छम् छम् छम् ..... छम् छम् छम्। छडी लागे छ्मछ्म, विद्या येई घमघम ।।
छम् छम् छम् ..... छम् छम् छम्
हे गाणे माझ्या लहानपणी सगळ्या मुलांना अतीशय आवडत असे. माझ्या पुढच्या पिढीमधल्या मुलांनी ते क्वचितच ऐकले असेल, पण त्यानंतरच्या पिढीतल्या लिटल् मॉनिटर मुग्धा वैशंपायन हिने हे गाणे सारेगमप लिटल् चँप्सच्या स्पर्धेत सादर केले आणि सर्वांनी ते अक्षरशः डोक्यावर घेतले. सारेगमपच्या महाअंतिम फेरीत तिनेच ते गायिले, मुग्धावर झालेल्या खास भागात या गाण्याचा समावेश होता आणि वाशीला झालेला या लिटल् चँप्सचा एक कौतुकसोहळा मी पाहिला त्यातसुध्दा तिने सादर केलेल्या या गाण्याला अमाप टाळ्या पडल्या. पंचरत्न या नांवाने निघालेल्या सीडीमध्ये हे गाणे घेतलेले असल्याने अनेक लोक ते ऐकत राहणार आहेत. विख्यात कवी आणि गीतकार वसंत बापट यांनी लिहिलेले हे मजेदार गाणे सुप्रसिध्द संगीत दिग्दर्शक वसंत देसाई यांनी १९५३ साली निघालेल्या श्यामची आई या चित्रपटासाठी स्वरबध्द केले आणि त्यावेळी बालवयात असलेले आताचे ज्येष्ठ संगीतज्ञ पं.हृदयनाथ मंगेशकर यांनी ते गायिले होते. मी लहान असतांना माझ्या आईच्या वयाच्या स्त्रिया एकत्र येऊन जेंव्हा गाणी वगैरे म्हणायच्या त्यात एक गाणे हमखास असायचे. त्याचे शब्द होते,
भरजरी ग, पितांबर, दिला फाडुन, द्रौपदिसी बंधु शोभे नारायण ।
हे गाणे त्या चित्रपटाचे निर्माते दिग्दर्शक आचार्य अत्रे यांनी स्वतः लिहिले होते आणि आशा भोसले यांनी गायिले होते.
य़ा गाण्यात अशा अर्थपूर्ण ओळी आहेत
प्रेमाचे लक्षण भारी विलक्षण । जैसि ज्याची भक्ती तैसा नारायण ।।
रक्ताच्या नात्याने उपजे ना प्रेम । पटली पाहिजे अंतरीची खुण ।।
धन्य तोचि भाऊ, धन्य ती बहीण । प्रीती ती खरी जी जगी लाभाविण ।।
चिंधी पाहून हरी झाले प्रसन्न । द्रौपदीसी .......
कवी यशवंत यांचे एक अजरामर असे मातृप्रेमाने ओथंबलेले गीत आशा भोसले यांच्याच आवाजात या चित्रपटात घातले होते. ते होते,
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी , ती हाक येइ कानी । मज होय शोककारी ।।
या गाण्यातली "स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी " ही ओळ तर आता मराठी भाषेतले एक सुवचन बनले आहे.
श्यामची आई या चित्रपटाला स्व. वसंत देसाई यांनी इतके मधुर संगीत दिले असले तरी गाणी हा कांही या चित्रपटाचा आत्मा नव्हता. स्व.साने गुरूजींनी लिहिलेल्या याच नांवाच्या पुस्तकातल्या कथेवर तो काढला होता आणि या पुस्तकाद्वारे साने गुरूजींनी दिलेल्या शिकवणीला त्यात सर्वात जास्त महत्व होते.
ही शिकवण समर्थपणे मांडलेला आणि या सर्व अमर गाण्यांनी नटलेला'श्यामची आई' हा अजरामर चित्रपट प्रदर्शित होऊन आता छपन्न वर्ष पूर्ण झाली. शुक्रवार, ६ मार्च १९५३ रोजी मुंबईच्या कृष्णा टॉकीज (आताचे ड्रीमलॅन्ड) मध्ये या सिनेमाचा पहिला खेळ श्री. आचार्य अत्रे ह्यांच्या मातोश्री, श्री. व्ही.शांताराम ह्यांच्या मातोश्री, श्री. साने गुरुजींच्या मावशी व भगिनी, श्री. माधव वझे ह्यांच्या मातोश्री आणि श्री. माधव अलतेकर ह्यांच्या मातोश्री या पंचमातांच्या उपस्थितीत झाला होता.
