आमच्या शाळेचा हिरकमहोत्सव होता. मला निमंत्रण आलं होतं ते बघून मला खूप आनंद झाला. कुणाकडून तरी माझा व्हाॅटस्ॲप नंबर मिळवून शाळेच्या निमंत्रण विभागाच्या कोऑर्डिनेटरांनी मला हिरकमहोत्सव सोहळ्याला बोलावलं होतं. माझी शाळेची वर्षं म्हणजे पाचवी ते अकरावी इयत्तेपर्यंतची वर्षं. एकूण सात वर्षं मी त्याच शाळेत शिकत होते. शाळेची आठवण मला मी इतकी मोठी झाले तरी अधुनमधून यायची. पण हे निमंत्रण पाहून ती तीव्रतेनं आली. माझी शाळेतली वर्षं फार चांगली गेली होती. सगळे शिक्षक चांगले होते. मला त्या शाळेत कधीही, कुठलीही शिक्षा झाली नाही. माझ्या शाळेबद्दलच्या आठवणी मधुर होत्या.
शाळेत एक पाण्याची टाकी होती. तिला भरपूर नळतोट्या होत्या. त्या तोटी खाली हातांची ओंजळ करून,ओंजळीला ओठ लावून आम्ही पाणी प्यायचो. ते पाणी पिऊन कुणालाही, कधीही, कसलंही स्टमक इन्फेक्शन झालं नाही. आम्ही एकत्र,गोल बसून डबा खायचो. एकमेकांना बोटांनीच डब्यातली थोडी, थोडी भाजी वाढायचो. बरोबर भाकरी असायची. त्यावेळी सणासुदीलाच पोळी व्हायची. शौचालयांची व्यवस्था नीट नव्हती. त्यात पुरेसं पाणी नसायचं. शाळेत वीज नव्हती. त्यामुळे वर्गांतून अर्थातच पंखे नव्हते. पण वर्ग मोठ्या आकाराचे, प्रशस्त, मोठ्या खिडक्या आणि भरपूर सूर्यप्रकाश असलेले होते. आमची शाळेतल्या उणीवांबद्दल कोणतीही तक्रार नव्हती,कारण त्या उणीवा आम्हांला मुळी जाणवलेल्याच नव्हत्या.
शाळेला मोठं पटांगण होतं. तिथं पी टी चे सर कवायत घ्यायचे. तिथेच आम्ही खेळायचो.
शाळेचं स्नेहसंमेलन, नाटकं, सहली, परीक्षा,परीक्षेआधीचं ते घाबरणं हे सगळं, सगळं खूपच सुंदर, रम्य, मजेदार होतं. म्हणजे त्यावेळी ते तसं वाटत नसेलही पण नंतर त्या आठवणी रम्य म्हणून मनात राहिल्या होत्या.
परीक्षा चालू असताना,सुपरवायझरचं लक्ष नाही असं बघून हळू आवाजात एकमेकांना प्रश्नांची उत्तरं विचारणं हे तर फारच थ्रीलिंग होतं.
निमंत्रण पाहिल्यावर हे सगळं आठवलं. शाळेतल्या काही मैत्रिणी अजूनही संपर्कात होत्या. काही मैत्रिणींचे चेहरे आठवत होते. त्या उमलत्या वयात "तसे" जरा आवडलेले एक दोन मुलगेही आठवत होते. काही वांड, दंगेखोर,तर काही हुशार, वक्तृत्व स्पर्धेत बक्षीसं मिळवणारी मुलंही चेहऱ्यांसकट आठवत होती. पण बाकीची पोरं मात्र आठवत नव्हती. आमची शाळा मुलामुलींची एकत्र शाळा होती. मात्र नियम फार कडक होते. ते काटेकोरपणे पाळले जायचे. एक नियम म्हणजे मुलामुलींनी एकमेकांशी अजिबात बोलायचं नाही. एकमेकांकडे पाहायचं सुद्धा नाही. गॅदरिंगच्या नाटकात मुलींचं नाटक वेगळं आणि मुलांचं वेगळं. मुलांच्या नाटकात स्त्रीपात्रं मुलांनी आणि मुलींच्या नाटकात पुरुषपात्रं मुलींनी करायची. इतका वाईट प्रकार.
