न्यू इअर रेझोल्यूशन (अर्थात तेरड्याचा रंग तीन दिवस)!

चतुरंग's picture
चतुरंग in जनातलं, मनातलं
7 Jan 2009 - 9:00 am

४ जानेवारीला ऑफिसबरोबरच व्यायामाचीही सुट्टी संपली आणि काल संध्याकाळी ५ तारखेला नेहेमीप्रमाणेच व्यायामशाळेत (जिममधे) गेलो. माझ्या स्पिनिंग क्लासमधे वेळेआधी पाच मिनिटे प्रवेश केला.
बघतो तर ही गर्दी झालेली. बरेच अनोळखी चेहरे उत्साहात सायकल हापसत होते!
२२ सायकलींपैकी २१ भरलेल्या, एकच रिकामी म्हणून स्वतःला लक्की समजत उत्साहाने गेलो तर ती मोडली होती. स्वतःशीच चडफडत एखाद मिनिट उभा होतो.
जेफ, आमचा इन्स्ट्रक्टर, त्याची बाईक सोडून आला, मोडकी बाईक तपासून म्हणाला "कॅन्ट फिक्स इट नाऊ, लॉट ऑफ वर्क. आय ऍम सॉरी फॉर दॅट!"
मी "इट्स ऑलराइट!" (वेळच्या वेळी बाईक तपासून ठेवायला काय होतं चोच्या (हा शब्द टार्‍याकडून उधार!) असं मनात) म्हणून बाहेर पडलो.
मूड ऑफ झाल्यानं क्षणभर वाटलं जाऊदे सालं घरीच जाऊयात आज व्यायामच नको. अचानक समोरच्या आरश्यात दिसणार्‍या 'भारदस्त' व्यक्तिमत्त्वानं जाणीव करुन दिली की
बाबा रे व्यायाम हा तुला आवश्यकच आहे!
पुन्हा वळलो, मग ट्रेडमिल आणि इतर वजनी व्यायाम केले. घामाच्या धारात सचैल न्हाऊन निघाल्यावर तरतरी आली. एकीकडे मनात विचार चालूच होते की जिममधे आज अचानक एवढी गर्दी कशी? आजूबाजूलाही बरेच नवीन चेहरे दिसत होते (काही आकर्षक होते ते जरा नीट न्याहाळले ;) ). मग एकदम ट्यूब पेटली, अरेच्चा नवीन वर्ष २००९ सुरु झाल्याने बरचसं पब्लिक हे अचानक व्यायामाचा झटका आलेलं असणार! माझा व्यायाम होताहोताच स्पिनिंग क्लास सुटला.
जेफला गाठलं तर डोळे मिचकावून म्हणाला "पुढचे सहा आठवडे हे असंच चालेल, जरा लवकर येत जा. न्यू इयर रेझोल्यूशन वाल्यांची गर्दी साधारण ५ ते ६ आठवडे असते त्यानंतर सगळं नॉर्मलला येईल!"

ह्या संकल्पवाल्यांना हसलो खरा पण मी बर्‍याच वर्षांपूर्वी केलेले काही संकल्प माझ्या मनात तरळून गेले. "येत्या १ जानेवारीपासून मी रोज सकाळी लवकर उठणार" "रोज फिरायला जाणार" ""रोजनिशी/अनुदिनी लिहिणार" "रोज सकाळी १२ सूर्यनमस्कार घालणार" इथपासून ते 'दिसामाजी काहीतरी ते लिहावे' हे समर्थवचन वाचल्यापासून "रोज एकतरी पान लिहिणार" असले सारे संकल्प सोडले कधी आणि सुटले कधी हे समजलंही नव्हतं, ते आठवलं आणि मलाच हसू आले. काहीतरी नवीन करण्याची ऊर्मी माणसाला स्वस्थ बसू देत नाही. आपल्या रोजच्या आयुष्यात थोडा सकारात्मक बदल म्हणून ह्या संकल्पांचा उदय होत असावा असं मला वाटतं. कधी दुसर्‍या कोणी सुरु केला म्हणून आपणही करावा असा विचार मनात उचल घेतो आणि हे संकल्प मनात मूळ धरतात.

