गीतारहस्य प्रकरण ८ -विश्वाची उभारणी व संहारणी

Bhakti's picture
Bhakti in जनातलं, मनातलं
13 Aug 2025 - 1:30 pm

गीतारहस्य -प्रकरण८

( पान क्र. १०२-११८)

**विश्वाची उभारणी व संहारणी

सांख्याप्रमाणे प्रकृति व पुरुष या स्वतंत्र मूलतत्वांचे स्वरूप म्हणजे प्रकृति पुरुषासमोर आपल्या गुणाचा जो बाजार मांडते त्यास मराठी कवींनी 'संसृतीचा पिंगा' तर ज्ञानेश्वर महाराज यांनी 'प्रकृतीची टांकसाळ 'असे म्हटले आहे.

प्रकृतीच्या या व्यापारास समर्थांनी 'विश्वाची उभारणी व संहारणी' हे शब्द घेतले आहेत. भगवद्‌गीतेप्रमाणे प्रकृति आपला संसार चालविण्यास स्वतंत्र नसून ती हे काम परमेश्वराच्या इच्छेने चालवीत असते ,असे म्हटले आहे .( गी. ९.१०) परंतू कपिलांनी प्रकृति स्वतंत्र मानिली आहे. पुरुषाचा व तिचा संयोग झाला म्हणजे तिची टांकसाळे सुरू होते आणि प्रकृतीची मूळची साम्यावस्था मोडून तिच्या गुणांचा विस्तार होऊ लागतो असे सांख्यांचे म्हणणे आहे. उलटप‌क्षी वेदसंहितेत, उपनिषदांत स्मृती ग्रंथांत व प्रकृति मूळ न मानिता परब्रम्ह मूळ मानून त्यापासून 'हिरण्यगर्भ समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकः आसीत् 'प्रथम हिरण्यगमे (ऋ१०.१२१.१) आणि या हिरण्यगर्भापासून किंवा सत्यापासून सर्व सृष्टि झाली (ऋ. १०.७२, १०.१९०) किंवा प्रथम पाणी उत्पन्न होऊन ऋ. १०.८२.६ ( त्यापासून सृष्टि त्यांत ब्रम्हदेव, ब्रम्ह‌देवापासून सर्व जग किंवा तोच ब्रम्हदेव अर्ध्या भागाने स्त्री झाला होता. अगर पाणी उत्पन्न होण्यापूर्वी पुरुष होता (कठ ४.६.) अगर ब्रम्हा-पासून प्रथम तेज, पाणी, व पृथ्वी (अन्न) ही तीनच तत्वे होऊन टंग मिश्रणाने पदार्थ झाले.

तथापि आत्मरूपी मूळ ब्रम्हापासूनच आकाशादिक्रमाने पंचमहाभूते निघाली (तै.उ. २.१.) हे अबेर वेदांतसूत्रात ठरविले.

वेदान्ती प्रकृति स्वतंत्र मानीत नसले तरी एकदा शु‌द्ध ब्रम्हातच मायात्मक प्रकृति, हा विकार दिसू लागल्यावर पुढील सृष्ट्युत्पत्तिक्रमासंबंधाने त्यांची आणि सांख्यांची अखेर एकवाक्यता झालेली होती, हे यावरून दिसून येते.

#सृष्ट्युत्पत्तिक्रमाची जुळणी

१.प्रकृतीची कळी उमलण्याच्या क्रमाबद्‌दल #गुणोत्कर्ष किंवा 'गुणपरिणामवाद' असे म्हणतात.

२.अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढे व्यक्त सृष्टि निर्माण करणाऱ्याचा निश्चय करीत असते, निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणे हे बुद्‌धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतीत #व्यवसायत्मिक बु‌द्धी हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असे सांख्यांनी ठरविले आहे.

३.मनुष्याला एखादे कृत्य करण्याची बु‌द्धी प्रथम होते, त्याचप्रमाणे प्रकृतिलाही आपला पसारा करण्याची बु‌द्धी प्रथम व्हावी लागते. या गुणास पाहिजे तर अचेतन / अस्वयंवेद्य म्हणजे स्वतः स न कळणारी बुद्‌धी म्हणा. (आधिभौतिक उदा. गुरुत्वाकर्षण / लोहचुंबकाचे आकर्षण).

