मातृत्वाचा शृंगाररस

गंगाधर मुटे's picture
गंगाधर मुटे in जे न देखे रवी...
19 Oct 2024 - 11:35 pm

मातृत्वाचा शृंगाररस

चंदन चांदणं गोंदण ल्याली
नवथर कांती तनू सुकुमार
अर्ध मोकळ्या केसावरती
माळून गजरा चंद्राकार

कुठे निघाली चंचल रमणी
थबकत लचकत हरिणी समान
सरकत शेला सावरलेला
धरत रोखुनी नयन कमान

ठुमकत मुरडत गवळण राधा
जणू विहरत यमुनाकाठ
गोप बघुनी झाकू पाहते
पदराखाली भरला माठ

हिंदोळणाऱ्या पदरासंगे
डुचमळते बेचैन उभार
हृदय-चक्षूंना वेधून घेते
तन्मीलनाची नमनमिनार

अर्ध्या उघड्या पाठीवरती
भुरुभुरू केसांचे नर्तन
नाभी भवती करुनी रिंगण
पिंगा खेळतो द्वाड पवन

गुलाब जाई मोहित होई
रूप गोजिरे पद्मसमान
लपून आडून चोरून बघती
फुलामागुनी पिकले पान

कुणी म्हणाले शेंग चवळीची
कुणी म्हणाले पेवंदी आम
कुणी म्हणाले कामुक मैना
खुदुखुदू हसुनी रमताराम

कुण्या मुलखाची राजपरी ही
कुजबुज करती वल्लीशिवार
जशी घडविली, तशी मढवली
ही रंगीली नटवी नार

तव वदली ती प्रसन्नवदना
हो मी आहे नटवी नार
खळखळ वाहत असतो माझ्या
नसानसातुनी रस शृंगार

विरक्तीला लुब्ध कराया
करीत पीयुषाची पखरण
सजणेधजणे, लटक, मटकणे
प्रीत लालित्याची उधळण

जरी दिसतो तुम्हां दुरुनी
माझ्याठायी हा एकच रस
परी मी आहे सर्व रसांचा
जणू घुसळला अमृतरस

कधी असते मी झाशी, अहिल्या
मीच कालिकेचा अवतार
मी राधिका, मीच मीरेच्या
अद्वैत भक्तीचा एकतार

मीच कैकेयी, मी कौशल्या
मी वनवासी जनकाची लेक
मीच देवकी, मीच यशोदा
माझे स्वरूप, रूप अनेक

मीच भीमाई, मी जीजाऊ
मी क्रांतीची ज्योतमशाल
पंकामध्येही पंकजाची
पालनकर्ती मी मृणाल

आदी माया आदी शक्ती
सचेतनाची मी सृजक
जैवजिवांची उत्पत्ती अन
प्रणयरसाची मी पूजक

स्त्रित्वाची मी अभय स्वामींनी
सजीव सृष्टी माझं बाळ
ब्रह्मांडाला व्यापून उरली
माझ्या मातृत्वाची नाळ

- गंगाधर मुटे 'अभय'
==============
अठरा/दहा/चोवीस

अभय-काव्यअभय-लेखनशृंगारकविता

प्रतिक्रिया

एकांतवासा साठी शुभेच्छा. झारखंड राज्यातील श्री गंगाराम तिवारीजी यांची कवीता,श्री हबीब तन्वीर यांनी जनमानसात आणली.पुढे श्री अमिर खान यांनी आपल्या सिनेमात वापरली. करोना काळात बर्‍याच लोकांना धैर्यशील बनवले.

द्रोना जईसे गुरू चले गए
करन जईने दानी संग, करन जईसे दानी
बाली जईसे वीर चले गए, रावन जस अभिमानी
चोला माटी के राम
एकर का भरोसा? चोला माटी के रे
कोनो रिहिस ना कोनो रहै, भईया ही सबके पारी
एक दिन आई सबके पारी
काल को नोला छोड़े नाहीं, राजा, रंक, भिखारी
चोला माटी के राम
एकर का भरोसा? चोला माटी के रे

कवितेचे नाव वाचूनच ऑन द रॉक्स सिवाज रिगल मधे कोजागिरी पोर्णिमेचे मसाला दूध मिसळल्यासारखे वाटले.

चौकस२१२'s picture

26 Oct 2024 - 6:12 am | चौकस२१२

हो ना किंवा उत्तम तांबड्या वारुणीत कोका कोला मिसळणे
म्हणजे दोन्ही ची हि मजा घालवली , पण कवीश्वरांना कोण सांगणार !