पाहिली मी पंढरी

क्रान्ति's picture
क्रान्ति in जे न देखे रवी...
10 Jun 2009 - 7:41 am

अमृताची चंद्रभागा झुळझुळे या अंतरी
याचि देही याचि डोळा पाहिली मी पंढरी

मीपणाचे कवच गळले निर्गुणाच्या दर्शने
ते अलौकिक रूप पाहून तृप्त झाली लोचने
नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी

माळ तुळशीची गळा, कासे पितांबर, कर कटी
भाळि कस्तुरिटिळक, कानी मकरकुंडल शोभती
स्वर्ग भीमेच्या तिरी, वैकुंठ शोभे भूवरी

भान हरपे आणि होई मूक वाचा बोलकी
चरणि माथा ठेविता हा जन्म होई सार्थकी
आज प्राणांतून घुमली सावळ्याची पावरी

कविताप्रकटनविचारसद्भावना

प्रतिक्रिया

जयवी's picture

10 Jun 2009 - 1:42 pm | जयवी

काय सही !!
क्रान्ते.....तुला साष्टांग दंडवत :)

नरेंद्र गोळे's picture

10 Jun 2009 - 2:17 pm | नरेंद्र गोळे

मात्र अशावेळी आपली गाववाली असल्याचा आनंद होतो. नाही का?

दत्ता काळे's picture

10 Jun 2009 - 1:53 pm | दत्ता काळे

हा जणू अभंगच झालाय. मुळात धृपदच (पहिल्या दोन ओळी ) मनाची पकड घेतात आणि त्यानंतरचा आख्खा अभंगच ( मी ह्या रचनेला अभंगच म्हणतो ) सुंदर झालाय.

क्रांतीताई, हि रचना ग्रेट झालीये.

जागु's picture

10 Jun 2009 - 2:05 pm | जागु

सुंदर.

अमृताची चंद्रभागा झुळझुळे ज्या अंतरी |
याचि देही याचि डोळा, का न पाहे पंढरी ||

क्रांती (मराठीत अंत्य वेलांटी दीर्घच असते),

अतिशय सुंदर रचना आहे.
अंतरातून स्फुरलेली, ओघवत्या शब्दांत रूप घेतलेली आणि नादमय.

सायली पानसे's picture

10 Jun 2009 - 2:19 pm | सायली पानसे

मस्तच आहे कविता...
सुंदर...

प्राजु's picture

10 Jun 2009 - 6:49 pm | प्राजु

ही कविता नसून... भक्ती गीतच आहे.
सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

प्राजु's picture

10 Jun 2009 - 6:50 pm | प्राजु

ही कविता नसून... भक्ती गीतच आहे.
सुंदर!!
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

निशिगंध's picture

10 Jun 2009 - 3:35 pm | निशिगंध

खरेच ग्रेट आहे...
कविता(अभंग) आणी तु ही

___ निशिगंध

अनामिक's picture

10 Jun 2009 - 6:22 pm | अनामिक

बोला हरी विठ्ठल ज्ञानदेव तुका SSराम!!

-अनामिक

ऋषिकेश's picture

10 Jun 2009 - 6:47 pm | ऋषिकेश

छान!.. भक्तीमय रचना!

ऋषिकेश
------------------
बुद्धीसाठी लोह वाढवणारी औषध घ्यायला लागल्यापासून "डोकं गंजलं तर!" ही भिती वाढली आहे

दिपाली पाटिल's picture

10 Jun 2009 - 10:47 pm | दिपाली पाटिल

फार च सुंदर वाटतेय ...

दिपाली :)

राघव's picture

12 Jun 2009 - 3:57 pm | राघव

चांगली रचना.

नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी

या ओळीचा भावार्थ जरा विस्तृतपणे मांडाल का?

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

क्रान्ति's picture

12 Jun 2009 - 9:22 pm | क्रान्ति

नाम ते येता मुखी या धन्य झाली वैखरी
त्या निराकाराला सगुण रूपात पाहिल्यावर अजाणताच त्याचं नाम मुखी येतं, आणि वाचा धन्य होते, पवित्र होते! वाणीला वेगळीच शक्ती मिळते.
१९८३ मध्ये मी नोकरीनिमित्त पंढरपूरला असताना रोज रात्री ९.३० ते १० च्या सुमारास मी आणि माझी मैत्रिण शशी मंदिरात जात असू. त्यावेळी कर्नाटकातून आलेले भक्तगण गरुडखांबाजवळ बसून मृदंगाच्या तालावर भक्त पुरंदरदासाच्या रचना गात असत. ते वातावरण इतकं भारून टाकणारं असे, की स्वर्गसुख म्हणतात, ते हेच असावं, असं वाटे! ही रचना त्याच काळातली. [आता पंढरी बरीच बदलली आहे, आणि पांडुरंग कैदेत असल्यासारखा वाटतो!]

क्रान्ति
ध्यानम् मूलम् गुरुमूर्ति, पूजामूलम् गुरु पदम्
मंत्र मूलम् गुरुवाक्यम्, मोक्षमूलम् गुरुकृपा
अग्निसखा

राघव's picture

13 Jun 2009 - 10:49 am | राघव

समजले. :)

राघव
( आधीचे नाव - मुमुक्षु )

अश्विनि३३७९'s picture

13 Jun 2009 - 10:35 am | अश्विनि३३७९

सकाळी सकाळी अभंग वाचून प्रसन्न् वाट्लं
मस्त रचना ..
अश्विनि ....

चन्द्रशेखर गोखले's picture

13 Jun 2009 - 1:39 pm | चन्द्रशेखर गोखले

केवळ अप्रतिम! आलिकडे भक्तीगीते बरीच येत आहेत !!!...?