मिपावर आल्यावर आमच्या संगीताबद्दलच्या ज्ञानात बरीच मौलिक भर पडली. म्हणजे आधी आम्ही अगदी औरंगजेब जरी नसलो तरी त्याच्या एखाद्या 'टियर २' सरदाराच्या जवळपास जायचो. पण आय्च्यान सांगतो.. तात्यांची बसंतचं लग्न ही लेखमालिका वाचली अन उत्सुकता आणि त्याबरोबर गोडी वाढत गेली. पण मूळचा पहिलवानी पिंड जाणार कसा हो? एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं !
अहो आमच्या क्रीडाक्षेत्रातदेखील काय एकसे एक कलाकार आहेत म्हणून सांगू? कित्येकांना "बघणं" आमच्या नशीबात नव्हतं पण आजही क्रीडाक्षेत्रात असे कलाकार आहेत ज्यांच्याबद्दल आम्ही आमच्या नातवंडांना सांगू 'अरे आमचा सौरव गांगुली सात-सात फील्डर असताना कव्हर्समधून फोर मारायचा'...'अरे आमच्या अक्रम-वकार पुढे तुमचे आजचे बोलर्स बच्चे आहेत बच्चे... ' अरे तो बेकर बघशील तर ६ फूट ४ इंच उंच..... पण काय चित्त्यासारखा डाईव्ह मारायचा कोर्टवर' ! आणि आमची नातवंडं डोळे मोठ्ठे करून (मनातून हसत) आम्हाला विचारतील "आजोबा खरंच???"
तुम्हाला अश्याच काही "कलाकृतींची" आठवण (आणि अजाणत्यांसाठी ओळख) करून द्यायची आहे !
पहिला मान अर्थातच आमच्या साहेबांचा ! किती आणि काय बोलावं साहेबांबद्दल? मिसरूड फुटायच्या वयात साहेब भल्या भल्या गोलंदाजांना 'फोडत' होते. उणीपुरी २ दशकं झाली साहेबांना आंतरराष्ट्रीय स्तरावर... पण आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीनंदेखील जगातला कोणताही संघ त्यांना "सॉर्ट आऊट" करू शकला नाही. साहेबांनी काळानुरूप आणि संघाच्या गरजेनुसार स्वतःला असं काही बदललं की घडी घडी रूपं बदलणारा नेताजी पालकरच जणू. म्हणूनच घणाघाती हल्ला चढवून प्रतिस्पर्ध्याच्या गोलंदाजीची शकलं उडवणारे साहेबच कधी कधी आपले फटके म्यान करून बचावाचा असा अभेद्य किल्ला उभारतात !
त्यांचीच ही एक कलाकृती.
साहेबांचा 'स्टान्स'च असा की वाटावं आपण डोळे मिटून आण्णांचा खर्जातला षडज ऐकतोय. अतोनात स्थिरता.... बोलरवर रोखलेली नजर.... दोन्ही पायांचा 'बॅलन्स' असा की वादळ आलं तरी माणूस हलणार नाही - "रॉक सॉलिड"...... गदेच्या ताकदीने गदेइतकीच जड बॅट हातात धरलेली - पण आवेश मात्र तो अजिबात नाही .... ब्रेट ली समोरून धावत येतोय... फलंदाजांचा कर्दनकाळ.... वेगाचा बादशहा... 'हा - ये' अश्या अर्थाची वाटावी अशी साहेबांची मानेची हालचाल.....अंपायरच्या जवळून झेप घेऊन ताशी १५० कि मी वेगाने ली चेंडू फेकतो.... "शॉर्ट ऑफ गुडलेग्थ" - ऑफस्टंपच्या किंचित बाहेर टप्पा....पुन्हा टप्प्यानंतर स्लिप्सच्या दिशेनी जाणारा ऑटस्विंगर.... त्यात पर्थच्या खेळपट्टीची ती जास्त उसळी.... अनप्लेयेबल - खेळायला केवळ अशक्य !
