मी आणि श्रावण..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
28 Jul 2009 - 8:43 pm

श्रावण सुरू झाली की, घराघरांतून नॉनव्हेज, अंडी, हेच नव्हे तर काही घरातून कांदा-लसूण सुद्धा हद्द्पार होते. आमच्या घरी कधी श्रावणाच अथवा चातुर्मासाचं स्तोम माजलं नसलं तरी माझी आजी मात्र श्रावण पाळायची. पाळायची म्हणजे कांदा-लसूण खायची नाही. आणि श्रावणात होणार्‍या एकेका सणाची चर्चा सुरू व्हायची.

कोणा नवविवाहीतेची मंगळागौर. श्रावणातला सोमवार म्हणजे मंगळागौरीच्या आदलेदिवशी केलेली शिवलिंगाची पूजा. आणि मग उपास. घरात आजी उपास करायचीच सोमवारी तिच्यामुळे खिचडीसारखा अद्वितिय आणि अवर्णनिय पदार्थ दर सोमवारी मिळायचा खायला. शिवाय आजूबाजूला कोणी ना कोणी नवविहाहीता असायचीच त्यामुळे मंगळवारी सकाळी तिच्या मंगळागौरीच्या पूजेला जायचं . पूजा चालू असताना तिथे होणारा मंत्रघोष, श्री सूक्त आणि एकापेक्षा एक सुंदर आणि सुगंधी फुलांनी होणारी मंगळागौरीची पूजा बघायची. सगळं वातावरण इतकं प्रसन्न... त्या पूजेला बसलेल्या सालंकृत नवविवाहीता... !! पूजा झाली की, त्या मंगळागौरीला सजवायचं वेगवेग्ळ्या फुलापानांची आरास, भोवती रांगोळी.. तिथेच बाजूला प्राजक्ताच्या फुलांनी शिवलिंग बनवायचे. तिथे पुरणाचं जेवण, सांडगे पापड, सुरळीची वडी.. असं सगळं हादडून मग दुपारी जरा जडावल्या पोटाने सुस्तावायचं आणि मग संध्याकाळ्च्या आरतीची तयारी. संध्याकाळी जेवायला मूगाच्या डाळीची खिचडी, वाटली डाळ, टॉमॅटोचं सार, शिरा.. शिवाय तळण. इतक्या वेळेला घरात मूगाच्या डाळीची खिचडी होते पण .. ही मंगळागौरीला संध्याकाळच्या जेवणात असणार्‍या खिचडीसारखी कध्धीच होत नाही. आणि मग नंतर सुरू होतो सकाळपासून ज्याची वाट पहात असतो तो कार्यक्रम म्हणजेच.. मंगळागौर जागवण्याचा कार्यक्रम. इतकी गाणी, इतके उखाणे, इतके खेळ... इतक्या फुगड्या... एकापाठोपाठ बसफुगडी घालत जाणे.. झिम्मा.. त्यातली ती माहेर कस्सं छान आणि सासर कसं कजाग.. हे सांगणारी गाणी.. आणि मग सगळे खेळून दमले की, मग अंताक्षरी म्हणजेच गाण्याच्या भेंड्या. तो धुंद झालेला माहोल कधीच संपू नये असं वाटायचं. दमून भागून रात्री झोपलं की, सकाळी उठून उत्तर पूजा.. आणि मग थालीपीठाचा खमंग नाष्टा. हा झाला श्रावणात अतिउत्साहात चालणारा एक सोहळा. बाहेर ..श्रावणामासि हर्षा मानसी हिरवळ दाटे चोहीकडे.. असा माहोल तर घरात असा खळाळणारा प्रसन्न सोहळा. नक्की काय सुंदर हे सांगणं कठीण.