स्टीफन कवीनं "दि सेवन हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव पीपल" ह्या पुस्तकात म्हटलं आहे की तुमच्या सवयीतला कोणताही बदल हा एखादा उपग्रह पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून बाहेर पडण्यासारखा असतो. बदल घडायला सुरुवात होते, एका विशिष्ठ मर्यादेपर्यंत बदल घडला असे वाटतानाच ती 'गुरुत्वीय खेच' पार करुन जायला आपण कमी पडतो आणि पुन्हा सगळे पूर्ववत होते! तुम्हाला खरोखरंच बदल घडायला हवा असेल तर ते तीव्र खेचणे मागे टाकून जाण्याइतकी शक्ती लावावी लागते तेव्हाच खरा बदल घडतो.
नेमकी तेवढी शक्ती कशी लावता येईल? संकल्प सिद्धीस जाण्यासाठी खरंच कोणत्या गोष्टींची आवश्यकता असते?
एक म्हणजे तुमच्या मनात एखादी गोष्ट का करायची आहे हे नक्की हवे म्हणजे त्या गोष्टीचे ज्ञान, दुसरे तुमच्या मनात ती गोष्ट तुम्ही कशी करणार आहात ह्याचा पक्का विचार हवा म्हणजे तंत्र माहीत हवे आणि तिसरे सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेरणा, मोटिवेशन. ह्या तीनही गोष्टी एकत्र आल्या की बदल घडायला सुरुवात होते आणि सतत अभ्यासाने तो बदल सवयीमधे परिवर्तित होतो. ह्या तीन्हीपैकी एकजरी गोष्ट कमी पडली तरी तुमचा उपग्रह पुन्हा कक्षेत खेचला जाऊन कोसळणार हे नक्की!

अमेरिकन लोकांवरचा एक सर्व्हे असं दाखवून देतो की पहिल्या महिन्यात साधारण ३५% लोक संकल्प तोडतात आणि सहा महिन्यापर्यंत हाच आकडा ५४% वर पोचलेला असतो! जगात इतर ठिकाणचं प्रमाणही थोडंफार असंच असू शकेल. हे असं का होतं? मला वाटतं ह्याची दोन मह्त्त्वाची कारणं आहेत एक म्हणजे वर उल्लेखलेल्या तीन बाबी, ज्ञान, तंत्र आणि प्रेरणा ह्याबाबत कमी पडणे. आणि दुसरे म्हणजे आपले लक्ष्य (गोल) ठरवताना व्यवहारिक दृष्ट्या झेपेबल ठेवणे. म्हणजे उदा. "मी सहा महिन्यात सिक्स पॅक ऍब्ज करुन दाखवीन" वगैरे असला गोल ठेवला तर मला नोकरी सोडून दिवसभर जिममधेच पडीक रहावे लागेल जे मला शक्य नाही! तेव्हा आपला आवाका ओळखून लक्ष्य ठरवणे. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुलना. अनावश्यक तुलना ही घातक ठरते. कोणीतरी रोज पन्नास पाने वाचते असे कळल्याने मीही सुरुवात केली तर जमेलच असे सांगता येत नाही. कारण तुमचा दिनक्रम कसा आहे, त्यात मोकळा वेळ कुठला आणि कसा आहे इ.इ. घटकांवर ते ठरते. थोडक्यात कॉमनसेन्स वापरावा!

