सशस्त्र क्रांति / लढ्याच्या मर्यादा.

कलंत्री's picture
कलंत्री in जनातलं, मनातलं
19 Dec 2008 - 10:31 pm

मिपावर सशस्त्र क्रांतिकारकांच्या लढ्याबद्दल नियमित लेख प्रसिद्ध होत असतात. याचा एक अर्थ सरळ सरळ असा आहे की भारताच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी क्रांतिकारकाचे भरीव योगदान आहे. दुसरा अर्थ असाही आहे की भारतीय जनमाणसाला क्रांतिकारकाचे अप्रुप वाटत असले तरी तत्कालिन राजकारणातील मुख्यलढ्याच्या समोर हा लढा तसा निष्प्रभ ठरत होता.

पुढील विवेचन करण्याअगोदर काही स्पष्टीकरण देणे आवश्यक आहे. एकतर भारतातील एकंदरीतच सर्वच स्वातंत्र्य सेनानी आदर्शवादाने भारावलेले होते, त्यांचे मनोबल उच्चदर्जाचे होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांचे वर्तन, चरित्र हे निष्कंलक होते. अशा सर्वच सशस्त्र अथवा निशस्त्र सेनानीचे व्यक्तिमत्व अतिशय धवल आणि प्रेरणा देणारे होते.

स्वातंत्र्य लढ्यात आपल्या विषयाच्या शीर्षकाप्रमाणे सशस्त्र क्रांतीच्या बद्दल खालील प्रवाह आढळतात. ( १९०० ते १९४७पर्यंत).

१. सावरकरांच्या नेतृत्वाखालील असणारे क्रांतिकारक.
२. भगतसिंगाच्या प्रेरणेतून साकारलेले क्रांतिकारक.
३. सुभाषचंद्र बोसबाबुच्या नेतृत्वखाली लढले गेलेले आझाद हिंद सेनेचे संग्राम.
४. तुरळ्क होत असणारे तुरळक सशस्त्र क्रांतिच्या घटना.

( माझा अभ्यास तसा याबाबतीत मर्यादित असल्याकारणे चुभुदेघे आणि लेखात भर टाकणे.).

आता या लढ्याच्या काय मर्यादा होत्या याबाबतीत माझे मत.

