा अशक्यच वाटतंय. गाडी लॉक करुन मी चालायला लागलो. “हा जोश्या इथे काय करतोय आज?” नकळत माझा मेंदू विचार करायला लागला आणि तापायला लागला. पण शांत रहायला पाहिजे. आता सकाळच्या कामाचा चुथडा. माझं सकाळीच फॅक्टरीत यायचं कारण जरा वेगळं असतं . फोन चालू व्हायच्या आतच मला स्वत:चे असे काम करायला वेळ मिळायचा. नंतर एकदा का फोन आणि मिटींग्ज चालू झाल्या की पाणी प्यायलासुध्दा वेळ मिळत नाही. पण आज ? सकाळ जाऊदेत , दिवसभर तरी वेळ मिळणार आहे की नाही स्वत:साठी, कोणास ठाऊक ?

ठीक आहे चला ! आलीया भोगासी असावे सादर ! असे मनाशी म्हणून मी माझ्या केबिनकडे वळणार तेवढ्यात हाक ऐकू आली.."सानेसाहेब” वळून बघितले तर आमचे सुपरवायझर – शितोळे, युनियनचा एक माणूस – काय बरं नाव त्याचं ? जोसेफ ! व्ही. एम. सी चा फोरमन जाधव, आणि एक कामगार प्लॅंटच्या दरवाजातून मोठ्य़ांदा बोलत येत होते. च्यायला, भांडताएत की काय ? हळूहळू मग नीट ऐकू आणि लक्षात यायला लागले.
शितोळे म्हणत होते “ सर जरा प्रॉब्लेम आहे.” त्याचवेळी जोसेफ किंचाळत होता “ आता टूल डाऊन होणार आहे “ तो बिचारा कामगार काहीतरी तक्रार करत होता. त्याचं कोणीच ऐकून घेत नव्हतं. हे कमी म्हणून, जाधव बोंबलत होता ’ अशक्य आहे साहेब आज प्रॉडक्शन होणे. पार्टसच नाहीत. ते माझ्याकडे अगदी आपेक्षेने बघत होते. जणूकाही त्यांचे सगळे प्रश्न मी आत्ताच दूर करणार आहे. आणि मी ? त्यांच्याकडे मूर्खासारखा बघत उभा होतो. काय सांगणार त्यांना कप्पाळ ! अजून मी चहा पण घेतला नाही, हे ? कसंबसं त्यांना शांत करत मी विचारले “अरे काय झाले ते सांगाल की नाही ? आणि एकावेळी एकानेच बोला.” सगळं ऐकल्यावर उलगडा झाला. जोशीसाहेब माझ्या अगोदर एक तास प्लांटमधे आले आणि एकच गोंधळ झाला. त्यांनी आल्या आल्या ऑर्डर नं.४१४२७ चे काय झाले ? पूर्ण झाली का ती, ते विचारले. आमचं नशीबच वाईट. कोणालाच त्याबद्दल काहीच माहीत नव्हते.

झालं.

जोशीसाहेबांनी मग सगळ्यांना त्यामागे पिटाळले होते. साहजिकच आहे. मोठी ऑर्डर आहे ती. आणि फार पूर्वीच जायला पाहिजे होता तो माल. मी खांदे उडवले. “त्यात नवीन आणि विशेष काय आहे ? ही तर नेहमीचीच बाब आहे. इथे प्रत्येक ऑर्डर थोडी उशीरा, उशीरा, थोडी जास्त उशीरा, उशीराच उशीरा पूर्ण व्हायची. एक ऑर्डर वेळेवर पूर्ण होईल तर शप्पथ ! या सगळ्या प्रकाराने आमच्याकडे सगळ्या कामाचे अग्रमान सारखे बदलत असे. सगळ्यात महत्वाच्या याला तर ते म्हणत “प्रथमेश.”

