पंचमचे पहिले गीत

प्रदीप's picture
प्रदीप in जनातलं, मनातलं
31 Dec 2008 - 8:09 pm

तसे म्हटले तर चित्रपटांतील प्रत्येक गीत एक स्वतंत्र प्रकल्पच असतो. कधी गीत आधी लिहीले जाते व त्याबरहुकूम चाल बसवली जाते, तर कधी चालीची फ्रेम प्रथम तयार असते, व गीतकार त्यावर गीत लिहीतो. काही असले तरी त्या दोघांचा सुंदर मिलाप झाला व ते प्रथितयश गायकांनी/ गायिकांनी निपुण साजिंद्यांच्या साथीने गायले की एक वेगळीच बहार निर्माण होते. ह्यापूढे त्याचे चित्रीकरणही त्या गीताच्या साजेश्या तर्‍हेने झाले तर ते गीत प्रेक्षणीयही ठरते, पण अनेकदा हे असे होतेच असे नाही. तरीही (आणि पूर्वीच्या काळातील गाण्यांच्या बाबतीत हे विशेषरित्या लागू आहे) ते गीत इतके श्रवणीय असते, की चित्रपट बघतांना डोळे मिटून ऐकावे.

हे सर्व आताच आर. डी. बर्मन उर्फ पंचमचे पहिले गीत बघतांना/ ऐकतांना प्रकर्षाने जाणवले. अनेक वर्षे ते आपल्या वडिलांना संगीत दिग्दर्शनात मदत करत होते. वडिलांनी हिंदी चित्रपटसृष्टित मानाचे पान पटकावले होते, त्यांना त्यांचा समर्थ हातभार होता, पण तो पडद्यामागूनच-- एक सहाय्यक म्हणून. शेवटी त्यांनी स्वतंत्र संगीत दिग्दर्शन करण्याचे ठरवले तेव्हा पहिले गीत अर्थातच लताबाईंकडून गाऊन घेतले. 'घर आजा घिर आए, बदरा सांवरिया' हे ते गीत. नेहमीचीच सिच्युएशन आहे-- 'तो' मित्रांसोबत कोठीवर रमला आहे, व अर्धी रात्र उलटून गेली तरी तो काही घरी आला नाही, म्हणून 'ती' त्याची वाट बघत आहे. ह्यावर शैलेंद्रने आपली कमाल शब्दात अशी दाखवली आहे -

घर आजा, घिर आये, बदरा सांवरिया,
मोरा जिया धक धक रे, चमके बिजुरिया

सुना सुना घर मोहे, डसने को आये रे
खिडकी पे बैठे बैठे सारी रैन जाये रे
टप टिप सुनत मै तो भयी रे बांवरिया

कसमत जियरा, कसक मोरी दुनी रे
प्यासी प्यासी अंखियों की कलिया है सुनी रे
जाने मोहे लागे किस बैरन की नजरिया

पंचम साहेबांचे तालवाद्यांवर प्रभुत्व होते, आणी तालांशी, लयीशी खेळ करण्याचे त्यांचे कसब लाजवाब होते. 'छोटे नबाब' ह्या च्चित्रपटापासून सुरू झालेल्या त्यांच्या पुढील कारकीर्दीत त्यांनी अनेक पाश्चात्य धर्तीची तालवाद्ये व त्याबरहुकूम ठेके प्रामुख्याने व अत्यंत कुशलतेने वापरले. पण ह्या पहिल्याच स्वतंत्रपणे दिलेल्या गाण्यास त्यांनी खास भारतीय अशा सात मात्रांच्या रूपक तालात बांधले आहे. हेच मुळात एक धार्ष्ट्य होते, कारण सर्वसाधारणपणे कुठलाही संगीतकार पहिली वहीली गीते साध्या चार मात्रांच्या केहेरवा अथवा सहा मात्रांच्या दादरा ह्या तालांत बांधतो. इथे सगळाच अनोखा प्रकार. आणि त्याहीपुढे वैशिष्ठ्य म्हणजे त्या सात मात्रांच्या ठेक्यातून त्यांनी काही अनोखी रूपे दर्शवली आहेत. उदा. मुखड्याच्या दुसर्‍या ओळीतील 'धक धक' , तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण!! रूपकचे इतके बहारदार इंटर्प्रिटेशन दुसरे माझ्या ऐकण्यात नाही.

आणि हे गीत लताबाईंनी त्यांच्या नेहमीच्या संयत शैलीने गायले आहे. हे गीत कुठल्या रागावर आधारित आहे, ह्याबद्दल तात्यांसारख्या जाणकाराने सांगावे.

उत्सुकतेने हे गीत येथे पाहिले, आणि त्याचे चित्रीकरण मात्र अत्यंत ढोबळ वाटले. पण पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे.

