नमस्कार मंडळी,
कधीकधी आपल्याला भविष्यात काय घडणार याची कल्पना निसर्ग स्वप्ने, भास किंवा जाणीवेच्या पातळीवरील अनुभवांमधून देतो. कधी त्याक्षणी निसर्गाच्या संकेतांचा अर्थ कळतो तर कधी कळत नाही. अनेकदा अशा एखाद्या अनुभवाचा किंवा स्वप्नाचा संबंध काय आणि तो अनुभव/स्वप्न का पडले हे आपल्याला कळत नाही आणि आपण त्याविषयी फारसा विचार करत नाही. पण निसर्ग आपल्याला ज्या घटनेविषयी सुचित करायचा प्रयत्न करत आहे ती घटना घडून गेल्यानंतर मात्र आपल्याला अशा घटनांचा उलगडा होतो. मला नक्की काय म्हणायचे आहे हे मला स्वत:ला आलेल्या तीन अनुभवांमधून स्पष्ट होईल.
१) दिनांक २९ मे १९९७. माझे वडिल ठाण्यातील सिंघानिया रूग्णालयात अतिदक्षता विभागात होते.त्यावेळी आम्ही ठाण्यात राहायला होतो. २९ तारखेला सकाळी मी रुग्णालयात पोहोचलो.रूग्ण अतिदक्षता विभागात असेल तर नातेवाईकांनी आपल्या समाधानासाठी बाहेर थांबायचे कारण आत जायच्या ठराविक वेळा सोडून विभागात पाऊलही ठेवता येत नाही.आणि माझे वडिल त्यावेळी बेशुध्दावस्थेत असल्यामुळे आत गेल्यावरही कोणतेही संभाषण व्हायचा प्रश्नच नव्हता. तरीही मी तिथे जात होतो.त्या दिवशी दुपारी माझी बहिण आणि मावशी तिथे येणार होत्या.आणि आम्ही तिघांनी रूग्णालयाच्या कँटिनमध्ये जेऊन मग मी घरी परत जाणार होतो.मी आदल्या दिवशी कँटिनमध्ये जाऊन चहा घेतला होता त्यामुळे मला कँटिन कुठे आहे याची पूर्ण कल्पना होती.तर माझ्या बहिणीला आणि मावशीला कँटिनची जागा माहित नव्हती आणि मी त्यांना तिथे घेऊन जाणार होतो.
कँटिनकडे जाण्यासाठी एका लांब पॅसेजच्या मध्ये खाली जाणारा एक जीना होता.त्या जीन्यावरून कँटिनला जायचे होते.पण त्या दिवशी काय झाले काय माहित.मी कुठे जात आहे याचे अजिबात भान मला नव्हते.मी त्या लांब पॅसेजमध्ये जीन्यावरून खाली न जाता चालतच राहिलो.आणि मी पूर्णपणे ’ब्लँक’ झालो होतो.त्याच पॅसेजच्या शेवटी शवागार होते आणि तिथे गेल्यावर माझी बहिण म्हणाली ’अरे इथे कुठे घेऊन आलास?आपल्याला कँटिनला जायचे आहे’.तेव्हा मी भानावर आलो आणि माझ्या रस्ता चुकल्याचे लक्षात आले.मग मी परत त्या पॅसेजमधून उलटे जाऊन कँटिनमध्ये गेलो.
हा सगळाच प्रकार माझ्यासाठी अनाकलनीय होता.पुढे दोन दिवसांनी ३१ मे १९९७ रोजी माझ्या वडिलांचे निधन झाले.तेव्हा माझ्या लक्षात आले की दोन दिवसांपूर्वी झालेला प्रकार म्हणजे पुढे काय होणार आहे याचा निसर्गाने दिलेला संकेत होता.त्याचा अर्थ मला त्यावेळी कळला नाही पण नंतर कळला.
२) दुसरा प्रकार मी अमेरिकेत असताना घडला.मी अमेरिकेत पी.एच.डी करत होतो आणि माझ्या दुर्दैवाने मला पी.एच.डी साठी मार्गदर्शन करणारे गाईड अत्यंत त्रास देणारे निघाले.मार्गदर्शन करण्यापेक्षा कसलेच मार्गदर्शन न करणे असा त्यांचा स्वभाव निघाला.मी माझ्या परिने होईल तितके हातपाय मारले आणि बराच प्रयत्न केला.पण पूर्णपणे स्वत:च्या हिंमतीवर व्हायला पी.एच.डी म्हणजे पाचवीची परीक्षा नव्हे!दगडावर डोके आपटून रक्त येण्याखेरीज दुसरे काहीही होत नाही आणि उगीच ’टाईमपास’ चालला आहे हे माझ्या लक्षात आले आणि मी पी.एच.डी सोडून भारतात परत यायचा निर्णय घेतला.
