फसवणूक-प्रकरण २१-उपसंहार (Afterword)

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
11 Aug 2010 - 2:32 pm

फसवणूक-प्रकरण २१-उपसंहार (Afterword)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

(थोडेसे वैयक्तिकः हे या पुस्तकाचे शेवटचे प्रकरण आहे व हे 'मिपा'वर चढवितांना माझ्या मनात मिश्र भावनांची गर्दी होणे सहाजिक आहे.
ही मालिका लिहायला घेतली तेंव्हा "माझ्या हातून हा प्रकल्प पुरा होईल का" याबद्दल मलाच शंका होती. पण जवळ-जवळ गेले ७-८ महिने रोज रात्री ९ ते १२ आणि संपूर्ण रविवार असा माझा लेखनक्रम होता. माझ्या सौ.ने मला खूप प्रोत्साहन दिले. माझ्या वृद्ध आईला तर काळजीच पडायची रोज!
'मिपा'वर अनेकांनी खूप चांगले प्रतिसाद दिले पण मदनबाण आणि विकास पिसाळ यांनी अगदी सातत्याने प्रतिसाद तर दिलेच पण माझ्या लेखनातील अनवधानाने झालेल्या टंकनाच्या चुका आणि अर्थबोध नीट न होणारी वाक्ये माझ्या निदर्शनास आणून दिली. याबद्दल मी या दोघांचा ऋणी आहे.
आता 'साई-सुट्यो' झाले आहे आणि मला खरंच अगदी मोकळे वाटत आहे!
इथल्या अनुभवानंतर ही मालिका ई-सकाळवर प्रकाशित होत असून वाचकांचा प्रचंड प्रतिसाद आहे. प्रशंसेचे खूप निरोप मला वैयक्तिक ई-मेलवर येत आहेत. पुस्तकरूपाने हे लिखाण प्रसिद्ध करण्यासाठीही विचारणा होत आहे. बघू इथे जकार्ताला राहून कितपत जमते ते!
त्यातच एक 'मिपा'वरील सहसभासदामुळे एका दिवाळी अंकातही या पुस्तकाची ओळख करून देण्याबद्दल विचारणा झालेली आहे.
या उपक्रमात सर्वात शेवटी एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क या उभय लेखकद्वयांचेही आभार मानतो आणि Atlantic Books या कॉपीराईटचे अधिकार धारण करणार्‍या प्रकाशन संस्थेच्या व्हॅलरी डफ आणि व्हानेस्सा केर यांचेही आभार मानतो.)

२००७ साल उजाडले आणि बुश-४३ सरकारला आपल्या उसवत चाललेल्या पाकिस्तानी धोरणाबद्दल काळजी वाटू लागली. ९/११ नंतरच्या काळात अमेरिकेने पाकिस्तानला दिलेल्या ११०० कोटी डॉलर्सच्या मदतीपैकी (बहुतांश लष्करी) ३३ कोटी मदत पाकिस्तानच्या लष्करशहांनी हडप केली होती. ज.मुशर्रफ़ अमेरिकेच्या गळ्यातले एक लोढणे बनू लागले होते कारण इस्लामी अतिरेक्यांशी लढण्याऐवजी व लोकशाही आणण्याबद्दलच्या आधीच्या "शेंडी तुटो वा पारंबी तुटो, मी पाकिस्तानात लोकशाही आणणारच, कारण मी लोकशाहीचा खंदा पुरस्कर्ता आहे" अशा राणा भीमदेवी गर्जनांसह दिलेल्या
आश्वासनांची पूर्तता करण्याऐवजी मुशर्रफ़ यांनी हुकुमशाही सातत्याने राबविली होती. त्यामुळे पाकिस्तानी जनता चिथावली-डिवचली गेली होती व तिथे हिंसेचा डोंब उसळला होता व या अण्वस्त्रसज्ज राष्ट्रात कमालीचे अस्थिर वातावरण निर्माण झाले होते.

त्यांची राष्ट्राध्यक्षपदची मुदत संपत आली होती व घटनेनुसार त्यांना आपला गणवेश उतरवून पुन्हा निवडणुकीला उभे रहाणे जरूरीचे झाले होते. पण त्यांची गणवेश उतरवायला तयारी नव्हती. न्यायसंस्था यावेळी त्यांना घटना बदलू देणार नव्हती हे तिने स्पष्ट केले होते. पाकिस्तानच्या न्यायसंस्थेने नेहमीच लष्करशहांच्या बाजूने न्याय दिला होता व अशा लष्करशहांच्या कारवायांना हेतुपुरस्सरपणे कायदेशीर चौकट प्रदान केली होती असे पाकिस्तानचा इतिहास सांगतो. पण आता पाकिस्तानी लष्करावर चोरी, भ्रष्टाचार, निवडणुकीत मुद्दाम केलेले गैरव्यवहार वगैरेबद्दलचे आरोप करू शकणारा एक स्वतंत्र आवाज तेथील वकील वर्गाला सापडला होता व या स्वतंत्र आवाजाने लष्करी हुकुमशाहीला एक आव्हान दिले होते आणि त्याची परिणती न्यायमूर्ती इफ्तिकार मुहम्मद चौधरी या सरन्यायाधीशांच्या तडका-फडकी केलेल्या उचलबांगडीत झाली होती. या कृतीची प्रतिक्रिया फारच अनपेक्षित होती. एरवी दोन पक्षातल्या भांडणांचा फायदा घेऊन व त्यातून उद्भवलेले खटले चालवून त्यातून मिळविलेल्या लठ्ठ बिदागीवर छानछोकीत रहाणार्‍या वकीलवर्गाने या वेळी सर्व राज्यांच्या राजधान्यांत खूप उग्र निदर्शनें करून जनजीवन पार विस्कळित करून टाकले होते आणि नऊ वर्षें लष्करशाहीखाली भरडल्या गेलेल्या जनतेने मोठ्या संख्येने या निदर्शनांत भाग घेऊन त्यांना साथ दिली.

