मित्रहो,
याचा कंटाळा आला असेल तर जरूर कळवा. कारण वाचकांची संख्या रोडावताना दिसत आहे. तसे असल्यास येथे ही लेखमालिका मी मिपासाठी थांबवू शकतो...
भाग - १
भाग - २
भाग - ३
भाग - ४
भाग - ५
भाग - ६
भाग - ७
या भागाचा हिरो - हेनरिच गर्लक आणि त्याची बायको. याने मुसोलिनीला आणि स्कोर्झेनीला घेऊन विमान उडवले आणि मोठी जोखीम पत्करली.... त्याच्या गळ्यात या मोहिमेसाठी मिळालेले पदकही दिसत आहे. -
पुढच्या विमानानी ग्लायडर ओढणारा दोर सोडला आणि ग्लायडरने जमिनीकडे झेप घेतली. ग्लायडरच्या वैमानिकाने खालच्या भुभागावर नजर टाकली आणि तो निराश झाला. त्या भुभागाच्या अभ्यासासाठी त्याला मिळाली होती १३ X १३ सेंटी मिटरची छायाचित्रे. त्यात दिसत होते त्यापेक्षा हे प्रकरण भयानक होते. खाली जाताना एक इमारत आता स्पष्ट दिसायला लागली होती. आता ते त्या हॉटेलवर साधारणत: १५० मिटरवर असताना त्या हॉटेलच्या मुख्य दरवाजातून आतबाहेर करणारी मुंग्यांएवढी माणसे त्यांना दिसायला लागली आणि जेथे त्यांची ग्लायडर्स उतरणार होती ते ठिकाणही त्यांना स्पष्ट दिसायला लागले. स्किइंगची सुरवात करायची मुख्य जागा होती ती. जमिनीला ग्लायडर टेकणार तेवढ्यात त्याच्या वैमानिकाने त्या ग्लायडरचे नाक वर उचलले आणि त्याचा मागचा भाग जमिनीवर आदळला. घसरत लांब जाऊ नये म्हणून ग्लायडरच्या खालच्या भागाला काटेरी तार गुंडाळली होती. ब्रेक्सच्या झडपांमुळे आणि या तारेमुळे आवाज करत, लाकडाच्या चिरफळ्या उडवत ते ग्लायडर त्या हॉटेलच्या गच्चीपासून १८ मिटरवर जाऊन थांबले.
इमारतीत इस्पेक्टर जनरल जुसेपी गुली याचा काय करायचे याचा मनोमन निर्णय झाला होता. बाडोग्लिओ आणि त्याच्या मंत्रीमंडळाने इटलीतून पळ काढल्यामुळे सगळीकडे अनागोंदी माजली होती. जरी त्याला मुसोलिनीला अशा वेळी ठार मारायचा आदेश होता तरी त्यानेही सबूरीने घ्यायचे ठरविले. त्याच्या खोलीत धडपडत येणार्या ले. अलबर्टोने काय करायचे हे विचारल्यावर त्याने ताबडतोब उत्तर दिले “ताबडतोब हत्यारे टाकून द्या”. दोघेही खिडकीतून ओरडून सांगू लागले “ गोळीबार करू नका ! गोळीबार करू नका !”
त्या छोट्याशा मैदानात आता ती सगळी ग्लायडर जमिनीला घासत होती.
