चायपे बुलाया है...(अंतिम)

सुबक ठेंगणी's picture
सुबक ठेंगणी in जनातलं, मनातलं
22 Jun 2009 - 8:50 am

चायपे बुलाया है...(भाग १) इथे वाचा: http://www.misalpav.com/node/8244
__________________________________________________________________________

इथे यजमानांच्या वतीने त्या आजी आणि पाहुण्यांच्या वतीने आमच्यातल्याच एक अनुभवी काकू एवढी दोनच माणसं एकमेकांशी बोलत होती. बाकीचे लोक गंभीर चेहरा करून माना डोलवत होते. चहाचा पत्ताच नव्हता.एवढयात खोलीचा दरवाजा उघडला आणि बदामी हलव्यासारखी दिसणारी गुलाबी मिठाई आली. ती खायला जाणार एवढयात...काहीतरी टोचलं

__________________________________________________________________________
पाहते तर योशिदासान करंगळीएवढया, He-manच्या तलवारीसारख्या दिसणा-या स्टीलच्या आयुधाने मला टोचत होत्या. पाहिलं तर आजूबाजूच्या लोकांनीही किमोनोत दडवलेल्या पाकिटातून आपापल्या तलवारी बाहेर काढल्या होत्या. मंडळी ती मिठाई नाजूकपणे तलवारीने कापून, तिलाच टोचून खात होती. हातातोंडाच्या लढाईला आम्ही तलवार वापरत नाही असं त्यांना सांगावसं वाटलं. पण चहा मिळाल्यावर बोलू म्हणून गप्प बसले. पण बाकी काहीही म्हणा मिठाई दिसायला आणि असायला भलती़च ग्वाssड होती.
(फोटोतली सर्वात डावीकडची मी खाल्लेली. बाकीच्या सगळ्या जालावरून घेतलेल्या!)

आम्ही मिठाई खात असतानाच एक तरूण मुलगी खोलीत आली आणि चहा करायला लागली. यंत्राचं बटण दाबावं तशा तिच्या स्लो-मोशनमधे शिस्तबद्ध हालचाली सुरु झाल्या. प्रथम एका लाल सिल्कच्या कापडाची त्रिकोणी घडी करून चहाचे वाडगे आणि पळी पुसली, वाडग्यात मापाने माच्चाची हिरवी पावडर घातली, काळ्या चिनीमातीच्या बोन्साई रांजणातलं गरम पाणी बांबूच्या पळीने त्या वाडग्यात ओतलं आणि लाकडी चासेनने अंडं फेटावं तसाच पण हळुवारपणे चहा फेटला. तयार झालेला चहाचा वाडगा घड्याळाच्या दिशेने तीन वेळा फिरवला आणि बाजूला ठेऊन दिला. त्याबरोब्बर आज्जी उठल्या आणि तो वाडगा घेऊन पाहुण्यांकडे गेल्या. पाहुण्यांनी तो तीन वेळा आपल्याकडे फिरवून घेतला आणि त्या वाडग्यावरची नक्षी पाहून धन्य झाल्यासारखं दाखवलं. बोलक्या काकूंनी सगळ्यांच्या वतीने वाडगा आवडल्याचं सांगितलं. त्याबरोब्बर आज्जीची वाडगा कोण, कुठला, सध्याच्या ऋतूला तो कसा चांगला आहे ह्याविषयीची कॉमेंट्री सुरु झाली. वास्तविक मी जपानमधेच ह्याच्यापेक्षा कित्तीतरी सुंदर वाडगे पाहिले आहेत. त्या काळ्या वाडग्यात एवढं पाहण्यासारखं काय होतं ते त्या झेनलाच ठाऊक! सगळ्यात शेवटी माझ्यापर्यंत चहा पोचला. तो लहान बाळांच्या फॅरेक्स एवढा घट्ट आणि फेसाळ होता. चव कडुलिंबाच्या रसासारखी होती. लहानपणी चहाच्या आधी क्रीमचं बिस्किट खाल्लं की आई “आता चहा काय गोड लागणार!” असं म्हणायची. आणि इथे नेमकं तेच तत्त्व वापरून चहा पद्धतशीरपणे कडू लागवण्यात आला होता. सगळेजण वाडगा तोंडाला लावून सुर्रकन तो घट्ट चहा शोषून घेत होते. एवढी एकच गोष्ट मात्र मला चांगली जमली. चहा पिऊन झाल्यावर आलेल्या हिरव्या मिशा आणि आपापल्या कपाची उष्टावलेली कड ओल्या टिश्यूने पुसून तो वाडगा परत तीन वेळा फिरवून आज्जींकडे परत दिला. चहा करणा-या काकूंनी मग हळूहळू एक एक करून कप विसळले, चहाची भांडी विसळली, पुसली आणि एकदाचे नमस्कार चमत्कार झाल्यावर आम्ही निघायला मोकळे झालो. इथे एका परिच्छेदात आटपलेली सेरेमनी प्रत्यक्षात मात्र तासभर चालू होती. एक तास वज्रासनात बसून पाय जड होऊन दुखण्याच्या पलिकडे गेले होते. आयुष्यात पहिल्यांदाच “चहा नको पण सेरेमनी आवर” असा मी आपल्या देवाचा धावा केला.