तर झालं काय होतं, ४१४२७ चा काहीच पत्ता लागत नाही बघून जोशीसाहेब स्वत: आता त्याच्या मागे लागले होते. त्यांच्या तावडीत पहिल्यांदा आमचे शितोळे सापडले. जोशीसाहेब तर त्यांच्या मागे हात धुऊन लागले ....हे करा आणि ते करा. शेवटी त्याला लागणारे सगळे पार्टस‍ जमा झाले आणि त्याचा हा मोठा ढीग साठला होता. पण शेवटची असेंब्ली काही होत नव्हती. कारण त्याला लागणारी एक सब‍ - असेंब्ली होत नव्हती. कारण त्यासाठी लागणारा एक कॉंपोनंट तयार होत नव्हता. यालाही अर्थात कारण होतेच. आमच्याकडे एक बरं असतं. सगळ्यासाठी सगळ्यांकडे कारणं तयार असतात. काही विचारले की सांग कारण. थोडक्यात काय, कॉंपोनंट नाही म्हणून सब असेंब्ली नाही, ती नाही म्हणून मुख्य असेंब्ली नाही, त्यामुळे माल जाणार नाही.

एवढा आरडाओरडा झाल्यावर समजले की तो कॉंपोनंट एका छोट्या मशिनच्या समोर रांगेत पहुडला होता. सगळे तेथे धावल्यावर बघितले तर, तो मशिनिस्ट दुसर्‍या एका कॉंपोनंटच्या मशिनिंगची तयारी करत होता. आणि ते काम “प्रथमेश” या अग्रमानाचे होते. जोशीसाहेबांना त्याच्याशी काही घेणे देणे नव्हते. त्यांना आता ४१४२७ शिवाय काहीच दिसत नव्हते. त्यांनी लगेच शितोळेंना सांगितले की हा जॉब काढून त्याच्या जागी ४१४२७ चा कॉंपोनंट लावायला सांगा. हे ऐकल्यावर त्या मशिनिस्टनी नशीब, त्याच्या हातातील स्पॅनर ह्यांना फेकून मारला नाही. त्याने फक्त जळजळीत नजरेने ह्या लोकांकडे बघितले आणि हताशपणे तो स्पॅनर बाजूला टाकला आणि म्हणाला “वेड लागलंय तुम्हाला. गेले दोन तास मी हा जॉब सेट करतोय. आणि आत्तापर्यंत या जॉबच्या मागे सगळे लागले होते. न जेवता मी हे काम केलंय ! जाऊ देत मरु देत हे काम.”
जोशीसाहेबांना हे पुरे होते. सगळ्यांना बाजूला सारुन त्यांनी त्या मशिनिस्टला सज्जड दम दिला.
“हे काम तू करु नकोस, तुझी नोकरी गेलीच म्हणून समज.” मग काय एकच गोंधळ उडाला. युनियनचे लोक आले, मग तू तू मी मी, काही विचारु नका. सगळ्यांनीच काम थांबवलेले. आणि त्या गोंधळाचे साक्षीदार आता माझ्यासमोर उभे राहून माझ्या निर्णयाची वाट बघत होते.
“जोशीसाहेब कुठे आहेत आत्ता ? मी विचारले.
“साहेब तुमच्या ऑफिसमधे बसले आहेत ते !” – शितोळे.
“एक काम करणार का माझे ? त्यांना जाऊन सांगा की मी लगेच येतोच आहे त्यांना भेटायला !”
सुटकेचा नि:श्वास टाकत शितोळे तेथून सटकला.
मग माझा मोर्चा मी जोसेफकडे वळवला.
“आणि अजून एक गोष्ट, इथे कोणाचीही नोकरी जाणार नाही आहे. हा सगळा गैरसमजातून झालेला घोटाळा आहे दूर हॊईल तो. जोसेफचा त्याच्या चेहर्‍यावरून तरी माझ्यावर विश्वास बसलेला वाटला नाही. ज्याप्रकारे त्या मशिनिस्टने तोंड फिरविले त्यावरुन तर मला खात्रीच पटली की हे प्रकरण चांगलेच चिघळणार. जोसेफची तशी मला विशेष काळजी नव्हती. संपाचा निर्णय त्याच्या पातळीवर होणे शक्यच नव्हते.
पण उघडपणे मी त्याला म्हटले “जोसेफ, तुमची काय तक्रार आहे ती तुम्ही कायदेशीरपणे नोंदवत का नाही ? तुमच्या युनियनच्या अध्यक्षांशी मी संध्याकाळी बोलेन. आणि तोपर्यंत कदाचित हे प्रकरण मिटलेलेही असेल.”
