आज सकाळी कधी नव्हे ते, बॅडमिंटन खेळायला गेलो. पूर्वीसारखे आता नियमित खेळणे होत नाही. नेटजवळील सेटल घ्यायला जी लवचिकता आणि चपळता लागते ती आता वयांपरत्वे कमी व्हायला लागलीय. पण, मित्रांसाठी भेटीगाठी होतात म्हणून अधून-मधून बॅडमिंटन कोर्टवर जात असतो.
![]() |
प्रशांत-नीलकांत
|
आज सकाळी सेट सुरू होताच की हातातल्या एमाआय बँडवर मिपाचे तांत्रिक गोष्टी बघणारे प्रशांतसेठ यांचा कॉल दिसला. मी कसा व्यायाम, खेळ आणि आधुनिक तंत्राशी जमवून घेतो हे वाचकांच्या लक्षात आणून द्यायचंय, हे एव्हाना वाचकांच्या लक्षात आलंच असेल, तर, प्रशांतशेठचा कॉल कसा काय, असा अचानक असा विचार मनात आला. प्रशांतशेठ, अधून-मधून गावाकडे जातांना भेटत असतात. अधून-मधून होणा-या गोपनीय कट्ट्यांना 'आम्ही' भेटत असतो. 'आम्ही' मध्ये जी मिपाकर मंडळी आहेत, त्यांची नावे लिहिण्याचे टाळतोय, हेही वाचकांच्या लक्षात आलंच असेल तर, काही मिपाकरांच्या अधून-मधून भेटी होत असतात. प्रशांतशेठ यांना कॉलवलं तर, ते म्हणाले की 'सर, कुठेय' म्हटलं 'ग्राउंडवर'. अर्ध्या तासात या, भेटूया. मी मैदानावरुन तसाच तिकडे रवाना झालो. आमच्या गावाजवळून गोदावरी नदी वाहते. नदीचा प्रवास, नाशिकहून प्रवरासंगम आणि पुढे पैठण मार्गे पुढे तिचा प्रवास समुद्रापर्यंत असतो. त्या गोदावरी तटावर वाट बघतो असे प्रशांतसेठला सांगितले. गोदावरीच्या पुलावर नदीचं सौंदर्य बघत उभा राहिलो. अनेकदा हौशीखातर, सकाळी सकाळी या पुलावर गळ लावायलाही आलोय. तर, आजच्या या सकाळी सकाळचा गार वारा मोहक वाटत होता. नदीकाठावर तीन महादेवाची हेमांडपंथी की नागरशैली अतिशय सुंदर मंदिरं आहेत. रामेश्वर मंदिरातली शिल्प सुंदर आहेत. कायगाव-टोका नदीकाठच्या गावांची नावे. कांचन मृगाचा पाठलाग करत असताना, प्रभू रामचंद्र गोदावरी – प्रवरा संगमावर येतात. इथे प्रभू रामचंद्र कांचन मृगाचे शीर धडा वेगळे करतात. मृगाचे शीर जेथे पडले त्या स्थानाला टोका म्हणता, तर धड जेथे पडले ते स्थान कायगाव अशा या गावांच्या कथा. तर, गोदाकाठी उभा राहिलो तेव्हा, माझ्या विभागप्रमुख राहिलेल्या सरांच्या कवितेतील चार ओळींची आठवण झाली.
'आज तुझ्या काठावर
स्मृतीगंधा उमलते
अन तेव्हाच कळते
गोदे तुझे माझे नाते'
प्रशांतसेठ आणि त्यांची गाडी ओळखीची आहे, अनेकदा त्यांच्यासोबत प्रवास झालेला आहे. गोदावरी पुलाजवळ गाडी उभी केल्यानंतर प्रशांतसेठ गाडीतून उतरले आणि त्यानंतर चक्क त्यांच्याबरोबर नीलकांत ( मिपा मालक) येताना दिसले. पाहताचक्षणी विचाराबरोबर आनंद झाला. गेली पंधरा वर्ष किंवा अधिक वर्षापासून अधून-मधून आम्ही बोललोय पण भेटी अनेकदा हुकलेल्या आहेत. आपलं एक स्वतःचं मनासारखं वाटेल तसं लिहिता येईल अशा संस्थळाची जेव्हा कल्पना आली. तात्या नीलकांतच्या समन्वयातून मिपाचा जन्म आणि मिपाचा पुढे रोचक आणि दमदार प्रवास आजही सुरू आहे. तात्याशी फोनवर बोलणं व्हायचं तेव्हा नीलकांतचा उल्लेख अनेकदा यायचा. मिपावर असं करू, तसं करू अशा ब-याच गोष्टींचा साक्षीदार राहिलेलो आहे. सुरुवातीपासूनच एक कट्टर मिपाकर राहिलो आहे, मिपावर जीव आहे. मिपानेही मला सांभाळलंच आहे, मिपाचं व्यसन गेली पंधरा वर्षापासून आहे.
