फसवणूक-प्रकरण अकरावे-"क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे" (Guest of the Revolutionary Guard)

सुधीर काळे's picture
सुधीर काळे in जनातलं, मनातलं
13 May 2010 - 8:49 am

फसवणूक-प्रकरण अकरावे-"क्रांतिकारी रक्षकांचे पाहुणे" (Guest of the Revolutionary Guards)
© एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट-क्लार्क (मूळ लेखक)
© सुधीर काळे, जकार्ता (मराठी रूपांतरासाठी मूळ लेखकांच्या वतीने)
मराठी रूपांतर: सुधीर काळे, जकार्ता
(या लेखातील सर्व मते मूळ लेखकद्वयींची आहेत)

१ जानेवारी १९८९रोजी पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाचा अमेरिकेतील सर्वोत्तम अन्वेषक रिचर्ड बार्लो CIA मधून बाहेर पडून पेंटॅगॉनमध्ये संरक्षणमंत्र्यांच्या कार्यालयात-OSDमध्ये(१)-रुजू झाले. त्यांना परराष्ट्रमंत्रालयात व CIAमध्ये अनेक शत्रू होते. त्यांनी स्वतःबरोबर त्यांना मिळालेली प्रशस्तीपत्रकें व बक्षिसेही आणली होती व त्यांनी स्वतःला कामात बुडवून घेतले. त्यांच्या कामाची व्याप्ती विशाल होती आणि त्यांना अण्वस्त्रप्रसारविरोधी अन्वेषण करायला सांगण्यात आले. पण अमेरिकेच्या शस्त्रास्त्रे बनविणार्‍या व राजकीयदृष्ट्या बलवान असलेल्या कारखान्यांचे हितसंबंध एका बाजूला तर अमेरिकेची परराष्ट्रनीती दुसर्‍या बाजूला अशा परिस्थितीच्या अडकित्त्यात ते सापडले होते.

कांहीं आठवड्यातच त्यांनी पाकिस्तानच्या अण्वस्त्राबद्दलच्या प्रगतीचे खूपच पुरावे जमा केले व हमीद गुल यांच्या इराद्याबद्दलही माहिती मिळविली. पाकिस्तान प्रक्षेपणास्त्रे निर्मून स्वतःला वरच्या पातळीवर नेण्यात गुंतला होता. ते प्रक्षेपणास्त्रे बनवण्याच्या प्रयत्नात होते व अमेरिकेने पुरविलेल्या F-16 विमानांना अण्वस्त्रवहनक्षम बनविण्याच्या प्रयत्नात होते.

पण कांहींही केले तरी बार्लोंच्या कामाकडे कुणी लक्षच देत नव्हते. पण एड्वर्ड नेम (Gnehm) यांची कनिष्ठ उपसंरक्षणमंत्री म्हणून नेमणूक झाल्यावर परिस्थिती बदलली. त्यांनी आंतरराष्ट्रीय सुरक्षाधोरणविभागाचे उपसंरक्षणमंत्री स्टीफन हेड्ली या अधिकार्‍याबरोबर काम सुरू केले. हेड्लींचा विभाग होता नाटो, पश्चिम युरोप व अमेरिका यांच्या अण्वस्त्रें, प्रक्षेपणास्त्रे वापरून बचाव करणे आणि शस्त्रास्त्रनियमन! अन्वेषणानंतर जे कांहीं बार्लोंना मिळे ते अहवालाच्या स्वरूपात या दोघांकडे जाऊ लागले.

नेम यांनी बार्लोच्या कामात खूपच वैयक्तिक रस दाखविल्यावर बार्लोंना उत्साह आला व ते नेमना संपूर्ण वृत्तांत देत. पण त्यांना त्यावेळी तिथे जे राजकारण चालू होते त्याचा विसर पडला. ते इतके आपल्या कामात बुडून जात कीं आजूबाजूला काय घडत आहे याचा त्यांना विसर पडायचा. पाकिस्तानची आता अणूबाँब बनवायची व टाकायची तयारी सुरू आहे आणि तरीही पाकिस्तानचे घटकभागाच्या खरेदीचे काम जोमातच चालू आहे असे त्यांनी नेम यांना कळविले. पण हे अहवाल प्रेस्लर व सोलार्त्झ यांच्या घटनादुरुस्तीद्वारा पाकिस्तानला दिल्या जाणार्‍या मदतीच्या आड येणार होते. रेगननंतर अधिकारावर आलेल्या बुश-४१ (अमेरिकेचे ४१वे अध्यक्ष 'पहिले बुश') यांच्या भोवतालचे व अद्यापही शीतयुद्धपूर्व मनोवृत्ती असलेले अधिकारी बुशना पाकिस्तानच्या खर्‍या हेतूंची बरोबर माहिती मिळू देत नव्हते. त्यांच्या सर्व कारवायांमुळे सुरक्षिततेवर गंभीर परिणामा व्हायचा जो पाकिस्तानला मदत मिळण्याच्या तूलनेत खूप जास्त होता. बुश-४१ वेगळ्या स्वभावाचे होते. रेगन यांसारखी प्रतिनिधीगृहाशी दादागिरी करण्याऐवजी कायद्यांचा सन्मान करणे व प्रतिनिधीगृहाशी सलोख्याचे संबंध ठेवणे त्यांना पसंत होते.

नेम यांनी बार्लोंचे म्हणणे ऐकून घेतले पण त्यांचा त्यावर विश्वासच बसेना व त्यांना खूप संताप आला.
पण त्यांचे संभाषण पाकिस्तानला होणार्‍या शस्त्रास्त्रांच्या विक्रीवर देखरेख करणारे OSDचे पाकिस्तानविषयक अधिकारी मायकेल मॅकमरे यांनी ऐकले. ते संतापले. त्यांना ही बार्लोंची लुडबूड वाटली कारण नेम यांना अहवाल/सल्ला देण्याची जबाबदारी त्यांची होती. पण नेम यांना माहिती मिळालीच होती व कसल्याही खोटेपणाचा व फसवणुकीचा त्यांना तिरस्कार वाटायचा. बार्लोंच्या अहवालावर त्यांचा विश्वास बसला व त्यांनी पाकिस्तान आपले अणूबाँब शत्रूवर टाकण्याचे नवे मार्ग शोधत आहे ही माहिती पेंटॅगॉनमध्ये ज्यांना अशी माहिती मिळविण्याचा clearance होता त्यांना सांगितली.

बुश-४१ यांचे संरक्षणमंत्री डिक चेनी यांच्या माहितीसाठी पाकिस्तानवर एक सर्वंकश अहवाल लिहायची बार्लोंना आज्ञा झाली. चेनी लवकरच या विषयावरील राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीला हजर रहाणार होते. उपलब्ध असलेला सर्व पुरावा गोळा करून बार्लोंनी अतीशय गुप्तता बाळगणार्‍या व पेंटॅगॉनच्या सर्व गुप्तहेर संघटनांमध्ये समन्वय ठेवणार्‍या Defence Intelligence Agency (DIA) शी संपर्क साधला. DIAला बार्लो चांगलेच परिचित होते कारण बार्लो CIA असताना त्यांनी DIAचे अहवाल वापरले होते. DIAला पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल त्यांनी काय साध्य केले आहे व काय करू पहात आहेत याचा आढावा घेणारा एक अहवाल बनविण्यास सांगण्यात आले होते. त्यात खास करून DIAने अमेरिकेने पुरविलेल्या F-16 जातीच्या विमानाबाबतच्या माहितीवर लक्ष केंद्रित केले होते कारण त्यांची सहा विमानांची पहिली तुकडी १५ जानेवारी १९८३ला सरगोढा विमानतळावर येऊन दाखल झाली होती. ही विमाने रेगन-झिया करारातील एकूण ४० विमानविक्रीच्या कराराचा भाग होती व ती पाकिस्तानने सोविएत सैन्याबरोबरचे युद्ध चालूच ठेवण्यासाठी दिली गेली होती व ती विमाने अणूबाँबवहनक्षम बनवणे पाकिस्तानला शक्य नव्हते असेही सांगण्यात आले होते.

पण DIA व बार्लोंना जे समजले ते वेगळेच होते. पाकिस्तानने त्या विमानात हवे ते फेरबदल करून घेऊन ती विमाने अणूबाँबवहनक्षम बनविण्यात यश मिळविले होते! आता अण्वस्त्र प्रक्षेपणास्त्रांच्या निर्मितीची पाकिस्तानला निकड होती हे उघड होते.

पाकिस्तानला लष्करी साहित्य पुरविण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार्‍यांना व पेंटॅगॉनला ही माहिती बाहेर फुटायला नको होते कारण या चाळीस विमानाव्यतिरिक्त पाकिस्तानला F-16 जातीची आणखी ६० विमाने पुरविण्याचा संरक्षणखात्याचा मनसुबा होता (जे अद्याप बार्लोंना माहीत नव्हते).

