अखेर एकदाचा तो आला! =D> तब्बल ६ ते ८ महिने काहिलीत राहिलेल्या जीवासाठी जरासा का होईना, उतारा घेऊन आला! पण असा अचानक? :? दुपारी १ वाजता ऑफिसमधून ५ मिनिटांच्या रस्त्यावर असलेल्या बँकेत जाऊन येईपर्यंत सगळ्या आयुधांना [पक्षी - सनकोट, स्कार्फ, हातमोजे, बूट इ. इ. ] पुरून उरणा-या उन्हानं निखा-यावर मक्याचं कणीस भाजावं, तसं भाजून काढलं होतं. आल्यावरही पंखे, कूलर, एसी यांना दाद न देणारा प्रचंड उकाडा! ढगाच्या तुकड्याचाही मागमूस नाही!
आणि अचानक ४.३० च्या सुमारास जोरदार वारे वाहू लागले, एकदम अंधारच झाला! गणेश चतुर्थीला गणपती आणायला जाताना एखाद्या दादानं एक जोरदार हाळी मारावी, आणि पाचपन्नास पोरं गोळा करावी, संदलवाल्यानं, ढोलवाल्यानं जोशात वाजवायला सुरुवात करावी आणि पोरांनी हवा तस्सा धुडगुस घालावा, तसं यानं भराभरा काळे ढग गोळा केले, गडगडून ढोलताशे वाजवले आणि केली सुरुवात धिंगाणा घालायला! :) मातीचा गंध मनात भरून गेला! सगळं वातावरणच बदलून गेलं एकदम!
ऐन ऑफिस सुटायच्या वेळेला आला, पण आज त्याचा राग नाही आला. वेधशाळेचा अंदाज होता तो येईल असा, त्यामुळे रेनकोट सोबत ठेवायचं कारण नव्हतं! ;) मग काय! तो इतक्या कौतुकानं आला, आणि त्याच्या जाण्याची वाट पहात बसायचा करंटेपणा कोण करणार? मस्तपैकी गाडीला किक मारली, आणि निघाले भिजत भिजत! म्हटलं, होऊ दे सर्दी झाली तर! या मोसमाचा पहिला वहिला बहुप्रतिक्षित सखा आलाय आणि आपण नाजुकपणा करायचा? ;;) ऑफिसपासून अवघ्या १० मिनिटांच्या अंतरावर असणा-या घरी यायला अर्धा तास लागला. जोर तर भरपूर होता त्याचा, अक्षरशः डोळ्यांवर फटके मारावेत, तसे थेंब पडत होते, निम्मा रस्ता तर डोळे झाकून चालवावी, तशी गाडी चालवली. रस्त्यावर माझ्यासारखेच तुरळक वेडे दुचाकी घेऊन होते, बाकी चारचाकीवाले, आणि रस्ता बराचसा मोकळा! पण आजची ही संधी दवडणं शक्य नव्हतं! चिंब भिजून घरी आले, तर तो थांबूनच गेला! ;)
उद्या कदाचित तो याच वेळेला आला, तर त्याचा राग येईल, त्याच्यापासून वाचण्याची आयुधं बरोबर ठेवायचं संकट वाटेल, रस्त्यावरचं पाणी अंगावर उडवणा-या चारचाकीवाल्याला ठेवणीतल्या शेलक्या विशेषणांनी झाडलं जाईल, ;) पण आजचा त्याचा आनंद वेगळाच! याचं वर्णन करायला सगळ्या भाषांमधले सगळे शब्द अपुरे पडतील!हे माझं वेडंवाकुडं निरुपण त्या लाडक्या सख्या पावसासाठी! :)
प्रतिक्रिया
24 Jun 2009 - 6:55 pm | अनामिक
काय सुंदर लिहिलं आहे क्रान्ति तुम्ही!
अस्संच्या अस्सं हापिसातून उठाव आणि पावसात चिंब चिंब भिजावं वाटतंय!!
खरंच लै लै लक्की आहात तुम्ही!!!
-अनामिक
24 Jun 2009 - 8:34 pm | प्राजु
अफाट!!!
सॉल्लिड!!! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Jun 2009 - 8:59 pm | टारझन
झकास !!!