पण त्या निमिषार्धात साहेबांचा उजवा पाय किंचित मागे सरकतो.... डावा पाय ऑफस्टंपच्या बाहेर येतो...... गरुडासारखी धारदार नजर चेंडूच्या दिशा आणि टप्प्याचा अचूक अंदाज घेते... पूर्ण संतुलन राखत साहेब चेंडूच्या रेषेत येतात..... बॅट किंचित वर उचलली जाते..... आणि पापणी लवण्याच्या तलवारीच्या पात्यासारखी खाली येते.... डोकं बरोब्बर चेंडूच्या वर येतं.... आणि .... आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी तसे साहेब त्या भयानक चेंडूला चापट मारतात.... आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं.
From Pictures" alt="" />
लाँगऑन आणि लाँगऑफचे क्षेत्ररक्षक एकमेकांकडे असहायपणे बघतात...... चूक ना बोलरची असते.... ना कप्तानाची... ना क्षेत्ररक्षकांची.... पण "साहेब" जेव्हा स्ट्रेटड्राईव्ह मारतात तेव्हा ती देवाची एक योजना असते आपलं अस्तित्त्व दाखवून द्यायची ! देवाचीच ही अजून एक कलाकृती... आणि ह्या कलाकृतीखाली देवाची सही असते....
From Pictures
"सचिन रमेश तेंडूलकर" !
प्रतिक्रिया
15 Oct 2009 - 6:42 pm | टारझन
लेख ठिक आहे , लेख ज्यांच्यावर आहे ... त्या महान व्यक्तिबद्दल नितांत प्रेमही आहे . म्हणूनंच तो "साहेब" हा शब्द खटकला ... प्रेमाने "सच्या" किंवा "तेंडल्या" म्हंटलेलं भारी वाटतं उलट. ते साहेब ऐकलं की कानात घड्याळाच्या गजराचा किर्रर्ररर्र आवाज अंमळ पॅनिक करतो .
-(तेंडल्याचा फॅन) टार्या
15 Oct 2009 - 6:42 pm | प्रशान्त पुरकर
आणि हेच आमचे लाडके राजे जेव्हा सन्घाला नेमकि गरज असते तेव्हा आपले दुसरे रूप दाखवतात..........
15 Oct 2009 - 10:53 pm | शैलेन्द्र
कसोटी व एकदीवसीय सामन्यात मिळुन त्याने साधारन ३०००० धावा केल्या, त्यावेळी अजीबात धावा करु नकोस ,त्यांची गरज नाही असे संघातर्फे आपण लिहुन दिले होतेत का त्याला? आगावच आहे मग "साहेब"..
मुद्दा सचिनच्या बॅटींगच्या रसग्रहनाचा आहे, उपयुक्ततेचा नाही.
4 May 2010 - 12:55 am | भारद्वाज
हे पाहा आणि स्वत:चे अज्ञान दूर करा.....
http://sachinandcritics.com/
जय महाराष्ट्र
4 May 2010 - 1:01 am | मेघवेडा
अप्रतिम वेबसाईट आहे हो!! :) मस्तच!! :)
-- मेघवेडा!
भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो, तू मला शिकवीली गीते..!
4 May 2010 - 10:11 am | विशाल कुलकर्णी
हाण तिच्या मारी, भारद्वाजसाहेब त्वांडंच बंद केलीत की वो.. लै झ्याक, धंकू बर्का..
बाकी टार्याशी सहमत... त्याला सच्या किंवा तेंडल्या हीच नावं वापरायला हवीत. :-)
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
4 May 2010 - 5:35 pm | जे.पी.मॉर्गन
जबर्या वेबसाईट आहे ही. आधीही माहिती होती पण कधी तेंडुलकरवरच्या टीकेला आपण उत्तर द्यावं असं वाटलंच नाही. ज्यांना सचिन आवडत नाही, वा त्याच्यावर जे टीका करतात त्यांच्याबद्दल "जाऊदे बिचारे... देवा त्यांना माफ कर.. ते काय म्हणतात त्यांचं त्यांनाच कळत नाही" ह्या पलिकडे कधी विचार केला नाही.
