वाट फुटेल तिथे १

सुधीर कांदळकर's picture
सुधीर कांदळकर in जनातलं, मनातलं
11 Feb 2008 - 9:04 pm

ही कथा आहे एका प्रवासाची. प्रवास आहे द़क्षिण भारताचा. ५०० कि. मी. पेक्षा जास्त. पण एका छोट्या मारुती ८०० मधून केलेला. हातात नकाशा घेऊन केलेला एक मनोरंजक, बिनधास्त प्रवास.

आम्ही म्हणजे मी आणि आमचे मित्र. यथावकाश एकेकाचा परिचय होईलच. एकाचे नाव जाड्या. हा या प्रवासात होता. खरे म्हणजे याच्यामुळेच आम्ही कॉलेज सोडून इतकी वर्षे झाली तरी अजून एकत्र येतो. जगी सर्वसुखी असा कोण आहे या ओळी याला पाहूनच्न सुचल्या याबद्दल आम्हाला तिळमात्रहि शंका नाही. अविवाहिततेचे अनंत फ़ायदे पाहा. याला बायकामुले नसाल्यामुळे हा सदैव मोकळा. विनोदबुद्धि अफ़ाट. हजरजबाबी तसाच. कोणाची फ़िरकी केव्हा कशी घेईल याचा कांही नेम नाही. याचे बरेच मोठे गुण आहेत. कितीहि वाईट पदार्थ भरपूर स्तुति करून तोंड जरादेखील वाकडे न करता कितीहि खाऊ शकतो. खाण्याच्या प्रमाणाच्या बाबतीत बकासूर देखील लाजेल. त्यामुळे हा आमच्या प्रत्येकी एक असलेल्या बायकांत हा फ़ार लोकप्रिय. फ़ोनवर बोलायला सुरुवात केल्याबरोबर बायको गुदगुल्या झाल्याप्रमाणे ह्सू लागल्यास खुशाल समजावे की याच महाशयांचा फ़ोन आहे. आमच्या एका मित्राचे जेव्हा नुकतेच लग्न झाले होते तेव्हा एकदा याचा फ़ोन गेला. संक्रांतीचा दिवस होता. १९८२ च्या सुमाराची गोष्ट. 'पुरणपोळ्या केल्या की नाहीत? खायला येतो.' ती बावचळून म्हणाली 'होळीला करतात.' 'होळीच्या दिवशी तर किशोर म्हणाला की संक्रांतीला करतात.' बिचारा किशोर होळीच्या दिवशी जाड्याच्या ऑफ़िसात पुरणपोळ्यांचा डबा घेऊन हजर. तर असे हे आमचे मित्ररत्न. पार्ट्या व पिकनिक्स याचे हवन याच पठ्ठ्याने अविरत चालू ठेवले. वर्षाला दोनपांच पिकनिक्स व पाचसहा पार्ट्या असे किमान प्रमाण याने कायम ठेवले. १९९७ पासून वर्षाला पाचसहा पिकनिक्स असतात. हल्ली फ़ोनाफ़ोनीमुळे व मेलामेलीमुळे पार्ट्या कमीच. दोघेतिघे जमतात व इतराशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधूनच गप्पा होतात. छोट्या गाडीतून आम्ही दीडदोन आठवड्यांच्या तीन सहली केल्या या सहलींच्या आठवणी सहलीवरून कालच आलो असे असे अजूनहि वाटते एवढ्या ताज्या आहेत. लिप्टन चहाएवढ्या. त्यापैकी पहिल्या सहलीच्या या आठवणी.

