'बाळु' आमचा गडी. हसरी, लाजरी, नम्र अशी मुर्ती. हा आमच्याकडे आठवड्यातून ४ दिवस येतो. महीन्याच्या पगारावर राहायला हा तयार नाही कारण त्याला इतर ठिकाणीही भरपूर डिमांड असतो. मग त्याला जास्त पैसे मिळतात.
हाय वयाने ४० च्या आसपास असेल. माझी सासू ह्याला "बाळू" भाऊ म्हणून हाक मारते तर आम्ही बाकीचे सगळे बाळू काका म्हणुन हाक मारतो.
जेवढे दिवस हा कामाला असतो तेवढे दिवस घरातल्या माणसांना मोठा आधार असतो. कारण प्रत्येक काम हा आवडीने, निट-नेटकेपणाने, स्वच्छ आणि विश्वासाने करतो. अगदी बगिचा सांभाळण्यापासुन ते घरातील ओटा पुसण्या पर्यंतचे कामही हा वेळ आली तर करतो. माझे हेच काम आहे मी अमुक काम करणार नाही, मला नाही जमत हे शब्द त्याला माहीतच नाहीत. अगदी कधीही बाजारात जरी पाठवले तरी जातो. आम्ही तो नसताना अंगणातला कचरा काढतो पण तो जेंव्हा काढतो तेंव्हा माती गुळगूळीत झाल्यासारखी वाटते. त्याच्या हातातच कामाची कला आहे.
हा मुळ फलटणचा. घरात काका आणि त्याचे वडील आणि त्यांचे कुटुंब एकत्र राहात होते. ह्यांची वारसा हक्काने मिळालेली जमिन होती. त्यात ते शेती करत. ती जमिन त्याचे काका मोठे असल्याने त्यांच्या नावावर होती. त्यांना ४ मुले आहेत. बाळुला १ बहिण आहे. तिचे लग्न लहान वयात तो २ वर्षाचा असतानाच झाले होते. ५ वर्षाचा होता तेंव्हा ह्याच्या वडीलांना रस्त्यात मोकाट बैलाने शिंग खुपसून मारले. बाळू आणि आईचा आधार संपला होता.
वडील गेल्यावर काकाच्या कुटुंबाने बाळू आणि त्याच्या आईचा छळ करायला सुरूवात केली. ५ वर्ष असे हाल झेलून एक दिवस बाळुच्या आईने कंटाळून त्यांचा जमिनीतील हिस्सा मागितला आणि आम्ही आमचे कमवून खाऊ म्हणून स्पष्ट सांगितले. असे सांगताच बाळूच्या काकांनी ही जमिन माझ्या नावावर आहे त्यात तुमचा काहीच हिस्सा नाही म्हणून सांगुन हकलऊन दिले.
दोघांचा राहीलेला आधार पण संपला होता. मग बाळूच्या आईने आपल्या माहेरी जायचे ठरवीले. मामाच्या घरची परिस्थिती तशी काही चांगली नव्हती पण ठिक होती. तिच्या माहेरी शेळ्यांचा व्यवसाय होता. मामा रोज दिवसभर शेळ्यांना चरायला घेऊन जायचा. घरात मामाच्या दोन मुली आणि मामी असा परीवार होता. बाळूचे आजी आजोबा आधीच वारले होते. तिचा विश्वास होता की माहेरची माणसे तिला नक्की सांभाळतील. आपण त्यांची कामे करू, कामाला हातभार लावू, शेळी राखू आपल्या मुलाला शिकऊन मोठा करू मग तो आपल स्वतःच घर बांधेल आणि आपण त्याचा सुखाचा संसार बघुन डोळे मिटू.
मामाने बाळू आणि आईला घरी ठेऊन घेतले. बाळूची आई मामीला घरकामात मदत करू लागली. बाळू आता मोठा झाला होता. तो मेंढ्या सांभाळू शकेल म्हणून मामाने एका वाडीवाल्या इसमाकडे नोकरी पत्करली आणि बाळू मेंढ्यांना चारायला घेऊन जाऊ लागला. सकाळी उठल्यावर डबा घेऊन तो शेळ्या चरायला न्यायचा तो संध्याकाळी दिवस मावळताना घरी यायचा. अशा परीस्थितीत आईने त्याला शाळेत घालण्याची इच्छा मनोमनच मारली. बाळू संध्याकाळी थोडावेळ विरंगूळा म्हणून आजूबाजूला त्याने जे मित्र जमवले होते त्यांच्याशी गप्पा गोष्टी करायला जायचा आणि घरी आल्यावर जेऊन गाढ झोपायचा आयुष्याची स्वप्न बघत.
अशिच काही वर्षे निघुन गेली आणी बाळूला समज येउ लागली. आता त्याला स्वत:च्या घराची ओठ लागली होती. आपलही एक घर असाव त्यात आपण आपल्या आईला सुखात ठेवाव अस त्याला मनोमन वाटू लागल. एक दिवस त्याच्या मित्राने त्याला सांगितल की मुंबईतील एका बंदरात ओझी वाहण्याच्या कामासाठी मजूर हवे आहेत. तिथे पगार चांगला आहे. आपण तिकडे जाऊ. बाळूच्या डोळ्यासमोर त्याची सगळी स्वप्न फेर धरू लागली. त्याने लगेच त्या मित्राला आपला होकार कळवला आणि आपला विचार आईला सांगितला. आई घाबरत होती.नको म्हणत होती. कारण तिने मुंबई ही भुलभुलैया आहे हे ऐकले होते. पण तिला माहीत होते की तो जर इथेच राहीला तर आयुष्यभर त्याला मामाच्या मेंढ्या सांभाळाव्या लागतील. तिने त्याला होकार दिला.
रात्री ही गोष्ट आईने मामाच्या कानावर घातली. मामा वैतागला होता. म्हणाला की "तुमच्या भरवश्यावर मी दुसरी मजूरी पत्करली. दोन वेळचे मिलते ना तुमास्नी खाया, मग आता काय धाड भरली ? मी तुमच्यावर उपकार केले त्याची ही परत फेड करता व्हय !".
....... क्रमश.
प्रतिक्रिया
26 Mar 2009 - 12:39 am | योगी९००
जागू,
बाळू चे व्यक्तिचित्रण आवडले. काही माणसे जन्मत:च वाईट नशीब घेऊन आली असतात. पण कष्ट करून आपली परिस्थिती बदलवतात. अशा लोकांविषयी नेहमीच मला आदर वाटतो.
लवकरच पुढचा भाग टाका.
खादाडमाऊ
26 Mar 2009 - 12:47 am | बिपिन कार्यकर्ते
छान लिहिलं आहेत हो जागु!!! पुढचा भाग लवकर येऊ द्या.
बिपिन कार्यकर्ते
26 Mar 2009 - 6:40 am | सँडी
वा! जागु, तुमच्यात लेखक पण दडला आहे तर...
छान लिहलतं, पुढ्चा भाग लवकर टाका...