यशाच्या शिखरावर असलेला सचिन जेव्हा नातेसंबंधांवर बोलायला लागतो तेव्हा त्याच्या तोंडातून पहिलं वाक्य बाहेर पडतं, "ज्या यशाबद्दल मला श्रेय दिलं जातं हे यश माझ्या एकट्याचं नाही.' फार कमी वेळा सचिन क्रिकेट सोडून इतर विषयांवर बोलतो. या विषयावर मात्र तो भरभरून बोलला. .......
कोणत्याही मुलाचं सर्वांत मूलभूत नातं असतं ते आई-वडिलांबरोबरचं. निःसंकोचपणे मी सांगू शकतो, की माझ्या आयुष्यात सर्वांत जास्त प्रभाव कोणाचा असेल, तर तो माझ्या वडिलांचा. माझे वडील रमेश तेंडुलकर कमालीचे शांत होते. त्यांचे विचार प्रगल्भ असायचे. त्यांना कोणत्या गोष्टीची भुलावण नव्हती. पैशाचा किंवा कशाचाच त्यांना अजिबात लोभ नव्हता. त्यांना मोह पडायचा तो पुस्तकांचा, दर्जेदार साहित्याचा. नवी सुचलेली कविता त्यांना खूष करून टाकायची. त्यांच्या हातात १० रुपये ठेव, नाही तर १० लाख ठेव, त्यांना मोह पडायचा नाही. त्यांनी कधी मला जवळ बसवून संस्कारांचे धडे दिले नाहीत; पण त्यांच्या सभ्य, सुसंस्कृत वर्तणुकीतून, प्रगल्भ विचारांतून मला सारं काही समजलं होतं, की आयुष्यात काय करायचं आणि कोणत्या मार्गाला जायचं नाही. त्यांचीच शिकवण होती, की यशानं माजायचं नाही आणि अपयशानं खचून जायचं नाही. बाबांना जाऊन आज सात वर्षं होऊन गेली. ते नसले तरी त्यांची शिकवण, त्यांच्या स्मृती मला आयुष्यात सदैव साथ देतील.
आई या नात्यात जगातली करुणा, माया, ममता दडली आहे. मला काही झालं तर तिचा अस्वस्थपणा पराकोटीचा वाढतो. एक आठवण सांगतो. सुरवातीच्या क्रिकेटच्या काळात शिवाजी पार्कवर सरावाला जवळ पडावं म्हणून चार वर्षं मी माझ्या काका-काकूंकडं राहायचो. त्या वेळी माझी आई एलआयसीत नोकरी करायची. तिचं ऑफिस सांताक्रूझला होतं. रोज म्हणजे अगदी दररोज ती ऑफिस संपल्यावर संध्याकाळी मला भेटायला सांताक्रूझहून त्या मुंबईच्या गर्दीत उलटा प्रवास करून शिवाजी पार्कला यायची. सुनंदन, त्या वेळी लहान असल्यानं मला तो हक्क वाटायचा. आज मी मोठा झालो. माझ्या मुलांची थोडीफार काळजी घेत असताना मला कळतं, की त्या काळी दिवसभर ऑफिसमध्ये काम करून माझ्या आईचं ते रोज शिव ाजी पार्कला येणं काय दिव्य होतं. किती त्याग त्यांनी माझ्याकरिता केला! आजही माझ्या आईकरिता मी लहान सचिन आहे. कोणत्याही ग्लॅमरचा तिच्यावर काडीमात्र फरक पडलेला नाही.
