तिखट विषय, बोथट शब्द

धनंजय's picture
धनंजय in जनातलं, मनातलं
29 Aug 2009 - 8:15 am

मागे इथल्या पुस्तकांच्या जत्रेत नगरसेविका जॅकी स्मिथ यांचे नांव कवितावाचनाच्या फलकावर पाहिले, आणि कुतूहल वाटले. आमच्या या नगरसेविका गेल्याच वर्षी पुन्हा निवडून आल्या होत्या. वाटले, "वा! बाई कविता सुद्धा करतात तर." म्हणून नवकवींचे कवितावाचन ऐकायला तिथेच थांबलो.

नवकवींच्या कविता वाचण्यापेक्षा त्या ऐकाव्यात. कवीला गल्लीतल्या बारीकसारीक गोष्टींबद्दल वाटणारी खरीखुरी आपुलकी छापील पानावर क्षुल्लक वाटू शकते. पण कोरड्या शब्दांत नसतो तो गहिरा भाव आवेशातून जाणवू शकतो. अशाच एकदोन कवींनी कविता म्हटल्या, मला त्या खूप आवडल्या.

जॅकीबाईंची पाळी आली. सभेतली धिटाई, आत्मविश्वास हा राजकारणपटूच्या ठायी असतोच. तरतरीतपणे त्या लाऊडस्पीकरपाशी गेल्या. चिटणिसांनी त्यांची ओळख करून दिली.

मग बाईंनी पहिल्या कवितेचे प्रास्ताविक सांगितले - "आपल्या शहरातल्या स्थितीमुळे मला ही कविता स्फुरली -"

आपण आपल्या गलिच्छ वस्त्यांमध्ये बघतो
सामान्य माणूस दारिद्र्यरेषेखाली राहातो
...
त्याची मुले मॅट्रिकपूर्वीच शाळा सोडतात
ड्रग्स विकून पोटासाठी पैसा जोडतात
...

वगैरे. बाई मोठ्या आवेशाने बोलत होत्या. पण मला असे सारखे वाटत होते, की हेच शब्द मी कित्येक पुढार्‍यांच्या तोंडून आधीही ऐकले आहेत. सुरुवातीला वाटले की "दारिद्र्यरेषा" वगैरे सरकारी शब्द मला खटकत असावेत. पण हे खरे नाही. अर्थ योग्य असेल तर चांगला कवी वाटेल तो शब्द चपखल बसवून देतो. दोष तो नसावा. मग असे वाटले, की कवितेत अहवालछाप कल्लोळ होता, पण अनुभवाची कळकळ नव्हती, हा दोष असावा. म्हणून पुढची "मुलीस उद्देशून" कविता नीट ऐकली :
...
मुली, मी तुझी मैत्रीण नाही, तर मी तुझी आई आहे
मला पोकळ बडबड नको, तुझा आदर मला हवा आहे
"हाय मम्मी" नको, निमूट "व्हय माय" मला हवे आहे
...

अधेड वय झाले की मुला-मुलीशी आईबापांने मैत्री करावी असे बालसंगोपनवाले म्हणतात. बाई त्यांना स्वानुभवातून सांगते आहे, शिस्त म्हणून काही हवी. इथे तर बाईंचा आपला अनुभव आहे, तरी कविता म्हणून का भावत नाही? बाईंच्या आवाजात जरब होती, पण आतडे तुटल्याचे स्वरात जाणवत नव्हते. बंडखोर मुलीबद्दल तणतण मला ऐकू आली, बंड जिव्हारी लागल्यामुळे कठोर झालेल्या आईचा कंप ऐकू आला नाही. हे मुलीला उपचारापुरते दिलेले उपदेशाचे डोस होते, आणि आदली कविता म्हणजे यमके जुळवलेले राजकिय भाषण होते.

काही म्हटले तरी जॅकीबाई म्हणजे साध्या नगरसेविका. राष्ट्रीय पातळीवरच्या पुढार्‍यांची भाषणे लिहिणारे खास लेखक असतात. तशी मदत जॅकीबाईंना कुठे मिळणार? ते सोडा - कवित्वाची हौस तर त्यांना आपणहून होती. शब्दांना काव्यात्म करण्याची जबाबदारी त्यांनी आपणहून स्वीकारली होती. म्हटले तर मला खटकलेल्यापैकी "दारिद्र्यरेषा" हा किती चित्रमय शब्द आहे - समाजाच्या ग्रुप पोर्ट्रेटवर खस्सकन आडवी रेघ ओढावी, आणि गरीब लोकांना खाली वेगळे करावे - किती नाट्य आहे. पण प्रत्यक्षात त्या शब्दातून एक रंगहीन आकडा पुसटसा दिसून लगेच गायब होतो. मुलीला दिलेल्या उपदेशात "खरा आदर" म्हणजे नेमके काय हरवले, काय हवे, ते ठसठसत नाही. साच्यातला कुठलातरी उपदेश शब्दाला शब्द जोडून सांगितल्यासारखे वाटते. शेवटी मला असे जाणवले, की कवितेतील प्रत्येक कडव्याला कंटाळवाणेपणाच्या किड्याने पोखरून पोकळ केले आहे.