इतरत्र काश्मीरच्या व अफगाणिस्तानच्या अनेक युद्धांत सक्रीय अनुभव घेतलेल्या मुस्लिम उग्रवादी संघटनांनी व गटांनी ही संधी साधून मुशर्रफ यांच्यावर जबरदस्त दडपण आणले. पाकिस्तानी लष्कराशी व गुप्तहेरखात्याशी जवळीक असलेल्या कांहीं गटांनी मुशर्रफवर दुटप्पीपणाचे आरोपही केले: एका बाजूने खासगीत जिहादी गटांची प्रशंसा करायची व दुसर्‍या बाजूने अमेरिकेच्या बाजूने युद्धात उतरून त्यांच्या ध्येयांचा विश्वासघात करायचा! अमेरिकेच्या दृष्टीने सगळ्यात काळजीची गोष्ट ही होती कीं तालीबान ही संघटनाही नव्याने नुसती उभीच राहिली होती असे नाही तर ती चांगली बोकाळली होती व वजीरिस्तानात व वायव्य सरहद्द प्रांतात खोलवर उभ्या केलेल्या नव्या तळांचा वापर करून ते ’नाटो’ फौजांवर उग्र हल्ले चढवून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हमीद करझाई यांच्या अधिकराला सुरुंग लावून त्यांच्या संघटनेचा पगडा पाकिस्तानभर विस्तारण्यात गुंतले होते. स्वात’ प्रांतातून आलेल्या बातम्यांवरून तिथल्या सरकारी इमारतींवर तालीबानचा सफेत त्रिकोणी ध्वज फडकत होता तर रहादारीचे नियंत्रणही पगडीधारी तालीबानी करताना दिसत होते.

अशा तर्‍हेने १९९९ साली ’कुदेता’द्वारा सत्तेवर आल्यापासूनचा इतिहास पहाता त्यांचा दरारा आता झाला होता इतका कमजोर या ८ वर्षांत कधीच झाला नव्हता. पक्षीय राजकारण तर नाजूक होतेच. तरीही २००७ साली व्हाईट हाऊसने (वेळेच्या अभावी व एकाद्या अस्सल व टिकाऊ तोडग्याआभावी) अमेरिकेच्या सर्व विदेशनीतिज्ञांनी व सर्वपक्षीय "आंतरराष्ट्रीय पेचप्रसंग समिती"च्या (International Crisis Group) सभासदांनी एकमताने पाकिस्तानच्या अस्थिरतेचे मूलभूत कारण म्हणून "गौरविलेल्या" मुशर्रफसारख्या नालायक राज्यकर्त्याला कायदेशीर दर्जा प्रदान करून त्याला वाचवले व वरवरची मलमपट्टी करण्याचा निर्णय घेतला व आगीत तेलच ओतले.मुशर्रफ यांनी लष्करी गणवेश उतरवायचा आणि एक बिनलष्करी (मुलकी) नागरिक या नात्याने राष्ट्रपतीपद भूषवायचे आणि मग मग सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या अशा एका "सुवर्णमध्य" सौद्याचा पाठपुरावा उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाऊचर यानी सुरू केला. अशा तर्‍हेने १९९९ साली ’कुदेता’द्वारा सत्तेवर आल्यानंतर त्यांचा दरारा आता इतका कमजोर कधीच नव्हता.

पाकिस्तानात लोकशाही स्थापणे-बावनकशी वा बेगडी-हा एकच मार्ग त्या देशाला स्थिर करण्यायोग्य दिसत होता. पण पाकिस्तानातील राजकीय स्वातंत्र्याचा अमेरिकेने कधीच पाठपुरावा केला नव्हता.
पक्षीय राजकारण तर नाजूक होतेच. तरीही २००७ साली वेळ आणि अस्सल व टिकाऊ तोडगा स्थापण्याची प्रवृत्ती या दोन्हींच्या अभावी अमेरिकन सरकारने ’मलमपट्टी’ तोडगा योजला. त्यानुसार पाकिस्तानच्या अस्थिरतेचे मूळ म्हणून सर्वांनी[१] निंदलेल्या मुशर्रफना बाजूला न करता कायदेशीर बिरुदावली देऊन वाचवायचे ठरले. मुशर्रफ यांनी लष्करी गणवेश उतरवायचा आणि एक मुलकी नागरिक म्हणून राष्ट्रपतीपद भूषवायचे आणि मग मग सार्वत्रिक निवडणुका घ्यायच्या.

पंतप्रधानपदासाठी उमेदवार अमेरिकेने ठरवायचा आणि पाकिस्तानी जनतेने त्या उमेदवाराला निवडायचे अशा एका "सुवर्णमध्य" सौद्याचा पाठपुरावा उपपरराष्ट्रमंत्री रिचर्ड बाऊचर यानी सुरू केला. ९०च्या दशकात त्या दोनदा पंतप्रधानपदी असताना त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप जरी झालेले होते तरी पाश्चात्य देशात शिकलेल्या व पाश्चात्य विचारसरणीशी जवळीक असलेल्या, कांहींशी धर्मनिरपेक्ष विचारसरणी असलेल्या व मुख्य म्हणजे पाकिस्तानात अद्यापही खूप लोकप्रिय असलेल्या बेनझीर भुत्तो यांना "वासरात लंगडी गाय शहणी" या नात्याने निवडणुकीनंतरच्या सरकारात पंतप्रधान म्हणून निवडावे असा बाऊचर यांचा प्रस्ताव होता.

पण या "मुशर्रफ बचाओ" योजनेच्या मार्गात लक्षणीय अडचणी होत्या. कारण मुशर्रफ यांना बेनझीरबद्दल तर बेनझीरला मुशर्रफबद्दल पूर्ण तिरस्कार होता. पण बाउचरनी दोघांना आपापले प्रतिनिधी निवडायला सांगितले आणि या प्रतिनिधींत दुबई, लंडन, वॉशिंग्टन आणि इस्लामाबादला बैठकी झाल्या. या बैठकी इतक्या पुढे गेल्या कीं शेवटी अतीशय गुप्ततेत आणि तणावात हे दोघे जानेवारी २००७मध्ये अबू धाबीत समोरासमोर भेटले.