संगीतसंस्कृतीचित्रपटआस्वाद

प्रतिक्रिया

प्राजु's picture

31 Dec 2008 - 8:49 pm | प्राजु

खरंच छान आहे.
आपण रसग्रहणही छान लिहिले आहे. गाण्यातील केरव्याचे सौंदर्य चांगले समजावून सांगितले आहे..
धन्यवाद.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

केशवराव's picture

1 Jan 2009 - 4:31 am | केशवराव

केरवा नाही. . . . रुपक!

प्राजु's picture

1 Jan 2009 - 4:36 am | प्राजु

लीटल मिस्टेक.... केरवा नाही रूपक.
धन्यवाद केशवराव. :)
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/

ऋषिकेश's picture

31 Dec 2008 - 9:19 pm | ऋषिकेश

त्याहीपुढे वैशिष्ठ्य म्हणजे त्या सात मात्रांच्या ठेक्यातून त्यांनी काही अनोखी रूपे दर्शवली आहेत. उदा. मुखड्याच्या दुसर्‍या ओळीतील 'धक धक' , तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण

वा! अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते.
सुंदर रसग्रहण!.. खूप आवडले
अजून येऊ द्या!

-(रसिक) ऋषिकेश

चित्रा's picture

31 Dec 2008 - 9:33 pm | चित्रा

अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते.

रसग्रहण आवडले.

धनंजय's picture

31 Dec 2008 - 11:51 pm | धनंजय

अशीच सौंदर्यस्थळे दाखवणारे लेख आणखी येऊ देत.

सहज's picture

1 Jan 2009 - 12:19 pm | सहज

अशी सौदर्यस्थळे कोणी दाखवून दिली की एखादे गाणे अधिकच आवडू लागते.
अगदी खरं

बिपिन कार्यकर्ते's picture

31 Dec 2008 - 9:31 pm | बिपिन कार्यकर्ते

गाणं छानच आहे. 'आर.डी.' ची रेंज हा एक स्वतंत्र विषय आहे. तुम्ही लिहिलंय पण छानच. अजून लिहा.

बिपिन कार्यकर्ते

योगी९००'s picture

31 Dec 2008 - 10:43 pm | योगी९००

छानच लिहिले हो तुम्ही..फार छान गाणे..

पण माझ्यामते "आर डी." चे पहिले गाणे "फंटूश" मधील "ए मेरी टोपी पलट के.." हे होते. जरी या चित्रपटाला "एस डी." चे संगीत होते. तरी या गाण्याची रचना "आर डी" नी केली होती असे मी एका त्यांच्या मुलाखतीत वाचले होते.

४ जानेवारीला आर. डी. ची पुण्यतिथी आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आणखी असेच एक रसग्रहण आपण लिहावे अशी नम्र विनंती. हिच खरी आर डी. ना श्रधांजली होईल.

आणि एक..असेच रसग्रहण मी खय्याम यांच्या काही गाण्यांसाठी आपल्याकडून ऐकू ईत्छितो.

खादाडमाऊ

नंदन's picture

1 Jan 2009 - 12:47 am | नंदन

सुरेख गाण्याचे तितकेच उत्तम परीक्षण. एखाद्या बहारदार गाण्याचे चित्रीकरण कसे करू नये, याच्या अनेक उदाहरणांपैकी एक म्हणजे - हमने देखी है

ऐंशीच्या दशकानंतर टीव्ही/व्हिडिओचे प्रस्थ वाढल्याने गाण्याच्या सांगीतिक बाजूबरोबर (बर्‍याचदा सांगीतिक बाजूपेक्षाही) त्याच्या चित्रीकरणालाही महत्त्व आले असावे. त्यामुळेच की काय, काही अपवाद सोडले तर पूर्वीची गाणी जशी गायक-गायिकांची म्हणून ओळखली जात त्याऐवजी हल्लीची गाणी नायक-नायिकांची म्हणून स्मरणात राहतात. (जलते है जिसके लिये हे तलतचे, पण एक-दो-तीन हे माधुरीचे. अर्थात आता हिमेशसारखे काही 'सन्माननीय' अपवाद आहेत.)

नंदनमराठी साहित्यविषयक अनुदिनी

विकास's picture

1 Jan 2009 - 3:29 am | विकास

लेख आणि माहीती मस्तच आहे. गाणे पण ऐकायला (लताच्या तरूणपणच्या आवाजात) खूपच छान वाटते. "...पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे. " हे १००% मान्य!

त्या दुव्यावरील गाण्याच्या खाली अजून एक मजेदार माहीती वाचली...त्या प्रमाणे आरडींना हे (पहीलेच) गाणे लताच्या आवाजात हवे होते. मात्र तेंव्हा लता आणि एसडींचे बिनसले असल्याने ती गाण्याची शक्यता कमी होती. तेंव्हा आरडींनी वडलांना जरा मिळवून घेयला सांगितले. सगळेच कलाकार असूनही सगळ्यांनी एक पाऊल मागे आणि हात पुढे केले. परीणामी हे गाणे मस्त झालेच पण त्याच बरोबर इतर अनेक छान गाणी ६०च्या दशकात ऐकायला मिळाली - गाईड सकट...