![]() |
प्रशांत-नीलकांत प्रा.डॉ.
|
नीलकांतशेठ, मिपा मालक पाहताचक्षणी गळाभेटी झाल्या. आणि मग गप्पा आवरता आवरल्या नाहीत. दीडेक तास तिघांच्या गप्पा झाल्या, रंगल्या. तब्येतीने मिसळपाव चापली. बीना साखरेची कॉफीही घेतली. नीलकांतसेठ, महाराष्ट्रात शासनातील एका महत्त्वाच्या पदावर आहे, त्यांना न विचारता लिहिणे काही बरोबर नाही म्हणून कोणत्या पदावर आहे, त्या पदाचा उल्लेख टाळतोय. तर, त्यांच्या ऑनलाईन बैठका सुरू होत्या. अधून-मधून फोन कॉल्स सुरू होते. एकमेकांची विचारपूस पासून तर विविध विषयांवर मनसोक्त गप्पा झाल्या. मिपाकर जुने -नवे लेखक मंडळी, लेखन वगैरे असं सर्व. मिपा चर्चाही झाल्या. मिपाकराच्या आयडीज, मिपाकरांच्या सूचना, मिपाकरांचे लेखन, वाद, विषय. ललित, ललितेर विषय यावर अधिक लेखन आले पाहिजे वगैरे. विविध माहितीपूर्ण लेखन, कला, साहित्य, शिल्प, माहितीची देवाण-घेवाण. विविध अंक, वगैरे. मध्येच राजकारण विषय कमी केले पाहिजे असं पुसटसं प्रशांतसेठ बोलल्याचा आवाज येऊन गेला. एकमेकांच्या नोकरीची-कुटुंबाची ख्याली-खुशाली विचारत गप्पा वेगात होत्या. नीलकांत फोटोवरुन शिष्ट वगैरे, खडूस वगैरे वाटण्याची शक्यता असते, पण तसे ते नाहीत हे प्रत्यक्ष भेटीतही जाणवलं. वयांपरत्वे जरासा शरीरावर स्थूलपणा आलाय, पण शोभणारं, प्रशासकीय व्यक्तिमत्त्व. व्यायाम, सायकलिंग यावर चर्चा झाल्या. सायकलचा विषय निघाला की प्रशांतसेठ आवरत नाही, प्रशांतसेठचा आवडीचा विषय. गप्पा रंगल्यानंतर मध्येच प्रशांतसेठ यांनी आता निघालेच पाहिजेची आठवण केली. नीलकांत आणि प्रशांत समृद्धी मार्गे रवाना झाले आणि मी सुखद नादात माझ्या गावी.
प्रतिक्रिया
25 Mar 2023 - 2:18 pm | गवि
फक्त मिसळीवर बोळवण केलीत? काय हो हे?
बाकी मिसळ बरी असते का हो तुमच्या तिकडे? की पुण्यासारखी गोड?
25 Mar 2023 - 2:23 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
प्रशांतला आणि नीलकांतला शनीवारी वशट चालत नै.
मिसळ चवदार असते आणि तीखट तर्रीही मिळते.
धन्स.
-दिलीप बिरुटे
25 Mar 2023 - 2:51 pm | प्रचेतस
तेव्हढं एक मिसळ सोडून बोला भो, तुमची मराठवाड्याची मिसळ म्हणजे नुसतेच मोठे वाटाणे आणि पाणचट तर्री.
26 Mar 2023 - 1:17 pm | टर्मीनेटर
अर्रर्रर्र.. असं आहे का? पण मटकीवाल्या पुणेरी मिसळीपेक्षा वाटण्याचीच मिसळ आवडत असल्याने (पाणचट) तर्रीकडे दुर्लक्ष करून आम्ही एकवेळ चालवून घेऊ शकतो 😀
26 Mar 2023 - 2:24 pm | प्रचेतस
आता प्रा डॉ तुमच्याशी मयतरी कर्णार बघा :)
26 Mar 2023 - 2:50 pm | टर्मीनेटर
तशी आमची व्हर्चुअल मैत्री आहेच, प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी सटी-सहामाशी कधीतरी थोड्याफार गप्पा होतात आमच्या Whatsapp वर वगैरे. त्यांचे काही (खरंतर बरेचसे 😀) विचार पटत नसले तरी त्याने काही फरक पडत नाही, माणूस रॉयल आहे!