खरे बघावे तर हे सगळे कंटाळा येण्यासारखे प्रश्न नव्हेत. "दरिद्री मुलांना ड्रग विकण्याचा मोह होतो. मुला-मुलींना वडील मंडळींचा प्रेमळ धाक हवा." पुन्हा-पुन्हा ऐकल्यामुळे हे मुद्दे टाकाऊ होणारे नव्हेत. तरीसुद्धा तेच ते शब्द ऐकून ऐकून त्यांच्याविषयी भाषा माझ्या हृदयाला भिडेनाशी झालेली आहे. पण समस्या तर अजून सुटलेल्या नाहीत. समस्येशी झटणारे असतात ते थोडेच, हे खरे आहे. पण लोकशाही देशांत बाकी सर्वांचे मतही लोकशिक्षणाने बदलणे आवश्यक असते. पण येथे तर मतपरिवर्तन होण्याआधीच, समाज बदलण्याआधीच कंटाळा येऊन विषय नकोसे होतात. विचारमंथन आणि मतपरिवर्तन व्हावे, पण चर्वितचर्वणामुळे दुर्लक्ष होऊ नये, असे आपल्याला हवे असते. आरोग्य, साथीचे रोग, समाजसुधारणा, या सर्व बाबतीत समस्या सुटायला दशके, शतके लागतात. पण खूप चर्चा झाल्यानंतरही महत्त्वाच्या विषयांबद्दल भाषेची धार दशका-शतकांपर्यंत कायम कशी ठेवावी? हे कोडे शेकडो लोकशाही देशांतल्या हजारो विचारवंतांना सुटलेले नाही. इतक्यांना जमले नाही, मग दोष जोराजोरात बोथट शब्द चालवणार्‍या एकट्या जॅकीबाईंना का द्या?

राजकारणशिक्षणप्रकटनमत

प्रतिक्रिया

मुक्तसुनीत's picture

29 Aug 2009 - 8:37 am | मुक्तसुनीत

धनंजयचा लेख रोचक वाटला. मात्र एक प्रश्न आहे.
आपण अनेकदा असल्या बोथट , उथळ , बटबटीत गोष्टी पाहातो , वाचतो, ऐकतो. मग प्रस्तुत प्रसंगाचाच उल्लेख का करावासा वाटला असावा ? (अर्थात एक गोष्ट नमूद करायला हवीच : बोथट किंवा तीव्र , उथळ किंवा खोल , बटबटीत किंवा तरल या संज्ञा व्यक्तिसापेक्ष आहेत. एखाद्याला जे बटबटीत वाटते दुसर्‍याला तेच प्यार असते.)

बाकी आपल्यापुढे जे प्रश्न आहेत त्यांची परिणामकारक मांडणी कशी करता येईल हा मुद्दा सुद्धा विचार करण्यासारखाच. प्रत्येक काळात प्रत्येक समाजापुढे प्रश्न हे आहेतच. रोजच्या बातम्यांमधून त्यांची झलक आलटून पालटून पहायला ऐकायला मिळते. तर मग कुठल्याही प्रश्नाबद्दल जनजागृती नक्की कशामुळे परिणामकारक होईल असा प्रश्न पडणे समजण्यासारखे आहे.