१. सशस्त्र / निशस्त्र क्रांतिसाठी असलेल्या नेत्यांची आवश्यकता. दुदैवाने मोठी खेळी करु शकंणारा नेता सशस्त्र क्रांतिसाठी मिळाला नाही. भगतसिंगांना तरुणवयातच फासावर जावे लागले. सावरकर यांचीही कारकिर्द ही दोन जन्मठेपेनंतर राजकिय दृष्ट्या निष्क्रिय ठरली. सुभाषचंद्रांच्या प्रेरणा या महासभेतील ( काँग्रेस) असल्यामुळे त्यांनी निरुपाय म्हणून या लढ्याकडे पाहिले असे माझे मत आहे.
२. गुप्ततेची पराकोटीची आवश्यकता. : अनेक वेळेस अश्या क्रांकिकारकांचे सर्वच प्रयत्न स्वातंत्र्य लढ्याच्या सशस्त्र क्रांतिच्या अनिवार्यतेपेक्षा कट - कारस्थान रचण्यात जाऊ लागले. बरे असा कट - प्रसंग अंतिम टप्प्यात येण्याअगोदरच फंदफितुरी होण्याची शक्यता असे. सर्वच प्रयत्न अशा मुळे वाया जात असत. ( अवांतर : निशस्त्र लढ्यात या लढ्याचे नेतेच प्रचंड फितुर होते. आपल्या चळवळीची माहिती ते स्वताच ब्रिटिशाना देत असत. उदा दांडी, चंपारण्य, चलेजाव याची माहिती ब्रिटिशांना तेच देत असत. किती सत्याग्रही, कोठे, कधी आणि का ही माहिती पुरवत असत, इतके कमी आहे का ते तुरुंगात जाण्यासाठीही तयार असत, लाठी - गोळ्या खाण्यासाठीही तयार असत, त्यामुळे ब्रिटिशांना काय करावे हेच समजत नसे, अरेरे बिचारे सत्याग्रही.... )
३. आहे त्या यंत्रणा नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न : अनेकवेळेस आगगाडी उडविणे, कोषागार लुटणे, एखाद्या दुसर्‍या आधिकार्‍याला मारणे येथपर्यंतच क्रांतिची व्याप्ति असे. नकळतच एक राष्ट्र म्हणून उभारणीसाठी लागणार्‍या गोष्टी नकळतच नष्ट होत असत.
४. निष्पाप जनतेला अशा कृत्याची झळ बसणे : अशा काही गोष्टी घडल्यानंतर निष्पाप जनतेला याची ( पोलीसी कारवाईची )झळ बसत असे. माझ्यामते सर्वसामान्यांना क्रांतिकारकांच्या लढ्यात येण्यासाठी या मुळेही अटकाव होत असावा.
५. पकडले गेल्यानंतर नेत्याची उणीव भासणे : एखादा नेता पकडला गेल्यानंतर सशस्त्र लढा हा नेत्याअभावी परत उभारी घेत नसे, चळवळ भरकटण्याची शक्यता असे.
६. क्रांतिकारकात आणि सामान्यजनात दरी असणे. : क्रांति ही गोष्ट सर्वसामान्यांना आपल्या आवाक्याच्या पलिकडे वाटत असे. दुसरे असे की लढ्यासाठी पिस्तुले, बॉब्म इत्यादीची आवश्यकता असणे. ही शस्त्रे आणणे हे सर्वसामान्याच्या आवाक्यात नसे.
७. मतांतर, विचारमांडण्यासाठी स्वातंत्र्य नसणे : नेता म्हणेल तशीच कृती करणे. सर्वसामान्यांना यामध्ये कितपत सक्रियता वाटत असावी?
८. अयोग्य लोकाच्या हाती चळवळ जाणे : ( भारतीय लढ्यात हा मुद्दा गैरलागु आहे) समजा एखाद्या अंहकारी, हुकुमशहाच्या हाती अशी चळवळ गेली तर काय झाले असते? ( उदा. प्रभाकरणने आपल्या विरोधकाचा सरळसरळ काटा काढला होता.) गट-गटात चळवळ विभागली जाऊन अंतर्गत हिंसा निर्माण होणे.
९ लोकसहभाग नसणे : लोकसहभाग नसल्यामुळे समजा अश्या क्रांतिलढ्यामुळे स्वातंत्र्य मिळालेही असते तर राज्य चालविण्यासाठी लोक कोठुन आले असते?
१० विधायक भाग नसणे : मारणे / वध करणे यापेक्षाही राष्ट्र वेगळ्यापद्धतीने उभारले जात असते. उदा. दारुबंदी, खादी, अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषा निर्माण, स्वदेशी इत्यादी.

माझ्या मते मिपाकरांनी या सर्वबाबीचा विचार करावा.

जीवनमानराजकारणसंदर्भशिफारस

प्रतिक्रिया

घाटावरचे भट's picture

20 Dec 2008 - 1:30 am | घाटावरचे भट

कलंत्री साहेब, तुम्ही 'सशस्त्र क्रांती' या विचाराच्या मर्यादांबद्दल म्हणताय की त्याच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या इंप्लिमेंटेशनबद्दल म्हणताय? विचाराबद्दल म्हणत असाल तर वरील एकही मुद्दा लागू होत नाही. वरील सर्व मुद्दे सशस्त्र क्रांतीच्या भारतीय स्वातंत्र्यलढ्यातल्या इंप्लिमेंटेशनबद्दल किंवा त्यातील त्रुटींवर भाष्य करणारे आहेत.

मी क्रांति अथवा असे लढे यशस्वी का होऊ शकत नाही याबद्दल हे लिहिलेले आहे. जनतेचा व्यापक आणि सक्रिय सहभाग मिळवण्यात असे लढे का अपयशी ठरतात या दृष्टीकोनातून या लेखाचा विचार करावा.

