पीए नामा: आरक्षण आणि एका तरुणाची व्यथा कथा

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
5 Nov 2023 - 10:51 am

(काही सत्य सत्य आणि काही काल्पनिक )

आठ- नऊ वर्षांपूर्वीची गोष्ट. संध्याकाळी जर सहा साडेसहा पर्यंत कार्यालयातून सुट्टी मिळाली तर मी चार्टर्ड बस घेत होतो. चार्टर्ड बस मध्ये सीटवर बसायला मिळत असे. त्या बसेस मध्ये जनकपुरी आणि उत्तम नगर जाणारे सरकारी कर्मचारी असायचे. जनकपुरी येथे राहणाऱ्या सुनील( टोपण नाव) नावाच्या एका सरकारी कर्मचाऱ्याशी माझे चांगली ओळख झाली होती. एक दिवस त्याने मला विचारले पटाईत, तुझा ओळखीचा एखादा चांगला मनोचिकित्सक आहे का. कारण विचारल्यावर त्याने मला सांगितले त्याचा 32 वर्षाचा लहान भाऊ डिप्रेशन मध्ये आहे, नौकरी सोडा, घरात ही काही काम करत नाही. दिवसभर शून्यात पाहत बसून राहतो. काही म्हंटले की अंगावर येतो. मी कारण विचारले. त्याने पूर्ण कथा सांगितली

सुनीलचे वडील सरकारी नौकरीत होते. साहजिकच होते मुलांना सरकारी नौकरी मिळावी अशी त्यांची ईच्छा होती.. सुनील कसा बसा बीए पास झाला. त्याने स्टनोग्राफी शिकली. आरक्षित श्रेणीच्या पात्रतानुसार त्याला सरकारी नौकरी मिळाली. त्याचा लहान भाऊ हुशार होता, तो प्रथम श्रेणीत तो पॉलिटिकल साईंस
विषय घेऊन एम.ए. झाला. त्याच वेळी त्याचे वडील ही हार्ट अटॅक ने गेले. आईला सरकारी पेन्शन मिळू लागली. त्याने ही सुनील सारखे सरकारी नौकरीसाठी परीक्षा देणे सुरू केले. आता सरकारी परीक्षा कोणत्याही पदासाठी असली प्राथमिक परीक्षेत अंग्रेजी, गणित, सामान्य ज्ञान आणि रिजनींगचे पेपरस् असतात. अर्ध्या तासात ५० प्रश्न सोडविणे आर्ट्सचे शिक्षण घेतलेल्या तरुणांसाठी जरा जडच. या शिवाय आरक्षण असेल तरी एका पोस्ट साठी 25 ते 100 तरुण परीक्षा देणारे असतात. असेच चार पाच वर्ष निघून गेले. घरात खटके उडू लागले. तुझे वय वाढत चालले आहे, आधी नौकरी शोध आणि नौकरी करता करता परीक्षा दे. जास्त वय झाल्यावर नौकरी मिळणे कठीण होईल. अनेकांना वयाच्या तिशी पर्यंत सरकारी नौकरी मिळाल्याची अनेक उदाहरणे त्याच्या बिरादरीत होती. शिवाय आईची शह ही त्याला होती. खरे म्हणाल तर एक दोन परीक्षा दिल्यानंतर आपली पात्रता आपल्याला कळून चुकते. तरीही फक्त आशेच्या जोरावर तरुण मुले परीक्षा देत राहतात. किंवा घरच्यांना मूर्ख बनवित राहतात (हे सर्वांनाच लागू). पण सतत अपशयामुळे मानसिक तणाव वाढू लागतो. अखेर एकदाची त्याची तिशी ही उलटली आणि सरकारी नौकरीचा मार्ग खुंटला.

