रहस्यकथा भाग ६ व ७

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
26 Jan 2024 - 2:13 pm

२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग १
भाग २ व ३
रहस्यकथा भाग ४ व ५
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ६

ह्यावेळेस ते प्रेत, ते शरीर स्त्रीचं होतं. चेहेरा ओळखू येणार नाही याची खात्री करून कबीर बाकीच्या कामी लागला. प्रेत दरीत ढकलून तो कारमध्ये येऊन बसला.
त्याची पद्धत ठरलेली होती. चेहेरा ओळखू येणार नाही असा करायचा. निर्वस्त्र करायचं म्हणजे लौकर ओळख पटणार नाही. कपडे आणि कपड्यात ओळखीचे काही कागदपत्रे असलीच तर ते सगळे जाळायचे पण वेग वेगळ्या ठिकाणी. आणि प्रेत पुरायचं नाही तर ते खोल दरीत फेकायचं जेणेकरून ते भेटायला वेळ लागेल. प्रेत भेटेपर्यंत ते कुजलेलं असायचं शिवाय ओळख पटण्यासारखे काहीच पुरावे हाती न लागल्याने चौकशी व पुढचे सरकारी पोलिसी सोपस्कार पार पडायला आणखी उशीर, असा एकंदर अंदाज बांधून कबीर हे पार पाडायचा.
याही वेळेस त्याने पर्स आणि आणि त्यातले किरकोळ कागदपत्र, आतल्या पैशांसहित पेटवले. ते पूर्ण जळेपर्यंत तो कारमध्ये बसून पाहत होता. डोळ्यांवर झोप अनावर झालेली तरीही त्याला हे करणं भाग होतं आणि तो देखील ते निमुटपणे करत होता. पुरुष असल्यास कबिरला जास्त सोपं जायचं पण स्त्रीचं शरीर असल्यावर बाकी काही नाही तरीही कपडे संपवणे मोठं अवघड काम वाटे.
ठरलेल्या ठिकाणी त्याने कपडेही पेटवले आणि पूर्ण जळेपर्यंत याही ठिकाणी थांबला. डोळ्यासमोर जवळजवळ अंधारी येऊ लागली होती.
उत्तराला हॉस्पिटल मधून आणून एक आठवडा झाला होता. दोन दिवस तिच्यासोबत घालवून जड मनानेच माया कबिरसोबत खंडाळ्याला आली. उत्तरा चा विचार करतच कबिरने गाडी कम्पाउंड च्या आत घेतली. गॅरेज मधून आत जाणारं दार त्याने स्वतः कडच्या चाविने उघडले. स्वतःचे हाथ, कपडे व्यवस्थित न्याहाळत तो बाथरूम कडे गेला. कपडे चेंज केले. पहाटेची किरणं अजून पडली न्हवती इतक्यात तो बेडवर पडला आणि लगेच झोपी गेला. माया हे सगळं ओल्या डोळ्यांनी बघत होती.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

भाग ७

सकाळ नेहेमीचीच होती. माया तिच्या वेळेवर उठली. घर आवरत होती, कबीरला ऑफिस ला जाताना जे जे लागतं ते ते व्यवस्थित जागच्या जागी आहे की नाही पाहात होती.
अलार्मच्या खणखणी सोबत कबीर ने अंथरून सोडलं. अंघोळ वगैरे उरकून तो टेबलवर सकाळच्या नाश्त्याची वाट पाहत आणि हातातला न्यूज पेपर वाचत बसला.
एव्हाना वैशाली देखील आली, आणि आत येताच ती किचनमध्ये दाखल झाली. वैशाली ला कामावर ठेवताना तिची मुलाखत, चौकशी वगैरे सोपस्कार माया नेच पार पाडले. वैशाली तसेच आणखी एक घरगडी दिनकर, प्रशस्त गार्डन साठी माळी-माळीणी ची जोडी संगीता आणि देवपाल आणि घरातली पडेल ती जड कामं करण्यासाठी सदानंद मामा नावाचा एक गडी या सर्वांची नेमणूक मायानेच केली त्यात कबिरने कोण, कशासाठी, किती पगार वगैरे काही विचारलं नाही तो त्यात पडला ही नाही. फक्त गेटवरचे रात्र आणि दिवस पाळीतले दोन्ही वॉचमन मात्र कबिरच नेमायचा. हो नेमायचा आणि दर १५-२० दिवसांनी ते बदलले जायचे. त्याने तसा करारच वॉचमन पुरवणाऱ्या एजन्सी बरोबर केलेला. नेमल्या जाणाऱ्यांचे इंटरव्ह्यू वगैरे तो बाहेरच कुठे तरी घ्यायचा. मायादेखील हे असं का हे विचारण्याच्या फंदात पडली नाही. वॉचमन वगळता बाकी सर्वांवर मात्र पूर्ण ताबा मायाचाच होता. कबीर ला सगळे सर म्हणायचे पण माया ला मात्र ताईच म्हणायचे.
'ताई, वटवाघूळं बदलली बरका!' वैशाली डोळे मिचकावत मायाला सांगू लागली.
'वटवाघूळं काय म्हणतेस गं? वॉचमन आहेत ते. माणसंच आहेत ना? की तुझ्या सरांनी खरंच वटवाघूळं भरली ह्या वेळेस?' असं बोलून माया स्वतःच हसू लागली आणि बेफाम हसायला नुसतं कारण लागणारी वैशाली तर स्वतःच्या तोंडावर हात ठेऊन गडबड लोळायची तेवढी बाकी राहिली.
'बरं जा, जा तुझ्या सरांना पटकन हा नाश्ता दे नाहीतर चिडतील खूप ते.' स्वतः ला सावरत तिने वैशालीला ऑर्डर सोडली तशी वैशालीदेखील हातात ट्रे घेऊन किचन बाहेर पडली. ती गेली आणि तशीच परत आली. हातातला ट्रे देखील तसाच. माया ला काही समजलंच नाही. तिची प्रश्नार्थक मुद्रा पाहून वैशाली ने सांगितलं, 'ताई सर तर गेले.'
'अगं, असा कसा कबीर जाईल?' म्हणत माया बाहेर टेबल जवळ आली तर खरंच कबीर न्हवता.
'आवो ताई, सरांची गाडी जाताना बी पायली मी. ते बगा बॅग पण नाही सरांची.' कबिरची ब्रिफकेस ठेवायच्या जागी बोट दाखवत वैशालीने सांगितलं.
ब्रिफ केस नसल्याचं माया च्या लक्षात तर आलंच पण रोजच्या पेक्षा निराळं म्हणजे आज कबीरने फक्त ब्रिफ केसच ऑफिसला नाही नेली तर न्यूजपेपर देखील टेबलवर न ठेवता नेला.

क्रमशः

कथा