युध्दस्य कथा रम्या: असं एक संस्कृत सुभाषित आहे. माझ्यापुरतं तरी ते १००% खरं आहे. लहानपणापासून युद्धकथा वगैरे वाचायची आवड होतीच. पुढे शाळकरी वयात दुसर्या महायुद्धाने आणि त्यातल्या त्यात जपान नावाच्या काहीतरी गूढ प्रकाराने तर अजूनच. युध्दाआधीचा जपान, तिथले प्रचंड लष्करीकरण, औद्योगिक प्रगति पण जुन्या रितीरिवाजांना / परंपरांना कवटाळून बसायची प्रवृत्ति... असे बरेच परस्पर विरोधाभास असल्याने एकंदरीतच जपान बद्दल गूढ वाटायचे / वाटते. तर, दुसर्या महायुद्धात झालेल्या काही अतिशय महत्वाच्या आणि ज्यामुळे युध्दाला अतिशय महत्वाची कलाटणी मिळाली अशा युध्दांबद्दल वाचत असताना, एक थोडेसे चमत्कारिक नाव कानावर पडले. "इवो जिमा". नाव कायमचे लक्षात राहिले.
"इवो जिमा" हे जपानी बेटसमूहापैकी एक बेट. जपानच्या मुख्यभूमी पासून खूपच दूर. युध्दात जेव्हा जपानची पीछेहाट सुरू झाली तेव्हा मुख्यभूमीच्या बचावासाठी जपानी सैन्याने इथे घट्ट पाय रोवून ठाण मांडले होते. या बेटाचे महत्व असे की, हे जर अमेरिकेच्या हाती पडले तर तिथे अमेरिकेला तळ बनवून सैन्य, आरमार आणि विमानं वगैरे ठेवता आले असते. आणि मग या तळाचा उपयोग मुख्यभूमीवर बाँबवर्षाव आणि हल्ले करण्यासाठी झाला असता. तेव्हा हे बेट वाचवणे हे अतिशय आवश्यक होते. पुढे अतिशय घनघोर लढाई झाली आणि शेवटी हे बेट अमेरिकेच्या हाती पडले. आजही अमेरिकेच्या मरिन कोअर साठी हे बेट एक तीर्थक्षेत्र आहे. नवीन भरती झालेले इथे श्रध्दांजली वाहण्यासाठी येतातच. तर जपानी सरकारनेही या बेटावर बराचसा भाग प्रतिबंधित केला आहे कारण जवळजवळ १० हजार जपानी सैनिकांची प्रेतं (अवशेष) तिथे विखुरलेली आहेत.
तर अशा या ऐतिहासिक घटनेवर आपल्या क्लिंट इस्टवुड आजोबांनी एक चित्रपट काढला आणि स्वतः दिग्दर्शित केला. खूप दिवसांपासून बघायची इच्छा होतीच. आज योग आला. अक्षरशः एकदाही जागचे न उठता बघितला हा चित्रपट. चित्रपट सत्य घटनांवर बेतलेला आहे. या लढाईत ज्याने जपानी सैन्याचे नेतृत्व केले होते, त्याने वेळोवेळी आपल्या बायको आणि मुलांना लिहिलेल्या पत्रात लढाईच्या आधीच्या तयारीचे आणि प्रत्यक्ष लढाईचे वर्णन केले होते. त्यावर आधारित एक पुस्तक निघाले आणि त्यावर आधारित हा चित्रपट. चित्रपट पूर्णपणे जपानी भाषेत आहे. इंग्लिश सबटायटल्स आहेत. काही काही प्रसंगात सबटायटल्स नसले तरी भाषा आड आली नसती एवढे सुंदर काम केले आहे अभिनेत्यांनी. साधारण कथानक असे.
