२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .
३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!
४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या
५. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे
६. अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!
८. अदूचा आठवा वाढदिवस: आनंदयात्रेची आठ वर्षं!
९. मुलीला नवव्या वाढदिवसाचं पत्र: अदू इन वंडरलँड आणि ॲलेक्स पर्वाची सुरूवात
दि. १७ सप्टेंबर २०२४
प्रिय पाबई...
✪ वृक्षतोड, जंगल आणि शफाली वर्मा
✪ रवीन्द्रनाथ टागोर आणि हॅग्रिड
✪ बिच्चारे डोरेमॉन- शक्तीमॉन आणि तो पोकेमॉन
✪ "निनू, मला वाटलं तू सायकल मागून धरली होतीस!!"
✪ अंग्रेज के ज़माने के जेलर आणि “पारोसा”!
✪ गे नेक- एका कबुतराची व न वाचलेल्या पुस्तकाची कहाणी!
✪ एक साधू व त्याच्याभोवती स्तब्ध उभे असलेले अठरा लांडगे
✪ ॲलेक्सची धमाल, शोज, मस्ती आणि देवगड!
✪ तुम चेंदू हो या चँपियन हो?
✪ बुद्धीबळ आणि वेटलिफ्टिंग!
✪ “दादा, तुझं नाव काय रे?”
आज तुझा दहावा वाढदिवस!!! चक्क दहावा! दहा वर्षं! "इतकी मोठी" तू झालीस! अर्थात् तू किती मोठी झाली आहेस हे मला रोजच कळतं. मस्तीमध्ये तू मारामारी करतेस तेव्हा मला आता कधी कधी तुझे फटके जोरात बसतात! तुझ्यातली शक्ती चांगलीच कळते! आणि आता तुला कडेवर घेणं अशक्यप्राय होतंय! आपल्या डबल सीट राईडसही आता जवळ जवळ थांबल्या आहेत. तर वाढदिवसाच्या माझ्या पत्रांमधलं हे दहावं पत्र! तू माझ्याशी कधी कधी कशी भांडतेस, तसं मीसुद्धा तुझ्याशी भांडणार आहे ह्या पत्रातून! तेव्हा तयार राहा.
हे दहावं पत्र लिहीताना आनंद होतोय! दर वर्षीच्या पत्रातून मी त्यावेळच्या गोष्टी लिहून ठेवल्या आहेत. त्या त्या वर्षातल्या गमती! केलेली मजा, मस्ती, आठवणी आणि कधी कधी आजारपणाच्या आठवणीही. ह्या वर्षामध्ये अशा ब-याच गोष्टी झाल्या. हे लिहीताना ते सर्व आठवतंय. आणि त्याबरोबर गेली दहा वर्षंही आठवत आहेत! एवढसं सरपटत एका खोलीतून दुसर्या खोलीत जाणारं ते बाळ! त्या बाळाची तू आता नक्कल मस्त करतेस! ते बाळ अजिबात ओरडायचं नाही! अजिबात त्रास द्यायचं नाही, मारामारी करायचं नाही! आणि हो, त्या बाळाला छोटसं जंगल होतं. आधी एक छोटं झाड होतं. आणि दोन- अडीच वर्षांपासून छोट्या छोट्या मस्त शेंड्या होत्या. अजून मोठं झाल्यावर तर एक गलेलठ्ठ उंदीर तर कधी दोन सापसुद्धा असायचे! आता त्या जंगलाला, त्या वृक्षांना मी जाम मिस करतो. एके काळी ते इतकं मोठं जंगल असायचं की, त्यात घनदाट झाडीतून जाणारी पायवाट असायची! एक चढाव चढून त्या जंगलात ती वाट जायची. पुढे फिरून मग एक मोठा उतार लागायचा. आणि त्या उतारावरून घसरलं की बरोबर ज्वालामुखी लागायचा! सतत स्फोट करणारा ज्वालामुखी! वृक्षतोड फार वाढलीय, त्यामुळे ते जंगल आता मला आठवणींमध्येच दिसतं आणि तू म्हणतेस तसं इन यूवर ड्रीम्स! ते जंगल नसल्याचा मला भयंकर त्रास ह्या वर्षामध्ये सुरू झाला. ते जंगल परत कधी उगवेल माहित नाही! आणि आता तर तुझं जंगल मिलिटरी कॅडेटसारखं आहे! त्यामुळे ती शफाली वर्मा आठवते सारखी! नाम तो बड़ा हो गया, बाल छोटे रह गए!