माझा दुसरा अनुभव आहे ऑक्टोबर २००७ मधला.मी भारताबाहेर बराच काळ राहिल्यामुळे भारत हाच माझ्यासाठी परदेश झाला होता.आणि भारतात परत गेल्यावर मला नोकरी मिळणार की नाही, त्यासाठी किती दिवस थांबावे लागेल अशा अनंत चिंतांनी घेरून टाकले होते. त्यावेळी अमेरिकेतील कोणत्याही भारतीय विद्यार्थ्याप्रमाणे माझे वेळापत्रक विचित्र होते. झोपायच्या उठायच्या वेळा याला काहीही धरबंद नव्हता.
एकदा विद्यापीठात सर्व एम.एस आणि पी.एच.डी च्या विद्यार्थ्यांसाठी एका सेमिनारचे आयोजन केले होते.अशा सेमिनारमध्ये मेहेरदाद नेगाहबान या भारदस्त नावाचे मूळचे इराणी असलेले विद्यार्थीप्रिय प्राध्यापक आयोजन करण्यात पुढे असत.सेमिनार दुपारी चारच्या सुमारास संपला आणि मी त्यानंतर घरी येऊन झोपलो. झोपेत मला एक स्वप्न पडले. त्या स्वप्नात प्रा.नेगाहबान विद्यापीठात होते आणि सेमिनारला हजर असलेल्या सर्व विद्यार्थ्यांना ते ’इकडे या’ असे बोलवत होते. इतर विद्यार्थ्यांबरोबर मी पण तिकडे गेलो तर ते मला म्हणाले ,’अरे तू इथे का येतोस?हा मार्ग तुझ्यासाठी योग्य नाही.तू दुसर्या मार्गाने जा’ असे म्हणून दुसर्या एका दिशेला त्यांनी बोट दाखवले. मी त्या दिशेला जाऊ लागलो.बरोबर इतर कोणीच नव्हते. विमान प्रवासात मी नेहमी न्यायचो ती हँडबॅग माझ्याजवळ होती आणि पुढे जाऊन बघतो तर विमान उभे होते.
त्यानंतर मी ताबडतोब जागा झालो. माझ्यासाठी ’चांगला मार्ग’ भारतात आहे आणि तिकडे नेण्यासाठी विमान माझ्यापुढे उभे होते. तसेच भारतात परत गेल्यावर सर्वकाही चांगले होईल असा तो संकेत आहे हे माझ्या लक्षात आले. ही कदाचित अंधश्रध्दा असेलही पण त्या क्षणानंतर माझ्या सगळ्या चिंता दूर झाल्या. पुढे भारतात परत आल्यानंतर माझे सगळे चांगलेच झाले.
३) मी मिपावर माझा २६/११ मुंबई हल्ल्यानंतरचे संपादकिय लिहिले.ते ई-मेलवर पाठवून दिले आणि थोड्या वेळातच मला माझ्या चुलत भावाचा फोन आला की माझ्या चुलत बहिणीचे यजमान ह्रुदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन पावले.माझे वडिल आजारी असताना त्यांनी आम्हा सगळ्यांनाच खूप मदत केली होती.ही घटना घडायच्या ३-४ दिवस आधी मला १२ वर्षांपूर्वी झालेल्या घटना उगीचच आठवत होत्या. उदाहरणार्थ माझे वडिल रूग्णालयात असताना माझे त्यांचे काय बोलणे झाले ते मला आठवले.माझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी मी त्यांच्याबरोबर त्यांच्या गाडीतून हॉलवर गेलो होतो.त्यावेळी काय बोलणे झाले ते पण मला आठवले.त्याच वर्षी त्यांच्या मुलाची शाळा बदलली होती. तेव्हा तो नव्या शाळेत नीट स्थिरावला का, त्याला नवे मित्र मिळाले का असे प्रश्न मी त्यांना विचारले होते. हे सगळे मला आठवले.