पावडरीपासून काढ्यापर्यंत चहाच्या अवस्था...(हे फोटो जपान वेब मॅगझिनच्या सौजन्याने)
चहा पिण्यासारखा साधा आनंद एवढा अगम्य का वाटावा? का तो सोपा झाला तर त्यातली मजा निघून जाईल? टी सेरेमनी करण्यामागे “इचि गो इचि ए” (一期一会) अशी संकल्पना आहे. म्हणजेच आयुष्यातली प्रत्येक गाठभेट ही एकमेवच असल्याने तिचा प्रत्येक क्षण अनुभवण्यासाठी हा टी सेरेमनीचा खटाटोप. बरोबरच आहे. असा अखंड वज्रासनात बसवून, न बोलता, कडू चहा प्यायला दिला तर ती भेट ही शेवटचीच ठरेल ह्यात काय शंका?

चहाचा मार्ग वगैरे म्हटलं की मला लगेच आठवतो आमचा कॉलेजचा दीक्षित रोड. ’चायला’ ही शिवी न रहाता देणा-याला आणि घेणा-यालाही आनंद वाटावा अशी जागा म्हणजे तो चहावाला. आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची. आमच्या टी. वायच्या वर्गात मोजून नऊ टाळकी होती. तास संपला की चर्चा, मस्करी सगळं फुल्याफुल्यांच्या गाळलेल्या जागा भरून वर्गातून टपरीवर पुढे चालू होई. एकदा तर पावसाळ्यात शेक्सपिअर शिकताना “अत्ता चहा हवा होता बुवा!” असं कुणीतरी म्हणालं तेव्हा कॉलेजच्या आणि टपरीच्या इतिहासात कदाचित पहिल्यांदाच तो चहा टपरी ओलांडून वर्गात आला होता. आणि मग तेव्हापासून आम्ही Tea.Y.B.A. म्हणून ओळखले जायला लागलो. तिथे टपरीवर खिदळणे, गाडयांचे हॉर्न, चहावाल्याने पळीने केलेली ठोकठो्क ह्या सगळ्या गदारोळात चर्चा, रोमान्स, भांडणं, मांडवली, अभ्यास हे सगळं व्यवस्थित चालू असायचं. जप्त झालेली आय. डी., प्रेमभंग सारखी चहाच्या कपातली वादळंही चहानेच थंड व्हायची आणि केट्या सुटल्याचे, थापा पचल्याचे आनंदही चहानेच साजरे केले जायचे. दुःखाचा किंवा आनंदाचाही जास्त बाऊ न करता “कटिंग”वरच ठेवायची फिलॉसोफी त्या टपरीवरच्या चहाने शिकवली. मला खात्री आहे की जपानी टी सेरेमनीतसुद्धा नियमांच्या ऐवजी थोडया दिलखुलास गप्पा असत्या तर तो कडू चहाही नक्कीच गोड झाला असता. आणि ह्या एकमेव भेटीनेच पुढल्या भेटीची ओढ लावली असती.

निःशब्दपणे हिरव्या चहाचा एकेक घोट घेताना त्या चहातून आजुबाजूचा निसर्ग आपलाच एक भाग असल्याची सुखद जाणीव झेनला होते. आणि मला चहापत्तीच्या कडवटपणातून, आल्याच्या तिखटपणातून आणि दूधसाखरेच्या गोडव्यातून अगदी जिवलग मित्राला भेटल्याचं, मनसोक्त गप्पा मारल्याचं समाधान मिळतं. कुणाचं सुख कशात असेल हे सांगता येत नाही. पण म्हणतात नां “सर्व देव नमस्कारम् I केशवम् प्रतिगच्छति II” तसेच चहाचे कोणतेही मार्ग शेवटी आनंदाच्याच वाटेला जाऊन मिळतात हेच खरं.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

सर्वात डावीकडे आहेत त्या आजी :D सर्वात उजवीकडच्या चहा करणार्‍या काकू :D !