घराच्या गच्चीतून नुसती नजर टाकली तर लांबवर... नाजूक हिरवट रंगाची लुसलुशीत हिरवळ दिसावी आणि अंगणात पोचावं तर ओलेत्या जमिनीवर प्राजक्ताने पांढर्‍या शेंदरी रंगाचा गालिचा अंथरलेला असावा. मागे बागेत जावे तर जास्वंदी ऐन यौवनात लाल बुंद झालेली असावी आणि स्वस्तिकाचं फूल उगाचच निरागसपणे त्या उंच गेलेल्या जांभळाच्या झाडाकडे बघून ओलसर हसत असावं. आळवाच्या पानावर पावसाने मोत्याचा खजिना साठवलेला असावा आणि पिवळ्सर, लालसर मध्येच डाळिंबी रंगात कर्दळी न्हात असावी. श्रावणावर या सर्वांचं फार फार प्रेम आहे की श्रावणाचं या सर्वांवर? असं वाटल्यास आश्चर्य वाटू नये. थोडं पुढे जावं तर ओल्या मातीत चांदण्या पडल्यासारख्या दिसाव्यात.. हे काय म्हणून पहावं तर नारळाच्या तुर्‍यातली फुलं निखळलेली दिसावी. किती पहावं आणि किती नको.. एका बाजूला निशिगंध उन्मत्त , मदमस्त आपल्याच गुर्मित उभा असावा ..तर एका कोपर्‍यात थोडिशी ओशाळून उभी असलेली गुलाबी आणि जांभळ्या रंगाची कोरांटी काट्यातूनही उठून दिसावी.. आणि वाटावं असं सांगते आहे की, माझ्याकडे सुगंध नाहीये पण माझा रंग बघ ना.. श्रावणाचा हा खेळ गेली कित्येक वर्ष चालू असला तरी दरवेळी श्रावण येताना इतकं नाविन्य कुठून आणतो हेच समजत नाही.