आपण कधी बाइकवर पावसात चिंब भिजल्यावर बाइकवरच बसून पाणिपुरी खाल्लीये का ? त्यात त्या पाणिपुरीची चव केवळ अप्रतिम लागते .. किवा एखादं भाजलेलं आणि लिंबुमिठ लावलेलं कणीस ?
आहाहा !! पाउस जरी चिडचिड करवणारा वाटला तरी तो केवळ अप्रतिम हो :)
(पावसात चटक-मटक खाणारा) टारझन खाउगुल्ला
24 Jun 2009 - 11:06 pm | संदीप चित्रे
काय मस्त अनुभव आहे :)
>> या मोसमाचा पहिला वहिला बहुप्रतिक्षित सखा आलाय आणि आपण नाजुकपणा करायचा?
य्ये हुई ना बात :)
पु.लं. नी रवीन्द्रनाथांच्या ओळींचा अनुवाद केला होता तो आठवला --
"तो आकाशीचा बाप आपल्या सहस्त्र हातांनी तुम्हाला कुरवाळायला येतोय आणि तुम्ही करंट्यासारखे छत्री, रेनकोट वापरता?"
(शब्दशः अशीच ओळ नसेलही पण अर्थ मात्र हा नक्की !)
24 Jun 2009 - 11:58 pm | रेवती
वा क्रांतीताई!
तू म्हणजे कमालच केलीस!
रेवती
25 Jun 2009 - 12:09 am | बिपिन कार्यकर्ते
जबरदस्त... छोटस्सं पण एकदम मस्त. भन्नाट!!
एक सूचना: तुम्हाला कंटाळा आला तर इकडे पाठवून द्या त्याला.
बिपिन कार्यकर्ते
25 Jun 2009 - 10:37 am | दशानन
भन्नाट.. जबरा क्रांती ताई ... मस्त लिहले आहे... ;)
थोडेसं नवीन !
25 Jun 2009 - 11:03 am | स्वाती दिनेश
मस्त ग... पावसात भिजलेल्या अनेक ओल्याचिंब आठवणी जागवल्यास,:)
स्वाती
25 Jun 2009 - 11:28 am | जागु
क्रांती लेख मस्तच. मी पण आयुध बरोबर ठेवते हल्ली. आज रेनकोट घालूनच आले. नवरोबा पाउस पडत होता म्हणून बसनी जायसाठी सांगत होता पण मी हट्टी. मला पावसात गाई चालवायची म्हणून निघाले. थोडाच पाऊस पडला. हेल्मेटवर पडलेल्या थेंबामुळे हेल्मेट्ची काच उघडीच ठेवली. पाणी तोंडावर पडत होत. मध्येच चिखलामुळे गाडी जड होत होती तेंव्हा भिती वाटत होती पडेल की काय ? पण सुखरुप पोहोचले. मलाही तुझ्यासारखा गाडी चालवतानाचा जोरदार पाउस अनुभवायचा आहे.
25 Jun 2009 - 12:27 pm | घाशीराम कोतवाल १.२
मला पावसात गाई चालवायची
हे कस शक्य आहे बा!! ;) ;)
स्वगत घाश्या जागुताई पावसात गाई कशी चालवणार रे!
गाय तर स्वतःहुन चालते ना!!!
**************************************************************
नकार देण ही कला असेल पण
होकार देऊन काम न करण हिच खरी कला !!! ;)
25 Jun 2009 - 12:40 pm | पक्या
मस्त . छान लिहीले आहे क्रांती ताई.
25 Jun 2009 - 1:04 pm | जागु
कोतवालजी तिथे गाडी वाचा. चुकुन गाई झाले आहे.
25 Jun 2009 - 4:12 pm | नरेंद्र गोळे
क्रांती, सुरेख आणि उत्स्फूर्त लेख.
दीर्घ प्रतीक्षा संपली आणि तो आला |
काहिली उन्हाची चढली आणि तो आला ||
त्या विद्द्युल्लतेला सोबत घेऊन आला |
ते ताशे तडतड, ढोल घेऊनी आला ||
धिंगाणा घालत, गंध मातीचा आला |
मग का न निघावे, त्याला भेटायाला ||
आवेग असा मनी, उत्स्फूर्त गतीने आला |
तो आला, आला, चिंब भिजवुनी गेला ||
अन् तसाच आला, लेखही भिजवायाला |
भिजवून स्मृतींतच, धुंद करूनी गेला ||
25 Jun 2009 - 4:14 pm | सहज
मस्त
:-)