बाकी वरची खादाडमाऊंची, "४ जानेवारीला आर. डी. ची पुण्यतिथी आहे. त्या दिवसाचे औचित्य साधून आणखी असेच एक रसग्रहण आपण लिहावे अशी नम्र विनंती. " विनंती एकदम मान्य/सहमत.

विसोबा खेचर's picture

1 Jan 2009 - 11:16 am | विसोबा खेचर

वा! छोटेखानी परंतु छान परिक्षण. बाकी रुपकची अन् झुमर्‍याची मजाच वेगळी...!

मध्यमातलं गाणं. दोन्ही निषादांचा फार सुंदर वापर. सतारीचं आणि सारंगीचं एरेंजिंगही सुंदर आहे.

तसेच -- आणी हे विशेष जाणवले ते-- पहिल्या अंतर्‍याच्या शेवटच्या ओळीतील 'टप टिप' ह्यांची पखरण!!

ह्यातला शुद्धगंधार तानपुर्‍यातल्या स्वयंभू गंधाराची आठवण करून देणारा.

प्रदीपराव, अच्छा लिखते है आप! येऊ द्या अजूनही...

पण पूर्वीच्या अनेक गीतांप्रमाणे डोळे मिटून ऐकावयाचे हे गीत आहे.

असहमत आहे. कृपया हे पाहा, हे पाहा, आणि हे पाहा.. :)

गाणी सुरेख आहेत आणि प्रेक्षणीयही..! :)

तिसर्‍या गाण्यातली खालील फ्रेम पाहिली की जगातली सर्व शायरी अपुरी पडते, शब्दच संपतात..!

असो, अजूनही आपल्याला आवडणार्‍या काही गाण्यांवर अवश्य लिहा, आम्हाला वाचायला आवडेल..

तात्या.

प्रदीप's picture

1 Jan 2009 - 5:03 pm | प्रदीप

सर्व प्रतिक्रिया लिहीणार्‍यांचे आभार. माझ्या विनंतिला मान देऊन ह्या गाण्यातील संगीताच्या खास जागा दर्शविल्याबद्दल तात्यांचे विशेष आभार.

तात्यांप्रमाणे अनेकांनी 'असेच अजून येऊ द्या' असे सांगितले आहे, आर. डी. च्या पुण्यतिथीच्या निमीत्ताने त्याच्यावर लेख लिहा, खय्यामवर लिहा, असे आग्रह केले आहेत, ह्या सर्वांबद्दल मनःपूर्वक आभार. मी तालवाद्यांचा प्रेमी आहे, त्यातील काहींचा कोणे एके काळी थोडाफार अभ्यासही केला आहे. त्यामुळे हिंदी/ मराठी चित्रपटगीतांत तालवाद्ये कशी वापरली गेली, ह्यांबद्दल, मला वाटते, मी काहीबाही थोडेफार लिहू शकेन. ज्याला हिंदी चित्रपटसंगीताचा 'सोनेरी काल' समजला जातो, त्या सुमारे १९४५ ते १९८० च्या कालखंडातील गाणी ही, आपल्यापैकी अनेकांप्रमाणेच, माझेही पॅशन आहे. गाण्यांतील शब्द, संगीतरचना, वाद्यरचना, गाण्याच्या शैली, त्यातील थोड्याफार तांत्रिक बाबी, ह्या कुठेतरी समजतात, आत कुठेतरी पोहोचतात, हे खरे असले, तरी त्यांबद्दल अधिकारवाणीने लेख लिहीणे हे अवघड काम आहे. आणि म्हणूनच आर. डी. किंवा इतर कुण्या संगीतकाराच्या कामगिरीचा समग्र आढावा घेणारे लेख लिहीणे हे माझ्या आवाक्याबाहेरचे आहे. तेव्हा त्याबद्दल क्षमा असावी. पण जमेल तसे, अधूनमधून काही मला आनंद देणार्‍या संगीताबद्दल, विशेषतः त्यातील तालरचनांबद्दल, लिहीन म्हणतो.

संजय अभ्यंकर's picture

1 Jan 2009 - 8:29 pm | संजय अभ्यंकर

प्रदीपजी इतके सुंदर गीत, जे विस्मृतीत गेले होते, ते मि.पा. करांपुढे मांडलेत.

ह्या गीताची MP3 आवृत्ती कोठे मिळेल?

संजय अभ्यंकर
http://smabhyan.blogspot.com/

विसोबा खेचर's picture

2 Jan 2009 - 12:32 am | विसोबा खेचर

ह्या गीताची MP3 आवृत्ती कोठे मिळेल?

कृपया आपला इ पत्ता कळवा. हे गाणे माझ्या संग्रही आहे. मी ते आपल्याला पोस्टाने पाठवेन (मेल करेन)

आपला,
(आडनावबंधु) तात्या अभ्यंकर.

बहुगुणी's picture

1 Jan 2009 - 9:27 pm | बहुगुणी

इथे प्रयत्न करा. कदाचित इ-स्निप्स लॉगिन लागेल.