आपल्याभोवती काय चालले आहे याची बार्लोंना कल्पनाच नव्हती. OSD चे अधिकारी बार्लोंवर त्यांचे निष्कर्ष बदलण्यासाठी दबाव आणू लागले. त्यांनी बार्लोंच्या अहवालातील F-16 विमानांना अण्वस्त्रवहनक्षम बनविण्यासाठी पाकिस्तानने यशस्वीपणे केलेले फेरबदल व पाकिस्तानने प्रेस्लर व सोलार्त्झ यांच्या घटनादुरुस्तींची कलमें मोडल्याचे अनेक प्रसंग या बाबतचे संपूर्ण परिच्छेदच्या परिच्छेद वगळायचा आग्रह धरला. पण विमानातले फेरबदल सरळ-सरळ तांत्रिक फेरबदल होते व त्या फेरबदलांना या विषयातील उच्चतम सरकारी तंत्रज्ञांनी त्यांच्या अनेक तांत्रिक अन्वेषणात पुष्टी दिली होती. ही गुप्त माहिती बळकट होती. आणि असे अन्वेषण करणारे बार्लो एकटेच नव्हते. पाकिस्तानने F-16 मध्ये अणूबाँबवहनक्षमतेसाठी फेरबदल केल्याचा व प्रेस्लर व सोलार्त्झ यांच्या घटनादुरुस्तीच्या कलमांचा भंग केल्याचा निष्कर्ष अमेरिकेच्या उर्जा खात्यानेही काढला होता.

पण पुढच्याच महिन्यात एड्वर्ड नेम यांची परराष्ट्रमंत्रालयात बदली झाली व त्यांच्या जागी परराष्ट्रमंत्रालयाच्या आर्थर ह्यूज यांची नेमणूक झाली. या बदलाची फारशी दखल न घेता व या बदलामुळे कांहीं बदलेल असे न वाटल्याने बार्लो नेहमीसारखेच आपले काम करीत राहिले. मग त्यांना आणखी एक कारस्थान आढळले. नेहमीच्या मेंटेनन्ससाठी लागणारी सुट्या घटकभागांची 'किट्स' मागविण्याच्या नावाखाली पाकिस्तान चक्क ती 'किट्स' या विमानांना अण्वस्त्रवहनक्षम बनविण्यासाठी वापरत होता. थोडक्यात अमेरिकेच्या सुट्या भागांचा उपयोग करून पाकिस्तान अण्वस्त्रवहनक्षमता मिळवत होता.

मग बार्लोंच्या एक विलक्षण गोष्ट लक्षात आली कीं फायली आणि अहवाल तसेच जमविलेल्या माहितीची टाचणे नाहींशी होऊ लागली. त्यांच्या वरच्या एका अधिकार्‍याने बार्लो काम करत असलेल्या खरेदीप्रकरणाबाबतचे तसेच ते करत असलेल्या गुन्ह्याविषयक चौकशा अशा विषयावरील कागदपत्रें ते मधल्या मधेच हडप करू लागले. बार्लोंची मतीच कुंठित झाली व ते अस्वस्थ आणि गोंधळले पण कुणाला कांहीं बोलले नाहींत व जेंव्हां त्यांच्या बॉसने त्यांना 'कॅपिटॉल हिल'वर एका बैठकीची व्यवस्था करायला सांगितले तेंव्हां पूर्वीचा दुःखद अनुभव बाजूला सारून त्यांनी तशी व्यवस्था केली. पण त्यांना कल्पना नव्हती कीं ते बार्लोंचे वस्त्रहरण करण्याची तयारी करीत होते.

पाकिस्तानात ज. बेग यांनी सरगोढ्याला अण्वस्त्रें वाहू शकतील अशा दोन प्रक्षेपणास्त्रांची चांचणी करून सर्वांना एक विस्मयकारक धक्काच दिला. अमेरिकेत DIAने बुश-४१ना पाकिस्तानने हत्फ-१ व हत्फ-२(२) या ५०-ते २०० मैल पल्ला असलेल्या क्षेपणास्त्रांच्या थार वाळवंटात केलेल्या चांचणीबाबत कळविले. अशा तर्‍हेने दिल्लीवर व मुंबईवर परमाणू हल्ला करण्याची क्षमता पाकिस्तानने मिळविली होती. एका विद्यार्थीसमुदायाला संबोधित करताना ज. बेग यांनी जाहीर केले कीं या दोन अचूक क्षेपणास्त्रांच्या डागण्याची चांचणी मेक्रान किनार्‍यावर फिरत्या मालमोटारीवरूनही(२अ) यशस्वीपणे करण्यात आली. चीनच्या मदतीने बनविलेल्या या क्षेपणास्त्रांच्या चांचणीने पाकिस्तानने जणू अमेरिकेला इशारा दिला कीं पाकिस्तान शस्त्रास्त्रांसाठी आता केवळ अमेरिकेवर अवलंबून नव्हता.

शस्त्रास्त्रे लपविण्याने शत्रूच्या पोटात भीती निर्माण होत नाहीं म्हणून त्यांना प्रतिबंधक (deterent) म्हणून कांहींच किंमत नसते. म्हणून बेग यांनी 'द मुस्लिम' या वृत्तपत्राच्या एका मित्राशी संपर्क साधला व "पाकिस्तानने आता जमीनीवरून विमानांवर मारा करणारी व १५० ते ५००० मीटर्सचा पल्ला असलेली (SAM) प्रक्षेपणास्त्रे निर्मिली असून लेझरवर आधारित Rangefinder सुद्धा बनविला आहे" असा गौप्यस्फोट केला. कहुताप्रकल्पाच्या कारखान्यांच्या परिसरात खानसाहेबांच्या युरोपियन हस्तकांच्या सहकार्याने त्यांनी 'स्टिंगर' प्रक्षेपणास्त्रही बनवली आहेत व त्यांचे नाव 'अंझा' असे ठेवले आहे असेही त्यांनी जाहीर केले. (अंझा हा प्रेषक महंमद यांचा सहकारी शत्रूला आपल्या भाल्याने मारत असे.)

बेनझीरना या सर्व कामगिरींचे वृत्त वृत्तपत्रांतून कळले. बेनझीर या कमकुवत नेत्या ठरत होत्या. त्या लष्कराला ताब्यात ठेवू शकत नव्हत्या. त्यामुळे लष्कर उघड-उघड अमेरिकेशी आव्हानात्मक पवित्र्याने वागत असे. त्यामुळे अमेरिकेला लक्षात आले कीं बेनझीर यांच्या "पाकिस्तानकडे अणूबाँब नाही" अशा खात्रीने दिलेल्या आश्वासनांवर आता विश्वास ठेवणे शक्य नव्हते.

सरहद्दीपलीकडे भारतही संतापला होता. भारतानेही 'अग्नी' नावाच्या १८ मीटर लांब व ७.५ टन वजन असलेल्या, १५०० मैलांचा पल्ला असलेल्या व दक्षिण चीनपर्यंत पोचणार्‍या आपल्या पहिल्याच मध्यम पल्ल्याच्या व अण्वस्त्रवहनक्षमता असलेल्या प्रक्षेपणास्त्राची चांचणी केली. बेनझीर यांना शह द्यायला टपून बसलेले आणि भारतावर मात करू पहाणारे बेग यांच्यामुळे आपल्या डोळ्यादेखत अण्वस्त्रस्पर्धा सुरू झालेली रॉबर्ट ओकलींना दिसत होती व त्यात राजीव गांधीप्रणीत शांततेचे प्रयत्न धुळीला मिळू लागले होते.

बेनझीरना सर्व बाजूंनी वेढण्यात आले होते. हमीद गुल यांनी रचलेला, नवाज़ शरीफ यांनी पाठिंबा दिलेला व ओसामा बिन लादेन यांचे अर्थसहाय्य असलेला त्यांना जिवे मारण्याचा कट त्याना समजल्यावर त्यांनी PPPच्या एका विश्वासू कार्यकर्त्याला सौदी अरेबियाच्या राजांना भेटायला पाठविले. त्यांच्याकडून कळले कीं राजासाहेबांचा या कारस्थानाला पाठिंबा नाहीं. मग बेनझीर यांनी हमीद गुल यांना ISIच्या प्रमुखपदावरून बडतर्फ करून त्यांच्या जागी ले.ज. शमसूर कल्लुए यांची नेमणूक केली. पण बेग यांनी आपल्याच प्रधानमंत्र्यांचे सर्व हुकूम धाब्यावर बसवून ISIमधील आपल्या एकनिष्ठ अधिकार्‍यांकरवी सर्व महत्वाची आणि संवेदनाशील कागदपत्रे, फायली व टेप्स तसेच राज्यकर्त्यांबद्दलच्या अतिगुप्त फायली ISIच्या मुख्यालयातून आपल्या रावळपिंडीतील आर्मी हाऊस येथील कार्यालयात हलविल्या.

लष्कराचे ज्येष्ठ अधिकारी सांप्रदायिकतेला प्रोत्साहन देऊन, PPPच्या स्थानिक कार्यकर्त्यांना भ्रष्ट प्रकरणांत गोवून मग त्यांची कुलंगडी फोडून बेनझीर यांच्या सरकारला अस्थिर करण्याचे जोरदार प्रयत्न करीत होते. पंजाबमधील बाँबस्फोटांचा आरोपही PPP वर करण्यात आला. खरे तर ते बेग व गुल यांच्या हस्तकांनीच करविले होते. कराचीलाही अशीच ISIप्रणीत भांडणे सुरू केली गेली व संप, हरताळ वगैरे करवून सरकारला आर्थिक फटकाही बसविला.