पण ह्या इसमानी त्या सगळ्या टीका ऑलमोस्ट पर्सनली घेऊन त्यांना उत्तरं दिली आहेत :). मधूनच लाल, मधूनच बोल्ड फाँट.... ह्या गड्याची तळमळच दिसते ही वेबसाईट बघून. सचिनपंथाचा एक सच्चा माळकरी ! ! !
4 May 2010 - 7:40 pm | भारद्वाज
अगदी खरं आहे ते. ज्या भक्ताने हे केले तो आणि इतर भक्तांनी मिळुन orkut वर आपल्या देवाची community लै जबरदस्त पद्ध्तीने हाताळलीये.
http://www.orkut.co.in/Main#Community?cmm=23803
15 Oct 2009 - 7:44 pm | संदीप चित्रे
>> आणि बापानी खांद्यावरच्या पोराला बागेत खेळायला सोडताना त्याच्या ढुंगणावर हलकेच चापट मारावी तसे साहेब त्या भयानक चेंडूला चापट मारतात.... आणि ते कार्टं सुद्धा वारं प्यायल्यागत सुसाट बाउंड्रीलाईनकडे धावत सुटतं.
हे फारच आवडलं... एकदम पर्फेक्ट उपमा दिलीय.
बाकी टार्या म्हणाला तसं 'तेंडल्या'मधे जे प्रेम आहे ते 'साहेब'मधे दिसत नाही राव !
15 Oct 2009 - 8:34 pm | ब्रिटिश टिंग्या
साहेब एकदम कडक!
>>"सच्या" किंवा "तेंडल्या" म्हंटलेलं भारी वाटतं उलट
हॅ हॅ हॅ....आम्ही देवाला टोपणनावाने हाक मारत नाही! तुम्ही मारता इतकचं :)
15 Oct 2009 - 8:47 pm | टारझन
टिंगु, तुझं म्हणजे अगदी "विरोधाला विरोध" असं आहे बघ. असो , तुझा मला राग येत नाही. चालु दे तुझे चड्डीछाप धंदे. बाकी ? आजवर फक्त पवर्याला साहेब म्हणतात असं ऐकत होतो , तेंडल्याला साहेब म्हणनारे एकामागे एक दोन नग सापडले. असो
- मंदिर चाळे
15 Oct 2009 - 10:40 pm | बेसनलाडू
साहेबांना साहेब म्हणण्यात काही गैर नाही. मग ते ठाकरे असोत, पवार किंवा तेंडुलकर. साहेब ही व्यक्ती नाही तर प्रवृत्ती आहे, इतकेच.
बाकी सचिन'साहेबां'बद्दल काय बोलावे. ईश्वराने त्याची करामत दाखवावी आणि आम्हा भक्तगणांनी मंत्रमुग्ध होऊन ती पाहत बसावे, इतकेच.
(सचिनभक्त)बेसनलाडू
15 Oct 2009 - 11:29 pm | चतुरंग
केवळ अशक्य मारलेत! लागोपाठ तीन वेळा ब्रेट ली तुफानी चेंडू टाकतो आणि एकदाही चेहेर्यावरची रेषाही हलू न देता साहेब त्या चेंडूला सणसणत सीमापार धाडतात! पहिला कवर्समधून आणि पुढचे दोन स्ट्रेट!
त्याच्या बॅटचा फॉलोथ्रूसुद्धा इतका नेटका आणि देखणा असतो की हृदयात आनंदाने अक्षरशः कळ येते!
कुठेही बोलरला डोळे दाखवणं नाही, हातवारे नाहीत, बॅट दाखवणं नाही, काही गरजच नाही केवळ उच्च दर्जा!! हॅट्स ऑफ!!
ज्याला मारलं आहे त्या बॉलरने सुद्धा आनंदाने मान डोलवावी की मीच तो भाग्यवान बोलर ज्याचा चेंडू सचिनने असा सीमापार केला! :)
(तेंडल्याचा एसी)चतुरंग
16 Oct 2009 - 7:51 am | सनविवि
वा जे. पी. मॉर्गन 'साहेब', माझी सकाळ एकदम झकास केलीत!