इतक्या वर्षांनंतर मुद्दामून आठवाव्यात इतक्या महत्वाच्या या गोष्टी निश्चितच नव्हत्या. तेव्हा हे सगळे मला का त्या वेळी का आठवावे हे मला कळेना.लवकरच त्यांच्याबद्दल काही बातमी येणार आहे हा तो संकेत होता का?
या सगळ्या गोष्टींचा बुध्दीवादाने खुलासा होईल असे वाटत नाही.ही अंधश्रध्दा आहे का हे मला माहित नाही पण निसर्ग कधीकधी भविष्यात काय होणार आहे याची कल्पना आपल्याला देत असतो का?अर्थात प्रत्येक महत्वाच्या घटनेची कल्पना आपल्याला मिळत नाही. ते का हे पण समजायला मार्ग नाही.
आपल्यापैकी कोणाला असे अनुभव आले आहेत का?
प्रतिक्रिया
21 Mar 2009 - 8:51 am | विसोबा खेचर
पण निसर्ग कधीकधी भविष्यात काय होणार आहे याची कल्पना आपल्याला देत असतो का?
याचे सामान्यीकरण करता येणार नाही. हे प्रत्येकाच्या अनुभवावर अवलंबून आहे.
आपल्यापैकी कोणाला असे अनुभव आले आहेत का?
नाही बुवा! म्हणजे निदान तसं कधी जाणवलं तरी नाही...
तात्या.
21 Mar 2009 - 12:15 pm | आनंदयात्री
होय ... असे अनुभव आहेत. सर्वसाधारणपणे असे स्वप्नातुन संकेत मिळतात. पण दरवेळेस त्यांचे लिंकिंग घटना घडुन गेल्यावर होते, त्यामुळे मनाचे खेळ म्हणुन दुर्लक्षिले जाते.
पण जेव्हा जेव्हा स्वप्नात सापाने माझ्या पायाला विळखा घातला आहे तेव्हा तेव्हा मी काहीना काही प्रिय असे गमावले आहे.
-
आनंदयात्री
21 Mar 2009 - 12:24 pm | नरेश_
चार महिन्यांपूर्वी एके दिवशी अचानक मला माझ्या मावसबहिणीची आठवण सतावू लागली.
आणि अचानक दुसर्या दिवशी फोन आला, 'ती' गेल्याचा !
21 Mar 2009 - 7:43 pm | क्रान्ति
बरेचदा संकेत अगदी लहानसे असतात, पण आपल्याला ते काहीतरी घडून गेल्याशिवाय समजत नाहीत. पश्चातबुद्धीने आपण त्या संकेतांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करत रहातो. आपल्याला हिंट मिळाली होती, पण त्यावेळी तिचं महत्त्व आपल्याला समजल नाही, हे वेळ गेल्यावर कळत. हे मनाचे खेळ म्हणा की आणखी काही, पण असं होतं हे मात्र नक्की!
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}
21 Mar 2009 - 8:18 pm | रेवती
मलाही असे संकेत बर्याच वेळा मिळतात.
रेवती
22 Mar 2009 - 11:18 am | आनंद घारे
योगायोगाने ज्या गोष्टींची नंतर संगती लागते त्या तेवढ्या लक्षात येतात, इतर येत नाहीत. आपल्याला कधी कधी कोणाकोणाची आठवण झाली हे रोजच्या रोज लिहून ठेवले आणि ते वेळोवेळी तपासत राहिले तर त्या लोकांपैकी बहुसंख्य लोकांच्या बाबतीत पुढे कसलीही बातमी आली नाही हे नक्की जाणवेल. त्याचप्रमाणे इतर अनेक वेळा आपण विमनस्कपणे अनपेक्षित अशा गोष्टी करतो. त्या सार्या लिहून ठेवल्या तर त्यातल्या बहुसंख्य गोष्टींचे नंतर कसलेही संदर्भ लागत नाहीत. ज्या लोकांना आपल्याला भविष्यातले संकेत मिळतात असे वाटते त्यांनी एक दैनंदिनी ठेऊन हा प्रयोग अवश्य करावा.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
23 Mar 2009 - 2:59 pm | चापलूस
आनंद घारे ह्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे. रॅशनल थिंकिंगमध्ये अशा संकेतांना काही स्थान नाही. पण इंटरेस्टिंग रीड.