मुले मोठी झाली तसे आम्ही कौटुंबिक जबाबदारीतून थोडेफ़ार मोकळे झालो. आमचे पुत्ररत्न पण १० वीत गेले. क्लासमुळे तो अभ्यासात पण अधिक स्वयंपूर्ण झाला. (शेवटी माझ्याच चांगल्या वळणावर गेला) सौ चा वेळ त्याच्या उस्तवारीत जाऊ लागला. ती गृहस्वामिनी आहे. अर्थात नोकरी करीत नाही. मी जास्तच मोकळा झालो. इतरांची मुले १ वा २ वर्षे पुढेमागे. साहाजिकच आम्हाला दूरच्या प्रवासाची स्वप्ने पडू लागली. तसे आम्ही काही आगोदर ठरविले नव्हते म्हणा. पण म्हणतात ना ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. तसे आम्ही स्वत:ला विद्वान (असलो तरी) समजत नाही. शेवडे व देवा म्हणजे देवगांवकर यांनी ठरविले की दूरच्या प्रवासाला मारुती ८०० घेऊन जायचे. आणखी कोण येवो अथवा न येवो दोघेच तरी जाऊ. जाड्या हे आमचे मध्यवर्ती दळणवळण केंद्र आहे. जाड्या तिसरा बहुतेक येईल. आलाच तर कालू. म्हणजे अस्मादिक. तुम्हाला म्हणून सांगतो, हे सगळे माझ्या रंगावर जळतात. कुठे जायचे? प्रथम सर्वजण रजा टाकू. नकाशा घेऊन वाट फ़ुटेल तिथेल जाऊ. रजा सलामत तो स्थळे पचास. गणेशोत्सव चालू होता. आता एकेकाच्या रजेच्या तारखांची जुळवाजुळव. देवाची मारुती ८०० घेऊन पुण्याला जायचे. शेवडेच्या मारुती ८०० मध्ये बसायचे व निघायचे. वाट फ़ुटेल तिथे. अरे हो. सांगायचे राहून गेले. या दोघांचेहि ड्रायव्हिंग उत्कृष्ट. सुरक्षित आणि गाडीचे वजन रस्ता पकडण्याची कुवत व रस्त्याची स्थिति या गोष्टींना अनुसरून योग्य त्या वेगात. नाहीतर स्वर्गातच जावे लागायचे. अर्थात आम्ही पुण्यवंत असल्यामुळे. (आमचा चिन्या जोशी नावाचा एक मित्र आहे. याचा रंग माझ्यासारखा. म्हणून याला आम्ही किरवंत म्हणतो. हा देखील जगी सर्वसुखी अर्थात अविवाहित आहे. फ़क्त मुलांसाठी असलेल्या शाळेत वाढल्यामुळे वाह्यात विचार येतात. विषयांतराबद्दल क्षमस्व.) असो. तर द्वारकाधीश कृष्ण वा मद्रनरेश शल्याला लाजविणारे दोन थोर सारथी आम्हा भाग्यवंतांच्या समवेत होते आणि अजून आहेत. अखेर १ ऑक्टोबर २००० ही तारीख ठरली. नवरात्राचा पहिला दिवस. सरत्या पावसाची मजा औरच. रजा टाकल्या. भरपूर अवकाश असल्यामुळे रजा मान्य न होण्याचा प्रश्न नव्हता.

कुठे जायचे? द़क्षिणेलाच जाऊ. मी शाकाहारी. शेवडे व देवा ब्राह्मण म्हणजे शाकाहारातच जन्म काढलेले. इडली डोसे मिळ्तील. खाण्याची आबाळ होणार नाही. मला काळ्या वर्णाचे आकर्षण आहेच इति इतर. जाड्या जरी अट्टल मांसाहारी किंबहुना मांसाहाराच्या व्यसनांत अडकलेला असला तरी तो कांहीहि आणि कितीहि खाऊ शकतो. त्याने आयुष्यात एकदाच खाण्याचा पदार्थ टाकला आहे. बँगकॉकच्या हॉटेलातील मगरीचे सूप. पण ते मगरीचे आहे हे ठाऊक असून त्याने ते मागविले. काय हे धारिष्ट्य? असो. तर ठरले. द़क्षिण भारत. पुन्हा एकदा ऑल ग्रेट मेन .....