तर सांगायचं म्हणजे मी हिरकमहोत्सव सोहळ्याला गेले. (इथं पर्यंत म्हणजे "थोडक्यात स्पष्ट करा (५ गुण)" झालं. आता मूळ मुद्द्याला हात घालते. म्हणजे "ससंदर्भ स्पष्टीकरण (१० गुण)" )
सोहळ्याला खूपच गर्दी होती. शाळेच्या स्थापनेपासूनच्या प्रत्येक वर्षाची मुलं म्हणजे विद्यार्थी (मोठमोठे बाप्ये) आले होते.
आणि आम्ही विद्यार्थिनींनी.. विद्यार्थिनी कसल्या! सत्तरी ओलांडलेल्या आज्याच ! ..आम्ही एकत्र भेटलो. कित्ती कित्ती आनंद झाला म्हणून सांगू? आमचे एक दोन शिक्षक अजूनही हयात होते. आम्हाला शिकवायच्या वेळी नुकतेच नोकरीला लागलेले तरणेबांड शिक्षक. ते आता पंच्याऐंशी, नव्वद वर्षांचे झाले होते. त्यातले एक माझे आवडते कुलकर्णी सरही भेटले. आधी मी त्यांना ओळखलंच नाही, पण नीट पाहिल्यावर ओळखलं. मी माझी ओळख सांगितली. त्यांना माझं नाव चक्क आठवत होतं. इतरांचीही नावं आठवत होती. मी त्यांच्या पाऊलांना स्पर्श करत नमस्कार केला. त्यांनीही माझ्या डोक्यावर हात ठेवून मला आशीर्वाद दिला. त्यांच्या थरथरत्या उबदार हातांचा स्पर्श झाला आणि मला रडूच आलं. मी त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्यांनी मला थोपटलं. त्यांचाही आज सत्कार होणार होता. मी त्यांचा हात धरुन सर्वांत पुढच्या रांगेत नेऊन त्यांना त्यांच्या राखीव असलेल्या आसनावर बसवलं.
मग मी माझ्या वर्गातल्या मुलामुलींकडे वळले. त्यांची ओळख पटायला थोडासा वेळ लागला. पण वीज लखलखावी तशी ओळख पटत गेली. सगळेच बदलले होते. म्हातारे झाले होते. बहुतेकांना चष्मा लागला होता. श्रवणयंत्रं बसवलेली होती. पोटं सुटलेली, टक्कल पडलेलं, कवळ्या बसवलेल्या अशीच आम्हां सर्व "माजी" विद्यार्थी, विद्यार्थिनींची अवस्था होती. काहीजण आलेले नव्हते. काहींचे पत्ते बदललेले होते. काहीजण बऱ्याच वर्षांपूर्वी परदेशीच स्थायिक झाले होते. काहीजण परलोकी स्थायिक झाले होते.
ओळख पटली आणि सगळेच धबधबा कोसळावा तसे बोलायला लागले. "अरे,आपट्या तू? अय्या रजनी, किती जाडू झालीयस, अरे लेका, कुलकर्ण्या आहेस का अजून जिवंत? , कुस्मे, किती वर्षांनी भेटतोय,चंद्या,तू अजून गातोस का रे? शाळेत असताना गाणी गाऊन गाऊन आम्हांला पिळायचास,ए आपली ती म्हैसूर, बंगलोर ट्रीप आठवते का? (.. मुलांची बस वेगळी, मुलींची वेगळी. राहण्याची व्यवस्था दूर दूर. शाळेतले शिक्षक दुष्ट.. असो.), अकरावीच्या सेंडऑफला कसले रडलोय आपण!" असं सगळं सुरू झालं. (त्या वेळी दहावी ऐवजी अकरावीत शाळा संपायची.) आता आमची ओळख पटली. आमच्यांत झालेल्या बदलांसकट ओळख पटली. सगळे वयं विसरून जुन्या काळात पोहोचलो. मध्यंतरी इतका काळ गेला पण असं वाटलं , कालपरवापर्यंत आपण सगळेच एकमेकांना भेटत होतो. सगळे अरेतुरे आणि अगंतुगं वर आले. आम्ही मुलं मुली शाळेत असताना एकमेकांशी अजिबात बोलायचो नाही हे आठवून हसू आलं. आम्ही एकमेकांना टाळ्या दिल्या. एकमेकांना जवळ घेतलं, डोक्यात टप्पू मारले, इतकी बडबड केली की आमची तोंडं खापराची असती तर ती फुटलीच असती. जाती, धर्म, पंथ,हे भेद आमच्यांत शालेय जीवनातही नव्हते आणि आत्ता तर ते माहीतच नव्हते. कुणी वकील, कुणी, डॉक्टर, कुणी इंजिनिअर, कुणी उद्योजक होतं तर कुणी जास्त न शिकता लहान सहान दुकानं चालवून, आता मुलांवर सगळं सोपवून निवृत्त आयुष्य जगत होते. पण हा भेद आमच्या लक्षात आलाच नाही. जाणवलाच नाही. आम्ही सगळे शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी झालो होतो. आम्ही फक्त आनंद आणि आनंद लुटत होतो. काळ आमच्यासाठी जणु थांबला होता.