इवो जिमा वर जपानी सैन्य ठाण मांडून बसले आहे. त्या सैन्याचा प्रमुख म्हणून ले. जनरल तदामिची कुरिबायाशी याची नेमणुक झाली आहे आणि तो अधिकार सूत्र हातात घ्यायला येतो. त्याच्या स्वागताला काही अधिकारी उपस्थित असतात. तिथपासूनच त्याच्या आधुनिक आणि कल्पक विचारांची आणि त्या जुन्या अधिकार्यांच्या जुनाट / पारंपारिक विचारांची लढाई सुरू होते. बेटाची पाहणी करता करता त्याला असे आढळते की जरी अमेरिकेचे सैन्य बोटींमधून किनार्यावर उतरेल तरी तिथेच (म्हणजे किनार्यांवर) त्यांच्याशी लढणे कठिण जाईल. बेटाच्या एका भागात त्या बेटावरचा सगळ्यात उंच डोंगर असतो. बेत असा ठरतो की सगळे किनारे मोकळे सोडायचे आणि त्या डोंगरावर तळ बनवायचा. जपानी सैन्यात 'साइगो' नावाचा एक सामान्य शिपाई दाखवला आहे. तो पेशाने बेकर असतो पण जबरदस्तीने सैन्यात भरती केले असते त्याला. हा या चित्रपटाचा दुसरा नायक. (रूढार्थाने या चित्रपटाला नायक नसला तरी कुरिबायाशी आणि साइगो ही मुख्या पात्रं आहेत. त्यांच्या नजरेतून, आठवणींमधून चित्रपट पुढे जातो.) तर हा साइगो युध्दाला कंटाळलेला असतो, त्याला युध्द वगैरे प्रकारातला फोलपणा कळून चुकलेला असतो. लढाई सुरू होते आणि नेहमीच्याच मार्गाने जात राहते. बरेचसे जपानी सैनिक मरतात. शेवटी अगदी मोजके सैनिक राहतात. कुरिबायाशी स्वत: जातीने त्यांना घेऊन हल्ला करायला निघतो. तुंबळ लढाई होते, आणि..... पुढचे बघायचे असेल तर चित्रपटच बघा.
या संपूर्ण प्रवासात, जपानी संस्कृती मधले जे काही कट्टर प्रकार आहेत ते अगदी छान टिपले आहेत. शत्रूच्या हाती जिवंतपणे न पडणे हे अतिशय महत्वाचे आहे. त्यासाठी मग हाराकिरी आलीच. लढाईच्या सुरूवातीला एका भागात जपानी सैन्याचे अगदी पानपत होते. काही मोजके सैनिक आणि २-३ अधिकारी उरतात. कुरिबायाशी त्यांना कसंही करून तिथून जीव वाचवून पळून येऊन दुसर्या एका भागातल्या तुकडीला मदत करायला सांगतो, पण या तुकडीच्या मुख्य अधिकार्याला ते पटत नाही आणि तो स्वत: हाराकिरी तर करतोच पण बाकीच्या सैनिकांना पण भाग पाडतो. साइगो तिथेच असतो, पण तो जीव वाचवून पळतो तिथून. दुसरीकडे जाऊन मदत करण्याऐवजी, 'दिलेली जबाबदारी मला पार पाडता आली नाही म्हणून जीव देणे अधिक योग्य' अशा प्रकारच्या आत्मघातकी विचारांमुळे जपानी सैन्य अजून कमजोर आणि संख्येने घटत जाते. समोर मृत्यू अटळ दिसत असताना सैनिक सगळी सामानाची आवराआवरी करतात वगैरे दृश्ये छान घेतली आहेत.
अजून एक छान दृश्य / संवाद म्हणजे.... एक जखमी अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती लागतो. त्याच्या जवळ त्याच्या आईने लिहिलेले पत्र असते. त्या पत्राचे जाहिर वाचन तिथला इंग्लिश बोलणारा अधिकारी जपानी मधून करतो तेव्हा साइगोचा एक साथी त्याला म्हणतो, "माझ्या आईने पण मला अगदी हेच सांगितले आहे".
युध्दासारखा तीव्र भावनिक विषय असला तरी पूर्ण चित्रपट अतिशय संयतपणे पण त्यामुळेच परिणामकारी पद्धतीने मांडलेला आहे. (आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.) कुठेही आरडाओरडा नाही, डायलॉगबाजी नाही. उपदेश वगैरे नाही. सगळं कसं अगदी 'रिअल लाईफ'. बरंचसं चित्रण स्टुडिओ / सेट वर झालेल असले तरी कृत्रिमता कुठेही जाणवत नाही. छायाचित्रण पण आवडले. एकंदरीत एक छान चित्रपट बघायची इच्छा असल्यास जरूर बघा.
