वरीस पाडवा (२)

अरुण वडुलेकर's picture
अरुण वडुलेकर in जनातलं, मनातलं
17 May 2009 - 9:26 am

एवढं बोलून मुकादम फटफटीला किक मारून चालता झाला.

दिना फटफटीने सोडलेल्या धुराच्या पुंजक्याकडे पहातच राहिला. दिना पाय ओढीत घराकडे चालायला लागला तेंव्हा रानात गेलेली गुरं परतायला लागली होती. मुकादम असा तिर्‍हाईतासारखा वागेल असं त्याला कधी वाटलं नव्हतं. पाय पुढे चालत होते आणि मन मागे भरकटायला लागलं होतं. आठ वर्षांपूर्वी दिनाच्या गावांतून कामधंद्याच्या शोधात शहराची वाट धरलेल्या गरजू तरुणापैकी एक तरूण म्हणजे जालिंदर कुमावत. तसा जरा हिकमती स्वभावाचा. बाकी तरूण जो मिळेल तो कामधंदा, जमेल ते कसब यांत गर्क झाले. स्थानिक मजूरांपेक्षा कमी पैशात काम करूं लागले म्हणून स्थिरावले. पण तरीही शहरातला असलेला मजुरांचा तुटवडा जालिंदरने बरोबर हेरला आणि अवकळा झालेल्या विदर्भातल्या गांवा गांवाकडे चकरा मारून मजूर पुरविण्याचा धंदा करू लागला. शहरी भाषेत लेबर कॉन्‍ट्रॅक्टर आणि साध्या भाषेत मुकादम झाला. गरज संपली की आपणच आणलेल्या माणसांना वार्‍यावर सोडायचे आणि पुन्हा गांवाकडून गरजू कामगारांची फौज आणायची हे कत्रांटदारीतले कसबही त्याला आपसुकच साधले. मुकादम दिनाचा तसा दुसताच गांवकरी नव्हता तर कौशीच्या दूरच्या नातेवाईक लागत होता. त्या नात्याने सुरुवातीला दिनाला भाऊजीही म्हणत असें. आणि त्यामुळेंच बहुदा दिनाला त्याने रखवालदाराची नौकरी दिली होती. साईटवर रहाण्याची मोफत सोय होते आहे आणि कौशीही सतत डोळ्यासमोर राहू शकते या दोन लोभापायी दिनाने रखवालदारी पत्करली होती. पण रखवालदारी पेक्षा गवंडी, सुतार, सेन्टारिंग फिटर असे कांही झालो असतो तर फार बरे झाले असते असे दिनाला वाटायला लागले. या कारागिरांना रोजीही चांगली मिळते, हप्त्याच्या शेवटी रोख मिळते आणि शिवाय बुधवारची सुटीही मिळते. रखवालदारासारखं चोवीस तास बांधून रहायला नको. कारागिरी काय, सहा वर्षं झाली कामाला लागून, बिगारी काम करता करता शिकतांही आले असतें. दिनाचं डोकं विचार करून करून थकलं आणि पाय चालून चालून. दिनाला त्याचंही फारसं कांही वाटलं नाही. कारण मुकादम इतरांच्या बाबतीत असाच वागलेला त्याच्या कानावर आलेलं होतं. पण सगळ्यात जीवघेणी जखम झाली होती ती मुकादमानं घेतलेल्या संशयानं. दिनाला तो वार फार खोलवर लागला. इतके दिवस इमानदारीने काम करूनही ही अशी संभावना व्हावी या विचाराने तो उबगला होता. आणि मग आपण चोर नसतांही चोर ठरवले जाणार असूं तर मग इमानदारी तरी कां करायची, या विचारापाशी दिना पुन्हा पुन्हा येत राहिला. आपण रखवालदार होण्यापेक्षा गवंडी कां झालो नाही याची खंत करीत राहिला.

नुसता ओढून घेतलेला दरवाजा ढकलून दिना घरांत शिरला तर कौशी उभ्या गुडघ्यावर हनुवटी टेकवून त्याची वाट बसलेली. कृष्णा बाजूच्या खाटेवर शांत झोपलेला. कौशी जेवणाची ताटं वाढत होती तोवर हातपाय धुऊन दिना तिच्या समोर येऊन बसला. कांही न बोलता मुकाट जेवला. त्याचा रागरंग पाहून कौशीही गप्पच राहिली. कौशी आवरासावर करीत होती तेंव्हाही तो शून्यात नजर लावूनच बसला होता.

