पुष्पा २: द रूल् - संक्षिप्त ओळख वगैरे

वामन देशमुख's picture
वामन देशमुख in जनातलं, मनातलं
20 Dec 2024 - 5:46 pm

एकाच आठवड्यात हा सिनेमा मी दोनदा पाहीला. पहिल्यांदा कुटुंबीयांसमवेत हिंदीत एका थेटरात; चार दिवसांनी मित्रांसमवेत तेलुगूत दुसऱ्या एका थेटरात.

पुष्पा १: द राइज् आवडलेला होताच. पुष्पा २: द रूल् अधिकच आवडला.

इतर कोणत्याही लोकप्रिय तेलुगु सिनेमातल्यासारखाच या सिनेमातही प्रचंड मसाला आहे. पराकोटीची साहस दृष्ये, मादक शैलीतील गाणी, कमालीचे इमोशनल प्रसंग आणि शेवटचा अनपेक्षित ट्विट यांनी सिनेमा भरलेला आहे.‌

पृथ्वीतलावरील कोणतेही काम अशक्य नसलेला पुष्पा (अल्लू अर्जुन), तोंडी लावण्यापुरतीपेक्षा किंचित अधिक, पुष्पाची पत्नी श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना), पुष्पाचा जिवलग साथीदार केशव (जगदीश प्रताप भंडारी) आणि इतर कलाकार हे सिनेमाला, "पुष्पा खूपच महान आहे" हे दाखवण्यात मदत करतात.

आपल्या पत्नीवर निरतिशय प्रेम करणारा, तिची कोणतीही इच्छा पूर्ण करण्यास तयार असलेला पुष्पा, "मुख्यमंत्र्यांसोबत आपल्या नवऱ्याचा फोटो घरात असावा" या तिच्या इच्छेखातर राज्याचा मुख्यमंत्री बदलून टाकतो!

हिंदी सिनेमातील कमालीच्या सेक्युलर कथा-दृश्यांच्या पार्श्वभूमीवर, बाहुबली, पुष्पा, कांतारा इत्यादी सिनेमांतील हिंदू धर्म-परंपरेतील, विशेषतः देवळांतील प्रसंगांचे चित्रण मनाला खूप भावते.

याच सिनेमात शेवटी पुष्पा ३: द रॅम्पेज् या पुढच्या सिनेमाची बीजे रोवली आहेत.

सिनेमाप्रेमी मिपाखरांनी, आधी पाहिला नसल्यास हा सिनेमा अवश्य पहावा आणि इथे प्रतिक्रिया लिहायला अशी शिफारस करतो.

(तेलुगु चित्रपट प्रेमी) - द्येस्मुक् राव

संस्कृतीकलानृत्यनाट्यसंगीतधर्मकथामुक्तकचित्रपटछायाचित्रणप्रतिक्रियालेखबातमीअनुभवमतशिफारससल्लामाहिती

प्रतिक्रिया

एकच फार्मुला असतो कारण तोच पाहायला प्रेक्षक येतात.

या मसाल्यातले बरेच चित्रपट निघत असावेत. तसे दोन आम्ही मागच्या वर्षी तमिळनाडू सहलीत बसमध्येच पाहिले होते. प्रवासात पाहण्यासाठी आणि भाषा न कळली तरी चालतात असे. हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

टर्मीनेटर's picture

20 Dec 2024 - 6:48 pm | टर्मीनेटर

हिंदीचे चित्रपट पाहायचे म्हटले तर फक्त हेराफेरी. कुठूनही केव्हाही केव्हाही भाग प्रवासात पाहिला तरी मजा.

कंकाका हिंदीत हेराफेरी१,२, 'अंदाज अपना अपना', धमाल, मुन्नाभाई १,२ आणि जुन्यात 'जाने भी दो यांरो' हे चित्रपट कधीही आणि कुठूनही बघितले तरी कंटाळा येत नाही 😀

बाकी द्येशमुखरावांनी 'संक्षिप्त' नावाखाली एका भव्यदिव्य चित्रपटाचा जो अत्यंत त्रोटक परिचय करून दिला आहे त्यासाठी त्यांचा त्रिवारच नाही तर पंच-षष्ठ वार निषेध...
पुढल्या प्रतिसादांतून आम्हा 'पुष्पा' प्रेमिंची बाजू मांडतो!

कालच दोन्ही मुलगे, सुना, अर्धांगिनी वगैरे मशारनिल्हे चित्रपट बघून आले. मी गेलो नव्हतो. आल्यावर मुलगा म्हणाला की तुम्ही आला असता तर पहिल्या पंधरा मिनिटातच उठून घरी आला असता.

.

