फसवणूक-प्रकरण आठवे-अननसाचा केक (Pineapple Upside-Down Cake)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
मराठी रूपांतर आणि मराठी रूपांतरासाठी © (मूळ लेखकांच्या वतीने): सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)
झियांची अमेरिकेशी संबंध नसलेला 'स्वतंत्र व सतत' मिळकतीचा ओघ निर्माण करायची योजना साकार व्हायची असेल तर इराण व पाकिस्तानला खूप काम करायचे होते. खानसाहेबांना त्यांच्या 'आयाती'साठी बनविलेल्या संघटनेला 'निर्याती'त बदलायला हवे होते व जागाही बदलायला हवी होती. पाकिस्तानचे दुबईबरोबर खास जवळचे संबंध होते. दुबईच्या बाजारपेठा व हॉटेल्स इराकी निर्वासितांनी, इराणच्या शहांच्या समर्थकांनी, सुफींच्या खांद्याला खांदे घासणार्या पण युद्धाला कंटाळलेल्या शिया लोकांनी, सुन्नींनी आणि इतर गल्फ देशांतून आलेल्या व्यापार्यांनी ओसंडून चालल्या होत्या. १९६० पासून तेलाच्या विक्रीतून आलेल्या मिळकतीवर दुबई श्रीमंत होऊ लागली होती व जरी वरवर ती धार्मिक वाटली तरी दुबईचे सरकार व्यवहारात मोजून-मापून विचार असणारे होते तर झियांचे पाकिस्तानी सरकार असहिष्णु, अतीशय कडक स्वभावाच्या मौलवींच्या हातातले व 'मद्रासा' संस्कृतीने विणलेल्या संस्कृतीचे राज्य होते!
पण या दोन्ही राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था इतक्या एकमेकांत गुरफटल्या आहेत कीं त्या सुट्या करणे अशक्य आहे. पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडत होती त्याच वेळी दुबईची एकदम जोमात उभरत होती आणि कर आकारणीपासून मुक्तता असल्यामुळे अनेक पाकिस्तानी कामगार आणि मध्यमवर्गीय दुबईने खेचून घेतले व त्यांचे पगार व शिल्लक पाकिस्तानला जाऊ लागली. सोन्याचा व्यापार, संघटित गुन्हेगारी व सैन्यात त्यांनी खूपच वर्चस्व प्रस्थापित केले. ८०च्या दशकात अरबस्तानात व दक्षिण आशियात जसजशा धर्माधिष्ठित राजसत्ता मूळ धरू लागल्या तसतसे हजारो प्रवासी कळपाने दुबईला धंद्याबरोबरच आपापल्या व्यसनांच्या-वासनांच्या शमनार्थ येऊ लागले आणि आखाती देश, पाकिस्तान व भारत येथून आलेल्या गुप्तहेरांच्या पलटणी त्यांच्यावर नजर ठेवायला, त्यांना ब्लॅकमेल करायला व मिळविलेल्या गुपितांचा सौदा करायला येऊन पोचल्या होत्या.
खानसाहेबांनी दुबईला जेंव्हा पहिली भेट दिली तेंव्हा दुबई अद्याप एका खाडीत नांगरलेल्या कांहीं गलबतांपुरतीच (अरबी 'ढो') छोटीशी जागा होती. पण इतर मुस्लिम जगात बंदी असलेल्या गोष्टी तिथे करता यायच्या. खानसाहेबांनी गुपचुप नसबंदी करून घेतली होती. दहा वर्षें व दोन अपत्यानंतर खानसाहेबांचे हेनीबरोबरचे संबंधही तणावपूर्ण झाले होते. नेहमी पाकिस्तानातच वास्तव्य असलेल्या 'R' नावाच्या एका पाकिस्तानी स्त्री-उद्योजकेशी त्यांचे संबंध जुळले. हेनी बरोबरी करणारी व अधिकार गाजवणारी स्त्री होती तर 'R' नम्र, लज्जाशील व खानसाहेबांच्या मनातल्या पाकिस्तानी स्त्रीसारखी होती.
वारंवार झालेल्या दुबईभेटींमुळे खानसाहेबांच्या खूप ओळखी झाल्या. १९७८सालच्या Emerson Electric च्या समस्येमुळे जागृत झालेल्या युरोपियन कस्टम्सच्या, पोलीसांच्या व गुप्तहेरांच्या जाळ्यातून मुक्तता मिळविण्यासाठी कहूताच्या खरेदीजाळ्याचा केंद्रबिंदू युरोपमधून दुबईला आला होता. अण्वस्त्रांत व इतरही जागी वापरता येणार्या दुहेरी उपयोगाच्या घटकभागांची व यंत्रशाळेच्या खास यंत्रसामुग्रीची येथे आयात करणे व नंतर त्यांची पाकिस्तानला निर्यात करणे सोपे होते.
पूर्वी खानसाहेबांना यंत्रशाळेची खास यंत्रसामुग्री पुरविणार्या ग्रिफिनचे एव्हांना दुबईला छान बस्तान बसले होते. त्यांनी व अब्दुस सलाम यांनी आपला व्यवसाय दुबईहून चालविण्याचा निर्णय घेतला होता. त्यात एकच अडचण होती कीं दुबईत व्यवसाय करणार्या परदेशी कंपन्यांना एक स्थानीय समर्थक (sponsor) ठेवावा लागे. लंडनमधील कॉलिंडेल मशीदीतील आपले संबंध वापरून सलाम यांनी फळें व भाजीपाला आयात करणार्या 'फरूक' नावाच्या श्रीलंकेतील मुसलमानाबरोबर संपर्क साधला होता. फरूकनी सलाम यांची खलिद जस्सीम या स्थानीय समर्थकाबरोबर ओळख करून दिली व त्यांनी 'खलिद जस्सीम ट्रेडिंग' या नावाने एक कंपनी स्थापली. तिचे मुख्य कार्यालय होते नासर चौकातला फरूक यांचा फ्लॅट! ग्रिफिन भागीदार नसले तरी त्यांचा नफ्यातील भागीदारीचा करार होता. कहुताच्या उभारणीसाठी लागणार्या सामानाच्या आयातीपासून धंद्याचा 'श्रीगणेशा' झाला. ग्रिफिन कधीही ते निर्यात करत असलेल्या वस्तू कुठे वापरल्या जात आहेत याची फाजील चौकशी करत नसत.
फरूक यांनी ग्रिफिन व सलाम यांच्यावर चांगली छाप टाकली होती व पहिल्याच भेटीत खानसाहेबांबरोबरही फरूकची छान गट्टी जमली. फरूकना त्यांच्या भविष्यवेत्त्याने सांगितले होते कीं ग्रिफिन हा त्यांच्या नशीबाचा तारा असून त्यांनी ग्रिफिनना नेहमी मान दिला पाहिजे! फरूक व खान दोघेही हस्तसामुद्रिकाला हात दाखविल्याशिवाय कुठलाही निर्णय घेत नसत. खानसाहेबांचा हस्तसामुद्रिक एक कराचीतला तेलकट माणूस होता पण दुबईला असताना ते फरूक यांचा हस्तसामुद्रिक वापरत. प्रत्येक छोटी-मोठी घटना दैवी शक्तीमुळेच होते यावर त्या दोघांचा विश्वास होता.
फरूक व खानसाहेब बर्याच बाबतीत सारखे होते आणि खानसाहेबांच्या लक्षात आले कीं फरूक पुरवठा व मालाची ने-आण करणे यासारख्या कामात अतीशय निपुण होता व त्याला दुबईच्या आयात-निर्यात व्यापाराबद्दल अतीशय बारीक माहिती होती. पण खान यांच्या खरेदीजाळ्यात खूप स्वार्थी लोकांची गर्दी झाली होती व त्यांचे एकमेकाला बुडवण्याचे उद्योगही चालायचे. अशाच एका मतभेदापायी फरूकने शारिया कोर्टात फिर्याद केली व अब्दुस यांना हुसकावून देऊन पूर्ण धंद्याची मालकीच मिळविली.