या बैठकीने त्यांच्यातील मतभेदांची दरी किती रुंद होती हे दाखविले. बेनझीरबाई लंडनहून रात्रभर प्रवास करून अबू धाबीला पहाटे पोचल्या होत्या. जरी दमल्या असल्या तरीही त्या मद्यपान करत नसल्यामुळे तशा तरतरीत होत्या. याउलट त्या बैठकीत मुशर्रफ़ इतके दारूच्या नशेत होते कीं त्यांना सुसंगतपणे बोलायला अडचण येत होती असे बेनझीरबाईंनी त्यांच्या विश्वासू सहाय्यकांना सांगितले. त्यांनी अशा भेटीसाठी अबूधाबीसारख्या जागेची निवड केल्याबद्दल नाराजी दर्शविली कारण जिथे लाखोंनी पाकिस्तानी लोक नोकरीसाठी आले आहेत अशा कुणीही त्यांना ओळखले असते तर या गुप्ततेतील हवाच निघून गेली असती. याला मुशर्रफ यानी "तुम्ही बुरखा का नाहीं वापरला?" असा उद्धट प्रतिप्रश्न मुशर्रफ़ यांनी केला.

बरेच महिने ही चर्चासत्रे चालू राहिली. या दरम्यान पाकिस्तानातील अंतर्गत परिस्थिती आणखीच चिघळत चालली व शेवटी सप्टेंबर २००७ मध्ये दुसर्‍या भेटीनंतर एक तात्पुरता करार करण्यात यश आले. त्यानुसार मुशर्रफ आपले लष्करी पद सोडून एक नागरिक म्हणून राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवतील व भुत्तो कुटुंबियांविरुद्धचे सर्व फौजदारी आरोप मागे घेतील आणि त्याच्या मोबदल्यात अण्वस्त्र खाते, परराष्ट्रनीती, देशांतर्गत व बाह्य सुरक्षा आणि वार्षिक अर्थसंकल्पातील वरील खात्यांच्या तरतुदी लष्कराकडेच ठेवायला बेनझीरबाई तयार झाल्या. १९८८मध्ये पंतप्रधानपदी असतानाचा लष्कराकडून झालेल्या अपमानाचा व पदच्युतीचा पूर्वीचा कटु अनुभव बाजूला ठेऊन बेनझीरबाई या कराराला तयार झाल्या.

पण ९०च्या दशकात दोनदा पंतप्रधानपद भूषविलेल्या नवाज शरीफ यांचे विचार वेगळेच होते. त्यांनी सप्टेंबरच्या सुरुवातीला घोषणा केली कीं पाकिस्तान मुस्लिम लीग (PML-N) चे नेतृत्व करायला ते पकिस्तानला परत येऊ इच्छित होते. अमेरिकेला हे नको होते कारण आधी अण्वस्त्रचांचणी करणार नाहीं असे कबूल करून बरोबर त्याविरुद्ध कृती करणार्‍या शरीफ यांच्यावर अमेरिकेचा विश्वास नव्हता. ते कमजोर आणि खोटारडे आहेत असे त्यावेळी त्यांच्याशी वाटाघाटी केलेल्या क्लिंटन यांच्या सहाय्यकांचे मत होते. पण शरीफना त्याची पर्वा नव्हती. "मुशर्रफ याना घालवलेच पाहिजे. ते आता संपलेच आहेत" असे त्यांनी त्यांच्या लंडन येथील सदनिकेत जमलेल्या त्यांच्या पुरस्कर्त्यांना सांगितले. आम्हाला हुमुमशहा नको आणि आम्ही तत्वपूर्ण भूमिका घेऊन लोकशाही आणू. आम्हाला जनतेचा असलेला पाठिंबा स्पष्ट दिसत असून मुशर्रफ आता संपले आहेत असेही ते म्हणाले.

बेनझीरबाईंच्या पाकिस्तानभेटीची पूर्ण आखणी करायच्या दृष्टीने बाऊचर यांच्या हद्दपार म्हणून त्या रहात होत्या त्या दुबईच्या व इस्लामाबादच्या वार्‍या चालू होत्या. तेवढ्यात १० सप्टेंबर रोजी माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाकिस्तानला जाण्यासाठी लंडनच्या हीथरो विमानतळावरून प्रयाण केले. त्यांच्या एकनिष्ठ अनुयायांनी इस्लामाबाद येथे त्यांच्या वीरोचित आणि भव्य स्वागताची तयारी केली होती, पण ते एक दिवास्वप्नच ठरले. आपल्या समर्थकांना भेटण्याची संधीही त्यांना न देता या माजी पंतप्रधानांना पाकिस्तानी गुप्तहेर संघटनेने इस्लामाबाद विमानतळावरच अटक केली व कांहीं तासातच त्यांची पुन्हा सौदी अरेबियाला रवानगी केली.

आता बेनझीरबाईंना जलद पावले उचलणे जरूरीचे होते. त्या आपल्या दुबईतील राजेशाही बंगल्यातून जगभरचे फोन घेत होत्या. आपले पाकिस्तानला परत जायचे मनसुबे जाहीर करताना त्यांच्या मनात त्यांच्या अनेक कुटुंबियांच्या राजकारणापायी झालेल्या मृत्यूंबद्दल विचार येत असावेत.
"जन्माची वेळ व मृत्यूची वेळ विधिलिखितच असते व कुणीच त्या विधिलिखितात लिहिलेल्या वेळेच्या आधी मरत नाहीं." असे भुत्तोबाई बर्‍याचदा निर्विकारपणे म्हणत. "पाकिस्तानचे राजकारण आम्हा भुत्तोंच्या रक्तात खोलवर भिनलेले आहे तसेच ते माझ्याही रक्तात सतत दौडत आहे." असे त्या म्हणत. त्यांच्या सल्लागारांनी त्यांना धोका न घेण्याबद्दल आणि इतरांना स्वतःच्या फायद्यासाठी तिचा उपयोग न करू देण्याबद्दल वारंवार सांगितले. त्या म्हणत की वॉशिंग्टनसह सगळे त्यांना वापरत आहेत हे त्यांना माहीत होते पण त्यांना खात्री होती कीं त्यांच्या परतण्यामुळे त्यांचे एका अशा शक्तीत रूपांतर होईल की जी कुणीही थांबवू शकणार नाहीं आणि त्या पाकिस्तानचे नेतृत्व करून आपल्या विधिलिखिताची पूर्तता करून आपली प्रतिमा झळझळीत करू इच्छित होत्या.

