निरोप घेताना..

प्राजु's picture
प्राजु in जनातलं, मनातलं
22 Apr 2009 - 6:30 pm

निरोप घेताना...

नमस्कार मंडळी.
निरोप!! निरोप देणं आणि निरोप घेणं या जशा दोन वेगवेगळ्या कृती आहेत त्याच प्रमाणे त्यांचे अर्थही संदर्भानुसार बदलतात.
"जा, जरा समोरच्या काकूला निरोप दे, दुपारी बाजारात जाऊया म्हणून." असं आई म्हणते तेव्हा समोरच्या काकूला आईनं सांगितलेलं सांगणं.. याला आपण निरोप देणं असं म्हणू शकतो. निरोप घेणं यामध्ये सुद्धा बरेच अर्थ निघू शकतात. जसं, " मी बाहेर जाते आहे, आजोबांचा फोन आला तर निरोप घेऊन ठेव." यामध्ये आजोबा जे सांगतील ते लक्षात ठेव असा अर्थ असतो.पण बर्‍याचदा"निरोप घेणं" याचा अर्थ "टाटा, बाय बाय" असाच घेतला जातो.

मुलगी सासरी जाताना आई-बाबांचा निरोप घेते. तिच्या निरोप घेण्याला नव्या आयुष्याबद्दलच्या औत्सुक्याची किनार असते. आपलं २४-२५ वर्षाचं बालपण संपून जबाबदारी पेलण्यातलं आव्हान असतं. आणि म्हणूनच हा निरोप घेणं आणि देणंही फार फार अवघड असतं. सुट्ट्यांमध्ये आलेले पाहुणे जेव्हा पुन्हा गावी परतण्यासाठी निघतात तेव्हा खूप दिवस एकत्र राहिलो, खूप मजा केली.. खूप बरं वाटलं... अशा अर्थाचं समाधान त्यांच्या निरोप घेण्यामध्ये असतं. तेच आपल्याला नको असलेले पाहुणेही परत जाण्यासाठी निघताता तेव्हा, हुश्श!!! सुटलो... आता आलात.. पुन्हा येऊ नका.. किंवा येणार असाल तर तुमच्या या द्वाड कार्ट्याला जरा वळण लावून आणा.. अशा अर्थाचा निरोप घेतला जातो. अशा निरोपांमध्ये वर वर हसत्.."या पुन्हा.. नक्की" असं अत्यंत तोंडदेखलं आमंत्रण असतं. रेडीओवर आपली बकबक ऐकवून लोकांना पूर्ण पिळल्यानंतर "आता या गाण्यानंतर आजचा कार्यक्रम समाप्त करत मी आपला निरोप घेते" असं म्हणणं औपचारीक असतं. करणार काय वेळ पाळायची असते ना कार्यक्रमाची! तर असे हे निरोप घेण्या-देण्याचे प्रकार. निरोप घेताना स्थळ्-काळ हा एक खूप मोठा फॅक्टर असतो. निरोप घेण्याआधी जन्माला आलेली नाती, संबंध, प्रसंग.. आठवणी यांचा सिनेमा झर्रझर्र डोळ्यापुढून हलत असतो आणि त्या सिनेमा आडूनच आपण निरोप घेण्याचं काम करत असतो.

माझं लग्न झाल्यानंतर, जेवणावळी वगैरे झाल्या.. सगळं निट आटोपलं होतं. माझी बॅग भरून तयार होती. .. पण मी वधू पक्षाच्या खोलीत बॅगेशेजारी बसून मैत्रीणींशी चकाट्या पिटत हास्यकल्लोळ करत होते. माझा मामा वरती आला.... मला जवळ घेतलं.. मी म्हणाले "अरे हे काय !!अजून अवकाश आहे मला जायला.." तर तो म्हणाला.. "मी निघालो आहे.. म्हणून तुझा निरोप घ्यायला आलो आहे." आणि तेव्हा अचानक निरोप घ्यायला तो आला म्हणजे नेमकं काय याची जाणीव झाली.. लक्षात आलं अजून थोड्यावेळाने का होईना पण ही माझी सगळीच माणसं माझा निरोप घेतील..