लहान असताना काडेपेटीचे छाप गोळा करण्याचा नाद जडलेला म्हणजे हा संकल्प वगैरे नाही कारण तेवढे ते वयही नव्हते पण तो जवळ जवळ तीनेक वर्ष मी जोमाने जोपासला. अक्षरशः रस्त्यात, एस्.टी.त, रेल्वे स्टेशनवर, जिथे दिसेल तिथे, काहीवेळा तर पानवाल्याच्या दुकानात वेगळी काडेपेटी दिसल्यावर थांबून त्याच्याकडे रिकामी पेटी मागितलेली आठवते आहे. जवळजवळ सहाशे-साडेशहाशे छाप गोळा केलेले! आता मागे वळून पहाताना वाटते की किती मन लावून आपण त्या गोष्टी करायचो. कुठेही जाताना, वावरताना मनात कुठेतरी तो ध्यास जागा असायचा जाणीवपूर्वक नसेल, किंबहुना तसा तो नव्हताच पण तो असायचा आणि संधी मिळताच ती पकडायची एवढेच. आता मी कित्येकवेळा मन लावून गोष्टी करायला बघतो तेव्हा प्रयत्न करावे लागतात. वेळ मिळत नाही अशी सबब मी स्वतःपुढे करतो.
माझा मुलगा चित्रं रंगवायला बसला तर खडू घेऊन मीही त्याच्यासोबत बसतो केवढा आनंद मिळतो म्हणून सांगू! कोड्याची पुस्तकं तो आणि मी बरोबर सोडवतो. पुन्हा आनंदासाठीच.
मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्‍याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही!

तरीदेखील संकल्प सोडणे (म्हणजे धरणे ह्या अर्थी!) हे अजिबात गैर नाही. कारण निदान त्यामुळे आपल्याला काय काय करावेसे वाटते आहे त्याबद्दल विचार तरी चालू होतो! तेव्हा तुम्ही असा विचार चालू केला असेल तर तुम्हाला शुभेच्छा! केला नसेल तर जरुर करा त्यासाठी शुभेच्छा! लहान मूल होऊन काही काळ का होईना आपल्या आनंदासाठी जगा संकल्प तुमच्या नकळतच पूर्ण झालेला असेल.

चतुरंग

समाजजीवनमानविचारअनुभव

प्रतिक्रिया

सहज's picture

7 Jan 2009 - 10:30 am | सहज

मागे आमचे एक परमजालमित्र गुंडोपंत यांनी सांगीतले होते, रोज व्यायाम करायचा व जरी काही दिवस बुडले तरी तो एक ब्रेक होता समजायचे व परत सुरु. :-) सध्या मोठ्या ब्रेकवर आहे. पण रोज व्यायाम करणार्‍यातला समजतो.

डायट कंट्रोल मधे असेल तर आठवड्यातुन ३ वेळा केलेला व्यायाम सुद्धा पुरेसा व्हावा. लेख आवडला, पटला हे.सां. न.ल.

अवांतर - प्रतिसाद प्रकाशित करे पर्यंत मला वाटले हा लेख डॉ. दाढे यांनी लिहला आहे. नवे लेखन मधे शेजारी शेजारी होते हे लेख.

एकूणच कोणतीही नवीन गोष्ट सुरु होताना काय होते त्याबाबतचा विचार आहे. संकल्प आणि सिद्धीतल्या अडथळ्यांचाही विचार आहे..

चतुरंग

सहज's picture

7 Jan 2009 - 10:37 am | सहज

मान्य आहे.

शेखर's picture

7 Jan 2009 - 10:31 am | शेखर

सुंदर लेखन.

एखादा संकल्प जर करायचा म्हणुन केला तर कधीच टिकत नाही. बर्‍याच वेळा दुसरा करतो किंवा सांगतो (भरीला पाडतो) म्हणुन आपण संकल्प करतो. त्याला चिकाटीची जोड आणी आवड पाहीजे तरच आपण आपल्या संकल्पाशी एकनिष्ठ राहु शकतो.

शेखर

सुनील's picture

7 Jan 2009 - 10:37 am | सुनील

ईच्छाशक्तीच्या जोरावर काय होत नाही? मी स्वतः सिगरेट सोडून कैक वर्षे झाली. आता तांबाखू आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून शेकडो मैल दूर आहे.

Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.

चतुरंग's picture

7 Jan 2009 - 10:40 am | चतुरंग

अहो सुनीलराव, आमच्या तात्यांना घ्या की जरा घोळात त्यांचा सातारी काळा जर्दा त्यांना सोडत नाहीये! ;)

चतुरंग

मुक्तसुनीत's picture

7 Jan 2009 - 10:43 am | मुक्तसुनीत

ईच्छाशक्तीच्या जोरावर कुठलीही गोष्ट सहज करता येते ! मी स्वतः सिगरेट कित्येक वेळा सोडलीय !
(हघ्याहेसांनल)
- धूम्रकांडीला स्पर्श न केलेला , मुक्तसुनित.

