मुलीला नवव्या वाढदिवसाचं पत्र: अदू इन वंडरलँड आणि अॅलेक्स पर्वाची सुरूवात

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
18 Sep 2023 - 3:47 pm

१. एक प्रेमपत्र

२. दुसरं प्रेमपत्र: सूर निरागस हो. . .

३. लव यू ज़िन्दगी: अदूचा तिसरा वाढदिवस!!!!

४. मुलीच्या चौथ्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: गोष्ट आणि फगड्या

५. मुलीच्या पाचव्या वाढदिवसानिमित्त लिहिलेलं पत्र: परीकथेच्या सवे

६. अदूला सहाव्या वाढदिवसाचं पत्र- औ पाबई!

८. अदूचा आठवा वाढदिवस: आनंदयात्रेची आठ वर्षं!

दि. १७ सप्टेंबर २०२३

✪ डबल सीट राईडसची मजा
✪ सिंहगडाचा भिती न वाटलेला ट्रेक
✪ चाकामध्ये गेलेला पाय आणि फ्रॅक्चरमध्ये गेलेले दोन महिने
✪ हिमतीने केलेला वेदनेचा सामना- मी एक आर्टिस्ट आहे आणि माझं प्लॅस्टर मी रंगवणारच!
✪ अॅलेक्स पर्व! हिंस्र श्वापद? नव्हे हा तर माझा छबूली!
✪ मुलगी वाचू लागली हो!
✪ Help me! मला हे काका किडनॅप करत आहेत!
✪ कॅरममध्ये हेलमेटची गरज

प्रिय अदू! आज तुझा नववा वाढदिवस! चक्क नववा!!!!! आणि आता तर तूच विचारते आहेस मला की, पत्र कधी लिहीतोस सांग! ९ वर्षं! असंख्य आठवणी! आणि आजचा दिवस म्हणजे ह्या वर्षातल्या आठवणींचा सोहळाच! गेल्या वर्षभरामध्ये खूप वेगवेगळ्या आठवणी मिळाल्या! मागच्या वर्षी मी २० दिवस सायकलिंगमध्ये नव्हतो त्यानंतर तू भेटलीस तेव्हा तू केलेला हट्ट आणि गाजवलेला अधिकार! सगळ्या आठवणी माझ्या डोळ्यांपुढे येतात. काय आणि किती सांगू असं होतं! आणि ह्या आठवणी व त्याबरोबर एका छोट्याशा बाळापासून आज मोठी झालेली तू हा प्रवास मला भावुक करतो आणि माझ्या डोळ्यांमध्ये पाणी आणतो!

अदू, मागच्या वर्षी तुझ्या वाढदिवसानंतर थोड्याच दिवसांमध्ये मी सायकलिंगला गेलो होतो पाहा. मी‌ निघताना तू अजिबात रडली नाहीस. हसत हसत बाय बाय केलं होतंस. माझ्या त्या सायकलवर आपण खूप डबल सीट राईडसही केल्या पाहा. पहिले मला थोडी धाकधुक वाटायची, आपण शाळेत, क्लासला, एकदा नदी बघायला राईड करत गेलो आणि एकदा तर १५ किलोमीटर राईड करून गिरीशकाकाकडेही जाऊन आलो होतो. त्याबरोबर आपण बाणेरचा तुकाई मातेच्या डोंगरावरही छोटा ट्रेक केला आणि नंतर एकदा पुढेही जाऊन आलो पाहा. माझं सायकलिंग झाल्यानंतर तू नागपूरात मला येऊन भेटलीस आणि तुम्ही सगळे नंतर ताडोबालाही गेलात पाहा. तिथे तुला मस्त वाघ बघायला मिळाला! जंगल बघायला मिळालं!

ह्या वर्षभरामध्ये आपण धमालही केली आणि आपल्याला त्रासाचे दिवसही अनुभवावे लागले. पण असं होतंच. कधी कधी खूप आनंदाचे प्रसंग असतात तर कधी दु:खाचेही प्रसंग येतात. आणि अदू गंमत म्हणजे एक प्रसंग मला वाटलं होतं तुला खूप अडचणीचा जाईल किंवा त्रासाचा जाईल, तो तुला खूप सोपा गेला! तो म्हणजे आपण केलेला सिंहगड ट्रेक!