त्यातील एकातून कार्ल मेंझेल हा हे युद्धमय वातावरण पाहून इतका उत्तेजित झाला की त्याने मुसोलिनीला खिडकीत बघून रोमन सॅल्युट मारून हाईल ड्युसे अशी आरोळी मारली. स्कोर्झेनीच्या मागोमाग एक त्याचा एक अनुभवी कडवा अधिकारी, ऑट्टो श्वर्ट हाही मुख्य इमारतीपाशी पोहोचला. दरवाजातून त्यांना एक सैनिक ट्रान्स्मिटवरवर काहीतरी खुडबुड करताना दिसला. श्वर्टने एका लाथेनेच त्याचे स्टूल उडवून लावले आणि त्याच वेळी स्कोर्झेनीने त्याच्या हातातील पिस्तूलाचा हातोडीसारखा वापर करून त्या ट्रान्समिटरचे तुकडे केले. आता तेथे काय चालले आहे याची काहीही बातमी बाहेरच्या जगात पोहोचू शकत नव्हती. दुसर्या मजल्यावर धाव घेत, मधे येतील त्यांना त्याच्या पिस्तूलाचा प्रसाद देत, स्कोर्झेनीने २०१ नं च्या खोलीचा दरवाजा ढकलला. एका कटाक्षातच त्याने त्या खोलीतील दृष्य टिपले. उजव्या बाजूला एक हॅट अडकावयाचा स्टॅंड, एक कपाट, एक डबल बेड, चामड्याची आरामखुर्ची आणि ब्रुनो मुसोलिनीचा फोटो. खोलीच्या मध्यभागी तीन माणसे अंग चोरून बावळटासारखी त्याच्याकडे बघत बसली होती. त्यातील दोन होती गुली आणि अल्बर्टो आणि तिसरा होता मुसोलिनी. त्याला बघून स्कोर्झेनी ओरडला “ ड्युसे, मला फ्युररने पाठवले आहे. आपण आता या कैदेतून मुक्त आहात.”
ते ऐकून मुसोलिनीने हर्षभराने त्याला मिठी मारली आणि तो पुटपुटला
“ मला खात्री होती माझा मित्र मला असे एकटे सोडणार नाही”.
मुसोलिनीला सोडवताना स्कोर्झेनी -
या हॉटेलवरच्या हल्ल्याबरोबर खाली आसर्गीवर ही छत्रीधारी सैनिकांनी ताबा मिळवला होता. त्यामुळे आता वर उतरलेल्या जर्मन सैनिकांचा परतीचा मार्ग निर्धोक झाला. पण मुसोलिनीसारख्या अती महत्वाच्या व्यक्तीला त्या डोंगराळ भागातून घेऊन जाणे अतिशय धोक्याचे होते. त्या छोट्या विमानाचा आता उपयोग होणार होता. योजनेनुसार दोन छोटी विमाने तेथे उतरवण्यात आली होती पण त्यातील एका वैमानिकाने त्याच्या विमानाचे एक चाक मोडून पडले आहे असा निरोप दिल्यामुळे आता मुसोलिनीला आणि स्कोर्झेनीला घेऊन जायला एकच विमान उरले. त्यातून ते रोमला जाणार होते आणि मग एका जर्मन हेंकेल बाँबर विमानातून त्यांना व्हिएना येथे नेण्यात येणार होते. पण या विमानात वैमानिक आणि अजून एकच माणूस बसू शकत होता. त्या विमानाचा वैमानिक हेनरिच याने दोघांना घेऊन ऊडायला ठाम नकार दिला. त्याला समजावून स्कोर्झेनी म्हणाला
“समजा तुम्ही दोघेच गेलात, तुला काही झाले, मुसोलिनीला काही झाले तर मी माझी कामगिरी पार पाडली नाही असा त्याचा अर्थ होईल. त्या परिस्थितीत मी आत्महत्या करणेच योग्य ठरेल. तेव्हा आपण तिघेही जाउया. काय व्हायचे ते होईल.”
हेनरिच गर्लकने चडफडत त्या १८० मिटर लांबीच्या, तात्पुरत्या तयार केलेल्या हवाईपट्टीची पहाणी चालू केली. एका बाजूला डोंगर आणि दुसर्या बाजूला दरी. डोंगराच्या बाजूने मुसोलिनी आणि स्कोर्झेनीसारख्या ९३ किलोच्या माणसाला घेऊन ते विमान तेवढी उंची गाठूच शकले नसते. त्याच्या हातात आता दुसराच मार्ग होता. विमान वळवून डोंगराच्या पायथ्याशी आणणे आणि दरीच्या दिशेने उड्डाणासाठी पळविणे. दरीच्या मुखापाशी ते विमान हवेत जाईल अशी त्याचा अंदाज होता.