आर्ट्स विषय घेऊन एम.ए. करणाऱ्याला चांगल्या पगाराची निजी क्षेत्रात नौकरी मिळणे कठीण आणि त्यातच तिशी उलटलेल्या माणसाला कोण नौकरी देणार. नौकरीच्या शोधात एक वर्ष निघून गेले. आता आईही टोमणे मारू लागली. एक दिवस त्याने त्याच्या घरा जवळच जनकपुरीत नवीन उघडलेल्या शोरूमच्या बाहेर सेल्समनच्या नौकरीचे विज्ञापन बघितले. त्या दिवशी इंटरव्यू साठी दोनच उमेदवार आले होते. त्यातला एक बारावी पास 20 वर्षाचा तरुण मुलगा होता. मालकाने दोघांचा एकत्रच इंटरव्यू घेतला. त्या मुलाला साधी अंग्रेजी ही येत नव्हती. सुनीलच्या भावाला वाटले किमान इथे तरी त्याला नौकरी मिळेल. पण दुसऱ्या दिवशी सकाळी शोरुम मध्ये गेला तर पाहतो काय तिथे तो 20 वर्षाचा तरुण काम करत होता. त्याला राग आला, त्याने मालकाला जाब विचारला. मालकाने त्याला उत्तर दिले, या मुलाला आम्ही सर्व कामे सांगू शकतो. पण तू जास्त शिक्षित असल्यामुळे तुला सांगता येणार नाही. बाकी अंग्रेजी भाषेचे विशेष काय, कामचलाऊ अंग्रेजी तो काही दिवसांत शिकून जाईल. सुनीलच्या भावाला वाटले असावे बहुतेक त्याला कधीच नौकरी मिळणार नाही. त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. त्याच दिवसापासून त्याने बोलणे सोडले. घरात शून्यात पहात बसून राहू लागला.

ग्रुप सी आणि डी सरकारी नौकरीसाठी जिथे जास्तीसजास्त शैक्षणिक पात्रता स्नातक असते. तिथे वय मर्यादा २५-२६ पेक्षा जास्त नसली पाहिजे. कारण निजी क्षेत्रात अश्या पदांसाठी मोठ्या वयाच्या तरुणांना नौकरी मिळण्याची संभावना फारच कमी असते. (आजच मिपाव वर एक धागा वाचला.एक निजी कंपनी फक्त Graduates having any degree in BA, BBA, BCA, B Com, B.Voc, BTech, BE & B.Sc. of 2021-2022 & 2023 batches may apply).

व्होट बँक राजनीती साठी सरकार नौकरीची वय मर्यादा सतत वाढवत जात आहे. परीक्षा देणाऱ्यांपैकी फक्त एक -दोन टक्यांना सरकारी नौकरी मिळणार आणि बाकींचे वय परिक्षा देण्यातच निघून जाणार. त्यांचे काय होणार हा विचार कुणीच करत नाही. वय जास्ती झाल्याने शारीरिक मेहनतीचं काम करून धनार्जन करण्याची क्षमता ही त्यांच्यात राहत नाही. इतर कौशल्य शिकणे ही तिशी नंतर अवघड जाते.

सुनीलचा भाऊ मानसिक उपचारानंतर ठीक झाला. मोठ्या भावाच्या प्रयत्नाने त्याला नौकरी ही मिळाली आणि नौकरी करणारी छोकरी ही. आज त्या दोघांना मिळून ३०-३५ हजार मिळतात. पाठीमागे खंबीर मोठा भाऊ असल्यामुळे साठा उत्तराची कहाणी सफल झाली. पण सर्वांचे नशीब असे नसते. अधिकांश तरुणांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात.

धोरणसमाजविचारअनुभव

प्रतिक्रिया

रामचंद्र's picture

7 Nov 2023 - 3:27 pm | रामचंद्र

या बाबतीत मुस्लिम समाजाचे कौतुक करावेसे वाटते. फारशा सरकारी नोकऱ्या नाहीत. शिक्षण असतेच असेही नाही. पण रडत न बसता अंगमेहनत-छोटामोठा हंगामी का असेना स्वयंरोजगार करत या समाजातले तरुण आनंदात राहतात. एकमेकांना धरून राहणे आणि परिस्थितीशी शक्य तेवढे जमवून घेणे यामुळे बहुतेकदा ते तगून जातात. शिवाय वृद्ध व्यक्तींना घरातच कसे का होईना सांभाळले जाते, वृद्धाश्रमाची वाट दाखवली जात नाही. आणि आत्महत्या किंवा मानसिक रुग्ण यांचे प्रमाणही फारसे दिसत नाही. यातून इतरांनाही काही घेण्यासारखे नक्कीच आहे.

सहमत आहे. कौटुंबिक एकोपा खूप असतो. वृद्धांना हाडहूड करण्याचे, डस्टबीन समजण्याचे, लाथ मारुन हाकलून देण्याचे प्रमाण हिंदू (विशेषतः ब्राह्मण) समाजापेक्षा खुप कमी आहे.

मुक्त विहारि's picture

8 Nov 2023 - 10:34 pm | मुक्त विहारि

मी गेली, २०-२२ वर्षे, ह्या ना त्या नात्याने, वृद्धाश्रम आधारीत काम करत आहे...

