२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग १
भाग २ व ३
भाग ४ व ५
भाग ६ व ७
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ८
आपल्या केबिनच्या आत जात असतानाच त्याने ऑफिस बॉय प्रकाश ला ऑफिसमध्ये आज आलेले सगळे न्यूज पेपर्स गोळा करून आणायला सांगितले. बावचळलेला प्रकाश देखील थोडा धडपडतच सगळे न्यूज पेपर गोळा करू लागला.
'सर, आणू का ग्रीन टी?' न्यूज पेपर्स कबीर समोर टेबलवर ठेवत प्रकाश ने रोजचा प्रश्न विचारला.
'ग्रीन टी...नाही नको, काही नको आणि मी सांगेपर्यंत कोणाला आत नको पाठवुस?' कबिरने हुकूम सोडला.
प्रकाश देखील मान हलवून निघणार होता पण थोडा थांबला.
कबिरने हे स्वतंत्र ऑफिस काढण्याआधी तो स्वतः जिथे असिस्टंट म्हणून काम करत होता त्याच कंपनीत प्रकाश देखील होता. समवयस्क असल्याने त्याची आणि कबिरची चांगलीच ओळख आणि त्यामानाने एकमेकांच्या पदाचं भान राखून मैत्री देखील झालेली. कबीर स्वतंत्र ऑफिस सुरू करणार माहीत झाल्यावर प्रकाशने स्वखर्चाने बाकीच्यांना पेढे वाटलेले. कबिरनेही त्याला स्वतःच्या ऑफिसातला पहिला कर्मचारी होण्याचा मान दिला. जरी तो इतरांसाठी ऑफिस बॉय, पिउन किंवा मामा असला आणि कबीर जरी इतरांसाठी सर किंवा बॉस असला तरी खाजगीत ते दोघे एकमेकांना एकेरीत बोलायचे. प्रकाश ला यात कबिरचा मोठेपणा वाटायचा पण कबिरला मात्र ते नॉर्मल वाटायचं. कबीरनेच एक दोनदा प्रकाशला सर म्हणत असताना हटकलं पण प्रकाश म्हणायचा 'नको, मी तुम्हाला सरच म्हणत जाईल.' मग शेवटी एकट्यात एकेरी बोलायचा दोघांत करार झाला.
गेल्या काही दिवसांपासून कबीर थोडं वेगळं वागत असल्याचं प्रकाश च्या ही लक्षात आलेलं, आणि आज तर कबीर सर्वांत आधी आला शिवाय कदही न्हवे ते सगळे न्यूज पेपर्स गोळा करून आणायला सांगितले आणि त्याच्या आवडीच्या ग्रीन टी ला ही नकार दिला म्हणून न राहवून त्याने केबिनमध्येच घुटमळत शेवटी एकदा कबीर ला विचारलंच 'काही प्रॉब्लेम आहे का? नाही म्हणजे टेन्शन चेहऱ्यावर दिसतंय म्हणून विचारलं.' आपलं टेन्शन आपल्या चेहऱ्यावर फक्त आपल्यालाच दिसतं हा कबिरचा गैरसमज चटकन दूर झाला. प्रकाश सारख्या साध्या शिपायाला देखील कळू लागलंय म्हंटल्यावर काहितरी केलं पाहिजे नाहीतर क्लाइन्ट्स देखील जातील, कर्मचारी जॉब सिक्युरिटी ची भीती बाळगतील. आपली पर्सनल लाईफ आपल्या प्रोफेशनल लाईफ वर परीनाम पाडेल, असले सगळे नकारात्मक विचार क्षणार्धात कबिरच्या डोक्यात आले आणी स्वतः ला सावरत चेहऱ्यावर खूप मेहेनतीने हसू आणत कबीर बोलला 'अहो प्रकाश सर तसलं काही नाही. एकदम व्यवस्थित चाललंय. ते फक्त स्टॉक मार्केट पडतंय की काय त्याच्या बातम्या वाचण्यासाठी पेपर्स मागावले. जा पटकन ग्रीन टी आन जा.' प्रकाश ला देखील ते पटलं असावं कारण तो एकदम हुरूप आल्यासारखा खुश चेहेऱ्याने केबिन बाहेर पडला. कबिरने यापुढे इतरांशी कसं वागावं हे स्वतःला समजावून सांगितलं आणि पुन्हा त्या न्यूज पेपर मध्ये डोकं घातलं. सर्व न्यूजपेपर मध्ये एक सारख्याच मथळ्याच्या बातम्या 'खोपोली, कर्जत, खंडाळा परिसरात सिरीयल किलर. आतापर्यंत तीन कुजलेले मृतदेह सापडले. हत्या करण्याची पध्दत एकसारखी; चाकूने हत्या केल्यानंतर दगडाने ठेचून मृतदेह दरीत ढकलले. हत्यारा कोणीतरी माथेफिरू असून लौकर च त्याला पकडण्यात येईल असे गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी, इन्स्पेक्टर लोकेश मोरे यांनी आश्वासन दिले.'