(नेपाळ मधील लुकलाची हवाईपट्टी अशीच आहे. म्हणजे विमान शेवटी उडायच्या अगोदर दरीत उतरते आणि मग वर चढायला लागते. अर्थात आत्ताची विमाने तशी खूपच शक्तिशाली असतात त्यामुळे बहुदा काही अडचण येत नसावी. तरी सुद्धा काही वर्षापूर्वी एक विमान उडाले ते सरळ खालीच गेले). बर्याच वादावादीनंतर मुसोलिनीच्या आसनाच्या मागे स्कोर्झेनीने स्वत:ला कोंबले आणि त्यानंतर मुसोलिनीने त्याची जागा घेतली. एक हिसका देऊन विमानाने वेग घेतला. त्याच्या आवाजात खाली असलेल्या सैनिकांचा हाईल ड्युसेचा आवाज विरून गेला आणि त्या उतारावरून विमानाने दरीच्या दिशेने धाव घेतली.
त्या काठावर हेनरिचने ते विमान वरती घ्यायचा प्रयत्न केला पण ते उडालेच नाही. उजवे चाक एका खडकाला आदळले आणि डावा पंखा जवळजवळ जमिनीला टेकला आणि त्याच क्षणी त्या विमानाने त्या दरीत उडी घेतली. भेलकांडत ते विमान त्या दरीत जमिनीकडे झेप घेऊ लागले.
स्कोर्झेनीच्या तोंडातून एक चित्कार बाहेर पडला. मुसोलिनी मात्र अत्यंत शांतपणे हे सगळे पहात बसला होता. अनुभवी हेनरिचने हिंमतीने जॉयस्टीक पुढे दाबून खाली जायचा वेग वाढवला व जिवाच्या आकांताने ते विमान वर उचलायचा प्रयत्न चालवला. जमिनीपासून ३० मिटर अंतरावर असताना त्याला त्यात यश आले आणि भयंकर वेगात ते विमान खालच्या शेतांवरून आणि द्राक्षाच्या बागांवरून वर जायला लागले. मुसोलिनीच्या चेहर्यावर कसलाही भाव उमटला नाही आणि स्कोर्झेनी त्याचे बोलणे ऐकून चाट पडला. खाली बोट दाखवून मुसोलिनी म्हणत होता “त्याच ठिकाणी मी वीस वर्षापूर्वी प्रचंड जनसमुदायापुढे भाषण देत होतो.....” त्याने मग त्या सभेचा वृत्तांतच सादर केला.
संध्याकाळी ५.३० वाजता रोमच्या बाहेर एक छोट्या विमानतळावर त्यांचे विमान उतरले तेव्हा त्या विमानातून तेल गळत होते आणि विमानाच्या पुढच्या भागाचा चेंदामेंदा झाला होता. हेनेरिचचा हात हातात घेत मुसोलिनी जर्मनमधे म्हणाला “मला आज तू दुसरा जन्म दिलास. धन्यवाद ! “
१५ सप्टेंबरला मुसोलिनी रॅस्टेनबर्गला हिटलरला भेटण्यासाठी पोहोचला. विमानतळावरच हिटलरने त्याचे औपचारीक स्वागत केले.
विमानातून उतरल्यावर मात्र हिटलरशी हस्तांदोलन करताना मुसोलिनीच्या गालावर अश्रू ओघळले.
“ तू माझ्यासाठी जे केले आहेस त्यासाठी तुझे आभार कसे मानावे हे कळत नाही.”
हिटलरही त्या शब्दांनी आणि अश्रूंनी भावनाविवश झाला आणि त्याने मुसोलिनीचे हात हातात घेतले.
दुपारच्या बैठकीपर्यंत भावना मागे पडून व्यवहाराने त्याची जागा घेतली.
त्यांच्या खाजगी बैठकीत हिटलरने मुसोलिनीवर टीकास्त्र सोडले.
“हे असले कसले तुझे फॅसिझम ? जे एवढे तकलादू आहे ! जसे सूर्याच्या प्रकाशात बर्फ वितळते तसे हे युद्धात वितळून गेले आहे”
मुसोलिनी खिन्न होऊन गुपचूपपणे हे सगळे ऐकत होता. इटलीचे राजकारणावर चर्चा करायची ना त्याची मनस्थिती होती ना परिस्थिती. हिटलरने मात्र त्याच्यासाठी पुढची सगळी योजना तयार करून ठेवली होती. मुसोलिनीने आता राजेशाही रद्द केली आहे आणि फॅसिझमने त्याची जागा घेतली आहे असे ताबडतोब जाहीर करायचे होते.