विनायक प्रभू's picture

20 Dec 2008 - 1:57 pm | विनायक प्रभू

काय सांगताय काय?
माझा मामा ब्रिटीशांचा तुरंग फोडुन पळाला तेंव्हा त्याला जनतेच्या व्यापक आणि सक्रिय सहभागाची पर्वा नव्हती. आणि त्या सहभागा अभावी त्याने दिलेला लढा अपयशी ठरला असे त्याला कधीच वाटले नाही.

धम्मकलाडू's picture

20 Dec 2008 - 6:35 pm | धम्मकलाडू

माझा मामा ब्रिटीशांचा तुरंग फोडुन पळाला तेंव्हा त्याला जनतेच्या व्यापक आणि सक्रिय सहभागाची पर्वा नव्हती.

ब्रिटिशांचा तुरंग म्हणजे घोडा फोडुन पळाला. अरे वा! क्रांतीकारी होते की मामा की गांधीवादी?

"तुझं वाचन किती? तू बोलतोयस किती?"
"तुझा पगार किती? तू बोलतोयस किती?"

झुमाक्ष's picture

6 Jan 2009 - 9:20 pm | झुमाक्ष (not verified)

ब्रिटिशांचा तुरंग म्हणजे घोडा फोडुन पळाला.

ट्रोजन हॉर्स असावा.

- झुरळ मारणारा क्षत्रिय.

विसोबा खेचर's picture

20 Dec 2008 - 4:26 pm | विसोबा खेचर

ज्यांनी सशस्त्र क्रांती करायची होती ती त्यांनी केली अन् जिवाची पर्वा न करता फासावर गेले..

आणि तुम्हीआम्ही मात्र आता तिच्या मर्यादांबद्दल वगैरे बोलत बसलो आहोत!

खूपच सोपे आहे हे! चालू द्या..!

तात्या.

एकलव्य's picture

20 Dec 2008 - 5:57 pm | एकलव्य

कलंत्रीकाका - आपले बहुतेक सारे मुद्दे भंपक आहेत.

असो... केवळ मताची पिंक टाकून निघून जाण्याचा हेतू नाही पण काही लिहावे असेही नाही. तरीही मत दिलेच आहे तर भंपकपणा का वाटला हे सोमवारी थोडक्यात मांडेन.

एकलव्य

कलंत्री's picture

20 Dec 2008 - 6:06 pm | कलंत्री

आपले मत-मतांतरे वाचण्यासाठी समजुन घेण्यासाठी मला नक्कीच आवडेल.

मी काही कालासाठी सुट्टीवर असल्यामुळे माझ्याकडुन प्रतिसाद देण्यासाठी वेळ लागु शकतो.

कलंत्री's picture

6 Jan 2009 - 8:55 pm | कलंत्री

श्री. एकलव्य,

आपला प्रतिसाद अपेक्षित आहे अन्यथा आपण आपला आरोप ( भंपकपणाचा) मागे घ्यावा.

आपला,

कलंत्री काका

एकलव्य's picture

6 Jan 2009 - 9:30 pm | एकलव्य

काका - भंपकपणाचा आरोप तूर्तास मागे... प्रतिसाद मात्र नक्की देईन. कधी ते सांगणे अवघड आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती's picture

20 Dec 2008 - 6:10 pm | ३_१४ विक्षिप्त अदिती

७. मतांतर, विचारमांडण्यासाठी स्वातंत्र्य नसणे : नेता म्हणेल तशीच कृती करणे. सर्वसामान्यांना यामध्ये कितपत सक्रियता वाटत असावी?
नेता म्हणेल तशीच कृती हे तर गांधीजींच्या बाबतीतही होतंच ना?