निघण्याआधी एक आठवडा तिघा मुंबईकरांची बैठक झाली. सोबत नाही नाही म्हणत असणारा चौथा मुम्बईकर ना-या ऊर्फ़ नारकर असे. फ़ोनाफ़ोनी चालूच होती. शेवडेमास्तर फ़ोनवर होतेच. हा सद्गृहस्थ प्राचीन काळी मिलमध्ये वस्र अभिअयंता होता. तेथे याला मास्तर म्हणत. म्हणून हा मास्तर. रुट ठरला. पुणे कोयना मार्गे राष्ट्रीय महामार्ग १७ म्हणजे मुंबई गोवा रस्ता पकडायचा या रस्त्याने गोवा मुर्डेश्वर मडिकेरी. तेथून केरळात उतरायचे. रा म मा १७ ने तेल्लीचेरी - माहे - कोझीकोडे -एर्नाकुलम - अलेप्पी मार्गे कन्याकुमारी. रस्त्याचा नकाशा घेऊन जायचे. रा म मा १७च कां? कारण या रस्त्याला रहदारी कमी असते म्हणून ड्रायव्हिंग सोपे जाते. फ़क्त दिवसा आणि चांगल्या उजेडातच सारथ्य करावयाचे. ऊगीच किरवंताला काम नको. सालेमकडून येणा-या सालेम कन्याकुमारी रा म मा ४७ ईडपल्ली येथे रा म मा १७ ला मिळतो. त्यामुळे रस्त्याच्या ईडपल्लीपुढील भागाला रा म मा ४७ म्हणतात. त्याने पुढे कन्याकुमारीला जाऊन मग मागे वळायचे असा बेत ठरला. येतांनाचा मार्ग येतांनाच ठरवू. फ़क्त फ़्लेक्सिबल सामान घ्यावयाचे. कमीत कमी सामान ही सुखाच्या प्रवासाची गुरुकिल्ली आहेच. दोनचार हाफपॅन्टी व दोनचार टी शर्ट, पुरेशी साताठ अंतर्वस्त्रे, दाढीचे सामान, माफ़क औषधे: ऍस्पिरीन, पॅरासिटमॉल, लोमोटील, जेल्युसील वगैरे गोळ्या, टोपी, छत्री, बटरी, कपडे वाळत घालण्यासाठी दोरी, दोरीसाठी इंग्रजी एस आकाराचे हूक, चाकू बस्स. सुदैवाने पन्नाशी ओलांडली तरी आमच्यापैकी कुणालाच अजून कोणत्याहि गोळ्यांची अद्याप लागण झालेली नाही. ही तर ७ वर्षापूर्वीची गोष्ट आहे. असो. मारुती ८०० मधे पावसामुळे कॅरिअर नसतांना चारपाच बॅगाखेरीज आणखी काय राहणार? गंमत म्हणजे पाचवा ना-या बरेच आढेवेढे घेतल्यानंतर तयार झाला. तसे आम्ही त्याच्या मागे होतोच. एकंदरीत आमचा उत्साह व नकाशा घेऊन जाण्यातील थरार त्याला दूर ठेऊ शकला नाही. अर्थात ऑल ग्रेट मेन थिंक अलाईक. दर बैठकीला तो हजर असेच पण शेवटच्या क्षणापर्यंत त्याने होकार भरला नव्हता. मारुती ८०० म्ध्ये पाचवा म्हणजे अतीच. परंतु खूप जवळचा मित्र असल्यामुळे त्याची अडचण वा गर्दी जाणवणार नव्ह्ती फ़क्त त्याची बॅग मागील कांचेवर येणार होती. मुख्य म्हणजे आमच्या सारथ्यांना हे मान्य होते. ना-याअचा एक गुण आहे ना-या हिशेब चोख ठेवतो. प्रत्येकाकडून व्यवस्थित पैसे जमा करतो, मोत्यासारख्या अ़क्षरांत हिशेब लिहितो, झोपण्यापूर्वी प्रत्येकाला काही खर्च केला की काय हे अगत्याने विचारतो व असल्यास त्वरित पूलमधून देऊन टाकतो. थोडक्यात म्हणजे तो चांगला रोखपाल म्हणाजे कॅशिअर आहे. या वेळी त्याने पूलचे पैसे ठेवायला बस कंडक्टरसारखी बॅग आणली होती. लेजरच्या आकाराची उभी व नारिंगी रंगाची चामड्याची. ती तो या सहलीत प्रत्येक ठिकाणी आणत आसे. सकाळी तो रूमवरून निघतांना ती जी खांद्याला लटकवायचा ती संध्याकाळी रूमवरच उतरवायचा.

पाचहि जण उत्कंठेने व उत्साहाने भारून गेलो होतो काय करू आणि काय नको असे झाले होते. फ़ोनाफ़ोनीला वेग आला होत. केव्हा एकदा १ तारीख उजाडते असे झाले होते. माझ्या कल्पनेचा वारु उधळायला नेहमीप्र्माणे दशदिशा मोकळ्या होत्याच. सगळे जग नेहमीपेक्षा सुंदर आणि भव्य वाटायला लागले होते. आम्ही सगळ्यांनी पुन्हा वयाच्या सोळाव्या वर्षात पदार्पण केले.