जोसेफलाही त्याच्या मर्यादा माहीत होत्या. तत्परतेने त्याने हो म्हटले. तो आणि तो कामगार प्लॅंटच्या दरवाजाच्या दिशेले चालू लागले.
“चला जाधव, सगळ्यांना कामाला लावा आता.” मी व्ही. एम. सी च्या फोरमनला म्हणालो.
“पण साहेब, कुठल्या जॉबवर ? पहिल्या का जोशीसाहेबांच्या ?” जाधव मिशीखाली हसतोय असा मला क्षणभर भास झाला. भास कसला, खरंच हसला असणार तो.
“जोशीसाहेबांच्या जॉबवर !”
“पण मग सेटींगचे २/३ तास वाया जाणार .”
“जाऊ देत रे बाबा. जाधव, इथे काय चालले आहे हे अजून मला कळायचंय !
शिवाय ज्याअर्थी ते एवढ्या सकाळी आलेत, म्हणजे ती ऑर्डर निश्चितच निकडीची असणार. कळतंय ना मी काय म्हणतोय ते ?”
“साहेब चिडू नका. मी फक्त काय करायचे ते विचारले.”
“जाधव, मला तुझी अडचण कळतीय “ मी त्याला समजुतीच्या स्वरात समजावलं.
“पण आता जरा तो दुसरा जॉब पटकन कसा करता येईल ते बघायला पाहिजे.”
“बघतो मी काय करता येते ते “ : जाधव.
तेवढ्यात मला शितोळे येताना दिसला. घाईत असल्याचे दाखवत त्याने तोंड चुकवले. तो तसाच सटकणार तेवढ्यात मी त्याला हटकले. खाली मान घालत रडक्या चेहर्‍याने तो पुटपुटला “बेस्ट लक साहेब.”
माझ्या केबीनचा दरवाजा सताड उघडा होता. मी आत पाऊल टाकले. आता काय काय ऐकायला मिळणार कोणास ठाऊक ? आत जोशीसाहेब टेबलामागे माझ्या खुर्चीवर बसलेले दिसले. आमचे जोशीसाहेब म्हणजे थोडे जाडे, रुंद खांदे, करड्या रंगाचे केस, आणि गंमत म्हणजे त्याच रंगाचे त्यांचे डोळे आहेत. मी जसा माझा लॅपटॉप खाली ठेवला. त्यांनी माझ्याकडे रोखून बघितले. काही खरं नाही आता.
“गुड मॉर्निंग सर ! आज सकाळीच इकडे कुठे ? ती ऑर्डर एवढी अर्जंट आहे का ?”
“साने जरा बसा ! आपल्याला बरंच बोलायचे आहे.”
’पण सर तुम्ही माझ्या खुर्चीत बसलाय “काय बोलून गेलो sssssss.......
’मी एवढ्या सकाळी का आलोय हे जाणून घ्यायचंय ना तुम्हाला ? तुमची नोकरी वाचवायला आलोय असं समजा.”
आता मात्र माझे डोके फिरले.
“आत्ता मी जे काही बघितले त्यावरुन तर असे वाटतंय की तुम्ही आमच्या कामगारांना भडकवायला आला आहात की काय.” बोललो ! वाघ म्हटलं तरी खातो, वाघोबा म्हटलं तरी खातो. पुढचं पुढं !
माझ्या डोळ्यात रोखून ते म्हणाले.
“साने तुम्हाला कामगारांची चिंता करायची काही आवश्यकता राहील असे मला तर वाटत नाही. कारण इथे कामगार राहतील असे मला वाटत नाही. म्हणजे ते सोडून जातील असे नाही म्हणत मी , पण हा प्लॅंटच राहिला नाही तर ते तरी काय करतील बिचारे ? खरं म्हणजे ह्या प्लॅंटची काळजी करायला तुम्ही पण खुर्चीत पहिजे ना ! कळतंय ना मी काय म्हणतोय ते ?”
“साहेब जरा ऐकता का माझं ? या ऑर्डरची काय भानगड आहे ? तुम्ही स्वत: त्यासाठी आलात म्हणून विचारतो.”
त्यांनी जे सांगितले त्याच्यावरुन सगळा उलगडा झाला ........

क्रमशः..............
१/प्रकरण १

जयंत कुलकर्णी.
जर याचा कंटाळा आला तर पुढेमागे लेखक ही लेखमाला बंद करायचा हक्क राखून ठेवत आहे. :-)
ह.घे.