दुबईच्या इमिग्रेशन खात्याचे संचालक 'सईद बिन बलैला' यांना समर्थक म्हणून घेऊन एक नवी कंपनी स्थापण्याची सूचना ग्रिफिन यांनी केली. पैसे कमावण्याची संधी आहे हे कळल्यावर खानसाहेबांचे कॉलेजसहाध्यायी हेंक स्लेबोजही तिथे आले. जेंव्हा फरूक, ग्रिफिन आणि स्लेबोज या तीघांनी मिळून 'बिन बलैला ट्रेडिंग कंपनी' स्थापली तेंव्हा खानसाहेबांना खूप आनंद झाला. या कंपनीतील चौथे भागीदार होते फारूक यांच्या दिवंगत भावाचा सुपुत्र ताहीर. भावाच्या मृत्यूनंतर फरूकने त्याच्या कुटुंबियांवर आक्रमक कायदेशीर कारवाई करून त्या कुटुंबाची मालमत्ता व कोलंबो येथील त्यांचा वाडाही ताब्यात घेतला होता व ते फरूकला एकाद्या घरगड्यासारखेच वागवीत. तो ऑफीसच्या बाहेरील खोलीत एका टेबलाखाली झोपत असे. १९८५च्या पहिल्या भेटीनंतर खानसाहेबांनी ताहीरचे छुपे कर्तृत्व हेरले व त्याला जास्त-जास्त जबाबदार्या द्यायचे ठरविले. ताहीरनेही खानसाहेबांच्या अनेक लकबी उचलल्या. दक्षिण आशियातील काळज्या मागे सोडून खानसाहेब, फरूक, ताहीर, ब्रि. सेजवाल व त्यांचा मुलगा डॉ. शफीक बर्याचदा चांगल्या जेवणासाठी खाडी ओलांडून पलीकडेही जेवायला जात!
पण मग 'बिन बलैला कंपनी' आर्थिक संकटात सापडली. स्लेबोज हा एकांडा शिलेदार होता. त्यांने ती कंपनी सोडली व तो युरोपला निघून गेला. पण ताहीर व फरूकने 'शेख रशीद पथा'वरील 'पॉश' परिसरात छतापासून फरशीपर्यंत उंच खिडक्या असलेली व दुबईच्या आखाताच्या बाजूला बाल्कनी असलेली सदनिका भाड्याने घेतली.
खानसाहेब आता दुबईला वर्षात १०-१२ वेळा यायचे. त्यांनीही 'शेख रशीद'वर एक चार शयनगृहे असलेली सदनिका भाड्याने घेतली व तिथे हेनी व खानसाहेबांच्या मुली 'शॉपिंग'ला आल्या कीं रहायच्या. त्याच मजल्यावर ग्रिफिननीही एक सदनिका भाड्याने घेतली व 'बिन बलैला'च्या राखेतून जन्मलेल्या (व नव्याने भागीदारीत सुरू केलेल्या) 'अल् अकबर जनरल ट्रेडिंग कंपनी'च्या ऑफिसमध्ये काम करणारा नोकरवर्ग तिथे रहायचा. 'शेख रशीद'वरच्या त्याच इमारतीत तळमजल्यावर एक "Mummy & Me" नावाचे लहान मुलांच्या वस्तूंचे दुकान होते. खानसाहेबांना त्यांच्या नव्या अड्ड्यात पहाण्यासाठी अण्वस्त्रांचे घटकभाग पुरवणारे लोक जगातल्या सगळ्या भागांतून लोक येऊ लागले व खानसाहेबांचा हा अड्डा Mummy & Me या टोपणनावानेच ओळखला जाऊ लागला.
ताहीरवर आपला फळांचा व भाजीचा व्यवसाय सोपवून फरूकने अर्ध-सेवानिवृत्ती पत्करली व तो सिंगापूरला गेला. ताहीर एव्हांना संगणकाच्या आयात-निर्यातीच्या व्यापारात उतरला होता व लवकरच सेंट्रीफ्यूजेसच्या व इतर घटकभागांच्या आयात-निर्यातीतही तो उतरणार होता. १९८७मध्ये दुबईतील एकंदर व्यवस्थेबद्दल समाधान झाल्यावर खानसाहेबांनी ताहीरची व कहूताचा विदेशातील खरेदीप्रमुख फरूकची हाइंझ मेबुज व गॉठार्ड लर्च या घटकभाग पुरविणार्या जर्मनांबरोबर ओळख करून देण्यासाठी खास बैठक बोलावली. मेबुज पत्ररूपी बाँबहल्ल्यातून वाचला होता तर गोठार्ड लेबोल्ड हा हेरायसचा भूतपूर्व अधिकारी आता स्वित्झरलंडमध्ये रहात होता व युरानिटची ड्रॉइंग्ज चोरल्याच्या आरोपाखाली पोलीसचौकशीत अडकला होता. या बैठकीला कहूताच्या उत्पादन यंत्रशाळेचा प्रमुख कर्नल काजीसुद्धा हजर होता.
ते इराणबरोबरच्या नव्या धंद्याबद्दल बोलणार होते. खानसाहेबांनी सर्वाना गोपनीयतेची शपथ दिली. ते खूप उत्साहात बोलले. त्यांनी इराणची 'शॉपिंग'ची यादी दाखविली, कहूतामध्ये मिळालेल्या यशामुळे त्यांनी 'युरेंको'कडून चोरलेल्या P-1 या सेंट्रीफ्यूजच्या मूळ आवृत्तीऐवजी P2 या जर्मनीच्या G-2 आवृत्तीवर आधारित व दुप्पट वेगाने फिरणार्या आवृत्तीचे उत्पादन सुरू केले होते व त्यामुळे P-1चे न वापरलेले बरेच घटकभाग झियांच्या आज्ञेनुसार इराणला देणार असल्याबद्दल त्यांनी सांगितले. जे घटकभाग अद्याप पाकिस्तानात बनत नव्हते व जे युरोपमधून पाकिस्तानात आयात करण्यात आलेले होते ते मेबुज व लर्च यांच्यामार्फत इराणमध्ये आयात केले जायचे होते. प्रत्येक घटकभागापुढे प्रचंड किमतीही लिहिलेल्या होत्या. त्यांची बेरीज लक्षावधी डॉलर्समधे होती! इराणने कमीतकमी घटकभाग जरी खरेदी केले तरीही कहूताला व पर्यायाने पाकिस्तानला २० लाख डॉलर्स इतका फायदा हॊणार होता. ही यादी नंतर स्वित्झरलंडमधील भेटीत इराणच्या जन. एस्लामीला दाखवली जायची होती.
सारे खानसाहेबांवर खुष होते, पण अतिमहत्वाकांक्षेने पछाडले गेलेले खानसाहेब खूष नव्हते कारण हेनीबरोबरच्या त्यांच्या संबंधातील तणाव. 'R'-बाईबरोबरचे त्यांचे संबंध सुरूच होते. खानसाहेबांना वाटे कीं हेनीला वेड लागले आहे! त्यांचे मानसोपचारतज्ञ डॉ. अहमद विचारत की या वेडात खानसाहेबांचा वाट किती आहे? पण त्यांच्या मते खानसाहेब खूप बढाया मारू लागले होते व त्यांचे वागणे दिवसेंदिवस असह्य होऊ लागले होते. "जिन्नांनी पाकिस्तान निर्मिला असेल, पण त्याला वाचविला मीच!"सारख्या वल्गना ते करू लागले होते! त्यांना बक्षिसांची व किताबांची हाव सुटली. १९८४मध्ये त्यांनी कहूता गावाच्या रहिवाशांकडून एक सुवर्णपदक व पाकिस्तानचे भूतपूर्व सरन्यायाधीश हमूद उर्रशीद सुवर्णपदक 'मिळविले'. त्यांचा आत्मविश्वास इतक्या खालच्या पातळीला पोचला होता कीं ते त्यांचे नाव द्यायच्या व त्यांची थोरवी गायच्या अटीवर शाळा-मशीदींना देणग्या देऊ लागले. इतके दिवस बरेचसे प्रसिद्धीपराङ्मुख असलेल्या व त्यामुळे अप्रसिद्ध असलेल्या खानसाहेबांना प्रसिद्धीची हावच लागली होती.