८. अयोग्य लोकाच्या हाती चळवळ जाणे : ( भारतीय लढ्यात हा मुद्दा गैरलागु आहे) समजा एखाद्या अंहकारी, हुकुमशहाच्या हाती अशी चळवळ गेली तर काय झाले असते? ( उदा. प्रभाकरणने आपल्या विरोधकाचा सरळसरळ काटा काढला होता.) गट-गटात चळवळ विभागली जाऊन अंतर्गत हिंसा निर्माण होणे.
१०. विधायक भाग नसणे : मारणे / वध करणे यापेक्षाही राष्ट्र वेगळ्यापद्धतीने उभारले जात असते. उदा. दारुबंदी, खादी, अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषा निर्माण, स्वदेशी इत्यादी.

अयोग्य लोकांच्या हातात अयोग्य हत्यार आल्यामुळेचतर गर्दीच्या वेळी मोटरमनचा संप, हास्यास्पद कारणांसाठी ठाण्यातल्या रिक्षावाल्यांचा होतो ना! संपाचं हत्यार सामान्यांच्या हातात कोणी दिलं?

मूळ मुद्दा स्वातंत्र्याचा, कुणा एकाच्या प्रयत्नामुळे स्वातंत्र्य मिळालं असेल यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. पण तो कुणी एक (क्रांतिकारक, काँग्रस नेता, खलाशी, अगदी हिटलरसुद्धा) नसता तर जास्त वेळ लागला असता एवढं निश्चित!

मैत्र's picture

7 Jan 2009 - 11:06 am | मैत्र

३. आहे त्या यंत्रणा नष्ट करण्यासाठीचे प्रयत्न : अनेकवेळेस आगगाडी उडविणे, कोषागार लुटणे, एखाद्या दुसर्‍या आधिकार्‍याला मारणे येथपर्यंतच क्रांतिची व्याप्ति असे. नकळतच एक राष्ट्र म्हणून उभारणीसाठी लागणार्‍या गोष्टी नकळतच नष्ट होत असत.
राज्यकर्त्या इंग्रजांच्या विरोधात पूर्ण आगगाडी ताब्यात घेणे, सरकारी कोष लुटणे (आत्ताच्या परिस्थितीत नाही जेव्हा दिवसा ढवळ्या चार लोक पिस्तुले घेऊन भर गर्दीत बँका लुटू शकतात किंवा दहा लोक तीन दिवस संपूर्ण देशाच्या लष्करी शक्तीशी लढू शकतात. अखंड आणी बाणी सदृश स्थिती असताना या गोष्टी लहान कशा ठरतात ?
कल्पना करा आज असं कोणी केलं तर ती किती मोठी गोष्ट होईल. मग प्रातिनिधिक स्वरुपात तेव्हाही हे फार मोठं धाडस आणि विधान असलं पाहिजे.
सविनय कायदेभंग करून मीठ उचलणं हे देशाला आणि साम्राज्याला हादरा देऊ शकतं ( आणि मी या गोष्टीशी सहमत आहे). तर सरळ एका विशिष्ट अधिकार्‍याला मारणं किंवा असेंब्लित बाँब फेकणं हे लहान आहे असं कसं म्हणता येईल.
राष्ट्र म्हणून उभारणीसाठी लागणार्‍या गोष्टी नकळतच नष्ट करणं - आज आपल्या जनतेसाठी रेल्वे, सरकारी संपत्ती ही सार्वजनिक संपत्ती महत्त्वाची आहे. तेव्हा सरकारी कोषागाराला राष्ट्र उभारणीची गोष्ट खुद्द गांधीजी ही कधी म्हणाले नसते.

४. निष्पाप जनतेला अशा कृत्याची झळ बसणे : अशा काही गोष्टी घडल्यानंतर निष्पाप जनतेला याची ( पोलीसी कारवाईची )झळ बसत असे. माझ्यामते सर्वसामान्यांना क्रांतिकारकांच्या लढ्यात येण्यासाठी या मुळेही अटकाव होत असावा.
सविनय कायदेभंगाने अशी झळ बसत नव्हती काय? इंग्लंडचा इतिहास वाचला तर राज्याच्या विरोधात कुठलीही कृती सारखीच होती. सत्याग्रह किंवा सशस्त्र लढा हा सारखाच देशद्रोह होता.