यानंतर आणखी एक निरोप घेणं अतिशय अवघड असतं... जेव्हा अचानक समजतं आपल्याला कामासाठी परदेशात जावं लागणार आहे. घरच्यांचा गोंधळ उडतो. भराभर तयारी होते. आई-वडील .. बायको-मुले सगळ्यांचीच तारांबळ. त्यातून बायको-मुलांना घेऊनच जायचं असेल तर मनात थोडी निश्चिंती नाहीतर.. बायको मुलांना घेऊन बरोबर येईल ना.. नीट राहतील ना मुलं.. असे अनेक तर्‍हेचे विचार मनांत. त्यातून सुद्धा सगळी तयारी होते. आणि जायचा दिवस येतो. निघताना सगळ्यांत अवघड काय असतं तर ते निरोप घेणं. आई-वडिलांना नमस्कार करताना "काळजी घ्या, लवकर येतो आम्ही" अशी विनवणी असते. आणि आई-वडीलांच्या नजरेत "नीट राहशील ना रे सोन्या?? मुलांना-बायकोला जप.. आमची नको काळजी करू. मात्र... लवकर ये रे राजा." अशी आर्जव असते. त्याच्यासोबत जाणारी ती..ती.. तिच्या त्या नजरेनं ती घराचा, प्रत्येक कोपरा नजरेत साठवत असते. " कोण जपेल माझ्या घराला, कोण हात फिरवेल.. आई-बाबा नीट राहतील ना... " अशा अनेक प्रकारच्या चिंता तिला पोखरत असतात. त्यासगळ्या चिंता मनातच ठेऊन ती घराचा.. घरच्यांचा निरोप घेते..

नविन् जागा, नविन घर, नविन माणसं. आजूबाजूला ओळखी करून घेतल्या जातात. गेट टुगेदर्स होऊ लागतात. पॉटलक होऊ लागतात. मुलांसाठी शाळा, लायब्ररी, प्ले डेट्स यातून ओळखी वाढू लागतात. काही काही ओळखी पटकन होतात की, त्या दृढ कधी झाल्या समजतही नाही. संध्याकाळी एकत्र फिरायला जाणं.. मुलांना घेऊन पार्क मध्ये जाणं, तिथे सुखदु:खच्या गोष्टी होऊ लागतात. मध्येच कधीतरी, कोणाचं तरी पिल्लू आजारी पडतं. मग त्याला दवाखान्यात नेण्यापासून, ते औषध आणण्यापर्यंत इतकी ही जोडलेली नाती मदत करतात.. की आपण यांच पूर्वजन्मीचं देणं लागतो आहोत असं वाटू लागतं. मध्येच कधीतरी घरची लक्ष्मी आजारी पडते. तेव्हा तिच्या मुलांसाठी आणि मुलांच्या बाबांसाठी दुसर्‍या घरची लक्ष्मी अन्नपूर्णा होते आणि या लक्ष्मीला थोडा आराम मिळतो. आपल्यासारखेच हे सुद्धा त्यांच्या घरांपासून लांब आहेत. कोणाला काही झालं तर नातेवाईकांआधी असं म्हणण्यापेक्षा सुद्धा आई-वडीलांच्या आधी मदतीला येणारी कोण असतील तर ही लोकं.. ही भावना मनांत खोलवर घर करून बसते. एकमेकाला धरून राहणं, एकमेकाच्या मदतीला जाणं.. तसंच एकमेकाला हक्कानं मदतीला बोलावणं यातून ही नात्यांची वीण पक्की होत जाते. सण साजरे करण्यासाठी उत्साह येतो. सगळ्यांना घेऊन मोठ्ठी पार्टी करण्याचं ठरतं. सगळेच तयार होतात. कोणीतरी लीड घेतं आणि मग कॉन्ट्रीब्युशन घेणं.. जागा निश्चित करणं.. सगळ्यालाच ऊत येतो. हे सगळं करत असताना.. आजवर न दिसलेले अनेकांचे अनेक पैलू दिसू लागतात. कधी चांगले.. कधी वाईट. अनेकांशी असलेले संबंध दृढ होतात. एक वर्ष हाहा म्हणता म्हणता सरून जातं... मग समजतं की, आणखी एक वर्ष प्रोजेक्ट चालणार आहे. तेव्हा मात्र मनाची घालमेल नाही होत. आता मनाला इथे रहायला कारण असतं.. आणि कारण म्हणण्यापेक्षा सुद्धा.. आपल्या माणसांशिवाय जगणं आता थोडं सोपं वाटत असतं.

पुन्हा हेच सुरू होतं. नवी गेट टुगेदर्स, पॉटलक, कोणाचं बेबी शॉवर (डोहाळ जेवण), कोणाचा वाढदिवस्...कोणाची नव्या गाडीची पार्टी.. तर कधी ऑफिसकडूनच ठेवलेली पार्टी. एक ना अनेक!!! कधी मराठी मंडळाचे कार्यक्रम, कधी एखादी संगीतसभा. कधी जीम मध्ये भेटणारी नवी मैत्रीण.... तर कधी कोणीतरी सुट्टीसाठी भारतात जाणार असल्याची खबर. मग जो जाणार आहे त्याच्यासोबत घरच्यांसाठी काहीतरी पाठवण्याची धडपड.. तर कधी त्याच्यासोबत आईला लोणचं पाठवण्याची केलेली मागणी. मग घरच्यांनी पाठवलेला खाऊ.. इथल्या सुहृदांना देताना त्यांच्या चेहर्‍यावरचं समाधान आणि त्यामुळे आपल्या मनाला लाभलेलं समाधान आणि यथावकाश वाटणारा अभिमान! अनेक बंधातून ही नाती बांधली जातात. .. ही नाती घट्ट होत असतात.. आणि मग अचानक लक्षात येतं की, अरे!!! हे वर्ष सुद्धा संपून गेलं!!!