सिंहगडाचा भिती न वाटलेला ट्रेक

खूप दिवसांपासून आपण ठरवत होतो. त्यासाठी काही तयारीचे वॉक्ससुद्धा केले पाहा. मुलांनाच काय मोठ्यांनाही अवघड जाणारा हा अगदी चढाची पायवाट असलेला ट्रेक. पण तू तयार होतीस. तुला मनापासून इच्छा होती! अगदी पहाटे आपण भर अंधारात निघालो! मला नंतर एका बाजूला वाईटही वाटलं की, मी तुला खूपच चालवलं. अगदी घरापासून बसस्टॉपपर्यंतसुद्धा. प्रत्यक्ष ट्रेक तुला इतका अवघड अजिबात गेला नाही. एक तर चढाच्या वाटेवर व पायवाटांवर चालण्याची तुला थोडी सवय होती. हिमालयात आपण सत्गड- बुंगाछीना भागात ट्रेक केले होते. त्यामुळे तुला अशा डोंगराची व दरीची भिती अशी नव्हती. त्यामुळे तू खूप आरामात चढलीस. वयाच्या मानाने तर खूप म्हणजे खूप फास्ट. अगदी सव्वा तासात आपण गडावर होतो. मी एकोणीस वर्षांपूर्वी पहिल्यांदा गेलो होतो तेव्हा मला ह्याच्या तिप्पट वेळ लागला! तू मला उलटच म्हणालीस की किती भिती घातलीस उगीचच! सोपा तर आहे सिंहगड! उतरताना मात्र गंमत झाली. मी खूपदा घसरलो, पण तू मात्र अजिबात घसरली नाहीस. फक्त शेवटी शेवटी ऊन्हामुळे खूप दमलीस. घरीही आपण चालतच आलो. मलाच नंतर वाईट वाटलं की तुला खूपच ताणलं! पण तू अजिबात तक्रार केली नाहीस. खूप आनंदी होतीस! नंतर तू आल्यावर मस्त सिंहगडाची गोष्टही रेकॉर्ड केलीस!

अदू! मला तेव्हा तुझ्या वाचण्याची मात्र काळजी वाटत होती. चिकू पिकूमुळे तुला वाचायची आवड तर होती, पण कंटाळाही होता. तुझ्या मागच्या वाढदिवसाचं हॅरी पॉटरचं पुस्तकही तुझं राहून गेलं आहे अजून. पण आता तू मस्त वाचायला लागली आहेस. तुझ्या मागच्या वाढदिवसानंतर आपण काही चित्रपटही बघितले. त्यातली गंमतही तुला कळायला लागली. शिवाय तुला क्रिकेटही कळायला आणि आवडायला लागलं! पण हे सगळं असलं तरी तुझा तो पिकाचू तेव्हा खूपच फॉर्ममध्ये होता. मला आधी वाटत होतं की, पिकाचू म्हणजे बॅगेचं नाव! पण तू मला सांगितलं की, तो तर एक कार्टून कॅरेक्टर आहे! मला समजावून सांगितलंस! पण तुझे कार्टूनमधले तुझे मित्र हळु हळु बदलत गेले. शिंजो, डोरेमॉन, रुद्र, मोटू पतलूच्या ऐवजी पेपा पिग्ज आणि पिकाचू आले! ह्यावेळी तुझं एक वाक्य खूप सुरू होतं- आयना का बायना किंग ऑफ चायना! तुझे आवाज काढणं कमी झालं तरी तुझं ड्रॉईंग मात्र मस्त सुरू होतं. हळु हळु तुझी चित्र खूप छान यायला लागली. अगदी सहजपणे तुला चित्र काढता येतात. पण अदू कोणतीही गोष्ट कितीही जमत असली तरी सराव आणि अभ्यास लागतो. मेहनत लागते. ती तर करावीच लागते ना.