मग एकत्र जेवणं झाली. दुपारी चहा झाला. मग आमच्यातलाच एक जण म्हणाला,"आपण सर्वांनी मिळून व्हाॅटस्ॲप ग्रुप काढूया. एकमेकांच्या टच् मध्ये राहुयात. मग ठरलं. ग्रुप तयार झाला. चार, पाच जण ॲडमिन झाले. बाकीचे सगळे मेंबर झाले. मुली त्यांच्या सासर माहेरच्या दोन्ही आडनावांसकट ॲड झाल्या. मुलगेही ॲड झाले. त्या ग्रुपला एक सुरेखसं, समर्पकसं नाव दिलं गेलं. सगळ्यांनी यापुढेही दरवर्षी भेटायचं, एकत्र यायचं असा निश्चय केला.
सगळे गेट टुगेदरच्या सुखद आठवणी मनात साठवून आपापल्या घरी गेले.
ग्रुप वर दुसऱ्या दिवशी सकाळी धो,धो, मेसेजेस आले. कुणी जोक्स, कुणी उपदेश करणारे संदेश, कुणी कविता, फुलं असं खूप काय काय पाठवलं. आपल्यालाही विनोदबुद्धी आहे हे सगळ्यांनाच जाणवलं. आलेल्या संदेशांना सर्वांनीच गमतीदार उत्तरंही दिली. आता सर्वांना एकच चाळा लागला. सकाळी उठल्यावर सगळे मोबाईल हातात घेऊन मेसेजेस पाहू लागले. मेसेजेस टाकू लागले. आपल्या नवरा,पोरांची, बायको, पोरांची कुणाला आठवणच नसायची. हे काही काळ असंच चालू होतं.
असंच एक वर्ष गेलं. मग हळुहळू ग्रुपवर गप्पांऐवजी फाॅरवर्डेड मेसेजेस वाढू लागले. कुणी देवांचे, आपल्या गुरुंचे, महाराजांचे, स्वामींचे फोटो टाकायला लागले. पहिल्या वर्षी येणारे वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे मेसेजेस येईनासे झाले. कारण कुणाच्याच लक्षात कुणाचाच वाढदिवस राहीना. मग अमका जिहाद, तमका जिहाद. देश खतरेमे, युनेस्कोने काय किताब आपल्या देशाला जाहीर केला, अमक्यांनो एक व्हा. कुठला तरी रोग त्यावर उपाय, राशी भविष्य, जुन्या सिनेमातली धूसर दिसणारी गाणी, कसले कसले व्हिडिओज्, कसल्या कसल्या लिंक्स, कुणा नातेवाईकाची सत्तरी, नातवाची मुंज यांचे चाळीस, चाळीस फोटो पाठवले जायला लागले. याला काय उत्तर देणार म्हणून सगळे फक्त अंगठा वर करणाऱ्या इमोजीज् टाकायला लागले. ते एक "टाकणं" झालं. ओरिजिनॅलिटी संपली. क्रिएटिव्हिटी लुप्त झाली. मग चार, चार दिवस कुणीच फुलं आणि सुविचार ढकलणे वगळता काही मेसेज टाकेनासं झालं.
आम्ही दरवर्षी भेटायचं ठरवलं होतं खरं,पण त्यानंतर आमचं एकही गेट टुगेदर झाले नाही. कुणाला प्रवास झेपेनासा झाला. पाठ , मान, कंबर, माकडहाड दुखायला लागली. त्या तक्रारींचं मेसेजेसमध्ये रुपांतर झालं.
वयोगट पाहता अधुनमधून अपेक्षित मेसेजेस देखील येतच होते. अमका वारला, अमकीचे निधन झाले, तमक्याला देवाज्ञा झाली.
एकंदरीत "एक एक पान गळाया लागले" याची जाणीव आणखी गडद होत होती.
पूर्वी आम्ही मेसेज तर पाठवायचोच,पण एकमेकांना फोनही करायचो. अर्धा, अर्धा तास बोलत बसायचो. ते फोनही नंतर बंद झाले. बोलायला काही उरलंच नाही जणू. स्क्रीनवरचं नीट दिसतही नाही आणि स्थिर बोटं ठेवून टाईपही करता येत नाही.