“याने इटली आणि जर्मनिच्या संबंधावर शिक्कामोर्तब होईल” हिटलर म्हणाला.
मुसोलिनीने दुबळेपणाने मान हलवली. पण हिटलरचे विचार पक्के होते.
ज्या इटालियन ग्रॅंड कौन्सीलने मुसोलिनीला कैदेत टाकले होते व जे सदस्य अजूनही इटलीमधे होते, त्यांच्याकडे आता बघायचे होते. यात आपल्याला आठवत असेलच मुसोलिनीचा जावई – काउंट गॅलिआझो सिआनोही होता. मुसोलिनीच्या कारकिर्दीत तो फार झपाट्याने वरती चढला होता आणि मुसोलिनीला जर्मनीच्या दाव्याला बांधायच्या कामी याचाही हातभार लागला होता. सिआनोला जर्मनी सोडून पळून जाता आले नव्हते. त्याला जर्मनांनी म्युनिचमधे त्यांच्या देखरेखीखाली ठेवले होते.
मुसोलिनीने त्याचा काटा काढायला निकाराचा विरोध केला. “हा माझ्या लाडक्या मुलीचा नवरा आहे आणि माझ्या लाडक्या नातवाचा बाप.”
“मुसोलिनी तू फार प्रेमळ आहेस. तू कधीच चांगला हुकुमशहा होऊ शकणार नाहीस” हिटलर तुटकपणे म्हणाला आणि त्याने ती बैठक संपवली.
दुसर्या दिवशी मात्र हिटलरने मुसोलिनीला त्याने जर त्याचे म्हणणे मानले नाही तर काय होईल हे कडक शब्दात सांगितले. मुसोलिनीच्या उत्तरावर 'उत्तर इटली'चे भवितव्य ठरणार होते. त्यावेळी त्याने प्रथमच एका अतिशय विध्वसंक अस्त्राविषयी मुसोलिनीला कल्पना दिली. या अस्त्राने आख्खे लंडन उध्वस्त होऊ शकत होते. हे सांगताना त्याच्या हाताची मूठ वळली होती. ती एकदम सोडून बोटे पसरून तो मुसोलिनीला म्हणाला “हे अस्त्र कुठे वापरायचे हे तुझ्यावर अवलंबून आहे. लंडन का त्याची चाचणी मिलान, त्युरीन का जिनोआ येथे घ्यायची. पोलंडची जी मी अवस्था केली त्याचाही हेवा वाटेल अशी अवस्था मी उत्तर इटलीची करेन. आणि शिवाय असे झाले तर सिआनोला तुझ्या हातात दिले जाणार नाही ते नाहीच. त्याला येथेच जर्मनीमधे मी फासावर लटकवेन” यानंतर हिटलरने मुसोलिनीला कुठल्याही बाबतीत कधीही कसलाही पर्याय ठेवला नाही. तो सांगेल तेच त्याला निमुटपणे करायला लागले.
१८ सप्टेंबरला मुसोलिनीने त्यांच्या आकाशवाणीवर इटलीला उद्देशून भाषण केले त्यात त्यानी इटलीच्या जनतेला परत एकदा फॅसिस्ट पार्टीच्या झेंड्याखाली एकत्र यायचे आवाहन केले. त्याने त्याचे हिटलरच्या तालावर नाचणारे सरकार सरकार स्थापन केले. ते सरकार इतिहासात सालो गणराज्य म्हणून ओळखले जाऊ लागले. हे नाव सालो या गावावरून पडले जेथे याचे मुख्यालय होते. अर्थात हिटलरच्या मनातही मुसोलिनीपुढे काय वाढून ठेवले आहे याची पूर्ण कल्पना होती. गोबेल्सला एका चर्चेदरम्यान तो म्हणाला “या माणसाला राजकीय भवितव्य उरलेले नाही”.