चाकामध्ये गेलेला पाय आणि फ्रॅक्चरमध्ये गेलेले दोन महिने

ह्यावर्षीच्या पत्रात तुला नको असलं तरी मला ह्याबद्दल बोलायचं आहे. कारण तुला झालेला हा भयंकर त्रास जितका त्रासदायक होता, तितकंच तुला शक्ती देणाराही होता. तुला तू किती शक्तीवान आहेस हे दाखवून देणाराही होता. १० मार्चला तुझ्या शाळेला सुट्टी लागली. आपण किल्ले व गडावर जायचं ठरवत होतो. एका दिवशी पाषाण रोडवर राईड करून आलो. जाताना तू सतत ब्याऊ मोजत होतीस. येईपर्यंत तुझे २०० मोजून झाले होते! शिवाय तू आसपासच्या सगळ्या ब्याऊ व माऊंना नावं ठेवले होते! १२ मार्चला आपण पाषाणच्याच पंचवटी टेकडीवर गेलो. तिथे आपल्याला अगदी जवळून मोरही दिसला. तुलाच तो आधी दिसला. आणि तिथून आपण निघालो. खूप उताराचा रस्ता होता आणि तिथे सायकलला लावलेलं स्टिकर नीट करता करता तुझा पाय चाकात गेला! आणि तुला जी भयानक वेदना झाली, जो त्रास झाला तो मलाही आठवावासा वाटत नाही. भयानक तू व्हिवळायला लागलीस. कशी बशी सायकल थांबवली. मग एक काका मदतीला आले. नंतर सायकल तिथेच ठेवून आपण रिक्षाने घरी गेलो. नंतर एक्स रे केले, मग अनेक टेस्टस. आजी- आजोबाही संध्याकाळी आले. भयंकर वेदनेमधून तू जात होतीस. मला एकदा तर वाटलंसुद्धा की, माझ्यावर खूप चिडशील की, तुझ्यामुळेच हे झालं. पण तू आतून शांत होतीस. इतकं लागूनही तू शांतपणे म्हणत होतीस की अरे निनू, तुझं काहीच चुकलं नाही. चूक माझीच झाली, मीच ते स्टिकर पायाने नीट करायला गेले आणि गेला पाय आत. ह्यावेळपर्यंत आपण १५- २० तरी राईडस डबलसीट केल्या होत्या. त्यामुळे आधी तुला सांगायचो ती सूचना सांगायची गरज राहिलेली नव्हती. पण तरी हा त्रास झालाच. पुढचे काही दिवस तो वाढत गेला. नंतर ते ड्रेसिंग, प्लॅस्टर आणि दर आठ दिवसांनी ते प्लॅस्टर काढणं! ड्रेसिंगच्या वेळी तुला होणा-या यातना! तुझं ओरडणं ऐकणं कमालीचं त्रासदायक होतं. तुला किती त्रास झाला असेल! पण त्यानंतर लावायचे ते प्लॅस्टरसुद्धा तू रंगवून टाकायचीस. वेदना कमी झाल्यावर आनंदी राहायचीस. तुझं वाक्य नेहमी लक्षात राहील- मी एक आर्टिस्ट आहे, माझं प्लॅस्टर मी रंगवणारच!