लवकरच स्वतःची प्रतिमा उभारण्याची एक नवी पद्धत त्यांनी अंगिकारली! १९८५च्या डिसेंबरमध्ये त्यांनी वायव्य सरहद्द प्रांतात "Ghulam Ishaq Khan Institute of Engineering Sciences and Technology" ही संस्था काढली व स्वतःला तिचे संचालक म्हणून नेमले. भूतपूर्व अर्थमंत्री गुलामसाहेब सुरुवातीपासून कहूताचे खंबीर समर्थक होते. या संस्थेतून खूप धातूशास्त्रज्ञ व अभियंते बाहेर पडतील अशी खानसाहेबांची इच्छा होती! या संस्थेसाठी एक कोटी डॉलर्सचा निधी त्यांनी BCCI चे संस्थापक आगा हसद अबेदींच्या परोपकारी संस्थांच्या निधींतून उभा केला होता. या संस्थेचे रेक्टर म्हणून त्यांनी पूर्वी 'युरेंको'च्या नोकरीबाबत मदत करणार्या प्रा. मार्टिन ब्राबर्स यांची नेमणूक केली!
इराणबरोबरच्या कराराच्या अतीशय तणावपूर्ण वेळी खानसाहेबांनी एका मित्राला कहूताला बोलावले. कहूताला फारच मोजक्या लोकांना प्रवेश मिळे अन् हा खास मित्र तर 'हुर्मत'१ या एका किरकोळ खपाच्या उर्दू साप्ताहिकासाठी कधीकधी लिहिणारा पत्रकार होता. खानसाहेबांच्या आतापर्यंतच्या सर्व मुलाखतींसाठी आधी प्रश्नोत्तरांची यादी आगाऊ कहूताला किंवा लष्कराला दिली जायची. पण ही बैठक 'समोरा-समोर थेट प्रक्षेपणा'सारखी व्हायची होती व सोबत एक छायाचित्रकारही होता व खानसाहेबांनी त्याच्यासाठी फोटोसाठी उभे रहाण्याचे वचनही दिले होते! विमानविरोधी तोफा, रडारयंत्रणा व प्रक्षेपणास्त्रांच्या छाप पाडणार्या रांगांतून, अनेक सुरक्षा-चौक्यांतून एका ब्रिगेडियरबरोबर थाटात प्रवास करून ते कहूताला पोचले. कहूतालाही एका ब्रिगेडियने त्यांचे स्वागत केले व तो त्यांना खानसाहेबांच्या कार्यालयात घेऊन गेला. त्यांच्या टेबलवर त्यांची उघडी बॅग होती व त्यात असलेले पिस्तूलही दिसत होते. खानसाहेबांना स्वतःच्या जिवाची फार भीती होती-खासकरून 'मोसाद'च्या२ हस्तकांकडून!
हुर्मतच्या पत्रकाराने लिहिले, "खानसाहेब हे पाकिस्तानच्या प्रगतीचे प्रतीक आहेत, आज ते सर्वात जास्त अनमोल पाकिस्तानी आहेत. अशा माणसाच्या संरक्षणाची जबाबदारी सरकारने उचलली पाहिजे. पण खानसाहेबांनी ती जबाबदारी स्वतःच उचललेली दिसत होती. त्यांनी स्वतःच्या स्वास्थ्यासाठी स्वतःच काळजी घेतली होती व पाकिस्तानी लष्कराचे भूतपूर्व सर्जन-जनरल डॉ. चौहान यांना वैयक्तिक डॉक्टर म्हणून नेमले होते. इथे तर खानसाहेब पिस्तूल बाळगून स्वतःचे संरक्षण करू पहात होते. या निष्काळजीपणासाठी सरकारला व सार्या देशाला दोषी धरायला हवे. त्यांनी केलेल्या देशसेवेसाठी लाहोरच्या एका संस्थेने त्यांना सुवर्णपदक दिले आहे, पण खरे तर सरकारने त्यांना सर्वोच्च सन्मान बहाल केला पाहिजे"
लेखाचा शेवट वाचल्यावर खानसाहेबांच्या या खास निमंत्रणाचा हेतू स्पष्ट होत होता! खानसाहेबांना पाकिस्तानच्या परमाणू ऊर्जा संस्थेच्या (PAEC) प्रमुखाचा सन्मान हवा होता. लेखात पुढे लिहिले होते कीं पाकिस्तानाती वीजतुटवड्यावर मात करण्यासाठी PAECचे समूळ पुनर्गठन करून त्या संस्थेचे नेतृत्व अ. का. खानना द्यायला हवे. सध्याची PAEC ही एक सफेद हत्ती झालेली असून तिच्याकडून कांहींच अपेक्षा ठेवता येत नाहींत. याविरुद्ध खानसाहेबांनी चमत्कार करून दाखविले आहेत.
खानसाहेबांना मुनीर खान हे अद्याप प्लुटोनियम कार्यक्रम राबवत असल्याचे, कागदोपत्री अण्वस्त्रसंशोधन व अण्वस्त्रसंरचना विभागाचे व PAECचे प्रमुख असल्याचा फार संताप येई. या लेखाद्वारे आडवळणाने खानसाहेब जणू थेट राष्ट्राध्यक्षाशीच बोलले.
खानसाहेबांची असली सार्वजनिक वक्तव्ये आणि पाकिस्तान व चीनमधील वाढत्या सहकाराबद्दलच्या बातम्या यांमुळे भारतात पुन्हा एकदा कहूतावर हल्ला करण्याबद्दलच्या चर्चांनी जोर धरला! शीख मारेकर्यांच्या गोळीबारात मृत्युमुखी पडलेल्या आईच्या (इंदिरा गांधींच्या) जागी सत्तेवर आलेले राजीव गांधी १९८५च्या जूनमध्ये वॉशिंग्टनला आले. पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचा नायनाट करण्याबद्दल त्यांच्यावर दबाव वाढत होता व त्याबाबत कृती करण्याचा त्यांचा निर्धार त्यांना अमेरिकेपुढे व्यक्त करायचा होता. पण भेटीआधीच्या सल्लामसलतीत त्यांना सांगण्यात आले कीं अमेरिका या विषयावर अद्याप कुंपणावर बसून असून त्यांचे सांगणे फारसे उपयुक्त होणार नाही. त्याला आधार होता रेगन यांच्या नेहमीच्या वक्तव्याचा!
जेंव्हां राजीव गांधी रिक्तहस्ते परतले त्यावेळी खानसाहेबांनी पुन्हा झियांकडे खरीखुरी अण्वस्त्रचांचणी करण्याबाबत साकडे घातले होते अशा तर्हेच्या अफवांना ऊत आला होता. भारतीय संसदेने लष्करी कारवाईची मागणी केली व त्या अनुषंगाने अमेरिकन सरकारला उपपरराष्ट्रमंत्री मायकेल आर्माकॉस्ट व राष्ट्रीय सुरक्षा समितीतील एक ज्येष्ठ अधिकारी डोनाल्ड फॉर्टियर यांच्या नेतृत्वाखालील एक उच्चस्तरीय शिष्टमंडळ 'अग्नीशमना'साठी इस्लामाबाद व दिल्लीला संतापाच्या भावनांना थंड करण्यासाठी पाठविणे भाग पडले. या भेटीआधीची त्यांची "हे शिष्टमंडळ भारत-पाकिस्तानमधील परस्पर सहकार्याबद्दल चर्चा करेल", "अण्वस्त्रांबद्दल प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे" व "नवीन व खास अशा कुठल्याही चिंता नाहींत" व "भारत पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पावर हल्ला करेल काय अशा 'जर-तर'वाल्या प्रश्नांना आम्ही उत्तर देऊ इच्छित नाहीं" अशा तर्हेची निवेदने गोंधळात टाकणारी होती!
या भेटीतून अर्थातच कांहींही निषन्न झाले नाहीं व भारत व पाकिस्तान अण्वस्त्रयुद्धाकडे सरकू लागले. अशा वेळी रेगननी पुन्हा एकदा "पाकिस्तानकडे अण्वस्त्रें नाहीत" असे निवेदन प्रतिनिधीगृहाला दिले. १९८६च्या जुलैमध्ये पाकिस्तानला ४०० कोटी डॉलर्सच्या मदतीची घोषणा केली. ती आधीच्या योजनेपेक्षा १०० कोटी जास्त होती. अर्नॉल्ड राफेल या परराष्ट्रमंत्रालयातील अधिकार्याने पाकिस्तान अण्वस्त्रनिर्मितीक्षेत्रात काय करत आहे याबाबतची अमेरिकन हेरखात्याने दिलेली माहिती पत्रकारांना देण्यास व पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल रोज किंवा साप्ताहिक निवेदने देण्यास नकार दिला!