(ध्यान, ट्रेकिंग, फिटनेस, आकाश दर्शन, सायकलिंग अशा अनुभवांवरचे लेख माझ्या ब्लॉगवर वाचता येतील- https://niranjan-vichar.blogspot.com/2024/09/blog-post_17.html लेखन: निरंजन वेलणकर)
शफाली वर्मावरून आपण बघितलेल्या मॅचेस आठवतात! ऋषभ पंतचा प्रसंग आठवून तर अवाक् व्हायला होतं! तो परत खेळायला सुरू करणार होता पाहा. तेव्हा एक जुनी मॅच दाखवत होते. आणि त्यामध्ये तो खेळताना दिसला! तुला किती मोठा आनंद झाला होता! अक्षरश: नाचत होतीस. ती जुनी मॅच होती, पण नंतर तो खेळायलाही लागला! तुला आता क्रिकेट चांगलं कळतं. खेळाडू कसे आहेत, कोण जुने होते तेही लक्षात राहतं. धोनीला तू खेळताना बघितलंही नाहीस, पण तुला तो आवडतो! वर्ल्ड कप फायनलला तू पिवळा ड्रेस घालून एके काळी तुझ्या दुपट्याच्या आकाराच्या असलेल्या ऑस्ट्रेलियाला चीअर अप केलंस आणि जिंकवून दिलंस! मग काय. पण ह्या वर्षाचा टी- ट्वेंटी वर्ल्डकप तर आपण जिंकलो! तू मला प्रत्येक मॅचच्या वेळी स्कोअर विचारायचीस! कोणती मॅच कशी झाली, कोणी चांगला खेळ केला हे मी तुला सांगत होतो. क्रिकेटइतके तुला ऑलिंपिकचे खेळ मात्र नाही आवडले. पण खेळणारे किती जिद्दीने खेळतात, किती तयारी करतात, हे तुला कळलं. काही दिवस तू क्रिकेटच्या क्लासलाही गेलीस. आता पाऊस थांबला की परत जाशील. आपण मध्ये मध्ये क्रिकेटसुद्धा खेळलो पाहा. आणि बॅडमिंटन! पण क्रिकेट खेळताना तुला बॉल मारता आले नाही तर कशी रडायची आणि भांडायची! आठव तू!
तर पाबई! गेल्या वर्षातल्या गमतीमध्ये आठवतं ते तू अनन्याकडून शिकलेलं हँड- स्टँड व इतर स्टंट्स. माझ्या भाषेमध्ये कोलांटी उड्या व शीर्षासनासारखे व्यायाम. त्यातली मजा तुला कळाली. पण त्यामधली अजून जास्त मजा येण्यासाठी तुला ते करत राहावे लागतील. म्हणजे हे कसंय की, मस्त जेवणाचं ताट वाढलंय. तुझी आवडती बर्फी, काजू कतली, जिलबी असं सगळं यम्मी आहे. तू जेवायला बसतेस. एक घास घेतेस. तुला खूप मस्त वाटतं. आणि मग तू ताट बाजूला ठेवून देतेस. एकदा व्यायाम केल्यावर छान वाटतं, एक घास घेतल्यावर छान वाटतं तर पूर्ण जेवण करायला पाहिजे ना. तर खरी मजा येईल! तेच सगळ्या गोष्टींचं आहे. नाही नाही, पुस्तक वाचण्याबद्दल मी म्हणत नाहीय! नो, नो, नो! चित्र काढण्याबद्दल म्हणतोय! तू स्केच काढायला सुरू केलंस, बाहेरची आउटलाईन काढलीस. आणि तू रवीन्द्रनाथ टागोर काढायला सुरूवात केलीस. आणि तिथेच सोडून दिलंस. तर मग ते रवीन्द्रनाथ टागोर दिसतील का? की हॅग्रिड दिसतील? तू संत कबीरांचं चित्र मात्र मस्त काढलंस. जे तू मन लावून करशील ते छानच करशील. आणि कोणीही, जो कोणी मन लावून एखादी गोष्ट करेल, तो छानच करेल.