मला नेहमीच श्रावण बुचकळ्यात टाकत आला आहे. तो त्याच्या या रूपामुळे नाही तर मेहंदीमुळे. श्रावणाचा आणि मेहंदीचा असा काय सबंध आहे माहिती नाही पण सगळ्या कविंनीसुद्धा मेहंदीला श्रावणाच्या जोडीनेच कवितेत स्थान दिले. श्रावण आला की आम्ही बहिणी लग्गेच चर्चा करायचो... आता नागपंचमी येणार. मेहंदिच्या तयारीला लागलं पाहिजे. दर श्रावणात न चुकता ही चर्चा होणार. आजकाल मेहंदी कधीही लावली जाते.. आणि अगदी सहज दुकानातून कोनांत भरलेली मेहंदी मिळते त्यामुळे मेहंदी लावण्यात मध्ये तितकं नाविन्य मला तरी नाही वाटत. पण माझ्या लहानपणी जेव्हा आम्ही इचकरंजीत होतो तेव्हा नागपंचमी आली म्हंटलं की मेहंदीचे वेध लागायचे. मग ती मेहंदिची पावडर विकत आणणे. ती वस्त्रगाळ करणे आणि वस्त्र गाळ करण्यासाठी कधी कधी आईची शिफॉनची साडी किंवा बाबांचा स्वच्छ रूमाल घेणे.. वस्त्रगाळ मेहंदी मध्ये कुटलेला कात, लिंबाचा रस आणि चहाचं पाणी घालून हात संपूर्ण मनगटापर्यंत बरबटून सगळ्या गाठी मोडून ती भिजवणे. ती ८ तास झाकून ठेवणे. आणि मग काडेपिटीची काडी अथवा खराट्याची काडी घेऊन जमेल तितकी नाजूक (?)नक्षी काढणे. हाही मंगळागौरी इतकाच उत्साहाचा सोहळा असायचा. मेंदी काढत कित्येक रात्री जागवल्या आहेत. हातावरची मेहंदी वाळायला लागली की त्यावर साखर पाणी लावणे. आणि मग दुसरे दिवशी मेहंदी स्वच्छ पाण्याने धुऊन त्यावर खोबरेल तेल लावणे आणि मग तव्यावर लवंग भाजून त्याची धुरी देणे. तेव्हा मेहंदी खरडून काढून हात पुढचे ३-४ तास पाण्यात घालयचा नाही हे माहिती असूनही कधी ते पथ्य पाळलं गेलं नाही.. किंवा त्याचं तितकं गांभिर्यही नाही समजलं. दिवस जसा चढू लागे तसा मेहंदिचा चढत जाणारा रंग पाहून मनही भरायचं आणि दर ३ मिनिटांनी हात नाकापाशी नेऊन संपूर्ण श्वास भरून मेहंदीचा सुगंध घेताना.. मेहंदीसाठी घेतलेल्या कष्टाचं चीज झाल्याचं समाधान असायचं.
इचलकरंजीत मारवडी समाज खूप आहे.. त्यामुळे शाळेत असलेल्या बाहेती, छाबडा, लाहोटी, शर्मा, चड्डा, लोहिया अशा मैत्रीणींच्या हातावर कोनातून काढलेली अतिनाजूक, जाळिदार आणि गडद्द चॉकलेटी रंगाची मेहंदी पाहून मन त्यांच्या हातावरच कितीतरी वेळ घुटमळायचं. वाटायचं राजस्थानी मेहंदी आपल्यालाही मिळायला हवी आणि कोन बनवता यायला हवा. एकदा एक मारवाडी मैत्रीण मेहेंदीचा कोन घेऊन आली घरातून. तिच्या पुढे जी रांग लागली मेहेंदी काढण्यासाठी.. विचारायलाच नको! माझ्या सगळ्या नातातल्या बहिणी मिळून जेव्हा जेव्हा अशी मेहंदी काढायचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा कोन फेकून देऊन शेवटी खरट्याच्या काड्यांचाच आधार घेतला. आणि मग खरट्याच्या काड्यांनी आपापल्या हातावर मेहंदी काढताना एकेका बहिणीच्या चित्रकलेची कसोटी लागायची. बर्‍याचदा काढायला गेलो मोर आणि झाला घोडा अशी परिस्थिती. मग त्या चित्रांवरून फिदीफिदी हसण.. मग कोणीतरी उठून चिवडा किंवा फरसाणाचा डबा घेऊन यायचा.. मग कोण्या ताईने उठून मस्त चहा करायचा.. आणि मग रिकाम्या असलेल्या हाताने तो चहा आणि फरसाण किंवा चिवडा खायचा. तो पर्यंत सगळ्यांत लहान असलेल्या एखाद्या बहिणीला जिचे दोन्ही हात मेहंदीने भरले आहेत तिला नेमकं बाथरूमला जायचं असायचं.. आणि मग तिला थोडी मदत करायची.. आणि सगळ्यांत कहर् म्हणजे ती छोटी बाहेर आली की अंगठा दाखवत म्हणायची, "ए इथं जरा पुन्हा लाव गं मेहंदी.." की नक्की काय झालं असेल हे लक्षात येऊन पुन्हा हसून हसून मुरकुटी वळायची. मग मध्येच जरा बाहेर अंगणात जाऊन पाय मोकळे करायचे.. आणि पुन्हा मेहंदीचा कार्यक्रम चालू. किती रात्री अशा गेल्या आहेत .... सगळ्या बहिणी जगाच्या कोपर्‍यात कुठे कुठे स्थिरावल्या आहेत.. पण मेहंदी समोर आली की नक्कीच एकमेकीची आठवण होत असते.
हळूहळू मेहंदी नीट काढायला लागलो अगदी.. कोन हातात घेऊन हंस, मोर हे देखणे प्राणी तितक्याच देखण्या नक्षी मध्ये गुंफायला लागलो.. आजपर्यंत घरांत नात्यात जी लग्नं झाली त्या लग्नांत मेहंदिचा सोहळा असाच रंगवला आणि गंधवला. मेहंदी सारखी जिवाभावची रंगेल सखी आपल्या हातावर तांत्रिकपणे जिला आपण ओळ्खतही नाही त्या तोंड उतरलेल्या एखाद्या प्रोफेशनल कडून काढून घेणं हा मला मेहंदिचा अपमान वाटतो. मेहंदी अशी जिवाभाची सखी तितक्याच जिवाभावाच्या सख्यांमध्ये बसून चहाच्या सोबतीने आणि हास्याचे तुषार उडवतच रेखाटली.. रंगली पाहिजे. मेहंदी तांत्रिकपणे नाही तर.. त्या मंतरलेल्या गंधाला भरून घेत काढली पाहिजे. मेहंदिला इतक्या प्रेमाने गोंजारले पाहिजे की, त्या कोनातून अल्लड, अवखळपणे उतरून तितक्याच प्रेमाने ती हातावर विसावली पाहिजे. रंगणारा आणि अख्ख घर दार गंधाळून टाकणारा हा सोहळा अंधाराच्या, चांदण्यांच्या आणि रातराणीच्या साक्षीने रंगला पाहिजे.
आता मिळणार्‍या मेहंदीच्या कोनामध्ये केमिकलचा भार जास्ती वाटतो. हातावर उतरलेली मेहंदी विदेशातून आलेली .. आणि परकी वाटते. अशा मेहंदीला आपला हातावर प्रेमाने कशी उतरवावी? डिझाईनमध्ये अरेबिक सारखे प्रकार आले.. मात्र खराट्याच्या काड्यांनी काढलेल्या घोड्याची सर त्याला कशी यावी!
आजही श्रावण चालू झाल्या बरोबर मला मंगळा गौरीच्या आधी काय आठवली असेल तर मेहंदी. पण आता ती मेहंदीची मैफिलही नाही, तो चहाही नाही आणि खराट्याच्या काड्यांनी रेखलेला घोडारूपी मोरही नाही. आणि ही मैफिल सजवणारी ती माझी सखी पटेलच्या दुकानात थोडी काळसर होऊन , केमिकलच्या भपकार्‍यात ,चक्चकीत कागदाच्या कोनांत अडकून पडलेली.... का कोण जाणे मला तरी ती उदास वाटली.
ही मेहंदी लावून.. तळव्यावर मेहंदीचा अजून रंग ओला... हे गाणं म्हणावं असंही वाटलं नाही.