जेंव्हा रेगननी १९८६च्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानकडे अणूबाँब नसल्याचे प्रशस्तीपत्रक दिले तेंव्हा व्हाईट हाऊस व परराष्ट्रमंत्रालयात एक बंडाळीची परिस्थिती निर्माण झाली. हिंदी बोलू शकणार्या व भारत-पाकिस्तानच्या लष्कराबद्दल बरेच संशोधन केल्यामुळे दोन्ही बाजूला खूप लोकांशी संपर्क असलेल्या प्रा. स्टीफन कोहेन यांना खूप काळजी वाटू लागली. त्यांना परराष्ट्रमंत्रालयाने दूरगामी धोरणयोजनेवर काम करण्यासाठी नेमले होते. त्यांना अमेरिका-पाकिस्तानसंबंधांमुळे अमेरिकेच्या भारताशी असलेल्या संबंधांवर अनिष्ट परिणाम होत असलेले पाहून काळजी वाटू लागली व त्यांनी या असमंजस व धोकादायक धोरणाची दिशा बदलण्याच्या बाजूने सरकारला पत्रे लिहायला सुरुवात केली. पाकिस्तानशी असलेले संबंध चालू ठेऊन त्यांच्या अण्वस्त्रप्रकल्पाला रोखता येईल यावरही ते लिहू लागले. अशा उच्चस्तरीय बैठकांमध्ये त्यांना पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाला आवर घालणे व पाकिस्तानच्या आर्थिक मदतीचे समर्थन करणार्या अधिकार्यांनाही खुष ठेवणे अशी परस्परविरोधी पावलेही टाकावी लागत! पण या बैठका इतक्या गुप्त असत कीं त्यात चर्चा झालेल्या मुद्द्यांवर कांहींही लेखी नसे!
पण कोहेनसारख्या लोकांचा पराजय झाला. ते जो सल्ला देत होते तो मान्य होण्यासारखा नव्हता. कोहेनना असेही सांगण्यात आले कीं त्यांनी हा सल्ला चालू ठेवला तर त्यांना त्यांच्या पदाला मुकावे लागेल.
रेगन यांच्या १९८६च्या प्रशस्तीपत्रकानंतर खूप तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. रेगन खोटे बोलत होते. ACDA३चे उपसंचालक नॉर्म वुल्फ म्हणतात कीं कहूता व पाकिस्तानी अणवस्त्रप्रकल्प यांच्याबद्दल अद्ययावत् गुप्त माहिती गोळा करणे ही ACDAची जबाबदारी होती. राष्ट्रीय सुरक्षा समितीकडे सर्व जगातली संभाषणे चोरून ऐकण्याची क्षमता होती व ते वर्षानुवर्षें खानसाहेबांच्या जर्मनी, स्वित्झरलंड, इंग्लंड, फ्रान्स, तुर्कस्तान व दुबई येथील दलालांचे प्रत्येक संभाषण व निरोप यांवर लक्ष ठेवून होते व त्यांना माहीत होते कीं पाकिस्तानकडे 'वापरायला तयार' असा बाँब आहे.
भारताची सहनशक्ती संपत आली होती. कृष्णस्वामी सुंदरजींसारखे नवे व आपले मत आग्रहीपणे मांडणारे अधिकारी सेनाप्रमुख म्हणून नेमले गेले होते. यानीच १९८१ मध्ये पाकिस्तानशी अणुयुद्ध झाल्यास कशी व्यूहरचना करायला लागेल याबद्दलचे 'वॉरगेम्स' निर्माण केले होते. (याचा उल्लेख सहाव्या प्रकरणात आला आहे). आता १९८६ साली त्यांनी जास्त आक्रमक पवित्रा घेऊन भारताची सहनशक्ती संपल्याची जाणीव पाकिस्तानला देण्याचा सल्ला दिला. उदा. राजस्तानमध्ये मोठ्या प्रमाणावर लष्करी सराव करणे. भारताकडे असलेली अण्वस्त्रे सीमेवर आणून हवी तेथे बसविणे वगैरे पावलेही त्यात होती. राजीव गांधींनी होकार दिल्यावर त्यांनी आतापर्यंतचा सर्वात मोठा लष्करी सराव सुरू केला. इतका मोठा कीं 'नाटो'ने दुसर्या महायुद्धानंतरही इतका मोठा सराव केला नव्हता. "ब्रास टॅक्स" या सांकेतिक नावाने केलेल्या या सरावात त्यात सैन्याच्या सर्व विभागांनी भाग घेतला होता!
झियांना याचा अर्थ नीट कळला. पाकिस्तानमध्ये सुंदरजी एक आक्रमक आणि राजीव गांधींसारख्या शांतताप्रिय नेत्यालासुद्धा असल्या सरावाला प्रवृत्त करू शकणारे जनरल समजले जायचे. पाकिस्तानी नेत्यांच्या मनावर १९७१च्या युद्धाची आठवण कोरलेली होती. झियांनी लगेच तोफखाना व चिलखती दळ पूर्वसीमेवर जमवायला सुरुवात केली. १९८७च्या जानेवारीपर्यंत दोन्ही सैन्ये एकमेकांसमोर १०० मैल किंवा तीन तासांच्या अंतरावर उभी ठाकली. आणि हे सर्व कहूता येथील अमेरिकाप्रणीत अण्वस्त्रप्रकल्पापायी! पाकिस्तानी सेना भरताच्या सैन्यापढे टिकाव धरू शकणार नाहीं याची कल्पना असल्यामुळे झियांनी एक डाव आखला. भारताला ज्यामुळे पाऊल मागे घ्यावे लागेल अशी भीती निर्माण करण्याचा तो डाव होता. त्यासाठी त्यांनी खानसाहेबांना एक 'निरोप्या' म्हणून वापरायचे ठरविले. यशस्वी झाल्यास तो खानसाहेबांचा गौरवशील क्षण ठरणार होता. त्यांनी खानसाहेबांना एक जबरदस्त मुलाखत द्यायला सांगितले. त्या मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानची कहूता येथील प्रगती व पाकिस्तानची झटपट अणूबाँब बनवून वापरायची क्षमाता यावर एका बाजूने भर द्यायचा होता व त्याच वेळी भाषा पुरेशी संदिग्धही वापरायची होती जेणेकरून अमेरिका अडचणीत येणार नाहीं व पाकिस्तानकडे येणारा आर्थिक मदतीचा ओघ चालूच राहील४.
खानसाहेबांनी 'द मुस्लिम' या प्रभावी व सरकारधार्जिण्या वृत्तपत्राचे संपादक मुशाहिद हुसेन यांची निवड केली. मुशाहिद एकाद्या सोयिस्कर मुलाखतकाराची निवड करतच होते एवढ्यात त्यांना कुलदीप नायर या अनेक नियतकालिकांत ('द मुस्लिम'मध्येही) नियमित स्तंभलेखन करणार्या५ सुप्रसिद्ध भारतीय वार्ताहाराचा फोन आला. त्यांना पाकिस्तानच्या व्हिसासाठी समर्थक पाहिजे होता. झियांच्या मनात ही बातमी भारतीय वार्ताहाराला खरे तर द्यायची नव्हती, पण नायर हे त्या दृष्टीने योग्य वार्ताहार होते.