माझ्या वडिलांचे धाकटे भाऊ आहेत- ज्यांच्या घरी शिवाजी पार्कला मी चार वर्षं राहत होतो. सुरेशकाका, मंगलाकाकू माझे जणू दुसरे आई-वडील आहेत. मीसुद्धा त्यांच्याकरिता पुतण्या नसून त्यांचा मुलगा आहे. त्या चार वर्षांत मला त्यांनी काही कमी पडू दिलं नाही. जडणघडणीच्या महत्त्वाच्या वयात मला त्यांची माया लाभली. मी क्रिकेटमध्ये नाव कमावल्यावर त्यांनी कधी गाजावाजा केला नाही. अत्यंत प्रगल्भ विचारांची साधी माणसं मला कोवळ्या वयात मिळाली, हे माझं भाग्य आहे, असं मला वाटतं. अजितदादा माझा नुसताच मोठा भाऊ नाही, तर माझा मित्र आणि मार्गदर्शक आहे. माझ्या जडणघडणीत सर्वांत मोलाचा वाटा अजितदादाचा आहे. माझ्या बॅटिंगचे सर्व बारकावे तो जाणतो. आजही माझ्या फलंदाजीविषयी मी त्याच्याशी मनमोकळी चर्चा करतो. त्याला पुढं पुढं करायला अजिबात आवडत नाही. बऱ्याच कार्यक्रमांना तो जाणूनबुजून येत नाही. मात्र माझ्या खेळावर बारकाईनं नजर असते त्याची. माझ्या क्रिकेटर बनण्यामागं त्याचा मोलाचा वाटा आहे. तीच गोष्ट माझा मोठा भाऊ नितीन आणि बहीण सविताताईची. कधीच त्यांनी माझ्या "सचिन तेंडुलकर' असण्याचा कणभर फायदा घेतला नाही. आयुष्यात त्यांनी जे काही कमावलं ते स्वबळावर. माझ्यावर प्रेम केलं ते फक्त धाकटा भाऊ म्हणून.
सर्व नात्यांमध्ये सर्वश्रेष्ठ नातं असतं ते म्हणजे गुरू-शिष्याचं. माझे गुरू रमाकांत आचरेकर आहेत. आचरेकर सरांनी मला जी क्रिकेटची शिकवण दिली ती आयुष्यभर कामाला आली. तेव्हाही आचरेकर सर सामना झाल्यावर एकच प्रश्न विचारायचे, ""कसा बाद झालास?'' त्यांनी किती धावा केल्या हे कधीच विचारलं नाही. मग खराब फटका मारून बाद झाल्यावर अत्यंत स्पष्ट शब्दांत कानउघाडणी असायची. नसते लाड सरांकडं चालायचे नाहीत. त्याबरोबर चांगल्या खेळीनंतर मनमोकळी भरभरून शाबासकी मिळायची. सर सांगायचे, की फलंदाजानं कधीही तृप्त होता कामा नये. धावांची भूक सतत कायम राहायला हवी. जवळपास २३ वर्षं या गुरू-शिष्य नात्याला झाली. तुला सांगून पटणार नाही, परंतु सर किंवा अजितदादा मला आजपर्यंत वेलप्लेड म्हणाले नाहीयेत. मी आजही त्यांच्या त्या लाख मोलाच्या शाबासकीकरिता व्याकूळ आहे.
सुनंदन, मला तू धडक प्रश्न विचारलास, की सचिन तेंडुलकरची पत्नी होणं सोप्पं आहे का? मी १०० टक्के सांगतो, की प्रचंड अवघड काम आहे. लोकांना ग्लॅमर दिसतं; पण अंजलीची भूमिका फार कठीण आहे. ती गोल्ड मेडलिस्ट डॉक्टर आहे. प्रत्येक माणसाला चांगलं कुटुंब हवं असतं. प्रेमळ, शांत, समाधानी, विचारी कुटुंब. मी नशीबवान आहे. मला नक्कीच तसं कुटुंब मिळालं आहे. अंजलीला कुटुंबाची काळजी घ्यायची असते आणि माझीही. ज्या वेळी आपण अटीतटीचा सामना हरतो तेव्हा माझं डोकं ताळ्यावर नसतं. मूड ऑफ झालेला असतो. त्या वेळी अंजली मुलांना माझ्याजवळ सोडते. त्या निरागस लहानग्यांमध्ये मी रमतो आणि