काकू चहा करताना...

संस्कृतीकलाअनुभव

प्रतिक्रिया

ज्ञानदा कुलकर्णी's picture

22 Jun 2009 - 9:06 am | ज्ञानदा कुलकर्णी

खरेच खूप छान आहे हा अनुभव ...
आणि असा कडू चहा काय कोणताही चहा पिताना टपरी वरच्या "कटिंग" ची आठवण होणारच..
आपला अनुभव सर्वासोबत वाटल्याबद्दल धन्यवाद. जर कधी अशा टी सेरेमनी ला जाण्याचा योग आला तर्..........पाहू विचार करु आणि मगच निर्णय घेऊ

चंबा मुतनाळ's picture

22 Jun 2009 - 9:08 am | चंबा मुतनाळ

दोन्ही लेख उत्तम झाले आहेत. आपण म्हंटल्या प्रमाणे, शेवटी रस्त्यावरचा/कॅंटीनमधला चहा हाच बेष्ट!

अवांतरः आपण डहाणूकरच्या दिसता!

सुबक ठेंगणी's picture

22 Jun 2009 - 10:07 am | सुबक ठेंगणी

धन्यवाद...
मी डहाणूकर नाही साठ्येची आहे हो. :)

तुमच्या लेखाने 'कटिंगशी' संबंधीत बर्‍याच आठवणी जाग्या झाल्या. भटाचा तो 'कटिंग' चहा एकदम फर्मास. विषेशतः 'उत्सव' च्या वेळी रात्री जागवताना तर अमृतच!
साठ्ये बाहेरच्या चहावाल्या भटाने एकदा आमच्या एका तिथेच 'पडीक' असणार्‍या वर्गमित्राला 'तुला ग्रॅजुऐशन नंतर किती पगार मिळेल?' विचारल होतं. आणि आकडा ऐकून 'ग्रॅजुऐशन नंतर माझ्याकडे ये, पार्टनरशिप देईन. जास्त कमवशील!' असही सांगितल होतं :).

मुशाफिर.

मदनबाण's picture

22 Jun 2009 - 9:27 am | मदनबाण

दोन्ही भाग मस्त वाटले... :)

अवांतर टवाळकी :-- http://www.jokeemail.com/pictures/japanese.jpg

मदनबाण.....

Success is never permanent, and failure is never final.
Mike Ditka

सुबक ठेंगणी's picture

22 Jun 2009 - 3:22 pm | सुबक ठेंगणी

दाखवलं शाळेत्...त्यांना जपानी पण नाही आलं वाचता आणि इंग्रजी पण ! :P

सहज's picture

22 Jun 2009 - 9:44 am | सहज

"चहा नको पण सेरेमनी आवर"

:-)

एकंदरीत हा सोहळा इज नॉट अवर कप ऑफ टी म्हणायचे तर :-)

Nile's picture

22 Jun 2009 - 1:00 pm | Nile

बापरे! चहा सेरेमनी भलताच. हे जपानी लोक सगळी कामं अशीच शिस्तीत-आसनं वगैरे घालुन-करतात की काय? (तरीच जपानी लोकांच्या 'सुबक' पणाबद्द्ल आम्ही एवढ ऐकुन आहोत. ;) )

एकंदरीत हा सोहळा इज नॉट अवर कप ऑफ टी म्हणायचे तर

हा हा! गुड वन!

सुबक ठेंगणी's picture

22 Jun 2009 - 3:37 pm | सुबक ठेंगणी

एकंदरीत हा सोहळा इज नॉट अवर कप ऑफ टी म्हणायचे तर
हा हा हा...खरं आहे!
चहा चं नाव ऐकून कोणी फसू नये म्हणून!

नंदन's picture

22 Jun 2009 - 9:46 am | नंदन

भाग मस्त, खुसखुशीत शैलीतलं वर्णन आवडलं. दीक्षित रोड वाचून साठ्येमधल्या आठवणी जाग्या झाल्या (कटिंग, सँडविच, शुक्ला चाट सेंटर इ.) :)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

बिपिन कार्यकर्ते's picture

23 Jun 2009 - 6:48 pm | बिपिन कार्यकर्ते

सहमत... लेखाबद्दल आणि साठ्ये (आमच्या वेळचं पार्ला कॉलेज), दिक्षितरोड वगैरे बद्दल पण.

बिपिन कार्यकर्ते

विसोबा खेचर's picture

22 Jun 2009 - 10:30 am | विसोबा खेचर

सह्हीच लेख आहे..