जाताजाता... या चित्रपटाची अजून एक गंमत म्हणजे, बहुतेक लोकप्रिय चित्रपटांचे सिक्वेल्स / प्रिक्वेल्स निघतात. पण या चित्रपटाच्या बाबतीत तसे नाहीये. या चित्रपटाला आहे एक साथी चित्रपट. म्हणजे क्लिंट इस्टवुडनेच दिग्दर्शित केलेला 'फ्लॅग्ज ऑफ अवर फादर्स'. हा चित्रपटही इवो जिमाच्या लढाईवरच आहे पण त्यात अमेरिकेच्या दृष्टिकोनातून लढाई दाखवलेली आहे!!! दोन्हीही चित्रपट फक्त २ महिन्यांच्याच फरकाने प्रदर्शित झाले होते.
प्रतिक्रिया
29 May 2009 - 5:44 am | सूर्य
वा! चांगल्या चित्रपटाची माहीती दिलीत बिपीनराव. आजोबांनी डिरेक्ट केलेला म्हणजे उत्तम असणारच. तुम्ही जसे लिहिले आहे त्यावरुन उत्सुकता वाढली आहे.
बाकी 'आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.' याच्याशी अगदी सहमत.
- सूर्य.
29 May 2009 - 7:23 am | विसोबा खेचर
वा! चांगल्या चित्रपटाची माहीती दिलीत बिपीनराव.
हेच बोल्तो..!
बिपिनभौजी, जियो..!
तात्या.
29 May 2009 - 5:52 am | विकास
चित्रपट परीचय आवडला. नवीन माहीती कळली... क्लिंट इस्टवूड म्हणले की केवळ डर्टी हॅरीच डोळ्यासमोर येतो.. या चित्रपटाच्या निमित्ताने जरा काही वेगळे पहायला मिळेल असे वाटले.
29 May 2009 - 6:34 am | अवलिया
बिपिनशेट ! सुंदर ओळख !!
:)
--अवलिया
29 May 2009 - 7:30 am | सँडी
एक जखमी अमेरिकन सैनिक जपान्यांच्या हाती लागतो. त्याच्या जवळ त्याच्या आईने लिहिलेले पत्र असते. त्या पत्राचे जाहिर वाचन तिथला इंग्लिश बोलणारा अधिकारी जपानी मधून करतो तेव्हा साइगोचा एक साथी त्याला म्हणतो, "माझ्या आईने पण मला अगदी हेच सांगितले आहे".
अमेझिंग!!! आता चित्रपट पहावाच लागेल. :)
नाविन्यपुर्ण आस्वाद!
आवडले.
29 May 2009 - 7:53 am | प्राजु
एका चांगल्या चित्रपटाची ओळख करून दिलीस बिपिनदा..!
नक्कीच बघेन हा चित्रपट.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
29 May 2009 - 7:59 am | सहज
हा चित्रपट यादीत टाकून ठेवला आहे.
बिपिनदा उत्तम परिक्षणाबद्दल धन्यवाद.
29 May 2009 - 11:56 am | स्वाती दिनेश
हा चित्रपट यादीत टाकून ठेवला आहे.
मी ही..
बिपिन, परीक्षण आवडले हेवेसांनल.
स्वाती
29 May 2009 - 10:03 am | दिपक
वाह बिपीनदा माझ्या आवडत्या चित्रपटाबद्दल खुप छान लिहिले आहे. हा चित्रपट दोन महिन्यांपुर्वी पाहिला होता. त्याबद्दल इथे दोन ओळी लिहिल्या होत्या. तादामीची कुरुबायेशी(केन वॉटनेबी) अभिनयाला तोड नाही. अप्रतिम चित्रपट.
अक्षरशः एकदाही जागचे न उठता बघितला हा चित्रपट.
![](http://ia.media-imdb.com/images/M/MV5BMjA0NjQ5NDgyOF5BMl5BanBnXkFtZTcwMzI5MDIyMg@@._V1._SX600_SY400_.jpg)
खरयं!
29 May 2009 - 10:04 am | भडकमकर मास्तर
मस्त परीक्षण..
पाहिला पाहिजे चित्रपट...