सचिनबद्दल जितके लिहावे तेवढे कमीच आहे. :) हा घ्या त्याचा अजूनेक प्रसिद्ध शॉट - http://www.youtube.com/watch?v=5A3PSnEUJWw&feature=related
16 Oct 2009 - 8:02 am | सहज
एखाद्या संगीतप्रेमीला "टप्पा", "ठुमरी", "पुरिया धनश्री", "तीव्र मध्यम" वगैरे शब्द ऐकून जे काही "कुछ कुछ होता है" फीलिंग येतं ते आम्हाला "शॉर्ट ऑफ गुड्लेंग्थ", "हुक", "स्मॅश", "बॅकहँड क्रॉसकोर्ट", "स्लॅमडंक" वगैरे ऐकून येतं !
:-) सही!
16 Oct 2009 - 8:21 am | नंदन
सुरेख लेख. सचिनचा स्ट्रेट ड्राईव्ह लताबाईंच्या गायकीसारखा - मिनिमल फस, मॅक्झिमम जॉय.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
16 Oct 2009 - 9:11 am | हर्षद आनंदी
हा बघणे म्हण्जे.. म्हणजे.....
पोर्णिमेच्या रात्रीचा तेजोमहालया (ताजमहाल), कोकणकड्यावरचा सुर्यास्त, दीदींचा षड़्ज, अण्णा (भीमसेन जोशींचा) यमन, पहिल्या चुंबनाची गोडी, आणि आणि ..... या सर्व गोष्टींचा अनुभव एकाच वेळी घेणे, त्या आनंदात अखंड डुंबुन जाणे.
16 Oct 2009 - 11:06 am | जे.पी.मॉर्गन
प्रतिक्रियांबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
अहो 'सच्या', 'तेंडल्या', 'भाई'.. सगळी नामावळी वापरून झाली. इतकी वर्षं झाली आमच्या भक्तीला की हे सगळे शब्द थिटे वाटतात. पांडुरंगाला जसे 'विठू' 'माऊली' वगैरे म्हणतात तसे हे 'सच्या', 'तेंडल्या' वगैरे झाले.
त्याचं काय आहे की ह्या देवाची आमची भक्ती गेल्या काही वर्षात जरा जास्त वरच्या पातळीवर गेली आहे. त्यामुळे आम्ही ह्या पांडुरंगाला विठू न म्हणता 'परब्रह्म' म्हणतो इतकेच ! आमच्यासाठी वानखेडेवर (खरंतर जगात कुठेही) चाललेला 'सचिन....सचिन' हा गजर वारीतल्या 'जयजय रामकृष्ण हरी' इतकाच पवित्र ! म्हणून 'साहेब' म्हटले.. बाकी काही नाही ! हा आता हा 'साहेब' शब्द अजून कोण आणि कोणासाठी वापरतात ह्याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. (त्या 'साहेबांना' एका शुभेच्छुकाने "जाणता राजा" संबोधल्याचे ... आणि तेव्हा एक मनुष्यवधाची अतीव इच्छा झाल्याचे पण स्मरते.)
जे. पी.
16 Oct 2009 - 11:13 am | टारझन
खुलाश्याबद्दल धन्यवाद !
तात्या ... सॉरी ... टार्या
16 Oct 2009 - 11:38 am | निशांत५
एकदा कुणितरी म्हंट्ल्याच आटवत ..... मला जर कुणि विचारल देवाच अस्तित्व कुटे आहे? तर मी सांगेन, त्याच एक घर लताजिंच्या गळ्यात आहे, तसच एक घर सचिनच्या Bat मध्ये आहे.
17 Oct 2009 - 12:52 am | मी-सौरभ
जास्त जवळीक पण नही आणी जास्त आदर पण ..............
सौरभ
17 Oct 2009 - 5:18 am | फारएन्ड
मस्त वर्णन आहे!
17 Oct 2009 - 6:22 am | सुधीर काळे
माझी अशी समजूत आहे की सचूचा मीच "चमचाप्रमुख" आहे, पण आज लक्षात आले कीं मला बरेच 'टोकाचे' स्पर्धक आहेत.
पण "लेट-कट"चं वर्णन फारच "सही"!
जीते रहो!