आनंदयात्री's picture

7 Jan 2009 - 10:45 am | आनंदयात्री

वुई हेट सिगारेट्स ... दॅट्स व्हाय वुई बर्न देम आउट !!

चतुरंग's picture

7 Jan 2009 - 10:48 am | चतुरंग

चतुरंग

अवलिया's picture

7 Jan 2009 - 10:48 am | अवलिया

फार घाण वस्तु आहे ती.... जाळूनच टाकावी दिसली की.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

7 Jan 2009 - 10:36 am | ३_१४ विक्षिप्त अदिती

मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्‍याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही!
हे फारच आवडलं.

सध्या आमच्या जिममधेही सकाळी जत्रा वाटावी एवढी गर्दी असते. पण एकदा व्यायाम सुरु झाला की या नव्या चेहेर्‍याच्या मालकिणींचा उत्साह आणि व्यायाम करण्यातलं डेडीकेशन (मराठी शब्द?) पाहून अजून किती दिवस या येतील यावर मी आणि एका मैत्रीणीने बेटींग सुरु केलेलं आहे.

अदिती
आमच्यात दारू पिण्यासाठी नवीन वर्षाची, नवीन कपडे खरेदी करण्यासाठी दिवाळीची, मोदकांसाठी चतुर्थीची, आणि शुभेच्छा देण्यासाठी वाढदिवसाची वाट बघत नाहीत.

अवलिया's picture

7 Jan 2009 - 10:45 am | अवलिया

चतुरंग शेठ !

मस्त लेख !!!

अवांतर - आमच्यात संकल्प करण्यासाठी आणि तो सोडुन देण्यासाठी नवीन वर्षाची वाट पहात नाहीत.

-- अवलिया
अवलियाची अनुदिनी

आनंदयात्री's picture

7 Jan 2009 - 10:54 am | आनंदयात्री

या वर्षी संकल्प न करण्याचा पक्का संकल्प केलाय !!

बाकी व्यायामशाळेतल्या बांता अगदी तंतोतंत घडतात आमच्या बाबतीत. आरश्याचा असा राग येतो साला .. (एक पारा गळालेला आरसा फार आवडायचा मला, नेमका पोटाच्या ठिकाणीच धुसर झालेला ;) )

लेख आवडला हेवेसांनल.

वल्लरी's picture

7 Jan 2009 - 10:58 am | वल्लरी

>>>>मुलं त्यांच्या विश्वात रमताना संकल्प न करताही कार्य सिद्धीस नेतात जे त्यांच्या गावीही नसते कारण ते फक्त निखळ आनंदासाठी जगत असतात आणि आपण बर्‍याचवेळा फक्त संकल्प करतो कारण आपण रमत नाही, निर्भेळ आनंदासाठी जगत नाही!
>>>>लहान मूल होऊन काही काळ का होईना आपल्या आनंदासाठी जगा संकल्प तुमच्या नकळतच पूर्ण झालेला असेल.

आवडलं नि पटलं सुध्दा... :)

---वल्लरी

विनायक प्रभू's picture

7 Jan 2009 - 1:00 pm | विनायक प्रभू

Re-Solution ला सोल्युशन नाही.

श्रावण मोडक's picture

7 Jan 2009 - 4:05 pm | श्रावण मोडक

ज्ञान, तंत्र आणि प्रेरणा ह्याबाबत कमी पडणे... आपले लक्ष्य (गोल) ठरवताना व्यवहारिक दृष्ट्या झेपेबल ठेवणे... अनावश्यक तुलना ही घातक ठरते.
या तीन गोष्टी पक्क्या समजल्या की प्रश्न मिटतो. पण पुन्हा इथेही अंडरएस्टिमेट करण्याचा धोका राहतोच.
चांगला लेख.

