पंखा सुरू, पांघरुण ओढले, दिवा लागतो
उठ आता, वेळ झाली, बाबांची विरत जाणारी आरोळी
मग आई हळुच आत येते पंखा बंद करुन,
उठ हा आता डोक्यावरुन हात फिरवून जाते
पुन्हा एकदा बाबा येउन आज नाही आहे का ग क्लास?
माझ्याजवळ उभे राहुन आत आईला मोठ्या आवाजात प्रश्न.
चहा घ्या, पेपर आलाय आईचे बांबाना बाहेर बोलावणे
अरे पावणेसात झाले असे आई म्हणताच ओह नो! म्हणुन लवकर उठणे
पंधरा मिनटात आवरताना बेसीनपाशी गरम पाण्याचा गडू असतोच.
क्लास, खेळ, मित्र आटोपुन रात्री घरी आल्यावर, जेवताना
बाबा विचारतात कसा दिवस, आज उशीर झाला का?
मी हसत ओशाळत नाही हो, सायकल मारली जोरात.
पण बाबा उद्या तुम्हीच उठवा हो लवकर, आई म्हणजे बघा..
बाबा आईकडे पाहुन जोरात हसतात, तुप आणायला ती आत जाते.
--------------
सकाळी कोकराला तयार करायची ड्युटी माझी.
जीव होत नाही, म्हणुन न्याहळत बसला असतो उशाशी
बायको येउन म्हणते, अजुन नाही झाले का? वेळ पाहीली का?
आमच्या संवादात कोकरु जाग येउन कुस बदलू पहाते.
अरे वेडू जायचे की नाही शाळेत म्हणत मी कडेवर घेतो,
बेसीन मधील गरम पाण्याच्या नळाखाली हात घालताना
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
प्रतिक्रिया
4 Mar 2009 - 11:48 am | ३_१४ विक्षिप्त अदिती
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
सहजराव, मस्तच आहे कविता.
बाबा हळूच हाक मारून सकाळी उठवायचे, ताडकन उठलं की वर म्हणायचे, "आरामात, उशीर नाही झालेला!" कधी उशीर झालेला असला की गरम दूधाचा पेला पाण्यात ठेवून दूध थोडं गार करून द्यायचे. आज पुन्हा त्यांची आठवण झाली. :-)
अदिती
माझ्या मतांची आणि विचारांची कोणतीही वॉरंटी नाही.
4 Mar 2009 - 11:50 am | सुनील
वा सहजराव, अगदी सुंदर, हळुवार लिहिलीयं.
Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
4 Mar 2009 - 9:45 pm | चित्रा
असेच म्हणते.
4 Mar 2009 - 12:19 pm | अनिल हटेला
अप्रतीम !! :-)
बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
4 Mar 2009 - 12:21 pm | विनायक प्रभू
भारी. पहिल्यांदाच सहजरावांचे लिखाण आपल कविता वाचली.
4 Mar 2009 - 12:32 pm | आनंदयात्री
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
काय सुरेख लिहले आहेस रे सहज.
तीन पिढ्यांतील मधल्या पीढीचे मनोगत. वेडी माया.
मस्तच.
4 Mar 2009 - 12:35 pm | दशानन
सही.
ज्याला स्वतःचा भुतकाळ माहीत आहे... जो वर्तमान काळात कार्यरत आहे.. त्याचे भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे. :D
4 Mar 2009 - 3:23 pm | धमाल मुलगा
आनंदयात्री ह्यांच्याशी सहमत!
बाकी, आ.का.का.क.ना.हे.ज.जा.आ. (आम्हाला काव्यातलं काहीही कळत नाही हे जगजाहीर आहेच!) पण तरीही, छान वाटलं वाचायला. आवडलं.
आधीच्या पिढीची वागण्याची पध्दत आणि पुढच्या पिढीशी आपण वागण्याची पध्दत ह्यांची अत्यंत साध्या शब्दात सुरेख मांडणी.