१८ ऑक्टोबर २००७ रोजी बेनझीरबाई कराची विमानतळावर उतरल्या. सगळ्यांना त्यांच्या विराट स्वागताचे आश्चर्य वाटले. सारे विमानतळ व बेनझीरबाईंना व त्यांच्या बरोबरच्या पाकिस्तान पीपल्स् पार्टीच्या नेत्यांना व पत्रकारांना नेणासाठी आयोजलेल्या बसला लाखोंचा गराडा पडला. त्यातले बरेचसे PPP चे अनुयायी होते, पण ’गंमत पहायला’ म्हणून आजूबाजूच्या सोसायट्यांमधून आलेले लोकही होते. लष्करी राजवटीच्या वरवंट्याखाली संथ-सुस्त व भविष्याबद्दल भयग्रस्त असलेल्या पाकिस्तानी जनतेत भुत्तोबाईंच्या आगमनाने एक उत्साहाची व अपे़क्षेची लाट उसळली होती. अफाट जनसमुदाय व त्याचा अनोख उत्साह पाहून "बेनझीरला कोण विचारतोय्. ती एक संपलेली शक्ती आहे" असे अनुदार व कुत्सित उद्गार त्यांच्या आधीच्या भेटींत मुद्दाम काढणार्‍या मुशर्रफना एक धक्काच बसला होता.

बेनझीरबाईंची ही रथयात्रा व संचलन ८ तास चालल्यावर एक धमाका, पाठोपाठ एक लखलखाट व नंतर एक प्रचंड स्फोट झाला! बेनझीरबाईंच्या या आनंदयात्रेत एकच गोंधळ माजला व घबराट उडाली. पहावे तिकडे रक्त आणि प्रेते विखुरलेली दिसत होती. दोन आत्मघाती अतिरेक्यांनी या आनंदयात्रेवर प्राणघातक हल्ला केला होता. त्यात १४० लोक मृत्युमुखी पडले व ४० जखमी झाले व बेनझीरबाई थोडक्यात वाचल्या होत्या. बेनझीरबाईंनी लगेच पाकिस्तानी गुप्तहेरखात्यावर हा हल्ला योजल्याचा आरोप केला, तर पाठोपाठ गुप्तहेरखात्याने बेनझीरबाईंवर प्रत्यारोप केला कीं त्यांनी स्वत:चे राजकीय महत्व वाढवण्यासाठी मुद्दाम हा हल्ला घडवून आणला! बेनझीरबाईंनी आपल्या समर्थकांची पुन्हा एकदा जुळणी केली व बाऊचर यांच्या पुढाकाराने केलेल्या व उभयपक्षी मान्य असलेल्या अटींना त्यांनी केराची टोपली दाखवली. स्वतःच्या शक्तीचा व लोकप्रियतेचा अंदाज आल्यावर त्यांचा आत्मविश्वास वाढला.

मुशर्रफ यांनी नुकतीच जिंकलेली राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक त्यांनी लष्करातून निवृत्ती घ्यायच्या आधीच लढवली होती व हे कृत्य संविधानाच्या अटीविरुद्ध आहे म्हणून त्यांची ही निवडणूक अवैध ठरवायची हिंमत सर्वोच्च न्यायालयाने दाखवली त्या पाठोपाठ परिस्थितीची पहाणी करण्यासाठी थांबलेल्या वकीलांच्या संघटनेने त्यांची चळवळ पुन्हा सुरू केली.

मुशर्रफ भडकले. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला बरखास्त केले आणि नव्या स्वतःला समर्थन देणार्‍या न्यायाधीशांची नेमणूक केली. "पाकिस्तानी लष्कर या देशाचे तारणहार असून त्यांच्या मदतीशिवाय व हस्तक्षेपाशिवाय पाकिस्तान हा "एक देश" या नात्याने शिल्लकच रहणार नाहीं व ज्यांना हे मान्य नाहीं ते भरकटलेले लोक आहेत" असेही ते फूत्कारले. PPP व PML-N चे अनेक नेते, वकील, लोकशाहीवादी सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक व पत्रकार अशांना हजारोंनी तुरुंगात डांबण्यात आले. खासगी चित्रवाहिन्यांवर बंदी आणली गेली. BBC, CNNला येणार्‍या बातम्या कापल्या गेल्या आणि ब्रिटिश वार्ताहारांना परत धाडण्यात आले. ३ नोव्हेंबर २००७ रोजी पाकिस्तानी शहरांत आणि गांवात सैनिक गस्त घालू लागले व सर्व मोठ्या रस्त्यांवर वहातूक मंदगती करण्यासाठी व वाहनांच्या तपासणीसाठी जागोजागी अडथळे (Roadblocks) उभारण्यात आले. एक आत्मघाती बॉम्बहल्ला लष्कराच्या रावळपिंडी छावणीत झाल्याबरोबर मुशर्रफ यांनी पाकिस्तानची राज्यघटना तात्पुरती स्थगित करून "अतिरेकी घटनांना जास्त योग्य पद्धतीने तोंड देता यावे म्हणून" आणीबाणी पुकारली.

भडकलेली आग विझावी म्हणून केलेल्या उपायाचा परिणाम भलताच झाला. "स्वतःविरुद्ध केलेला कुदेता" असेही त्याचे वर्णन कांहीं भाष्यकारांनी केलं. अलीकडे तुरुंगात डांबलेले १७००० कैदी निधर्मी, पुरोगामी आणि लोकशाहीचे पुरस्कर्ते होते. दहशतवाद्यांशी लढणारे सैन्य मुलकी आणीबाणीला तोंड देण्यासाठी तिथून शहरांत बोलावले गेले होते. उलट तुरुंगांतून मुशर्रफनी कट्टर सुन्नी लढवयांना त्यांच्याबरोबर तात्पुरता करार करून सोडले होते. पण मुशर्रफना पाठिंबा द्यायच्या ऐवजी या तालीबानी बिनलष्करी सैनिकांनी त्यांच्या कारवाया आणखीच तीव्र केल्या.