पाबई, पण तुझ्या दहाव्या वर्षातला पर्सन ऑफ द यीअर पुरस्कार मात्र "त्यालाच" द्यायला पाहिजे! बहुतेक गेल्या वर्षामध्येही तोच पर्सन ऑफ द यीअर होता ना! तोच तो पिवळा. सगळ्यांना ज्याने हरवलं तो! नाही, ट्रॅव्हीस हेड नाही! डोरेमॉन, शक्तीमॉन आणि इतर लिंबूटिंबू मोटू टकलू, रुद्र, शिवा, बाईस का जुबाईस्का, पिनाकी, शिन्चॅन, निन निन जादू, फीशीरा वगैरेंना हरवणारा तो पिवळा! पि- का- चू अर्थात् पोकेमॉन! तोच ह्याही वर्षी सगळ्यांत जास्त फॉर्ममध्ये होता ना! इतका की जेव्हा तू माझ्याशी मुद्दामच- उगीचच बोलत नव्हतीस तेव्हा मलाही पोकेमॉनचीच मदत घ्यावी लागली! खरंच पोकेमॉनला मानलं पाहिजे! इतका मोठा शक्तीमॉन ॲलेक्स! पण त्याच्याही पुढे पोकेमॉनच आहे!
ॲलेक्सने मात्र ह्या वर्षात केलेली धमाल लिहीण्यासाठी वेगळं पत्रच खरं तर लिहावं लागेल! तुझ्या मागच्या वाढदिवसाला छोटूसा असलेला ॲलेक्स म्हणजे तुझा आल्लू बुबू, तुझा गोंडूला, तुझा बुब्बूला, डॉगुला आणि तुझा पॉटी पॉटी बुबू! आता खूप शक्तीमॉन झाला आहे! मोठ्यांनासुद्धा तो ओढून नेऊ शकतो! काय त्याचे शोज! बाप रे! भेटायला चार जण आले की, ॲलेक्सला जसा प्रश्न पडतो की, आधी कोणाच्या अंगावर जाऊ, आधी कोणाला गोंजारू, तसं मला ह्या आठवणी लिहीताना होतंय! पण ॲलेक्सबद्दल थोडं नंतर!
सायकल चालवता आली!
तर अदू, आधी ह्या वर्षातला मला आवडलेला सगळ्यांत मोठा प्रसंग सांगतो. माशाचं पिलू पोहायला शिकलं तो प्रसंग! खूप आधीपासून मी तुझ्या मागे लागत होतो की, चालव सायकल. चालवून पाहा. थोडी हिंमत कर. लगेचच शिकशील! पण तुला जमत नव्हतं! पण मग शेवटी जमलं! त्यासाठी तुला अर्धं पेडल मारून सायकलवर उभं राहून थोडं पुढे जायला पहिले सांगितलं. ते करता करता तुला बॅलन्स जमला. आणि मग एका दिवसातच शिकलीस! जेव्हा तुला कळालं की, मी कधीच हात सोडला आहे आणि तू तुझी पुढे जाते आहेस, तेव्हा तुला प्रचंड आनंद झाला होता! थोडी धडपडलीस. पण अगदी दोन दिवसांमध्ये व्यवस्थित जमलं. आणि मग मलाच किती वेळेस बोललीस, "निनू, मी उगीचच घाबरत होते, किती सोपं होतं हे!" माझ्या लहानपणी तर आम्ही गल्लीतल्या मुलांसोबत बघून बघून आपोआपच सायकल शिकलो होतो. तुला सायकल चालवता आल्यावर आपण मस्त राईडस केल्या. पाच किलोमीटर आणि मग बारा किलोमीटरसुद्धा. ह्या राईडसमध्ये खरं तर तू एकटीच चालवत होतीस. मी तुला फक्त बाजूने इशारे करत होतो. तू मस्त सायकल चालवायला शिकलीस. आणि चढावरही तुला तुलनेने सहजपणे सायकल चालवता येत होती! ह्या वर्षी आपण आणखी मोठ्या राईड करू. आणि तू माझी सायकलही लवकरच चालवू शकशील.