ऑक्टोबरमधे सिआनोला इटली मधे आणून व्हेरोना नावाच्या एका जुन्या तुरुंगात ठेवण्यात आले. त्याच्या बरोबर त्या २८ सदस्यांच्या परिषदेचे अजूनही काही सदस्यांना डांबण्यात आले होते. १४ नोव्हेंबरला फॅसिस्ट पार्टी कॉंग्रेसने एकमताने या सगळ्या सदस्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवली.
मुसोलिनीच्या मुलीने सिआनोची सुटका करायचा बराच प्रयत्न केला पण मुसोलिनीने जावयासाठी कायदा हातात घेऊ शकत नाही हे कारण देऊन हस्तक्षेपास नकार दिला. त्याने सिआनोला केव्हाच क्षमा केली होती पण बाकिच्यांना ते मान्य नव्हते आणि हिटलरलाही त्याचा या बाबतीतला कणखरपणा बघायचा होता.
सिआनो आणि एड्डा -
मुसोलिनीच्या बायकोलाही म्हण्जे रॅशेलला सिआनोला माफ करायचे नव्हतेच. त्याला तुरुंगात टाकताना ती त्याच्या अंगावर ओरडली होती “ तुला मुसोलिनी काय फर्निचर वाटले की काय. वापरले आणि फेकून दिले ?” ही बाई आता मुसोलिनी बरोबर रहात होती आणि ती पहिल्यापासून सिआनोच्या विरूद्ध होतीच. तिचा सिआनोने खटल्याला सामोरे जायलाच हवे असा आग्रह होता. या सगळ्या प्रकाराने मुसोलिनी धर्मसंकटात सापडला. त्याची निर्भत्सना करताना एड्डा म्हणाली
“माझ्या समोर तूम्ही पाण्यावाचून तडफडत असाल तर या जागातील पाण्याचे शेवटचे भांडे मी तुमच्यासमोर उपडे करेन”.
ही बाई एके काळी कमालीची उद्धट होती पण आता स्वत:च्या नवर्याला वाचवण्यासाठी ती काहीही करायला तयार होती. तिच्या मते तिच्याकडे एक हुकमी एक्का होता. सिआनोने जर्मनीत असताना गेली कित्येक वर्ष रोजनिशी लिहीली होती आणि त्यात इटली आणि जर्मनीमधील बर्याच मोठमोठ्या लोकांच्या देशद्रोहाबाबत लिहिलेले होते. अशा स्फोटक कागदपत्रांच्या आधारे त्या काळात सरकारमधे उलथापालथ होऊ शकत होती. शेवटी या कागदपत्रांच्या बदल्यात एक तडजोड झाली. सिआनोची काही कागदपत्रे एड्डाने जर्मनीला दिल्यावर जर्मन गुप्तहेरखाते सिआनोला त्या तुरुंगातून पळून जायला मदत करणार आणि गुप्त मार्गाने त्याला तुर्कस्तानला पोहोचवणार. त्या ठिकाणी उरलेली सर्व कागदपत्रे जर्मनांच्या ताब्यात देणार असा एकंदरीत बनाव ठरला.
७ जनेवारीला रात्री एड्डा ठरल्या प्रमाणे व्हेरोनाच्या पश्चिमेला एका रस्त्यावर त्या कागदपत्रांचा काही भाग घेऊन हजर झाली. दुर्दैवाने बर्या च वेळ वाट पाहून झाल्यावर तिला उमगले आता कोणी येणार नाही. हा सगळा बनाव फार खालच्या पातलीवर ठरला होता आणि हिटलरला याचा पत्ताच नव्हता. पण अगदी शेवटच्या क्षणी हिटलरला त्याचा सुगावा लागला आणि त्याने जनरल विल्हेम हर्स्टरला फोन लावला “जर सिआनो निसटला तर त्याच्या जागी तुला फासावर जावे लागेल हे ध्यानात ठेव” अर्थात पुढे काय झाले असावे याचा अंदाज करायला काही विशेष लागेल असे नाही.