- प्राजु

हे ठिकाणमांडणीप्रकटनविचार

प्रतिक्रिया

लवंगी's picture

28 Jul 2009 - 10:34 pm | लवंगी

मन कसं प्रसन्न झाल हा लेख वाचुन. लहानपणी पाट्यावर वाटलेली मेहंदि आणी तो जीवाला वेड लावणारा सुगंध.. जीओ प्राजु..

अनामिक's picture

28 Jul 2009 - 10:34 pm | अनामिक

काय सुंदर लिहिलं आहेस गं प्राजु तै! माझी ताई खूप सुंदर मेहंदी काढायची कोन तयार करून... त्यामुळे त्यासाठी चाललेला तिचा खटाटोप, तिच्या जमलेल्या मैत्रीणी, त्यांच्या गप्पा/गोंधळ सगळं डोळ्यासमोर आलं.

-अनामिक

क्रान्ति's picture

28 Jul 2009 - 11:24 pm | क्रान्ति

आवडली प्राजु. मला मेंदीचा वास अगदी वेड्यासारखा आवडतो. खूप छान आठवणी जागवल्यास. मंगळागौरीला, नागपंचमीला मेंदी, नव्या बांगड्या, आणखी काय काय! दुपारी देवळाच्या आवारात झिम्मा, फुगड्या, फेर,झोके खेळणं, मस्त मजा असायची. एरवी चार भिंतीत बंद असलेल्या, घरात कामानेच दमणार्‍या आई-आजीच्या वयाच्या बायका हे खेळ खेळताना पाहिल्या आणि त्यांची मजेदार थट्टामस्करी ऐकली, की इतकं आश्चर्य वाटायचं! उखाणे, गाणी अगदी चंगळ असायची. श्रावण आणि भाद्रपद हे लेकींचे महिने आहेत असं म्हणतात. आता लेकी जवळ नाहीत, त्यामुळे श्रावणातले सणवार सगळे सुनेसुने झालेत. गौरी-गणपतीला त्या आल्या की होईल मेंदीचा कार्यक्रम! :)

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
रूह की शायरी

भाग्यश्री's picture

28 Jul 2009 - 11:32 pm | भाग्यश्री

मस्त लेख! मात्र जरास्सा निराश शेवट नाही आवडला.. सगळा लेख मस्त आनंदी असताना असे नको होते असे वाटले..