जियो...

तात्या.

वर्षा's picture

22 Jun 2009 - 10:35 am | वर्षा

हा भागही छान! आणि फोटोही :)

स्वाती दिनेश's picture

22 Jun 2009 - 11:32 am | स्वाती दिनेश

हा भाग पण छान जमला आहे, आवडला.
स्वाती

मैत्र's picture

22 Jun 2009 - 11:54 am | मैत्र

हे सगळे फोटो पाहून एक गोष्ट आधी विचारावीशी वाटते?
प्रत्येक जपानी घर इतकं अतीव नीट नेटकं असतं का हो ? म्हणजे हरलोच मी ते फोटो पाहून्... अगदी मिठाई सुद्धा आपल्या लाडू किंवा दुधाच्या बंगाली टाईप मिठाया कशा जरा तरी रँड्म आकार.. एक रचना असली तरी... ह्या मिठाया म्हणजे चॉकलेटचे सुद्धा आकार वेडे वाकडे वाटाव्यात इतक्या सुबक!! जरा वेडेच आहेत हे लोक वाटतं!

आणि तुमच्या आजीबाई अगदी बाहुली सारख्या आहेत ... आजी कसल्या... :)

सुबक ठेंगणी's picture

22 Jun 2009 - 3:34 pm | सुबक ठेंगणी

चव सोडून बाकी सगळंच चांगलं असतं... ;)
आणि मैत्र, हे घर नाहिये काही! हा पंचतारांकित हाटेलाचा हॉल आहे...
पण अव्यवस्थितपणाच्या बाबतीत मी नक्की हरवेन त्यांना! :>

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

22 Jun 2009 - 12:05 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

मस्तच वर्णन! झक्कास...Tea.Y.B.A. तर फारच आवडलं!

तुझा फोटो पाहून तुझ्या नावातल्या सुबकचा अर्थ कळला, पण ठेंगणी अगदीच अस्थानी वाटलं!

क्रान्ति's picture

22 Jun 2009 - 7:20 pm | क्रान्ति

आहे हा पण लेख आणि फोटोही छान!

:) क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

रेवती's picture

22 Jun 2009 - 7:25 pm | रेवती

हा भागही मस्त!
काकू आणि आज्जी किती तुकतुकीत आहेत.
त्यांच्या किमोनोंचे रंग एकदम फिकट पण अल्हाददायक!
मिठायांचे प्रकार आणि व्यवस्थितपणा बघून आईने केलेल्या नारळाच्या वड्या खाताना लहानपणी जो धसमुसळेपणा केला होता तो आठवला (आता मनातल्यामनात त्याबद्दल लाज वाटते).
(देवाला नैवेद्य चौकोनी वड्यांचा दाखवायचा असल्याने कडेच्या निराकार ;) वड्या तोंडात कोंबल्या होत्या.)
एकूणच सेरेमनी वाचायला आवडला.

रेवती

परिकथेतील राजकुमार's picture

22 Jun 2009 - 7:41 pm | परिकथेतील राजकुमार

भारीच सेरेमनी !

अशा सेरेमनीबद्दल ऐकले खुप होते पण सविस्तर वर्णन आज वाचायला मिळाले, आपल्याला सुबक धन्यवाद.

º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

चित्रा's picture

23 Jun 2009 - 1:15 am | चित्रा

लेखही सुबक झाला आहे! आवडला हे सांगायला नको.
(आता हे वाचूनच चहाची भयंकर तल्लफ आली आहे. बाहेर पावसानेही रिपरिप लावली आहे. अशा वातावरणात एकट्याने आपला आपण चहा करून घ्यायचा हे एक मोठे दु:ख.).

धनंजय's picture

23 Jun 2009 - 1:23 am | धनंजय

मस्तच लिहिले आहे.

एक तास वज्रासनात बसणे म्हणजे काय गम्मत ए? 'थर्डडिग्री' लावल्यासारखेच वाटले मला! :T
लिवलंय नेहेमीप्रमाणे मस्त.

मी मात्र मस्त खुर्चीत बसून चहा पितापिताच वाचला हा लेख! बाहेर पाऊस, संगणकावर हा लेख आणि हातात चहाचा कप व्वा!!
'काषाय्-शर्करा'योग असला तर तो हाच असावा, आणि नसला तर आजपासून म्हणायला लागूयात! ;)

(चहाबाज)चतुरंग

सुबक ठेंगणी's picture

23 Jun 2009 - 6:10 am | सुबक ठेंगणी

'काषाय्-शर्करा'योग
हाहाहा...आवड्या! :))
(काषाय-शर्करा योगी) सुबक

प्राजु's picture

23 Jun 2009 - 2:07 am | प्राजु

दोन्ही भाग आवडले.
:)
चहा नको पण सेरेमनी आवर.. मस्त!!!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

श्रीयुत संतोष जोशी's picture

23 Jun 2009 - 8:48 am | श्रीयुत संतोष जोशी

दोन्ही भाग एकदम मस्त झालेत. मजा आली वाचताना.