हे पाहून अमेरिकी व ब्रिटिश अधिकार्‍यांचीही पाचावर धारण बसली. मुशर्रफ यांनी मात्र पुन्हा एकदा "घूम-जाव" केले व ते सौदी अरेबियाला गेले. सौदी राजघराण्याच्या सदस्यांची सौजन्यभेट घेऊन ते नवाज शरीफना भेटले. मोजक्याच दिवसांनंतर मुशर्रफ यांच्या आशिर्वादाने नवाज पाकिस्तानला परतले[२]. बेनझीरबाईंच्या मतात फूट पाडण्याचा हा डाव होता. या घटनांनी मुशर्रफ जरासे धीट झाले व त्यांनी लष्करी गणवेश उतरवला व त्यांनी माजी ISI प्रमुख व अयशस्वी ठरलेल्या भुत्तो-वाटाघाटींत मुशर्रफ यांचे प्रतिनिधित्व केलेल्या ज.अश्फाक परवेज कयानी यांना लष्करप्रमुख बनविले. स्वत:च्या राष्ट्रपतीपदाच्या दुसर्‍या सेवाकालाला त्यांनीच नेमलेल्या न्यायाधीशांच्या बेंचकडून मान्यताही मिळविली. ८ जानेवारी ही निवडणुकीची तारीख ठरली. अटकसत्रांसारखे अत्याचार, आत्मघाती हल्ले, राजकीय पक्षांना मोठ्या सभा घ्यायची व प्रचार करायची बंदी अशी अनेक पावले टाकूनही मुशर्रफ यांची लोकप्रियता २१ टक्क्यावर आली[३] आणि बेनझीर व नवाज यांची लोकप्रियता जोरात वाढली. सर्व अडचणींवर मात करून जर मतदान रद्द केले गेले नाहीं तर मुशर्रफ मोठ्या फरकाने हरतील असे चित्र दिसू लागले.

भुत्तो समर्थकांना ते चौरस्त्यावर उभे असल्याची जाणीव होती. एका बाजूने त्यांना विजयाची चाहूल लागली होती तर दुसर्‍या बाजूने बेनझीरबाईंच्या जिवाची काळजी लागली होती. कारण अल्-कायदा व पाकिस्तानी गुप्तहेर संघटना या दोन्ही संघटनांमध्ये त्यांना मारू पहाणारे गट होते. एक संरक्षक तटबंदी म्हणा किंवा एक तर्‍हेचा विमा म्हणा पण बेनझीरबाईंनी त्यांचा एक अमेरिकेतला माजी विश्वासू सहाय्यक मार्क झीगल यांना ई-मेल पाठवून मुशर्रफ यांच्या अधिकार्‍यांपैकी त्यांच्या जिवावर उठलेल्या लोकांची यादी पाठविली. तसेच PPP च्या नेत्यांनी अमेरिकेच्या अधिकार्‍यांसाठी व राजकीय नेत्यांसाठी कागदपत्रांची एक फाईल तयार केली होती ज्यात भुत्तो यांच्या निवडणुकीला सुरुंग लावण्याच्या सरकारी हालचालींची माहिती दिली होती.

२७ डिसेंबर रोजी लष्कराचा बालेकिल्ला असलेल्या व सैनिक व गुप्तहेरांनी गजबजलेल्या रावळपिंडी येथे एका सभेत भाषण करून परत येत असतांना आपला जयजयकार करणार्‍या समर्थकांचे हात हलवून आभार मानण्यासाठी बेनझीरबाईंनी गाडीच्या टपातून डोके बाहेर काढले आणि क्षणार्धात गोळीबाराचे आवाज झाले आणि बेनझीरबाई गाडीत कोसळल्या. पाठोपाठ त्यांच्या गाड्यांचा ताफा उधळून टाकण्यासाठी आत्मघाती अतिरेक्याकडून करविलेला एक मोठा स्फोटही झाला. कांहीं तासानंतर बेनझीरबाईंच्या (व त्यांच्या डझनावारी समर्थकांच्या) मृत्यूची बातमी जाहीर झाली. तिच्यावर उपचार करणार्‍या डॉक्टर्सनी सांगितले कीं बेनझीरबाईंना डोक्याला व गळ्याला गोळ्या लागल्या होत्या शिवाय बाँबमधून बाहेर पडलेले धातूचे तुकडेही त्यांना सर्वांगावर लागले होते.

बेनझीरबाईंच्या हत्येचे पडसाद सर्व जगात उमटले व सर्व राष्ट्रांनी त्याची एकमुखाने निंदा केली. PPP नेत्यांनी ताबडतोब मुशर्रफला दोषी ठरविले. संतापलेले भुत्तो-समर्थक रस्त्यावर उतरले. क्षणभर असे वाटले कीं पाकिस्तान आता संपले! सरकारही घाबरले. सरकारी दावा होता कीं बेनझीरबाईंचे डोके गाडीच्या टपाच्या खिडकीवर आपटले व त्या जखमेमुळे त्यांचा मृत्यू झाला. बेनझीरबाईंच्या मृत्यूने मुशर्रफ यांच्या अधिपत्त्याखालील एका भयानक जगाची ठळकपणे ओळख झाली जिथे रावळपिंडीसारख्या लष्कराच्या बालेकिल्ल्यातही हे अतिरेकी बेगुमानपणे व निर्भयपणे कुणालाही टिपून देशात एक भीतीचा उद्रेक उभा करून देशाला पूर्णपणे अस्थिरतेच्या जबड्यात ढकलू शकत होते.
अधिकृत प्रतिक्रियेने दोषाचे खापर त्यांच्या डोके बाहेर काढण्याच्या कृत्यावर फोडले. हे कारण अविश्वसनीय होते पण पाश्चात्य सरकारांनी विश्वास न ठेवण्याचे कांहींच कारण नाहीं असा सूर लावला. बेनझीरबाईंच्या मृत्यूनंतर पाश्चात्य सरकारांना PPP कांःईंच उप्योग नव्हता. दरम्यान बेनझीरबाईंच्या १८ वर्षीय बिलावल या मुलाला तिचा वारस नेमण्यात आले व त्याचे शिक्षण होईपर्यंत जरदारींना पक्षाचे नेते निवडले गेले.