अशा तंग परिस्थितीतील बेनझीर यांच्या 'व्हाईट हाऊस'च्या पहिल्या-वहिल्या भेटीत त्यांचे बुश-४१ यांच्याकडून थंडे स्वागत झाले. बिल केसी यांच्या निधनानंतर CIAचे प्रमुख झालेले विल्यम वेबस्टर CIAची बिघडलेली प्रतिमा दुरुस्त करण्यात दंग होते. त्यांनी बेनझीरना अमेरिकेला असलेली पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल अद्ययावत माहिती देऊन व बाँबची प्रतिकृतीही बनविल्याचे सांगून वातावरण चांगलेच तापवले. पण बेनझीरना त्यातल्या बर्‍याच गोष्टी माहीतच नव्हत्या! बेनझीर यांना पंतप्रधान असूनही अंधारातच ठेवण्यात येत होते. त्यांनी ही परिस्थिती पलटण्याचा व खानसाहेबांवर व त्यांच्या अण्वस्त्रप्रकल्पावर आपली पकड स्थापित करण्याचा निश्चय केला.

पण लोकशाहीमार्गे निवडून आलेल्या कमकुवत पंतप्रधान केंव्हांही सांप्रदायिक इस्लामिक लष्करशहांच्या चांडाळचौकडीपेक्षा अमेरिकेच्या जास्त नियंत्रणाखाली असलेल्या होत्या. त्यानुसार बेनझीर यांनी त्यांच्या बुश-४१बरोबरच्या भेटीत एक गुप्त करार केला. तो म्हणजे अमेरिकेच्या आर्थिक मदतीचा ओघ चालू ठेवायचा व त्याच्या बदल्यात अण्वस्त्रयोग्य अतिशुद्धीकृत युरेनियमचे उत्पादन पाकिस्तानने थांबवायचे. बुश-४१नी त्यांना सांगितले कीं त्यांना त्यांच्या अडचणींची कल्पना होती व त्यानुसार ते पुन्हा एकदा पाकिस्तानला डिसेंबर १९८९मध्ये खोटे प्रशस्तीपत्रक द्यायला तयार होते. पण त्यांची एक अट होती कीं अणूबाँबचा गाभा पाकिस्तानने बनविता कामा नये. पाकिस्तानला आणखी ६० F-16जातीची विमाने विकायलाही बुश-४१ तयार झाले. बेग यांच्यासाठी ही एक सकारात्मक बातमी होती. पाकिस्तानला पैसे व विमाने मिळाली होती व कहूताचे उत्पादन कांहीं काळ कमी करण्याचे पाकिस्तानने मान्य केले होते व एकंदरीत हा सौदा चांगला होता असे बेनझीरना वाटले.

पण पाकिस्तानातल्या वृत्तपत्रांनी हमीद गुल यांच्या सूचनेवरून गदारोळ माजविला. पाकिस्तानचा अण्वस्त्रप्रकल्प एका पाश्चात्य शिक्षण मिळालेल्या स्त्रीच्या हाती सुरक्षित नाहीं असाच सूर त्यांनी लावला. मुस्लिम जगताच्या पहिल्या अणूबाँबपेक्षा बेनझीरना अमेरिकेची पसंती जास्त महत्वाची वाटते अशी टीकाही वृत्तपत्रांतून झाली.

बेनझीर यांनी शांततेचे अश्वासन दिले असूनही बेग यांनी अमेरिकेला युद्धाची तयारी दाखविली. त्यांनी बेनझीर यांच्यावर दबाव वाढविण्यासाठी नोव्हेंबर १९८९मध्ये पाकिस्तानच्या सर्वात प्रचंड युद्धसरावांची घोषणा केली. त्याचे परवलीच्या शब्दात नाव होते ज़र्ब-ए-मोमीन. या युद्धसरावांत बेग पाकिस्तानच्या शस्त्रागारातील सारी आधुनिक अस्त्रे जगाला दाखविणार होते. त्यांना युद्धज्वर वाढवायचा होता. त्यांना पाकिस्तानी जनतेला सत्य परिस्थितीची जाणीव करून द्यायची होती. पाकिस्तानकडे क्षेपणास्त्रे होती, अण्वस्त्र बनविण्याची क्षमता होती व हे सारे त्यांना जगाला सांगायचे होते! अशा अर्थाच्या त्यांच्या निवेदनांत बेनझीर यांची नालस्ती करणे हाच मुख्य हेतू होता हे उघड होते.(३)

अमेरिकेच्या पाकिस्तानबद्दलच्या परराष्ट्रधोरणाची पुन्हा लक्तरे झाली होती. युरेनियम अतिशुद्धीकरणाचे उत्पादन घटविण्याच्या मोबदल्यात "अण्वस्त्रे नाहींत" असे बुश-४१ यांनी खोटे प्रशस्तीपत्रक मिळविलेला व अमेरिकेकडून तिसर्‍या नंबरची आर्थिक मदत आणि ६० F-16 जातीची विमाने मिळविणारा अण्वस्त्रसज्ज पाकिस्तान लष्करी सरावाची तयारी करत होता व त्यात त्याला मिळालेल्या विमानांची अण्वस्त्रवहनक्षमता दाखविणार होता! एकीकडे अण्वस्त्रप्रकल्पाची प्रगती वृद्धीला लागेल असा नवा लष्करी करार पाकिस्तानशी करायचा व दुसरीकडे पकिस्तानला अण्वस्त्रप्रकल्पात पाऊल मागे घ्यायला सांगायचे याला कांहींच अर्थ नव्हता. हा होता अमेरिकन सरकारच्या दुटप्पी धोरणाचा परिणाम!

२५ जुलै १९८९ रोजी बार्लोंनी पेंटॅगॉनच्या एका नियतकालिकात एक बातमी वाचली. त्यांना वाटले कीं ही बातमी OSD मधील इतर कुणी वाचून प्रतिनिधीगृहाला कळविण्याच्या आधी त्यांचे वरिष्ठ जेराल्ड ब्रूबेकर यांनी वाचली पाहिजे. पाकिस्तानने खरीदलेल्या F-16 विमानांचे रूपांतर अण्वस्त्रवहनक्षमता असलेल्या विमानात केलेले असून त्यांची चांचणी Wind Tunnels मध्ये घेतल्याचे अनुमान केल्याची जर्मन हेरखात्याची ती बातमी होती. हा मजकूर बार्लोंनी आणि DIAने गुप्तपणे संरक्षणमंत्री डिक चेनींसाठी बनवलेल्या अनुमानाशी तंतोतंत जुळत होता. CIA मधील त्यांच्या सहकार्‍यांना विचारून त्यांचे मत विचारायचा ते बेत करत होते.

एका दिवसात त्यांना पेंटॅगॉनचे उच्चतम लष्करी साहित्य विक्रेते व OSDच्या माहितीसंपादन कार्यालयातील अधिकारी क. हचिन्सन यांच्या कार्यालयात खेचण्यात आले. हचिन्सननी आरोप केला कीं बार्लो F-16च्या विक्रीच्या नव्या सौद्याबाबतच्या घातपाती कारवायात गुंतले आहेत! (असा खोटा आरोप केल्याचे नंतर त्या खात्याच्या इन्स्पेक्टर जनरलनी केलेल्या चौकशीत बाहेर आले.) त्यांच्या या माहितीमुळे त्या सौद्यावर अनिष्ट परिणाम होईल हीच जणू त्यांची एकमेव चिंता होती. ते सर्व अधिकारी बार्लोंवर भडकले व त्यांच्याशी तावातावाने भांडून हे अन्वेषण बंद करण्याची आज्ञा दिली.

आठ दिवसांनंतर F-16च्या विक्रीचा नवा सौदा सार्वजनिकरीत्या जाहीर केल्यानंतर कनिष्ठ उपसंरक्षणमंत्री आर्थर ह्यूज यांची प्रतिनिधीगृहाच्या परराष्ट्रधोरणविषयक समितीपुढे साक्ष झाली. पाकिस्तानबद्दलच्या फसवणुकीच्या मामल्यातील तज्ञ सोलार्त्झ यांच्या "पाकिस्तान या विमानांत अण्वस्त्रवहनक्षमतेसाठी जरूर ते फेरबदल करू शकेल काय?" या प्रश्नाला त्यांनी "नाहीं" असे उत्तर दिले. नंतर त्या साक्षीच्या संभाषणाचे पूर्ण शब्दांकन जेंव्हां त्यांच्या हातात पडले तेंव्हां त्यांना असेही दिसले कीं ह्यूज यांनी असे फेरबदल करणे पाकिस्तानच्या सध्याच्या आवाक्याबाहेरचे आहे असेही सांगितले होते. त्यानंतर साक्ष झाली तेरेशिया शाफर या कनिष्ठ उपपरराष्ट्रमंत्र्यांची. या बहुभाषिक बाईंच्या पाकिस्तान व त्या देशाला असलेल्या कायम स्वरूपाच्या लोकशाहीच्या गरजेबद्दलच्या मतांबद्दल परराष्ट्रमंत्रालयात खूप आदर होता. त्यांनीही ठोकून दिले कीं आधी विकत घेतलेल्या तसेच नव्याने विकत घेतलेल्या विमानांत अण्वस्त्रवहनक्षमता नाहीं. शिवाय असे फेरबदल ते अमेरिकेच्या परवानगीशिवाय करणार नाहींत अशी अटही विक्रीविषयक कंत्राटात घातलेली आहे.