लिखाळ's picture

7 Jan 2009 - 4:10 pm | लिखाळ

लेख मस्तच. छंद आणि संकल्प यांची सांगड घालून आवडीसाठी करणे आणि बळेच करणे यातला झगडा छान सांगीतलात.
ईच्छाशक्तीच संकल्प तडीस नेते. ईच्छाशक्ती वाढावी आणि ठरावीक गोष्टी पूर्ण करण्यासाची सवय लागावी म्हणूनच 'नेम' (नियम) करण्याची पद्धत पडली असावी. स्वतःला ठाकून ठोकून नियमित दिनचर्येत बसवणे हा सुद्धा 'संकल्प शक्ती' वाढवण्याचा उपाय असावा.
-- लिखाळ.
माझी अनुदिनी
'काहीतरी कुठेतरी चुकते आहे.' असली वाक्ये आपल्या 'सूक्ष्म' विचारशक्तीची बतावणी करायला उपयोगी पडतात.

अनिल हटेला's picture

7 Jan 2009 - 6:02 pm | अनिल हटेला

पण काय हे ..
कळतये पण वळत नाही....
:-(

बैलोबा चायनीजकर !!!
माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

भाग्यश्री's picture

8 Jan 2009 - 12:01 am | भाग्यश्री

वा.. काय वेळेत लिहीलाय तुम्ही हा लेख.. मला अगदी जरूरी होती असं काहीतरी वाचायची!
खूप दिवसांपासून काही गोष्टी मनात आहेत, पण होत नाहीत. आमच्या बाबतीत गुरूत्वीय खेच जरा जास्तच डेंजर असावी!
त्यातलंच एक काम, सेव्हन हॅबिट्स वाचणे.. :) बाबांनी वाच ग बाई , वाच म्हणणं सुद्धा सोडलंय आता! :|

http://bhagyashreee.blogspot.com/

विकास's picture

8 Jan 2009 - 1:13 am | विकास

लेख एकदम छानच आहे.

संकल्प सोडणे जितके सोपे असते तितके तो पाळणे (कायमस्वरूपी आमलात आणणे) हे अवघड असते हे सत्यच आहे. मात्र, दरवर्षी असे (वजन कमी करणे, व्यायाम करणे इत्यादी) संकल्प सोडणे आणि मोडणे कायम होते हे लक्षात आल्यावर माझ्या एका अमेरिकन मित्राने उलटा संकल्प करायचे ठरवले. गेल्या वर्षी त्याने या संदर्भात संकल्प केला की, 'खाणे कमी करणार नाही, धुम्रपान कमी वगैरे करायचा प्रयत्न करणार नाही, व्यायाम वगैरे टिव्ही पहात ट्रेडमील वगैरे चालवता आली तर तेव्हढाच...' त्याला असे वाटले की हा पण संकल्प आपण मोडू - अर्थात मग सगळे चांगलेच होईल... पण आजतागायत तो आपला हा संकल्प मोडू शकला नाही :-)

संदीप चित्रे's picture

8 Jan 2009 - 2:22 am | संदीप चित्रे

संकल्प करीन असे अजूनही म्हणतोय ;)
बाकी लेख उत्तम रंग्या... आमच्यासारख्या संकल्पवीरांमुळेच तर जिममधल्या इन्स्ट्रक्टर्सना जानेवारीचा बोनस मिळतो :)

---------------------------
माझा ब्लॉगः
http://atakmatak.blogspot.com

प्राजु's picture

8 Jan 2009 - 2:57 am | प्राजु

केल्याने होत आहे रे , आधी केलेची पाहीजे... !
दुसरं काय?
मी तरी सध्या नेटाने जीम मधली ट्रेडमील झिजवते आहे. आता मुलांना नाताळच्या सुट्ट्या आल्यामुळे ते २ आठवडे नाही जमलं. पण आता पुन्हा सुरू झालं आहे.
बघू किती दिवस रहाते ही कन्सिस्टंसी.. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

धनंजय's picture

8 Jan 2009 - 4:33 am | धनंजय

लेख छान उतरला आहे. हलकाफुलका आहे, पण वैचारिकही आहे.
- - -

या वर्षीही रेझोल्यूशन न करण्याचे रेझोल्यूशन केले आहे. मागच्या वर्षीचे हेच रेझोल्यूशन एक अपवाद सोडला तर पाळले होते.