१ ऒक्टोबर २०००.
अखेर १ तारीख उजाडली. जाड्याची एक गंमत आअहे त्याला अजिबात दिशाज्ञान नाही. त्याच्या स्वत:च्या घरासमोर त्याला स्वत:भोवती गरगर फ़िरवून सोडले तरी त्याला स्वत:चे घर दाखवता येईल की नाही शंका आहे. तरी त्याला घेऊन योग्य ठिकाणी उभे राहण्याची जबाबदारी माझी. केवढा जबाबदार माणूस मी! कालू दा जबाब नही . तर याला घेऊन मी कला नगारच्या नाक्यावर उभा राहिलो. देवा बांगूर नगरवरुन निघाला. सांताक्रूझ सबवेसमोर हायवेला ना-याला घेतले व आम्हाला कलानगरला घेतले आणि आम्ही पुण्याकडे कूच केले. आम्हा सर्वांचा एक साधा पण चांगला गुण म्हणजे वक्तशीरपणा. त्यामुळे सातला ठरले तरी बरोबर पावणेसातला कलानगरवरून निघालो. वेळ न पाळणा-यांना आम्ही कटवले हे सूज्ञांच्या ल़क्षांत आले असेलच. रहदारीची गर्दी होण्यापूर्वी निघाल्यामुळे योग्य त्या वेगाने जाऊन पुण्याला मास्तरांच्या घराखाली ठरल्याप्रमाणे बरोबर साडेदहाला पोहोचलो. तेव्हा द्रुतगती मार्ग अर्धाच झाला होता. परंतु जयंतराव टिळकांना त्याबद्दल सलाम केला. भ्रमण्ध्वनीवरून फ़ोनाफ़ोनी चालू होतीच. जाड्याच्या रसनेवर सरस्वती नेहमीपेक्षा जरा जास्तच उत्साहाने नृत्य करीत होती. पुणे कधी आले कळले देखील नाही. आदल्या दिवशीच मास्तरांनी गाडी सर्व्हिस करून घेऊन पेट्रोल भरून हवापाणी आणि ऑईल ठीक करून तयार ठेवली होतीच. ताबडतोब या गाडीतून सामान त्या गाडीत टाकले व पाच मिनिटात निघालो. सौ मास्तरांचे न्याहारीचे आमंत्रण साभार टाळले. खरे म्हणजे ते आकर्षक होते. पण पहिले म्हणजे आमच्या वेळापत्रकाचे बारा वाजले असते. आणि दुसरे म्हणजे खाणेपिणे टाळता येण्याएवढा निग्रह आमच्याकडे नसल्याबद्दल सौ मास्तर किंवा मास्तरीणबाईंनी आमची भरपूर टिंगल केली असती. देवाची पदावनति होऊन तो किलिंडरच्या जागेवर आणि मी सर्वांत बारीक असल्यामुळे मागे डावीकडे जाड्या व उजवीकडे ना-या या दोघंच्या मध्ये अशी पदावनति झाली. जाड्यचे नाव जरी जाड्या असले तरी त्याची कंबर ३४ इंच आहे. त्यामुळे फारशी गच्चडी झाली नाही.