हे ऐकून बार्लो भयभीत झाले! त्यांना वाटले कीं ह्यूज व शाफरना पेंटॅगॉनकडून योग्य ती माहिती दिली गेलेली नाहीं. त्यांनी मॅकमरे यांना बजावले कीं प्रतिनिधीगृहाला खोटे-नाटे सांगण्यात आले आहे. अशी खोटी उत्तरें या दोघांना कुणी लिहून दिली होती या प्रश्नाला मॅकमरेंनी ती त्यांच्या वरिष्ठांनी दिली होती असे सांगितले. बार्लोंनी ब्रूबेकर यांच्याच्या संपर्क साधला व सांगितले कीं परराष्ट्रमंत्रालय आणि संरक्षणमंत्रालय अशा खोट्या माहितीप्रसृतीमागे आहे. बार्लोंनी ताबडतोब ब्रूबेकर यांच्याकडे तक्रार नोंदविली. बार्लोंना OSDतून बाहेर पडायचे होते. डिक चेनींना दिलेल्या अहवालाच्या अधाराने त्यांना असे वाटले कीं १०० कोटी डॉलर्सचा सौदा पक्का करण्यासाठी प्रतिनिधीगृहाला असत्य माहिती देण्याची हेतुपूर्वक व विस्तृत कटबाजी परराष्ट्र आणि संरक्षणमंत्रालयात चालली होती.

बार्लोंना त्यांच्या "लक्षणीय अन्वेषणकार्या"बद्दल पुन्हा पदोन्नती दिल्यानंतर एका महिन्याच्या आत ब्रूबेकर यांनी त्यांना नोकरीवरून काढून टाकले. गोंधळलेले व त्यांनी केलेले अन्वेषणकार्य याच्या मुळाशी असल्याच्या शंकेमुळे बार्लोंनी या नोकरीवरून कमी करण्याच्या कारवाईला आव्हान दिले. ब्रूबेकरनी सांगितले कीं त्यांनी हेड्लींच्या आज्ञेनुसार कारवाई केली होती. ते खरे असो वा खोटे पण त्यांच्या बडतर्फीच्या हुकूमाला हेड्लींच्या खात्याचे चिटणीस जेम्स हिंड्स यांची संमती होती व त्यांना कसलीही पूर्वसूचना अथवा नोटीसही देण्यात आली नव्हती. बार्लोंनी हेड्लींशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यातही ते अयशस्वी झाले. शेवटी हेड्लींच्या लष्करी सहाय्यकांनी हेड्लींनी त्यांच्या बडतर्फीच्या हुकूमावर सही केल्याच्या वृत्तास दुजोरा दिला व पुन्हा फोन न करण्यास सांगितले.

दरम्यान ब्रूबेकर यांनी DIAच्या वरिष्ठांशी संपर्क साधून बार्लो यांच्यावर यापुढे विश्वास ठेवता येणार नाहीं असे सांगून यांचे सर्व सुरक्षा clearances रद्द करण्यास सांगितले. ८ ऑगस्ट १९८९रोजी बार्लोंना OSD च्या सुरक्षा संचालकांना भेटण्याचा हुकूम देण्यात आला व त्यांनी बार्लोंना त्यांचे सर्व सुरक्षा clearances रद्द झाल्याचे सांगितले. हे clearancesच तर बार्लोंची कामाची हत्यारे होती व त्यांच्याशिवाय ते कांहींच करू शकत नव्हते. बार्लोंना त्यांच्याविरुद्ध काय आरोप आहेत याबद्दलही कांहीं सांगण्यात आले नाहीं. फक्त "तुम्ही आता security risk झाला आहात अशी विश्वासार्ह माहिती आमच्या हाती आली आहे" एवढेच त्यांना सांगण्यात आले. "कुणी आणि काय सांगितले" या प्रश्नाला "ती गोपनीय गोष्ट आहे" असे सांगण्यात आले. नांव न घेता "संरक्षणमंत्रालयातील वरिष्ठ अधिकार्‍यांनी खूप पुरावा दिला" एवढेच त्यांना सांगण्यात आले.

बार्लो घराकडे परतले. आपल्या पत्नीला काय सांगायचे हेच त्यांना समजेना. CIAची नोकरी सुटल्यापासून त्यांचे लग्न मोडायच्या वाटेवर होते व ते 'कौन्सेलिंग'मध्ये होते. व याबद्दलही त्यांना ऑफीसला माहिती द्यावी लागली होती. आताच कुठे घडी बसू लागली होती आणि त्यांच्यावर double agent असल्याचा आरोप झाला होता! मग जरा विचार करून बार्लोंनी एक सरकारशी लढा देण्यातला वाकबगार वकील नेमला. मगच त्यांना कळले कीं ब्रूबेकर यांनी OSDच्या वरिष्ठांना सांगितले होते कीं बार्लॊ प्रतिनिधीगृहापुढे त्यांचे भांडे फोडणार होता. एक न घडलेल्या बैठकीतील चर्चेचा हवाला देऊन ब्रूबेकरनी सांगितले कीं त्या बैठकीत बार्लोंनी प्रतिनिधीगृहाकडे जाऊन त्यांना थेटपणे F-16 च्या सौद्याबद्दल व सरकारने प्रतिनिधीगृहाला पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल कसे सतत व मुद्दाम खोटे सांगितले होते याचा गौप्यस्फोट करणार होते.

बार्लो व त्यांच्या वकीलांनी आणखी थोडे खोलवर अन्वेषण केल्यावर त्यांना कळले कीं ब्रूबेकर व त्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी OSD ला बार्लोंवर मानसोपचारतज्ञांकडून उपचार सुरू असून त्यांना भलते-सलते भ्रम होत असतात व त्यानुसार अस्तित्वात नसलेल्या व्यक्ती प्रतिनिधीगृहाला खोटे सांगत आहेत असा भ्रम झाला होता असे सांगितले होते. त्यांची फाईल उपमंत्र्यांपर्यंत पोचली होती असेही समजले. कांहीं अधिकारी त्यांच्या वैवाहिक समस्यांचा दुरुपयोग करून त्यांना आयुष्यातून उठवू पहात होते. थोडक्यात त्यांच्या खासगी बाबींत नाक खुपसून आणि मिळविलेल्या माहितीला विकृत रूप देऊन बार्लोंना वेडसर ठरविले जात होते.

आणखी कागदपत्रें बाहेर आली व त्यानुसार बार्लोंच्या बडतर्फीशी व तिच्या परिणामांशी संबंधित कलावंतांची यादीच बाहेर आली. बार्लोंची केस उपसंरक्षणमंत्री पॉल वुल्फोवित्झ यांचे मदतनीस व पेंटॅगॉन येथील प्रशासनाचे संचालक मर्विन हॅम्टन यांनी हाताळली होती. ३६ वर्षें नौसेनेत सेवा करून पेंटॅगॉनला आलेले व वुल्फोवित्झ यांचे लष्करी मदतनीस दर्यासारंग जॉन रेडनासुद्धा याबाबतीत गुंतविले होते. पेंटॅगॉनच्या सुरक्षाविभागाने रेड यांना बार्लोंना पुन्हा नोकरीवर ठेवण्यासाठी सांगितले होते. पण त्यांनी बार्लोंची बडतर्फी त्यांच्या असमाधानकारक कामगिरीमुळे झालेली असल्याने त्यांना पुन्हा नोकरीवर ठेवण्यास नकार दिला. पण पेंटॅगॉनला माहीत होते कीं बार्लोंची कामगिरी समाधानकारकच होती. बार्लोंनी पेंटॅगॉनच्या सर्व थरावरील अधिकार्‍यांना न्याय मिळावा कळकळीची विनंती केलेली असल्यामुळे डावपेच व साधनसामुग्री विभागाचे कनिष्ठ उपसंरक्षणमंत्री लिबी यांच्यातर्फे एरिक एडलमनही यात गुंतले. नंतर पेंटॅगॉनच्या सुरक्षाविभागाकडून एक मेमोही काढला गेला कीं बार्लो यांचे आधी रद्द केलेले सर्व security clearances पुनर्प्रस्थापित करण्यात आले आहेत. पण OSD त्यांना पुन्हा नोकरीवर ठेवू इच्छित नव्हती. त्यावर एडेलमननी ते कुठेच फिट होणार नाहींत म्हणून नोकरीवर ठेवावयास नकार दिला.
नंतर कांहीं दिवसानंतरच हेड्लींच्या विभागाने बार्लोंच्या बडतर्फीवर पुन्हा शिक्कामोर्तब केले. त्यांच्यावरचे आरोपही classified असल्याने त्यांना सांगितले गेले नाहींत. कांहीं सहकारी तर इतके क्रूर होते कीं त्यांनी बार्लोंना सांगितले कीं या कारवायांमुळे त्यांचे लग्न मोडेल याची त्यांना कल्पना होती व हीसुद्धा एक शिक्षेचाच भाग होता.

बार्लोंना माहीत होते कीं त्यांना जरळ समोरासमोर चौकशीला तोंड द्यायला मिळाले तर ते कांहीं मिनिटातच स्वतःला दोषमुक्त शाबित करतील पण तशी संधी त्यांना देण्यातच आली नाहीं व फिर्यादीचे नांवही सांगण्यात आले नाहीं! पण तरीही बार्लो बधले नाहींत. ते OSDच्या सुरक्षाविभागाकडे गेले व त्याच्या प्रमुखाला याची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. तीही classifiedच राहिली. थोडक्यात म्हणजे बार्लोंवर निनावी अधिकार्‍याने केलेल्या गुप्त आरोपावरील गुप्ततेत केलेल्या चौकशीला तोंड द्यावे लागत होते. पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दलच्या सर्वात जास्त अनुभवी अशा अन्वेषकाला शेवटी OSDत नोकरी तर मिळाली, पण काम काय? तर lunch appointments वर देखरेख!