त्यांच्या जिवंतपणी त्यांनी ऐक्यापेक्षा दुहीच जरी जास्त निर्माण केली असली तरी त्यांच्या मृत्यूनंतर झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जरदारींच्या PPP व नवाज शरीफ यांच्या PML-N मध्ये निवडणूक समझोता झाला व ते भरघोस मताधिक्याने निवडून आले. ६७ टक्के मते मिळवून एक युतीचे सरकार स्थापन झाले व मुशर्रफ यांच्या ’कृपे’ने पाच वर्षें तुरुंगवास भोगलेले गिलानी पंतप्रधान झाले. पंतप्रधानपदाचा शपथविधी चालू असताना मुशर्रफ यांच्या चेहर्‍यावरचा अस्वस्थपणा साफ दिसत होता. चित्रवाणीवर दाखविलेल्या या समारंभात त्यांनी गुळमुळीतपणे गिलानींना मान्यता दिली.

पाश्चात्य देशांनी फक्त लष्कराला समर्थन दिले पण मुलकी संस्थांना कमजोर बनविले व यामुळे पाकिस्तान एक दिवस खोल खड्ड्यात पडण्याची घाबरवणारी शक्यता डोळ्यासमोर दिसू लागली होती. अमेरिकेतील सर्वात मातब्बर व प्रभावी लष्करी तज्ञ आणि 'West Point'च्या इतिहासवेत्ते कागन यांनी ताकीत दिली कीं १९७९साली इराणमध्ये शहांचा पाडाव होणार याबद्दल भाकित करू न शकल्यामुळेच आयातुल्ला खोमेनींची इस्लामी क्रांती तिथे यशस्वी झाली होती. आता पाकिस्तानमध्ये नजीकच्या भविष्यकाळात लोकशाही अयशस्वी झाल्यामुळे अमेरिकेला इस्लामाबाद काबीज करावी लागणार असल्याचा धोका त्यांना दिसत होता.

बुश यांनी जरी मुशर्रफ यांना "एक संपूर्णपणे विश्वसनीय सहकारी" या शब्दात समर्थन देणे चालूच ठेवले असले तरी कागन यांनी ’व्हाईट हाऊस’ने आता "पाकिस्तान हे सर्वसंहारक अशा भावी प्रलयाची जननी आहे" या पेंटॅगॉनच्या अधिकार्‍याच्या मतावर सखोल चर्चा करावी असा सल्ला दिला. पाकिस्तानच्या सेनेतील धर्मांध गट जास्त-जास्त बळकट होत असून या गटाने जर अचानक सीमांपासून निघून जायचे ठरविले तर जी पोकळी निर्माण होईल ती मूलगामी/कर्मठ अतिरेक्यांकडूनच व्यापली जाईल. अतिरेक्यांनी जर यशस्वी कुदेता घडवून आणला व अण्वस्त्रांवर ताबा मिळवला तर काय करावे लागेल याचा पाश्चात्य राष्ट्रांनी विचार करून ठेवावा असा सल्लाही त्यांनी दिला. याहूनही जास्त अनिष्ट गोष्ट म्हणजे पाकिस्तानी लष्करात फूट पडून त्यांच्यातल्या लठ्ठालठ्ठीत मूलगामी गटाची सरशी होऊन त्यांनी अण्वस्त्रांच्या साठ्याचा संपूर्णपणे ताबा घेणे. २००७ साली हे पुस्तक प्रकाशित झाले तेंव्हां कागन अमेरिकन एंटरप्राईज इन्स्टिट्यूट येथे ज्येष्ठ ’फेलो’ होते व त्यांनी अमेरिकेने आता आपल्या एकेकाळच्या सहकारी देशाची शकले होतील या शक्यतेची अटकळ बांधून त्यानुसार पावले उचलण्याची पूर्वतयारी केली पाहिजे असा सल्ला दिला होता.

थोडक्यात योग्य वेळ येताच अतीशय कर्तबगार (Elite) सैनिक पाकिस्तानात पाठवून सर्व अण्वस्त्रांचा साठा ताब्यात घेणे व ती अण्वस्त्रे पाकिस्तानाबाहेर काढून न्यू मेक्सिकोत एकाद्या गुप्त जागी ठेवणे किंवा ते शक्य नसल्यास पाकिस्तानातच एकाद्या अभेद्य जागी लपवून ठेवणे अशा कांहीं धोकादायक पर्यायांचा विचार करून ठेवला पाहिजे असेही कागन यांचे म्हणणे आहे. श्री. कागन पुढे म्हणतात कीं अमेरिकन लष्कराने आता पाकिस्तानच्या सरहद्दीचा भाग पादाक्रांत करून ही अटीतटीची लढाई तालीबान, त्यांचे मित्रगट आणि अल-कायदा यांच्यावर लादायला (शत्रूच्या भूमीत न्यायला) जय्यत तयार असायला हवे. पाकिस्तानचे इस्लामाबाद, पंजाब आणि दक्षिण व आग्नेय भाग ताब्यात घ्यायची आणीबाणीची योजना करून ठेवायला हवी!

