साध्या सोप्या संदर्भांचा अर्थ लावणंही कठीण होतंय
भोवळ येईतो फिरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का?
अज्ञात भविष्याच्या दोरीवरून अधांतरी चालताना
मनाचा तोल सावरत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का?
नाचवणारी बोटं कुठली, धागा कुठला, दिसत नाही
बाहुल्या होऊन नाचत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का?
अश्वत्थाम्याच्या जखमेसारखा भळभळणारा शापित जन्म
जखमा फुलवत हसत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का?
चक्रव्यूहात तडफडणा-या अभिमन्यूच्या अगतिकतेनं
दैवाच्या गुंत्यात अडकून जाणं, एवढंच हाती राहिलंय का?
प्रतिक्रिया
23 Apr 2009 - 10:34 pm | प्राजु
नाचवणारी बोटं कुठली, धागा कुठला, दिसत नाही
बाहुल्या होऊन नाचत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का?
हे खासच!
नाचवणारा, धागे ओढणारा 'तो'च. आपण फक्त नाचत रहायचं. नाही नाचलो तरी ... 'तो' स्वतःच आपले हात्-पाय हलवतो. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
24 Apr 2009 - 2:38 am | अनामिक
नाचवणारी बोटं कुठली, धागा कुठला, दिसत नाही
बाहुल्या होऊन नाचत रहाणं, एवढंच हाती राहिलंय का?
ह्या ओळी खूप आवडल्या. किती सहज आणि सुंदर कविता करता तुम्ही.
-अनामिक
24 Apr 2009 - 7:31 am | उमेश कोठीकर
जीवघेणे प्रश्न आणि कमालीची कविता!
24 Apr 2009 - 1:03 pm | जागु
आवडली कविता.
24 Apr 2009 - 1:27 pm | परिकथेतील राजकुमार
भारीच लिहिलय बॉ क्रांतीतै !
जास्ती काहि कळत नाही कवितेतले पण वरच्या साध्या सोप्या ओळीतल्या भावना मनाला भिडल्या.
परार्जुन
©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य