सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १६: रेपणपल्ली- आष्टी (८१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १७: आष्टी- गडचिरोली (६९ किमी)
✪ आरमोरी व ब्रह्मपुरीमध्ये संवाद
✪ मोहीमेतला शेवटून दुसरा दिवस!
✪ अजस्र वैनगंगा आणि वने
✪ १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य दिवस
✪ बांद्यापासून सुरूवात करून चांद्यापर्यंत मजल
✪ नागपूरच्या उंबरठ्यावर
✪ १७ दिवसांमध्ये १३४१ किमी पूर्ण
सर्वांना नमस्कार. मोहीमेतला १७ वा दिवस, १० ऑक्टोबर २०२२. सायकल मोहीम तेव्हाच पूर्ण झाली आहे, पण हे लिहायला जास्त वेळ लागतोय! पण हे अनुभव इतके वेगळे आहेत की, लिहावेच लागत आहेत. १० ऑक्टोबर- मानसिक आरोग्य दिवस आहे. ह्या सोलो सायकल मोहीमेचं स्वरूप लोकांसोबत मानसिक आरोग्य व मानसिक आणि शारीरिक फिटनेस ह्याविषयी बोलणं हे आहे. सिंधूदुर्ग जिल्ह्यातून गोवा- कर्नाटक- तेलंगणा- गडचिरोली अशा मार्गावरच्या ह्या प्रवासात मानसिक आरोग्यावर काम करणा-या काही संस्था व गटांना भेटीही देता आल्या. आता शेवटचा टप्पा सुरू आहे. ही मोहीम हाती घेण्यामागचं कारण म्हणजे नागपूरला विशेष मुलांशी झालेली भेट हे होतं. त्यांना भेटल्यानंतर ह्या विषयावर जागरूकता होण्यासाठी सायकल ह्या माध्यमाचा उपयोग करावा, ही कल्पना मनात आली होती. असो. गडचिरोलीमध्ये चांगली विश्रांती झाल्यानंतर नागभीडसाठी निघालो. शेवटचे दोन दिवस!
(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/06/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)
.
.
.
.
सुरूवातीच्या टप्प्यात एक एक दिवस लवकर संपत नव्हता. पण काही दिवसांनंतर मोहीमेला वेग आला. आज निघालो तेव्हा प्रसन्न सकाळ आहे. काल गडचिरोलीत फार लोकांना भेटता आलं नाही. पण आज वाटेमध्ये विद्यार्थी व इतर लोकांना भेटेन. श्री. सुभाषजी इटनकर ह्यांनी आरमोरीमध्ये एका कॉलेजमध्ये माझी भेट ठेवली आहे. हा सलग सायकलिंगमधला १७ वा दिवस असल्यामुळे (खरं तर त्यामध्ये आधीचे सरावाचेही दिवस धरायला हवेत) सायकलिंग हे अगदीच सहज झालंय. रस्ता उत्तम आणि वाहनं अगदी थोडी! पण आता वन विरळ होत जाणार आहे... अडीच तासांमध्ये आरामात आरमोरीला पोहचलो. एका कॉलेजमधल्य विद्यार्थ्यांसोबत थोड्या गप्पा झाल्या. श्री. इटनकरजी, त्यांचे मित्र व इतरही प्राध्यापक भेटले. माझे अनुभव व ह्या मोहीमेमागची भुमिका थोडक्यात सांगितली. कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांना असा सायकलिस्ट त्यांच्या कँपसमध्ये बघून आश्चर्य वाटतंय! गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा, रेपणपल्ली व आष्टी अशा माझ्या मुक्कामाच्या गावांमधले अनुभव श्री. इटनकरजींना सांगितले. तिथे काम करणा-या कार्यकर्त्यांविषयी सांगितलं. माझ्या धावत्या भेटीतही ह्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं टीम वर्क मला जाणवलं होतं. एकत्र असलेलं काम जाणावत होतं. त्याबद्दल बोललो आणि ह्या ठिकाणी माझी व्यवस्था केल्याबद्दल त्यांना धन्यवादही दिले. नाश्ता करून आरमोरीतून निघालो.
वैनगंगा!! ह्या मोहीमेत मी भव्य भीमा, अजस्र कृष्णा, महाकाय गोदावरी व प्राणहिता अशा नद्या ओलांडल्या आहेत. पण तरीही वैनगंगा वेगळी वाटते आहे. ब्रह्मपुरी गावातही श्री. आल्हाद शिमखेंडे व श्री. पद्माकर वानखेडे व त्यांच्या गटासोबत धावती भेट झाली. त्यांनी तिथे माझं स्वागत केलं व थोडा वेळ गप्पा मारल्या. विशेष म्हणजे त्यांनी मला एनर्जालसुद्धा दिलं. आता दुपारचं कडक ऊन पडतं आहे, त्यामुळे ते गरजेचं आहे! अर्थात् आता नागभीड फक्त १८ किलोमीटर दूर आहे. अगदी आरामात तिथे पोहचलो आणि आजचे ७६ किलोमीटर पूर्ण झाले.
नागभीड म्हणजे चंद्रपूर जिल्हा! बांद्यापासून सुरूवात करून आता चांद्यापर्यंत म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यत आलो. नागभीडमध्ये माझ्या बाबांचे जुने मित्र श्री. राजन जैस्वाल ह्यांच्याकडे थांबलो. बाबांनी फार पूर्वी नागभीडमध्ये इंटर्नशिप केली होती. माझे नागपूरचे एक काकाही श्री. जैस्वाल ह्यांचे शिक्षक होते. त्यामुळे त्यांना भेटताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.
.
संध्याकाळी नागभीडमध्ये पर्यावरण व ग्राम विकासावर काम करणा-या काही युवकांसोबत भेट झाली. संध्याकाळी पावसाचं वातावरण आहे. पण काय दिवस गेला हा... किंबहुना, काय १७ दिवस गेले आहेत हे! मोहीमेचा शेवटचा दिवस बाकी आहे! नागपूर, नागपूर! नागपूर बोलावतंय आणि नागपूरची मंडळी खूप उत्साहाने वाटही बघत आहेत. त्यांना माझ्या मोहीमेचं फार कौतुक वाटतंय. एवढ्या सायकल प्रवासाचा आनंद- ही इतकी मोठी गोष्ट खरी कशी असू शकते! तरीही मनाला वर्तमान काळात आणतोय. अजून मोहीमेचा एक दिवस बाकी आहे. अजून साधारण १०३ किमी बाकी आहेत!!
पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १९: नागभीड- नागपूर (१०३ किमी)
(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)