या थराला गोष्टी का आल्या याचे मूल्यमापन कुणीच केले नाहीं किंवा त्याबद्दलच्या चर्चेतही हा विषय आलाच नाहीं. पण पाकिस्तानला ८०च्या दशकात अमेरिकेच्या संमतीने आणि सहकार्याने अण्वस्त्रसज्ज बनताना पाहून परराष्ट्रमंत्रालय, CIA आणि पेंटॅगॉनमधील नेक अधिकार्‍यांना स्वतःला फसविल्यासारखे वाटे. आणि आजच्या बुश-४३ यांच्या सरकारला ते अण्वस्त्रभांडार ताब्यात घ्यायचा सल्ला दिलेला पाहून या अधिकार्‍यांना आपण व्यक्त केलेली भीती खरी ठरल्याने एका बाजूने वाटणारा आनंद पण आपल्या म्हणण्याकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने सार्‍या जगाला भविष्यकाळात भोगाव्या लागणार्‍या दुःखाच्या कल्पनेमुळे होणारा खेद अशा विलक्षण परस्परविरोधी भावना त्यांच्या मनात धुमाकूळ घालत होत्या.
याच अधिकार्‍यांना १९९० साली अमेरिकेने पाकिस्तानकडे कशी पाठ फिरविली हे माहीत होते आणि तेंव्हांही पाकिस्तानची मदत बंद केल्यास ते नक्कीच अण्वस्त्रविद्या विकून पैसे उभे करतील असे त्यांचे लष्करशहा सांगत होते तेही या अधिकार्‍यांना माहीत होते. त्यावेळी पाकिस्तानविरुद्ध अण्वस्त्रप्रसाराच्या मुद्द्यावर खंबीरपणे उभे रहायचा अमेरिकेचा निर्णय ९/११नंतर मागे घ्यावा लागला. पाकिस्तानने केलेल्या पापांकडे काणाडोळा करून व सर्व अपराध पोटात घालून त्यांना दहशतवादाविरुद्धच्या युद्धात पाकिस्तानला सहभागी करून घेण्यासाठी लोकशाहीवर मर्यादा घालण्याचा आणि अण्वस्त्रप्रसारात पाकिस्तानने घेतलेल्या सक्रीय भागाबद्दल मूग गिळून गप्प बसण्याचा करार अमेरिकेने पाकिस्तानबरोबर केला आणि लष्कराला पुन्हा वरचढ होण्यास मदत केली. आज सखोल मनन व विचार केल्यावर असाच निष्कर्ष काढावा लागेल कीं या काराराची किंमत पाश्चात्य राष्ट्रांना फारच महाग पडणार होती-केवळ आर्थिक दृष्ट्याच नव्हे तर पाकिस्तानला विघटनाच्या कड्यापर्यंत नेण्याची. आणि आता तो देश हातातल्या अण्वस्त्रांमुळे होणार्‍या अण्वस्त्रयुद्धाच्या सर्वविनाश करणार्‍या खाईकडे सार्‍या जगाला ढकलत आहे.
----------------------------------------------------
टिपा:
[१] यात परराष्ट्रधोरणाचे अभ्यासक आणि International Crisis Group सारख्या अपक्ष संघटना होत्या.
[२] मुशर्रफ़ किती निर्लज्ज आहेत पहा! अगदी "कामापुरता मामा" जातीचे! सप्टेंबरमध्ये ज्यांनी शरीफना पाकिस्तानात येऊ दिले नव्हते तेच स्वत:ला गरज पडताच, स्वत:ला खुर्चीचा चटका बसू लागताच सर्व मानमर्यादा गुंडाळून शरीफनाच सौदीला जाऊन भेटतात काय आणि शरीफ परत पाकिस्तानात येतात काय! अगदी सोयीची शय्यासोबत!
[३] लोकमतासा कानोसा घेणार्‍या विश्वसनीय संघटनांनी मतदारांना विचारून केलेला अंदाज

राजकारणप्रकटन

प्रतिक्रिया

बाकी काहीही असो.. पण एखाद्या गोष्टिचा पाठपुरावा करुन ती पूर्णत्वाकडे कशी न्यायची हे काळेसरांकडून शिकण्यासारखे आहे. ग्रेट !!

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

11 Aug 2010 - 4:34 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>>>बाकी काहीही असो.. पण एखाद्या गोष्टिचा पाठपुरावा करुन ती पूर्णत्वाकडे कशी न्यायची हे काळेसरांकडून शिकण्यासारखे आहे. ग्रेट !!

अगदी सहमत आहे.
धरसोड करत आपले लेखन वाचले. बाकी, आपल्या लेखनाच्या चिकाटीला आमचा सलाम आहे.

-दिलीप बिरुटे

चित्रा's picture

11 Aug 2010 - 7:48 pm | चित्रा

धरसोड करत आपले लेखन वाचले. बाकी, आपल्या लेखनाच्या चिकाटीला आमचा सलाम आहे.

असेच म्हणते.

सुनील's picture

11 Aug 2010 - 7:57 pm | सुनील

सहमत

वाहीदा's picture

11 Aug 2010 - 9:57 pm | वाहीदा

काका,
तुमच्या चिकाटी ला माझा मानाचा मुजरा !
मी ही धरसोड करुन च ते मिपावर वाचले पण office मध्ये ज्यांना ज्यांना तुमचे लिखाण सुचविले त्यांनी मात्र नित्य नियमाने ई-सकाळवर (प्रकाशित झालेले) वाचले
माझ्यासकट त्या माझ्या सर्व मित्र मैत्रिणीं कडून आपले हार्दिक अभिनंदन !!

मदनबाण's picture

11 Aug 2010 - 8:02 pm | मदनबाण

काळे काका, ही लेख मालिका पूर्ण झाल्या बद्धल तुमचे अभिनंदन !!! :)

Dhananjay Borgaonkar's picture

11 Aug 2010 - 11:51 pm | Dhananjay Borgaonkar

एक उत्तम लेखमाला. अभिनंदन काका.
तुम्ही खरच याच पुस्तक प्रकाशित करा.

आता कोणती नवीन लेखमाला आमच्या पर्यंत पोचवताय?

श्रावण मोडक's picture

12 Aug 2010 - 12:16 am | श्रावण मोडक

अनुवाद आधीपासून वाचतोय. मधल्या काळात मूळ पुस्तकही वाचलं. अनुवादामागील प्रयत्नांची कल्पना मला आहे, त्यामुळं तुमच्या चिकाटीला दाद.
पुस्तक जरूर करा. पण एक सूचना - चांगला संपादक गाठा. मराठीतील प्रकाशक या आघाडीवर कच्चेच. अनेकदा संपादकांनाही कळत नाही ते काय करतात हे. सावध. हा अनुवाद गिरणी-अनुवाद नाही. हे पुस्तकही तसे नाही. तेव्हा यातील भाषेला वजन असावंच लागेल. तुम्ही केलेल्या अनुवादावर आणखी थोडे भाषाविषयक संस्कार झाले, तर पुस्तकाचं मूल्य वाढेल.