१९४७ साली भारतात जायच्या आधी नायर (पाकिस्तानी) पंजाब प्रांतातील सियालकोटला जन्मलेले, मुस्लिम शेजारात वाढलेले व उर्दू व इंग्लिश लिहणारे/बोलणारे हिंदू वार्ताहार होते. पाकिस्तानी संस्कृतीत वाढलेले व भारतात हिंदू म्हणून वाढल्याने उदारमतवादी मते असलेल्या नायर यांचा स्तंभ सर्व भारतीय उपखंडात वाचला जायचा. मुशाहिद कसे नायरना पाकिस्तानला आणण्यासाठी उतावीळ झाले होते याची त्यांना आठवण आहे! केवळ २४ तासात त्याना व्हिसा मिळाला याचेही त्यांना अश्चर्य वाटले. आणि २९ जानेवारीला ते पाकिस्तानला जायला निघालेसुद्धा! त्यांना उतरून घ्यायला आलेल्या मुशाहिद हुसेननी त्यांना सांगितले कीं ते त्यांची उपखंडात सुप्रसिद्ध (व भारतात कुप्रसिद्ध) असलेल्या खानसाहेबांशी भेट घडवून आणणार होते. फक्त त्या मुलाखतीचे टेपिंग करायचे नाहीं व टिप्पणे घ्यायची नाहींत एवढ्याच अटी होत्या त्या नायर यांनी मान्य केल्या व ते खानसाहेबांच्या घराकडे निघाले!
घराकडे जाताना नायर यांचे मन खूप व्यग्र झाले होते. एका अतीशय संवेदनाशील अशा जागी एक भारतीय आल्याचे कुणाही सुरक्षा अधिकार्यांना आश्चर्यही वाटले नव्हते. लाकूड व दगडी बांधाकामाच्या खानसाहेबांच्या घराभोवती व्हरांडा होता व बागेत डच 'ट्यूलिप्स'च्या फुलांचे वाफे होते. खानसाहेब स्वतः व्हरांड्यात उभे होते. त्यांनी हात हलवून नायर यांचे स्वागत केले व म्हणाले कीं ते नायर यांचा स्तंभ नेहमी वाचत. घरात स्मितवदन हेनी अननसाचा केक६ (Pineapple Upside Down Cake) व चहाचे साहित्य ट्रॉलीवर ठेऊन उभी होती. हा केक नायरना आवडायचा. नायरना बरे वाटवे म्हणून खान दांपत्याने बरेच परिश्रम घेतल्याचे नायरना जाणवले. पण हेनी न थांबता आत निघून गेली व नायरना जाणवले कीं खानसाहेबांना त्यांना कांहींतरी सांगायचे असावे. नायरनीही त्यांना बरे वाटवे म्हणून त्यांची स्तुती करून त्यांच्या पार्श्वभूमीबद्दल विचारले.
ती माहिती असलेले एक उर्दू नियतकालिक खानसाहेबांनी त्यांना वाचायला दिले व नंतर सवडीने वाचायला सांगितले. नायरनी कहूताचा विषय काढला. खानसाहेबांनी सांगितले कीं कुठल्याही परदेशी माणसाला तिथे प्रवेश दिला जात नाहीं. नायर खानसाहेबांना खोटे-खोटेच म्हणाले कीं इस्लामाबदला येतांना त्यांना भारताच्या अणूबाँबचे निर्माते राजा रामण्णा भेटले होते. नायरनी जेंव्हा रामण्णांना सांगितले कीं ते खानसाहेबांना भेटणार आहेत तेंव्हां रामण्णांनी नायरना "बाँब नाहीं, माणसं नाहींत व कांहीं तर्कसंगतीही नाहीं, तेंव्हा उगीच वेळ कशाला घालवताय्" असे सांगितल्याची थापही नायरनी खानसाहेबांना मारली. हे मात्र खानसाहेबांच्या मनाला झोंबले असावे क्लारण त्यांचा चेहरा पडला!
खानसाहेबांनी टेबलावर आपली मूठ आपटली व ते दोन-तीनदा किंचाळले, "रामण्णांना सांगा कीं आमच्याकडे आता बाँब आहे". त्यांना डिवचायला नायर म्हणाले,"खानसाहेब, बोलणं सोपं असतं पण तुम्ही अजून चांचणी कुठे केलीय्?" त्यावर ते ताडकन उभे राहिले व म्हणाले, "भूगर्भात चांचणी करण्याची आता गरजच नाहीं. आता आपण प्रयोगशाळेत चांचणी करू शकतो." त्यांचा चेहरा लाल झाला होता! "आमच्याकडे अतिशुद्धीकृत युरेनियम आहे व त्याचा आम्ही अण्वस्त्रात उपयोगही केला आहे." नायर यांच्याकडे करड्या नजरेने पहात ते पुढे म्हणाले कीं भारताने जर १९७१सालाप्रमाणे आम्हाला पुन्हा भिंतीपर्यंत ढकलले तर आम्ही नेहमीच्या शस्त्रांनी युद्ध करून वेळ घालवणार नाहीं. सरळ अणूबाँबचा वापर करू!"
त्यांना हवी ती माहिती मिळाल्याचे पाहून नायरनी काढता पाय घेतला. हॉटेलकडे परततांना मुशाहिद हुसेननी साळसूदपणे नायरना सांगितले कीं त्यांनी पाकिस्तानने बाँब बनविल्याचे त्यांनी छापू नये कारण खानसाहेब जरा जास्तच बोलले होते.
भारतात परत आल्यावर नायरनी आपल्या श्याम भाटिया या लंडनस्थित 'ऑब्झरवर'चे वार्ताहार व जुन्या सहकार्याला फोन केला. त्या वृत्तपत्राला ही बातमी वाचून धक्काच बसला होता व "पाकिस्तानकडे अणूबाँब आहे" या खानसाहेबांच्या दाव्याचे परिणाम काय होतीला या चिंतेत त्यांनी एक महिना नायर व त्यांनी दिलेल्या माहितीच्या अभ्यासात व्यतीत केला. मग जेंव्हां त्यांना कळले कीं नायर खरेच सांगत होते तेंव्हा 'ऑब्झरवर'ने १ मार्चला ती गोष्ट पहिल्या पानावर "पाकिस्तानने अणूबाँब बनविला" या सनसनाटी मथळ्यासह छापली. त्यांनी खानसाहेबांचे वक्तव्यही वापरले होते कीं CIA पाकिस्तान कधीच बाँब बनवू शकणार नाहीं असे जे सांगत होती ते खरे आहे. ते माझ्या कर्तृत्वाबद्दल शंका व्यक्त करत असत, पण आता त्यांना कळले असेल कीं आमच्याकडे आता बाँब आहे!"
या जगभर गाजलेल्या सनसनाटी गौप्यस्फोटासाठी नायरना फक्त ३५० पौंड मेहेनताना मिळाले!
ही बातमी वृत्तपत्राबरोबर जेंव्हा रस्त्यावर आली तेंव्हा वॉशिंग्टन व इस्लामाबादमधील फोन खणखणू लागले कारण प्रत्येक राजकीय नेता व वार्ताहार या बातमीची सत्यासत्यता पडताळण्यासाठी आतुर झाला होता! रेगन आपली नेहमीची अण्वस्त्रप्रसारविरोधी असत्य विधाने करतच होते. पडद्यामागे झियांनी विश्वासघात केल्याची गरमागरम चर्चा सुरू झाली. अमेरिका व पाकिस्तानचे संबंध आता हवेतच उडाले होते. पाकिस्तान भयभीत झाले. झियांचा मर्यादित उद्देश भारताला भिवविण्याचा होता पण खानसाहेबांचा स्वभाव त्यांना कळला नव्हता. नायरनी डिवचल्यामुळे ताळतंत्र सोडून त्यांनी आपल्याबद्दल बढाई मारताना भान ठेवले नव्हते वा आपण कसा अणूबाँब बनवला हे सांगून ते मोकळे झाले होते! दरम्यान झियांनी दिल्लीला जाऊन राजीव गांधींच्या बरोबर तडजोड करून सैन्ये मागे हटविली होती. 'ब्रास टॅक्स'च्या कसरतीही संपल्या होत्या व दोन्हीकडची सैन्ये बराकीत परत गेली होती. त्यामुळे झियांना कोंडीत ढकलून व त्यांची गैरसोय करून अमेरिका-पाकिस्तानमधील संबंध वेळेआधीच निकालात निघण्यापलीकडे ऑब्झर्वरच्या सनसनाटी बातमीचा कांहींच उपयोग झाला नाहीं.
