रहस्यकथा भाग ४ व ५

म्हया बिलंदर's picture
म्हया बिलंदर in जनातलं, मनातलं
24 Jan 2024 - 1:28 pm

२०१८ च्या सुरुवातीला सुचलेली आणि त्याचवेळी लिहलेली हि कथा. छोटे छोटेच भाग लिहिले होते. मिपावरचं इतर दर्जेदार लिखाण पाहता हा प्रयत्न तसा बालिशच म्हणावा लागेल. सध्यातरी वेळेच्या कमतरतेमुळे कथेत जास्त बदल न करता आहे तशी इथे देत आहे. पूर्ण कथा एकदाच दिली तर कदाचित प्रचंड मोठी होईल (असे मला वाटते) म्हणून वेळ मिळेल तसे भाग इथे देत राहीन. याही कथेला नाव सुचलेलं नाही. सूचनांचं स्वागतच.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
रहस्यकथा भाग १
रहस्यकथा भाग २ व ३
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ४

पोलीस आत येताहेत हे समजताच माया वळून मागे बघेपर्यंत कबीर बाथरूम मध्ये शिरला आणि त्याने शॉवर सुरू केला. शॉवर खाली उभा राहून आलेल्या या संकटाला कसं सामोरं जायचं याचाच तो विचार करत होता. आज न उद्या पोलिसांची गाठ भेट होणार हे त्याला माहीत होतच. तरीही एखाद्या गोष्टीचा अंदाज असणे आणि प्रत्यक्ष त्याला सामोरे जाणं यात खूप फरक असतो आणि तो फरक कबीर आता प्रत्यक्ष अनुभवत होता.
शॉवर खाली उभा राहूनही बराच वेळ गेला, मायाने ही तीनदा हाक मारली, कामावरही जायचं आहे, शेवटी नाईलाजाने कबिरने बाथरूम बाहेर पाऊल ठेवलंच. बाथरोब गुंडाळून तसाच तो हॉल मध्ये आला तर माया, सोफ्यावर बसून समोर बसलेल्या पोलीस ऑफिसरशी गप्पा मारत होती. कबीर ला पाहून त्या ऑफिसरने हाथ पुढे केला, 'कबीर हा लोकेश. माझा कॉलेज फ्रेंड. कॉलेज नंतर आज भेट होतेय बघना आमची. त्याची इथेच आपल्या विभागात च बदली झालीय म्हणे.' असे बोलत बोलतच माया किचनमध्ये शिरली.
"हॅलो मिस्टर कबीर."
"अं..हॅलो मिस्टर...आय मीन इन्स्पेक्टर लोकेश" कबीर कसाबसा बोलला.
"सर, मी तुम्हाला कॉलेज पासून ओळखतो. तुम्ही टॉपर असायचे...."
लोकेश ला मधेच थांबवत कबीरने थोडं चाचरतच विचारलं "तुम्ही इथे कसे? म्हणजे आमच्या घरी आय मिन या परिसरात...कसे काय?"
"हो हो इथे ना इथे एका केस संदर्भात च निघालो होतो तर तेवढ्यात माझ्या बहिणीचा उमा चा फोन आला आणि तिच्याशी बोलल्यावर समजलं की माया तिच्या फॅमिलीसोबत इथे राहते. तिनेच पत्ता दिला म्हणून सहज भेटायला आलो." लोकेश चं बोलणं सुरू होतंच तोपर्यंत माया चाहा आणि बिस्किटे घेऊन आली. चहा पान होऊन लोकेश जाईपर्यंत कबीर अस्वस्थ च होता. कदाचित लोकेश ला ही ते लक्षात आलं म्हणून की काय त्यानेही काढता पाय घेतला आणि औपचारिक तेवढं बोलून निघून गेला.
एक सुस्कारा टाकून कबीर बेडरूममध्ये गेला आणि ऑफिस ला जाण्यासाठी तयारी करू लागला. एव्हाना मोलकरीण, वैशाली देखील आली होती. वैशाली सोबत माया घर आवरत असतांना फोन खणाणला. इथे ब्रिफकेस भरत असताना कबिरचं ही फोन च्या रिंगवर लक्ष होतंच. तिसऱ्या रिंगला मायाने फोन उचलला आणि जोरात किंचाळली 'कबीऽऽऽऽर'.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
भाग ५

हॉस्पिटलमध्ये पळत जाऊन माया आणि कबीर दोघेही थेट रूम नं १०५ मध्ये पोचले जिथे, उत्तरा ला ऍडमिट केलं होतं. ह्या दोघांचा जीव कंठाशी आलेला तर उत्तरा मात्र उजव्या हाताचं प्लास्टर न्याहाळत आरामात बसलेली. डॉ देखील तिथेच होते. दोघांना पाहून डॉ म्हणाले, "काळजी चं काही कारण नाही. तुमची मुलगी सुपर गर्ल आहे बघा अजिबात रडत नाही. साधं फ्रॅक्चर आहे, ३-४ आठवड्यात बरी होईल."