पुन्हा तीच वेळ येते ...निरोप घेण्याची!! मांडलेल्या इथल्या संसाराचा निरोप घेण्याची वेळ. नविन बिर्‍हाड करताना आणलेल्या अनेक वस्तू, मुलांसाठी प्रेमाने घेतलेली सायकल, स्कूटर, वेगवेगळे बॉल्स. तान्हुलं असेल तर त्याचं क्रिब, हाय चेअर, कार सीट... झोपाळा.. एक ना अनेक वस्तू. घर रिकामं करायचं. सेल लागतो.. जीम मध्ये, बिल्डींगच्या खाली, लेटर बॉक्सेस जवळ.. विकायच्या असलेल्या वस्तू आणि त्यांच्या किंमती यांची यादी लागते. पलंग, सोफा.. टीव्ही.. बघता बघता या वस्तू कोणीतरी घेऊन जातं. पण मुलांच्या गोष्टी कोणी घेऊन जातंय.. ही कल्पना नाही सहन होत. तरीही जे व्हायचं ते होतंच. त्याही वस्तू विकल्या जातात. जाण्या आधी ४ दिवस मैत्रीणींना बोलावलं जातं.. "माझं किचन मी रिकामं करते आहे.. या तेव्हा." त्या येतात. एकेक वस्तू निघते, तवा, कढया, फ्राईंग पॅन, चमचे, प्लास्टिकचे डबे, झारे, पळ्या.... कटींग बोर्ड, डिनर सेट.. क्रोकरी.. संपूर्ण स्वयंपाक घर मैत्रीणींच्या हाती असतं. एकेक वस्तू.. अतिशय प्रेमाने, मनापासून घेतलेली,.. अशीच सोडून जायची!!!! मैत्रीणी.. एकेक वस्तू घेतात. कोणाला कढई हवी असते, कोणी झारे-पळ्या घेते.. कोणी डिनर सेट... कोणाचे पोळपाट जुने झालेले असते ती पोळपाट घेते. कोणी एखादा टोस्टर घेते.. कोणी डीश रॅक घेते. बघता बघता मांडलेला, जपलेला, आवरलेला.. गोंजारलेला संसार इतक्या ठिकाणी विखुरला जातो. सगळ्या वस्तूंचा निरोप घेतला जातो. त्या टोस्टरशी काही आठवणी जडलेल्या असतात, त्या डिनरसेटशी काही .. तर त्या डोश्याच्या तव्याशी काही. मैत्रीणी त्या वस्तू नेण्यासाठी प्लॅस्टीकच्या पिशव्यांमध्ये भरत असतात आणि ती त्या सगळ्यावरून शेवटची नजर फिरवता फिरवता दरवेळी पापण्यांशी येणारा थेंब परतवून लावत असते. काही वस्तू मैत्रीणींकडे जातात, तर काहींना कचर्‍यात जागा मिळते. दिवसाच्या शेवटी बघता बघता सगळं स्वयंपाकघर रिकामं होतं... काल पर्यंत खणखणारे आवाज आज एकदम शांत होतात. आपार्टमेंट स्वच्छ करून द्यायची असते.. त्यासाठी धावपळ सुरू होते. एकेक खोली रिकामी होत होत स्वच्छ होत असते. मुलांनी भिंतींवर मारलेल्या रेघोट्या पुसता पुसता ... मन तुटत असतं. सगळ्या मित्रमैत्रीणींनी मिळून एक निरोप समारंभ ठेवलेला असतो... 'त्या'ला 'ति'ला आवडतील असे पदार्थ करून आणलेले असतात. त्यांना देण्यासाठी एक भेटवस्तू आणलेली असते. नेहमीप्रमाणे हसत-खेळत दंगा करत जेवणं पार पडत असतात्..गाण्यांच्या भेंड्यांमध्ये..."बाते भूल जाती है.. यादें याद आती है. " हे गाणं गायलं जातं.. आणि रोखलेला बांध फुटतो. ती-तो आणि त्यांचे मित्र - मैत्रीणी नकळत डोळ्यातली ओल टिपतात. आणि मग.. आंताक्षरीचा अंत होतो "कभी अल्वीदा ना कहेना" या गाण्याने. एकीकडे आपण आपल्या माणसांमध्ये जाणार याची ओढ असते.. तर एकिकडे आपलीच माणसे दुरावणार याचं दु:ख असतं. नक्की हसावं की रडावं समजत नसतं. मित्र्-मैत्रीणींकडे जेवायला जाण्याचे वार लागलेले असतात. सकाळ्-संध्याकाळ वेगवेगळ्या ठिकाणी जेवण. जेवताना तिथे एकत्र घालवलेले क्षण, प्रसंग, साजरे केलेले सण, कार्यक्रम, सहली... या सगळ्या आठवणींना उजाळा मिळत असतो. करता करता अखेर पुन्हा तो दिवस येतोच.. निरोप घेण्याचा..!