अचंबित झालेले व्हाईट हाऊस या घटनेमागील स्पष्टीकरण शोधत असतांना खानसाहेबांनी नायरवर त्यांना ती मुलाखत देण्याबाबत फसविल्याचा आरोप केला व सांगितले कीं पाकिस्तान सरकारने अनेक वेळा पुन:पुन्हा स्पष्ट केले आहे कीं त्याला अण्वस्त्रें बनविण्यात स्वारस्य वाटत नाहीं. पण राजीव गांधींना हे स्पष्टीकरण पुरेसे नव्हते. त्यांनी अमेरिकेवर प्रत्यारोप केले कीं अमेरिका पाकिस्तानला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखू शकलेली नाहीं आणि ती अद्यापही पाकिस्तानला आर्थिक व लष्करी मदत देतच आहे. पाकिस्तानचे शास्त्र व तंत्रज्ञानाचे मंत्री वासिम सज्जद यांनी पाकिस्तानकडे अण्वस्त्रें असल्याचे स्पष्टपणे नाकारून त्यांच्या राष्ट्रीय ऍसेंब्लीपुढे निवेदन केले कीं पाकिस्तानकडे अण्वस्त्रे नाहींत व व ते बनविण्याची त्यांची इच्छाही नाहीं व ती बनविण्याचे आर्थिक बळही पाकिस्तानकडे नाहीं. पाठोपाठ पाकिस्तानी परराष्ट्रमंत्री व अमेरिकेतील पाकिस्तानचे राजदूत व राष्ट्राध्यक्ष या सर्वांनी त्याच अर्थाची निवेदनें जारी केली. झियांनी तर सांगितले कीं पाकिस्तानला अण्वस्त्रें बनवायची इच्छाही नाहीं, मनसुबाही नाहीं व ती बनवायचे कर्तृत्वही नाहीं व ते अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर केलेला याबाबतचा 'सभ्य गृहस्था'चा करारही मोडू इच्छित नाहींत.
पण नायर यांनी केलेला गौप्यस्फोट कांहीं केल्या जाईना, तो खदखदतच राहिला! पाकिस्तानमध्ये खानसाहेबांनी ज़हीद मलिक नावाच्या एका प्रभावी वार्ताहाराला बोलावले. या ज़हीदने त्यांचे आत्मचरित्रही लिहिले होते व या वार्ताहाराच्यामार्फत ते स्वतःच्या मोठेपणाच्या खर्या-खोट्या गोष्टीही जनतेत पसरवत असत. त्या दोघांनी एक कंडी पसरवली कीं नायर हे RAW या भारतीय गुप्तहेरसंघटनेत हेर होते! श्याम भाटिया यांची इस्रायलकडून पगार मिळवत असलेला 'हिंदू कुत्रा' अशी संभावनाही झाली! आपला गौप्यस्फोट 'ऑब्झर्वर'सारख्या नावाजलेल्या वृत्तपत्रात छापून येण्यासाठी पामेला बोर्डस या नावाचे एक काल्पनिक 'स्त्रीपात्र'ही त्यांनी निर्माण केले व 'ऑब्झर्वर'चे संपादक डोनाल्ड ट्रेल्फोर्ड यांची या बाईबरोबरची भानगडही छापली व ही बाई त्याचवेळी 'संडे टाइम्स'च्या संपादकाशीही संबंध ठेवून होते असे प्रसिद्ध करून त्या दोघातही वितुष्ट आणले. वर पामेला बोर्डसला भारतीय वेश्या ठरवून व रॉ, नायर व भाटिया यांना गोवून एक नवीच सनसनाटी बातमी निर्माण केली कीं या वेश्येपायी ट्रेलफोर्ड यांनी पाकिस्तानच्या एका अनमोल रत्नाला गोत्यात आणले. ही प्रेमकहाणी असल्या 'गॉसिप'साठी भुकेल्या असलेल्या इस्लामाबादमध्ये खूप चवीने चर्चिली गेली.
पण नायरचा गौप्यस्फोट फसफसतच राहिला व झियांना त्याचा संताप येत राहिला. त्यांना एक 'बकरा' हवा होता. खानसाहेबांनी महम्मद फरूक नावाच्या त्यांच्या एका मदतनिसाचे नांव या नायर प्रकरणात गोवले. पण ते तर हज यात्रेला गेले होते.
झाले! झियांचा वॉशिंग्टनकडून छळवाद चालू असतांना त्यांचे मदतनीस ज. अरीफ यांनी मक्केला गेलेल्या प्रत्येक पाकिस्तानी पासपोर्ट असलेल्या फरूकला विमानात घालून परत आणले. त्यांच्या बायकांना तिथेच सोडले व नंतर त्यांना एकटे आपल्याच हिमतीवर परत यावे लागले! पण कुणालाच हा फरूक कसा दिसतो ते माहीत नव्हते. मग "खानसाहेबांचा फरूक कोण" या प्रश्नाला घाबरत-घाबरत 'मी' म्हणून बाहेर आलेल्या फरूकला पकडण्यात आले.
कहूताच्या शास्त्रज्ञांच्या हालचालींवर बंधनें आली. इराणबरोबरचा करारही थोडासा थबकला.
कुलदीप नायर दिल्लीत परत आले व आपल्या कामात गढून गेले. पुढच्या वेळी आपल्या गौप्यस्फोटांना जास्त मेहनताना आकारायचा असेही त्यांनी ठरविले.
या गौप्यस्फोटाबाबत त्यांना एके दिवशी अमेरिकेहून सिनेटर जॉन ग्लेन यांचा फोन आला. त्यांनी नायरना विचारले कीं त्यांनी केलेला गौप्यस्फोट पूर्णपणे खरा आहे कां?
नायर म्हणाले, "सिनेटरसाहेब, त्यातला प्रत्येक शब्द जसा खानसाहेबांनी मला सांगितला तसाच लिहिला गेला आहे. व त्याचा प्रत्येक शब्द एक धोकादायक, संतापजनक व भांडाभांडी करवणारे सत्य आहे!
============================
१ 'हुर्मत'चा अर्थ आहे Dignity, honour.
२ इस्रायली गुप्तहेरखाते
३ Arms Control and Disarmament Agency
४ अशा घटनांतून झियांचा धूर्तपणा प्रकट होतो!
५ Syndicated columnist
६ या प्रकरणाचे शीर्षक!
------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
------------------------------
प्रतिक्रिया
16 Apr 2010 - 6:24 pm | मदनबाण
वा...मजा आली हा भाग वाचुन. :)
जो पर्यंत पाकड्यांकडुन अमेरिकेला दणका बसत नाही तो पर्यंत ते सढळ हातानी मदतीचा ओघ सुरुच ठेवतील. :(
या सर्वात मोठ नुकसान मात्र आपल्याच देशाचं झालेल दिसतयं.पाकडे माजलेत अन् ड्रॅगन तर पूर्ण तयारीतच बसला आहे...
मदनबाण.....
There is no need for temples, no need for complicated philosophies. My brain and my heart are my temples; my philosophy is kindness.
Dalai Lama
16 Apr 2010 - 8:36 pm | सुधीर काळे
कुठलाही राष्ट्राध्यक्ष निवडून आला तरी अमेरिकेचे पाकिस्तानबद्दलचे धोरण कांहीं बदलत नाहीं. मी बराच विचार करतो पण खालील चार पर्यायांपैकी कुठला 'फिट' बसतो ते कांहीं उमजत नाहीं.
१) आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी इतकी 'वाट' लावली आहे कीं पाकिस्तानला मदत नाहीं केली तरी संकट व केली तरी संकट अशी परिस्थिती आहे? ही पाक धोरणाची 'वाट' आयसेनहॉवरनी लावली (SEATO/CENTO मध्ये पाकला घेऊन) कीं निक्सननी लावली (चीनशी दोस्ती करतांना पाकिस्तानची मदत घेऊन) कीं रेगननी (अफगाणिस्तानमधून अमेरिकन रक्त न सांडता पाकिस्तानकडून ते आक्रमण परतवून लावण्यापायी नको ते धोके उचलून) हे अनाकलनीय आहे!
२) सगळे राष्ट्राध्यक्ष एकाच मुशीतून बाहेर आले आहेत काय? सगळे छापातले गणपती आहेत काय?
३) राष्ट्राध्यक्ष कुणीही असो, सनदी नोकरच सरकार चालवतात काय? अशा वेळी BBC वरील "Yes, Minister" या मालिकेची आठवण झाल्याशिवाय रहावत नाहीं!