23 Mar 2009 - 3:53 pm | मराठी_माणूस
एकदम बरोबर
22 Mar 2009 - 2:03 pm | प्रमोद देव
इथे आहेत.
मात्र मी ह्या सर्वांना निव्वळ योगायोग मानतो.
कावळो बसाक आणि फांदी मोडाक गाठ....ह्या सदरात. (चुकले असेल तर मालवणी भाषकांनी मला क्षमा करावी.)
आम्ही कोणत्याही कंपूत नाही. कारण आमचा स्वतःचाच एक कंपू आहे. ;)
22 Mar 2009 - 3:37 pm | प्रकाश घाटपांडे
ज्योतिषाच्या बाबत असाच प्रश्न लोकांच्या मनात असतो. ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी.... प्रश्नोत्तरातुन सुसंवाद मधुन उधृत
लोकांना अनुभव येतो म्हणूनच हे शास्त्र टिकले ना? नाहीतर ते एक निरूपयोगी शास्त्र म्हणून फेकले गेले नसते का?
संभाव्यताशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ प्रॉबेबिलिटी. याचा मोठा उपयोग भाकिते वर्तवणाऱ्यांना होतो. याचे नित्य परिचयातले उदाहरण म्हणजे मुलगा होईल की मुलगी होईल याचे भाकीत. ते भाकीत पन्नास टक्के बरोबर येणारच असते, पण सामान्य लोक मात्र भाकीत बरोबर ठरल्याचे श्रेय ज्योतिषाला देतात. असे संभवनीयतेचे कितीतरी अनुभव तुमच्या दैनंदिन जीवनात येत असतात. उदा. तुम्ही एखाद्याची आठवण काढायला आणि ती व्यक्ती तुम्हाला भेटायला किंवा फोन यायला, तुम्ही एखादे गाणे गुणगुणायला आणि नेमके तेच गाणे रेडिओवर लागायला. एखाद्या घटनेची भीती व्यक्त करायला व ती घटना घडायला एकच वेळ येते. पण हीच संभवनीयता जर ज्योतिषाकडून व्यक्त झाली आणि त्याप्रमाणे घटना घडली तर मात्र ते प्रत्यंतर वा प्रचिती. या संभवनियतेविषयी दीड हजार वर्षांपूर्वी भट्ट नारायण लिखित 'वेणीसंहार` नाटकात दुर्योधनाच्या तोंडी एक वाक्य घातले आहे. ते म्हणजे-
ग्रहाणां चरितं स्वप्नो निमित्तान्युपयाचितम् ।
फलन्ति काकतालीयं तेभ्य: प्राज्ञा न बिभ्यति ।।
अर्थ :- ग्रहांच्या गती, स्वप्न, शकुन, नवस हे काकतालीय न्यायाने फळतात. शहाणे लोक त्यांना घाबरत नाहीत.
भविष्यात काय वाढून ठेवलेले आहे ते जाणून घेण्याची उत्कंठा प्रत्येकालाच असते. ती उत्कंठा भागवणारा कुणीही माणूस दिसला की लोक त्याच्यामागे लागतात. समजा, तुम्हाला हस्तरेषांतले काहीही कळत नाही, तरी पण तसा आव आणून व थोडी हुषारी वापरून तुम्ही जरा थापा मारायला सुरुवात करा. लगेच तुमच्या परिचयातले लोक, मुलं, मुली सुद्धा हात पुढे करतील, याचा अनुभव घेऊन पहा! तुम्हाला ज्योतिषातले थोडेफार कळते एवढा सुगावा लागायचाच अवकाश की तुमच्या आप्त परिवारातले लोक तुम्हाला आपले भविष्य सांगायचा आग्रह धरतात की नाही ते पहा. एवढे लांब कशाला, पेपरात येणा या राशी-भविष्याचा तुमचा स्वत:चा काय अनुभव आहे त्याचा विचार करा. त्या भविष्यात काही अर्थ नसतो हे ठाऊक असूनही तुम्ही अधूनमधून का होईना पण तुमच्या राशीचे भविष्य वाचताच ना! "राशीचक्र" चा प्रयोग पाहून आलेल्या प्रेक्षकांना त्यांचे मत विचारा, करमणूक भरपूर झाली, राशींची वर्णने काही पटली, काही नाहीत असेही म्हणतील, तरीपण प्रयोगाची लोकप्रियता काही कमी व्हायची नाही!