सातारा रस्त्यावरून उजवे वळण घेतले आणि रहदारी कमी झाली. दूर आल्यासारखे वाटायला लागले आम्ही आमच्या डोमेनमध्ये... अपेक्षित दुनियेत येऊन पोहोचलो असे वाटायला लागले. थोडे ढगाळलेलेच होते. रस्ता खराब असल्यामुळे सारथ्यांची एकाग्रता भंग होऊ नये म्हणून वटवट कमी करून निसर्गसौन्दर्याचा आस्वाद घेत होतो. वेग २० - २५ वर आला. घाई कुणाला होती. आमची घाई सकाळी निघेपर्यंत. नंतर प्रवासाचा आस्वाद घेणे. दीडदोन तासांनी सारथ्याला विश्रांति देण्यासाठी ब्रेक घ्यायचा. ड्रायव्हर व किलींडर यांची अदलाबदल करायची. निसर्गाच्या हाकेला ओ द्यायची व ताजेतवाने व्हायचे. झालेच तर एखादा चहा व पुन्हां पुढे निघायचे. पहिलाच दिवस असल्यामुळे उत्साह ओसंडून वहात होता. हास्यविनोदाला उधाण आले होते. रा म मा १७ आल्यावरच जाड्याला परमेश्वराचा पहिला अवतार मिळण्याची शक्यता. पुढे किती दिवस त्याला सांबार खावे लागणार कोण जाणे म्हणून तेव्हांच जेवण असे ठरले. अडीच वाजून गेले तरी रा म मा १७ दिसेना. जाड्या भुकेने कासावीस. अजून एक कोड ऑफ़ कॉन्डक्ट असा की गाडीत कहीहि खायचे नाही अन्यथा मुंग्यादि कीटकांना आमंत्रण. ड्रायव्हर बदलतांना जाड्याकडील सर्व मारी बिस्किटांचा स्टॉक संपला. अर्थात आम्ही इतर चौघांनी देखील बिस्किटांचा अवमान केला नाही. त्याचे भुकेने कासावीस होणे पाहून आमची भरपूर करमणूक झाली व भुकेच्ची तीव्रता जाणवली नाही. परंतु रा म मा १७ आल्यावरच जेवायचे यावर तोहि ठाम होता. मासे मिळण्याचे आमिषहि त्याला होतेच. आम्ही देखील त्याला हरभ-याच्या झाडावर चढवत होतो. आम्ही ४ मुंबईकरांनी न्याहरी देखील केली नव्हती. शेवटी शेवटी हॉटेल दिसले की तो थांबायचा आग्रह करी. नंतर आग्रहचे रूपांतर हट्टात झाले. त्यामुळे फ़क्त टिंगलीचे प्रमाण वाढले. हे दोघे गाडी अशा ठिकाणी थांबवीत की आजूबाजूला हॉटेल नसे. सौ शेवडे ही देवाची सख्खी बहीण. नेमक्या अशा टिंगलीच्या क्षणी तिचा फ़ोन आला. सुकाणू देवाकडे होते. मास्तरचे बोलून झाल्यावर त्याने जाड्याकडे फ़ोन दिला. आम्ही सकाळी उठल्यापासून काहीहि खाल्लेले नाही व तुझा रथचक्रधारी क्रूरकर्मा भाऊराया आम्हाला काहीहि खाऊं देत नाही अशी त्याने तक्रार केली. तेव्हा तिनेहि मग त्याचि फ़िरकी घेतली. केवळ वजन वाढून त्याची प्रकृति बिघडूं नये ह एकमेव उदात्त हेतु त्यामागे आहे अशी आम्ही फ़ोनवरून ऐकू जाईल असे ओरडून साक्ष देण्याचे परम कर्तव्य बजावले. त्यामुळे तिचीहि करमणूक झाली. अर्थात नंतर देवाच्या घरच्यांची देखील झाली असणार.

कमी वेगामुळे रा म मा १७ येईपर्यंत साडेतीन वाजून गेले. आमचा अगोदर अंदाज होता की संध्याकाळी पाचसहापर्यंत कणकवलीला पोहोचू. परंतु उजेड फ़रच कमी होत व फ़ारच जोरदार पाऊस. वळणे आहेतच. रस्त्यातील खड्डे दिसत नाहीत. तशात पावसाचा जोर वाढला. वायपर चालू होते वेग आणखी कमी. सगळ्यांचे ल़क्ष रस्त्याकडे लागलेले होते. ड्रायव्हर किलींडर समोर, मी मागे. जाड्या डावी व ना-या उजवी बाजू अशी वाटणी झाली. चारसाडेचारला हातखंबा आले. परंतु थोडे आंत जाऊन रत्नागिरीला मुक्काम करावा असे ठरवले. हायवेला हॉटेलाचे दर चढे असणार व सेवा देखील चांगली नसणार. रत्नागिरीलाच मुक्काम केला. हॉटेल पसंत करणे माझ्याकडे व घासाघीस करणे जाड्याकडे आले. घासाघीस करायला बायको नसल्यामुळे तो स्वत:च उत्तम घासाघीस करतो जे विवाहितांना करावे लागत नाही. मासळीबाजारात कोळणी त्याला गंडवतात तो भाग वेगळा. एका डबल ऑक्युपन्सीमध्ये मास्तर व देवा म्हणजे ब्राह्मण आणि दुसरीत आम्ही तिघे म्हणजे ब्राह्मणेतर अशी जातीय विभागणी झाली. ना-या वगळत आम्हा चौघांच देवाधर्मावर विश्वास नसल्यामुळे आणि संकटसंगीदेखील आम्ही अविचल राहिल्यामुळे आम्ही सर्व धर्मांची यथेच्छ टिंगल करतो. जातपात देखील मानत नसल्यामुळे आम्ही खाजगीत एकमेकांची भरपूर जातीय टवाळी करतो. अर्थात इतरांच्या भावना दुखावू नये म्हणून खाजगीत. रात्री आठनऊ पर्यंत पऊस पडत होता. दुस-या दिवशी लवकर उठून जाण्याची खुमखुमी असल्यामुळे जेवून लगेच झोपलो. मास्तर व मी रोज साडेनऊलाच झोपतो. जेवल्यावर आम्ही दोघे झोपलो. ना-याने दुस-या दिवशी सकाळी साडेसहाला बिल व न्याहरी मिळेल याची व्यवस्था केली. देवाने गाडीची पाहाणी केली. जाड्या वजन आटोक्यात ठेवण्यासाठी जेवण्यापूर्वी भरपूर व्यायाम करतो व जेवणानंतर भरपूर चालतो. पाऊस नंतर थांबल्यामुळे त्याच्या चालण्यात व्यत्यय आला नाही.