मग त्या दिवसांमध्ये आपण बुद्धीबळ खूप खेळायला लागलो. आणि आता तू हरलीस तरी आनंदी असायचीस. अजिबात रडत नव्हती किंवा वाईटही वाटून घेत नव्हतीस! आपण त्या महिन्यांमध्ये इतके डाव खेळलो, इतके डाव खेळलो की, लवकरच तुला ते चांगलं यायला लागलं! आणि एकदा नाही, दोनदा नाही तू मला पुढच्या महिन्यांमध्ये पाच वेळा हरवलंससुद्धा! बुद्धीबळ खेळताना ते उंट, हत्ती, घोडे तुला सहज उचलता यायचे! मला मात्र ते कधी कधी एकदम जड व्हायचे. एवढे मोठे प्राणी ना ते! सगळी शक्ती लावूनही उचलले जायचे नाहीत! तू मात्र हसून लगेच उचलायचीस! महिना- दिड महिना तुझं चालणं पूर्णच बंद झालं होतं. त्यावेळी तुला मला उचलून न्यावं लागायचं! तेव्हाची तुझी मला हाक अजूनही आठवते, निनू, टोयोटा! किंवा निनू, अर्जेंटिना! अशा त्रासामध्येही तुझी किती गंमत! मग तुला बेडकासारखं सरपटता यायला लागलं. अगदी हळु हळु वॉकरने पुढे जाता यायला लागलं. आजोबांनी सांगितलेले व्यायाम तू सुरू केलेस. तुझ्यातल्या निसर्गाने खूप शक्ती लावली. आतमध्ये खूप सैनिक दिवस रात्र फ्रॅक्चरसोबत लढत राहिले. तूही शांत राहीलीस. आणि बरोबर २ महिन्यांनी तू परत चालायला लागलीस! तुझी सुट्टी गेली, शाळाही बुडाली. पण त्यावेळी जे करण्यासारखं होतं ते तू करत राहिलीस, त्याचा आनंद घेत राहीलीस! आणि अदू, तुला माझ्यासोबत डबलसीट होताना असा अपघात होणं माझ्यासाठीही कसोटीचा क्षण होता. एक क्षणी मला भिती वाटली होती की, मी हे सगळं "माझ्यामुळे" झालंय असं मानेन की काय असं मला वाटलं होतं. पण त्या क्षणीही, तिथेही माझी सजगता होती की, हे होतंय ते होतंय, ते "मी केलंय" असं नाहीय. असो.

हिंस्र श्वापद? नव्हे हा तर माझा छबूली

सारा सिटीमध्ये मामा- मामीसोबत असताना १२ मे ला तू चालायला लागलीस. त्यानंतर आपण एका कँप साईटवर जाऊन रात्री तंबूत राहिलो होतो बघ. तिथेही तू अजिबात घाबरली नाहीस. पहाटे उठून माझ्यासोबत तारेही बघितलेस. त्यानंतर ३० मे ला आपल्याकडे नवीन मेंबर आला! नवीन प्राणी आला! नव्हे तुझा भाऊ आला. तू ताई झालीस! मी जेव्हा जेव्हा तुला सांगायचो की, मी आज रनिंग करून आलो, वॉक करताना मला इतके पेपा दिसले किंवा इतके ब्याऊ दिसले, तेव्हा मला किती तरी वेळेस तू विचारायचीस, विनवणी करायचीस की, निनू, तुला एक छोता छोता ब्याऊ दिसला तर घेऊन ये ना! पण ब्याऊ घरी आपण पाळूच शकत नाही हे सगळ्यांचं एकमत असल्यामुळे मी कधी आणला नाही. पण तुझ्या रडण्यामुळे तुला अखेर ब्याऊ मिळाला. आयुष दादाने तुला ब्याऊचा फोटो दाखवला व तू मागेच लागलीस. रडायलाच लागलीस. तुझं रडणं व तुझी इच्छा इतकी प्रबळ होती की, तुझी मावशी व काका त्या ब्याऊला सत्गड ते दिल्ली बसने व दिल्लीवरून ट्रेनने घेऊन आले! बिचारा तो ब्याऊ, अगदी वीस- पंचवीस दिवसांचा होता. छोटं बाळच ते. मला तर किती वाईट वाटलं की, त्याला तू त्याच्या आईपासून तोडलंस, भावंडांपासून तोडलंस. त्याला हा सगळा प्रवास भयंकर होता. पण त्यानेही तो केला! ट्रेनमध्ये तो सतत धापा टाकत होता. पण आला! मावशी व काकांचीही कमाल की त्यांनी त्याला आणलं. आणि असा तुला मिळाला लहान भाऊ! आणि तू खरंच त्याची ताई झालीस.