____________________
आवाज खालच्या सप्तकात बोलायला हवा असेल तर खर्जाचा रियाज करा.... ;)
29 May 2009 - 12:37 pm | घाटावरचे भट
>>(आपल्याकडचे काही 'बॉर्डर' वगैरे युद्धपट आठवले, तुलना करवतच नाही.)
ही लेख वाचून सहज म्हणून विचार करताना वाटलं की भारतात चांगले युद्धपट कधीच का बनले नाहीत? (केवळ तांत्रिकदृष्ट्या नव्हे, तिथे पैसा हा एक घटक असू शकतो, तर आशयाच्या दृष्टीनेसुद्धा.) बॉर्डर, एलओसी वगैरे दत्ताप्रभृती मंडळींचे सिनेमे तर युद्धपट म्हणून अत्यंत उथळ आहेत. याची कारणे कोणती असावीत? मला वाटली ती अशी -
१) युद्धपटातही प्रेमकथा, गाणी वगैरे घुसवण्याच्या नादात पटकथेची वाट लागते.
२) युद्धाचं त्रयस्थ चित्रण न दाखवता भावनेच्या आहारी जाणे. दत्तांचे चित्रपट तर अतिशय जिंगोईस्टिक वाटतात.
३) एक देश म्हणून युद्धाच्या बाबतीत कमी पडणारा आपला अनुभव (फक्त चार, ४८चं धरून ५, त्यातही एक हरलो त्यामुळे त्याच्यावर चित्रपट फारसे नाहीत. शिवाय युद्धांची स्केलही लहान.)
४) तांत्रिक सफाईचा अभाव (हे आजकाल जरा कमी झालंय. लक्ष्य सिनेमातली लढाईची दृष्यं बरी होती).
५) पहिल्या आणि जास्तकरून दुसर्या महायुद्धात युरोपात आणि अमेरिकेत एकूणातच खूप जास्त लोकांना युद्धाला तोंड द्यावं लागणं (युद्धामुळे नुकसान होणं, जवळच्या व्यक्ती युद्धात असणं वगैरे). मला वाटतं आपल्या भारतीय जनतेला युद्धाची प्रत्यक्ष झळ फारशी कधी बसलेली नाही. म्हणूनही युद्ध आणि जिंगोइझम यांचं असं समीकरण भारतीयांच्या मनात असावं.
अजून कोणती कारणं आहेत असं तुम्हाला वाटतं?
29 May 2009 - 12:57 pm | कपिल काळे
सहमत! भटाशी .
परिक्षण मस्तच.
30 May 2009 - 4:15 am | चतुरंग
अजून एक गोष्ट अशी वाटते की युद्धपट म्हणजे थेट आणि फक्त युद्धच दाखवायला हवे अशी समजूत.
युद्धाच्या पार्श्वभूमीवर मानवी संबंधांचे इतर धागेदोरे, माणसाच्या मूलभूत प्रवृत्ती, देशांचे एकमेकांशी वैर असले तरी सर्वसामान्य माणसाला खरेतर युद्ध नको असण्याची मानसिकता अशा काही गाभ्याला हात घालणार्या विषयांवर विचार केलेले चित्रपट नसतात त्यामुले उथळ आणि बटबटीतपणा येण्याची शक्यता वाढते.
('लक्ष्य' त्यामानाने मला बराच संयत वाटला होता. विशेषतः उत्तरार्ध.)
चतुरंग
30 May 2009 - 3:03 am | बिपिन कार्यकर्ते
प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद.
मी जेव्हा 'बॉर्डर'चा उल्लेख केला तेव्हा 'त्यांचं चांगलं म्हणून आपलं वाईट' असा काही उद्देश नव्हता आणि नाही. मला हेच म्हणायचे होते की आपल्याकडे निखळ थरारक युध्दपट नाहीच आहेत. कोणताही युध्दपट घ्या. त्यात बरीच दुसरी कथानकं असतात. युध्दाचे चित्रण पण नकली वाटते. (पण बॉर्डर मधे युध्दाचे चित्रण मात्र चांगले केले होते हे कबूल करावे लागेल.) चित्रणाच्या बाबतीत मला आजपर्यंत लक्ष्य मधले चित्रण सगळ्यात जास्त आवडले. विशेषतः कडा चढायचा प्रसंग. पण लक्ष्य हा निखळ युध्दपट नाही.