टर्मीनेटर's picture

20 Dec 2024 - 6:59 pm | टर्मीनेटर

अक्षरशः खरे आहे... पहिली जवळपास १३-१३.५ मिनिटे हा चित्रपट पाहताना आपण चुकून क्रिश ४, ५, ६ वगैरे किंवा मार्वल वाल्यांचा कुठला सिनेमा बघायला तर आलो नाही ना हा प्रश्न पडतो!
पण ते सगळं स्वप्नात घडल्याचे बघितल्यावर पुढचा चित्रपट पाहण्यासाठी ऊर्जा मिळते आणि ती शेवटपर्यंत कायम राहते... अर्थात सुरुवातीचा तो विलक्षण सीन आणि सगळीच गाणी वगळली असती तर चित्रपटाची लांबी आणि बजेट बऱ्यापैकी कमी झाले असते असे माझे मत!
बाकी चित्रपट मजेदार आहे... आपल्याला बुद्धी आहे की नाही हे तपासण्यासाठी जे लोकं चित्रपट पहायला जात असतील त्यांनी मात्र ह्या चित्रपटापासून दूर राहावे!

चौथा कोनाडा's picture

20 Dec 2024 - 7:04 pm | चौथा कोनाडा

श्रीवल्ली (रश्मिका मादन्ना),

रश्मिका मादक अण्णा म्हणायचे आहे का ? हा .... हा .... हा .... :)

रश्मिका मंदाण्णा असं नाव आहे तिचं ... अशी अण्णा वाली बरीच नावं असतात तिकडं !

सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

टर्मीनेटर's picture

20 Dec 2024 - 7:10 pm | टर्मीनेटर

सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

हरकत नाही... पण चित्रपट शौकीन असाल तर हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

वामन देशमुख's picture

20 Dec 2024 - 8:37 pm | वामन देशमुख

सिनेमाचे तिकिटदर कमी झाले की पुष्पा-२ पाहण्यात येईल असा घरचा आदेश आहे.

आम्हीही पहिल्या दिवशी तिकिटे जास्त होती म्हणून पाहीला नाही.

खरंतर त्या शोला अपघातानेच गेलो.

आमच्या अहोंना आणि त्यांच्या मैत्रिणींना मिळून हा सिनेमा तेलुगुत १३ डिसेम्बर ला पाहायचा होता. त्यांच्यासाठी तिकीट मी बुक केले ते चुकून हिंदीचे. ते लोक घरून निघायच्या वेळी ते लक्षात आले. मग त्यांनी बेत रद्द करून, आम्ही म्हणजे मी, अहो, अपत्ये आणि आई असे पाच जण गेलो. तिसऱ्या दिवशी १५ डिसेम्बर रोजी मी आणि माझे मित्र असे संध्याकाळी मस्त टुल्ल होऊन रात्रीच्या शोला गेलो. परत येताना पुन्हा टुल्ल होऊन, जेवण करून घरी दोन वाजता परतलो.

घरी आल्यावर झोप येत नव्हती म्हणून पुन्हा पुष्पा १ ओटीटीवर पाहीला. पहाटे साडेपाचला झोपी गेलो.

... हा Wild fire चित्रपट मोठ्या पडद्यावरच बघा अशी विनंती!

अगदी अगदी!

"पुष्पा अंटे फायर कादू, पुष्पा अंटे वाइल्ड फायर !" आणि मग दाढीवर दोन्ही उलटे हात फिरवणे हे पाहण्याची मजा मोठ्या पडद्यावरच आहे.

चौथा कोनाडा's picture

21 Dec 2024 - 7:25 pm | चौथा कोनाडा

येस्स .... या विकांताला आम्ही टवाळखोर मित्र "मई झुकेगा नई स्साला" म्हणत मल्टीप्लेक्क्स्ची वारी करणार आहोत !

वामन देशमुख's picture

20 Dec 2024 - 8:58 pm | वामन देशमुख

विशेषतः सणवार, उत्सव वगैरे बाबतीत आंध्र-तेलंगणा संस्कृती खूपच वैविध्यपूर्ण आहे. वीसपंचवीस तोळे सोन्याचे दागिने सहजच घालणाऱ्या स्त्रियांचा रुबाब, मोगरा-अबोली-गजरे माळलेल्या तरुणींची लगबग, हाफ साडी नेसलेल्या मुलींची धावपळ, रामराजचे पांढरेशुभ्र शर्ट-पंचा नेसलेल्या पुरुषांचा दरारा, नाना वेष धारण केलेल्या कलाकारांची विविध पारंपारीक रुपे, सात्विक तेजस्वी पंडित लोकांचे शास्त्रशुद्ध मंत्रोच्चार... आंब्याची तोरणे, नारळे, हळद, कुंकू, अक्षता, फळे, फुले यांची रेलचेल...

पुष्पा २ (आणि इतरही अनेक सिनेमांतून) हे सर्व आणि अजूनही बरेच काही सविस्तर पाहायला मिळते.

---

अवांतर: हे आवडणाऱ्या लोकांनी विशेषतः नवरात्रात तेलंगणात आणि संक्रांतीला आंध्रात पर्यटन करायला हवे. कधी योग आला तर एखाद्या देवळाच्या ध्वजस्तंभ पायाभरणी कार्यक्रमाला हजेरी लावायला हवी.