त्याचं नाव तू अॅलेक्स ठेवलंस! त्या पिल्लाने आजवर कुत्र्याचे विरोधक असलेल्या सगळ्यांना एकत्र केलं! अॅलेक्स पर्व सुरू‌ झालं! त्याची एक एक गोष्ट काय धमाल होती! ऑ... तो कित्ती क्युट आहे हे तू सारखं किती तरी दिवस म्हणत होतीस आणि अजून म्हणतेस! छोटा होता तेव्हा तो चालता चालता उलटा होऊन जायचा! बारीक आवाजात भुंकायचा. फार फार गोड दिसायचा आणि अजूनही दिसतो! पण तो तितकाच भयंकरही आहे! भितीदायकही आहे! त्याचे दात- नखं तीक्ष्ण! एकदम आक्रमक प्रकारचा कुत्रा आहे तो! इतरांसाठी हिंस्र श्वापद, पण तुझ्यासाठी मात्र तो छबू बूबूच आहे! तुझा लहान भाऊच आहे. तू त्याच्याशी जे बोलतेस ते बघणं हा तर एक सोहळा असतो. त्याचे काय लाड करतेस, त्याच्या तोंडात हात घालून त्याने तोंडात घेतलेली वस्तु काढतेस! भिती नावाचा प्रकार नाही! आणि कधी कधी तू त्याला चिडवतेस सुद्धा. पॉईंटरचा लाईट मारून त्याच्यासोबत चीटिंगसुद्धा करतेस आणि टीचरही होतेस! पण किती किती गंमत! सगळे जण म्हणायचे कोणाचा आहे हा ब्याऊ, कित्ती क्युट आए! आम्हांला देता का? सुरूवातीला आयुष दादा, आदित्य दादा व नवीन काका त्याची काळजी घ्यायचे, त्याला आंघोळ घालायचे. आणि नंतर तूही शिकलीस. नानीसुद्धा त्याचा बाळासारखा संभाळ करतात. अॅलेक्सलाही सगळ्यांना भेटावसं वाटतं. अनोळखी माणसांचा आवाज आला तरी तो शेपूट हलवतो, त्याला आनंद होतो! त्या बाळाला तू खूप त्रास देऊन आणलंस तरी त्याची ताईही तितकीच छान झालीस. अजिबात न घाबरता तू त्याची काळजी घेतेस. तो आता मोठा झाला तरी त्याला उचलून घेतेस. तुझी आई- बाबईसुद्धा अॅलेक्सशी खेळते. तुझ्या नानी तर तुझी जशी काळजी आधी घ्यायच्या तशीच त्याची सारखी काळजी घेतात.

अदू, ह्या वर्षातली अजून एक गंमत म्हणजे तू अॅबेकसचा क्लास लावला होतास. काही दिवस छान केलास. त्यातही तुला गंमत येत होती. आणि फ्रॅक्चर असतानाही तू काही क्लासेस केलेस. पण त्यानंतर मात्र तुझा त्यातला रस एकदमच गेला. त्यामुळे तो क्लासही बंद करावा लागला. त्यात काही चुकीचं वाटलं नाही. कारण तुझी आवड, तुझा उत्साह आणि तुझी तशी इच्छा होती. त्याबरोबर ह्या वर्षात आपण बॅडमिंटनही काही वेळेस खेळलो. त्यातही तुला आता चांगलं खेळता येतंय. पण जास्त आपण बुद्धीबळ खेळलो आणि त्यानंतर कॅरम! कॅरम खेळताना तर तुला खूपच गंमत येते! अक्षरश: कुठून कशाही गोट्या तू घेतेस. एका वेळी चार गोट्या तुझ्या जातात, कधी कधी एकाच होलमध्ये दोन- तीन गोट्या जातात. तुझं कॅरम खेळणं बघून मला शाहीद आफ्रिदीच आठवतो बघ! आणि मला हेलमेटचीही गरज भासते! आणि अजून एक गंमत म्हणजे तुझ्यासोबत खेळून माझे कॅरम, बुद्धीबळ व बॅडमिंटन असे खेळ आपोआप पक्के होतात! ह्या वर्षी तू पत्त्यांचे बरेच डावही शिकलीस. नॉट अॅट होम व चॅलेंज तर तूच मला शिकवलेस! तुझे कॅरमचे खेळ बघताना मात्र मला लहापणीचा मी आठवतो व माझी आजी आठवते जी म्हणायची की मला बरोबर चांगले पत्ते मिळतात! तसे तुला अगदी मस्त गोट्या येतात! पण ते खेळतानाही तुझी चिडचिड होते! मी कधी बाईसका जुबाईस्का किंवा अठ्ठाईसका म्हणालो आणि तुझी गोटी गेली नाही तर तू बिथरतेस! अगदी अॅलेक्ससारखी जेव्हा तो मस्ती करताना वेडा होतो किंवा सारखा अंगावर येतो! पण तेव्हाही तू त्याला शांत करतेस. अॅलेक्समुळे खरंच भिती, काही गोष्टींची अॅलर्जी वाटणं किंवा त्रास होणं ह्यापासून तू खूप पुढे गेली आहेस.

