सतरंगी रथात बसून आला
पाऊस ओला.. पाऊस ओला..
हिरवाई भारली सृष्टीच्या रंगात
शुभ्रसा निर्झर धरणीच्या भांगात
धुक्याचा कापूस पिंजून गेला..
पाऊस ओला .. पाऊस ओला..
गर्जत मेघांचे तुषार सांडले
तृणांवर मोत्यांनी डावही मांडले
मेघांनी झाकला नभाचा टीळा..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
झाडांच्या हातांत वेलींचा चुडा
ओसंडून वाहतो मेघांचा घडा
शृंगार हिरवा ऋतू ल्यायला..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
निळ्याशा थेंबात आभाळ दाटे
मातीच्या हृदयांत दरवळ भेटे
अल्लड अवखळ सरींचा मेळा..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल
ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर
हृदयांत शिरशिरी शिंपून गेला..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
- प्राजु
प्रतिक्रिया
10 Jun 2009 - 8:17 am | क्रान्ति
खूप खूप आवडली पाऊसकविता!
क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा
10 Jun 2009 - 8:40 am | अवलिया
वा! मस्त सुरेख रचना !!
खास आवडले :)
--अवलिया
10 Jun 2009 - 8:40 am | संदीप चित्रे
>> झाडांच्या हातांत वेलींचा चुडा
क्या बात है प्राजु -- ही कल्पना खूप आवडली.
एकूण सगळीच कविता आवडली त्यामुळे विशिष्ठ कडवं वेगळं काढू शकत नाही.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com
10 Jun 2009 - 3:40 pm | निशिगंध
असेच म्हणतो..
_ _ _ नि शि गं ध _ _ _
10 Jun 2009 - 11:22 am | जागु
वा शेवटचे कडवे मस्तच.
10 Jun 2009 - 12:44 pm | जयवी
ए किती गोड कविता !!
वेलींचा चुडा ही कल्पना मलाही खूप आवडली. संदीपला अगदी मनापासून अनुमोदन :)
10 Jun 2009 - 1:57 pm | दत्ता काळे
हे कडवं सर्वात जास्त आवडलं :
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल
ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर
हृदयांत शिरशिरी शिंपून गेला..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
- कविता आवडली.
10 Jun 2009 - 4:21 pm | लिखाळ
छान कविता..
वेलींचा चुडा ही कल्पना आवडली :)
-- लिखाळ.
या प्रतिसादासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत !!! - लिखाळ जोशी :)
10 Jun 2009 - 7:20 pm | सर्वसाक्षी
12 Jun 2009 - 10:06 pm | प्राजु
सुंदर फोटो..
अगदी चपखल..! :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jun 2009 - 6:42 am | चित्रा
सुरेख फूल आणि कविता.
पाऊस म्हटला की मला सोनटक्क्याची फुले आठवतात..
10 Jun 2009 - 7:26 pm | बिपिन कार्यकर्ते
प्राजुची अजून एक मस्त कविता!!!
हे तर बेष्टच.
बिपिन कार्यकर्ते
10 Jun 2009 - 7:53 pm | मराठमोळा
सहमत आहे. :)
ओलेत्या रानांत, ओलेती चाहूल
ओलेत्या मनांत, ओलेती हुरहूर
हृदयांत शिरशिरी शिंपून गेला..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
सुंदर
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
10 Jun 2009 - 8:43 pm | अनामिक
हेच म्हणतो... सुंदर कविता.
-अनामिक
12 Jun 2009 - 3:57 pm | राघव
असेच म्हणतो.
अवलिया अन मराठमोळा, दोघांशीही सहमत.
छान लिहिलेस! :)
राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )
10 Jun 2009 - 7:59 pm | चतुरंग
वेलींचा चुडा ही कल्पना वेगळीच आहे!
शेवटचे कडवे अप्रतिम! :)
(ढगाळ)चतुरंग
10 Jun 2009 - 8:02 pm | सूहास (not verified)
सुहास
10 Jun 2009 - 8:27 pm | धनंजय
धरणीच्या भांगात वाहाणारा ओढा छानच.
10 Jun 2009 - 8:29 pm | प्राजु
अहो.. ओढा नव्हे. झरा किंवा निर्झर.
ओढा जनरली हा नाल्यासारखा असतो. :(
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jun 2009 - 8:51 pm | प्राजु
सर्वांचे मनापासून आभार.
खरंतर, काल लेकाच्या शाळेची फिल्डट्रीप होती. मी वॉलेंटीयर म्हणून गेले होते. जिथे गेलो होतो तिथे जंगल होतं आणि त्यात पाऊस ही होता.
तो हिरवा सोहळा पाहून पेपर नॅप्किन वर खरडलेले शब्द आपण सगळ्यांनी गोड मानून घेतलेत.. त्याबद्दल खूप खूप आभार.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
10 Jun 2009 - 10:38 pm | दिपाली पाटिल
प्राजु, मस्त कविता आहे, वाचुन च पाऊस अनुभवता आला...ईकडे नाहिये अजुन पाऊस !!
दिपाली :)
11 Jun 2009 - 9:59 am | सुबक ठेंगणी
अगं इथला पाऊस जाम बोरिंग असतो...तुझ्या कवितेमुळे माहेरचा पाऊस आठवला...
12 Jun 2009 - 10:07 pm | प्राजु
पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार.
:)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
13 Jun 2009 - 1:47 pm | चन्द्रशेखर गोखले
सुंदर !! आपल्या कवितेने पावसात भिजण्याचा आनंद दिला, ज्याची आम्ही मुंबईकर आतुरतेने वाट पहात आहोत.
या ओळी खासच ...
हिरवाई भारली सृष्टीच्या रंगात
शुभ्रसा निर्झर धरणीच्या भांगात
धुक्याचा कापूस पिंजून गेला..
पाऊस ओला .. पाऊस ओला..
गर्जत मेघांचे तुषार सांडले
तृणांवर मोत्यांनी डावही मांडले
मेघांनी झाकला नभाचा टीळा..
पाऊस ओला.. पाऊस ओला..
15 Jun 2009 - 9:48 am | विसोबा खेचर
प्राजू,
अप्रतीम कविता..!
शब्द नाहीत!
तात्या.