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ९
आतापर्यंत भेटलेल्या तिन्ही मृतदेहांची पोलिसी कागदपत्र टेबलावर ठेऊन लोकेश त्यातली एक एक कागद, फोटो व्यवस्थित पाहत बसलेला. फोटोंवरून स्पष्ट दिसत होतं की चेहरा पूर्णपणे दगडाने ठेचलेला होता जेणेकरून ओळख पटू नये. निर्वस्त्र शरीर हा आणखीन एक अडथळा होताच. आणि गेल्या काही दिवसातल्या मिसिंग कम्प्लेन्ट्स च्या फाईली देखील चाळून पाहिल्या पण त्यात ही काही लिंक लागेना.
फोटो, कागदपत्र सारखे सारखे बघणे, चहा पिणे, पुनः ते फोटो, कागदपत्र, अशा कितीतरी फेऱ्या झाल्या पण हाती काहीच न लागल्याने लोकेश ने थोडा ब्रेक घ्यायचा ठरवला.
खुर्चीतच थोडं रेलून बसलेला लोकेश सकाळ पासून घेतलेल्या सर्व मिटींग्स आणि सिनियर्सच्या ऑर्डर्स आठवू लागला. घर सोडल्या पासून आतापर्यंत काय काय केलं याचा आढावा घेणं ही सवय किंवा छंद लोकेश ला कॉलेज मध्ये असल्यापासून च जडला. याच सवयीचा पुढे पोलीस प्रशिक्षणात त्याला उपयोग झाला आणि पुढे आपल्या विभागात सर्वोत्कृष्ट कामगिरी करण्यात देखील. आजवर हाती आलेलं प्रत्येक प्रकरण त्याने निकाली लावलेलं आणि कदाचित म्हणूनच हे इतकं किचकट प्रकरण त्याच्या वाट्याला आलं. पहिले दोन मृतदेह भेटेपर्यंत पोलिसांनि केस हाताळली पण तिसरा मृतदेह पोलिसांना भेटला आणि केस गुन्हे अन्वेषण विभागाकडे इन्स्पेक्टर लोकेश मोरे च्या टेबलवर पोहोचली.
'सर, चहा आणू का अजून?' लोकेश ला तंद्रीतून बाहेर काढत चहावाल्या पोऱ्याने प्रश्न केला. लोकेश ने एकदा त्याच्याकडे पाहिलं आणि पुनः डोळे बंद करून चहासाठी होकारार्थी इशारा दिला. पोऱ्या दारातून बाहेर जात असताच त्याला दारात अडवून लोकेश चे सहकारी सब इन्स्पेक्टर अभिजित जाधव आत आला. पोऱ्याला 'चहा नको आणूस, असं ही त्याने येताना सांगितलं.
अभिजित : 'सर, आता चहा कुठे घेताय?'
लोकेश : 'म्हणजे?'
अभिजित : 'नाही...म्हणजे, चहा घेण्याऐवजी जेऊया. वेळ तरी बघा.'
अभिजित चं वाक्य संपताच लोकेश ने पटकन डोळे उघडले. एक दोन सेकंद अभिजीत कडे पाहिलं आणि पुन्हा टेबलावर च्या फाईल्स उघडून आधाश्या सारखा काहीतरी शोधू लागला.
क्रमशः