सकाळपासून जोडलेली माणसं असतातच जवळ.. बॅग्जमध्ये काही भरायचं राहिलं नाही ना पहाणं, विमानतळ लांब असेल तर तिथे जाईपर्यंत मुलांना भूक लागेल या होशोबाने कोणीतरी पोळी-भाजी, केक.. असं काहीसं आणलेलं असतं. ते पाहून अक्षरशः अंतकरण भरून येत असतं. कोणी आणलेला नाष्टा... 'पुन्हा कधी आता यांच्या हातचं खायला मिळेल .. ' या विचाराने जड हाताने एकेक घास घेतला जात असतो. सांगून ठेवलेली टॅक्सी अशावेळी वेळेच्या आधीच ५ मिनिटे येते. बॅग्ज ठेवल्या जातात. गळाभेटी होतात.. पुन्हा एकदा आपण ज्या घरात राहिलो त्या घराकडे त्यांचं लक्ष जातं.. आजूबाजूचा परिसर जिथे संध्याकाळी मैत्रीणींबरोबर फिरलो, टेनिस कोर्ट.. जिथे खेळलो... कट्टे जिथे गप्पा ठोकत बसलो.... सगळ्यांवरून नजर फिरवत, नजरेत साठवत.. ते टॅक्सीत बसून विमानतळाकडे कूच करतात. मागे वळून पहाताना.. हात हलवत "टाटा.. वी विल मिस्स यू" असं म्हणाणारे चेहरे धूसर होत जातात... आणि इतके दिवस प्रत्येकवेळी परतवून लावलेले अश्रू आता मात्र न जुमानता गालावरून खाली सांडतात. कारण.. हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं.

खरंच !!! निरोप घेणं.. का इतकं अवघड असतं???
- प्राजु

हे ठिकाणप्रकटनलेखअनुभव

प्रतिक्रिया

अवलिया's picture

22 Apr 2009 - 6:39 pm | अवलिया

मस्त लेख ! आवडला !
निरोप घेणे खुप अवघड असते पण कधीकधी परिस्थितीपुढे मान तुकवावीच लागते...
जीवनाचे गाडे चालु ठेवावेच लागते इच्छा असो वा नसो. :)

खरे तर शिर्षक पाहुन उगाचच मनावर दडपण आले होते...
त्यामुळे घाबरतच धागा उघडला ...
वय झाले.. उगाच नाही नाही त्या शंका मनात येतात... असो.

--अवलिया

स्वाती दिनेश's picture

22 Apr 2009 - 6:45 pm | स्वाती दिनेश

निरोप घेणे अवघड असतेच पण परिस्थितीमुळे किती तरी वेळा आवश्यकही..
लेख आवडला.
स्वाती
अवलियांचीच शंका माझ्याही मनाला स्पर्शून गेली. खरंतर आपल्या माणसांना तो 'शेवटचा निरोप देणं' सगळ्यात अवघड गोष्ट..

परिकथेतील राजकुमार's picture

22 Apr 2009 - 7:00 pm | परिकथेतील राजकुमार

मस्त लिहिले आहेस :)
खरच कधि कधि निरोप घेणे खुप अवघड जाते. तुझा लेख वाचला आणी एकदम संदिप खरेंच्या 'हे भलते अवघड असते' ह्या कवितेची आठवण झाली.

हे भलते अवघड असते ......

गाडी सुटली रुमाल हलले क्षणात डोळे टचकन् ओले,
गाडी सुटली पडले चेहरे क्षण साधाया हसरे झाले,
गाडी सुटली हातामधुनी हात कापरा तरी सुटेना,
अंतरातली हळवी माया तुटू दे म्हटले तरी तुटेना,
का रे इतका लळा लवुनी नंतर् अ मग ही गाडी सुटते ,
डोळ्यांदेखत सरकत जाते आठवणींचा ठिपका होते,
गाडी गेली फ़लाटावरी आठवणींचा कचरा झाला,
गाडी गेली डोळ्यांमधल्या निर्धाराचा पारा फुटला....