हे राज्यं व्हावे ये तो श्रींची इच्छा.

जपान मध्ये खाद्यपदार्थाना चव जरा कमीच असते.माझ्या बर्‍याच मित्राना जपान मध्ये खाण्यापिण्या बाबत खुप अडचणी आल्या.आज तुमच्या टी सेरेमनी वरुन ते लक्षात आले. काही शाकाहारी पदार्थात ते बिन्धास्त माशांचा व समुद्रप्राण्याचा वापर करतात असे एकले आहे ते खरे आहे का? माझ्या मित्राचा मुलगा लहानाचा मोठा तिथे झाला (आता ते परत भारतात आले आहेत) तो एकदा जपानिझ नुडल्स खात होता, त्याचा वास देखिल मला सहन झाला नाही. परंतु त्याने चवीने ते संपवले.त्या जाड नुडल्स उकळुन त्यात कच्चे अंडे टाकुन खातात.एकदंरीत खाण्यापिण्या बाबतीत भारतिय खुपच नशीबवान आहेत असे वाटते.

वेताळ

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

23 Jun 2009 - 6:28 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

दोन्ही भाग आवडले !

यशोधरा's picture

23 Jun 2009 - 6:54 pm | यशोधरा

मस्त लिहिलं आहेस हां सुठें :)

धमाल मुलगा's picture

23 Jun 2009 - 7:35 pm | धमाल मुलगा

हे “इचि गो इचि ए” म्हणजे.
आपल्याला त्यातलं काही म्हणता काही सुधरत नाही, 'एक ते च्या पियाचं तर किती वो ते कुचकुचऽऽत्त बसायचं' असं काहीसं झालं माझं.

बाकी, अनुभव वर्णन छानच. आवडलं वाचायला..पण................

चहा कसा प्यावा ह्याबद्दलची माझी वैयक्तीक प्रांजळ मतं ही अशी:

चहा हा कधीही पुर्ण/फुल्ल वगैरे पिण्यात मजा नाही. तो कटींग कटींग करत चारदा प्या हवं तर लागोपाठ पण...कटींगच.

कटींग चहा हा त्या चिमुकल्या ग्लासातच हवा. कप वगैरे जहागिरदारी खास कॉफीसाठी राखीव!! (कॉफी कोणी ग्लासात दिली तर मी तो ग्लास, देणार्‍यावर भिरकावण्यापासून स्वतःला महत्प्रयासानं रोखतो :) )

चहाच्या चवीचे प्रमाण ही चहाची टपरी, बनवायची भांडी, चहावाला ह्यांच्या कळकटपणाशी चढत्या भाजणीत असते. :) (आठवा, फाईव्हस्टार हाटेलातला पुचाट चहा आणि कोपर्‍यावरच्या टपरीवरला खणखणीत कटींग :) )

चहा हे पेय माझ्या मते उभ्याने पिण्याचे पेय आहे :) (आठवा, क्क्क्क्क...कॉलेज के दिन ;) )

चहा पिताना गप्प गप्प गंभीर बसणारा माणूस हा एकतर मुकबधीर असतो किंवा डोक्यावर भयानक चढलेलं कर्ज कसं फेडायचं ह्याच्या चिंतेत असतो.

हे जपानी लोक असं गप्गुमान कसं काय चहा पिऊ शकतात राव? आमच्याकडं तर चहाच्या एकेका कटींगसोबत एकेक दोस्त होत जातो :)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता?::::

संदीप चित्रे's picture

23 Jun 2009 - 11:07 pm | संदीप चित्रे

>> आम्हाला ही टपरी म्हणजे कॉलेजचंच एक extension वाटायची.
अग आम्हाला तर कर्वे रोड आणि पलीकडचं गरवारे कॉलेज हे 'मयूरेश्वर' अमृततुल्यचं एक्स्टेन्शन वाटायचं :)

सुबक ठेंगणी's picture

24 Jun 2009 - 9:15 am | सुबक ठेंगणी

खरं आहे. कॉलेजपेक्षा टपरीवर भरणारे 'वर्ग' अधिक interesting असायचे हे बाकी खरं ;)