वार्तालाप: जाणण्याचे विज्ञान

विवेकपटाईत's picture
विवेकपटाईत in जनातलं, मनातलं
2 Aug 2023 - 9:04 am


जाणते लोक ते शहाणे.
नेणते वेडे दैन्यवाणे.
विज्ञान तेही जाणपणे.
कळो आले.

समर्थ म्हणतात सतत ज्ञान प्राप्तीचा प्रयत्न करणारे लोक शहाणे असतात. जे लोक काहीही जाणण्याचा प्रयत्न करत नाही, अज्ञानी आणि आळशी असतात. त्यांना समर्थांनी नेणते म्हटले आहे. नेणते लोकांच्या नशिबी फक्त दुःख आणि दारिद्र्य येते. समर्थ पुढे म्हणतात विज्ञान हेही जाणण्यामुळे कळू लागते. जाणण्याचे विज्ञान म्हणजे काय हा प्रश्न मनात येणे स्वाभाविक होते.

समर्थानी श्री सार्थ दासबोधाच्या माध्यमातून प्रपंच आणि परमार्थ दोन्ही कसे सिद्ध करावे याचे मार्गदर्शन केले आहे. प्रपंच उत्तम करण्यासाठी जाणण्याचे विज्ञान ही समजण्याची गरज आहे. उदाहरण- एका शेतकऱ्याला उत्तम शेती करायची आहे. फक्त बी पेरून, खत-पाणी देऊन उत्तम शेती होत नाही. शेत जमिनीची पोत, पाण्याचे व्यवस्थापन, त्या भागातील हवामान, हवामान खात्याचे अंदाज, शेतीचे नवीन-नवीन तंत्र, कृषी विशेषज्ञांचे मार्गदर्शन, दुसऱ्या शेतकऱ्यांचे अनुभव, विभिन्न ऋतूत शेतमालला मिळणारा बाजार भाव, प्राकृतिक विपत्ती- अतिवृष्टी, अनावृष्टी, गारपीट, आग, काळ-वेळ, सरकारची आयात- निर्यात नीती, एमआरपी, प्रोत्साहन अनुदान, इत्यादी सर्व जाणून शेती करणे म्हणजे शेतीचे विज्ञान जाणणे. अनुभवाने हे विज्ञान सिद्ध होते. असा शेतकरी आत्महत्या ही करत नाही, दुःखी आणि दरिद्री राहत नाही. दुसरे शेतकरी त्याच्या पासून प्रेरणा घेतात. जे लोक जाणण्याचे विज्ञान समजतात ते उद्योग-धंदे, व्यापार सर्व ठिकाणी सफल होतात.

आत्ताचेच एक उदाहरण- मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटोला शंभर रुपये किलोच्या भावाने विकले.

समाजजीवनमानशेतीविचारआस्वाद

प्रतिक्रिया

मे महिन्यात टमाटोला बाजार भाव मिळत नाही म्हणून पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले. शेतावर नांगर फिरवले. जुलै महिन्यात शेतकऱ्यांनी टमाटोला शंभर रुपये किलोच्या भावाने विकले.

मे महिन्यात न फेकता घरीच टमाटे ठेवले असते तर ते जुलै सोडा जूनमधेच सडून गेले असते आणि एक माणुस किती खाऊ शकेल याची मर्यादा असल्यामुळे रस्त्यावर फेकून देणेच योग्य होते. जरी ऑगस्ट मधे भाव दिडशे, सप्टेंबर दोनशे, ऑक्टोबर तीनशे असा वाढत गेला तरी मे महीन्यात फेकून न देता तसेच ठेवणे हा मुर्खपणाच ठरला असता.

शेतकरी तुम्हाला वाटतात तितके मुर्ख नाहीत

विवेकपटाईत's picture

2 Aug 2023 - 3:09 pm | विवेकपटाईत

लेख पुन्हा वाचा, बहुतेक तुम्हाला कळलेला नाही. शेतीच्या विज्ञानात बाजार भाव सहित अनेक बाबींचा उल्लेख केला आहे. बाकी टमाटो पीक जुलै ते सप्टेंबर महिन्यात येईल तर नेमीच चांगला भाव मिळतो. कॉन्ट्रॅक्ट शेती हे विकल्प आहे. शेतकरी मिळून स्वतची कंपनी बनवून प्यूरी ही विकू शकतात. ज्याला विज्ञान कळले त्यांनी आवळ्याचे ज्यूस ही २५ वर्षापूर्वी बाजारात आणले होते. आज १००० कंपन्या हा ज्यूस विकतात.

अहिरावण's picture

2 Aug 2023 - 7:33 pm | अहिरावण

शक्य आहे मला कळलेला नसावा.

पण, जरा वातानुकुलीत मनोरे सोडुन बाहेर या आणि विचार करा. मे महिन्यात फेकलेला टमाटा कधी पेरलेला होता. जुलै,ऑ गस्ट सप्टेबरात विकला जाणारा टमाटा कधी पेरला जातो. टमाटा पीक किती दिवसांचे असते याचा अभ्यास करा. जुलै सप्टेंबर टमाटा भाव वाढतो हे खरे पण या वर्षी आलेला अवकाळी किती कारणीभुत? पुढिल वर्षी असाच अवकाळी येईल काय? आवळा आणि टमाटा याची तुलना मुर्खपणाची नाही का?

अर्थात तुम्हाला बरे वाटावे(च) असे वाटत असेल तर घ्या फेसबुकी प्रतिक्रिया --

आपले लेख खुप विचार प्रबोधक असतात. तुमच्यासारख्या विचारवंतांचीच आज भारताला गरज आहे. परमेश्वर आपल्याला ह्या समाजोपोयगी कामासाठी दिर्घायुष्य देवो.