हे भलते अवघड असते, कुणी प्रचंड आवडणारे ते दूर दूर जाताना,
डोळ्यांच्या देखत आणि नाहीसे लांब होताना,
डोळ्यांतील अडवून पाणी, हुंदका रोखूनी कंठी,
तुम्ही केविलवाणे हसता, अन् तुम्हास नियती हसते,
हे भलते अवघड असते ..........

तरी असतो पकडायाचा हातात रुमाल गुलाबी,
वाऱ्यावर फडकवताना,पायाची चालती गाडी,
ती खिडकीतून बघणारी,अन् स्वतःमधे रमलेली,
गजरा माळावा इतुके, ती सहज अलविदा म्हणते,
हे भलते अवघड असते ..........

तुम्ही म्हणता मनास आता, हा तोडायाचा सेतू,
इतक्यात म्हणे ती माझ्या, कधी गावा येशील का तू,
ती सहजच म्हणुनी जाते, मग सहजच हळवी होते,
गजऱ्यातील् होन कळ्या अन्, हलकेच ओंजळीत देते,
हे भलते अवघड असते ..........

कळते की गेली वेळ, ना आता सुटणे गाठ,
अपुल्याच मनातील स्वप्ने, घेउन मिटावी मुठ,
हि मुठ उघडण्यापुर्वी चल निघूया पाऊल म्हणते,
पण पाऊल निघण्यापूर्वी, गाडीच अचानक निघते,
हे भलते अवघड असते ..........

परतीच्या वाटेवरती गुदमरून जड पायांनी,
ओठांवर शील दिवानी बेफिकीर पण थरथरती,
पण क्षणक्षण वाढत असते अंतर हे तुमच्या मधले,
मित्रांशी हसताना ही, हे दुःख चरचरत असते,
हे भलते अवघड असते ..........

भवतेक सगळ्यांना हि माहिती असेलच पण तरी काहि जणांना माहीत नसण्याच्या शक्यतेने इथे देत आहे.

©º°¨¨°º© परा ©º°¨¨°º©
फिटावीत जरा तरी जगण्याची देणी, एक तरी ओळ अशी लिहावी शहाणी...
आमचे राज्य

अनामिक's picture

22 Apr 2009 - 7:06 pm | अनामिक

निरोप घेणं खरंच खुप अवघड असतं...
घरातून शिक्षणासाठी बाहेर पडतेवेळी घरच्यांचा घेतलेला निरोप..
कॉलेजातून बाहेर पडतेवेळी चार वर्षांत जमवलेल्या जिवाभावच्या मित्र-मैत्रीणींचा घेतलेला निरोप..
परदेशी येताना घेतलेला निरोप... आणि परदेशातच जोडल्या गेलेल्यां मित्र-मैत्रीणींचा ठिकाणं बदलताना घेतलेला निरोप....
सगळं सगळं अवघड असतं, पण ह्याच सगळ्यांशी परत जेव्हा भेटतो तेव्हा त्यांना आणि स्वतःला झालेला आनंदही तेवढाच हवाहवासा आणि नात्याची विण घट्ट करणारा असतो...

लेख आवडला.

(असे तर नाही की शितलताईने लिहिला आणि प्राजुताईने लेख पोस्ट केला :? )

-अनामिक

क्रान्ति's picture

22 Apr 2009 - 7:09 pm | क्रान्ति

लेख खूप सुन्दर लिहिलास तू आणि पराचा प्रतिसादही अगदी साजेसा. संदीप खरेंची कविता खास आहे. खूप हळवे आणि नाजूक असतात निरोपाचे क्षण नेहमीच!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com

मनिष's picture

22 Apr 2009 - 7:14 pm | मनिष

केनी रॉजर्सच्या एका जुन्या, माझ्या आवडत्या गाण्याची इथे आठवण झाली.

Why do people cry
When they hear the word goodbye
In a love song?
Tears are sure to fall
When you know they gave it all
In a love song.
......

ते गाणे इथे ऐकता येईल -

यशोधरा's picture

22 Apr 2009 - 10:15 pm | यशोधरा

अरे क्या बात है मनिष! सही!! :)
धन्यवाद.

प्राजू, खूप छान लिहिलं आहेस गं :)

अबोल's picture

22 Apr 2009 - 7:16 pm | अबोल

हलवून सोडणारा लेख लिहिलात

स्मिता श्रीपाद's picture

22 Apr 2009 - 7:16 pm | स्मिता श्रीपाद

प्राजु...यु आर ग्रेट..

