ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...

विसोबा खेचर's picture
विसोबा खेचर in जनातलं, मनातलं
1 Feb 2008 - 10:33 am

राम राम मंडळी,

येत्या रविवारी, म्हणजे ३ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता सहयोग मंदिर, घंटाळी ठाणे येथे
'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...' हा कार्यक्रम ठाण्यातील कलारसिक मंडळ या संस्थेने आयोजित केला आहे.

पं. विश्वनाथ कान्हेरे यांचा शिष्य अनंत जोशी (उच्चारी अन्ता जोशी! ;) हा आमचा दोस्त. आमचा अन्ता हा हिंदुस्थानी ख्याल गायनाला संवादिनीची उत्तमपैकी साथसंगत करणारा तरूण पिढीतील एक उमदा कलाकार.

'ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद..' या कार्यक्रमाची मूळ संकल्पना ही अन्ताची आहे. ऑर्गन या वाद्यावर आमचेही अत्यंत प्रेम! काही दिवसांपूर्वी अन्ताने ही कल्पना आम्हाला बोलून दाखवली आणि आम्हालाही ती फार पसंत पडली. आम्ही पडलो ठाण्यातले बापू काणे! भाईकाकांचा बापू जसा प्रत्येक संस्थेशी निगडीत असतो, तसंच थोडंफार आमचंही आहे! :) ठाण्यात कुठे काही हिंदुस्थानी रागसंगीताविषयी कार्यक्रम असला की तिथे आमची काही ना काही लुडबुड, काही ना काही खारीचा वाटा हा असतोच! आमचा हा शेक्रेट्री बापूकाणे वजा अनुभव लक्षात घेऊन अन्ताने आम्हालाही या कार्यक्रमाच्या आखणीत सहभागी केले आणि 'निर्मिती सहाय्यक' हे पद आमच्याकडे आले! :)

तर ते असो! मंडळी, यातला गंमतीचा भाग सोडा परंतु हा कार्यक्रम खरोखरंच सुंदर आहे आणि ज्यांना शक्य असेल त्यांनी या कार्यक्रमाला अवश्य उपस्थित रहावे अशी सर्व मिसळपावकरांना विनंती!

ऑर्गन रसास्वाद! वादन-गप्पा-संवाद...

मूळ संकल्पना - अनंत जोशी
निर्मिती सहाय्य - तात्या अभयंकर.
संवादक - मुकुंद मराठे. (मुकुंद मराठे हे संगीतभूषण पं रामभाऊ मराठे यांचे चिरंजीव आहेत,)

ऑर्गन वादन करतील -

आदित्य ओक.
संजय गोगटे.
संजय देशपांडे.

आदित्य ओक ऑर्गन या वाद्याविषयीची तांत्रिक माहिती, ऑर्गन व पायपेटी यातील फरक या संबंधीही बोलणार आहे. आदित्य हा देखील आमचा दोस्त असून तरूण पिढीतील एक गुणी संवादिनी वादक आहे. आमच्या राहूल देशपांडेला अनेकदा मैफलीत साथ करतो.

संजय देशपांडे हे जुन्या काळातले प्रसिद्ध ऑर्गन वादक हरिभाऊ देशपांडे यांचे चिरंजीव. मंडळी, हल्लीच्या पिढीला कदाचित हरिभाऊ देशपांडे हे नांव ठाऊक नसेल, परंतु हरिभाऊंनी साक्षात नारायणराव बालगंधर्व यांना नाटकातून अनेकदा ऑर्गनची साथ केलेली आहे! या कार्यक्रमाच्या निमित्ताने संजय देशपांडे हे आपल्या वडिलांच्या आणि नारायणरावांच्या काही आठवणी सांगणार आहेत.

मराठी संगीत रंगभूमीवरील सुप्रसिद्ध कलावंत प्रसाद सावकार यांनी आमच्या विनंतीला मान देऊन या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे मान्य केले आहे. या कार्यक्रमात प्रसाद सावकारही संगीत रंगभूमीवरील काही जुन्या आठवणींना उजळा देणार आहेत. आमच्या सावकारबुवांचा बोलण्याचा ढंग खूप छान आहे, बोलता बोलता जुन्या काळात, जुन्या आठवणींत ते श्रोत्यांना अगदी सहज घेऊन जातात!

आणि शेवटी पं गोविंदराव पटवर्धन यांचे शिष्योत्तम पं विश्वनाथ कान्हेरे यांच्या ऑर्गन वादनाने कार्यक्रमाची सांगता होईल.

आमचे कान्हेरेबुवा म्हणजे काय विचारता महाराजा? एक अतिशय गुणी, अतिशय सुरिला कलाकार! कान्हेरेबुवांचं वादन इतकं सुरेख असतं की त्यांच्याकडून ऑर्गनवर नाट्यपदं ऐकणं म्हणजे ते गाणं ऐकल्यासारखंच आहे! कान्हेरेबुवांचं मला खूप प्रेम मिळालं हे मी माझं भाग्य समजतो. ते मला माझ्या गुरुस्थानी आहेत. कधीही त्यांच्या घरी गेलो की प्रेमानं बसवून घेतील, संवादिनीवर म्हणा, ऑर्गनवर म्हणा, काहीतरी चांगलंचुंगलं ऐकवतील आणि 'बराय बुवा, निघतो आता' असं मी म्हटलं की एखादी प्रेमळ कोकणी शिवी देऊन 'बस रे XXXX, काय घाई आहे? जाशील सवडीने!' असं म्हणून प्रेमाने स्वत:च्या हाताने पिठलंभात करून जेवायला वाढतील! बुवांच्या घरचा तो पिठलंभात मी अनेकदा खाल्ला आहे. त्या पिठलंभातीची गोडी काही औरच!

असो..

बराय तर मंडळी, आता निरोप घेतो. सर्वांनी या कार्यक्रमाला अवश्य येण्याचे करावे अशी आग्रहाची विनंती!

आपला,
(गाण्यातला) तात्या अभ्यंकर.

कलासंगीतनाट्यमाहिती