'श्यामची आई' हा मराठी बालसाहित्यातला अनमोल संस्कारांचा ठेवा आहे. हा ठेवा घरोघरी नेऊन पोचवण्याचे महान कार्य ७६ वर्षाचे श्री. पुराणिक हे गेली १३ वर्षे सतत करत आहेत. रोज एक तरी पुस्तक विकले गेलेच पाहिजे नाहीतर त्या दिवशी एक जेवण करायचे नाही असा त्यांचा संकल्प आहे, पण गेल्या तेरा वर्षात अशी वेळ फक्त तीन दिवशी आली. सरासरीने पाहता त्यांची रोज तीन पुस्तके विकली गेली आहेत. "दुस-याकडून आदर, विश्वास, सत्याची अपेक्षा करण्याआधी स्वत: ते आधी आचरणे म्हणजेच संस्कार. संस्कार ही काही अचानक माणसांत येणारी शक्ती नव्हे. संस्कार हे घडवावे लागतात, हळूहळू रूजवावू लागतात." असे ते सांगतात. पुस्तकातली आणि चित्रपटातली श्यामची आईसुध्दा रोज घडणा-या लहान सहान प्रसंगातून वेळोवेळी श्यामला समज देऊन किंवा समजावून सांगून आणि स्वतःच्या आचरणातून त्याच्या मनावर संस्कार करत असते.
ही सर्व सचित्र माहिती मराठीवर्ल्ड या संकेतस्थळावर भाग्यश्री केंगे यांनी दिली आहे. मी त्यांचा आभारी आहे.
"आजच्या युगात श्यामच्या आईची शिकवण कांही कामाची नाही" असे अनेक लोक म्हणतील. प्रेम, परोपकार, दया, क्षमा, सचोटी, खरेपणा, संयम वगैरे सगळे झूट आहे आणि लबाडी, कपट, जबरदस्ती, हडेलहप्पी, फंदफितुरी, दगलबाजी, अतिरेकी वृत्ती वगैरेच खरे मार्ग आहेत असे सांगणारी पात्रे रामायण महाभारतातसुध्दा होती, असे लोक इतिहासकाळातही होऊन गेले आणि आजही मोठ्या संख्येने आहेत. त्यांनी केलेला युक्तीवाद वरकरणी बिनतोड वाटतो. पण सत्प्रवृत्तींना कुठल्याही परिस्थितीत जीवंत रहायची एक विलक्षण खोड आहे असे दिसते. श्रीरामचंद्र, गौतमबुध्द, येशू ख्रिस्त, साईबाबा वगैरे महान विभूतींची शिकवण लोक संपूर्णपणे आचरणात आणत नसतील, तरीसुध्दा त्यांची नांवेच आदराने घेतली जातात, ती प्रातःस्मरणीय ठरतात. सिनेमातल्या मुन्नाभाईच्या भाषेत सांगायचे झाले तर "उन बंदोंमे था दम।". श्यामच्या बालपणीच्या काळातले समाजजीवन आज दिसणार नाही, ते आतापर्यंत खूप बदलले आहे. आज कोकणातसुध्दा सोवळी दुर्वांची आजी कदाचित शोधून सापडणार नाही. श्यामच्या आईची पुस्तकातली गोष्ट वाचल्यानंतर किंवा तो चित्रपट पाहिल्यावर त्यातले वातावरण आपल्याला ओळखीचे वाटणार नाही. तरीही "ती ग्रेटच होती " असेच कोणीही म्हणेल.
प्रतिक्रिया
15 Mar 2009 - 11:40 am | भडकमकर मास्तर
त्यांनी केलेला युक्तीवाद वरकरणी बिनतोड वाटतो. पण सत्प्रवृत्तींना कुठल्याही परिस्थितीत जीवंत रहायची एक विलक्षण खोड आहे असे दिसते.
ही वाक्ये बेहद्द आवडली... अगदी पटलीच...
हे माझे आवडते पुस्तक होते पण आजच्या ; कमी वयात मोठ्या (!) होणार्या मुलामुलींना हे पुस्तक कसे आणि कितपत आवडते / आवडेल याविषयी थोडी शंका वाटते.
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
15 Mar 2009 - 11:51 am | नाना बेरके
श्यामच्या आईची पुस्तकातली गोष्ट वाचल्यानंतर किंवा तो चित्रपट पाहिल्यावर त्यातले वातावरण आपल्याला ओळखीचे वाटणार नाही. तरीही "ती ग्रेटच होती " असेच कोणीही म्हणेल.
. हे अगदी खरं आहे. मी पण असेच म्हणतो.
अवांतर : श्री. माधव वझे आणि त्यांचा मुलगा अमित हे उत्तम नाट्यनिर्मितीची जाण अजूनही ठेऊन आहेत.
15 Mar 2009 - 12:21 pm | प्राची
लहानपणी (जेव्हा पुस्तक वाचता येत नव्हते) आई 'श्यामच्या आई' पुस्तकातल्या गोष्टी सांगायची,त्या आठवणी जाग्या झाल्या.त्यातील कळ्यांची गोष्ट (या प्रसंगाचे चित्र या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर असल्यामुळे कदाचित) मनात विशेष घर करून राहिली.
15 Mar 2009 - 12:44 pm | अनंता
यांचे संस्कार मराठी मनावरुन कधीच पुसले जाणार नाहीत !!
15 Mar 2009 - 1:29 pm | क्रान्ति
लेख खूपच आवडला. जग कितीही पुढे गेल तरी शामची आई या पुस्तकातला संस्कारांचा खजिना कधी कमी होणार नाही, त्याची गोडी अविटच रहाणार आहे.
क्रान्ति {मी शतजन्मी मीरा!}