सकाळी शाळेत जाण्यासाठी उत्तरा आजोबांबरोबर खाली आली आणि स्कुल बस सुटू नये म्हणून रोजच्या सारखी धावू लागली. पायात घुटमळून पडली ते नेमकी पायऱ्यांवर. गुडघ्याला थोडं खरचटलं पण उजव्या हाताला फ्रॅक्चर झालं. काही कळायच्या आत कबीर च्या बाबांनी समोर आलेल्या तिच्याच स्कुलबस मधून जवळच्या हॉस्पिटलमध्ये तिला आधी डॉ च्या हवाली केलं आणि पहिला फोन कबिरच्या घरी केला. तो नेमका मायाने उचलला आणि किंचाळली.
कबीर बाकीच्या फॉर्मलिटी करत काउंटरवर उभा होता. डॉ कबिरला आणि त्याच्या आई वडिलांना ओळखत असल्याने कशाचाही विलंब न करता आधी त्यांनी उपचार सुरू केले. दरम्यान राहिलेले कागदपत्र कबीर सवयीप्रमाणे वाचून भरत होता. थोडं सावरल्यावर माया देखील त्याच्या शेजारी आली.
माया : "कबीर, आपण पिलू ला घेऊन जाऊ आपल्याकडे."
कबीर : "पुण्यात तिच्या शिक्षणाची योग्य व्यवस्था होईल."
माया : "मग आपण पुण्यात येऊन राहूया आई बाबांसोबत."
कबीर : "याविषयी आधीच आपलं ठरलेलं आहे, आणि आपलं ठरल्याप्रमाणे आपण खंडाळ्यात राहतोय."
माया : "आपलं नाही तुझं. हे बघ कबीर तुझं काय ठरलं असेल ते असो पिलू ला सोडून राहणं अशक्य आहे. अरे पोटची पोर आहे ती माझी..."
"आणि माझी...माझी कोणी नाही का?" लालबुंद डोळ्यांनी कबिरने विचारलं.
"मग असा का रे वागतोयस? का हा त्रास आपल्या तिघांनाही? राहूया ना एकत्र." काउंटरवरच रडत रडत माया बोलत होती. आसपास बघे जमू लागले होते. कबिरचे बाबा देखील तिथे आलेले कबिरने त्यांना इशाऱ्याने माया ला आत न्यायला सांगितलं. कबीर राहिलेले फॉर्म्स भरत होता खरा आणि त्याच्या नकळतही दोन थेंब आसवं त्या पेपर्सवर पडलेच.

क्रमशः

कथा

प्रतिक्रिया

उत्सुकता टिकवण्यात कथा यशस्वी होते आहे. फारच छोटे छोटे भाग असल्याने चांगल्या कथेतली मजा कमी होत आहे. सलग लिहून तयार आहे असे प्रास्ताविकावरून वाटते आहे. तसे असेल तर एकदम सलगच टाकावी असे सुचवावेसे वाटते. किमान दोनच मोठे भाग इतपत विभागणी जास्त चांगली ठरेल असे वाटते.

कर्नलतपस्वी's picture

24 Jan 2024 - 8:54 pm | कर्नलतपस्वी

गवीभौंशी सहमत.

nutanm's picture

25 Jan 2024 - 1:00 am | nutanm

ग वी भाऊंशी सहमत.. रहास्यकथेचा उलगडा ताबडतोब झाला पूर्ण कथा दिलेली असेल तर छान मजा येते आपल्या नाशीही उलगडून ठेवून ताडता येऊन बरोबर निघाल्यास i चांगली छान व मस्त कठीण असे वाटून रहस्यकथेची मजा घेता येते. वभीती, छान वाटणे, वेगळेच जग अनुभवने यां गोष्टी तर होतात छान रहस्यकथा असेल तर. पण रहस्य कथेला लिंक लागली पाहिजे व ती एकदमच लिहिलेली छान. म्हणजे लिंक न तूटता वाचून होते व मजाही येते. पण एक समंध नसेल तर तिची लिंक तुटून त्यातील उत्सुकता जाते, bhiti kiva rahasyachi एकटाणता तुटते व मजा जाते.

आपल्या नाशीही नाहीं आपल्या मनाशी

एक समंध नाहीं एक संबंध म्हणायचेय.