" हं, काय झालं? मुकाडदम भेटला?" अखेर कौशीने त्या शांततेला तडा दिलाच.
" हूं. भेटला."
" काय म्हनाला?"
" काय न्हाई"
" म्हंजी......"
" उंद्याला बंदुबस्त व्हईन"
" म्हंजी......"
" म्हंजी, म्हंजी काय लावलया? उंद्याला बंदुबस्त व्हईन म्हनलं ना!" आपण कां इतके करवादलो हे दिनालाही समजेना.
" अवो पर म्हंजी.......कसा? आन्‌ यवडं चिरडायला काय झालं?"
" आता काय बी इचारू नगंस. लै दमायला झालंय बग. उंद्याला तुला पैसं भेटतीन. डाळ,गूळ, हार, कडं सम्दं काय ते घेऊन यी."

कौशीनं फणकार्‍यानं नाक मुरडलं आणि कृष्णाशेजारी जाऊन पडली. दिना लगेच झोपणार नव्हता. बांधकामाच्या जागेवर एक गस्त घालून येणार होता.
आणि आज तर गस्तीला थोडा जास्तच वेळ लागणार होता. दिना कंदील आणि काठी घेऊन निघाला. आज त्याने चाव्यांचा जुडगाही बरोबर घेतला होता. एक नावापुरती गस्त घालून झाली तसा दिनानं हळूच आवाज न करतां बांधकाम साहित्याच्या गुदामाचं कुलुप उघडलं. एक रिकामी गोणी घेतली आणि शिल्लक राहिलेल्या दरवाज्याच्या बिजागर्‍या, कडी-कोयंडे, नळकामाचे सुटे भाग, आणखीही कांही लोखंडी सामान इत्यादि गोळा करून गोणीत भरायचा सपाटा सुरूं केला. अशा दोन गोण्या भरल्या. त्या त्याने उरापोटावर उचलून दाराच्या बाहेर नेउन ठेवल्या. दाराला पुन्हा कुलुप लावून बाहेर येऊन बसला. हाताच्या बाहीला कपाळावर आलेला घाम पुशीत तो पुढची योजना मनाशी ठरवूं लागला. उद्या पहांटे, अंधारातच तो या दोन गोण्या डोक्यावर घेऊन पुन्हा वस्तीकडे जाणार होता. याकूब भंगारवाला फार कांही लांब रहात नव्हता. पहांटच्या वेळेला याकूबकडे अशा मालाचा राबता असतोच हे दिनाला माहिती होते. दिनाच्या अंदाजाने या मालाचे वजन किमान चाळीस किलो तरी भरणार होते. याकूबने कांटा मारला तरी सात रुपयाच्या भावाने दोन अडीचशे रुपये नक्कीच मिळणार होते. कौशीला काय सांगायचं ते उद्याचं उद्या पाहू. सांगू मुकादमाकडून उचल आणली म्हणून. इतकं सारं मनाशी पक्कं करीत दिना घरापाशी पोहोचला आणि बाहेर अंगणात कौशीनं टाकलेल्या अंथरुणावर झोपी गेला.

दुसरे दिवशी दिनाला जाग आली ती कौशीच्या आवाजाने. दचकून दिनाने नजरेच्या टाप्प्यातल्या इमारतीकडे पाहिलं. त्या दोन गोण्या सकाळच्या कोवळी उन्हं घेत होत्या. दिना दचकून उभाच राहिला.