कथासमाजतंत्रविज्ञानअर्थकारणअर्थव्यवहारमतमाहितीसंदर्भभाषांतर

प्रतिक्रिया

प्रास's picture

28 Feb 2011 - 6:40 pm | प्रास

नि:संशय उत्कंठापूर्ण लिखाण आहे......

पुढे लिहा नक्की आणि लवकरात लवकर.....

कानडाऊ योगेशु's picture

28 Feb 2011 - 7:49 pm | कानडाऊ योगेशु

शॉप फ्लोअरवरचे अनुभव तसे नेहेमीच वाचनीय असतात.
वाचता वाचता काही नवे शिकायला मिळाले तर उत्तमच होईल.
कुळकर्णीसर तुम्ही लिहित राहा.

मुक्तसुनीत's picture

28 Feb 2011 - 8:21 pm | मुक्तसुनीत

लेखन रोचक आहे. पुढे वाचायला आवडेल.

Nile's picture

1 Mar 2011 - 4:53 am | Nile

पुढे वाचण्यास उत्सुक आहे.

त्याशिवाय, संपादन धोरणात झालेल्या सुयोग्य बदलानंतर कुलकर्णींनी सुद्धा लगेच पुन्हा येथे लिहायला घेतलेले पाहुन आनंद झाला. मालिका संपुर्ण करा अशी आग्रहाची विनंती आहे.

मस्त लेखन, पुढच्या भागांची प्रतिक्षा आहे.

आत्मशून्य's picture

28 Feb 2011 - 9:28 pm | आत्मशून्य

येऊद्यात पूढचा भाग.

बहुगुणी's picture

28 Feb 2011 - 9:38 pm | बहुगुणी

..सलग येऊ द्यात पुढचे भाग, हा भाग आवडला हे वेसांनल...

कुलकर्णी काका. मला ही कथा तुमच्या ब्लॉगवर का कुठेतरी वाचलेली पुसटशी आठवतेय..

- पिंगू

जयंत कुलकर्णी's picture

28 Feb 2011 - 9:51 pm | जयंत कुलकर्णी

नाही ब्लॉगवर नसेल. मी इथेच दोन भाग टाकले होते, जे मी नंतर काढून टाकले होते. पण आता बरेच भाग लिहून झाले आहे. त्यामुळे सलग काही काळ तरी प्रॉब्लेम नाही.

५० फक्त's picture

28 Feb 2011 - 9:49 pm | ५० फक्त

जयंत कुलकर्णि साहेब, एका महत्वाचा विषयावर तुम्ही सुरुवात केली आहे त्याबद्दल धन्यवाद.

एक शंका - हा उतारा कोण्या पुस्तकातुन घेतलेला आहे काय > कुठे तरी वाचल्यासारखा वाटतोय.

निनाद मुक्काम पोस्ट जर्मनी's picture

1 Mar 2011 - 1:05 am | निनाद मुक्काम प...

व काहीतरी वेगळ जीवनाला कलाटणी देणारे लिखाण वाचायला मिळत आहे .
वाचून मनन करेन
कितीतरी वेळा खूप चांगले वाचले जाते .पण...
'' कळतंय पण वळत नाही ''
अशी अवस्था होते बहुतेक वेळा ..
ह्या वेळी लेखामुळे काही सकारात्मक अनुभव आला तर नक्की कळवेन
तुमच्या अनोख्या उपक्रमासाठी
पु ले शु

पुष्करिणी's picture

1 Mar 2011 - 1:14 am | पुष्करिणी

पुढील भागांच्या प्रतिक्षेत, हा भाग आवडलाच.

मैत्र's picture

1 Mar 2011 - 1:14 pm | मैत्र

गोल ... केवळ अप्रतिम ... बिझनेस नॉव्हेल. गोल्डरॅटच्या सगळ्या पुस्तकात सर्वोत्तम...

कुलकर्णी काका गोल चा अनुवाद म्हणजे खरोखर शिवधनुष्य आहे.
पुढच्या लेखांची वाट पाहतो.

जयंत कुलकर्णी's picture

1 Mar 2011 - 6:31 pm | जयंत कुलकर्णी

सर्वांना मनापासून धन्यवाद !