सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १७: आष्टी- गडचिरोली (६९ किमी)

मार्गी's picture
मार्गी in जनातलं, मनातलं
25 May 2023 - 4:53 pm

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- चोरला घाट- बेळगांव (८८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ४: बेळगांव ते लोकापूर (१०८ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ५: लोकापूर- बागलकोट- कोल्हार (७१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ६: कोल्हार- विजयपूरा- सिंदगी (१०१ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ८: कलबुर्गी- मन्नेखेली (९६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ९: मन्नेखेली- संगारेड्डी (८२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १०: संगारेड्डी- हैद्राबाद (७० किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ११: हैद्राबाद- जनगांव (७६ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १२: जनगांव- वारंगल (५४ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १३: वारंगल- भूपालपल्ली (७३ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १४: भूपालपल्ली- सिरोंचा (६२ किमी)
सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १५: सिरोंचा- रेपणपल्ली (६३ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १६: रेपणपल्ली- आष्टी (८१ किमी)

✪ वनांचा निरोप घेताना
✪ परत महामार्गाचा अनुभव
✪ गडचिरोली!
✪ योजनेनुसार पूर्ण होणारी मोहीम
✪ १६ दिवसांमध्ये १२६५ किमी पूर्ण

नमस्कार. सायकल मोहीमेचा १६ वा दिवस, ९ ऑक्टोबर २०२२. काल मी ह्या प्रवासातला सर्वांत कठीण टप्पा- आलापल्ली ते आष्टीमधला धुळीचा रस्ता पार केला होता. आज आष्टी गावातून निघेन. आजपासून परत मस्त महामार्ग मिळेल. एका बाजूला चांगलं वाटतंय, पण त्याबरोबर इथून पुढे हे वन कमी होत जाईल आणि हा दुर्गम परिसर मागे पडत जाईल, ह्याचीही जाणीव होते आहे. गेल्या २-३ टप्प्यांचा हँगओव्हर तर अजून जाणवतोय. लोकांचं किती प्रेम मला मिळालं! आणि आता मोहीमेचे फक्त शेवटचे ३ दिवस राहिले आहेत, ह्यामुळेही अस्वस्थ वाटतंय!

(सर्व लेख फोटोंसह इथे वाचता येतील: http://niranjan-vichar.blogspot.com/2023/05/cycling-in-4-states-on-singl... त्याशिवाय ब्लॉगवर ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील.)


.

.

सकाळी लवकर सुरूवात केली. शांत आणि प्रशस्त रस्ता! वन हळु हळु कमी होईल, पण आत्ता तर आहे. ह्या पूर्ण जिल्ह्याचं मुख्यालय असलेलं गडचिरोली! खरं तर ते नकारात्मक गोष्टींमुळे जास्त प्रसिद्ध आहे. पण माझा अनुभव प्रमाण मानला तर हा जिल्हा खूपच चांगला आहे. लोकांनी मला खूप प्रेम आणि आत्मीयता दिली आहे. आजचं अंतर कमी म्हणजे ६९ किमीच आहे आणि महामार्गही आहे. त्यामुळे मस्त जात राहिलो आणि अर्ध्या अंतरावर म्हणजे चामोर्शीला एक ब्रेक घेतला. गडचिरोली‌ जवळ येतंय, तसे गावं हळु हळु मोठे होत आहेत, मागासलेपण थोडं कमी वाटतंय. रस्त्यावर बोलणा-यांच्या भाषेमध्येही बदल जाणवतोय.

गडचिरोली! इतर कोणत्याही शहरांसारखं शहर वाटतंय. जरी हा आदिवासी भाग व दुर्गम परिसर असला, तरी शहर म्हणून मोठं वाटतंय. गडचिरोलीला पोहचल्यानंतर श्री. बहादूरे जी व श्री. इटनकरजी ह्यांनी सांगितल्यानुसार थेट संघाच्या कार्यालयामध्ये गेलो. आज रविवार असल्यामुळे शाळा व कॉलेजेस बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांसोबत संवाद करायला संधी मिळाली नाही. पण संघ कार्यालयात असलेले विद्यार्थी व इतर कार्यकर्ते ह्यांच्याशी बोलणं झालं. तेलंगणाच्या नंतरच्या माझ्या मुक्कामातली व्यवस्था- सिरोंचा, रेपणपल्ली आणि आष्टी इथली व्यवस्था श्री. इटनकर जी, श्री. बहादुरे जी व इतर मंडळींनी करून दिली होती. श्री. बहादूरे जींसोबत तिथल्या अनुभवांबद्दल बोललो आणि मदतीसाठी धन्यवादही दिले. उद्या वाटेमध्ये मी आरमोरी‌ गावात श्री. इटनकरजींना भेटेन. आज तशा फार भेटी झाल्या नाहीत. पण उद्या माझ्या ब-याच भेटी होतील. सर्चलाही जाण्याचा विचार होता, पण तिथे कोणाशीच प्रयत्न करूनही संपर्क होऊ शकला नाही. म्हणून तिथे जाता आलं नाही.


.

असा मोहीमेतला १६ वा दिवस गेला! आत्तापर्यंत प्रत्येक टप्पा ठरल्यानुसार पार पडला आहे. सायकलीला आणि सायकलिस्टलाही अजूनपर्यंत काहीच त्रास झाला नाही आहे! ह्याचं एक कारण कदाचित हेही असेल की, मी माझी क्षमता व फिटनेस लक्षात घेऊन छोटे टप्पेच ठरवले होते. त्यामुळे एक किंवा दोन दिवस वगळता मी कधीच फार जास्त थकलो नाही किंवा परीक्षेचा प्रसंग आला नाही. आणि अर्थातच ह्या मोहीमेसाठी मी माझ्या फिटनेसचं केलेलं अनुमान बरोबर ठरलं. तसंच पूर्ण वाटेत मला दररोज अनेक लोक भेटत गेले- मोठ्या गटात किंवा वन टू वन, कार्यक्रमात किंवा अनौपचारिक प्रकारे. त्यांच्यामुळेही मला योजनेनुसार पुढे जायला बळ मिळत गेलं. आणि सायकल! तिला अजून काहीच झालेलं नाही! आणि किमान ही मोहीम पूर्ण होईपर्यंत तिला काहीही होणार नाही असं वाटतंय!

पुढील भाग: सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १८: गडचिरोली- नागभीड (७६ किमी)

(लेख वाचल्याबद्दल धन्यवाद! सायकलिंगमधले फोटो वर दिलेल्या ब्लॉगवर बघता येतील व ट्रेकिंग, सायकलिंग, रनिंग, ध्यान, आकाश दर्शन ह्यासंदर्भातील माझे अनुभव वाचता येतील. अशा उपक्रमांचे अपडेटस हवे असतील तर संपर्क करू शकता. निरंजन वेलणकर 09422108376)

समाजजीवनमानलेखअनुभव