सुधीर काळे's picture

12 Aug 2010 - 10:09 am | सुधीर काळे

मोडकसाहेब,
आपल्याला व्यनि पाठविला आहे.
काळे

सुधीर काळे's picture

12 Aug 2010 - 10:16 am | सुधीर काळे

चित्राताई, वाहीदा, अवलिया-जी, प्रा. डॉ. बिरुटे-जी, सुनील-जी, मदनबाण आणि धनंजय,
मनापासून धन्यवाद!

सहज's picture

12 Aug 2010 - 12:14 pm | सहज

वरील सर्वांशी सहमत.

अतिशय चांगले काम केले आहे. प्रकरण १९ ज्यात अल-कायदाचे २०२० व्हिजन आहे तो भाग तर रोचक व चिंतनीय आहे.

धन्यवाद.

सुधीर काळे's picture

26 Aug 2010 - 8:03 pm | सुधीर काळे

सहज-जी,
१९व्या प्रकरणातील अल-कायदाचे "२०२० व्हिजन" हा भाग खरंच प्रत्येक भारतीयाला एकाद्या धर्मग्रंथाप्रमाणे रोज वाचायला लावला पाहिजे इतका गाभ्याला हात घालणारा आणि म्हणूनचा चांगला आणि वाचनीय आहे.
पण मी जो उद्वेग एक-दोन ठिकाणी बोलून दाखविला तो यासाठीच..... या प्रकरणाचे वाचन फक्त २११ वेळा झाले व अभिप्रायही फक्त पाच आले.
काश्मीरवरच्या (त्यामानाने) 'तद्दन किरकोळ' लेखाला १८१ प्रतिसाद आणि वाचनेही २००० हून जास्त.
त्याच अनुषंगाने मी म्हटले होते कीं, "बोरि बाभळी उगाच जगती, चंदन माथि कुठार"!
याच गाण्यातील दुसर्‍या एका कडव्यातील ओळी याहूनही जास्तच भेदक आहेत....
"पतिव्रतेच्या गळ्यात धोंडा, वेश्येला मणिहार"!
तशातली गत!
(अर्थ शब्दशः घेऊ नयेत. ओळी माडगूळकरांच्या आहेत!)
"पार्किन्सन्स लॉ" या मालिकेत तीन पुस्तके आहेत. फारच नाजू़क चिमटे काढणारी! कुणी वाचली आहेत कां? त्यातला एक लॉ आहे "Time spent on each item is inversely proportional to its importance"
बस्स. एका वाक्यात सगळे सार आले.

'मॅजेस्टिक पब्लिकेशन'ने मा़झ्या या ले़खमालिकेवरून नवीन पुस्तक नुकतेच प्रकाशित केले आहे. शीर्षक आहे "पाकिस्तानी अणुबाँब: एक घोर फसवणूक". मूळ लेखनात मी खूप सुधारणा करून हे पुस्तक लिहिले आहे. हे माझे पहिलेच 'अपत्य' आहे! तरी येथील सर्व सभासदांनी ते जरूर वाचावे ही विनंती!

श्रीरंग_जोशी's picture

4 May 2015 - 5:36 pm | श्रीरंग_जोशी

पहिल्या पुस्तकाच्या प्रकाशनाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन.

पुस्तकाची इ-आवृत्ती खरेदीसाठी उपलब्द झाल्यास अधिक आनंद होईल.

एस's picture

5 May 2015 - 6:59 pm | एस

अभिनंदन!

@श्रीरंगभाऊ, या लेखमालेच्या सर्व भागांचे दुवे देता येतील का? आप हमें दुवे दो, हम आप को दुवा देंगे|

खेडूत's picture

4 May 2015 - 4:59 pm | खेडूत

अभिनंदन!

हे पुस्तक वाचेनच.
त्या काळी मिपावर नसल्याने अनेक चान्गले लेख वाचायचे राहून गेले आहेत. जुने दुवे मिळाल्यास उत्तम.

जयंत कुलकर्णी's picture

5 May 2015 - 9:52 am | जयंत कुलकर्णी

अभिनंदन !......काळेसाहेब, एका वाचकाला जरी ते आवडले तरीही तुमचे काम झाले.....अर्थात मी ते वाचेनच...

श्रीरंग_जोशी's picture

5 May 2015 - 10:06 pm | श्रीरंग_जोशी

प्रकरण #शीर्षक
Adrian Levy व Catherine Scott-Clark लिखित "अण्वस्त्रांबाबतची फसवणूक"
     १एक रागाने भडकलेला तरुण
     २प्रकल्प "लोणी कारखाना"
     ३मृत्यूच्या दरीत
     ४कवड्या!
     ५पाकिस्तान, अमेरिका व अण्वस्त्रांचा गुप्त व्यापार
     ६ज्यूंचा कल्पनाविलास
     ७पाकिस्तानी अणूबॉम्ब सार्‍या मुस्लिम जगताचा!
     ८अननसाचा केक
     ९नेत्रपल्लवी करणारे ज. आइन्सेल
    १०बांगड्या ल्यायलेले बदमाष!
    ११क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे
    १२प्रकल्प "A/B"
    १३चेस्टनटस् व उकडलेला मासा
    १४एक नवी स्पष्ट दिशा
    १५एक अरक्षित भगदाड
    १६मुश आणि बुश
    १७मोहीम फत्ते!
    १८आपल्याला त्यांनी कुत्र्यांच्या तोंडी घातलंय्!
    १९नवी विचारसरणी
    २०जागृती (Awakening)
    २१उपसंहार (Afterword)

एस's picture

5 May 2015 - 9:43 pm | एस

धन्यवाद!

डॉ सुहास म्हात्रे's picture

5 May 2015 - 8:26 pm | डॉ सुहास म्हात्रे

पुस्तकप्रकाशनासाठी अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !

काळे काका, अभिनंदन आणि अनेक शुभेच्छा !!!

रुपी's picture

6 May 2015 - 5:23 am | रुपी

पुस्तक प्रकाशित झाले याबद्दल अभिनंदन!!

भारतवारीत नक्कीच विकत घेईन.

इथल्या सर्व भागांचे दुवे दिल्याबद्दल श्रीरंग जोशी यांचेदेखिल आभार!