त्यामुळे, तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही..

आणि

वृद्ध माणसांना जातपात किंवा धर्म नसतो... ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात...

अहिरावण's picture

9 Nov 2023 - 10:47 am | अहिरावण

असहमतीबद्दल सहमती.

गेल्या चाळीस वर्षांमधे आजुबाजूच्या पन्नास एक (त्यातील तीस एक ब्राह्मण) कुटुंबातील वृद्धांची वाताहात, विशेषतः आयटीमधे कामाला असलेल्या मुलामुलींनी केलेली आहे ती अगदी जवळून पाहिली आहे. अनेक जण वृद्धाश्रमात निधन पावल्यावर त्यांच्या त्याच गावात रहाणा-या मुलामुलींनी स्मशानात आम्ही नेणार नाही, तुम्हाला काय करायचे ते करा आमचा संबंध नाही अशी भुमिका घेतल्यावर समविचारी मित्रांच्या सहाय्याने त्यांचे अंतिम संस्कार केलेले आहेत.

>>>तशीच काही अडचण असल्याशिवाय, कुणीही (सामान्यत: किमान ९९%)घरातील वृद्धांना, वृध्दाश्रमात ठेवत नाही..
तशीच काही अडचण केवळ २०-३० टक्के वृध्दांच्या बाबत असते. बाकी अडगड झालेले आहेत.

>>ती सगळीच माणसे, पैलतीरावर नजर लावून बसलेली असतात...

हे मात्र अगदी खरे...

रामचंद्र's picture

9 Nov 2023 - 2:56 am | रामचंद्र

चाळीसेक वर्षांपूर्वीपर्यंतच्या कनिष्ठ मध्यमवर्गीय ब्राह्मण समाजात जेवढी तडजोडीची-जमवून घेण्याची वृत्ती होती, ती आता कमी झालेली दिसते. याला आर्थिक परिस्थितीत झालेली सुधारणा हे कारण वाटते. मात्र बऱ्यापैकी उच्चशिक्षित आणि सुस्थितीत असलेल्या बहुजनसमाजात ब्राह्मणांचा हा दुर्गुण सुदैवाने अजूनतरी तितकासा दिसून येत नाही. त्यांचाही शेतीचा आधार फारसा राहिला नाही. बहुतेकजण नोकरीपेशातच स्थिरावले आहेत. पण माणसं धरून ठेवण्याकडेच त्यांचा एकंदरीत कल दिसतो.

सरकारी नोकरी हा एक मोठा छलावा आहे.
त्यातूनही युपीएस्सी ची परिक्षा ही उगाचच घरातल्याना आशा लावण्यासाठी ठेवली असावी असेच वाटते.
सी ए पार्ट २ ही परीक्षा देखील अशीच. पार्ट १ बरेचजण क्लीअर करतात. आणि मग वर्षानुवर्षे पार्ट २ करत बसतात. निदान ते काही क्लेरीकल काम तरी करत असतात.
कामाची लाज वाटणे या बरोबरच घरातल्यानी सहन करणे हे सर्वात मोठे कारण असते असल्या कर्मदरिद्री वागण्याचे.
( शब्द वाईट आहे .............पण वस्तुस्थिती आहे ही)

स्वधर्म's picture

9 Nov 2023 - 7:26 pm | स्वधर्म

या लेखाच्या शिर्षकात आरक्षण आहे, पण मजकूराशी त्याचा संबंध समजला नाही.

सर टोबी's picture

9 Nov 2023 - 10:17 pm | सर टोबी

सदर धागालेखकांच्या लेखांमध्ये मोदींची स्तुती अथवा मागील सरकारांवरील टिका अथवा दोन्ही गोष्टी कोणत्याही संदर्भाशिवाय येऊ शकतात.

सुबोध खरे's picture

13 Nov 2023 - 9:41 am | सुबोध खरे

आपला कोणताही प्रतिसाद श्री मोदींबद्दल गरळ टाकल्याशिवाय आला आहे का?

इतका मोदीद्वेष बरा नव्हे प्रकृतीला.

काळजी घ्या

विवेकपटाईत's picture

9 Dec 2023 - 10:23 am | विवेकपटाईत

आरक्षणाचा कोणत्याही पार्टीशी संबंध नाही. एकट्या दिल्लीत शेकडो उदाहरणे सापडतील.