पाबई, ट्रेकिंग मात्र आपण फार जास्त नाही केलं. मला एक तुकाई माता मंदिराच्या टेकडीचा ट्रेक आठवतोय. तू कंटाळलीस आणि दमल्याचं नाटक करून परत यायला लावलंस. तो ट्रेक मी नंतर आजू व प्रसन्नसोबतसुद्धा केला. आणि आपण गिरीशकाकासोबत घोराडेश्वरचाही अर्धा ट्रेक केला. तिथेही तू उलटीच होतेय अशी ॲक्टींग करून परत यायला लावलंस! आपल्याला नंतर सुट्ट्यांमध्ये कुठे जाता आलं नाही. आपले बरेच किल्ले व ट्रेक बाकी आहेत!
अंग्रेज के जमाने के जेलर
ह्या वर्षी आपण हंगामा, हम है राही प्यार के आणि थ्री इडियटस पिक्चर बघितले. शिवाय आणखीही बघितले! त्यातले काही वाक्य व प्रसंग तुला मस्त लक्षात राहिले! तुला आवाज छान काढता येतो व अभिनय मस्त करता येतो. किती तरी वेळेस आपण हसून हसून रडू येईपर्यंत तो शोलेमधला "अंग्रेज के जमाने के जेलर" चा सगळा ड्रामा बघत होतो! तुलाही तसे हावभाव, उद्गार व अभिनय करता यायला लागले! शिवाय तू सूरमा भोपालीचाही आवाज हुबेहूब काढलास! आणि त्या गब्बरसिंहला तर तू "पारोसा" नाव दिलंस! अदू, तू थोडा सराव केला, थोडं अजून मन लावून आणि मनावर घेऊन केलं ना तर तुला असे मस्त परफॉर्मन्स करता येतील. खूप मुलं- मुली असे १५- १५ मिनिटांचे परफॉर्मन्स करतात. जशी अदिती आत्या वर्हाड निघालंय लंडनला ह्या एका नाटकातले संवाद म्हणायची. खूप मजा येते. तू फक्त मनावर घेऊन करत राहा. तुझ्यासोबत अशा गमती करताना मलाही कळालं की, मलाही असे आवाज काढता येतात!
गे नेक- कबूतराची व न वाचलेल्या पुस्तकाची गोष्ट
गेल्या वर्षातली अजून एक आठवण म्हणजे गे- नेक पुस्तक- एका कबूतराची कहाणी! तुझ्या हिंदीच्या पुस्तकात त्याचं वर्णन वाचून मी ते पुस्तक घेतलं. खूप जबरदस्त पुस्तक आहे. कबूतरांची खूप सुंदर गोष्ट व वर्णनं आहेत. त्यात खूप सुंदर वाक्य दिले आहेत. जोपर्यंत आपण घाबरत नाही, तोपर्यंत शत्रू आपल्याला काहीच त्रास देऊ शकत नाही. एका वेळा गरूडाच्या हल्ल्यामुळे घाबरलेल्या गे नेक कबूतराला एक साधू- लामा जवळ घेऊन थोपटतात. त्यामुळे त्याची भिती पळून जाते. त्या पुस्तकात दुसरंही एक सुंदर वर्णन आहे की, एक माणूस एका जंगलामध्ये जात असताना एक जंगली कुत्रा त्याच्या समोर येतो. कुत्र्याला खूपच आश्चर्य वाटतं की हा माणूस काहीच कसा घाबरत नाहीय. तो माणूस अजिबात घाबरत नाहीय हे कळून कुत्र्याचीही भिती कमी होते. त्यामुळे तोही त्याच्यावर भुंकत नाही. आणि मग तर तो कुत्रा त्या माणसाचा मित्र होतो व त्याला जंगलातली वाट दाखवतो!
पाबई, हे वाचताना मला ओशोंच्या प्रवचनातला एक प्रसंग आठवला. एक भिक्षु एका जंगलामध्ये ध्यान करत बसला होता. तेव्हा त्याच्या बाजूला अठरा लांडगे सगळीकडे येऊन उभे होते. पण त्या भिक्षुच्या मनामध्ये किंचितही भिती नव्हती, किंचितही आक्रमकता (attack करण्याची इच्छा) नव्हती, त्यामुळे ते लांडगेही स्तब्ध उभे राहिले. तेसुद्धा त्याच्यावर हल्ला करू शकले नाहीत! अदू, इतकं सुंदर हे पुस्तक आहे. प्राणी, वेगवेगळे पक्षी, झाडं, निसर्ग, पक्ष्यांच्या सवयी, ते घरटी कशी उभी करतात, कबूतरांना कसं शिकवता येतं हे सगळं त्यात खूप छान दिलं आहे. पण पाबई, इतकं सुंदर पुस्तक तुझं अजून वाचायचं बाकी आहे!
