http://www.misalpav.com/node/8695
http://www.misalpav.com/node/8696
चढवताना दुवे जास्त झाले की काय माहिती नाही, पण त्यामुळे तीन भागांत लेख टंकावा लागला. [दोन वेळा टंकलेला पूर्ण लेख हरवला!]
तर आता अण्णांची गाणी! अपलम चपलम आजही प्रत्येक नृत्यस्पर्धेत ठाण मांडून बसलेलं आहे. किती वर्षं झाली, तरी त्याची गोडी अवीटच आहे! शारदामधलं शामा आणि मीनाकुमारीवर चित्रित हे अप्रतिम गीत ओ चांद जहां वो जायें आज जरी त्याची पार्श्वभूमी मोबाइल युगामुळे बदलली असली, तरी ते गाणं मनात जे घर करून राहिलेलं आहे, ते तिथेच आहे! लताबाई आणि आशाबाई! याच जोडीचं सखी री सुन बोले पपीहा उसपार मिस मेरीमधलं गाणं. मीनाकुमारी आणि जमुना. अप्रतिम बिहाग बरसतोय जसा! त्या सुरेल, मधुर ताना ऐकताना देवाचे आभार मानावेसे वाटतात, की त्यानं आपल्याला श्रवणशक्ती दिली! मंगेशकर घराणं नसतं तर हिंदी चित्रपट संगीताचं काय झालं असतं, देव जाणे!
ओपीजींची रेशमी सलवार कुरता जाली का [नया दौर] कुमकुम आणि मिनू मुमताजवर चित्रित केलेली ठसकेबाज रचना भेंडीच्या खेळात हमखास आठवतेच. तसंच कजरा मुहब्बतवाला [किस्मत] धमाल गाणं! मात्र हे फक्त ऐकायचं गाणं आहे. बायकी अवतारातला विश्वजीत नाचताना पाहून डोळे बंद करावेसे वाटतात. बबिता जरा बरी तरी दिसते! पण गाणं ही ऐकायचीच गोष्ट आहे ना! आशाबाई आणि शमशाद यांचं हे गाणं कमालीचं लोकप्रिय झालंय. [म्हणूनच त्याचे रिमिक्स करून भ्रष्ट नक्कल केली जाते!]
बाबू नामक संगीतकारानं संगीतबद्ध केलेलं गीताजी आणि सुमन कल्याणपूर यांनी गायिलेलं सारा जहां हमारा या चित्रपटातलं एक नाजूक, गोड गाणं "फुलवाबंद महके, देखो लहके डाली डाली" यातल्या दुस-या ओळीत "भंवरा करे फेरे, मोहे घेरे अरी आली" मधल्या 'आली'वर सुमनजींची छोटीशी गोड मोहक मुरकी क्या कहने! तसंच हीरामोतीमधलं भोजपुरी ढंगाचं "कौन रंग मुंगवा कवन रंग मोतिया" हे निरुपा रॉय आणि शुभा खोटे यांचं गाणं मला नेहमीच साधी माणसं मधल्या "राजाच्या रंगम्हाली रानी ही रुसली" या सुलोचना आणि जयश्रीबाई यांच्या गाण्याची आठवण करुन देतं. वसंत देसाई यांच्या सुमधुर संगीतानं आणि बिस्मिलाखांजींच्या सनईनं गाजलेल्या गूंज उठी शहनाई मधलं गीताबाई आणि लताबाई यांचं "अखियां भूल गयी हैं सोना" हे छेडछाड करणारं सुंदर गाणंही याच पठडीतलं. किती गाणी आठवावीत, किती साठवावीत आणि किती ऐकावीत! विविधभारतीच्या भूले बिसरे गीत या रोज सकाळी ६.३० ते ७.३० लागणा-या कार्यक्रमात अशी बरीच अनमोल गाणी ऐकायला मिळतात, आणि सकाळ प्रसन्न होते, दिवस चांगला जातो. पण एरवी ही गाणी बरीच कमी ऐकायला मिळतात.
आणि आता शेवटी अत्यंत अनमोल रत्न! मदनमोहनजींची ही रचना आजकाल खूप कमी ऐकायला मिळते, पण ती ऐकणं म्हणजे केवळ स्वर्गसुख आहे! लताबाई आणि आशाबाईंची पुन्हा एक वेड लावणारी ही अप्रतिम कव्वाली. दुल्हन एक रात की मधली कभी ऐ हकीकत-ए-मुंतजर नजर आ लिबासे-मजाज में . आरंभसंगीतापासून मनाची पकड घेणा-या या गीतातल्या लताबाईंच्या पहिल्या तानेला कशाची उपमा द्यावी, हा गहन प्रश्न आहे! त्या आवाजाला, त्या कलेला 'अन्य नसे उपमान!' एका उर्दू गझलला दिलेलं कव्वालीचं हे रूप इतकं अप्रतिम आहे! आणि या दोघी भगिनींचा खास उर्दू लहजा! कलेजा खलास झाला, अशीच अवस्था हे गीत ऐकल्यावर होते. मदनमोहन खरंच सुरांचे जादुगार होते!
अशी आणखीही बरीच गाणी आहेत, जी मला आठवली नाहीत. त्यात तू-नळीचे व्हिडिओ रिव्हर्स गीअरमध्ये जाऊन पुन्हा धक्का मारून पुढे ढकलावे लागत असल्याने आणि बरीच गाणी तरीही दिसत नसल्याने राहिली आहेत. ती प्रतिसादांतून मिळतीलच याची मला खात्री आहे. दुसरं असं की माझं शास्त्रीय संगीताचं ज्ञान वाचीव आणि ऐकीव माहितीवर आधारित असल्यानं ते अगदी खात्रीशीर नसेल कदाचित. त्याबद्दल मिपावरची तज्ञ मंडळी मार्गदर्शन करतीलच.
प्रतिक्रिया
27 Jul 2009 - 5:59 pm | अनामिक
अनेकानेक सुंदर गाण्यांचे दुवे दिल्याबद्दल (तिनही धाग्यात) क्रान्ति यांचे खूप खूप धन्यवाद! यातली काही गाणी ऐकताना "अरे, हे कसं विसरलो आपण" असं वाटलं, तर २-३ माहीतच नव्हती.
सध्या एम पी ३ उतरवून घेतोय!
-अनामिक
27 Jul 2009 - 9:09 pm | प्राजु
तिनही भाग आवडले.
खूप छान छान गाणी पुन्हा ऐकायला छान वाटलं.
असं वाटलं, की दिवाळीच्या आधीच गोड धोड आणि चटप्टीत पदार्थाचं ताट समोर आलं आहे. :)
जियो!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
27 Jul 2009 - 10:01 pm | टारझन
मस्तं लेखण @!!!!@
क्रांती तै अजुन येउन द्या :प
28 Jul 2009 - 12:30 am | स्वाती२
अग क्रांती, तुझ्यामुळे काय सुरेख गाणी ऐकायला मिळाली.