मेंदी हा प्रकारच भन्नाट आहे की त्याच्याशी जुळलेल्या लहानपणच्या आठवणी हे काही कळत नाही! परवा नागपंचमीला मी विसरले होते मेंदी काढायची.. तर रात्री झोपेतून उठून काढ्ली! तेव्हा कुठे बरं वाटलं.. :)
तो वास, साखरपाणी लावणे, अधांतरी ठेवून झोपल्यामुळे सकाळी ठणकणारा हात, तरी तितक्याच उत्साहाने सकाळी पहीलं काम कुठलं? तर मेंदी खरवडायचे! :) मग नंतर तासातासाने बघायचे किती रंगली! आणि शेवती ती मरून काळी झाली की खुष व्हायचे!
लहानपणापासूनचा आवडीचा कार्यक्रम! :)

http://www.bhagyashree.co.cc/

बेसनलाडू's picture

28 Jul 2009 - 11:54 pm | बेसनलाडू

आवडले.
(स्मरणशील)बेसनलाडू

टारझन's picture

29 Jul 2009 - 12:28 am | टारझन

ह्हाह्हा !! मजेदार लेख !! मस्त गं प्राजुतै !!!!!!

अवांतर :
तसा "मी आणि श्रावण" , "मी आणि भाद्रपद", "मी आणि चैत्र" , "मी आणि वैषाख","मी आणि माघ" आणि इतर ... अशी बारा भागांची मालिका एकसारखीच लिहील .. मला तर सगळेच दिवस सारखे .. घरच्यांनी सांगनेही सोडून दिलंय ..

-(सदासर्वदा चिकनचापी) टार्जु

ऋषिकेश's picture

29 Jul 2009 - 12:52 am | ऋषिकेश

छान वर्णन.. सख्खी बहिण नसल्याने बायकांच्या राज्यातले हे इतके बारकावे माहित नसले/लक्षात नसले तरी लहानपणापासून (खरंतर लहानपणीच. हल्ली कुठे दिसतंय हे सगळं) बघितलेली आई आणिआजुबाजूच्या काकवांची धावपळ, लगबग आठवली.

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

महेश हतोळकर's picture

29 Jul 2009 - 1:02 pm | महेश हतोळकर

सख्ख्या बहिणी सकट सगळ्याच बाबतीत सहमत. आता आमच्या खटल्या मुळे घरातपण हे सगळं सुरु झालं आहे.

अवांतरः "मेहंदी" पेक्षा "मेंदी" बरं वाटलं असत.
-----------------------------------------------------------------
तुम्ही जिंकलात का हारलात याला काहिच महत्व नाही. मी जिंकलो का हरलो हे महत्वाचे.
-----------------------------------------------------------------

विसोबा खेचर's picture

29 Jul 2009 - 1:14 am | विसोबा खेचर

प्राजू, सुंदर लेख..

तात्या.

दिपाली पाटिल's picture

29 Jul 2009 - 1:44 am | दिपाली पाटिल

अगदी लहानपणी ची आठवण करुन दिलीत... आम्ही बहीणी ही असंच मेहंदी ची पाने आणायचो आणि वाटुन नेहमी एकच डिझाइन म्हणजे स्वस्तिक आणि कमळ काढायचो. :)
वाटायचं राजस्थानी मेहंदी आपल्यालाही मिळायला हवी आणि कोन बनवता यायला हवा.
असं नेहमी वाटायचं पण नेहमी च करायला जाय्चो एक आणि व्हायचं काही भलतंच. पण खुप मजा यायची श्रावणा...
दिपाली :)

पाषाणभेद's picture

29 Jul 2009 - 8:49 am | पाषाणभेद

हेच म्हणतो.
झारखंड, उत्तरप्रदेशचा काही भाग, मध्य प्रदेश चा काही भाग, ओरीसाचा काही भाग, प. बंगालचा काही भाग, नेपाळचा काही भाग मिळून संयुक्त बिहार झाला पाहीजे ही मागणी करणारा पासानभेद उर्फ पथ्थरफोड

श्रीयुत संतोष जोशी's picture

29 Jul 2009 - 10:33 am | श्रीयुत संतोष जोशी

फारच छान लेख.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

आशिष सुर्वे's picture

29 Jul 2009 - 10:37 am | आशिष सुर्वे

प्राजु ताई,
भन्नाट लिहिलेय आपण!!
-
कोकणी फणस

''आयुष्य ही देवाच्या हातची मिसळच जणू.. सुख-दु:खाची!''

