पंडित कुमार गंधर्व यांच्या विलक्षण प्रतिभेतून साकारलेल्या निर्गुणी भजनांचा एक नवा अल्बम घेऊन नव्या दमाचे गायक राहूल देशपांडे रसिकांच्या भेटीला येत आहेत. सानिया मिडिया या संस्थेचा हा संगीताच्या विश्वातील पहिला प्रकल्प आहे. 'कबीर बानी - म्युझिक फॉर सोल' असे या अल्बमचे नाव असून अल्बमचे रेकॉर्डिंग पूर्ण झाले असून, मे महिन्याच्या उत्तरार्धात त्याचे प्रकाशन पुण्यात केले जाणार आहे.
या अल्बमविषयी राहूल देशपांडे यांनी सांगितले की, निर्गुणी भजने ही खास भारतीय परंपरा. कबीर आणि त्यांच्या समकालीन संतांनी केलेल्या रचना त्यात मोडतात. अध्यात्मिक ज्ञानाची कवाडे साध्या-सोप्या शब्दांतून संतांनी या रचनांतून खुली केली आहेत. प्रामुख्याने उत्तर भारतात असणारी ही भजनांची परंपरा पंडित कुमार गंधर्वांनी गायनाच्या माध्यमातून जगभरात पोचवली. आजही जगातील वेगवेगळ्या भागातील रसिकांवर कुमारांच्या या भजनांची मोहिनी कायम आहे. कुमारजींनी लोकप्रिय केलेल्या या भजनांमधील कबिरांच्या सात रचनांचा या अल्बममध्ये समावेश केला आहे. कबिरांचा तत्वज्ञानात्मक विचार, कुमारजींचा सांगितीक विचार असा मेळ असणाऱ्या या भजनांच्या श्रवणातून मिळणाऱ्या आत्मिक आनंदाचा, मनःशांतीचा विचार करूनच या अल्बमचे नामकरण कबीरबानी - म्युझिक फॉर सोल असे करण्यात आले आहे. ही आपली कुमारजींना आदरांजली आहे, असेही राहूल यांनी नमूद केले.
ही भजने रसिकांसमोर सादर करताना पंडित कुमार गंधर्व यांनी केलेल्या सांगितीक विचारांशी आपण प्रामाणिक राहिलो आहोत, मात्र त्याचवेळी त्यात पखवाज, ढोलक अशी नवी साथसंगतही घेतली आहे, असे राहूल सांगतात. या भजनांसाठी भवानी शंकर यांनी पखवाज आणि ढोलकची, हार्मोनियमवर आदित्य ओक यांनी, निखिल फाटक यांनी तबल्यावर तर सिंथेसायझरवर सत्यजीत प्रभू यांनी साथसंगत केली आहे. अलीकडेच मुंबईच्या यशराज स्टुडिओमध्ये या अल्बममधील भजनांचे रेकॉर्डिंग पूर्ण करण्यात आले. मे महिन्याच्या उत्तरार्धात पुण्यातच या अल्बमचे प्रकाशन केले जाणार आहे, असे ओक यांनी सांगितले.
कोणत्याही एका विशिष्ट दैवताची आराधना निर्गुणी भजनांतून केली जात नसते. प्रस्तुत अल्बममधील कबिरांच्या रचनांतून तर समाजातील अनेक रुढी आणि परंपरांना प्रश्न करीत आत्मिक ज्ञानाचा वेध घेतला गेला आहे. अल्बममध्ये सुनता है गुरू ग्यानी, उड जायेगा हंस अकेला, निरभय निरगुण गुण रे गाऊंगा, कौन ठगवा नगरिया लुटल हो, अवधुता गगन घटा गहरानी रे, शून्य गढ शहर शहर, हिरना या सात भजनांचा समावेश करण्यात आला आहे, असे राहूल देशपांडे यांनी सांगतात.
विख्यात गायक वसंतराव देशपांडे यांच्याबरोबरच खुद्द कुमारजींच्या गायकीचा वारसा लाभलेल्या राहूल देशपांडे यांनी कै. पं. गंगाधरबुवा पिंपळखरे यांच्याकडे गायनाचे प्राथमिक शिक्षण घेतले. त्यानंतर पं. कुमारजींच्या शिष्या श्रीमती उषाताई चिपलकट्टी आणि कुमारजींचे सुपुत्र पं. मुकूल शिवपूत्र यांच्याकडे राहूल देशपांडे यांनी शिक्षण घेतल्याने त्यांच्या गायकीत कुमारजींची छटाही आढळते. निर्गुणी भजनांच्या गायनातून आपण कुमारजींना आदरांजली अर्पण करीत आहोत, असे राहूल म्हणाले.
दरमदार आवाजाचा, तानांची खेचक फेक करणारा, वेगळ्या गायनाचा वेध घेणारा गायक म्हणून राहूल देशपांडे यांना ओळखले जातेच त्याशिवाय नव्या पिढीतील प्रयोगशील गायक म्हणूनही त्यांची ओळख होत आहे. एकाच छापात न अडकता संगीताचा चतुरस्र वेध घेण्याचा प्रयत्न हा गायक सातत्याने करीत आला आहे. त्यातूनच त्यांच्या गायकीत प्रयोगशीलता आली आहे. 'कबीर बानी' तही त्यांची प्रयोगशीलता दिसून येते.
राहूल देशपांडे यांच्या या अल्बमला शुभेच्छा.
प्रतिक्रिया
21 Apr 2009 - 5:27 pm | ठकू
माझ्याही शुभेच्छा! अल्बम बाजारात आला की विकत घेईन म्हणते.
-ठकू
www.mogaraafulalaa.com
गुण गावे गाढ वाचे, पाय धरावे बा येकाचे
21 Apr 2009 - 7:35 pm | क्रान्ति
माझ्याही शुभेच्छा आणि या अल्बमची सविस्तर माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. ऐकायलाच हवाय!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
www.mauntujhe.blogspot.com