४ प्रकृतित उत्पन्न होणारा बुद्‌धी हा गुण, सत्व, रज आणि तम या मिश्रणाचा असला तरी, त्यातील प्रत्येकाचे प्रमाण अनंत रीतींनीं भिन्न होत असल्यामुळे, या तिघांच्या प्रत्येकी अनंत भिन्न प्रमाणांनी झालेले बु‌द्धीचे प्रकारहि त्रिघात अनंत होऊ शकतात. हे सर्व इंद्रियगोचर असल्यान व्यक्त तत्त्व मानले जातात.

५.पण प्रकृति अजूनही एकजिनसी असते, तो मोडून बहूजिनसीपणा उत्पन्न होतो, यासच 'पृथकत्व म्हणतात

६.बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.

मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात.

१ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि

२.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि

** इंद्रिय याचा अर्थ इंद्रियवान प्राण्यांच्या इंद्रियांच्या शक्ती

#सेंद्रिय प्राण्यांचा जड देह होतो. म्हणून फक्त इंद्रियांचा देहाचा समावेश जड म्हणजे निरिंद्रय सृष्टींत सांख्यांत सेंद्रिय सृष्टी म्हणजे देह विचार केला आहे. व आत्मा सोडून फक्त इंद्रियांचा विचार केला आहे.

अहंकार (एकूण १६ गुणोत्कर्ष)

#सत्त्वगुणोत्कर्ष

पाच इंद्रिये

पाच कर्मेंद्रिये व मन

(एकूण अकरा इंद्रिये)

#तमोगुणोत्कर्ष

निरिंद्रिय सृष्टी

पाच तन्मात्रद्रव्ये

९ तन्मात्रे - शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध यांची जिस तन्मात्रे, मिसळ न होता प्रत्येक गुणाची निरनिराळी अतिसूक्ष्म मूलस्वरुपे ही निरिंद्रिय सृष्टीची मूलतत्वे आहेत.

१०.या पंचतन्मात्रद्रव्यांपासून क्रमाक्रमाने स्थूल पंचमहाभूतें (यांस 'विशेष' असेहि नांव आहे) व स्थूल निरिंद्रिय पदार्थ होऊ लागतात, या पदार्थांचा यथासंभव अकरा सूक्ष्म इंद्रियांशी संयोग होऊन सेंद्रिय सृष्टि बनले, असे सांख्यांनी ठरविले आहे.

#स्थूलपंचमहाभूते व #पुरुष धरून याप्रमाणे एकंदर २५ तत्त्वे होतात. हे मूल प्रकृतिचेच विकार होत

त्यांतही विकार सूक्ष्मतन्मात्र व पाच स्थूल महाभूते हे द्रव्यात्मक असून बुद्धि, अहंकार गुण आहेत, ही असा भेद आहे. तेवीस व इंद्रिये या केवळ शक्ति किंवा तत्त्वे व्यक्त तर मूळ प्रकृति अव्यक्त

#ब्रम्हवृक्ष किंवा ब्रम्हवन [ ममा. अश्व ३५. २०-२३ व ४७.१२-१५] पान. नं १०८-१०९.

माह (मा, अश्व. २५. २०-२३ व ४७. १२-१५),

अव्यक्तबीजप्रभवो बुद्धिस्कन्धमयो महान् ।

महाहंकारविटपः इन्द्रियान्तरकोटरः ।।

महाभूतविशाखश्च विशेषप्रतिशाखवान् ।

सदापर्णः सदापुष्पः शुभाशुभफलोदयः ।।

आजीव्यः सर्वभूतानां ब्रह्मवृक्षः सनातनः ।

एनं छित्वा च भित्त्वा च तत्त्वज्ञानासिना बुधः ।।

हित्त्वा सङ्गमयान् पाशान् मृत्युजन्मजरोदयान् ।

निर्ममो निरहंकारो मुच्यते नात्र संशयः ।।

१

"अव्यक्त (प्रकृति) हें ज्याचें बीं, बुद्धि (महान्) हें ज्याचें खोड, अहंकार हा ज्याचा मुख्य पल्लव, मन व दहा इंद्रियें हीं ज्याच्या आंतल्या ढोल्या, (सूक्ष्म) महाभूतें (पंचतन्मात्रे) या ज्याच्या मोठ्या शाखा, आणि विशेष म्हणजे स्थूल महाभूतें या ज्याच्या आडशाखा किंवा डहाळ्या, असा हा नेहमीं पानें, फुलें व शुभाशुभ फळें धारण करणारा, सर्व प्राणिमात्रांना