असं वाटतं आमची आणि मोबाईलची ओळख खूप उशीरा झाली. कधीकधी वाटतं हे तंत्रज्ञान आपल्या तरुण वयात का नव्हतं? काळ नावाच्या एका महापुरुषाने आमचं बालपण, तरुणपणी एकमेकांशी राहू शकला असता अशा संपर्काची संधी आमच्या पासून हिरावून घेतलीय.
आमच्या व्हाॅटस्ॲप ग्रुपवर आता आमच्यापैकी कुणीतरी, कधीतरी "वेळ जात नाही म्हणून" किंवा "करमणूक म्हणून" गुड मॉर्निंग आणि गुड नाईटचा मेसेज टाकतो. ग्रुप बंद करुया असं अधेमधे म्हणत फुलांचे फोटो ढकलत राहतो.
आम्ही आमच्याआमच्या लहानशा जगात रमलो आहोत.
उंबरातले किडेमकोडे
उंबरी करिती लीला.
हिरकमहोत्सवाची सांगता झाली आहे..
प्रतिक्रिया
30 Jan 2025 - 1:02 am | diggi12
छान
30 Jan 2025 - 12:58 pm | विजुभाऊ
आमच्या शाळेचा ग्रूप असाच स्थापन झाला.
मात्र १९१५ पसून आम्ही गेट टुगेदर साजरे करतोय दर वर्षी.
एकून १२० जन ग्रुप मधे आहेत. त्यातली ६०/६५ जण येतात.
आणि आथवणीने इतर सापडत नसलेल्या मित्र मैत्रीणीना शोधत असतात.
इटरनेट मुळे हे साधतय.
5 Feb 2025 - 2:22 am | मुक्त विहारि
टायपिंग मिस्टेक झालेली दिसत आहे.
2 Feb 2025 - 10:48 am | चित्रगुप्त
एवढ्याश्या लेखाचा केवढा मोठा आवाका आहे.
सर्वात आधी शाळकरी जीवनाच्या आनंदी आठवणी --
-- मग हीरकमहोत्सवाचा आनंदी सोहळ्याचे वर्णन -- "आम्ही फक्त आनंद आणि आनंद लुटत होतो. काळ आमच्यासाठी जणु थांबला होता" --
-- मग सोहळ्यानंतरच्या काळातला ओसरत गेलेला उत्साह --
-- ओरिजिनॅलिटी संपली. क्रिएटिव्हिटी लुप्त झाली. मग चार, चार दिवस कुणीच फुलं आणि सुविचार ढकलणे वगळता काही मेसेज टाकेनासं झालं....
-- आम्ही दरवर्षी भेटायचं ठरवलं होतं खरं,पण त्यानंतर आमचं एकही गेट टुगेदर झाले नाही. कुणाला प्रवास झेपेनासा झाला. पाठ , मान, कंबर, माकडहाड दुखायला लागली...
--- अमका वारला, अमकीचे निधन झाले, तमक्याला देवाज्ञा झाली....एकंदरीत "एक एक पान गळाया लागले" याची जाणीव आणखी गडद होत होती..... ते फोनही नंतर बंद झाले. बोलायला काही उरलंच नाही जणू. स्क्रीनवरचं नीट दिसतही नाही आणि स्थिर बोटं ठेवून टाईपही करता येत नाही....
-- हे सगळं वाचताना कसनुसं झालं...
2 Feb 2025 - 2:10 pm | अथांग आकाश
+१
2 Feb 2025 - 9:09 pm | चौथा कोनाडा
व्वा सुंदर लेखन !
शाळेच्या युनियनला गेल्यावर जुने वर्गमित्र भेटून अत्यानंद झाला ! पुधं व्हाअ ग्रुप पण स्थापन झाला. अनेक मित्रमंडळी सोबत प्रत्यक्ष / फोन वर बोलणं होत असतं ख्याली खुशाली कळत असते.
बाकी फापटपसारा येतोच , पण दुर्लक्ष करतो.. ग्रुप टिकुन आहे (वयोगट जास्त नाही म्हणून असेल कदाचित)
बा़की आजी, तुमच्या लेखनाच्या शेवटच्या ओळी नेहमीच कातर करून राहातात !
लिहित रहा, येत रहा, आजीबाई !
5 Feb 2025 - 2:23 am | मुक्त विहारि
लेख आवडला...