पूजादीप's picture

29 Jul 2009 - 12:26 pm | पूजादीप

मला श्रावण म्हटल कि आजही आठवण येते ति दुसर्याच्या बागेतुन चोरुन आणलेल्या फुलांची. रोज आईने वाचलेल्या कहाण्यांची. मेंदी तर आहेच. सुंदर लेख प्राजु.

पर्नल नेने मराठे's picture

29 Jul 2009 - 12:29 pm | पर्नल नेने मराठे

एका बाजूला निशिगंध उन्मत्त , मदमस्त आपल्याच गुर्मित उभा असावा ..तर एका कोपर्‍यात थोडिशी ओशाळून उभी असलेली गुलाबी आणि जांभळ्या रंगाची कोरांटी काट्यातूनही उठून दिसावी..
चुचु

स्वाती दिनेश's picture

29 Jul 2009 - 12:33 pm | स्वाती दिनेश

प्राजु, श्रावण उभा केलास डोळ्यांसमोर..
स्वाती

दिपक's picture

29 Jul 2009 - 12:39 pm | दिपक

काय सुंदर लिहिले आहे.. तिसरा पॅराग्राफ भयंकर आवडला परत परत वाचला. :)

इनोबा म्हणे's picture

29 Jul 2009 - 12:45 pm | इनोबा म्हणे

लेख आवडला.

-चोराच्या मनात 'चांदणी'...तर पोलिसाच्या मनात काय?

नम्रता राणे's picture

29 Jul 2009 - 12:58 pm | नम्रता राणे

खुपच छान!!!!!!!!!!
अप्रतिम!!!!!!!!!!!!!!!!!!!!
सुरेख!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!!
वाचतांना अंगावर अक्षरशः श्रावणधारा बरसल्या..
अस वाटल की बोर्डवर फिरणारे हात थांबवून मेहंदी काढावी आणी ती सुकविणाच्या बहाण्याने दोन तास काही न करता टंगळमंगळ करत रहाव.
प्राजू खरच छान लिहतेस ग ..

शाल्मली's picture

29 Jul 2009 - 1:25 pm | शाल्मली

मस्त लेख लिहिला आहेस!
शेवट एव्हढा निराश का गं केलास?
बाकी एकदम झकास लेख.

--शाल्मली.

सुरेख वर्णन! आमच्याकडे मात्र मेहंदीचा पाला वाटूनच ती लावत असत!!

कुंपणांवरील मेहंदीच्या झुडुपांना बहर येऊ लागे. बारीक पांढुरक्या फुलांचा मंद सुगंध जातायेता लक्ष वेधून घेई. पावसाला सुरू होताच कितीही पाला तोडला तरी नवी पालवी झपाट्याने येत असल्याने भरपूर पाला तोडला जाई. पाट्यावरवंट्यांनी वाटून लेपाची वाडगी भरत. कित्येकदा त्यात थोडी साखरही मिसळली जात असे. चिकटण्यासाठी.

तर्री's picture

29 Jul 2009 - 8:08 pm | तर्री

ऊत्कट...

लिखाळ's picture

29 Jul 2009 - 10:29 pm | लिखाळ

लेख चांगला आहे. पावसासोबत येणार्‍या सणावारांच्या अनुशंगाने अनेक आठवणी रुंजी घालतात. तरारून उठणारी बाग आणि फुलणारी फुले मोह घालणारी.