आधारभूत, पुरातन मोठा ब्रह्मवृक्ष आहे. याला तत्त्वज्ञानरूप तरवारीनें छेदून व त्याचे तुकडे तुकडे करून ज्ञानी पुरुषानें जन्म, जरा व मृत्यु उत्पन्न करणारे संगमय पाश तोडावे, आणि ममत्वबुद्धि व अहंकार यांचा त्याग करावा, म्हणजे तो निःसंशय मुक्त होतो." सारांश, हा ब्रह्मवृक्ष म्हणजेच 'संसृतीचा पिंगा' किंवा प्रकृतीचा अगर मायेचा 'पसारा' होय. याला 'वृक्ष' म्हणण्याची वहिवाट फार प्राचीन म्हणजे ऋग्वेदापर्यंत पोंचलेली असून, उपनिषदांतून यासच 'सनातन अश्वत्थवृक्ष असें म्हटलें आहे (कठ. ६. १). परंतु तेथे म्हणजे वेदांत या वृक्षाचे मूळ (परब्रह्म) वर आणि शाखा (दृश्यसृष्टीचा पसारा) खालीं एवढेच वर्णन केलेलें असतें. हैं वैदिक वर्णन आणि सांख्यांचीं तत्त्वें यांची जोड घालून गीतेंतील अश्वत्थवृक्षाचे वर्णन बनविलें आहे. हैं गीता १५.१ व २ या श्लोकांवरील आमच्या टीकेंत स्पष्ट करून दाखविलें आहे.

वर वृक्षरूपानें दिलेल्या पंचवीस तत्त्वांचेंच सांख्य आणि वेदान्ती निरनिराळ्या प्रकारें वर्गीकरण करीत असल्यामुळे, या वर्गीकरणाबद्दलचीहि थोडी माहिती येथें सांगितली पाहिजे. सांख्य असें म्हणतात कीं, या पंचवीस तत्त्वांचे मूलप्रकृति, प्रकृतिविकृति, विकृति आणि न-प्रकृति-न-विकृति, असे चार वर्ग होतात. (१) प्रकृतितत्त्व दुसऱ्या कोणापासून झालेलें नाहीं म्हणून त्यास मूलप्रकृति हैं नांव प्राप्त होतें. (२) ही मूलप्रकृति सोडून दुसऱ्या पायरीवर आलें म्हणजे महान् हें तत्त्व लागतें. महान् प्रकृतीपासून निघाला म्हणून तो 'प्रकृतीची विकृति किंवा विकार' आहे; व पुढें अहंकार या महान् तत्त्वापासून निघाला म्हणून महान् या अहंकाराचें प्रकृति किंवा मूळ आहे. एतावता महान् किंवा बुद्धि हा गुण एका बाजूनें अहंकाराची प्रकृति किंवा मूळ होतो; आणि दुसऱ्या बाजूनें मूळ प्रकृतीची विकृति म्हणजे विकार होतो. म्हणून सांख्यांनीं त्यास 'प्रकृति-विकृति' या वर्गात घातले आहे; व याच न्यायानें अहंकार व पंचतन्मात्रे यांचा समावेशहि 'प्रकृति-विकृति' या वर्गांतच करण्यांत येतो. जें तत्त्व अगर गुण स्वतः दुसऱ्यापासून निघालेलें (विकृति) असून पुढे आपणच दुसऱ्या तत्त्वांचें मूलभूत (प्रकृति) होतें त्यास 'प्रकृति-विकृति' असें म्हणतात. महान्, अहंकार व पंचतन्मात्रे हीं सात तत्त्वें अशा प्रकारचीं आहेत. (३) पण पांच ज्ञानेंद्रियें, पांच कर्मेंद्रियें, मन आणि स्थूल पंचमहाभूतें या सोळा तत्त्वांपासून पुढे दुसरी कोणतींहि तत्त्वें निघालेलीं नाहींत. उलट तींच दुसऱ्यापासून निघालीं आहेत. म्हणून या सोळा तत्त्वांस 'प्रकृति-विकृति' असें न म्हणतां नुसतें 'विकृति' किंवा 'विकार' असें म्हणतात. (४) पुरुष प्रकृति नाहीं व विकृतीहि नाहीं, तो स्वतंत्र व उदासीन द्रष्टा आहे.

