खालची कविता माझ्या भाचीसाठी मुळ कथेला (जी आता नीट आठवतही नाही) थोडी कलाटनी देऊन लहान मुलांना आवडेल अशा स्वरुपात मांडायचा प्रयत्न केला आहे. (काही बदल सुचवता आले तर नक्की सुचवा).
कावळा आणि चिमणी
राहायचे शेजारी
सुख होतं भरपूर
दोघांच्याही घरी
कावळ्याचं घर होतं शेणाचं
चिमणीचं घर होतं मेणाचं
एकदा काय झालं
खूप पाऊस आला
पुराच्या पाण्याने
गाव भरून गेला
कावळ्याचं घर गेलं वाहून
चिमणीकडे आला तो धावून
"चिमणे चिमणे दार उघड"
कावळा म्हणाला चिमणीला
"पिलू आहे छोटं, वेळ नाही मला"
चिमणी म्हणाली कावळ्याला
कावळा बिचारा गेला निघून
पावसाच्या पाण्यात राहिला भिजून
चिमणी मात्र होती
तिच्या पिलात व्यस्तं
पिलासवे तिचा
दिवस जाई मस्तं
दिवसां मागे दिवस गेले
चिमणीचे पिलू मोठे झाले
पिलाला उडायची
हौस होती भारी
उंच आकाशात
त्याने मारली भरारी
मोकळ्या आकाशी गेले ते उडून
चिमणीच्या घरट्यात, नाही आले परतून
चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशांची पाठवण
चिमणी झाली होती खूप म्हातारी
म्हातारपणाने पडली आजारी
"आजारी आहे चिमणी"
असा पिलाला निरोप गेला
पण ऐन वेळी मदतीला
कावळाच धावून आला
पिलू होते दूर
त्याने केला फोन
औषधांसाठी म्हणे
पाठवतो पैसे दोन
चिमणी म्हणे पिलाला, पैसे नको...
माझी थोडीही काळजी करू नको
कावळ्याने चिमणीची केली सेवा
खायला तिच्यासाठी आणला मेवा
कावळ्याच्या मदतीने
चिमणी झाली बरी
त्याची तिने मागितली
माफी खरी खरी
कावळा म्हणाला विचार नको करू फार
घरासोबत जोडावे मित्रही चार!
कावळा अन् चिमणी आता
झाले मित्र पक्के
एकमेकांच्या मदतीने
काढले आयुष्य अख्खे!
-अनामिक
प्रतिक्रिया
1 Jun 2009 - 9:54 pm | प्राजु
बोध घ्यावा अशी गोष्ट कवितेतून सांगितली आहेस.
मस्त जमली आहे.
:)
भाचीला आवडली की नाही ते ही सांग.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
2 Jun 2009 - 4:46 am | स्वप्निल..
मला पण आठवत नाही पुर्ण गोष्ट..पण तुझी कविता मस्त जमलीय..
चांगला लेखक/कवी झाला रे तु आता...... :)
अजुन लिहि...
स्वप्निल
2 Jun 2009 - 4:50 pm | अनामिक
कसचं कसचं.... लेखक्/कवि... बापरे! फार मोठे शब्द आहेत रे!
-अनामिक
2 Jun 2009 - 6:48 am | मनीषा
गोष्ट छान आहे...
2 Jun 2009 - 7:48 am | क्रान्ति
छानच आहे कवितेतली गोष्ट!
:) क्रान्ति
क्या पता किस मोडपर मिल जायेगा वो?
गुमशुदा दिल को दिवाने ढूंढते हैं|
अग्निसखा
2 Jun 2009 - 9:42 am | अरुण वडुलेकर
कावळा चिमणीचा नेहेमीची गोष्ट थोडी बदलून सांगितलेली दिसते.
चिमणीने कावळ्याला धुत्कारले तरी कावळ्याने तिला सहानुभूतिपूर्वक
मदत केली हा बदल फारच छान आहे.
जियो.
2 Jun 2009 - 11:48 am | अश्विनि३३७९
कविता छान आहे ..
अश्विनि ....
2 Jun 2009 - 11:51 am | परिकथेतील राजकुमार
आता ही कविता वाचुन तरी लोकांना माझे चांगुलपण लक्षात येइल ;)
मस्तच आहे हो कविता,
परा'चा कावळा
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य
2 Jun 2009 - 11:53 am | जागु
छान आहे कविता.
2 Jun 2009 - 2:16 pm | मराठमोळा
मस्तच...
कावळा म्हणाला विचार नको करू फार
घरासोबत जोडावे मित्रही चार!
लै भारी. आवडली कविता. (जेवढी लहानांसाठी त्यापेक्षा जास्त मोठ्यांसाठी )
आपला मराठमोळा.
कोणत्याही गोष्टीचा ताप येईपर्यंत ठीक असते, पण तिचा कर्करोग होऊ देऊ नये!!
2 Jun 2009 - 2:38 pm | मराठी_माणूस
चिमणीला पिलाची
यायची आठवण
पिलू मात्र करी
पैशांची पाठवण
चिमणी झाली होती खूप म्हातारी
म्हातारपणाने पडली आजारी
"आजारी आहे चिमणी"
असा पिलाला निरोप गेला
पण ऐन वेळी मदतीला
कावळाच धावून आला
वरच्या ओळी खुप आवडल्या. प्रखर वास्तवता. दोन पैसे पाठवले की झाले असे समजणार्या पिलांचे जन्मदाते कसे बसे आयुष्य कंठताना दिसतात .
2 Jun 2009 - 4:50 pm | अनामिक
प्रतिसाद देणार्या अन् न देणार्या सगळ्यांचे धन्यवाद!
-अनामिक
3 Jun 2009 - 11:44 pm | राघव
मस्त मांडले आहेस. आवडले खूप.
राघव