लकी मुलगी!
अदू, तू खरंच खूप लकी आहेस! आधी एकदा तू स्वत: म्हणालीसुद्धा होतीस की, मी जगातली सर्वांत लकी मुलगी आहे! खरंच आहे. तुला महिनाभर हिमालयामध्ये राहायला मिळालं! तिकडचे गावं, डोंगर, तिथले नातेवाईक ह्यांना भेटता आलं! मनसोक्त फिरता आलं! आणि हो, तुला अजिबात ललू आलं नाई! उलट आता तर तू मला सारखं विचारत असतेस की निनू, तू कधी जाणार आहेस रे बाहेर! अशी गंमत! तू हिमालयामध्ये गेलीस, आई फ्रान्सला गेली तेव्हा मला १५ दिवस तुझ्या प्राण्याला एकट्याने संभाळायचं होतं! १५ दिवस मी अडकून पडणार होतो. मला पहिले हा खूपच बाउंसर वाटला होता. पण मग मी त्या बाउंसरला अशी बॅट लावली की, तो सरळ सिक्स गेला! मी ॲलेक्सला घेऊन देवगडला जायचं ठरवलं! ॲलेक्समुळे इतके दिवस मलाही राहता आलं! जेव्हा सगळे असे कुठे कुठे जाणार हे ठरलं, तेव्हा तुला प्रश्न पडला की माझ्या माशांचं काय होणार! तूच हा विचार केलास! मग माशांचीही व्यवस्था झाली. दीपक सर माशांना खाऊ देण्यासाठी येणार, असं ठरलं.
मग १५ दिवस तुझ्या लाडक्या प्राण्याला घेऊन मी व माझे मित्र भूषणकाका आणि प्रसन्न देवगडला गेलो! ॲलेक्समुळे तिथे इतके दिवस राहता आलं. प्रसन्न ॲलेक्सला अजिबात घाबरला नाही. आणि म्हणून ॲलेक्सनेही त्याला जास्त त्रास दिला नाही. वरच्या गोष्टीसारखंच बघ. मग देवगडचा समुद्र, तिथलं शांत वातावरण, ट्रेकिंग, आमच्या भेटी असं एंजॉय करता आलं. फक्त ॲलेक्सला जाताना खूप त्रास झाला. पहिल्यांदा मी एकटं नेत होतो तेव्हा तर परतही यावं लागलं. नंतर मात्र भूषणकाका व प्रसन्न सोबत असताना नीट नेता आलं. बिचार्या ॲलेक्सने उलट्या, उष्णता आणि बंद जागेचा त्रास सहन केला. तिथे त्याने नंतर आनंदही तितकाच घेतला. मोकळ्या माळरानावरच्या घराचा तो राजाच झाला! तिथे झाडांमध्ये, चिखलामध्ये, मोकळ्या जागेत त्याने तुफान मजा केली! आम्हांलाही तिथे खूप छान वाटलं. घराच्या बागेतले फुलं- झाडं- फळं खूप जवळून बघता आले. तिथल्या निसर्गाची वेगवेगळी रूपं अनुभवता आली. सुरूवातीला ॲलेक्सला तिथलं दगडी कुंपण ओलांडून पलीकडे जाता येत नव्हतं. पण काही दिवसांमध्येच तो शिकला आणि मोठ्या उड्या मारायला शिकला! तिथेही त्याने नारळ सोलून दिले. तिथून परत येणं आम्हा सगळ्यांनाच त्रासदायक गेलं.
तिथून आल्यावर ॲलेक्सची मस्ती खूप वाढली. चुकून आपल्या घरात एक मांजर आली. तेव्हा केवढा थरारक ड्रामा घडला होता! घोरत पडलेल्या ॲलेक्सच्या बाजूनेच ती आत आली! मग ॲलेक्स वेडाच झाला. कसबसं तिला मी गॅलरीत ढकललं. तिथेही ती खूप वेळ खिडकीत बसली होती. तेव्हा तिला खूप घाबरवून खाली उडी मारायला लावली! ती आरामात उतरू शकत होती, पण घाबरल्यामुळे उतरत नव्हती! अशी केवढी धमाल ॲलेक्समुळे रोजच होते! मॉर्निंग वॉक करताना ॲलेक्स त्या झाडांमध्ये जो घुसतो ना, ते बघण्यासारखं असतं! त्याच्या रोजच्या शोमुळे ॲलेक्स रडू येईपर्यंत हसवतो!