११.मूलप्रकृतिरविकृतिः महादादयाः प्रकृतिविकृतयः सप्त । षोडषकस्तु विकारो न प्रकृतिर्न विकृतिः पुरुषः ।।

" मूळ प्रकृति ही अविकृति म्हणजे कशाचाच विकार नाही. महदादि साल, महत्, अहंकार व पंचतन्मात्र या प्रकृति विकृति होत. आणि मनासकट अकरा इंद्रिये व स्थूल पंचमहाभूतें मिळून सोळा तत्त्वांस नुसत्या विकृति किंवा विकार असे म्हणतात. पुरुष प्रकृति नाही आणि विकृति नाही. (सां.का.३)

१२.पण वेदांतशास्त्रात प्रकृति स्वतंत्र न मानता परमेश्वरापासून पुरुष व प्रकृति निर्माण होतात हा सि‌द्धांत आहे. त्यामुळे प्रकृति- विकृती या सांख्यभेद शिल्लक राहत नाही. ती परमेश्वरापासून उत्पन्न झाली असून ती प्रकृति-विकृतिच्या वर्गात येते

१३.एका बाजूस जीव व दुसऱ्या बाजूस ८ प्रकारची प्रकृति निर्माण झाली. म्हणजे वेदान्त्यांनुसार पंचवीस तत्त्वापैकी सोळा तत्त्वे सोडून देऊन बाकी राहिलेल्या नऊ तत्त्वांचे जीव' व "अष्धा प्रकृति' हे दोनच प्रकार आहेत.

१४.गीतेत पुरुष' याला जीव म्हटले आहे, जी ईश्वराची 'परा प्रकृति - श्रेष्ठ रुप' आहे तर मूळप्रकृति गीतेत 'अपर' म्हणजे कनिष्ठ स्वरूप मानली जाते. (गी. ७.४५.)

# पंचीकरण - पाच महाभूतांपैकी प्रत्येकाचा कमीजास्त भाग घेऊन त्या सर्वांच्या मिश्रणाने नवा पदार्थ तयार होणे.

# पंचमहाभूते यांच्या उत्पत्तीचा क्रम तैतिरीयोपनिषदांत असा दिला आहे.

"आत्मनः आकाशः संमूतः । आकाशाद्वायुः । वायोरग्नि। अग्नेरापः ।
अद्‌भ्यः पृखिवी । पृथिव्या ओषधयः । इ"

आणि पंचमहाभूत निर्माण झाल्यानंतर.

'पृथिव्या ओषधयः । ओषधीभ्योऽन्नम् । अन्नात्पुरुषः"

१५.परंतू श्वेताश्वतरोपनिषद, छांदोग्योपनिषादांत पंचतत्त्वां ऐवजी तेज, आप व अन्न (पृथ्वी) ही तीनच मूलतत्वे त्रिवृत्कारणाने सृष्टी निर्माण झाली असे कोन आहे.

परंतू तैत्तरीय (२.१), प्रश्न (४.८), बृहदारण्यक ८४.४.५ वगैरे दुसया उपनिषदांतून, श्वेताश्वेतर (२०१२) वेदांत सूत्रर (२.३१-४) व शेवटी गीता (७.४, १३.५) यातही तिहींत ऐवजी पाच महाभूते सांगितली आहेत. गर्भोपिनिषदांत 'पंचात्मक' आहे असे आरंभीच म्हटले आहे.

#सचेतन तत्व-#पुरुष'

१..मूळ प्रकृतीपासून निघालेल्या पृथिव्यादि स्थूल पंचमहाभूतांम सूक्ष्म इंद्रियांशी संयोग झाला म्हणजे शरीर तयार होते पण ते सेंद्रिय तरीही जडच असते. या इंद्रियांना प्रेरणा करणारे तत्त्व जड प्रकृतिहून निराळे असून त्यास पुरुष म्हणतात.

२.हा पुरुष अकर्ता असून त्याचा प्रकृतीशी संयोग झाला म्हणजे सजीव सृष्टीस सुरुवात होते, व 'मी निराळा व प्रकृति निराळी हे ज्ञान झाल्यावर पुरुषाचा प्रकृतिशी झालेला संयोग लुटून तो मुक्त होतो.