नंदन's picture

29 Aug 2009 - 9:00 am | नंदन

लेख. लेखाचा विषय आणि मांडणी आवडली. नित्याच्या परिचयामुळे, अतिवापरामुळे घासून गुळगुळीत झालेले; अर्थहीन वाटू शकणारे शब्द आणि हे शब्द योजणार्‍या व्यक्तीबद्दलची किंवा तिच्या व्यवसायामुळे (राजकारणी, व्यावसायिक गायक, नट, आयटी प्रोफेशनल इ.) आपल्या मनात तयार झालेली एक प्रतिमा यामुळे तुम्ही म्हणता तशी भाषेची धार बोथट होत असावी. ह्या दोन कारणांबरोबरच शब्दांचा सैलपणे, व्यापारी किंवा स्वार्थी हेतूसाठी करण्यात येतो अशा आजवरच्या बव्हंशी अनुभवामुळे एकंदरीतच 'हे खोटे, बेगडीच आहे', असं धरून चालण्याकडे कल बनत असावा. असे असले तरी काय सच्चे आहे आणि काय बेगडी याचा निवाडा प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे, पूर्वग्रहांप्रमाणे आणि पिंडाप्रमाणे करत असतो. बटाट्याच्या चाळीचे चिंतन काहींना बेगडी, दिखाऊ वाटतं तर काहींना काळजाला हात घालणारं. तेव्हा शक्यतो सरसकट सामान्यीकरण करण्यात करू नये, असं वाटतं. 'तू न पहचाने तो है ये, तेरी नजरों का कसूर'चे धोरण बर्‍याचदा (अर्थात कायम नव्हे) याबाबत उपयुक्त ठरावं; हे माझं वैयक्तिक मत. वरील धोरणाला अनुसरून ते सार्‍यांनाच पटावे याचा आग्रह नाही.

इतर एका चर्चेत दिलेला 'मादाम बॉव्हरी'तला हा उताराही याच गोष्टीवर भाष्य करतो -

रॉडॉल्फ या परपुरूषाच्या प्रेमात पडलेली कथानायिका आपल्या भावनांची कबुली त्याला देते, तेव्हा बाहेरख्याली स्वभावाच्या त्या जमीनदाराच्या डोक्यात आलेले विचार आणि त्या निमित्ताने फ्लॉबर्टने भाषेच्या दुबळेपणाविषयी केलेलं चिंतन असं -

He could not see - this man of such broad experience - the difference of feeling, beneath the similarity of expression. Because wanton or venal lips had murmured the same words to him, he only half believed in the sincerity of those he was hearing now; to a large extent they should be disregarded, he believed, because such exaggerated language must surely mask commonplace feelings: as if the soul in its fullness did not sometimes overflow into the most barren metaphors, since no one can ever tell the precise measure of his own needs, of his own ideas, of his own pain, and human language is like a cracked kettledrum on which we beat out tunes for bears to dance to, when what we long to do is make music that will move the stars to pity.

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

सुनील's picture

29 Aug 2009 - 12:02 pm | सुनील

वेगळ्या विषयावरील लेख आवडला.

वि. द. घाट्यांनी त्यांच्या एका निबंधात फार सुंदर उदाहरण दिले होते - "स्वप्न साकार झाले", ह्या शब्दप्रयोगाचे!

ज्याने हे शब्द प्रथम वापरले त्याची अनुभूती, आनंद, तृप्तता काही वेगळीच असावी. वर्षानुवर्षे एखाद्या गोष्टीचा ध्यास घ्यावा, परीश्रम करावे आणि नंतर त्याचे गोड फळ मिळावे, तेव्हा असा सुंदर शब्दप्रयोग जन्माला आला असावा.

नंतर नंतर तो शब्दप्रयोग इतका घासून घासून गुळगुळीत झाला, सवंग झाला की, कुणालाही रात्री एखादे फडतूस स्वप्न पडते आणि दुसर्‍या दिवशी ते साकारदेखिल होते!

कीट्स म्हणतो -
O sweet Fancy! let her loose;
Summer's joys are spoilt by use

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

स्वाती दिनेश's picture

29 Aug 2009 - 12:23 pm | स्वाती दिनेश

वेगळ्या विषयावरचा लेख आवडला,
स्वाती

दत्ता काळे's picture

29 Aug 2009 - 1:01 pm | दत्ता काळे

नंदन म्हणतात, त्याप्रमाणे :
असे असले तरी काय सच्चे आहे आणि काय बेगडी याचा निवाडा प्रत्येकजण आपापल्या मगदुराप्रमाणे, पूर्वग्रहांप्रमाणे आणि पिंडाप्रमाणे करत असतो.
तसेच गाठीशी असलेल्या अनुभवांवरसुध्दा -काय सच्चे आहे आणि काय बेगडी - हे मापले जाते.

उदा. खरोखरीच अतिगरीब आर्थिक स्थिती असलेल्या लोकांसाठी काम करणार्‍या संस्थामधले व्रती संस्थाचालक जे काही बोलतात / सुचवतात त्यामागे आख्खे लाभार्थी ( इथे - अतिगरीब लोक )उभे असतात. त्यांचा 'हो' / 'नाही' अगदी ठाम असतो. तात्पर्य कुठल्याही क्षेत्रात त्याचे महत्व जाणून घेऊन अगदी सच्चेपणाने काम करणार्‍यांचा शब्द निर्वाणीचा असतो. त्यात जास्त बोलण्याची गरजच रहात नाही.