किती सह्ही लिहितेस गं तु....अप्रतिम लेख...
मला माझ्या कर्‍हाडच्या घरचा "निरोप समारंभ" आठवला.३ च खोल्या ..पण मी परत परत फेर्‍या मारत होते....
असंख्य आठवणी मनात दाटुन आल्या होत्या..माझं आख्खं बालपणं जिथे गेलं ती वास्तु सोडायची म्हणजे काय....
आईनं गॅलरीत लावलेल्या गुलाबाच्या रोपांना आता कोण पाणी घालेल?..
मी आणि माझ्या बहिणीने अभ्यास करतान भिंतीवर लिहिलेली आमची नावं दिसली आणि रडु कोसळलं....
कधी नव्हे ते मी बाबांना पण रडताना पाहिलं होतं तेव्हा.... त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या कमाईची ती वास्तु होती ना...
पण शेवटी "बदल" हाच फक्त "शाश्वत" असतो....
असो..

माझ्या या सगळ्या आठवणी जाग्या केल्याबद्दल तुला खुप खुप धन्यवाद....

-स्मिता

सूहास's picture

22 Apr 2009 - 7:17 pm | सूहास (not verified)

खरंच !!! निरोप घेणं.. का इतकं अवघड असतं???

काही आठवणी झाल्या..........

सुहास
आज "मै॑ या तो वो"

शितल's picture

22 Apr 2009 - 7:19 pm | शितल

प्राजु,
मस्त लिहिले आहेस.
मी भारतात जाताना मात्र तु भेटु नकोस नाही तर मा़झे काही खरे नाही.. आणी तु़झे ही..;)

समिधा's picture

22 Apr 2009 - 9:53 pm | समिधा

खुपच छान आहे तुझा लेख. खुप प्रसंग डोळ्यासमोर आले.
इकडे येताना घेतलेला घराचा आणि घरच्यांचा निरोप आठवला......
अजुन इथुन मांडलेला संसार आवरुन परत कधी गेले नाही पण जाताना कसे वाटेल ते जाणवले. =D>

समिधा
(चांगल्या मैत्री सारखे सुंदर दुसरे काही नाही.)

बिपिन कार्यकर्ते's picture

22 Apr 2009 - 9:55 pm | बिपिन कार्यकर्ते

सुंदर लिहिलंयस गं प्राजु. वाचताना सगळ्या प्रसंगात मी स्वतःच तिथे आहे की काय असे वाटले.

माझ्या बहिणीच्या लग्नात मी रडणार नाही अशी शप्पथ घेतली होती. पण त्या क्षणी मात्र डोळ्यातून कधी पाणी आलं ते कळलंच नाही, आणि मी पण ते लपवायचा प्रयत्न केला नाही.

बिपिन कार्यकर्ते

चतुरंग's picture

22 Apr 2009 - 10:16 pm | चतुरंग

माझ्या बहिणीच्या लग्नात (ती धाकटी त्यामुळे अजूनच लाड) असेच झाले.
ते अश्रू मायेचे असतात, न बोलता बरंच काही सांगून जाणारे, एका भावाचं बहिणीवरचं प्रेम व्यक्त करणारे, त्यामुळे ते थोपवले जात नसतात!

चतुरंग

चकली's picture

22 Apr 2009 - 10:13 pm | चकली

लेख छान आहे. आवडला..आणि पटला.

चकली
http://chakali.blogspot.com

अभिज्ञ's picture

22 Apr 2009 - 10:33 pm | अभिज्ञ

प्राजु,
अतिशय सुंदर लिहिले आहेस.
अभिनंदन.

अभिज्ञ

दिपाली पाटिल's picture

22 Apr 2009 - 11:29 pm | दिपाली पाटिल

खुप च छान लिहीलं आहे.. अजुन जुन्या अपार्टमेंटचा ही निरोप घेताना अस्सं च वाटतं.

दिपाली :)

विसोबा खेचर's picture

22 Apr 2009 - 11:40 pm | विसोबा खेचर

मागे वळून पहाताना.. हात हलवत "टाटा.. वी विल मिस्स यू" असं म्हणाणारे चेहरे धूसर होत जातात... आणि इतके दिवस प्रत्येकवेळी परतवून लावलेले अश्रू आता मात्र न जुमानता गालावरून खाली सांडतात. कारण.. हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं.

सुरेख..!

तात्या.

मानस's picture

22 Apr 2009 - 11:51 pm | मानस

तुझ्या कवितांचा मी पहिल्यापासुनच चाहता होतो, आज हा लेख वाचुन फारच आनंद झाला. काही काही वेळेस आपल्याला उगीचच काही आठवणी येतात .... आणि त्या जुन्या आठवणींमधे आपण रममाण होतो. तुझा हा लेख वाचल्यावर असच काहीसं झालं.