४) हा पर्याय म्हणजे अमेरिकन जनतेलाही पाकिस्तान जवळचा वाटतो काय? हे खरे वाटत नाहीं कारण मला जे आम अमेरिकन लोक अमेरिकेत भेटले आहेत त्यांना राजकारणात, तेही विदेशी राजकारणात फारसा रस वा फारशी माहितीही नसते.
याबद्दल आम मिपाकरांचे व खास करून अमेरिकास्थित मिपाकरांकडून प्रतिसादांचे खास स्वागत आहे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?comple... (India Today)
16 Apr 2010 - 9:37 pm | चतुरंग
तुमची ही मालिका वाचायला मला वेळ होत नाहीये परंतु काही भाग वरवर चाळलेत.
अमेरिकेचे धोरण का बदलत नाही हा प्रश्न तुम्ही विचारला आहेत.
'एका तेलियाने' ह्या गिरीश कुबेर लिखित पुस्तकात ह्याची थोडी उत्तरे मला मिळाली असे वाटते. वसाहतवाद हा अमेरिका आणि ब्रीटनसारख्या देशांच्या विचारांचा आत्मा आहे. अमेरिकेपुरते बोलायचे झाले तर ह्या ला दोन मुख्य पदर आहेत. अमेरिकन सरकारचे बोलविते धनी हे शस्त्रास्त्र निर्मिती करणारे कारखाने आणि बलाढ्य औषधकंपन्या आहेत हे सत्य आता जगजाहीर आहे. (काही दुवे शोधतोय सापडले की देतोच). त्यांच्या फायद्याचे जे असेल ते आणि तसेच सरकारने वागले पाहिजे ह्याकडे कटाक्षाने लक्ष दिले जाते.
दुसरे म्हणजे तेल हे अमेरिकन जीवनाचे रक्त आहे ते आटले तर अमेरिका संपलीच (तसे संपूर्ण जगाचेच रक्त तेल आहे पण अमेरिकेचे अवलंबित्व पराकोटीचे आहे) तेलाचे राजकारण हा मध्यपूर्वेतल्या एकूण सत्ताकांक्षेचा केंद्रबिंदू आहे. तेलाचे साठे असलेले देश आपल्या ताब्यात रहावेत ह्या एकाच उद्देशाने सीआयए ने गुप्तहेरगिरी केली काय वाट्टेल ते करुन तिथे सत्ता प्रस्थापित करायचीच हे एकमेव धोरण (वेनेझुएलाचा चावेज ह्याच कारणाने अमेरिकेच्या डोळ्यात सलतोय कारण तोही प्रचंड तेलसाठ्यांच्या खजिन्यावरचा नाग आहे!)
त्याच बरोबर सोविएत रशिया ह्या एकेकाळच्या बलाढ्य कम्युनिस्ट राष्ट्राशी सतत स्पर्धा हा एक उद्देश - मध्यपूर्वेत त्यांनी मुसंडी मारु नये हा खरा हेतू. ८० च्या दशकात अफगाणिस्तानात रशिया घुसली तेव्हा लादेन आणि त्याची पिल्ले ह्यांना कोणी पोसले? सीआयए (अमेरिका) ह्यांनीच! पुढे त्यांचा भस्मासूर झाला.
इराण - इराक - अफगाणिस्तान - जॉर्डन - इजिप्त - इस्राएल - पॅलेस्टाईन हे सगळे भूभाग सतत अस्थिर ठेवायचे कारण तिथे स्थिर सरकारे आली की त्यांना विचार करायला वेळ मिळतो आणि एकदा तसा वेळ मिळाला की मग अमेरिकेला तिथून काढता पाय घ्यायला लागेल! युद्ध खेळायचे ते त्यांच्या भूमीवर काय रक्तपात होईल, पिढ्या बरबाद होतील, सर्वंकश हानी होईल ती तिथे, आपल्या घराला झळ लागता कामा नये. भले शेकड्यानी अमेरिकन सैनिक मरोत आणि अब्जावधी डॉलर्सचा चुराडा होवो फिकिर नाही!
'पाकिस्तान प्रेम' हे असेच संधीसाधू आहे. एकूण भूभागाचा विचार करता पाकिस्तान हा स्ट्रॅटेजिकली कळीचा भाग आहे. एकतर दक्षिणेला अरबी समुद्र त्यामुळे अमेरिकन युद्धनौका थेट पोचू शकतात. त्यातून एका बाजूला अफगाणीस्तान, अग्नेयेला भारत, उत्तरेला रशिया, ईशान्येला ड्रॅगन. तिथे सत्ता असली तर अनेक संवेदनक्षम टापू एकाच टप्प्यात नजरेखाली राहतात! भारताच्या महत्त्वाकांक्षांना पाकिस्तानच्या माध्यमातून चाप लावायची ही नामी संधी ते कशी सोडतील! एकीकडे ड्रॅगनला बाबापुता करुन चुचकारत ठेवणे त्यांना गरजेचे ठरते. पाकिस्तानात मुसंडी मारुन सगळे तालिबानी हाकलून लावणे एवढे कठिण नाहीये अमेरिकेला पण ते तसे करणार नाहीत फक्त धमक्या देत रहाणार. कारण पाकिस्तानातली अस्थिरता हा त्यांचा उद्देश आहे. अस्थिर रहा आणि आमच्यावर अवलंबून रहा. मदत देऊ त्याबदल्यात आम्ही तिथे येऊन पाहिजे ती माहिती मिळवू.
आपण पाकिस्तानात कसे काम करतो आहोत, पाकिस्तान सरकार दहशतवादाला पायबंद घालायला कसे प्रयत्नशील आहे असे अधूनमधून सांगत रहायचे की झाले! पाकिस्तान फारच आगळिक करतोय असे दिसले तर त्यांना समज द्यायची. मधून मधून भारत कसा अण्वस्त्रयुक्त देश आहे आणि त्यामुळे अमेरिकेला कशी काळजी वाटते ते सांगायचे. असे आलटून पालटून चालू असते.
पाकिस्तान जर मोडला तर तिथला अंकुश जाईल. चीन टपलेलाच आहे. भारत-पाकिस्तानात सख्य होऊ देणेही त्यांना परवडणारे नाहीच.
मदत केली तर संकट आणि नाही केली तरी संकट अशीच परिस्थिती आहे पण आता अमेरिकेची परिस्थिती अंडरवर्ल्डमध्ये शिरकाव केलेल्या गुंडासारखी आहे. माणसे मारणे थांबवता येत नाही सुपार्या घेत रहायच्या माणसे टिपत रहायची परतीचा मार्ग बंद आहे. थांबले की संपले!
चतुरंग
16 Apr 2010 - 9:50 pm | सुधीर काळे
चतुरंग-जी,
पण अमेरिका फारच अदूरदृष्टीच्या धोरणाने वागते आहे असे वाटते, कारण त्यांना पुढच्या दशकात भारताचीच मदत लागणार आहे! जेंव्हा पाकिस्तानला वगळून आपल्याबरोबर मुलकी परमाणू करार तिने केला तेंव्हां मला वाटले होते कीं चीनशी लढण्यासाठीची ही पूर्वतयारीच सुरू केली तिने. पण पाकिस्तानसारखा fickle मित्र कुणालाच काय कामाचा?
Both US and Pakistan deserve each other असे एका वाचकाने एका प्रतिसादात लिहिले होते ते खरे आहे!
अमेरिका एक 'सुपारी' घेतलेल्या गुंडाच्या भूमिकेतून राजकारण करते आहे हा तुमचा मुद्दा interesting आहे.
धन्यवाद!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?comple... (India Today)
16 Apr 2010 - 10:02 pm | चतुरंग
कोणीच कोणाचा कायमचा शत्रू वा मित्र नसतो. सगळे गरजेनुसार असते.
कारण त्यांना पुढच्या दशकात भारताचीच मदत लागणार आहे! जेंव्हा पाकिस्तानला वगळून आपल्याबरोबर मुलकी परमाणू करार तिने केला तेंव्हां......