पण नंतर OSDच्या सुरक्षाविभागाच्या अधिकार्‍यांनी करबुडवेपणा, मद्यपी, विवाहबाह्य संबंध ठेवणारा, आधीच्या सर्व सरकारी नोकर्‍यांवरून काढून टाकला गेलेला यासारखे नवीन घाणेरडे आरोप त्याच्यावर लादले. बार्लोंवर त्याच्या विवाहविषयक सल्लागाराची मुलाखत घेऊ देण्याच्या परवानगीसाठीही त्याच्यावर जबरदस्ती करण्यात आली व त्याच्या पत्नीलाही त्यात फरफटत आणले गेले. मग त्यांना कळले कीं त्यांच्यावरच्या बिनबुडाच्या आरोपांची माहिती त्यांच्या सार्‍या सरकारी सहकार्‍यांना आणि जुन्या नोकरी देणार्‍यांनाही देण्यात आली होती. सार्‍यांना वाटावे कीं बार्लोंनी जणू एकाद्या सोविएत हेराबरोबरच संधान बांधले होते! त्यांच्या व्यावसायिक व वैयक्तिक आयुष्याचे अशा तर्‍हेने वाटोळे करण्यात आले!

कांहीं वर्षांनंतर बार्लोंना आणखी एक आश्चर्यकारक गोष्ट कळली. त्यांनी डिक चेनीसाठी केलेल्या F-16 विमानांबद्दलचे गुप्त मुल्यमापन चेनीपर्यंत पोचलेच नव्हते. म्हणूनच ह्यूज यांनी अज्ञानापोटी प्रतिनिधीगृहापुढे खोटी साक्ष दिली होती. नेम यांच्या आज्ञेनुसार बार्लोंनी राष्ट्रीय सुरक्षा समितीसाठी व राष्ट्राध्यक्षांसाठी केलेला गुप्त अहवाल दडपून ठेवण्यात आला होता व त्याजागी नवा अहवाल दिला होता.
पाकिस्तानचे विभागाचे प्रमुख मॅकमरे यांनी बार्लोंचा अतीशय गुप्त अहवाल त्यातले F-16 मधील अण्वस्त्र वहनक्षमतेसाठीच्या केलेल्या फेरबदलाचे सर्व उल्लेख वगळून तो बदलला होता. त्या अहवालातले प्रेस्लर व सोलार्त्झ यांच्या घटनादुरुस्तीच्या कलमाच्या पाकिस्तानने वेळोवेळी केलेल्या भंगाचे उल्लेखही वगळल्याचे मॅकमरे यांनी नंतर कबूल केले. म्हणजे या अधिकार्‍यांनी राष्ट्राध्यक्षांना पाकिस्तान व त्यांच्या अण्वस्त्रप्रकल्पाबद्दल जे सांगितले होते ते हेच कीं पाकिस्तानची आर्थिक व ल्ष्करी मदत चालू ठेवल्यास पाकिस्तान संयमाने वागेल. पण या फसवाफसवीचा आणखी एक भयंकर परिणाम झाला तो हा कीं पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेचा व त्या राष्ट्राच्या कर्तृत्वाचा चुकीचा अंदाज समजल्याने क्यूबा येथील अण्वस्त्रविषयक आणीबाणीनंतर प्रथमच दोन देश (पाकिस्तान व भारत) अणूयुद्धाच्या इतक्या जवळ आले होते.

एकीकडे नोव्हेंबर १९८९ च्या युद्ध सरावानंतर ज. बेग यांनी वृत्तपत्रांच्या वार्ताहारांना बाजूला घेऊन पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेची व पाकिस्तानच्या अण्वस्त्र शस्त्रगाराची ऐटीत माहिती दिली तर दुसरीकडे बेनझीर 'व्हाईट हाऊस'ला खात्री देण्यात गुंतल्या होत्या कीं पाकिस्तानच्या अण्वस्त्रप्रकल्पावर त्यांचे पूर्ण नियंत्रण आहे! त्याच महिन्यात ज. बेगही त्यांना भेटायला एक नवे संकट घेऊन आले. त्यांना त्यांनी स्वतः हमीद गुल यांच्या सहकार्याने पूर्वीच तयार केलेली 'काश्मीर मोहीम' सुरू करायची होती.
स्थानीय विघटनवादी लोकांनी काश्मीरमध्ये युद्ध सुरू केले होते व भारताने सैन्याचा क्रूर वापर करून त्याला प्रतिसाद दिला होता. बेग यांनी बेनझीर यांच्यापुढे परिस्थितीचा आढावा ठेवला. बेग यांचे लष्करी हेरखात्याचे निर्देशक मे. ज. जहांगीर करामतही या बैठकीला हजर होते.

जनरल्सना बेनझीर यांच्याकडून लष्कराला सोयीचे असेल त्याप्रमाणे व बेनझीरना पुन्हा न विचारता भारतावर हल्ला करण्याचा अधिकार हवा होता. काश्मिरी स्वातंत्र्यसैनिक(४) पाकिस्तानच्या बाजूने पर्वत ओलांडून भारतात नकळतपणे घुसतील, पाठोपाठ अफगाणिस्तानात लढून कणखर झालेले एक लाख मुजाहिदीन सैनिक घुसतील. पाकिस्तान श्रीनगरचा कबजा घेईल आणि बेनझीरना विजयाचा आणि गौरवाचा मुकुट ल्यायला मिळेल अशी ती बेग यांची योजना होती. बेनझीर म्हणाल्या कीं त्यांना फारच भीती वाटली. जरी त्यांचा काश्मीरच्या मुक्ततेला पाठिंबा असला तरी बेग यांचा द्रष्टेपणा काय होता? त्यांना बेनझीर यांचा सल्ला न घेता युद्धात पडायचे होते. बेनझीरच्या बाजूच्या सर्व सल्लागारांनी बेगना सांगितले कीं युद्धावर मुलकी सरकारचेच नियंत्रण हवे. त्यांची विनंती नाकारण्यात आल्यावर बेग संतापले. त्यांच्या व ISIच्या हातात युद्धाचे 'बटण' देण्यात आले नाहीं, पण बंडखोरीला परवानगी दिली गेली.

बेग यांची आणखी एक जरा संवेदनाशील विनंती होती व ते इतर सर्व लोक खोलीबाहेर जाऊन ते बेनझीर यांच्याबरोबर एकटे असेपर्यंत थांबले. ते म्हणाले कीं काश्मीरमधील बंडाळीला मदत देणे फारच खर्चिक होऊ लागले होते. त्यांना मुजाहिदीनना देण्यासाठी, प्रशिक्षणशिबिरे चालवण्यासाठी, त्यातून बाहेर पडणार्‍या अतिरेक्यांना हत्यारे देण्यासाठी व काश्मीरमध्ये पाठविलेल्या स्वातंत्र्यसैनिकांना(४) शस्त्रें पाठविण्यासाठी पैशाची गरज होती. पाकिस्तान तर कफल्लक परिस्थितीत होता व पाकिस्तानची ३३ टक्के जनता दारिद्र्यरेषेच्या खाली होती! म्हणून बेग यांनी कहूताप्रकल्पातून मिळविलेले तंत्रज्ञान विकून पैसे उभे करण्याचा प्रस्ताव मांडला. बेनझीरना धक्काच बसला! बेग-गुल चांडाळचौकडीला गुपचुप कारभार करून पैसा उभा करायचा होता! त्यांचे म्हणणे होते कीं हा पैसा काळा असेल व कुणाला तो मिळाल्याचे कळणारही नाहीं. अशा तर्‍हेने पैशासाठी अमेरिकेवर किंवा बँकांवर (ज्यांच्याकडून पाकिस्तान कर्ज घेतच होता!) अवलंबून रहाण्याची गरजही उरणार नाही. बेनझीर यांनी विचारले कीं हे तंत्रज्ञान विकत कोण घेईल आणि आज IMF पाकिस्तानला २० कोटी डॉलर्स देते त्याचे काय? आणि दोन-तीन वर्षांत घेणारे पारंगत झाल्यावर पुढे काय?

बेनझीरनी असा ताडकन नकार दिला, पण त्या थक्क होऊन बेग यांच्या धारिष्ट्याबद्दल चिंतन करू लागल्या! बेनझीरना इराणबरोबर झालेल्या चर्चेची/सौद्याची किंवा सौदी अरेबियाला अण्वस्त्रें देण्याच्या आश्वासनाची कांहींच कल्पना नव्हती-पण शंका जरूर होती. कारण ओकलींनी त्यांना कहूताचे तंत्रज्ञ व लष्करी अधिकारी मालवाहू विमानांतून गुपचुपपणे प्रवास करत असल्याची चेतावणी दिली होती.
पण बेग यांच्या काश्मीर मोहिमेला चांगले यश येऊ लागले होते व तिथला उठाव उग्र व रक्तलांछित होऊ लागला होता व निदर्शनें, दबा धरून केलेले छुपे हल्ले व राजकीय वध यांवर भारतीय फौजेचे प्रतिहल्ले आवर घालू शकत नव्हते! या हैदोसामुळे अण्वस्त्रविक्रीचा मुद्दा जरा मागे पडला. भारताने पाकिस्तानवर युद्धात तेल घालत असल्याचा आरोपही केला. १९ जाने. १९९० मध्ये हताश होऊन व संतापून भारताने काश्मीरमध्ये राष्ट्रपती राजवट आणली आणि शेकडो अतिरेक्यांना अटक केली. पाकिस्तानमध्ये ISIने बेनझीर यांच्या अव्यक्त पाठिंब्याने हा लढा तीव्र करून प्रशिक्षण केंद्रांच्या संख्येत आणि सीमा ओलांडून येणार्‍या अतिरेक्यांच्या संख्येत वाढ केली. लाखभर(५) हिंदू जे अद्याप काश्मीरमध्ये रहात होते ते या युद्धामुळे जिवाच्या भीतीने पळाले. मग फारसी भाषा बोलू शकणार्‍या बेग यांनी एकतर्फी निर्णय घेऊन बेनझीर यांच्या परवानगीशिवाय तेहरानला प्रयाण केले, तेही क्रांतिकारी रक्षकांचा पाहुणा(६) म्हणून!