तू दीड महिन्यानंतर ॲलेक्सला भेटली तेव्हा त्याला खूप आनंद झाला. कुत्रे बोलू शकत नाहीत. पण हे खरं नाही. कुत्रे बोलू शकतात. बोलतात. ऐकतात. फक्त भाषा थोडी वेगळी असते. तेही खूप जीव लावतात. त्यांना आपली सोबत सारखी लागते. आपण बाहेर जातो तेव्हा काय नजरेने ते आपल्याकडे बघत असतात! खरं तर आपण माणूस म्हणून कुत्र्यांना काही फार चांगली वागणूक देत नाही. बांधून किंवा बंद जागेत ठेवतो. ओढून इकडे- तिकडे नेतो. त्यांच्या नैसर्गिक घरातून किडनॅप करून आणतो. पण बिचारे आपली खूप साथ देतात. तुझा प्राणी तू शाळेतून आल्यावर किती आनंदाने तुझ्याशी खेळतो! मस्ती करतो. तू त्याला फटका दिला तरी दुसर्या क्षणामध्ये खेळायला लागतो. खूप दिवसांनी जे भेटतात त्यांना बघून किती खुश होतो आणि त्याच्या त्याच्या पद्धतीने आपलेही लाडच करतो! आपण त्याला थोपटतो तेव्हा किती शांत बसतो पाहा. आयुष दादाचा तर तो बॉडीगार्डच झाला आहे! दादा बाथरूममध्ये गेला तरी बाहेर थांबतो तो! इतर काही कुत्र्यांच्या गमती, हिमानी काकूचा शॅडो, त्यांचं बोलणं हे तुला खूप आवडतं. तू नक्कीच कुत्र्यांची भाषा बोलू शकतेस. तू प्राण्यांसोबत बोलणारी होऊ शकतेस.
तू चेंदू है या चँपियन!
ह्या वर्षी आपण बघितलेला अजून एक छान चित्रपट म्हणजे चंदू चँपियन! तुझ्या आरोह काकाने त्यात काम केलंय! पण चित्रपटही किती छान आहे! सगळी कथा किती मस्त आहे! कितीही अडचणी आल्या तरी ते मुरलीकांतजी अजिबात हरत नाहीत. आणि तो चित्रपट बघून झाल्यावर आईला आठवलं की, तू फार छोटी (कुक्कुली) असताना तुम्ही त्या मुरलीकांत पेटकर काकांना भेटले होते! किती मस्त ना! ह्या चित्रपटावरून मला तुला चिडवायला मात्र एक संधी मिळाली. जेव्हा तू कंटाळा करतेस (वाचन कंटाळे), पुस्तकं वाचत नाहीस, अभ्यासाचं किंवा क्राफ्टचं काही न करता लोळत टीव्ही बघतेस तेव्हा तुला मी विचारतो की, तू चेंदू आहेस, चेंदू! अशी लोळत टीव्ही बघताना तू खूप डल दिसतेस. तूच एकदा बघ स्वत:ला. त्यामुळे अशा गोष्टी तू करतेस तेव्हा चेंदू असतेस. पण जेव्हा मस्त खेळतेस, काही करत असतेस, अभ्यास करतेस, कंटाळा करत नाहीस, तेव्हा मात्र तू चँपियन असतेस! आणि हो, तू आता हळु हळु बुद्धीबळामध्येही चँपियन होते आहेस. फक्त तुला ते रोज खेळत राहावं लागेल. आपण रोज करत गेलो तर आपण कोणतीही गोष्ट नीट करू शकतो! फक्त बुद्धीबळाच्या बाबतीमध्ये एक अडचण अशी आहे की, ते खेळताना मला खूप वेटलिफ्टिंगही करावं लागतं! त्याशिवाय का मला ते हत्ती- घोडे- उंट- माणसं उचलता येतातत! तुला आणि आजूला काय, एक हॅरी पॉटरचा स्पेल टाकला की ते हलके होतात!