बरोबर आहे. पण सध्या पाकिस्तान गरजेचा आहे ना मग घ्या मदत! जेव्हा त्यात वापरण्याजोगं शिल्लक रहाणार नाही तेव्हा भारताला जवळ करा. त्यासाठीच सध्या परमाणू करार करुन ठेवलाय! तेवढीच चीनलाही थ्रेट!
अदूरदृष्टीने नाही कावेबाजपणाने आहे. सुपारी घेतलेल्या गुंडाची उपमा मी अशाकरता दिली की आता काही धोरणे अंगावर आली तरी त्यात ते इतके गुंतलेले आहेत की सहजी माघारीचा मार्ग नाही ती आत्महत्त्या ठरेल त्यामुळे पुढे जात रहायचे.
चतुरंग
16 Apr 2010 - 10:47 pm | सुधीर काळे
ते इतके गुंतलेले आहेत की सहजी माघारीचा मार्ग नाही ती आत्महत्त्या ठरेल त्यामुळे पुढे जात रहायचे.
म्हणजे पहिला पर्याय त्यातल्या त्यात जवळचा ठरेल.... मलाही असेच वाटते! अगदी तानाजीचा सिंहगडावरचे सगळे दोरखंड कापल्याचा पवित्रा!
१) आधीच्या राष्ट्राध्यक्षांनी इतकी 'वाट' लावली आहे कीं पाकिस्तानला मदत नाहीं केली तरी संकट व केली तरी संकट अशी परिस्थिती आहे?
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
दोन अत्यंत वाचनीय दुवे: http://www.dnaindia.com/opinion/main-article_dynasty-vs-government_1368625 (DNA) व http://indiatoday.intoday.in/site/Story/89840/Inhuman+rights.html?comple... (India Today)
18 Apr 2010 - 8:01 am | सुधीर काळे
शीर्षक कसे बदलायचे? मला फसवणूक-प्रकरण आठवे-अननसाचा केक (Pineapple Upside-Down Cake) असे बदलायचे आहे
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मालिकेचे प्रकाशन आज 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावना: http://epaper.esakal.com/esakal/20100417/4956582226686397045.htm
18 Apr 2010 - 5:08 pm | सुधीर काळे
या लेखमालेच्या प्रकरणांबद्दल बरेच 'मिपा'कर मला 'व्यनि'वर व्यक्तिगत प्रतिसाद देणे पसंत करत असावेत. त्यात एकाने मला या प्रकरणाच्या शीर्षकाचा (अननसाचा केक किंवा Pineapple Upside Down cake) अर्थ किंवा त्याचा मुख्य मजकुराशी संबंध काय असा प्रश्न विचारला.
खरं तर या पुस्तकातील बर्याच प्रकरणांची शीर्षकें जराशी 'फिट्ट' वाटत नाहींतच. उदा. आपल्याला जोडणारे धागे किंवा ज्यू मनोवृत्ती वगैरे. बर्याच वेळी मूळ प्रकरणात त्यांचा उल्लेख जरासा ओढून-ताणूनच वाटतो.
मी माझ्या पत्नीस या केकची कांहीं खासियत आहे कां असे विचारले. ती म्हणाली हा केक अननसाच्या चकत्या सर्वात वर टाकून बनवितात व काढताना इतर केक्स प्रमाणे हाही उलटाच बाहेर येतो. पण वरच्या बाजूला अननसाच्या चकत्या लावलेल्या असल्यामुळे त्या बाजूला icing करता येत नाहीं म्हणून तो तळाला icing असल्यामुळे उलटाच पेश केला जातो.
या प्रकरणात या केकचा बादरायणी संबंधच आहे! कुलदीप नायर जेंव्हा खानसाहेबांच्या घरी जातात तेंव्हा हेनीबाईंनी (सौ. खान) हा केक नायरना आवडतो म्हणून बनविला असतो.
नायर लिहितात कीं मला बरे वाटावे म्हणून खानदांपत्याने बराच खोलवर अभ्यास करून माझा पाहुणचार केला असावा.
All said and done, they wanted to (mis)use the good offices of Mr Kuldip Nayar, though due to Dr Khan's "overdrive", the eposode boomranged to a large extent!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मी 'मिपा'वर लिहीत असलेल्या मालिकेचे प्रकाशन आज 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावनेचा लेख वाचा: http://epaper.esakal.com/esakal/20100417/4956582226686397045.htm
20 Apr 2010 - 7:58 am | सुधीर काळे
आज एक फारच महत्वाची बातमी ई-टाइम्समध्ये वाचली.
http://timesofindia.indiatimes.com/world/us/articlelist/30359486.cms
या बातमीत उत्तर वझीरिस्तानमधून पळविल्या गेलेल्या ISI ऑफिसर्सची निवेदने आहेत. त्यात अस्लम बेग व हमीद गुल यांचे उल्लेख आहेत.
याच दोन लष्करी अधिकार्यांनी बेनझीरला तिच्या पंतप्रधानकीच्या पहिल्या सत्रात राज्य करू दिले नव्हते व हे अधिकारी पूर्णपणे आतंकवादाला पाठिंबा देणारे होते/आहेत. याची माहिती 'फसवणूक'च्या येत्या कांहीं प्रकरणांत येणार आहे.
अस्लम बेग व हमीद गुल यांनीच या पकडल्या गेलेया ISI अधिकार्यांना तालीबानच्या नेत्यांना भेटायला पाठविले होते हे त्या पकडलेल्या अधिकार्यांनी सांगितले आहे.
९/११च्या आधी नवाज़ शरीफ यांची ओसामा बिन लादेन यांच्याबरोबर भेट घडवून आणल्याचा दावा करणारा खालिद ख्वाजा हा अधिकारीही यात आहे!
सुधीर काळे, जकार्ता
------------------------
'न्यूक्लियर डिसेप्शन' या मी 'मिपा'वर लिहीत असलेल्या मालिकेचे प्रकाशन आज 'ई-सकाळ'मध्ये सुरू झाले. प्रस्तावनेचा लेख वाचा: http://epaper.esakal.com/esakal/20100417/4956582226686397045.htm
29 Apr 2010 - 3:44 pm | सातबारा
श्री. सुधीर काळेजी,
आपल्या लेखमालेचा मी पहिल्यापासूनचा वाचक आहे. आधी मिपा चा फक्त वाचक होतो. आपल्याला प्रतिसाद देता यावा म्हणून त्वरेने सदस्य बनलो.
बरेच दिवसात पुढचा भाग आला नाही. वाट पहात आहे.
---------------------
हे शेतकर्यांचे राज्य व्हावे.
30 Apr 2010 - 12:34 am | सुधीर काळे
सातबारा-जी,
(खरे नाव कळले तर जास्त आवडेल. आपल्याला प्रशस्त वाटत असल्यास कृपया व्यनिवर पाठवा. ते माझ्यापुरतेच राहील.)
गेला आठवडा प्रवासात गेला. आधी ३-४ दिवस पुण्यात होतो. तिथं खूप कांहीं कामंही होती व ३-४ दिवसांसाठी इंटरनेटची सेवा घेण्यातही अर्थ नव्हता. अमेरिकेत आल्यावर एका दिवसात जेटलॅग झटकला व परत लिहायला सुरुवात केली व आताच ९वे प्रकरण संपवले.
ई-सकाळला हे लिखाण मालिकेच्या रूपात प्रसिद्ध होऊ लागल्यामुळे आता लिहीत रहाणे व वेळेवर ई-सकाळला लेख पुरवणे ही जबाबदरी माझ्या अंगावर आलेली आहे. पण काम आवडीचे असल्याने मजा येतेय् करायला.
त्यात आपल्यासारख्यांचा असा उत्साहवर्धक प्रतिसाद वाचला कीं केल्या श्रमाचे सार्थक झाल्यासारखे वाटते.
प्रतिसादाबद्दल मनापासून आभार.
९ व्या प्रकरणावर एक 'सफाई'चा हात फिरवून बहुदा उद्या इथे पोस्ट करेन.
सुधीर काळे, सध्या मुक्काम ओबमांच्या पंढरपुरी (हो, वॉशिन्ग्टन डीसी येथे)!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रस्तावना: http://tinyurl.com/36pvtbn; प्रकरण पहिले: http://tinyurl.com/24rlna9