जाण्यापूर्वी ओकली बेगना भेटले होते व त्यावेळी बेग यांची वागणूक त्याना चिंताग्रस्त, फसवी, कावेबाज वाटली. परत आल्यावर मात्र ते बदलले होते! त्यांनी सांगितले कीं त्यांना काश्मीरच्या युद्धात इराणचा पाठिंबा मिळाला असून त्याच्या बदल्यात पाकिस्तान त्यांना त्यांच्या अण्वस्त्रप्रकल्पात मदत करेल. ओकलींना कळेना कीं इराणसारखे तिसर्‍या दर्जाचे लष्कर व हवाईदल असलेले राष्ट्र पाकिस्तानला कसली मदत करणार होते व पाकिस्तान अण्वस्त्रांसारखे धोकादायक तंत्रज्ञान इराणसारख्या अविश्वसनीय शेजार्‍याला काय म्हणून विकायला निघाला आहे! त्यांनी वॉशिंग्टनला पुन्हा एकदा या अण्वस्त्रप्रकरणाबद्दल निकडीचा संदेश पाठवला. पण त्यांना अमेरिकेचे कांहींच प्रत्युत्तर आले नाहीं. ही फारच घातक नजरचूक होती.

बेग यांनी मग ती माहिती आंतरराष्ट्रीय सुरक्षा कारभाराचे उपसंरक्षणमंत्री हॅरी रोवन यांनाही दिली आणि वर ठणकावून सांगितले कीं जर अमेरिकेने पुरेशी मदत देऊ केली नाहीं तर इराणला हे तंत्रज्ञान देण्यावाचून पाकिस्तानला गत्यंतरच उरणार नाहीं. रोवन यांनी उलट दम भरला कीं असे केल्यास पाकिस्तानला त्याची जबरदस्त किंमत मोजावी लागेल. कांहीं दिवसांनी बेग यांनी ही माहिती अमेरिकेच्या Central Commandचे प्रमुख व मध्यपूर्व/दक्षिण आशियाच्या कांहीं भागाची जबाबदारी असलेले ज. नॉर्मन श्वार्त्झकॉफ यांनाही दिली(७).

बेग यांचे वागणे कपटीच वाटत होते! अमेरिकेने दिलेली F-16 विमाने असल्याने त्यांना इराणच्या मदतीची गरज नव्हती. त्यांनी इराणशी चर्चा केली होती काश्मीरमधील जिहादच्या मदतीसाठी रोख पैशाच्या आणि तेलाच्या मोबदल्यात युरेनियमच्य अतिशुद्धीकरणच्या तंत्रज्ञानाच्या विक्रीची!
बेग भारतावरील दबाव वाढवतच राहिले! त्यांनी पकिस्तानच्या संपूर्ण सामर्थ्याचे प्रदर्शनच मांडले. F-16 विमानांवर अण्वस्त्रें चढविली, फ्रान्सनिर्मित मिराज विमानेही तयार केली, जी कांहीं प्रक्षेपणास्त्रें होती त्यांच्यावरही अण्वस्त्रे बसविली व सारे सामर्थ्य 'तय्यार' परिस्थितीला आणले. उद्देश होता कीं पाकिस्तान काश्मीरमध्ये खोड्या काढत असला तरीही भारताने आक्रमणाचा विचार मनात आणू नये!

१९८९च्या डिसेंबरमध्ये अमेरिकेचे नवे राजदूत विल्यम क्लार्क दिल्लीला आले होते. त्यांनाही ही गरम हवा जाणवली. ज्या वेगाने व तीव्रतेने पाकिस्तान काश्मीरमधील हिंसाचार वाढवत होता त्याने अमेरिकेला व भारताला आश्चर्यच वाटले होते!

१९९०च्य मार्चमध्ये भारताने काश्मीरमध्ये दोन लाख सैन्याची जमवाजमव केली होती व दबाव वाढविण्यासाठी राजस्थानच्या वाळवंटातील महाजन येथे लष्करी सरावाची सुरुवात केली! भारताच्या सर्वात जास्त आक्रमक ब्रिगेड्स पाकिस्तानी हद्दीपासून केवळ ५० मैलावर तैनात करण्यात आल्या. १९८७ सालच्या झियांना आक्रमणाची पूर्वतयारी असे वाटून भयभीत केलेल्या "ब्रास टॅक्स" या लष्करी सरावाची आठवण पाकिस्तानला होती, म्हणून त्यांनीही त्यांच्या बाजूला सरावाची तयारी केली व आपल्या चिलखती तुकड्यांची हद्दीलगत जमवाजमव केली. भारताच्या बाजूने युद्धतयारीचा ज्वर चांगलाच चढला होता. विनाउद्देश चढाईची शक्यता लक्षात घेऊन भारतीय लष्कराने आणखी जय्यत तयारी केली.
दुसर्‍या बाजूला ओकलींनाही गरमीची जाणीव झाली होती. १९८९साली बराच आरडा-ओरडा व घोषणा झाल्या होत्या पण १९९०साली मात्र परिस्थिती आणखीच खराब झाली! पाकिस्तानी लष्कराची हिंमत अफगाणिस्तानच्या विजयाने वाढली होती व बंडाळी करण्याचे कौशल्यही वाढले होते. काश्मीरमध्ये दुसरे अफगाणिस्तानच बनतेय् कीं काय अशी रास्त भीती वाटू लागली होती.

पण बार्लोंचा दाबून ठेवलेला अहवाल डिक चेनी यांच्यापर्यंत पोचलाच नसल्याने दोन्ही बाजूच्या राजदूतांना परिस्थितीचे गांभिर्याचे पूर्ण आकलनच झालेले नव्हते. क्लार्क यांना माहिती मिळाली कीं पाकिस्तानी विमाने ज्या हालचाली करीत होती त्या अण्वस्त्र टाकण्याजोग्या हालचाली होत्या पण अशी अण्वस्त्रे असल्याचीच माहिती नसल्याने गोंधळाचे वातावरण होते. ओकलींनी तर ठासून सांगितले कीं F-16वर अण्वस्त्रे बसवण्याची सोय केल्याचा कुठलाही पुरावा त्यांच्या कडे नव्हता!

पण बार्लो व DIAच्या अन्वेषकांना सत्यपरिस्थिती माहीत होती! या सर्वांनी एकत्र येऊन पाकिस्तानच्या वेगाने प्रगती करणार्‍या व क्षेपणास्त्रावर चढविलेल्या किंवा F-16/मिराज विमानांद्वारा मार करण्याची क्षमता असलेल्या अण्वस्त्रप्रकल्पाचे चित्र रेखाटले होते. डिक केर यांच्या म्हणण्याप्रमाणे ही परिस्थिती क्यूबाच्या क्षेपणास्त्राच्या आणीबाणीच्या परिस्थितीपेक्षा जास्त स्फोटक होती!

मग भारताने पाकिस्तानातील प्रशिक्षणकेंद्रे उडविण्याची धमकी दिली! भारताचे सैन्याचे नवे सरसेनापती विश्वनाथ शर्मांनी पाकिस्तानला सांगितले कीं त्याना त्यांच्या पृष्ठभागावर दणदणीत लत्ताप्रहार मिळणार आहे. पण आश्चर्य असे कीं अजूनही पाकिस्तानी लष्करी अधिकारी अगदीच शांत व सद्यपरिस्थितीशी विसंगत वाटावे इतके शांत होते. इराणी सरकारच्या पाठिंब्याचा अर्थ बेगना फारच अर्थपूर्ण वाटला असावा!
जणू एक आव्हान म्हणून बेग यांनी खानसाहेबांना कहूता येथील बंद ठेवलेली सेंट्रीफ्यूजेस पुन्हा सुरू करायला सांगितले. दोन्ही बाजूची सैन्ये जमू लागल्यावर पाकिस्तानचे अतिशुद्धीकृत युरेनियमचे उत्पादनही सुरू झाले. भारत व अमेरिकेला वाकुल्या दाखविण्यासाठी बेग यांनी बेनझीरना खानसाहेबांना "हिलाल-ए-इम्तियाज" हा पाकिस्तानचा दोन नंबरचा मुलकी किताब अर्पण करण्याची विनंती केली व त्यांनी तो तसा केलाही. "पाकिस्तानकडे खानसाहेबांच्या योग्यतेचा नागरिक असल्याचा पाकिस्तानला अभिमान आहे व अशा श्रेष्ठ योग्यतेचे आणखी नागरिक पाकिस्तानमध्ये निर्माण होतील अशी मला आशा आहे. खानसाहेबांनी केलेले अमूल्य योगदान केवळ परमाणूक्षेत्रातच केलेले आहे असे नाही तर इतर क्षेत्रातही केले आहे, मुख्यतः लष्करी साधनसामुग्रीच्या उत्पादनक्षेत्रात!"