अदू! तुझी अशी वाटचाल बघताना खूप आनंद होतो. तुलाही ट्रेकिंग आवडतं, फिरायला आवडतं आणि आता तर क्रिकेटसुद्धा आवडतं! असे आपल्याला बोलायला खूप नवीन विषय मिळाले आहेत. मला फक्त एक काळजी मात्र होती की, तुला वाचायला मात्र तितकं आवडत नव्हतं. तुला लिहायला- वाचायला सांगितलं तर तू म्हणायची निनू शाळेत खूप झालंय रे. पण आता मात्र तू पूर्ण पुस्तकसुद्धा वाचते आहेस! हेलन केलरचं एक इंग्लिश पुस्तक तू वाचलंस. बोक्या सातबंडेचं धमाल मजेचं पुस्तक तुझं वाचून झालंय. अॅलाईस इन वंडरलँड हे पुस्तकही तू वाचते आहेस! हे बघताना खरंच समाधान वाटतं की माझी मुलगी वाचायला लागली! आणि माझे पत्रही तू आता आरामात वाचू शकतेस. छोटी छोटी पुस्तकं वाचू शकतेस. खूप खूप आनंद होतो हे बघताना. आणि हो, आता मला तुला यश आणि राधाच्या पुस्तकांवरून चिडवण्याची गरजच उरलेली नाही!

ह्या वर्षी दु:खद घटनाही घडल्या. तुझी वासंती आजी- माझी आत्या गेली. तिने तुझे खूप लाड केले होते. देवगडला आपण तू इवलिशी असताना गेलो होतो. इथून पुढे तुझे लाड करणा-यांमध्ये तिची उणीव जाणवेल. पण तिच्याच घरी नव्याने आलेली हिमानी काकू, तीसुद्धा तुझे लाड करते. विशेषत: अॅलेक्सचे तिने केलेले लाड! अॅलेक्ससोबत ती जे खेळली आणि अॅलेक्सला जो आनंद झाला होता तो विसरता येत नाही. त्याबरोबर माझे आजोबा- मोठे आजोबाही ह्यावर्षी गेले. त्यांनी तुला एक पाय नाचव रे गोविंदा म्हणून इवलुशी असताना हसवलं होतं. तू मोठी होशील, नवीन गोष्टी करत जाशील तशा अशा गोष्टी मागे पडत जातील. पण मला जाणवतंय जीवनाचं एका बाजूला पुढे जाणं आणि हळु हळु काही गोष्टी मागे सुटत जाणं. आणि ह्या पुढे येणारा उद्या व गेलेला काल ह्यामध्ये असणारा हातातून निसटणारा आज. तो मात्र आपण आपल्या ओंजळीत धरला पाहिजे. तोही वाळूप्रमाणे ओंजळीतून निसटणारच. पण तो निसटेपर्यंत तरी तो अनुभवला पाहिजे. त्यासाठीच खरं तर ही पत्र मी लिहीतो. पत्रांमधून ते छोटे छोटे प्रसंग आणि तो काळ डोळ्यांपुढे उभा राहतो.

किडनॅपिंगचा थरार!