अवांतरः पुढची पिढी जर आमच्यासारखी रात्र रात्र ट्वाळक्या, गप्पा करुन जागवून पहाटे पहाटे बेडरुमच्या दाराला आतून कडी लाऊन कुंभकर्ण होणारी असेल तर ह्याच कवितेतला दुसरा भाग कसा लिहिला जाईल बरं? :? :D
घ्या तिच्याआयला! ओ विडंबन पंटर्स...घ्या च्यामारी तुम्हाला सुपारी!
फाडा आता हीपण कविता. ;)
----------------------------------------------------------------------------------------
::::हल्ली चालु असलेल्या मराठी-आंतरजालीय-टोळीयुध्दाचा आपण एक भाग नाही आहात? काय सांगता? स्वतःला कर्कवृत्ती मराठी माणुस कसे काय म्हणवता? ::::
4 Mar 2009 - 12:35 pm | अमोल खरे
जुन्या आठवणी जाग्या झाल्या. हल्ली तर आठ शिवाय उठत नाही. पण विद्यार्थी असताना पहाटे लवकर उठवायचे आई बाबा त्याची आठवण झाली. मस्त कविता आहे.
4 Mar 2009 - 1:19 pm | अवलिया
छुपे रुस्तुम... :)
--अवलिया
4 Mar 2009 - 1:52 pm | मदनबाण
हेच म्हणतो...
मदनबाण.....
Be only positive and pure minded,for in such temples of the mind God loves to come and to stay.
Paramahansa Yogananda.
http://en.wikipedia.org/wiki/Paramahansa_Yogananda
23 Apr 2010 - 1:44 pm | ऋषिकेश
असेच म्हणतो.
कविता भयंकर आवडली.
ऋषिकेश
------------------
इथे दुसर्यांच्या ब्लॉगची जाहिरात करून मिळेल. योग्य बोलीसह संपर्क साधावा.
4 Mar 2009 - 1:23 pm | परिकथेतील राजकुमार
लिहिलिये :) सरळ आणी सहज काव्य.
©º°¨¨°º© प्रसाद ©º°¨¨°º©
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु
अखंडस्थितीचा निर्धारु, श्रीमंत योगी...
आमचे राज्य
4 Mar 2009 - 1:57 pm | बिपिन कार्यकर्ते
अंमळ त्रास झाला.... यातच कवितेचं यश आहे.
बिपिन कार्यकर्ते
23 Apr 2010 - 6:56 pm | संदीप चित्रे
अगदी सहमत बिका
>> पुन्हा एकदा बाबा येउन आज नाही आहे का ग क्लास?
माझ्याजवळ उभे राहुन आत आईला मोठ्या आवाजात प्रश्न.
चहा घ्या, पेपर आलाय आईचे बांबाना बाहेर बोलावणे
>> सकाळी कोकराला तयार करायची ड्युटी माझी.
जीव होत नाही, म्हणुन न्याहळत बसला असतो उशाशी
>> बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
क्या सोप्या शब्दांतून छान लिहिलं आहे.
कविता खूप आवडली
4 Mar 2009 - 2:15 pm | विसोबा खेचर
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
सुरेख..!
तात्या.
4 Mar 2009 - 2:50 pm | छोटा डॉन
सहजराव, आसपास कोणी "दहावी-बारावी" चा वारकरी आहे की काय ?
आम्हाला तर हे वाटुन तसेच वाटले ...
मस्त आहे कविता, अत्यंत हळवी व त्रास देणारी ...
आपलं कोकरु परिक्षेत चमकावं असं वाटत असतं खर पण त्याला ह्यासाठी स्वाय लागावी म्हणुन हात धुवुन मागे लागत असताना व आपल्या डोळ्यासमोर त्याचे बालपण कोमजताना पाहुन प्रत्येक बापाला असेच वाटत असेल ...
असो, जमली आहे ही भावना ...
लाजवाब ..!!! सुरेख ..!!!
------
छोटा डॉन
एखाद्याला देव म्हटलं की देवाच्या चुका दाखवता येत नाहीत, चुका दाखवल्या की भक्तांना त्रास होतो.