बेग यांचा पाकिस्तानचे सर्व अण्वस्त्रविषयक शस्त्रागार उघडपणे दाखविण्याचा मनसुबा ओकलींना माहीत नव्हता तरीही त्यांची काळजी दिवसागणिक वाढत चालली होती. त्यांच्या अतीशय संवदनाक्षम मापकांनी कहूता येथील सेंट्रीफ्यूजेस सुरू झाल्याचे मापले होते. ही युद्धाची तयारी अशाच जोमाने दोन्ही बाजूंनी सुरू राहिली व थांबविली गेली नाहीं तर शरद ऋतूमध्ये युद्ध नक्कीच भडकेल अशी त्यांना भीती वाटु लागली. वॉशिंग्टनने आपल्या उपग्रहांची कक्षा बदलून ते दक्षिण आशियातील घडामोडी तासा-तासाला पाहू लागले. शिवाय डिएगो गार्सिया येथील चोरून पाहू/ऐकू शकणारी यंत्रणाही या भागासाठी कार्यान्वित केली. मेमध्ये परिस्थिती इतकी बिघडली कीं ओकलींनी बेनझीर यांच्याशी संपर्क साधला व सांगितले कीं परिस्थिती वेड लागल्यासारखी हाताबाहेर गेली असून ते नंतर पुन्हा फोन करतील.

बेग व ओकली या दोघांनी नीट माहिती न दिल्यामुळे हताश झालेल्या बेनझीरनी मग त्यांच्या परराष्ट्रमंत्रालयाने योजलेल्या परदेशवारी करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा समितीचे उपसल्लागार रॉबर्ट गेट्स(८) मॉस्कोत शिखरपरिषदेची तयारी करायला गेले होते. जरी पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेची माहिती ओकलींना व रॉबर्ट गेटसना अद्याप नसली तरी बेनझीर यांना न कळविता त्यांना मॉस्कोहून इस्लामाबादला जाण्यास सांगण्यात आले. ते व ओकली असे दोघेच गुलाम इशाक खान व बेग यांना भेटले व गेट्सनी युद्ध झाल्यास काय होईल याचे अतीशय विचारी चित्र त्यांच्यापुढे उभे केले. बेनझीरना फक्त ओकलींनी सांगितले म्हणून व त्यांनी सांगितले तेवढेच कळले. त्या आपल्या परदेशवारीत मग्न होत्या.

ही बोलणी यशस्वी ठरली. गेट्स व ओकलींचा असा विश्वास होता कीं त्यांनी बेगना नीट समजावले तरी होते किंवा बेग यांच्या स्वतःच लक्षात आले होते कीं ते भारताबरोबरचे युद्ध जिंकू शकत नाहींत. बेगनी मात्र "आम्हाला गेट्स यांची जरूरी नव्हती" अशी दर्पोक्तीही केली. "अमेरिकेला जे वाटत होते ते कधीच झाले नसते. पाकिस्तानला भारताशी लढायचे नव्हतेच. पाकिस्तानने कुठे बारीकशी खोडी काढल्यास भारताने पाकिस्तानवर स्वारी करू नये म्हणून पाकिस्तानला फक्त स्वतःची कुवत दाखवायची होती" असे त्यांनी सांगितले.

ओकलींनी बेनझीरना युद्ध टाळल्याबद्दल सांगितले पण पाकिस्तानची अण्वस्त्रसज्जता अमेरिकेत गाजत होती. कहूतात युरेनियम अतिशुद्धीकरण जोरात चालू होते व बेनझीरना कांहीं तरी करणे भाग होते. त्यांनी इशाक खान, डॉ. खान व मुनीर खान यांच्याबरोबर एका बैठकीचा प्रस्ताव मांडला, पण ती बैठक रद्द झाली. बेनझीर यांच्याकडून कुठलेच आश्वासन न मिळाल्यामुळे ओकलींची सहनशक्ती संपत आली होती. ते सतत बेनझीर, इशाक खान व बेगना फोन करून सांगत कीं १ ऑक्टोबर रोजी प्रेस्लर व सोलार्त्झ यांची घटनादुरुस्ती लागू होऊन पाकिस्तानची मदत बंद केली जाईल. बेग म्हणत कीं अण्वस्त्रें पाकिस्तानकडे बर्‍याच वर्षांपासून होती पण अमेरिकेने मदत बंद केली नव्हती, मग आता अशी भाषा का? बेनझीर बैठकीचे प्रस्ताव करत राहिल्या व बैठका पुढे पडत राहिल्या. शेवटी इशाक खान यांनी वेगळाच डावपेच आखला व पाकिस्तानच्या घटनेच्या आठव्या कलमाचा आधार घेऊन ६ ऑगस्ट रोजी बेनझीरना पंतप्रधानपदावरून बडतर्फ केले. तारीखही काळजीपूर्वक निवडण्यात आली होती. त्यापूर्वी तीनच दिवस आधी सद्दाम हुसेन यांनी कुवेतवर आक्रमण केले होते त्यामुळे अमेरिका पूर्णपणे त्यातच गुंतली होती आणि पाकिस्तानातील घटनेकडे तिचे अजीबात लक्ष नव्हते.

बार्लोंच्याविरुद्ध केल्या गेलेल्या (व त्यांना माहीत नसलेल्या) आरोपांची चौकशी-ज्यात त्यांनी भागही घेतला नव्हता-९ मार्च रोजी संपली. त्यात बार्लो पूर्णपणे निर्दोषी ठरले. त्यांचे जुने सुरक्षेबद्दलचे clearances त्यांना परत मिळाले. सुरक्षाविभागाच्या प्रमुखांनी त्यांना सांगितले कीं ते वुल्फोवित्झना भेटून त्यांची पूर्वपदावर फेरनियुक्ती करवतील. पण बार्लोंना काम द्यायला कुणीच तयार नव्हता!
मग बार्लोंनी नवीन वकील केला आणि १९९०च्या शरद ऋतूत त्यांना २०,००० डॉलर्सची नुकसानभरपाईही मिळाली. पण त्यामागे गप्प रहाण्याची अट होती. वकीलाच्या सल्ल्यानुसार त्यांने ती नाकारली व एक नवा उलटमागणीचा दावा लावला. या दाव्याची प्रगती होत असतानाच संरक्षणमंत्रालयाच्या Inspector General कडून पुन्हा अडचण आणली गेली. ते कामासाठी पेंटॅगॉनला गेले पण त्यांच्यावर वॉरंट बजावायला लोक उभे होते! त्यांना सांगण्यात आले कीं Inspector General नी अशी अफवा ऐकली होती कीं OSDच्या उच्च पातळीवर कांहीं गुन्हेगारीचे कारस्थान झाले होते व त्यात बार्लोंचे नाव घेतले जात होते. म्हणून त्यांच्याकडून काय-काय झाले याचा पूर्ण वृत्तांत त्यांना हवा होता.

त्यांनी बार्लोंच्याकडून सर्व माहिती काढून घेतली. परराष्ट्रमंत्रालयाच्या व संरक्षणमंत्रालयाच्या ज्येष्ठ अधिकार्‍यांनी प्रतिनिधीगृहाची कशी दिशाभूल केली, पाकिस्तानच्या अण्वस्त्रसज्जतेबद्दलची व F-16 विमानांच्या अण्वस्त्रवहनक्षमतेसाठी केल्या गेलेल्या फेरबदालांच्याबद्दलची माहिती कशी दडपून ठेवण्यात आली, प्रेस्लर व सोलार्त्झ यांच्या घटनादुरुस्तीच्या अटींचा कसा सतत भंग केला जात होता, बार्लोंना त्यामध्ये कसे उगीचच अडकवण्यात आले होते व नंतर त्यांना दोषमुक्त करण्यात आले, ही रशियासारख्या देशात शोभणारी वर्तणूक त्यांच्याबरोबर अमेरिकेत कशी करण्यात आली होती हे सारे त्यांच्याकडून काढून घेण्यात आले.

सर्व अन्वेषण अधिकारी थक्कच झाले! त्यांनी बार्लोंना सांगितले कीं त्यांनी कांहींही चूक केली नव्हती व ते नियमाप्रमाणे वागले होते. त्यांनी ज्यांनी-ज्यांनी त्यांना छळले होते त्या सर्वांवर गुन्हेगारी आरोप दाखल करावयाची तयारीही केली. पण कुठलेही स्पष्टीकरण न देता वुल्फोवित्झ यांच्या कार्यालयातील घटनांबाबतची ती चौकशी राजनैतिक दबावाखाली रद्द करण्यात आली होती.