५. पकडले गेल्यानंतर नेत्याची उणीव भासणे : एखादा नेता पकडला गेल्यानंतर सशस्त्र लढा हा नेत्याअभावी परत उभारी घेत नसे, चळवळ भरकटण्याची शक्यता असे.
सत्याग्रही चळवळीचे नेते फासावर गेले नाहीत आणि नैसर्गिक मृत्यू येइपर्यंत लढत राहीले हा चळवळीला झालेला फायदा. त्याला सशस्त्र लढ्याची मर्यादा म्हणणे बरोबर नाही.

६. क्रांतिकारकात आणि सामान्यजनात दरी असणे. : क्रांति ही गोष्ट सर्वसामान्यांना आपल्या आवाक्याच्या पलिकडे वाटत असे. दुसरे असे की लढ्यासाठी पिस्तुले, बॉब्म इत्यादीची आवश्यकता असणे. ही शस्त्रे आणणे हे सर्वसामान्याच्या आवाक्यात नसे.
सामान्यजन जर लाठ्या आणि गोळ्या झेलायला निशस्त्र लढ्यात जात होते आणि त्यांना ते जवळचं वाटत होतं तर तसंच सशस्त्र लढ्यात जिथे त्यांना असं सरळ सहन करायचं नव्हतं तिथे दरी असणं खरं वाटत नाही.
कालच तीळ आणि तांदूळ या गदिमांच्या आत्मचरित्र पर पुस्तकाच्या काही भागात नाना पाटलांना सर्व सामान्य जनता कशी मदत करत होती याचं वर्णन आहे. तो त्यांच्या आयुष्याचा भाग म्हणून आला आहे. गदिमा.कॉम वर हे उपलब्ध आहे.

७. मतांतर, विचारमांडण्यासाठी स्वातंत्र्य नसणे : नेता म्हणेल तशीच कृती करणे. सर्वसामान्यांना यामध्ये कितपत सक्रियता वाटत असावी?
वर म्हटल्या प्रमाणे सत्याग्रही लढ्यात सर्व गोष्टी नेत्या प्रमाणेच चालत होत्या. सशस्त्र क्रांती मध्ये तरी लहान लहान गटांना आपल्या कारवायांसाठी स्वातंत्र्य होतं. सत्याग्रही चळवळीत नेत्याच्या विचारांशिवाय सर्व सामान्यांची वैयक्तिक विचारांची काय सक्रियता होती? आणि असं स्वातंत्र्य नव्हतं हे विधान कुठल्या आधारावर आहे?

८. अयोग्य लोकाच्या हाती चळवळ जाणे : ( भारतीय लढ्यात हा मुद्दा गैरलागु आहे) समजा एखाद्या अंहकारी, हुकुमशहाच्या हाती अशी चळवळ गेली तर काय झाले असते? ( उदा. प्रभाकरणने आपल्या विरोधकाचा सरळसरळ काटा काढला होता.) गट-गटात चळवळ विभागली जाऊन अंतर्गत हिंसा निर्माण होणे.
अहंकारी हुकूम शहाच्या हाती चळवळ जाणे किंवा अंतर्गत हिंसा याला सशस्त्र क्रांतिलढा नाही अराजक किंवा लष्करशाही/हुकूम शाही म्हणतात. सत्तेसाठी लढाई आणि देशाच्या स्वातंत्र्या साठी जीव धोक्यात घालून किंवा मरण येईल हे माहीत असून अतिशय बलाढ्य राज्या विरुद्ध लढणे यात मूळातच वैचारिक फरक आहे.

९ लोकसहभाग नसणे : लोकसहभाग नसल्यामुळे समजा अश्या क्रांतिलढ्यामुळे स्वातंत्र्य मिळालेही असते तर राज्य चालविण्यासाठी लोक कोठुन आले असते?
जर काँग्रेस चे बाजार बुणगे (नेते वगळता) स्वातंत्र्य मिळाल्यावर राज्य करू शकले तर सशस्त्र लढ्यातून राज्यकर्ते मिळाले नसते कशावरून?