त्यात अजुन देवाला "स्वेटर" घालणे ही तर अजुनच मजेशीर गोष्ट. असो. ;)
4 Mar 2009 - 6:21 pm | विकास
मस्त आहे कविता, अत्यंत हळवी व त्रास देणारी ... (त्रास - येथील सदस्य नव्हे :) )
कविता खूप आवडली. उगाच कुठेतरी "दिल ढूंढता है फिरवही..." मधील, "आखो मे भिगे भिगे से, लमहे लिये हुवे" या ओळींची आठवण झाली.
4 Mar 2009 - 4:28 pm | लिखाळ
कविता छानच.
(पण मेट्रोनम कुठाय :) ह घ्या हे सां न लगे)
मागल्या पिढीतल्या पुरुषांपेक्षा या पिढीतले पुरुष जास्त सहजतेने वागणारे असावेत. कोमल भावनांचे प्रकटिकरण फक्त बायकांनीच करावे आणि पुरुषाने अश्या भावना कठोर वागणुकीतून दर्शवाव्या हा विचार-आचार मागे पडत असावा. स्त्री-पुरुषांच्या कार्यक्षेत्राची सरमिसळ होते आहे तशी भावविश्वाची आणि प्रकटिकरणाच्या तर्हांची सुद्धा सरमिसळ होते आहे का असा एक विचार मनात आला. (आता थोडा दम खातो.)
तुमच्या कवितेवरुन माझे शाळकरी-महाविद्यालयीन दिवस आठवले आणि मजा वाटली.
-- लिखाळ.
4 Mar 2009 - 4:34 pm | नंदन
कविता आवडली. वर सुनील यांनी म्हटल्याप्रमाणे सुंदर, हळुवार कविता.
नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी
4 Mar 2009 - 4:35 pm | मेघना भुस्कुटे
खरंच सुरेख आहे कविता. एकदम निराळीच शैली. सगळं काही 'सोपं आणि वात्सल्यपूर्ण' न करता सहज संवादातून नातं रेखाटत जाणारी. त्याकरता पूर्वार्ध विशेष आवडला.
पण उत्तरार्धातल्या शेवटच्या कडव्यात बाबाच्या डोळ्यांत येणार्या पाण्याचा उल्लेख जर्रासा भडक वाटला. तो आला नसता, तर मजा कित्येक पटींनी वाढली असती, असं वाटलं.
येऊ द्या... :)
4 Mar 2009 - 9:07 pm | मुक्तसुनीत
पुरुषाच्या डोळ्यांत मुलाच्या प्रेमापोटी तरळणारे पाणी भडक वाटल्यास , आपले चष्मे बदलण्याची वेळ आली आहे असे समजायला हरकत नाही :-)
4 Mar 2009 - 11:54 pm | मेघना भुस्कुटे
मुलाच्या प्रेमापोटी नव्हे हो, आईच्या आठवणीपायी.
आणि पुरुषाच्या डोळ्यांतल्या पाण्याशी काही नाही संबंध त्याचा.
(उग्गाच काहीही कुठेही नेऊ नका हो!)
5 Mar 2009 - 8:14 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
>>पुरुषाच्या डोळ्यांत मुलाच्या प्रेमापोटी तरळणारे पाणी भडक वाटल्यास , आपले चष्मे बदलण्याची वेळ आली आहे असे समजायला हरकत नाही
5 Mar 2009 - 8:10 pm | देशपांडे१
मेघना जरा विस्र्तुत प्रतिसाद दे, काय म्हणायचे कळले नाही
पुरुषाच्या डोळ्यांत मुलाच्या प्रेमापोटी तरळणारे पाणी भडक वाटल्यास , आपले चष्मे बदलण्याची वेळ आली आहे असे समजायला हरकत नाही :-)
सहमत ,
4 Mar 2009 - 5:12 pm | भडकमकर मास्तर
मस्त आहे मुक्तक...
अवांतर : सकाळी उठणे भयानक त्रासदायक असते...
मी पहिलीत रोज अशी प्रतिज्ञा करत असे की मी शिक्षणमंत्री असतो तर सर्व लहान मुलांची सकाळची शाळा बंद केली असती...
______________________________
पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस, मनाला घाण लागू नये म्हणून जप हो श्याम....
ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
4 Mar 2009 - 5:20 pm | राघव
कविता छानच :)
मलाही माझे शाळेतले दिवस आठवलेत.
तेवढं कवितेचं शीर्षक खटकतंय.. असो.. उगाच काढायची म्हणून काढलेली खोड म्हणून सोडून द्या! :)
(सक्काळी-सक्काळी शाळेत जायला नेहमी नाही म्हणणारा)मुमुक्षु
4 Mar 2009 - 5:44 pm | प्रकाश घाटपांडे
कवितेची प्रेरना कंची हाय? आमाल काहि समजानी ब्वॉ.
प्रकाश घाटपांडे
आमच्या अनुदिनीत जरुर डोकवा.
4 Mar 2009 - 7:51 pm | शितल
सुंदर कविता... भावस्पर्शी..
अभिनंदण. :)
4 Mar 2009 - 8:09 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
मस्त रे ! कमी शब्दात किती भाव व्यक्त करते कविता...नाही का !
अजून येऊ दे !
-दिलीप बिरुटे
4 Mar 2009 - 8:50 pm | क्रान्ति
(|: भर उन्हाळ्यात इतकी सुरेख कविता वाचून खरच थंडीतली सकाळ आठवली. {आमच्या नागपूरला आताच कडक उन्हाळा सुरू झालाय. ४०.२} त्यातही परिक्षेचे दिवस आहेत, मग तर हे सगळ आताच घडत आहे असे भास होणारच !
क्रान्ति
4 Mar 2009 - 10:12 pm | धनंजय
दोन्ही जोड-कवितांतल्या कल्पना छान आहेत. वेगवेगळ्या वाचल्या तरी स्वयंपूर्ण आहेत.
बाकी टीन-एज पौगंडावस्थेत उशीरा उठणे वगैरे होते - तेव्हा आरडाओरडा आदळआपट होते खूप! तेव्हाही
हे चित्र बाबांना आठवले तर सुसह्य होत असेल, नाही का?
(अवांतर : मेघना यांना जे वाटले तसे मला थोडे वाटले, पण पुरुष-स्त्रियांच्या वेगळ्या अपेक्षित वर्तणुकींमुळे नव्हे. "आईच्या मायेने गळा दाटून आला" ही ओळ न घालता कोकराच्या "माझा चेहरा धू" मधून तीच भावना, तीच घटना, अगदी हळुवारपणे सांगितली जाते, असे मला वाटते.)
छुपे रुस्तुम - आणखी लिहा...
4 Mar 2009 - 11:56 pm | मेघना भुस्कुटे
थँक्यू धनंजय. तुमची प्रतिक्रिया वाचून मला मदतीला कुणीतरी दिग्गज धावून आल्यासारखं दुकटं वाटलं. :)
5 Mar 2009 - 8:13 pm | देशपांडे१
तुमची प्रतिक्रिया वाचून मला मदतीला कुणीतरी दिग्गज धावून आल्यासारखं दुकटं वाटलं.
आपल्याला नक्की काय म्हणायचे आहे हे स्पष्ट असल्यास
ते विचार स्वता:च नीट मांडले तर ते सर्वांनाच नाही का कळणार ?
असो
सन्मय देशपांडे
भावनांचा आभाव, शब्दांचे भांडवल व विचारांची गूतवणूक संपल्यास अस्थिरता जाणवते व ईथेच अस्तित्वासाठी कंपूच्या राजकारणाची सूरूवात होते.
5 Mar 2009 - 9:34 pm | मेघना भुस्कुटे
आंतरजालावर सगळ्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगण्याचा अट्टाहास नाही करता येत.
ज्यांना नाही कळलं, त्यांनी सोडून द्या.
इतकं काय त्यात?
4 Mar 2009 - 11:49 pm | प्राजु
अतिशय हळवी कविता..
सकाळी कोकराला तयार करायची ड्युटी माझी.
जीव होत नाही, म्हणुन न्याहळत बसला असतो उशाशी
मस्त. असंच होतं. रोज होतं. न चुकता......!!!
"मनू, चला स्कूल बसची वेळ झाली..." म्हणत उठवताना.. त्याच्या चेहर्यावरून नजर मात्र हलत नाही.. नुस्तच न्याहाळावं वाटतं.