बार्लोंचा nervous breakdownच व्हायचा बाकी होता! त्यांनी बिनपगारी रजा घेतली व ते सीअ‍ॅटल येथील त्यांच्या मित्रांना भेटायला गेले. नोकरीची खटपटही चालूच होती. पण नव्या कामाच्या मालकांनी OSD कडे चौकशी केली कीं नोकरी हवेत विरून जायची. त्यांच्या पत्नीने घटस्फोटासाठी अर्ज केला कारण तिला जीवनात स्थैर्य व मुले-बाळे हवी होती. व ते सुख नजीकच्या भविष्यकाळात बार्लोंच्याबरोबर मिळण्याची कांहीच शक्यता नव्हती.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
(१) Office of the Secretary of Defense
(२) हत्फ हे प्रेषक महंमद यानी आपल्या तलवारीला दिलेले नाव होते व या अरबी शब्दाचा अर्थ आहे 'प्राणघातक'!
(२अ) Mobile Launching Pad
(३) पाकिस्तानातील अशा टोकाला गेलेल्या अस्थिरतेची भारताला कल्पनाच नव्हती कां? अशा अस्थिरतेचा फायदा घेऊन कहूताप्रकल्प बेचीराख करण्याची सुवर्णसंधी भारताकडे होती! वाटल्यास इस्रायलची मदतही मागता आली असती. मग आपण या संधीचा फायदा कां घेतला नाहीं?
(४) हा पाकिस्तानचा लाडका शब्दप्रयोग लेखकद्वयींनी वापरला आहे म्हणून मी अनुवादात तो तसाच ठेवला आहे. आपणा सर्व भारतीयांच्या दृष्टीने हे सारे अतिरेकीच!
(५) खरे तर हा आकडा एक लाखाहून खूपच जास्त असणार!
(६) Guest of Revolutionary Guards (यावरूनच या प्रकरणाचे नांव ठेवण्यात आलेले आहे)
(७) एवढा पुरावा असूनही दुसर्‍या बुश यांनी फक्त खानसाहेबांनाच या अण्वस्त्रतंत्रज्ञानाच्य़ा विक्रीबद्दल जबाबदार धरून मुशर्रफसारख्या लबाड नेत्याला clean chit कशी दिली याचे आश्चर्यच वाटते! अमेरिकन नेते इतके मूर्ख कसे असतील?
(८) Deputy National Security Aadviser. आज हेच रॉबर्ट गेट्स अमेरिकेचे संरक्षणमंत्री आहेत.
-------------------------------
सर्व प्रकरणांचे दुवे:
Foreword-Core: http://www.misalpav.com/node/10857
Chapter 1-Angry Young Man: http://www.misalpav.com/node/10935
Chapter 2-Operation Butter Factory: http://www.misalpav.com/node/11039
Chapter 3-In the valley of death: http://www.misalpav.com/node/11139
Chapter 4-Peanuts: http://www.misalpav.com/node/11266
Chapter 5-The Ties That Bind: http://www.misalpav.com/node/11433
Chapter 6-The figment of Zionist Mind: http://www.misalpav.com/node/11738
Chapter 7-A Bomb for the Ummah: http://www.misalpav.com/node/11798
Chapter 8-Pineapple Upside-Down Cake: http://www.misalpav.com/node/11936
Chapter9-The Winking General: http://www.misalpav.com/node/12145
Chapter 10-Gangsters in Bangles: http://www.misalpav.com/node/12224
Chapter 11-Guest of the Revolutionary Guard: http://www.misalpav.com/node/12301
Chapter 12-Project A/B: http://www.misalpav.com/node/12421
-------------------------------

राजकारणमाहितीभाषांतर

प्रतिक्रिया

विकास's picture

13 May 2010 - 9:13 am | विकास

खालील दुवा वाचनीय आहे:

With friends like these: Elements in Pakistan's intelligence service "involved in Times Square plot"

--------------------------------
मी या आणि इतर संकेतस्थळावर केवळ "विकास" याच नावाने वावरतो. त्याच्या मागेपुढे उभ्या (||) आडव्या (=), तिरप्या (\\ //) आदी कुठल्याच प्रकाराच्या रेषा नसतात. त्या अर्थाने माझी कुठेही शाखा नाही. :-)

श्रावण मोडक's picture

13 May 2010 - 10:40 am | श्रावण मोडक

क्रांतीकारी रक्षक? म्हणजे? रिव्होल्यूशनरी गार्ड्सचे भाषांतर म्हणून ठीक. पण... खटकतंच.

सुधीर काळे's picture

13 May 2010 - 6:44 pm | सुधीर काळे

याहून चांगला प्रतिशब्द हवा आहे. खूप डोके खाजवूनही सुचला नाहीं म्हणून हा वापरला आहे. शोध चालू आहे! आपल्याला सुचल्यास जरूर सांगावा म्हणजे 'सकाळ'ला पाठवतांना बदलेन!!
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत !
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

Dhananjay Borgaonkar's picture

13 May 2010 - 11:55 am | Dhananjay Borgaonkar

सुंदर लेख. बरीच माहिती मिळाली.
काका तुम्ही एके ठिकाणी अस ननुद केल आहे की
ही विमाने रेगन-झिया करारातील एकूण ४० विमानविक्रीच्या कराराचा भाग होती व ती पाकिस्तानने सोविएत सैन्याबरोबरचे युद्ध चालूच ठेवण्यासाठी दिली गेली होती

पण पाकिस्तानच आणि रशियाच कधीच युद्ध झाल नव्हत. अफगाण आणी रशिया युद्धा त्यांनी अप्रत्यक्षपणे अफगाणिस्तानला मदत केली होती. मग असे असताना एड्रियन लेव्ही आणि कॅथरीन स्कॉट यांनी अस का लिहिल?

पाकिस्तानातील अशा टोकाला गेलेल्या अस्थिरतेची भारताला कल्पनाच नव्हती कां? अशा अस्थिरतेचा फायदा घेऊन कहूताप्रकल्प बेचीराख करण्याची सुवर्णसंधी भारताकडे होती! वाटल्यास इस्रायलची मदतही मागता आली असती. मग आपण या संधीचा फायदा कां घेतला नाहीं?

आपण अजुन एक संधी सोडली ती म्हणजे कारगील युद्धात LOC क्रॉस करुन सर्व अतिरेकी तळ उद्वस्त करण्याची.

भारत आणि पाकिस्तान हा ईश्यु किती दिवस रहाणार आहे काय माहित.

१) पाकिस्तान (व पाकिस्तानमार्फत अमेरिका) अफगाणिस्तानमध्ये ज्याला proxy war म्हणतात तसले युद्ध लढत होते. म्हणजे "मी कुठं कांहीं केलं" असं म्हणत म्हणत अप्रत्यक्ष युद्ध करायचं. (असंच युद्ध पाकिस्तान आपल्याबरोबर अतिरेक्यांमार्फत खेळत आहे.)
जोवर पाकिस्तान यात होता तोवर अमेरिकन रक्त न सांडता परस्पर सोविएत महासंघाची वाट लावायची असा अमेरिकेचा plan होता. म्हणून पाकिस्तानला लढत ठेवण्यासाठी लागतील तशा तडजोडी (compromises) रेगननी केल्या व आज पाकिस्तानला अमेरिकेच्या छाताडावर नाचण्यायोग्य बनवला.
मी जे पहातो ते हे कीं पाकिस्तानच्या थेट/छुप्या (बिचार्‍या) 'शिपुरड्यां'नी रक्त सांडले, त्यांच्या (अक्षरशः) जिवावर अमेरिकेचे ३० टक्के पैसे लष्करी अधिकार्‍यांनी 'खाल्ले' (हे पुढे या पुस्तकात आले आहे), बरेचसे पाकिस्तानने भारताशी लढण्याची बरोबरी करण्यासाठी वापरले व उरलेले खर्‍या कारणासाठी वापरले.
२) खरं तर आपण जात्याच भित्रे आहोत. म्हणून तर जिवावर येईपर्यंत शांतीची जपमाळ ओढत बसतो. पाकिस्तानला हे माहीत आहे म्हणूनच ते अशी शिरजोरी करतात. २६/११ नंतरचा भारताचा भ्याडपणा हा त्यातलाच एक भाग. त्यावेळी भारताने कांहींही केले असते तरी ते जगाने मान्य केले असते!
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.

मदनबाण's picture

13 May 2010 - 2:26 pm | मदनबाण

वा... हा भाग वाचतानाही बरीच माहिती कळाली. :)
बार्लोंचा nervous breakdownच व्हायचा बाकी होता!
प्रामाणिकपणे काम करणार्‍या लोकांची अशीच वाट का लागते हे मला अजुन कळाले नाहीये... :(
आयएसआय नक्की काय चीज आहे हे मला अजुन कळाले नाही...म्हणजे कोण त्यांना फंडींग करतो ? ह्यांचे अधिकारी कोण निवडतो ? इ.

मदनबाण.....

When you are in Love you can't fall asleep because reality is better than your dreams.
Dr Seuss

सुधीर काळे's picture

13 May 2010 - 6:50 pm | सुधीर काळे

ISI म्हणजे एक विलक्षण प्रकार आहे. त्याचा प्रमुख लष्करशाहीत लष्करप्रमुख नेमतो व मुलकी सरकार असताना लष्करप्रमुख ज्याला निवडतो त्याला(च) पंतप्रधान नेमतो असा माझा कयास आहे. विकास यांनी पाठविलेला दुवा अजून वाचला नाहींय्. वाचून नक्कीच जास्त माहिती मिळेल.
सुधीर काळे, पुन्हा विठोबाच्या पंढरीत (वॉशिंग्टन डी. सी.) परत!
------------------------
'ई-सकाळ'वरील फसवणूक मालिकेचे दुवे: प्रकरण तिसरे: http://tinyurl.com/2br29tx
आधीच्या प्रकरणांचे दुवे 'सकाळ'ने लेखाच्या सुरुवातीला दिले आहेत.