शिवाय लाऊड अभिनय, एकदम दणकून संवाद वगैरे जीव खातात. आपण अजून एक नेहमी करतो... आपल्या युध्दपटांमधे शत्रू (म्हणजे पाकिस्तानी) अगदी फालतू, सुमार बुद्धीचे वगैरे असतात.
भटाने मुद्दे छानच मांडले आहेत. मला अजून असे वाटते की पाश्चात्य लोक कोणतीही गोष्ट करताना पूर्ण संशोधन करून, बारकावे वगैरे सकट तयारी करतात. आणि चित्रण करताना पूर्ण आर्थिक ताकद वापरली जाते. क्वालिटीत तडजोड नसते.
बिपिन कार्यकर्ते
30 May 2009 - 3:15 am | मुक्तसुनीत
लेख आवडलाच. चित्रपट यादीत टाकतो आहे. भट यांची प्रतिक्रिया (नेहमीप्रमाणेच) सांगोपांग विचार करणारी , प्रसंगी वर्मावर बोट ठेवणारी झाली आहे. भारतीय चित्रपटांच्या संदर्भात मात्र , हरलेल्या युद्धावर बनलेला एक चित्रपटच , सर्व युद्धपटांचा आदर्श आहे (हकीकत) हा मुद्दा त्यांनी नजरेआड केलेला दिसतो :-)
एक कळीचा मुद्दा : एका अमेरिकनाने जपानी बाजूचे चित्रण करताना विश्वासार्हता, निष्पक्षपातीपणा , विषयाला न्याय देणे या मूल्यांचे जतन कितपत झाले आहे ?
30 May 2009 - 3:25 am | बिपिन कार्यकर्ते
एका अमेरिकनाने जपानी बाजूचे चित्रण करताना विश्वासार्हता, निष्पक्षपातीपणा , विषयाला न्याय देणे या मूल्यांचे जतन कितपत झाले आहे ?
जरी हा सिनेमा जपानी सैन्याच्या दृष्टीकोनातून बघतो असे म्हणले असले तरी, ते तितकेसे बरोबर नाहीये. जपानी सैन्याच्या बाजून असे म्हणले तर खरे तर असे पाहिजे की चित्रपट जपानची बाजू मांडतो, युध्दाचे काही समर्थन देतो वगैरे असायला पाहिजे. पण तसे नाहीये. त्या लढाईत, जपानी सैन्याच्या भागात काय आणि कशा घडामोडी झाल्या त्याचे चित्रण आणि त्याच्या आधाराने काही गोष्टी मांडतो. कुरिबायाशी (जो सर्वोच्च नेता आहे) आणि साइगो (जो एक साधा शिपाई आहे) या दोन्ही मुख्य व्यक्तिरेखा युध्दाच्या व्यर्थतेवर बोट ठेवणारी भाष्य करतात.
तरी सुध्दा, जपानी सैन्याचे / सैनिकांचे मानवी रूप समोर मांडण्यात दिग्दर्शक यशस्वी झाला आहे असेच म्हणावे लागेल. कुठेही जिंगोइस्टिक अथवा प्रचारकी थाट जाणवत नाही.
बिपिन कार्यकर्ते
30 May 2009 - 3:25 am | Nile
मि पाहीला आहे सिनेमा, फार आवडला नाही. :)
या बाबतीत शंका नको, सहसा हे लोक असं करत नाहीत(कारणं वेगळी:)) The Last Samurai पहा, सुंदर बनवला आहे. यामध्ये जो जपानी जनरल(नट) झाला आहे तोच त्यात लास्ट समुराय आहे. :)
बाकी पाश्चात्य लोक फक्त "सुंदरच" सिनेमे बनवतात याबाबतीत मि असहमत आहे. त्यांचे आपण "सुंदर" सिनेमेच बघतो असे असु शकेल. (अर्थात मी फक्त सुंदरच नाही बघीतले म्हणुन हे विधान ;) )
30 May 2009 - 3:29 am | बिपिन कार्यकर्ते
बाकी पाश्चात्य लोक फक्त "सुंदरच" सिनेमे बनवतात...