"काय झालं? कुनाशी बोलत होतीस?"
" अवो ते कुरकळणी काका"
"कोऽऽन?"
" मी कामाला जाती ना त्या बंगल्यात. थितलं मालक"
" बरं मग?"
" इक्तं डोळ फाड फाडून कां बगायलाय म्हन्ते मी. कोन रावन आला न्हाई तुमच्या शितेला पळवायला" कौशी डोळे चमकवीत हंसत होती.
" मस्करी सोड. कोन ते कायले आले व्हते ते बोल."
" सांगते! जरा दमानं घ्या की."
" हां बोल."
" ते काका हैत ना. त्यांच्या घराच्या मांग पान्याच्या मीटराचं चेम्बर हुगडच हाय"
" बरं.मग!"
" त्यांच्यात उंद्या तेंची ल्येक येनार हाय. माघारपनाला."
" बरं. मग!"
" तिची कच्ची बच्ची हैत. उगं खेळता खेळता येखांद पडन बिडन चेंबरात. म्हनतांना ते झाकाय पाहिजे."
" बरं मग!"
" डोच्कं तुमचं! त्याला ढापा लावून देशान कां म्हून इचाराय आले हुते, काका."
" अगं पर ते गवंड्याचं काम हाय."
" घ्याऽऽऽ! कुबेरानं धाडला घोडा आन्‌ रावसाहेबांचा फाटका जोडा"
" ये माजे आये! काय समजंन असं बोल की."
" काय कीर्तन समजायचंय त्यांत. रखवालदारानं गवंड्याची थापी हातात घेतली तर काय पाप लागंन कां?"
" पर मला जमंन कां त्ये?"
" अवो निस्तं ढापं तर बसवायचंय. शिमिट बिमिट सम्दं सामान हाय थितं. तुमी करनार नसान तर मी करीन."
" हॉ! मी करीन म्हनं. ते चूल लिपाय यवढं सोप्पं हाय काय?"
" तुमी चूल लिपा सोप्पी. मी ढापं लिपिते."

कृष्णाचा आवाज आला तशी कौशी घरांत गेली. संभाषण अर्धवट राहिलं. पण दिना मनाशी विचार करू लागला. काय अवघड आहे गवंडी काम. कधी बिगारी म्हणून गवंड्याच्या हाताखाली काम करायची संधी मिळाली असती तर ते कामही शिकायला मिळाले असतेच. आज अनायसे काम करून पहायची वेळ आली आहे तर काय हरकत आहे करून बघायला. दिना तसाच गुदामाकडे. गेला इकडे तिकडे बघत गोण्या गुदामात टाकून दिल्या. तिथेच एका गवंड्याची राहिलेली हत्याराची पिशवी उचलली आणि खोपटाकडे परतला. अंघोळ उरकली आणि कुलकर्ण्यांच्या बंगल्याकडे गेला.

ढाप्याचं काम दिनाला फार कांही अवघड गेलं नाही. आणि मग ते काम चटक्यासरशी झाल्यानं कुलकर्णी काकांच्या शेजारच्या बंगल्याच्या अंगणात चार फरशा बसवायचंही काम दिनाला मिळालं. मध्ये एकदा घरी येऊन भाकरी खाऊन गेला तेवढाच काय तो खंड पडला. पण सायंकाळी दिना घरी परतला तेंव्हा दिडशे रुपयाच्या नोटा दिनाने कौशीच्या हातावर ठेवल्या. कौशीच्या डोळ्यात पाणी तरारलं. काल रात्रीही दिनाच्या नकळत जाऊन दिनाला गोण्या भरतांना गुपचुप पाहूनही कौशीचे डोळे डबडबले होतेच. पण आताच्या पाण्यानं डोळ्याला गारवा लागत होता.

भल्या सकाळी चुलीवर शिजलेल्या डाळीत कौशी गूळ हाटीत होती. त्याचा सुवास दरवळत होता. दिना गुढीची आणि गुढीच्या खाली पाटावर मांडलेल्या गवंडी कामाच्या नवीन अवजारांची पूजा करीत होता. मनांत एक संकल्प जागा झाला होता. जीवनाला एक नवी दिशा मिळाली होती.

समाप्त

कथाविरंगुळा

प्रतिक्रिया

प्रमोद देव's picture

17 May 2009 - 9:48 am | प्रमोद देव

आवाडली कथा.
एकून वरीस पाडवा झोकात झाला म्हनायचा!

हाती नाही येणे,हाती नाही जाणे,हसत जगावे,हसत मरावे, हे तर माझे गाणे!

सहज's picture

17 May 2009 - 10:14 am | सहज

कथा आवडली.

यशोधरा's picture

17 May 2009 - 10:15 am | यशोधरा

मस्त कथा एकदम! :)
खूप आवडली.

पाषाणभेद's picture

17 May 2009 - 10:25 am | पाषाणभेद

मस्त कथा.
शालेय पाठ्यपुस्तकात शोभेल असा धडा दिनाने दिला.