#ज्ञानाखेरीज जो मनुष्य मरतो त्याच्या आत्मा प्रकृतीच्या चक्रांतून अजीबात सुटत नाही हे उघड आहे."

म्हणजेच ज्ञान नसतो प्राणी मेला तर मरतेवेळी त्याच्या आत्म्याबरोबर प्रकृतीच्या १८ तत्त्वांचे हे लिंगशरीर पंचमहाभूततत्त्वे) देहातून बाहेर पडते आणि ज्ञानप्राप्ती होईपर्यंत त्या पुरुषास नवे नवे जन्म घेण्यास लावीत असते.

(पान ११४)

३.पंचमहाभूते संपल्यावर इतर १३ तत्त्वे पंचतन्मात्रांसह राहते. पुढे वेदांतात कर्माकर्मानुसार तर सांख्यात सत्त्व, रज, तम गुणानुसार या लिंगशरीराला निवृत्ती अथवा देवयोनी (सत्व अधि मनुष्ययोनी (रज अधिक) तिर्थक्‌योनी (तमगुण अधिक] येथे जन्म प्राप्त होतो.

#संहार
सांख्यशास्त्रानुसार मूळ अव्यक्त प्रकृतीपासून किंवा वेदांतानुसार मूळ सद्रूपी परब्रम्हापासून सृष्टीतील सर्व सजीव व निर्जीव व्यक्त पदार्थ क्रमाक्रमाने निर्माण झाल्यावर सृष्टीच्या संहाराची वेळ आली म्हणजे उभारणीचा वर जी गुणपरिणामक्रम सांगितला त्याच्या उलट क्रमाने सर्व व्यक्त पदार्थ अव्यक्त प्रकृतीत किंवा मून ब्रम्हांत लय पावतात असा सांख्य व वेदांत या दोन्हीं शास्त्रांचा सिद्‌धांत आहे.

पुढे श्रुतिस्मृतिपुराणांत ब्रम्हदेवांपासून / हिरण्य गर्भापासून / शैव / वैष्णव निमित्तकारणापासून सृष्टी कशी निर्माण झाली हे वर्णिले आहे.

भगवद्‌गीतेंतहि "मम योनिमहत ब्रम्ह" (गी. १४.३)असे त्रिगुणात्मक प्रकृतीलाच ब्रम्ह नाव देऊन या बीजापासून प्रकृतीच्या त्रिगुणाने अनेक मूर्ति झाल्या हे सांगितले.

तर (गी.१.६) मध्ये ब्रम्हदेवापासून सात मानसपुत्रांची उत्पत्ती व पुढे चराचर सृष्टी निर्मिती झाली आहे.

परंतू भागवतातील संकर्षण, प्रद्युमन्न, अनिरुद्‌ध यांचा सृष्टीरचनेचा उल्लेख गीतेत कोठेही नाही. हा भागवत आणि गीता भेद पुन्हा दर्शित करतो.
-लोकमान्य टिळक

मुक्तकविचारमाहितीसंदर्भ

प्रतिक्रिया

प्रसाद गोडबोले's picture

13 Aug 2025 - 1:43 pm | प्रसाद गोडबोले

उत्तम !

एक शंका : आधी बुद्धी की आधी अहंकार ?
माझ्या आकलनानुसार अहंकार हा आधी येत असला पाहिजे आणि मग त्यातून निर्माण होणाऱ्या "मी" ह्या जाणिवेला टिकवून ठेवण्यासाठी बुद्धीचा उगम होत असावा.
बुद्धी नसते तेव्हाही अहंकार असतोच ना.

Bhakti's picture

13 Aug 2025 - 2:48 pm | Bhakti

अहंकार हा बुद्धीचाच एक पोटभेद असल्यामुळे पहिल्यानें बुद्धि झाल्याखेरीज अहंकार उत्पन्न होऊ शकत नाहीं. म्हणून अहंकार हा दुसरा म्हणजे बुद्धीच्या मागाहूनचा गुण आहे असें सांख्यांनी ठरविलें आहे. सात्त्विक, राजस व तामस भेदानें बुद्धीप्रमाणें अहंकारहि अनंत प्रकारचा असतो हैं सांगावयास नको. पुढील गुणहि याचप्रमाणें प्रत्येकीं त्रिघात अनंत आहेत. किंबहुना व्यक्त सृष्टींत प्रत्येक वस्तूचे याचप्रमाणें अनंत सात्त्विक, राजस व तामस भेद होत असतात; व या सिद्धान्तास अनुसरूनच गीतेंत गुणत्रयविभाग व श्रद्धात्रयविभाग सांगितले आहेत (गी. अ. १४ व १७).