मेहंदी असा उच्चार सर्व लेखात आणि प्रतिसादांत सुद्धा अनेकांनी केला आहे. अनेक मराठी लोक असा उच्चार करतात असे दिसते. मी तरी मेंदी असाच उच्चार करतो.
-- लिखाळ.
मराठी लँग्वेजचं फ्युचंर मध्ये काय होणार गॉड नोज !

सहज's picture

30 Jul 2009 - 7:11 am | सहज

हेच म्हणतो. (मेंदी)

लेख छान आहे.

स्वाती२'s picture

30 Jul 2009 - 12:01 am | स्वाती२

छान लिहीलयस प्राजु.
>>मेहंदी अशी जिवाभाची सखी तितक्याच जिवाभावाच्या सख्यांमध्ये बसून चहाच्या सोबतीने आणि हास्याचे तुषार उडवतच रेखाटली.. रंगली पाहिजे.
अगदी मनातलं.

आपला अभिजित's picture

30 Jul 2009 - 12:31 am | आपला अभिजित

मस्त गं प्राजु!!

पण `मेहंदी' हा हिंद्याळलेला उल्लेख खटकला. निदान तुझ्याकडून तरी!!!

llपुण्याचे पेशवेll's picture

3 Aug 2009 - 9:40 am | llपुण्याचे पेशवेll

हो बरोबर आहे.. मेंदी हाच शब्द जास्त जवळचा वाटतो.
मेंदी या शब्दाला जो आपलेपणा आहे तो मेहेंदी या शब्दाला नाही. \

असो पण लेख छान वाटला.
पुण्याचे पेशवे
एरवी सगळे कागद सारखेच. फक्त कागदाला अहंकार चिकटला की त्याचे सर्टीफिकेट होते.
Since 1984

विसोबा खेचर's picture

30 Jul 2009 - 8:40 am | विसोबा खेचर

मेहेंदी या शब्दाला जो छान लहेजा आहे तो मेंदी या शब्दाला नाही असं माझं मत आहे..

आपला,
(हिंदीप्रेमी) तात्या.

भोचक's picture

30 Jul 2009 - 12:14 pm | भोचक

तात्या, हे खरंय. बाकी आमच्या उज्जैनास मेहंदी छानच मिळते होय. भरपूर दुकानं आहेत, मेहंदीची. प्राजूताई लेख छानच.

मेंदीने रंगविण्याइतके केसही नसलेला (भोचक)

प्राजु's picture

30 Jul 2009 - 8:54 am | प्राजु

सर्वांचे मनापासून आभार.
मेंदी आणि मेहंदी.. दोन्ही शब्द मला आवडतात. पण खरं सांगायचं तर मेंदी म्हणताना मला चिंधी म्हणल्यासारखं वाटतं.. आणि मी तरी लहानपणापासून मेहंदी असंच म्हणत आले आहे. त्यामुळे मेहंदी हा शब्द अमराठी आहे असं मला अजिबात वाटत नाही. ज्यांना मेंदी आवडतं त्यांनी 'ह' गाळून वाचावं. भावना महत्वाची असं माझं मत आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

अश्विनि३३७९'s picture

30 Jul 2009 - 12:20 pm | अश्विनि३३७९

लहानपणी मावस बहीणी च्या लग्नात मेहेंदी चा केलेला हट्ट आठवला..

विजय नाणेकर's picture

31 Jul 2009 - 10:11 am | विजय नाणेकर

खुपच छान छान लिहीतेस प्राजु ताई.

दत्ता काळे's picture

3 Aug 2009 - 6:53 pm | दत्ता काळे

फार छान लिहिलंय.

यशोधरा's picture

3 Aug 2009 - 8:09 pm | यशोधरा

सुरेख लेख प्राजू! खूपच आवडला!

अन्वय's picture

3 Aug 2009 - 11:05 pm | अन्वय

प्राजू, खरंच सुंदर लिहलंय गं.
त्या मेहेंदीचा ओलावा तुझ्या लेखनातून जाणवला अगदी. तुझ्या शैलीदार लेखनामुळे. असंच लिहित राहा.
खरंच मलाही असंच ओघवतं लिहिता यायलाच हवं.