माझी तगमग शांत होते. मागे माझ्या आयुष्यात कोपराला झालेल्या दुखापतीनं अस्थिरता आली होती. एक प्रकारची साशंकता मनात घर करत होती. अंजली स्वतः डॉक्टर असल्यानं तिनं मला शांत केलं. सुनंदन, लोकांना कळणार नाही, पण माझ्या मुलीनं- सारानं- माऊंट मेरी चर्चमध्ये जाऊन देवापुढं मेणाचा हात ठेवून अंजलीबरोबर जाऊन प्रार्थना केली. माझा लहान मुलगा अर्जुनही मला विचारत होता, की बाबा, तुझ्या हाताला बाऊ झाला आहे का? मी औषध लावून देऊ का? सगळे जण माझी कोपराची दुखापत लवकरात लवकर बरी व्हावी म्हणून प्रार्थना करत होते. मला वाटतं, माझ्या क्रिकेटच्या मै दानावरच्या पराक्रमाइतकंच अंजलीचं संसारातलं योगदान लाख मोलाचं आहे. माझ्यासाठी त्यांना सर्वांना माहीत आहे, की क्रिकेट माझ्याकरिता काय आहे. निःसंकोचपणे कबूल करावंसं वाटतं, की कुटुंबाच्या पातळीवर अंजलीचा अप्परहॅंड आहे तो तिच्या त्यागामुळे आणि कर्तृत्वामुळे. लग्नाला इतकी वर्षं झाल्यावर पती-पत्नी नात्याला वेगळी खोली प्राप्त होते. त्याचा अनुभव मी घेत आहे.
माझं कुटुंब माझं सर्वस्व आहे. या सर्व लोकांनी अत्यंत निर्व्याज भावनेनं माझ्यावर भरभरून प्रेम केलं. मी क्रिकेटमध्ये यश मिळवो वा अपयश, त्यांच्या भूमिकेत काडीमात्र बदल होणार नाही. या लोकांकरिता मी नेहमी फक्त "सचिन' राहणार. माझ्या या छोट्याशा कुटुंबातल्या प्रत्येकाची सकारात्मक इच्छाशक्ती माझ्या पाठीशी भिंतीसारखी सदैव उभी असते. त्यांच्या सर्वांच्या अचाट त्यागावर माझ्या क्रिकेटच्या यशाची इमारत उभी आहे. माझ्या ३४ वर्षांच्या आयुष्यात सुख असो वा दुःख, यश असो वा अपयश, याच नात्यांनी तारून नेलं आहे. माझ्याकरता ही नाती ही दिखाऊ नाहीत, तर जीवनमरणाची... रक्ताची नाती आहेत.
प्रत्येक माणसाला चांगलं कुटुंब हवं असतं. प्रेमळ, शांत, समाधानी, विचारी कुटुंब. मला नक्कीच तसं कुटुंब मिळालं आहे.
- सचिन तेंडुलकर
प्रतिक्रिया
4 Feb 2008 - 5:20 pm | भडकमकर मास्तर
ले़ख छानच आहे....
आत्ता ऑस्ट्रेलिया दौर्यात टेस्ट मॅचेस मध्ये पुन्हा पूर्वीचाच आक्रमक सचिन पहायला मिळाला , फार बरे वाटले... मेल्बोर्न पहिली इनिंग पाहिल्यावरच (६२) असे वाटले होते की यावेळी साहेबांचा पवित्रा निराळा आहे...मेल्बोर्न दुसर्या इनिंग मध्ये त्याने पुन्हा ब्रेट ली वर आक्रमणाचा प्रयत्न केला आणि मग आउट झाला...मग सिडनी आणि ऍडिलेड मध्ये सुद्धा अप्रतिम शतके पाहायला मिळाली...
...गेल्या वर्षी पर्यंत दुखापतींनी वैतागलेला धीमा सचिन पाहता आम्ही प्रचंड दु़।खी झालो होतो....आणि ऑस्ट्रेलिया दौर्यात दौर्यात सचिन खेळला तर खरे, असे मानत होतो...पण आम्हास साहेबांनी अप्रतिम खेळ दाखवला, आणि खुश करून सोडले......
.......लगे रहो सचिनभाई........
( २० -२० च्या जमान्यात टेस्ट क्रिकेट हेच बेष्ट मानणारा )
( जुन्या आक्रमक सचिनचा चाहता)
सतलज _भडकमकर