सिआनो आणि इतर पाच जणांचा खटला ८ जानेवारीला त्या न्यायालयात उभा राहिला. न्याय काय करायचा हे ठरलेले होतेच. एका न्यायधिशाने हा न्याय करायचा प्रकार नसून सूड घ्यायचा प्रकार आहे असे ठणकावून सांगितले पण त्याचा उपयोग झाला नाही आणि सगळ्यांनीही हा निर्णय दिला असता तरीही त्याचा उपयोग झाला नसता कारण त्या न्यायालयात सगळ्यात मागच्या बाकावर ब्लॅकशर्टस
त्यांची पिस्तूले सरसावून बसले होते. उरलेल्या काहींनी सर्व दरवाजे रोखून धरले होते. त्यांच्या प्रमुखाने पुढे येऊन दोन्ही बाजुच्या वकिलांना समजावून सांगितले “ आम्ही तुम्हाला कसलाही त्रास देणार नाही व तुम्हाला घाबरायचे काहीही कारण नाही. आम्ही तुमच्या विरूद्ध नाही. हे जे पाच लोकं तेथे बसले आहेत ते जर निर्दोष सुटले तर त्यांना येथेच ठार मारायचे आम्हाला आदेश आहेत. तुम्हाला त्या वेळेस फक्त थोडे खाली बसावे लागेल”. पण नशिबाने ती वेळ आली नाही, सहातील एकाला ३० वर्षाची शिक्षा झाली तर उरलेल्या सिआनोसकट सगळ्यांना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठवण्यात आली.
११ जानेवारीला ही शिक्षा २५ जणांच्या तुकडीने या हातपाय बांधलेल्या पाच जणांची गोळ्या घालून हत्या केली. सिआनोचा या जगातील प्रवास या शेवटच्या दुर्दैवी घटनेनी संपुष्टात आला.
मृत्यूद्ंडानंतर सिआनो.....
वरील हत्याकांडादरम्यान पद्धती प्रमाणे तेथे व्हेरोना तुरुंगाचा एक धर्मगुरू हजर होता. त्याचे नाव होते डॉन गुसेप्पे चिऑट. या वृद्ध धर्मगुरूने आदल्या दिवशीची रात्र या पाचीजणांबरोबर काढली होती. तो जेव्हा मुसोलिनीला भेटायला गेला तेव्हा मुसोलिनीने त्याला रोखठोक प्रश्न केला
“ कसे काय झाले सगळे ?”
“”जसे आपल्याला पाहिजे होते तसे” डॉन.
“काय म्हणायचे आहे तुम्हाला ? हा निर्णय न्यायालयाचा होता हे तुम्ही विसरताय “
त्याच्याकडे दुर्लक्ष करून तो धरमगुरू म्हणाला “ आपण जर ही परवानगी दिली नसतीत तर त्यांना ठार मारायचे धाडस कोणातही नव्हते हेही खरे आहे. देशद्रोह आणि फॅसिस्ट पक्षाशी द्रोह या दोन गोष्टी एक नाहीत हे जनतेने बर्याेच वर्षांपूर्वी जाणले आहे हे लक्षात घ्या !”
मुसोलिनीने आपले मस्तक दोन्ही हातानी दाबून धरले. सुकलेल्या ओठांवरून जिभ फिरवत, सामान्य माणसाप्रमाणे त्याने विचारले “ आदली रात्र त्यांनी कशी घालवली ?”
“खरे सांगायचे तर ते अत्यंत निर्भयपणे या शेवटच्या दिवसाला सामोरे गेले. जनूकाही ते परमेश्वराच्या अगदी जवळ होते. त्यांनी ती रात्र एका खोलीत वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करण्यात घालवली. प्लॅटोचे आत्म्याच्या अमरत्वावरचे भाष्य़, लास्ट सपर, आणि असे अनेक विषय त्यांनी हाताळले. चिआनोने मात्र शेवटपर्यंत दयेच्या अर्जावर सही करायचे नाकारले.’ते समाधान मी त्याला केव्हाच मिळू देणार नाही’ तो कडवटपणे म्हणाला. हे सगळे तुम्हाला समजायलाच पाहिजे होते म्हणून सांगितले. तुमचा जावई शेवटपर्यंत तुम्हाला शिव्या देत होता हे ऐकायला कदाचित तुम्हाला बरोबर वाटणार नाही पण ते सत्य आहे”.