हे शास्त्र जर भ्रामक असेल तर त्याचे अनुभव लोकांना कसे येतात ? या शंकेचे उत्तर असे आहे की, नरबळी देणे, चेटूक, जारणमारण, भानामती, भूत काढणे, जट येणे, शुभ-अशुभ शकुन, गणपती दूध प्याला अशा कितीतरी वेडगळ अंधश्रद्धांचे अनुभव लोकांना येत असतात म्हणून तर त्या आजवर टिकून राहिलेल्या आहेत. फलज्योतिषाचेही असेच अनुभव लोकांना येत असतात, पण त्या अनुभवांच्यामुळे हे खरे शास्त्र आहे असे सिद्ध होत नाही. वस्तुस्थितीचा अंदाज घेऊन शक्यतेच्या आधारे वर्तवलेली 'भाकिते` वेगळी व फलज्योतिषाच्या आधाराने वर्तवलेली भाकिते वेगळी, पण दोन्हींची गल्लत लोक करतात. भाकिते खरी ठरली तरी त्यामागचा कार्यकारणभाव न तपासताच खरी ठरलेली भाकिते जणू काही ज्योतिषाचा वस्तुनिष्ठ पुरावा म्हणून गणले जाते. आता हे भाकीत पहा :- ' तुमच्या मुलाला लवकरच नोकरी लागेल व ती यंत्राशी संबंधीत असेल.` आता कुठेही नोकरी लागली तरी या यंत्रयुगात यंत्राशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येतोच. खऱ्या ठरलेल्या भाकितांची यादी जशी देता येते तशी खोटया ठरलेल्या भाकितांची यादी पण देता येते. चुकलेली भाकिते लोक विसरून जातात पण खरी झालेली भाकिते मात्र पक्की लक्षात ठेवतात. अशा अनेक कारणांमुळे फलज्योतिषाला एक फसवी प्रतिष्ठा लाभते.
जे का रंजले गांजले ...!
सतत प्रतिकूल परिस्थितीशी झगडता झगडता मेटाकुटीस आलेल्या माणसाला कुणीतरी धीर देणारा माणूस हवा असतो. ज्योतिषी ती गरज भागवतो. अमुक अनिष्ट ग्रहाची दशा दोन महिन्यांनी संपून तमुक शुभ ग्रहाची दशा सुरू होईल, असे काहीतरी ज्योतिषाच्या तोंडून ऐकले म्हणजे त्या बिचाऱ्याला हुरूप येतो. ज्योतिषी त्याला काही तरी दैवी उपाय करायला सुचवतो, त्याचा तरी निदान उपयोग होईल अशी आशा त्याला वाटते.
माणसाच्या स्वभावाची एक गंमत आहे. देव नवसाला पावला तर ती देवाची कृपा, नाही पावला तर आपलेच नशीब वाईट, असे स्वत:चे समाधान माणूस सहज करून घेतो. ज्योतिषाचे तसेच असते. एखादे चांगले भाकीत बरोबर ठरले की ती ज्योतिषशास्त्राची किमया, खोटे ठरले तर तुमचे नशीबच फुटके! चुकलेली दहावीस भाकिते कुणाला आठवायची नाहीत, पण एक बरोबर ठरलेले भाकीत मात्र लोकांच्या लक्षात पक्के रहाते, आणि त्याची तोंडोतोंडी प्रसिद्धी होत जाते. चुकला तर ज्योतिषी चुकला कारण तो माणूस आहे त्याच्या ज्ञानाला मर्यादा आहेत पण बरोबर आलं तर फलज्योतिष बरोबर आलं ही मानसिकता ज्योतिषांनीच रूजविली आहे.