विसुनाना's picture

29 Aug 2009 - 2:17 pm | विसुनाना

'कविता' हा विषय बराच गुंतागुंतीचा आहे. जॅकी स्मिथ बाईंच्या कविता कदाचित खरोखरीच्या तळमळीतून जन्मल्या असतील किंवा कदाचित जनसामान्यांच्या त्या विषयांवरच्या भावनांना हात घालून त्याचा राजकीय फायदा उठवण्यासाठी असतील. (इंग्रजीत 'र्‍हेटोरिक' )किंवा कदाचित दोहोंच्या मिश्रणातून जन्मलेल्या असतील.

'अनुभवाची कळकळ' ही थेट अनुभवांतून गेल्याबिगर येत नाही असे अनेकांचे म्हणणे आहे. म्हणूनच आपल्या मराठी भाषेतही "'दलित साहित्य' हा केवळ दलितांनीच लिहीण्याचा साहित्यप्रकार आहे कारण दलितांचे अनुभव इतरांना येणे शक्य नाही "-असे मत अनेक दलित लेखक हिरीरीने मांडत असतात.
त्यावर साहित्यिकाचा 'परकायाप्रवेश' हा किती खरा - किती खोटा असतो यावर चर्चा होऊ शकते. संवेदनशीलता आणि सहृदयता या दोन गुणांची प्रत्येक साहित्यिकाला मूलभूत गरज असते. त्याबरोबरच प्रत्यक्ष अनुभवांची शिदोरी असल्यास त्याला कमीतकमी बेगडी / कृत्रिम साहित्यनिर्मिती करता येते.

अन्यथा निर्माण झालेले साहित्य 'कित्ता गिरवणे' या सदरात मोडते.

हे झाले साहित्यनिर्मितीबाबत. समस्यांबाबत बोलायचे झाल्यास समस्यांची मांडणी त्या समस्येशी प्रत्यक्ष झगडणार्‍या व्यक्तीने केल्यास त्या मांडणीच्या 'अनघड'पणातच त्या समस्येचे कापणारे कंगोरे, घुसमटवणारे कानेकोपरे, ठेचकाळवणारे खाचखळगे (हुश्श! :)) बारकाईने मांडणे शक्य आहे. त्या झगड्याचा अनुभव नसलेल्यांपर्यंत ते अनुभव सामाजिक, आर्थिक, वैचारिक गाळ्ण्यांमधून पोचतात आणि मग त्यांची मांडणी घासून गुळगुळीत झालेल्या शब्दांमधून होते.

समस्या प्रत्यक्ष अनुभवणार्‍या व्यक्तीस समस्या मांडण्यास उद्युक्त केले तर त्या मांडणीची धार बोथट होणार नाही असे वाटते.

सहज's picture

29 Aug 2009 - 5:49 pm | सहज

चांगला विषय, उत्तम लेख, सुंदर प्रतिसाद.

डू द राईट थिंग !

:-)

श्रावण मोडक's picture

29 Aug 2009 - 6:09 pm | श्रावण मोडक

सहमत...
'हमे देखना है' या वाक्याची इतकी खिल्ली नंतर झाली होती की, विकास यांनी दुसऱ्या एका धाग्यात दिलेला ट्रेडमिलचा किस्सा अगदी भविष्यवादी ठरला होता.

प्रकाश घाटपांडे's picture

29 Aug 2009 - 6:31 pm | प्रकाश घाटपांडे

त्यावर साहित्यिकाचा 'परकायाप्रवेश' हा किती खरा - किती खोटा असतो यावर चर्चा होऊ शकते

विद्रोही साहित्यात शब्दांची धार बोथट होउ नये याची पुरेपुर काळजी घेतली जाते. जेधे-जवळकरांच्या साहित्यात धारे ने टिळकांना कापले होते. देशाचे दुष्मन हे जवळकरांचे पुस्तक आठवते
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.

कालिन्दि मुधोळ्कर's picture

29 Aug 2009 - 8:28 pm | कालिन्दि मुधोळ्कर

छान लेख.

कवितांमधून ही बोथटता अधीक जाणवते. कवितेचा भाषिक अवकाश खूप छोटा असल्याने शब्द-गुंफण हा अत्यंत महत्वाचा भाग बनत असेल कदाचित. कधी शब्दांचे रिसायकल केल्याने बोथटता तर कधी तोच-तोच अर्थ्/संदेश दिल्याने.

घाटपांडे म्हणतात त्याप्रमाणे साचेबद्ध झालेल्या शब्दांची/अर्थाची मोडतोड करणे आणि नवी धार तयार करणे हे चांगल्या कवींच्या अभ्यासात मोडते.