आणि ? मुसोलिनीने विचारले.
“त्यांच्यातीलच एकाने सिआनोचे खांदे त्याच्या दोन्ही हातात पकडले आणि त्याला सगळ्यांना क्षमा करू टाक असे विनवले. “आपण आता परमेश्वराच्या न्यायालयात उभे रहाणार आहोत. यांची काय तमा आपल्याला ?”
“ते ही खरेच आहे म्हणा. माझ्या सगळ्या कुटुंबियांना माझा निरोप सांगा की माझ्या मनात आता त्यांच्याबद्दल कसलाही कडवटपणा उरलेला नाही”. सिआनो म्हणाला.
“मी ही त्यात आलो ?” मुसोलिनीने अधिरतेने विचारले.
“हो ! त्यात तुम्हीही आलाच” तो धर्मगुरू म्हणाला.
एक क्षणभर मुसोलिनीने त्याच्याकडे बघितले आणि मग भावनांनी त्याच्या मनाचा ताबा घेतला आणि तो ओक्साबोक्शी रडायला लागला.
डॉन चिओटच्या मनात एक शंका आली ’या माणसापर्यंत तो दयेचा अर्ज पोहोचलाच नसेल तर ?
खरी गोष्ट अशी होती की त्यादिवशी रात्रभर मुसोलिनी त्या अर्जाची वाट बघत होता पण मुसोलिनी भावनाविवश झाल्यावर माफी देऊ शकतो हे माहिती असणार्यां नी तो अर्ज त्याच्यापर्यंत पोहोचू दिला नाही. जेव्हा पोहोचला तेव्हा फार उशीर झाला होता.
साश्रू नयनांनी मुसोलिनीने त्या धर्मगुरूचे हात हातात घेतले
“ त्यांनी मला खरेच क्षमा केली असेल ना ? असे म्हणून भानावर येत तो म्हणाला “ येथे आत्ता जे घडले ते बाहेर कोणाला कळता कामा नये”.
चिऑटने त्याच्याकडे करूणेने बघितले. परवा ठार झालेल्या माणसांमधे आणि मुसोलिनीमधे त्याला फरक करता येईना. त्या सगळ्यांच्या चेहर्यावर बालीशच भाव होते. त्याने हात झाडले आणि मान हलवत तो बाहेर पडला............
ही बाई वयाच्या ८४ व्या वर्षी मेली. हिच्याबद्दल आपण पुढच्या भागात वाचणार आहोत, तसेच स्कोर्झेनीबद्दलही ..
क्रमश:
जयंत कुलकर्णी.
0
प्रतिक्रिया
28 Feb 2012 - 1:15 am | मोदक
>>>याचा कंटाळा आला असेल तर जरूर कळवा. कारण वाचकांची संख्या रोडावताना दिसत आहे. तसे असल्यास येथे ही लेखमालिका मी मिपासाठी थांबवू शकतो...
मी फक्त सगळे भाग पूर्ण होण्याची वाट पाहतो आहे.. नंतर एका दमात वाचून काढेन. :-)
(प्रतिक्रिया) क्रमश: :-)
28 Feb 2012 - 1:42 am | निशदे
कंटाळा वगैरे काही नाही......... आजिबात थांबवू नका...... :)
अतिशय उत्साहाने वाचत आहे.........
28 Feb 2012 - 12:34 pm | सागर
कंटाळा वगैरे काही नाही......... आजिबात थांबवू नका......
अतिशय उत्साहाने वाचत आहे.........
28 Feb 2012 - 2:00 am | मराठे
कुलकर्णीसाहेब, वाचनसंख्या कमी आहे म्हणून लेखन थांबवू नका. तुमच्या लेखांच्या पुढच्या भागाची आतुरतेने वाट पहाणारासुद्धा मोठा वाचकवर्ग आहे, त्यांना निराश करू नका.
28 Feb 2012 - 6:54 am | पिंगू
काका, लेखमालिका पुढे चालू ठेवा ही विनंती.