ह्या वर्षीच्या अशा खूप गमती जमती आहेत. आणि ह्या वर्षी तुला मिळालेला अॅलेक्स हेच तुझं खूप मोठं बर्थडे गिफ्ट आहे! त्याशिवाय अनन्या- आत्मजासोबत केलेल्या गमती, गौरी आत्या व अदिती आत्यांच्या फंक्शन्समधली धमाल! तुझं व आत्मजाचं खेळणं आणि तुम्ही मला राक्षस म्हणून पळणं! किंवा तुमच्यावरूनच मला सुचलेली ती गोष्ट- एका जंगलात पायवाटेवरून मी जात असतो. जाताना मला एक हलका चढ लागतो. आणि तिथे पुढे एकदम उतार असतो! आणि त्या उतारावरून घसरल्यावर एक ज्वालामुखी लागतो! हे कोडं म्हणजे तुझ्या जंगलातल्या पायवाटेचं कोडं होतं! तुझ्या जंगलातला- केसांचा भांग म्हणजे पायवाट! त्यावरून पुढे गेल्यावर घसरल्यावर लागणारा ज्वालामुखी म्हणजे तुझे दात आणि तुझा आवाज! कधी तुझ्या दोन शेंड्या सापासारख्या दिसतात तर कधी त्यांचा एकच गलेलठ्ठ उंदीर होतो! किती किती गंमत! ह्यातली एक वेगळी गंमत म्हणजे किडनॅपिंगचा थरार!

आपण रस्त्याने जाताना मध्येच तू एकदम चिरकायला लागतेस- हेल्प मी, वाचवा मला! हे काका मला किडनॅप करत आहेत! मला इतकं हसू येतं आणि तूसुद्धा हसतेस. आणि मलाही व तुलाही माहिती आहे की, जो तुला किडनॅप करेल, तो स्वत:च किडनॅप होईल. इतकी मोठी शस्त्रं तुझ्याकडे आहेत! तुझं ओरडणं, रडणं, दात, हात- पाय आणि तुझी शक्ती (ज्याची बरीच झळ सध्या मला सारखी बसते आहे)! शिवाय तुझी बुद्धी, तुझी हुशारी आणि हिंमत!

असं हे वर्षं गेलं अदू! नऊ वर्षं! लिहीण्या- वाचण्यातली तुझी गती खूप सुखावणारी आहे. त्याबरोबर मेहनत आणि खेळाची आवडसुद्धा! चिकाटीने सगळ्या वस्तु गोळा करून क्राफ्ट करण्याचा पेशन्सही तुझ्यात आहेच. तुला इतकं मोठं होताना बघताना ते छोटसं बाळ मात्र सतत आठवतं. तूच तुझे जुने फोटो बघतेस आणि आनंदून म्हणतेस, "मी कित्ती क्युट होते रे! मला पुन: लहान व्हायचंय!" तुझ्या सोबतीत मी नक्कीच लहान होतोय आणि गेले ९ वर्षं लहान राहू शकतोय हे मात्र नक्की! अॅलाईसप्रमाणेच तू एका वंडरलँडमध्ये आहेस आणि मलाही वंडरलँडमध्ये नेतेस!

तुझ्या आवडत्या फ्रोजन चित्रपटातल्या गाण्याच्या काही ओळी इथे आठवतात-

I am one with the wind and sky
You'll never see me cry
Here I stand and here I stay
Let the storm rage on
My power flurries through the air into the ground
My soul is spiraling in frozen fractals all around

- निरंजन वेलणकर 09422108376 niranjanwelankar@gmail.com

व्यक्तिचित्रमौजमजाप्रकटनअनुभव

प्रतिक्रिया

भागो's picture

19 Sep 2023 - 10:22 am | भागो

"I am one with the wind and sky..."
The line is meant to convey Elsa's sense of liberation and freedom as she embraces her powers and lets go of the fear and isolation that have been holding her back...
तुमच्या मुलीसाठी अगदी योग्य कविता,
पत्र अर्थातच आवडले.

कंजूस's picture

19 Sep 2023 - 11:35 am | कंजूस

पत्र आवडले.

कर्नलतपस्वी's picture

19 Sep 2023 - 12:45 pm | कर्नलतपस्वी

दोन वेळेस झाले आहे. साहित्य संपादकांना व्य नि करा दुरूस्त करून देतील.

छकुली गोड आहे.

छान पत्र आहे.

मार्गी's picture

19 Sep 2023 - 4:24 pm | मार्गी

सर्वांना नमस्कार आणि मनःपूर्वक धन्यवाद!

@ कर्नल तपस्वी जी, ओह, ओके. त्यांना विनंती करतो. धन्यवाद!