भडकमकर मास्तर's picture

30 Aug 2009 - 1:35 am | भडकमकर मास्तर

_____________________________
तरीसुद्धा तेच ते शब्द ऐकून ऐकून त्यांच्याविषयी भाषा माझ्या हृदयाला भिडेनाशी झालेली आहे.
_
वरील वाक्य वाचताना मिस इन्डिया आणि मिस वर्ल्ड स्पर्धेत दिली जाणारी उत्तरं आठवली...
वर्ल्ड पीस, मदर टेरेसा, दैन्य दारिद्र्य, भूक, पाणी प्रश्न... हुशार कमनीय बाहुल्यांची पाठांतरित बडबड...

____________________________
हल्ली प्रातःसमयी ओ सजना बरखा बहार आयी ऐकतो... जय बालाजीजय बालाजी

चित्रा's picture

31 Aug 2009 - 7:20 pm | चित्रा

जे विषय तुमच्यापर्यंत "पोचत" नाहीत, किंवा ज्या विषयांवर बोलूनही काही फायदा होत नाही आहे असे वाटू लागले की ते पोकळ, फोफसे वाटू लागतात. त्यातील रस निघून जातो.
उ. अमेरिकेतील अनेक वर्तमानपत्रे पानांमागून पाने बातम्या देत असतात.
उदा. ही बातमी पहा -
परवाच एका १९ वर्षांच्या मुलाला एका नृत्याच्या कार्यक्रमाला गेला असताना मारले गेले. आता बातमीत याबद्दल असे म्हटले आहे - (यात राईस ही नृत्यकार्यक्रम जेथे आयोजित केला होता त्यांची प्रवक्ती).

Rice called Brown’s death a tragic event. “We’re heartbroken. Our thoughts are with this young man’s family and friends.’’ (हे विचार खरे नसतील का? असतीलही, हे सर्व लोक, ही प्रवक्ती स्त्री या मुलाच्या "वेक"साठी जातील, तिथे अश्रूही ढाळतील इ. विचार मनात आले).

The Dorchester YMCA has canceled all scheduled events until Boston police clear them to continue. (हे बरोबर आहे).

Rice had no word whether security policies would change. “Today we’re dealing with the human loss,’’ she said. (असे कसे? म्हणजे ज्यांनी हा प्रश्न विचारला त्यांना "अशा वेळी" प्रश्न कसा काय विचारला असे वाटावे अशी व्यवस्था केली जात आहे असा विचार मनात आला).

Still, she said, it is important for a community like Dorchester to continue to offer teens and children a place to feel safe off the streets. (म्हणजे तरीही आमचे अस्तित्व टिकवणे हे तुमच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे).

आता खरे प्रश्न असे दिसतात की त्या पार्टीला आलेल्या सर्वांना सुरक्षा-यंत्रणेने तपासून आत पाठवलेले असतानाही या मुलाला कसे मारले, त्याला मारावे असे त्याने काय केले होते, मुलांच्या हाती बंदूका कशा येतात, त्यांना शिक्षण का मिळत नाही इ.. आणि मग प्रश्न पडले आणि त्यासंबंधाने सहानुभूती वाटली तरी त्यात वेळ घालवण्याची इच्छा नाहीशी होते. हे होऊ नये. आणि ज्यांना हे मुद्दे तरीही वेळ घालवण्यासारखे वाटतात अशांच्या प्रयत्नांनी थोडी-थोडी सुधारणा होत राहते किंवा निदान त्यांना काही केल्याचा आनंद मिळत राहतो.

खरे तर बाकीच्यांचीही सहानुभूती नसते असे नाही, पण एखाद्या महत्त्वाच्या प्रश्नावर उपाय सापडत नसल्याने किंवा उपाययोजना नीट अंमलात येत नसल्याचे, लक्षात आल्याने त्यातला रस कमी होतो. आणि एक प्रकारचा डोमिनो इफेक्ट होतो की काय असे काही वाटते. असे होऊ नये यासाठी उपाय काय, तर कळीच्या दुव्यांना प्रश्नावर स्थिर करणे. हे छोटे बदल कसे घडतील हे नियंत्रित करणे.

राजकारणी कवियत्री जॅकीबाईंच्या कवितेचा संदर्भ हा फक्त विषयाकडे जाण्यासाठी वापरलेला धागा आहे. खरा ठसठसणारा सवाल हा 'तीव्र प्रश्नांकडे समाज हळूहळू निश्चितपणाने पाठ फिरवताना दिसतो ते का?' हा आहे.

(सविस्तर प्रतिसादा जरा वेळ देऊन लिहितो.)
चतुरंग