बुद्धीपासून पुढे उत्पन्न होणाऱ्या अन् पृथकपणाच्या या गुणासच #अहंकार' म्हणतात. कारण, पृथक् पणा 'मी-तूं' या शब्दांनीच प्रथम व्यक्त करण्यांत येत होता. म्हणजेच अहं-कार-अहं- अहं [मी-मी] करणे होय.

मूळ प्रकृतीत अहंकाराने भिन्न भिन्न पदार्थ बनण्याची शक्ति याप्रमाणे आल्यावर पुढील वाढीच्या दोन शाखा होतात.

१ झाडे, मनुष्य वगैरे #सेंद्रिय प्राण्यांची सृष्टि

२.#निरिंद्रिय पदार्थांची सृष्टि

ग्रंथात याबाबत सांख्यांचे स्पष्टीकरण सांगितले आहे.वेदांताचा याबाबत संदर्भ या ग्रंथात नाही.
तसेच प्रकृतिला किंवा ब्रम्हाला आधी व्यवसायात्मक बुद्धी जी अचेतन आहे ती होऊन विस्तार करावा वाटतो.

अव्यक्त प्रकृतीदेखील स्वतःची साम्यावस्था मोडून पुढें व्यक्त सृष्टि निर्माण करण्याचा निश्चय प्रथम करीत असते निश्चय म्हणजेच व्यवसाय, व तो करणें हैं बुद्धीचे लक्षण आहे. म्हणून प्रकृतींत व्यवसायात्मिक बुद्धि हा गुण प्रथम उत्पन्न होतो, असें सांख्यानीं ठरविलें आहे. सारांश, मनुष्याला ज्याप्रमाणें एखादें कृत्य करण्याची बुद्धि प्रथम होते, त्याचप्रमाणें प्रकृतीलाहि आपला पसारा करण्याची बुद्धि प्रथम व्हावी लागते. निण मनुष्यप्राणी सचेतन असल्यामुळे, म्हणजे त्याच्या ठायीं प्रकृतीच्या बुद्धीशीं सचेतन पुरुषाचा (आत्म्याचा) संयोग झाला असल्यामुळे, मनुष्याला झालेली व्यवसायात्मिक बुद्धि मनुष्याला समजते, आणि प्रकृति स्वतः अचेतन म्हणजे जड असल्यामुळे तिच्या बुद्धीचें तिला स्वतःला ज्ञान नसतें, असा या दोहोंमध्यें मोठा फरक आहे, हा फरक पुरुषाच्या संयोगानें प्रकृतींत उत्पन्न झालेल्या चैतन्यामुळे होत असतो; तो नुसत्या जड प्रकृतीचा गुण नव्हे. मानवी इच्छेच्या तोडीची पण अस्वयंवेद्य शक्ति जड पदार्थांतहि आहे असें मानिल्याखेरीज गुरुत्वाकर्षण किंवा रसायनक्रियेचें व लोहचुंबकाचें आकर्षण व अपसारण, इत्यादि केवळ जड सृष्टींतच आढळून येणाऱ्या आवडीनिवडीची नीट उपपत्ति लागत नाहीं, असें अर्वाचीन आधिभौतिक सृष्टिशास्त्रज्ञहि आतां म्हणू लागले आहेत, हैं लक्षांत आणिलें म्हणजे प्रकृतींत प्रथम बुद्धि हा गुण उत्पन्न होतो, या सांख्याच्या सिद्धान्ताचें आश्चर्य वाटण्याचें कांहीं कारण रहात नाहीं. प्रकृर्तीत प्रथम उत्पन्न होणाऱ्या या गुणास पाहिजे तर अचेतन किंवा अस्वयंवेद्य म्हणजे स्वतःस न कळणारी बुद्धि म्हणा. पण कांहीं म्हटलें तरी मनुष्यास होणारी बुद्धि आणि प्रकृतीस होणारी बुद्धि या दोन्ही मुळांत एकाच वर्गातल्या आहेत हें उघड आहे