१० विधायक भाग नसणे : मारणे / वध करणे यापेक्षाही राष्ट्र वेगळ्यापद्धतीने उभारले जात असते. उदा. दारुबंदी, खादी, अस्पृश्यता निवारण, राष्ट्रभाषा निर्माण, स्वदेशी इत्यादी.
हा टिळक आगरकर वाद झाला... स्वातंत्र्य महत्त्वाचं का सुधारणा?

या प्रतिक्रियेत कुठे टंकलेखनाची चू़क असेल तर कृपया दृष्टिआड करावी. मिपा हे सामान्य शुद्धलेखनाच्या दुराग्रहापासुन फार लांब आहे. तिथे अतिशय स्पष्ट मुद्दा दिसत असताना टंकलेखनाच्या चुकांवर चर्चा करण्याचा बालिशपणा करू नये..

कलंत्री's picture

8 Jan 2009 - 7:54 pm | कलंत्री

तर भारतात सशस्त्र क्रांती अथवा क्रांतिकारक यशस्वी का झाले नाही या मुद्यांचा विचार करावा लागेल. आपल्या मते काय कारणे असावीत?

शक्तिमान's picture

8 Jan 2009 - 11:47 pm | शक्तिमान

१० वा मुद्दा सोडला तर बाकी मुद्दे पटण्यासारखे आहेत..

चिन्या१९८५'s picture

9 Jan 2009 - 12:12 am | चिन्या१९८५

कलंत्री,अजुन अभ्यासातुन अजुन चांगली कारणे बाहेर तुम्ही काढु शकाल असे वाटते. ही तुम्ही दिलेली कारणे वरवरची आहेत.
बाकी सावरकर,बोस यांचा लढा सफल होता असे मी मानतो(अर्थात हे कॉन्ट्रोव्हर्शिअल आहे).कारण सावरकरांनी सैन्यभरतीला महत्व दिले.युवकांनी सैन्यात सामिल व्हावे यावर भर दिला.त्याच्यामुळे त्यांच्यावर खुप टिका झाली.पण सावरकर म्हणत होते की सैनिकी शिक्षण घ्या आणि वेळ आल्यावर बंदुकीची नळी कुठे फिरवायची हे आपण बघुन घेउ.म्हणजे फक्त काही ब्रिटीश ऑफिसर्सना मारुन काही उपयोग नाही हे सावरकरांचे मत झालेले असावेंएताजी सुभाश चंद्र बोस जेंव्हा सावरकरांना भेटले तेंव्हा नेताजींना अशा प्रकारची फौज बनवा हे सावरकरांनीच सांगितले.मग त्यानंतर नजरकैदेतुन पळुन जाउन नेताजींनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.व भारतीय युवक जे ब्रिटीशांसाठी लढत होते त्यांचा वापर भारताच्या स्वराज्यासाठी घेतला.ब्रिटीशांना याची जाणीव हळुहळु होउ लागली होती.ब्रिटीश संसदेत ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांनी हे स्पष्ट केले होते की भारतीय लष्कर(आझाद हिंद सेना नाही) ब्रिटीशांचे अधिकार मानण्याला नकार देउन कधीही आपल्याविरुध्द जाउ शकते त्यामुळे भारताला स्वातंत्र्य देणे आवश्यक आहे.एव्हढेच काय तर जपानचे एक विचारवंत प्रोफ्.जे.जे.ओसामा यांनी याबद्दल लिहिलेय की भारतीय सैनिकांनी ब्रिटीशांसाठी लढण्यास नकार दिली तो क्षण आझाद हिंद सेनेच्या फॉर्मेशनचा सुरुवातीचा क्षण मानला जावा.त्यामुळे त्यांचे कार्य माहीत नसले तरीही खुपच महत्वाचे होते.

बघा- http://gandharvablog.blogspot.com/

... चिन्या१९८५! धन्यवाद!!