फलाण्या थोर माणसाने आपल्या मृत्यूचा दिवस कुंडलीवरून आधीच वर्तवून ठेवला होता, आणि बरोबर त्याच दिवशी त्याला मृत्यू आला, असे किस्से अनेकदा ऐकायला मिळतात. ज्याला आपल्या मरणाचा दिवस किंवा वेळ आधीच अचूक कळली तो माणूस थोर, अशी समजूत प्रचलित आहे. ते किस्से खरे असतील तर त्याचा अर्थ असा होतो की कुंडलीवरून मृत्यूची तारीख बरोबर सांगता येते. तसे असेल तर मेलेल्या माणसांच्या पाच-दहा कुंडल्या ज्योतिषाला दिल्या तर निदान एका तरी कुंडलीवरून त्या माणसाच्या मृत्यूची तारीख बरोबर सांगता यायला पाहिजे, पण तसे होत नाही. हा तिढा टाकल्यावर ज्योतिषी कबूल करतात की कुंडलीवरून मृत्यू अचूकपणे वर्तवता येत नाही, पण मृत्यूची शक्यता मात्र वर्तवता येते! 'शक्यता` या शब्दाच्या प्रांतात एकदा शिरल्यावर मूळ प्रश्नाला अनेक फाटे फुटतात, आणि त्यात उत्तर हरवून जाते. सांगायचा मुद्दा हा की, मृत्यूची अचूक भाकिते कुंडलीवरून वर्तवल्याच्या कथा कर्णोपकर्णी फैलावत जातात, पण त्यांची शहानिशा करणे दुरापास्त असते. लोकांना मात्र वाटत रहाते की ज्योतिष किती महान शास्त्र आहे! थोडक्यात संभवनियतेनुसार खरी ठरलेली भाकिते आणि जातकाला मिळालेले मानसिक समाधान वा आधार यालाच तो 'अनुभव` म्हणतो.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
23 Mar 2009 - 5:37 pm | आनंद घारे
खरे तर एक स्वतंत्र लेख होऊ शकेल इतका चांगला प्रतिसाद आहे. या विषयावर माझ्या अनुदिनीमध्ये मी वेगवेगळे लेख लिहिले आहेत.
आनंद घारे
मी या जागी चार ओळी खरडल्या आहेत, जमल्यास वाचून पहाव्यात.
http://360.yahoo.com/abghare
http://anandghan.blogspot.com/
22 Mar 2009 - 4:09 pm | भाग्यश्री
मी मिपावरच कुठेतरी प्रतिसादात लिहीले होते आधी.. मला इंट्युशन्स खूप येतात.. अर्थात फक्त माझ्याच संदंर्भात.. त्याप्रमाणे मी नाही वागले तर बर्याचदा मला पस्तावायची वेळ येते..
बाकी हं.. एखाद्या व्यक्तीची प्रकर्षाने आठवण यावी आणि लगेच कुठुनतरी त्या व्यक्तीचा संपंर्क व्हावा असेही घडलेय..
स्वप्नं बर्याच्दा एकच पडते मला.. उंच जीना मी चढतेय, चढतेय.. आणि खूप उंचावरून जोरात खाली पडतेय वगैरे.. अजुनतरी अर्थ लागला नाहीये याचा!
23 Mar 2009 - 2:42 pm | केवळ_विशेष
म्हणतात ते हेच असते का?
मलाही बरेच वेळा काही स्वप्न पडतात. उठल्यावर ती अंधूकशी आठवतात. पण जेव्हा एखादी घटना घडते, त्या वेळेस ते स्वप्न आठवतं की अरे, ही घटना आपण पूर्वी पाहीली आहे!असं वाटतं.
यावर वाचायला आवडेल. आपल्यापैकी कोणाला काही अनुभव असतील तर जरूर शेअर करा.
23 Mar 2009 - 2:50 pm | दशानन
मागे कधी तरी मी ह्या विषयी लिहले होते त्याचा दुवा येथे !
23 Mar 2009 - 4:42 pm | सातारकर
पुढे काय घडणार आहे ते आधीच दिसलं आणि मग तस घडलय असं कधी झाल नाही पण घडल्यानंतर मात्र बय्राच वेळेला असं वाटत आल आहे की हे असं घडणार आहे हे माहीत होत.
इंग्रजी व्यक्तीमत्व विकासाच्या पुस्तकांमधे बय्राच लेखकांनी ह्या संकल्पनेचा / प्रकाराचा जराशा वेगळ्या पद्धतीन पुरस्कार केलेला दिसतो. ते म्हणतात की तुम्हाला जे हवय आणि जस हवय त्याची इत्थंभूत कल्पना करा, चित्र डोळ्यासमोर आणा आणि तुम्ही त्या गोष्टी मिळवण्यात/करण्यात यशस्वी व्हाल आणि ह्या सिद्धांताच्या जोडीला बरीचशी उदाहरण.
-----
जात-धर्म न मानणाय्रा लोकांचा एक पंथ स्थापन करायचा आहे, येताय ? ;)