क्रमशः

हे ठिकाणअनुभव

प्रतिक्रिया

संजय अभ्यंकर's picture

11 Feb 2008 - 10:34 pm | संजय अभ्यंकर

उत्तम प्रवास वर्णन.
लगे रहो!....

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

मुक्तसुनीत's picture

11 Feb 2008 - 10:39 pm | मुक्तसुनीत

...आणि मुख्य म्हणजे कौटुंबिक जिव्हाळ्याच्या आणि व्यक्तिविशेषांबद्दलच्या तपशीलामुळे अत्यंत वाचनीय असे लिखाण. खूप मजा येते आहे. लगे रहो "कालू" भाई ! :-)

ऋषिकेश's picture

11 Feb 2008 - 11:43 pm | ऋषिकेश

जबरदस्त!!! ही मारुती ८०० ची मुशाफीरी भन्नाट वाटली. नर्मविनोदी भाषाशैली आणि व्यक्तीपरिचयाची हातोटी प्रचंड आवडली. पुढिल भागांच्या प्रतिक्षेत :)

-(प्रवास आणि प्रवासवर्णनाचा चाहता) ऋषिकेश

चतुरंग's picture

12 Feb 2008 - 12:41 am | चतुरंग

अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन.
(आपल्या नावात जरी 'धीर' असला तरी पुढचा भाग वाचायला आमचा धीर निघत नाहीये!:)

चतुरंग

विसोबा खेचर's picture

12 Feb 2008 - 11:28 am | विसोबा खेचर

अकृत्रिम आणि म्हणूनच भावणारे सहज सुंदर लेखन.

रंगरावांशी सहमत आहे..

सुधीरराव, और भी आने दो. आपले प्रवासवर्णन वाचायला मौज वाटली!

आपला,
(प्रवासी) तात्या.

भडकमकर मास्तर's picture

12 Feb 2008 - 2:21 am | भडकमकर मास्तर

मस्त्...व्यक्तींच्या वर्णनामुळे तर बहार आलीय.....
...आता तुमच्याबरोबर दक्षिण भारताची सफर करणारच...
...पुढील भागाच्या प्रतीक्षेत..

स्वाती दिनेश's picture

12 Feb 2008 - 12:06 pm | स्वाती दिनेश

मस्त सुरुवात झाली आहे,तुमच्या दक्षिण सफरीची उत्सुकता वाढली आहे.वरील सर्वांप्रमाणेच पुढच्या भागांच्या प्रतिक्षेत.
स्वाती

धमाल मुलगा's picture

12 Feb 2008 - 12:15 pm | धमाल मुलगा

मजा आली वाचताना, सगळे किस्से थोड्याथोडक्या प्रमाणात आपल्याशीच स॑ब॑धीत असल्यासारख॑ वाटल॑.

सुधीरशेठ, झकास वाटतय हे वाचताना...
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत..

आपला,
- भटक्या ध मा ल.