आमची येथे लिहिण्याची मेलेली ईच्छा पुन्हा जिवंत होईपर्यंत निव्वळ वाचत राहू. - एकलव्य

चिन्या काही फायदा नाही. झोपी गेलेल्यांनाच जागे करता येते.

कोणीतरी एकही देश सशस्त्र क्रांती मुळे निर्मान झाला नाही असेही लिहीले आहे.
इतर् कुठे न जाता आपल्याच महाराष्ट्राचा इतिहास तपासला असता तर शिवाजी महाराजांचे कार्य दिसले असते. पण डोळ्यावर झापड लावली की सर्वच संपले.

कोलबेर's picture

9 Jan 2009 - 2:29 am | कोलबेर

इतर् कुठे न जाता आपल्याच महाराष्ट्राचा इतिहास तपासला असता तर शिवाजी महाराजांचे कार्य दिसले असते. पण डोळ्यावर झापड लावली की सर्वच संपले.

१) महाराष्ट्र हा देश नाही.

२) 'देश'/'राष्ट्र' ही संकल्पना मागील शतकातली, शिवाजी महाराजांच्या काळात ती अस्तित्वात नव्हती. त्यामुळे शिवाजी महाराजांनी 'देश स्वतंत्र केला' असे तांत्रिक दृष्ट्या म्हणता येणार नाही.

३) "चिन्या काही फायदा नाही. झोपी गेलेल्यांनाच जागे करता येते." ह्या टिप्पणीची आवश्यकता नव्हती. तात्यांना सुखाने जगु देण्यास हीच विधाने अडथळा आणतात असे वाटते.

केदार's picture

9 Jan 2009 - 4:13 am | केदार

तुम्ही आत्तापर्यंत मी लिहीलेल्या कुठल्याही प्रतिक्रियेला वैयक्तीक स्वरुप कधी आणि कसे आणले ते दाखवा. मी मराठी साईटसवर अनेकदा वाद घातलेत पण ते कुठल्याही स्वरुपाची वैयक्तीक टिका न करता. आणि मिपाही त्याला अपवाद नाही.

ह्या पेक्षा अनेक पटींनी भयानक वाक्ये मी मिपा वर वाचली असताना तुम्ही हा विनाकारन माझ्यावरच वैयक्तीक टिका करत आहात हे वाटतयं. झोपी गेलेला ही मराठी फ्रेझ आहे आणि ती विचारसरनी विरुध्द आहे, व्यक्ती विरुध्द नाही ह्याची देखील आपण नोंद घ्यावी.

शिवाजी महाराजांनी 'देश स्वतंत्र केला' असे मी म्हणत नाहीये तर त्यांनी नविन देशच निर्मान केला तेव्हा त्याचे आधीचे स्वरुप जरी छोटे असले तरी नानासाहेबांच्या काळात देशाचेच होते. त्याची सुरुवात अहिंसेनी झाली नाही सशस्त्र क्रांतीनेच झाली. इंग्रजाचा पत्रव्यवहार वाचाल, त्या पेक्षा इंग्रजाना बहुतांश भारत कधी मिळाला हे पाहता, मराठ्यांना हारवल्यावरच तो मिळाला हे इतिहास सांगतो. त्यामुळे मराठ्यांनी देशावरच राज्य केले. फक्त पुण्याचा आजुबाजुच्या परिसरावर नाही. त्याची सुरुवात छोटी होती इतकेच.

दुसरे उदा हवे असल्यास सम्राट पुष्यमित्राचे देतो. तिसरे उदा सम्राट चंद्रगुप्ताचे. निदान शिवाजीला तरी बॅकींग होते, पुष्यमित्र तर एक साधा शिपाई होता व चद्रगुप्त एका गणिकेचा मुलगा. ह्या तिन्ही क्रांत्या सैन्यावरच झालेल्या आहेत.

खुद्द इंग्र्जांचे देखील पुर्ण भारतावर राज्य न्हवते. १४ ऑगस्ट १९४७ रोजी भारतात एकुन ५२३ राज्ये होती तरी आपण इंग्रजाचे भारतावर राज्य होते असेच म्हणतो ना? मी दिलेले उदा काहीसे तसेच आहे. दुसरे व तिसरे मी डिटेल मध्ये लिहीत नाही.