- पिंगू
28 Feb 2012 - 7:47 am | जयंत कुलकर्णी
मी काही बंद करणार नाही पण इथे लोक वाचणार नसतील तर माझ्या ब्लॉगवर टाकणार होतो म्हणजे ज्यांना अशा इतिहासात रस आहे त्यांना वाचता येईल...बाकी काही नाही. सध्या मि हे ब्लॉगवर टाकत नाही आहे. आणि मी वल्ली आणि अन्या डॉनला हे पूर्ण करायचे वचन दिले आहे....त्यामुळे पूर्ण तर होणारच आहे. येथे दुसरे काहीतरी लिहिले असते...... :-)
28 Feb 2012 - 8:25 am | अन्या दातार
:)
28 Feb 2012 - 12:13 pm | कॉमन मॅन
नमस्कार कुलकर्णीजी,
आमच्या माहितीप्रमाणे मिपाच्या अलिखित घटनेनुसार का होईना, येथे लेखन करण्याची आपल्याला पूर्ण मुभा आहे व म्हणुनच आपण येथे अवश्य लेखन करीत राहावे असे वाटते. सबब, आपण लेखमाला थांबवू नये असेही वाटते..
28 Feb 2012 - 12:22 pm | जयंत कुलकर्णी
मला वाटते लक्ष्मणच्या कॉमन मॅनचा पोषाख आता बदलायला पाहिजे. त्याने आता काळा कोट आणि पांढरा बो बांधायला हरकत नाही. :-) ह.घे.
अहो, लोकांना हे आवडत नसेल तर दुसरे काहीतरी लिहिण्यात वेळ घातलेला बरा म्हणून ते लिहिले होते.
असो पण आपणही हे वाचत आहात हे वाचून बरे वाटले.
धन्यवाद !
28 Feb 2012 - 12:35 pm | कॉमन मॅन
निश्चितच वाचत आहोत. लेखमाला संग्राह्य करावी अशीच आहे..
28 Feb 2012 - 8:47 am | प्रचेतस
पुन्हा एकदा अप्रतिम लिखाण.
लेखमाला चालूच राहावी ही विनंती.
28 Feb 2012 - 11:58 am | प्रास
मी सुद्धा हेच म्हणतो बरं का!
28 Feb 2012 - 5:10 pm | मनीषा
उत्कृष्ठ रितीने शब्दांकीत केलेला इतिहास वाचताना
अजिबात कंटाळा आला नाही. वाचते आहे.
28 Feb 2012 - 7:21 pm | मनराव
उत्तम........... वाचत आहे............मालिका खंडीत करु नका......
28 Feb 2012 - 10:19 pm | अमोल खरे
असेच म्हणतो. अप्रतिम लेखमाला.
2 Mar 2012 - 10:26 am | सुमीत
मला तर तुमच्या लेखनी तून उतरलेला सर्व इतिहास रंजक वाटतो.
खरे तर दुसरे महायुद्ध आणी त्यातले राजकारण, अगदी छोट्या घटना पण खूप आवडतात अणि त्यात तुमची लेखणी (टंकीत) म्हणजे पर्वणीच.
तुम्ही लिहित रहा, हया लेखमाले नंतर तुम्हाला विनंती की अलाईड नेशन्स ने फ्रांस च्या नॉर्मंडी किनार्या वर केलेला हल्ला, पूर्व तयारी, आणी हल्ल्या नंतरचे गणित ह्या वर लेख माला लिहावी.
ह्या घटने वरचा "द लाँगेस्ट डे" हा चित्रपट माझ्या संग्रही आहेच.
10 Jul 2013 - 11:33 am | गजानन५९
अत्यंत संग्राह्य लेखन असते तुमचे नेहमी
10 Jul 2013 - 1:44 pm | मालोजीराव
वाचतोय !
10 Jul 2013 - 5:36 pm | एकुजाधव
कटाळा नाही आला. तुम्ही लीव्हा.
11 Jul 2013 - 3:23 am | बांवरे
कृपया पुढचा भाग लवकर टंकावा ही आग्रहाची विनर्म विनंती.
11 Jul 2013 - 9:03 am | जयंत कुलकर्णी
अरेच्या ही मालिका संपली आहे............. शेवटचा भाग असेल ना !