कधी इंग्रजी, कधी मराठी संवाद करत तो उठतो आणि मग... "तू ब्रश कर... " असं म्हणतो.. रोजचच आहे. पण तरीही रोज नवं वाटतं.
कधी तो आपला आपण ब्रश करून येतो.. आणि मग "पिल्लू मोठं झालं" असं उगाच वाटून जातं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
4 Mar 2009 - 11:50 pm | रामदास
सुंदर मुक्तक.बाबाचा गळा आईच्या मायेनी दाटून यावा.
वा!! भाई वा !!!
5 Mar 2009 - 12:04 am | पक्या
सुंदर कविता... लेखणी तून अगदी सहज कागदावर उतरलीये अशी.
"आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो"
ह्या ओळी खासच.
अवांतर : सकाळी मेंदू ताजातवाना असतो आणि नवीन गोष्टी शिकण्यासाठी सकाळची वेळ उत्तम असते. फक्त शाळांच्या वेळा भल्या सकाळी ७ , ७:३० अशा नसाव्यात..छोट्यांसाठी ९ ची वे़ळ योग्य असे मला वाटते. मोठ्या मुलांसाठी ८, ८:३०.
मुले जर रात्री ८, ८:३० च्या दरम्यान झोपली तर सकाळी उठायला त्रास देत नाहीत. स्वतःहून वेळेत उठतात किंवा एका हाकेत उठतात. हा स्वानुभव आहे.
5 Mar 2009 - 12:39 am | चतुरंग
बाबाचा गळा आईच्या मायेने दाटून येतो ही भावना छानच! औरभी आने दो!! :)
(रातच्याला पोरगं वेळेवर झोपलं नाही की सकाळी रुटीन अपसेट होणार ह्या भीतीनं आणि रागानं ओरडणारा माझा गळा सकाळी निष्पाप पहुडलेलं पोर बघताना प्रेमानं दाटून येतो ही वेळेची जादू म्हणायची का मुलाच्या निरागसतेची हा प्रश्न मला नेहेमीच पडतो!)
चतुरंग
5 Mar 2009 - 12:45 am | बेसनलाडू
फारच आवडली.
'बालपण सदैव नटवायचं असतं' या माझ्या कवितेतील पुढील ओळी आठवल्या -
चिल्ल्यापिल्ल्यांशी खेळून
त्यांचं डबादप्तर भरून
आपण आपलं बालपण सदैव नटवायचं असतं
(स्मरणशील)बेसनलाडू
5 Mar 2009 - 8:42 am | मनीषा
आणि हळवी कविता ....... आवडली .
5 Mar 2009 - 9:37 am | नीधप
वा मस्त...
पहिल्या भागाने खूप सार्या आठवणी जागवल्या.
दुसरा भाग फारच छान आहे.
- नी
http://saaneedhapa.googlepages.com/home
5 Mar 2009 - 1:33 pm | जयवी
सहज, हळवी,सुरे़ख....!!
अगदी रोजची असली तरी नवी :)
5 Mar 2009 - 3:46 pm | देशपांडे१
कविता अनेकदा वाचली .. सुंदर.. मता-पिता वत्सल .. भावपूर्ण शब्दरचना :-)
5 Mar 2009 - 5:32 pm | सँडी
पंचतारांकित!
अजुक येउंद्या!
6 Mar 2009 - 8:43 am | एकलव्य
आईच्या मायेने गळा दाटून येतो, कोकरु म्हणते
बाबा वेडू अरे माझा चेहरा धू, तुझे डोळे काय पुसतो
बापात दडलेल्या आईचे हे असंच असतं! अगदी चपखल वर्णन...
- एकलव्य
6 Mar 2009 - 9:40 am | प्रमोद देव
एक 'सहज'सुंदर आणि भावूक कविता!
23 Apr 2010 - 6:47 pm | sagarparadkar
फारच छान ...
मी रोज सकाळी हे अनुभव्तोय .... अजुन काही वरशानी हे क्शण आठव्तील तेव्हा मजा येइल ...