बाकी आपण सुज्ञ आहात. मी वैयक्तीक टिका करत नाही आणि ती खपवुनही घेत नाही.

इति

चिन्या१९८५'s picture

9 Jan 2009 - 4:29 am | चिन्या१९८५

केदार तुमचे म्हणने बरोबर आहे.मराठ्यांनी सशस्त्र मार्गानेच स्वराज्य निर्माण केले.
त्यामुळे मग तो देश होता का नाह्ही वगैरे चर्चा निष्फळ ठरतात. राज्यव्यवस्था बदलणे याचा विचार व्हावा. ब्रिटीश राज्यव्यवस्था बदलुन भारतीय आणली असाही स्वातंत्र्याचा एक अर्थ होतो.
बघा- http://gandharvablog.blogspot.com/

नितिन थत्ते's picture

9 Jan 2009 - 10:56 am | नितिन थत्ते

जी उदाहरणे दिली आहेत ती जुन्या काळातील आहेत. त्यावेळी संपर्क साधने व दळणवळ्णाची साधने विकसित झालेली नव्हती. विसाव्या शतकात तरी असे लढे यशस्वी झालेले नाहीत. आपल्या आसपासची पंजाब, काश्मीर, श्रीलंका ही उदाहरणे ताजी आहेत. परकीय सत्तेचा सक्रीय सहभाग असेल तर असे लढे यशस्वी होऊ शकतात. इस्रायल, बांगला देश, अफगाणिस्तान (रशियापासून मुक्ती) ही अशी उदाहरणे आहेत.

नितिन थत्ते's picture

9 Jan 2009 - 11:01 am | नितिन थत्ते

त्या काळी राष्ट्र ही सन्कल्पना नव्हती त्यामुळे, आदिलशहाच्या विरोधात मोंगलांची मदत घेणे, मोंगलांच्या विरोधात इंग्रजांची मदत घेणे वगैरे उघडपणे होऊ शकत असे.

यशोदेचा घनश्याम's picture

9 Jan 2009 - 3:27 pm | यशोदेचा घनश्याम

इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठि जी सशस्त्र क्रांती झाली ती 'छोटे मोठे विरोध' या प्रकारची झाली.
नेताजी सुभाषचंद्रांनी जसे ईशान्येकडून एक एक करत भूभाग स्वतःच्या ताब्यात घ्यायला सूरूवात केली तसे सर्वत्र व्हायला हवे होते.
शिवाजी महाराजांनी सुद्धा एक एक भूभाग (गड) काबीज करत शत्रूची ताकत संपवून स्वराज्य निर्माण केले.

नितिन थत्ते's picture

9 Jan 2009 - 3:43 pm | नितिन थत्ते

नेताजी सुभाषचंद्रांनी जसे ईशान्येकडून एक एक करत भूभाग स्वतःच्या ताब्यात घ्यायला सूरूवात केली तसे सर्वत्र व्हायला हवे होते.

मान्य. त्यानाही परकीय सत्तेचे (जपान) सहाय्य होते. पण त्या मार्गाने स्वातन्त्र्य मिळू शकले असते की जपानच्या अंमलाखाली पारतन्त्र्यात रहावे लागले असते हे माहित नाही. (सध्याच्या अफगाणिस्तान सारखे) तसे झाले असते तर आगीतून फुफाट्यात असे झाले असते.

यशोदेचा घनश्याम's picture

9 Jan 2009 - 3:58 pm | यशोदेचा घनश्याम

शक्य आहे.
पण क्रांतीच्या मार्गाचा लढा यशस्वी होण्यासाठी, सर्व क्रांतीकारकांचे आणि त्यांच्या गुटांचे, मोठ्या प्रमाणावर संघटन व्हायला हवे होते. मग ईतर कोणाची मदत घ्यायची गरज लागली नसती.

यशोदेचा घनश्याम