सौन्दर्य's picture

21 Dec 2024 - 4:18 am | सौन्दर्य

कालच ओटीपीवर हा सिनेमा पाहिला, मुद्दाम हाच पाहायचा अस काही नव्हतं, समोर आला आणि पहिला इतकंच .
पूर्वीच्या सिनेमात हिरो सुरवातीला कितीही वाईट असला तरी शेवटी तो सुधरतो असे दाखवले जायचे जे प्रेक्षकांना भावायचं, आता गुन्हेगारीचे उदात्तीकरण लोकांना आवडतं हे बघून आपण म्हातारे होत चाललो आहोत हे जाणवले. चालायचंच , कालाय तस्मे नमः

चित्रपट म्हणजे समाजाचा आरसा . आता खलनायक नायक म्हणून समोर येत आहे आणि पोलीस खलनायक दाखवला गेला आहे. अॅनिमल चित्रपट आठवतो आहे का?
म्हणजेच समाजात खलनायक प्रवृत्ती वाढत आहे, आणि वाढतच जाणार

चित्रपटात सर्व काही पत्नीच्या इच्छेखातर असे दाखवण्यात आले आहे. feelings पण तिची असेल तर .... लगेच ....

१ - 'पुष्पा: द राईज' - जगभरातील एकूण ढोबळ कमाई = ३९३.५० कोटी रुपये!
"पुष्पा नाम सुनकर फ्लॉवर समझे क्या? फ्लॉवर नहीं... फायर हैं" 🙂

२ - 'पुष्पा: द रुल' - ५ डिसेंबरला प्रदर्शित झाल्यापासून काल (२४ डिसेंबर) पर्यंतची २० दिवसांतली चित्रपटाची भारतातील ढोबळ कमाई = १०८९.८५ कोटी रुपये!
"पुष्पा फ्लॉवर नहीं... वाइल्ड फायर हैं" 😘
आणि,
जगभरातील एकूण ढोबळ कमाई = १६२५.३१ कोटी रुपये!
"पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं" 😍

३ - 'पुष्पा: द रॅम्पेज' - हा (आगामी) तिसरा भाग पहिल्या दोन भागांप्रमाणे व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी होईल कि नाही हे पुढे कळेलच, पण तो बघायची प्रचंड उत्सुकता मात्र लागून राहिली आहे! दुसऱ्या भागासाठी तब्बल तीन वर्षे वाट पाहावी लागली... तिसऱ्या भागासाठी तरी फार प्रतीक्षा करावी लागू नये ही अपेक्षा 😎

अवांतर: रविवारी 'मुफासा: द लायन किंग' पाहिला, खूप आवडला... करमणूकीच्या दृष्टीने वर्षाखेर * चांगली झाली 👌
२० डिसेंबरला प्रदर्शित झालेल्या ह्या सुंदर अ‍ॅनिमेटेड चित्रपटाला भरघोस प्रतिसाद देत त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या 'वनवास' हा उत्कर्ष शर्मा आणि नाना पाटेकर ह्यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या भावनाप्रधान चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचे पाहिल्यावर 'चित्रपट माध्यम' आणि त्यातल्या 'मनोरंजन मुल्या' कडे पाहण्याचा भारतीय प्रेक्षकांचा दृष्टिकोन सकारात्मकरित्या बदलत असल्याची सुखद जाणीव झाली 👍

२०२४ च्या नोव्हेंबर आणि डिसेंबर ह्या शेवटच्या दोन महिन्यात 'सिंघम अगेन' आणि 'भूल भुलैया ३' ह्या दोन ट्रिक्वेल चित्रपटांनी अनुक्रमे साफ निराशा आणि थोडेफार मनोरंजन केले, तर 'ग्लॅडिएटर २', 'मोआना २', 'पुष्पा: द रुल' आणि 'मुफासा: द लायन किंग' अशा अनुक्रमे तीन सिक्वेल आणि एका प्रिक्वेलने झकास करमणूक केली! २०२५ ह्या येत्या वर्षात अनेक चांगले करमणूकप्रधान चित्रपट रसिकांना पहायला मिळोत अशी मनोरंजनाच्या देवाकडे प्रार्थना 🙏

(*आज प्रदर्शित झालेला 'बेबी जॉन' हा हिंदी चित्रपट २०१६ च्या 'थेरी' ह्या तामिळ चित्रपटाचा रिमेक असुन तो पुर्वीच पाहुन झाला आहे हे एक कारण आणि वरुण धवन आणि किर्ती सुरेश हे दोन्ही कलवंत आवडत नाहीत हे दुसरे कारण असल्याने बेबी जॉन बघण्यात रस नाही त्यामुळे नविन चित्रपट बघण्याच्या दृष्टीने माझ्यासाठी हे वर्ष संपले आहे.)

वामन देशमुख's picture

26 Dec 2024 - 12:45 pm | वामन देशमुख

"पुष्पा को नॅशनल खिलाडी समझे क्या?... इंटरनॅशनल हैं"