सुधीर
------------------------
देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकतो त्या बदलायची व ज्या गोष्टी मी बदलू शकत नाही त्या स्वीकारण्याची शक्ती व या दोन्हीतला फरक समजण्याइतकी विवेकबुद्धी मला दे!
4 May 2010 - 1:28 am | शुचि
काय चित्रदर्शी मोहमयी वर्णन आहे ... गरुडासारखी नजर ....'हा - ये' अश्या अर्थाची वाटावी अशी साहेबांची मानेची हालचाल .....गदेच्या ताकदीने गदेइतकीच जड बॅट हातात धरलेली - पण आवेश मात्र तो अजिबात नाही वगैरे वगैरे. कोणी योद्धाच जणू.
मस्त! आवडलं.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
विश्वच अवघे ओठा लावून, कुब्जा प्याली तो मुरलीरव
डोळ्यांमधुनी थेंब सुखाचे, हे माझ्यास्तव..हे माझ्यास्तव
4 May 2010 - 8:52 am | जयंत कुलकर्णी
द्वारकानाथसाहेबांच्या पोटावर पाय देणार बहुतेक !
:-)
सुनील गावसकरांबद्दल वाचायला आवडेल. तसेच ज्यांना क्रिकेट मधले कळते त्यांच्यातली ब्रॅडमन "साहेब" आणि सचिन यांची तुलना वाचायला आवडेल.
जयंत कुलकर्णी.
त्यांच्याकडे उत्तर नसते तेव्हा मी गप्प बसतो. त्यांची अडचण होऊ नये म्हणून !
www.omarkhayyaminmarathi.wordpress.com
4 May 2010 - 11:09 am | विशाल कुलकर्णी
खरेच जेपी.. अगदी तुलना नको पण सर डॉन ब्रॅडमन, विक्टर ट्रंपर, क्लॅरी ग्रिमेट, रे लिंडवॉल, बिल ओ'रेली यांच्याबद्दल काही माहिती असेल तर लिहा की. विशेषतः ट्रंपर बद्दल जाणून घ्यायला खुप आवडेल. त्याच्या भन्नाट खेळाबद्दल खुप ऐकलेय पण निस्चित अशी माहिती नाही. अर्धवट तुटलेल्या बॅटने ओल्या, घसरड्या पिचवर त्याने मारलेल्या एका शतकाची गोष्ट ऐकलीय मी. ती खरी आहे का? काय जबरद्स्त माणुस असेल तो.
तसेच रणजीतसिंहजी, दुलीपसिंहजी यांच्याबद्दलही वाचायला आवडेल.
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
4 May 2010 - 5:55 pm | जे.पी.मॉर्गन
नक्की प्रयत्न करीन लिहीण्याचा. फकस्त प्राब्लेम येकच हाये म्हंजी आपन कधी त्यांला खेळताना पघितलं न्हाईयेना.... तेंडल्या म्हंजे कसं.... गुढघ्यायेवडा असल्यापासून बघतोय (त्यो बी न मी बी) :)
पण खरंच ट्रंपर, वूली, लारवूड बद्दल बरंच वाचलंय... पण तुम्ही म्हणता तसं आता लिहिण्याच्या दृष्टीनी परत वाचीने. "हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा" मालिकेत आजच्या खेळाडूंच्या वैशिष्ट्यांचा वेध घ्यायचा प्रयत्न केला होता... आता ह्या कालच्या खेळाडूंबद्दलही लिहीण्याचा प्रयत्न करीन !
जे पी
5 May 2010 - 12:55 pm | विशाल कुलकर्णी
धन्स, वाट बघतोय... अर्थात तुम्ही हवा तेवढा वेळ घ्या पण जरुर लिहा !
सस्नेह
विशाल
*************************************************************
आम्ही इथेही पडीक असतो "ऐसी अक्षरे मेळविन!"
6 May 2010 - 2:36 am | इंटरनेटस्नेही
सचिन तेंडुलकर यांना एकच नाव देता येईल..
मास्टर ब्लास्टर!
--
इंटरनेटप्रेमी.
6 May 2010 - 3:09 am | भारद्वाज
झोपा की हो आता...
गुडनाईट