गेल्या १४-१५ वर्षाच्या या देशाबाहेरच्या कालखंडात या अशा अनुभवातून अनेक वेळा गेलो आहे. बहुतेक सगळेच जात असतील. लेख वाचून झाल्यावर डोळ्यात टचकन पाणी आलं. यातच तुझ्या लेखाचं यश दडलं आहे.

हे मित्र- हे जीवलग्-ही नाती पुन्हा कधी, कोणत्या वळणावर भेटतील.. किंवा भेटतील की नाही?? याची काही शाश्वती नसते. आणि हे निरोप घेणं कायमचं मनावर कोरलं जातं

-- सुंदर

तुझा हात नियतीने सतत लिहीता ठेवावा, हीच नम्र इच्छा ....

विकास's picture

23 Apr 2009 - 12:14 am | विकास

लेख एकदम मस्त आहे. "निरोप" हा असा विषय आहे जो कधी ना कधी इच्छा असो अथवा नसो, आपल्याला अनुभवायला लागतो. दोन व्यक्तींमधे असलेली आत्मियतेची भावना ही अशा निरोपाच्या वेळेस एकाअर्थी सुखदायक पण वेदना म्हणूनच अनुभवावी लागते. त्या संदर्भात गीत रामायणातील "निरोप कसला माझा घेता..." हे सीतेच्या तोंडचे गाणे आठवले.

अनेकांना वेगवेगळ्या पद्धतीने अनुभव असेलच...अमेरिकेस पहील्यांदा आलो त्यासुमारास असे खूप झाले होते ते एकदम आठवले.

संदीप चित्रे's picture

23 Apr 2009 - 12:29 am | संदीप चित्रे

हा लेख खूप आवडला प्राजु...
आधी एकदा वाचला होताच पण आता पुन्हा एकदा वाचला.
---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

मीनल's picture

23 Apr 2009 - 12:33 am | मीनल

एक महत्त्वाचा निरोप विसरलीस.
माहित असलेला मृत्यूला सामोर जातानाचा निरोप.
जी व्यक्ती जात असते तिला दु:ख होत असेल का ते माहित नाही. कदाचित पूर्ण तयारी झाली असेल त्या आजारी व्यक्तीची.
पण नातेवाईकांची?सर्व उपायच थकून जातात तेव्हा.
ते कसा देतात निरोप इच्छा नसूनही?

मीनल.

सखी's picture

23 Apr 2009 - 2:08 am | सखी

प्राजु
सुरेख झालाय लेख हा. लहान-मोठे, तात्पुरते-कायमचे घेतलेले निरोप आठवुन गेले आणि नकळत डोळे ओलावले...

पिवळा डांबिस's picture

23 Apr 2009 - 3:50 am | पिवळा डांबिस

सुरेख लेख!
प्राजु इज बॅक!!!!

आणि प्राजु, निरोपाला आणखी एक परिमाण आहे. आपल्या पितरांच्या अस्थी नदीत अर्पण करतांना घेतलेला निरोप!! यानंतर त्यांचं काहीही ऐहिक अस्तित्व रहात नसतं, रहातात त्या फक्त अमूर्त आठवणी!!
तुम्ही मुलं लहान आहांत कदाचित अश्या प्रसंगातून गेला नसाल (देव करो आणि तुम्हांला पुढील अनेक वर्षे या प्रसंगातून जायला न लागो)
पण तो निरोपही फार फार अवघड असतो....

असो. लेख खूप आवडला...
-काका

विसोबा खेचर's picture

23 Apr 2009 - 10:26 am | विसोबा खेचर

आपल्या पितरांच्या अस्थी नदीत अर्पण करतांना घेतलेला निरोप!! यानंतर त्यांचं काहीही ऐहिक अस्तित्व रहात नसतं, रहातात त्या फक्त अमूर्त आठवणी!!

तू म्हणतोस ते खरं आहे रे डांबिसा. साला, माझा बाप वारला तेव्हा त्याच्या अस्थी समुद्रात विसर्जित करतांना घेतलेला निरोप आठवला. त्याला दाखवता कधीच आलं नाही, परंतु खूप जीव होता त्याचा माझ्यावर!

तात्या.

अंतु बर्वा's picture

23 Apr 2009 - 4:41 am | अंतु बर्वा

छान लिहीलं आहे.... भुतकाळात घेतलेल्या काही निरोपांची आठवण आली ...ख्ररंच, निरोप घेणं फारच अवघड असतं...

गुलाम अलींच्या या गझलेतलं हे शेवटचं कडवं ऐकताना हेच जाणवतं...

वक्ते रुक्सत अलविदा का लब्ज कहने के लिए.... वोह तेरे सुखे लबों का थरथराना याद है....