प्रमोद देव's picture

12 Feb 2008 - 4:12 pm | प्रमोद देव

कांदळकर साहेब तुमची लेखन शैली मस्त आहे .
मित्रांच्या स्वभावाचे वर्णन वाचून एकूण एक नमूने डोळ्यासमोर उभी राहिले.
आता पुढील प्रवासातील गमती जमतीकडे लक्ष लागून राहिलेय.

केशवसुमार's picture

12 Feb 2008 - 4:18 pm | केशवसुमार

सुधीरशेठ,
मस्त लेख..
काही वर्षा पूर्वी मी फटफटी वरून पुणे- कन्याकुमारी- पुणे असा दौरा केला होता त्याची आठवण झाली..५ दिवसात ३३०० कि.मी फटफटीचा प्रवास संपला तेव्हा '*डिचा फणस होणे 'म्हणजे काय ते समजले होते पण मजा आली होती.. आयुषातला एक अविस्मर्णीय प्रवास होता तो..
पण सला आम्हाल तुमच्या सारखा हे पान पान खरडायला जमत नाही ना..ते आपला शब्दांची आदला बदल करून विडंबनेच बरी.. असो..
पुढचा भाग लवकर येऊद्या..
(फटफटी वर प्रेम करणारा) केशवसुमार.

धमाल मुलगा's picture

12 Feb 2008 - 4:27 pm | धमाल मुलगा

५ दिवसा॑त पुणे- कन्याकुमारी- पुणे...तेही फटफटीवरून ???

महाराज, कुठायत तुमचे पाय? फोटो पाठवा..देव्हार्‍यात ठेवतो !!!

बाकी '*डिचा फणस होणे' हे लय भारी :)) नवीन शब्द कळला, आमचा साध्या पुणे-कोल्हापुराच्या प्रवासातच फणस झाला होता !!! त्यात सुद्धा इथ॑ था॑ब तिथ॑ था॑ब करत ९-१० तास लागले कोल्हापुरात पोचायला.

-आपला
(फटफटी वर प्रेम करणारा, पण *डिची फणसपोळी होत असलेला) ध मा ल.

प्रमोद देव's picture

12 Feb 2008 - 4:40 pm | प्रमोद देव

'फट फटी' ह्या शब्दातच सगळे आले!
:-)

धमाल मुलगा's picture

12 Feb 2008 - 4:43 pm | धमाल मुलगा

प्रमोदकाका, तुम्हीसुद्धा ???

:)) खल्लास कोटी हा॑ ! ह.ह.पु.वा.

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 7:23 pm | सुधीर कांदळकर

चरणकमल धरायला पाहिजेत. आम्हीदेखील तरूण वयात फटफटीवरून ५ - १० पिकनिक्स केल्या. पण फणस होईपर्यंत नाही. दिवसाला जेमतेम २५० - ३०० कि.मी. मी अर्थात पिलियनवर. परंतु आपल्याकडे असामान्य प्रतिभा आहे जी माझ्याजवळ नाही. आपण ज्याला शब्दांची अदलाबदल म्हणता ते आज किती जणांना जमते? मी कां नाही करूं शकत? आपण देखील छान लिहू शकाल. फक्त मनांतील गंड काढून टाका.

प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

आपल्या पुढील साहित्या साठी शुभेच्छा.

सख्याहरि's picture

12 Feb 2008 - 5:14 pm | सख्याहरि

मि पा वरील फणसा सार्खि माणसे पहून मन अग्दी भरून येतंय..

-कोंकण प्रेमी सख्याहरी

सख्याहरि's picture

12 Feb 2008 - 5:35 pm | सख्याहरि

-सख्याहरी

बापु देवकर's picture

13 Feb 2008 - 1:40 pm | बापु देवकर

प्रवास वर्णन खुप छान आहे....पुढचा भाग लवकर पोस्ट करा...
राज....

मनीष पाठक's picture

14 Feb 2008 - 3:34 pm | मनीष पाठक

जिवंत प्रवास वर्णन. मीही त्यातलाच एक आहे अस कुठेतरी वाटु लागलय इतक जिवंत. म्हणुन पुढील भाग लवकर येउद्यात.

मनीष पाठक

सुधीर कांदळकर's picture

15 Feb 2008 - 7:17 pm | सुधीर कांदळकर

सर्वांच्या आपुलकीच्या प्रतिक्रियांनी भारावून गेलो आहे. कितीहि धन्यवाद कमीच पडतील.