मला असं अजिबात म्हणायचं नव्हतं. मी फक्त युध्दपटांच्या बाबतीत हे लिहिलं होतं. :)
लास्ट सामुराई हा मला आवडलेला अजून एक चित्रपट...
बिपिन कार्यकर्ते
30 May 2009 - 3:30 am | Nile
तुम्हाला नाही हो तसं म्हट्ल. एकंदरी असा सुर दिसला लोकांचा म्हणुन. :)
पण आपल्यापेक्षा पाश्च्यात्य लोकांकडे अनेक प्रकारचे प्रेक्षक टारगेट करणारे सिनेमे (जास्त संख्येने) निघतात हे मात्र अगदी खरं.
30 May 2009 - 9:53 am | आनंदयात्री
>>पण आपल्यापेक्षा पाश्च्यात्य लोकांकडे अनेक प्रकारचे प्रेक्षक टारगेट करणारे सिनेमे (जास्त संख्येने) निघतात हे मात्र अगदी खरं.
क्या बात है !! आवडुन गेला तुमचा आउट ऑफ द बॉक्स व्यु :)
बाकी बिपिनदा बरे केलेस लिहलेस ते .. पुढल्यावेळेस भेट्शील तेव्हा नक्की दे तो चित्रपट.
30 May 2009 - 3:16 am | चंबा मुतनाळ
मला त्यामानाने, मनोज बाजपेयीचा अभिनय असणारा भारतीय युद्धकैद्यांवर काढलेला १९७१ हा चित्रपट आवडला होता. काहिही फाफट पसारा नसलेला आणी विषयाला धरून काढला होता.
- चंबा
30 May 2009 - 4:08 am | चतुरंग
हा मध्यंतरी टाळला सिनेमा, बघू की नको अशी द्विधा अवस्था होती. पण आता उत्सुकता निर्माण झाली आहे बघायची.
चतुरंग
30 May 2009 - 8:18 am | डॉ.प्रसाद दाढे
चांगला चित्रपट परिचय बिपिनराव, पाहिला पाहिजे!
सध्या तंत्रज्ञान सुधारले असले तरी तात्विक, वैचारिक आणि प्रेम-कहाणी नसलेले चित्रपट भारतात दुर्मिळ आहेत. 'लाईफ इज ब्यूटिफूल', 'लास्ट सामुराई'
किंवा 'ब्रिज ऑन दी रिव्हर क्वाय' सारखे चित्रपट आपल्या डेव्हिड धवन किंवा बडजात्यांनी हिंदीत बनविले आहेत हे स्वप्नरंजनही वृथा आहे. 'वेन्स्डे' सारखे अपवादही
आहेत्, पण अपवाद उदाहरण होऊ शकत नाहीत. ऍव्हरेज भारतीय प्रेक्षकांचा एकंदरीत आय्-क्यूसुद्धा कारणीभूत आहेच. मागे एकदा माझी ह्याच विषयावरून
हेमंत देवधरांशी (राजा शिवछत्रपतीचे दिग्दर्शक) चर्चा झाल्याची आठवली. ते पूर्वी जब्बार पटेलांबरोबर काम करीत असत. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे असे वैचारिक किंवा 'वेगळे' चित्रपट मराठीत वा एकंदरीत भारतात फारसे चालत नाहीत त्यामुळे फायनान्सरही पैसे घालायला कचरतात; शेवटी सगळे गणित येऊन पोहोचते पैश्यांवरच!
30 May 2009 - 9:15 am | शरदिनी
बॉर्डरमध्येही युद्धाच्या व्यर्थतेचे काही संवाद आहेत असे वातते...
नक्की आठवत नही, पण पत्र येते त्यावेळी तो शत्रूबद्दल असे काही बोलतो असे वाटते...
... युद्ध हे भारी असे त्यांना म्हणायचे आहे " हे तुमचे मत असावे असे वाटले..
10 Nov 2016 - 2:08 pm | सिरुसेरि
छान ओळख . "द गुड द बॅड अॅन्ड द अग्ली" वाल्या क्लिंट इस्टवुडचे "द मिलिअन डॉलर बेबी " , "लेटर्स फ्रॉम इवो जिमा" व इतरही चित्रपट खुप आवडले . "फ्युरी" , " शिंडलर्स लिस्ट" हे असेच लक्षात राहिलेले चित्रपट .