खुश?

'वातानुकूलित मनोरे' आणि 'फेसबुकी प्रतिक्रिया' हे शब्दप्रयोग लईच आवडल्या गेले आहेत. यवढे बोलून खाली बसतो.

सर टोबी's picture

2 Aug 2023 - 8:27 pm | सर टोबी

किंवा हिंट ऑफ अमकं तमकं असं असतंना तशी पटाईत काकांची ही स्टाईल आहे. मोदी किंवा रामदेव बाबा प्रेमाची हळूच पखरण करायची.

पटाईत काका तेवढ्या हजारापैकी जमतिल तितक्या आवळा ज्युस बनविणार्या कंपन्या सांगा बरं. बाकी जास्तीचा टोमॅटो विकतच घ्यायचा असतां तर नेस्ले, टाटा, गोदरेज आणि ईतर लोकल कंपन्या होत्या ना? त्यांची क्षमता संपून जास्तीचे टोमॅटो काय करायला पाहिजे म्हणता?

आग्या१९९०'s picture

3 Aug 2023 - 11:27 am | आग्या१९९०

बाकी टमाटो पीक जुलै ते सप्टेंबर महिन्यात येईल तर नेमीच चांगला भाव मिळतो.
हे शेतकऱ्यालाही माहित असते. ते का घेत नाही ह्याचा अभ्यास करा. आणि सगळ्याच शेतकऱ्यांनी जुलै ते सप्टेंबर महिन्यात पीक विक्रीला येईल असे नियोजन केले तर मागणीपेक्षा पुरवठा वाढणार नाही का?
शेतकरी मिळून स्वतची कंपनी बनवून प्यूरी ही विकू शकतात.
शेतकरी फक्त टोमॅटोच पिकावतो का? अन्य पिकेही घेत असतो, त्यांचेही भाव पडतात. कशा कशाचे तो प्रक्रिया उद्योग काढेल?

चित्रगुप्त's picture

2 Aug 2023 - 5:04 pm | चित्रगुप्त

पंजाबच्या शेतकऱ्यांनी टमाटो रस्त्यावर फेकले... त्यापेक्षा ते त्याची प्यूरी, सॉस वगैरे बनवू शकले असते.... बरोबर आहे. त्यासाठी समर्थांनी सांगितल्याप्रमाणे 'जाणतेपण' वाढीला लावणे आवश्यक आहे. लेख आवडला. छोट्या छोट्या लेखातून काही विचार मांडण्याची तुमची कल्पना छान आहे.

सुबोध खरे's picture

2 Aug 2023 - 8:05 pm | सुबोध खरे

जे लोक स्वतः शेती करत नाहीत त्यांना शेतीतील काय समजतं ? शेतीतज्ज्ञ वगैरे अंधश्रद्धा आहेत.

तुम्ही जर स्वतः बाई नसलात तर तुम्ही स्त्रीरोग तज्ज्ञ असूच शकत नाही

एवढे बोलून मी खाली बसतो

राजेंद्र मेहेंदळे's picture

2 Aug 2023 - 8:12 pm | राजेंद्र मेहेंदळे

निष्णात पुरुष स्त्री रोग तज्ञ बघण्यात आहेत.

विवेकपटाईत's picture

4 Aug 2023 - 11:10 am | विवेकपटाईत

शेतीचे फक्त एक उदाहरण होते. आवळा ज्यूस ही एक उदाहरण. आवळा ज्यूस ही पॅक करून बाजारात विकल्या जाते हेही जाणण्याचे ज्ञान होते.
नितीन देसाई यांचे दुखद निधन झाले. त्यांचा स्टुडिओ चालत नव्हता म्हणून ते कर्ज सोडा व्याज ही फेडू शकत नव्हते. स्टुडिओ पर्यटन ही आज एक मोठा धंदा आहे. लोक हजारो रुपये खर्च करून रामोजी सिटीला भेट देतात. मुंबईच्या माझ्या चार पैकी तीन नातलगांना नितीन देसाई यांचा स्टुडिओ आहे ही माहिती नव्हती. त्यांनी या वेगळ्या मार्गाकडे लक्ष दिले असते तर किमान व्याजाची परतफेड निश्चित करता आली असती. स्टुडिओ भ्रमण साठी ५०० रू तिकिटासाठी खर्च करण्याची क्षमता मुंबई आणि पुण्यातील मराठी लोकांची निश्चित आहे.
बाकी स्टुडिओ हातचा गेला असता तरी आर्ट डायरेक्टर म्हणून त्यांच्याकडे काम निश्चित असते. दिवाळखोर होणे काही गुन्हा नाही. माया नगरीत शंभर लोक स्वप्न पाहतात तेव्हा एखाद्याचे स्वप्न पूर्ण होते. आत्महत्या सारखा तामसिक मार्ग निवडण्याचे एकच कारण अहंकार मी नाही तर जग नाही.

सर टोबी's picture

4 Aug 2023 - 11:27 am | सर टोबी

आता तुम्ही बिनधास्त मोदी आणि रामदेव बाबा यांची तोंड फाटेस्तोवर स्तुती करा. कुणी काही म्हटलेच तर आहेच हे सांगायला कि मोदी आणि बाबा हि फक्त उदाहरणं झाली.

अहिरावण's picture

4 Aug 2023 - 6:56 pm | अहिरावण

पडलो तरी माझे नाक वरच !*

* पडणे हे एक उदाहरण
* * नाक हे सुद्धा उदाहरणच बर का !

*** माकड सुद्धा ... उदाहरणच