मुल आणि कविता होईपर्यंत खाजगी असते आणि एकदा "झाल्यानंतर" ते सार्वजनीक होते.
- मराठी आणि बेळगाव, कारवार, अहवा, डांग, बर्‍हाणपूर, गोव्यासह संयुक्त महाराष्ट्र प्रेमी - पाषाणभेद उर्फ दगडफोड्या (- राजेंनी बहाल के

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

17 May 2009 - 11:45 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

मस्त ! आवडली कथा.
अजून येऊ द्या !

-दिलीप बिरुटे

समिधा's picture

17 May 2009 - 11:58 am | समिधा

मस्त लिहीलीय कथा, अजुन नविन कथा जरुर येउद्यात.

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

स्वाती दिनेश's picture

17 May 2009 - 2:16 pm | स्वाती दिनेश

कथा आवडली..
लिहिण्याच्या ओघात मुलाचे नाव रामाचे कृष्णा आणि एके ठिकाणी कौशीची सुशी झाली आहे तेवढे संपादन केलेत तर उत्तम, बाकी कथा आवडली हे वे सां न ल.
स्वाती

अरुण वडुलेकर's picture

17 May 2009 - 2:34 pm | अरुण वडुलेकर

तुम्ही जशी एक सुशीची चूक दाखवलीत तशी प्राजु यांनी राम ची चूक दाखवून दिली आहे.
तुम्ही कथा इतक्या काळजीपूर्वक वाचतां आहांत हे पाहून बरं वाटलं . आता प्रकाशित झालेली कथा
पुन्हा संपादित करण्याची सुविधा असेल तर दुरुस्ती नक्की करता येईल.

पुनश्च धन्यवाद.
असाच लोभ असो द्यावा ही विनंती.

स्वाती दिनेश's picture

17 May 2009 - 2:54 pm | स्वाती दिनेश

मला वाटते संपादन करण्याची सुविधा आहे, तुम्हाला लेख उघडलात की 'संपादन' असे दिसेल, त्यावर टिचकी मारुन तुम्ही अजूनही संपादन करु शकाल.
धन्यवाद,
स्वाती

अरुण वडुलेकर's picture

17 May 2009 - 3:26 pm | अरुण वडुलेकर

कथेत आवश्यक ती सुधारणा केली आहे.
मार्गदर्शनाबद्दल धन्यवाद.

अरुण वडुलेकर's picture

17 May 2009 - 3:33 pm | अरुण वडुलेकर

वरीस पाडवा ही कथा आणि इतरही कांही
कृपया इथे वाचा http://malatinandan.blogspot.com

लवंगी's picture

17 May 2009 - 4:38 pm | लवंगी

कथा आवडली

शक्तिमान's picture

17 May 2009 - 4:58 pm | शक्तिमान

उत्तम!
बऱ्याच दिवसांनी उत्तम मराठी लेखन वाचायला मिळाले!

प्राजु's picture

17 May 2009 - 7:27 pm | प्राजु

खूप आवडली..
शेवट सुखदायक आहे हे खूप आवडले.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

बिपिन कार्यकर्ते's picture

17 May 2009 - 11:14 pm | बिपिन कार्यकर्ते

पुनरागमन झोकातच!!! मस्त कथा. लेखन पण धारावाही आहे.

बिपिन कार्यकर्ते

रेवती's picture

18 May 2009 - 7:41 am | रेवती

कथा आवडली!
पहिला भाग वाचून काहीतरी वाईट होइल असं वाटत होतं....
कथेचा शेवट चांगला झालेला वाचून आनंद वाटला.

रेवती

प्राची's picture

23 May 2009 - 12:28 pm | प्राची

हेच म्हणते.
कथा आवडली....:)

क्रान्ति's picture

19 May 2009 - 8:17 pm | क्रान्ति

खूप सुन्दर कथा! शेवट अगदीच खास.
क्रान्ति
***मन मृदु नवनीत | मन अभेद्य कातळ
मन भरली घागर | मन रिकामी ओंजळ***

बहुगुणी's picture

22 May 2009 - 12:05 am | बहुगुणी

...अगदी डोळ्यासमोर खरीखुरी पात्रं उभी राहिली असं वाटलं. आपलं आणखी साहित्य वाचायला आवडेल.

टिउ's picture

22 May 2009 - 11:48 pm | टिउ

छान कथा आहे...तुमच्या अनुदिनीवरचे बाकी अनुभव/कथाही वाचतोय!