प्राजु's picture

23 Apr 2009 - 6:03 pm | प्राजु

कधीही ऐकली तरी.. हृदयाचा ठाव घेते ती.
धन्यवाद दुव्यासाठी.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

घाटावरचे भट's picture

23 Apr 2009 - 5:23 am | घाटावरचे भट

छान लेख!!

सायली पानसे's picture

23 Apr 2009 - 9:45 am | सायली पानसे

प्राजु
खुपच छान आहे ग लेख... अगदि मनातल्या भावना लिहिल्या आहेस.
३-४ वेळा हा अनुभव आला आहे पण प्रत्ये़क वेळी नविन ठिकाणी जाताना जुन्या जागेचा निरोप घेताना डोळ्यातला पाणी खळत नाही.
जुने दिवस आठवले लेख वाचताना.

वल्लरी's picture

23 Apr 2009 - 11:24 am | वल्लरी

सुंदर लेख!!

---वल्लरी

अमोल केळकर's picture

23 Apr 2009 - 1:10 pm | अमोल केळकर

मस्त लेख. खुप आवडला
--------------------------------------------------
छोट्या दोस्तांसाठी गंमत गाणी इथे वाचा

jenie's picture

23 Apr 2009 - 1:59 pm | jenie

खरंच !!! निरोप घेणं.. का इतकं अवघड असतं???
काही आठवणी झाल्या डोळे भरुन आले .. माझे पण आनुभव सांगेन एकदा ....
खरंच !!! निरोप घेणं खुप अवघड असतं

चतुरंग's picture

23 Apr 2009 - 2:46 pm | चतुरंग

तुझ्यातली लेखिका प्रभावी आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं! :)

निरोप हा अवघड असतोच. व्यक्तीचाच काय पण मूक वास्तूचा निरोपही अतिशय कठिण असतो.
आमच्या रहात्या वाड्याची डागडुजी होईनाशी झाली तेव्हा त्याचं अपार्टमेंट करायचं ठरलं. सगळं घर रिकामं करुन शेजारीच दुसर्‍या अपार्टमेंटमधे रहायला गेलो. वाडा जणू मूकपणे म्हणत होता "नका रे सोडून जाऊ, पण तुमची तरी काय चूक म्हणा मी असा जराजर्जर झालोय आता मी जाणंच योग्य आहे!" पहिली कुदळ वाड्यावर नाही हृदयावर पडली होती! अर्धवट पाडलेल्या वाड्यात जाऊन रडत बसलेल्या मला वडिलांनी समजूत घालून परत आणलं. त्या रस्त्याने जाण्याचं मी टाळायचो. पूर्ण वाडा पाडून नवीन वास्तू उभी राहिली त्याचवेळी मी तिथे गेलो. जुन्या वाड्याबरोबर जपलेल्या आठवणी मात्र आजही मनात घर करुन आहेत. तिथे घालवलेला जवळजवळ प्रत्येक क्षणनक्षण लक्षात आहे. तो निरोप फार फार अवघड होता.

चतुरंग

प्राजु's picture

23 Apr 2009 - 6:09 pm | प्राजु

आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद.
मीनल, डांबिसकाका,
आपलं म्हणणं बरोबर आहे.
पण बर्‍याच वेळेला.. माझ्या लेखनातून तेच येतं ज्यातून मी स्वतः गेले आहे किंवा माझ्या अगदी जवळचे.. ज्यांना त्या अनुभवातून जाताना मी पाहिलं आहे.
त्यामुळे लेखांत त्या त्रुटी असू शकतील.
आपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप आभारी आहे. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

स्वाती राजेश's picture

23 Apr 2009 - 7:54 pm | स्वाती राजेश

सुरेख लेख लिहीला आहेस....निरोपाचे असंख्य प्रसंग आयुष्यात येत असतात..... :)
सजीव तसेच निर्जिव वस्तुंचा सुद्धा निरोप घेताना जड जाते.....
आम्ही परदेशात जाणार असल्यामुळे आमची ५ वर्षे सोबत असलेली सँट्रो जेव्हा आम्ही विकली..तेव्हा आम्हा दोघा नवरा-बायकोंना रात्री झोप आला नव्हती.. रात्रभर आम्ही त्या गाडीने कशी सोबत केली, कुठे कुठे घेऊन प्रवास केला, याच्या आठवणीत घालवली...कारण आमच्या घरात ती पहिली वहिली कार होती....ती पुसायला कधी आम्ही माणूस लावला नाही...घरीच आवडीने ते काम करत होतो..अगदी घरासारखे तीला चकचकीत ठेवत होतो....पण विकताना खूप वाईट वाटत होते....

प्राची's picture

23 Apr 2009 - 7:58 pm | प्राची

प्राजूताई,
खूप छान लिहिले आहेस. :)