वत्साला गाऊली | पांथस्था साऊली
बालका माऊली | तसे गुरू आम्हां ||
निर्धनासी धन | अडाण्यासी ज्ञान
दरिद्र्या सन्मान | तसे गुरू आम्हां ||
अन्न भुकेल्याला | जल तृषार्ताला
सुख पीडिताला | तसे गुरू आम्हां ||
गंध चंदनाला | मधु जसा फुला
कंठ कोकिळाला |तसे गुरू आम्हां ||
पथिका निवारा | नौकेला किनारा
संकटी सहारा | तसे गुरू आम्हां ||
शांत आसमंत | पवित्र दिगंत
थोर साधुसंत | तसे गुरू आम्हां ||
तप्त भुईवर | पावसाची सर
भक्ताला ईश्वर | तसे गुरू आम्हां ||
प्रतिक्रिया
7 Jul 2009 - 2:12 pm | पक्या
छान. सोपी सुंदर रचना.
फक्त गाऊली शब्द तितकासा नाही आवडला. गोमाता या अर्थी
गो-माऊली चालेल का?
7 Jul 2009 - 3:08 pm | मदनबाण
व्वा.गुरुपौर्णिमेच्या दिवसाला एक सुंदर कविता वाचायला मिळाली. :)
मदनबाण.....
Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka
7 Jul 2009 - 10:03 pm | प्राजु
आवडली. :)
मस्त जमली आहे.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
8 Jul 2009 - 12:00 am | राघव
भा.पो. :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
9 Jul 2009 - 2:53 pm | मिसळभोक्ता
आमच्या सर्व गुरुजींनी आमच्या पृष्ठभागावर बांबूच्या फोकाने उठवलेल्या वळांची आठवण ताजी आहे. त्यामुळे सदर कविता काल्पनिक आहे, आणि गुरुपौर्णिमा हा दु:खद सण आहे, असे आमचे मत आहे.
-- मिसळभोक्ता
9 Jul 2009 - 4:01 pm | सुबक ठेंगणी
तप्त भुईवर | पावसाची सर
भक्ताला ईश्वर | तसे गुरू आम्हां ||
हे खास आवडले.
बाकी पक्या म्हणतात तसंच गाऊली हा शब्द पटकन कळला नाही त्यामुळे गो-माउली हाच जास्त योग्य वाटतो.