(रेझोल्यूशन न करण्याचे रेझोल्यूशन हा एक अपवाद!)

चतुरंग - आपला लेख आणि विचार पटले. भट्टी छान जमली आहे. :) असो... त्यानिमित्याने मला जे आठवले तेही खाली टंकतो आहे..

==========
ज्ञानप्रबोधिनीचे डॉ. यशवंत लेले यांच्याकडून मी बर्‍याच गोष्टी शिकलो... पण त्यातली सर्वात लक्षात राहिलेले जर काही असेल तर त्यांचे हे वाक्य - "आग्रहाचे सामर्थ्य हवेच हवे!".

त्यांच्याच शैलीत (आठवेल तसे ) सांगायचे झाले तर : लवचिकता हवी पण कोणतीच गोष्ट स्थिर नाही आणि कशाचाच आग्रह अथवा संकल्प नाही हे म्हणजे घरंगळणार्‍या चेंडूवर धडपड्यासारखे आहे. गोष्ट छोटी असो की मोठी -- शुभंकरोति म्हणणे असेल, व्यायाम करणे असेल अथवा घर विकत घेणे असेल -- ठरवायला तर हवे आणि पाळायलाही हवे. एक मिणमिणता का असेना पण ध्रुवतारा पक्का केला की गाडी मार्गावर राहते. खूपच अवघड जात असेल तर संकल्प जगजाहीर करावा म्हणजे भरकटणे जरा कमी होते.

- एकलव्य

स्वाती राजेश's picture

8 Jan 2009 - 5:45 pm | स्वाती राजेश

Create monthly goals instead of resolutions
If you always break your New Years Resolution before January is over, try something new this year. Make 12 mini, very do-able resolutions.
उदारणार्थः जर वजन कमी करायचे असेल तर्....जानेवारी मधे भरपूर पाणी प्यायची सवय करा. फेब्रुवारीमधे हिरव्या पालेभाज्या खा...इत्यादी...
हा प्रयोग मी कॉम्प्युटर शिकण्यासाठी केला होता..एका महिन्यात एक्सेल, पॉवर् पॉईंट एका महिन्यात वेब डिझाईन्...इत्यादी...कुठेही क्लासला न जाता..

शितल's picture

8 Jan 2009 - 6:12 pm | शितल

चतुरंगजी,
लेख एकदम एनर्जीटीक झाला आहे.:)
'गुरुत्वीय खेच' तर अगदी मनाला पटली. :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे's picture

8 Jan 2009 - 10:05 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

लेख आवडला ! संकल्प हे मोडण्यासाठीच असतात असा समज झाल्यामुळे त्या शब्दाचा अर्थही दुर्लक्षीत झाल्यासारखा वाट्तो.
चतुरसेठ, व्यायामाचा विषय आला की जीव कासाविस होतो. मागच्या वर्षीच्या संकल्पाची वाट लावली ,पण आमचे वाढते वजन आणि पोटाचा घेर नजरेत भरु लागला आहे. परंपरेने चालत आलेला साखरेचा वारसा आमच्यापर्यंत कधीतरी येऊन पोहचणार आहे, या धास्तीने आम्ही काही दिवसापासून नियमित काही अंतर चालतो, क्रिक्रेटची प्रॆक्टीस करणा-यांना स्पीन ऐक्शन घेऊन मध्यमतेज गोलदांजी करतोय. नियमित व्यायाम करायचा, शरिरातील काही कॆलरीज जाळायच्याच असा संकल्प आहे. बघुया हा संकल्प किती दिवस तग धरतो !!!

-दिलीप बिरुटे

रेझर रेमॉन's picture

11 Jan 2009 - 2:00 pm | रेझर रेमॉन

संकल्प लेख सुंदरच जमलाय.
कारण आम्ही सारे संकल्पांचे बळी.
अनंत संकल्प मोडून पडलेले.
शेवटी संकल्प करायचा नाही असा संकल्प केला....
छान चाललंय.
- रेझर