लड़कियों, कान खोल कर सुन लो!
तेव्हा पाबई अशा गमती आहेत ह्या वर्षातल्या. आपण सावरकर नावाचा चित्रपटही बघितला होता. तुला नंतर त्यांची "सागरास" कविता लिहून दिली व त्याचा अर्थ सांगितला होता पाहा. मला ही कविता बरीचशी पाठ आहे, हे बघून तुला किती आश्चर्य वाटलं होतं! आपण पुढेही अशा अनेक गोष्टी करणार आहोत. मला अशी खूप गमतीची पुस्तकं तुला सांगायची आहेत. वेगवेगळ्या गमती दाखवायच्या आहेत. पण त्यासाठी तुझीही तयारी हवी ना. मी काही सांगितलं की लगेच नाही नाही म्हणायचंस. मला निनू- निनो म्हणता म्हणता तू "नो नो" म्हणायला लागतेस! मग काय. त्या जेलरसारखं नो, नो नो म्हणतेस! हम अंग्रेज के जमाने की किताबें पढ़नेवाले लोग हैं, हमारे घर में पढ़ने का आलस! तुला कंटाळा करून चालणारच नाही. जसं ते बोक्या सातबंडेचं पुस्तक. ते तू एकच वाचलंस. तेही उडत उडत. नीट वाचलंस आणि सगळे पुस्तकं वाचलेस तर गंमत छान कळेल. जास्त मजा वाटेल. आणि जेवढं जास्त वाचशील, तेवढं लवकर समजेल, तेवढं चांगलं लिहीता येईल. चुकाही होणार नाहीत. नो नो नो! तो लड़कियों, कान खोल कर सुन लो!
"दादा, तुझं नाव काय?"
तुझ्या बाबतीमध्ये घडलेला आणखी एक विशेष प्रसंग! तुझ्या गाण्याच्या क्लासमध्येही तेच झालं आणि अजून एका ठिकाणीसुद्धा. तिथे तर तुला छोटी मुलं दादाच म्हणत होते! तू नाव सांगितलं तर लोकांना अद्वैत ऐकू जात होतं! चांगलंच आहे. तुला कळलं पाहिजे की, वृक्षतोड किती भीषण समस्या आहे. ह्या अद्वैत नावाच्या मिलिटरी कॅडेटशी खेळताना मला माझी ती गोडूली- कुक्कुली अदूच आठवते! तिच्या दोन वेण्या होत्या! ती अजिबात मला त्रास देत नव्हती. आणि हा दुष्ट कॅडेट! सारखा माझ्याशी भांडतो! मग काय.
तर पाबई, अशी खूप गंमत आपण केली. मागच्या वर्षी तुझं फ्रॅक्चर झालं होतं, ह्यावर्षी माझं! ह्यावर्षी आपण नागपूरला अदिती आत्याच्या लग्नासाठी गेलो होतो. नंतर तू, आई व आजी- आजोबा स्टॅच्यू ऑफ युनिटीलाही गेला होतात. माझी तेव्हा जरा वेगळ्या प्रकारची म्हणजे जुलाबाची हाफ मॅरेथॉन झाल्याने मला काही जमलं नव्हतं. शिवाय तुला तो गिनीपिग प्राणीही भेटला पाहा. अजूनही खूप गोष्टी आहेत! आपल्या ॲलेक्सवर तर पुस्तक लिहीता येईल इतक्या गमती आहेत. आणि तुझं ते जनरल नॉलेजचं ऑलंपियाड- अगला प्रश्न पचास हजार रूपयों के लिए ये रहा! किती मजा येते ना असा अभ्यास करताना! अशी आता तू खूप मोठी म्हणजे डबल डिजिटवाली झाली आहेस! तेव्हा माझ्या पत्राला मोठं उत्तर नक्की दे. तू काही झालं की म्हणतेस तसं पाच करोड ऐंशी हजार शब्दांमध्ये लिहून उत्तर दे!
- तुझा निनू
- निरंजन वेलणकर दि. १७ सप्टेंबर २०२४.
(वाचल्याबद्दल धन्यवाद! जवळच्यांसोबत शेअर करू शकता. 09422108376 फिटनेस, ध्यान, आकाश दर्शन, मुलांचे ज्ञान- रंजन सेशन्स आयोजन)