औरंगाबादला, सॉरी छत्रपती संभाजी नगरला येण्याचे आमंत्रण ते नेहमी देतात, बघू कधी प्रत्यक्ष भेटीचा योग्य येतो ते...
26 Mar 2023 - 4:50 pm | प्रचेतस
एक मिपा कट्टाच करूयात की छत्रपती संभाजीनगरात. प्रा डॉ सर आपल्याला वेरुळ लेणी, पाणचक्की वगैरे दाखवतील, त्यांचा पाहुणचार घेऊ, तारा पान खाऊ. मुक्कामी कट्टा करू.
26 Mar 2023 - 5:06 pm | टर्मीनेटर
अपनी सबसे दोस्ती... नही किसीसे बैर... 😀
जरूर करूयात दोन्ही ठिकाणे बघितली आहेत, पण परत बघू. वेरूळ लेणी तुमच्यासोबत बघणे हि नक्कीच पर्वणी असेल!
तारीख ठरवा (एप्रिल ची २ आणि २३ सोडून कधीही) आणि मला कळवा, धमाल करू...
26 Mar 2023 - 6:38 pm | कंजूस
Google mapsमध्ये अजून छत्रपती संभाजीनगर, धाराशीव नामांतर झालेले नाही. Openstreetmap मध्ये झालं आहे.
29 Mar 2023 - 3:00 pm | राजेंद्र मेहेंदळे
पुण्याची मिसळ गोड?
येरवड्याची राजूशेटची मिसळ खा, डोक्यातुन घाम नाकापर्यंत ओघळेल. कर्वे रोड्जवळ काटाकिर्र् सुद्धा बरी वाटली. दुसरी कड्ड्क मिसळ सुद्धा आहे.
29 Mar 2023 - 3:54 pm | प्रचेतस
सर्वात तिखट चिंचवडच्या नेवाळेचीच असावी.
4 Apr 2023 - 5:35 pm | उपेक्षित
हायला तिखटपणावर मिसळीचा दर्जा ठरवण्यापेक्षा चवीवर ठरवलं पायजे मंडळी.
मिसळ खरतर मुळशी/ पौड/ केळवण/ सासवड / पावस अशा आड वाटांना पूर्वी लय म्हंजी लयच भारी मिळायची, साला आता मिसळीची व्हेज थाळी करून ठेवलीये आमच्या ;) पुण्यात,
बाकी पूर्वीच पुणंहि नाही राहील आणि मिसळपावही ;) ;)
25 Mar 2023 - 2:50 pm | प्रचेतस
छोटेखानी उत्तम वृत्तांत. मिपा दिग्गजांची ग्रेट भेट. पहिल्यांदाच झालेली प्राडॉ आणि नीलकांत यांची भेट पाहून भरुन वगैरे आलं.
गळाला मासोळी वगैरे लागली की नाय कधी? ;)
ह्या मंदिरांवर पूर्वी एक लिहिला होता याची आठवण झाली. नीलकांतशेठला हे मंदिर दाखवायला हवे होतेत.
मला तर हालाच्या सच्चं भणं गोदावरीची आठवण झाली.
तुमच्या झालेल्या चर्चांमधील महत्वाचे तपशील गोपनीय ठेवले गेले आहेत असे वाटून गेल्या आहे.
बाकी प्रशांत आणि नीलकांत दोन्ही एकदम साधी हसतमुख मनमिळाऊ व्यक्तिमत्वे. एकदम भारी वाटले तुमची भेट झालेली पाहून.
25 Mar 2023 - 5:35 pm | तुषार काळभोर
या लेखाला मिपावर पर्मनंट बुकमार्क करायला हवं.
नीलकांत, प्रशांत आणि साक्षात प्राडॉ यांची त्रिवेणी भेट म्हणजे कपिलाषष्ठीच्या दिवशी दुग्धशर्करा योग म्हणायचा!
बाकी गोदावरीकाठी हिरवळ, गळ लावून बसणे इत्यादी शब्दप्रयोग वाचून थोडी उत्सुकता चाळवली गेली, पण पुढे काही डिटेल्स न आल्याने अंमळ निराशाच झाली. असो..
नीलकांत यांच्या भेटीची उत्सुकता आहेच, पण प्राडॉ यांना सुद्धा भेटायचं कधीपासून मनात आहे. प्रशांत आणि सायकल म्हणजे अतूट जोडी. मी त्यांना कार किंवा दुचाकी चालवताना डोळ्यासमोर आणू शकत नाही. प्रशांत म्हटले की तो टिपिकल पोशाख, हेल्मेट आणि गॉगलसह सायकलवर स्वारी असेच चित्र डोळ्यांसमोर येते.
या छोटेखानी वृत्तांतासाठी मनःपूर्वक धन्यवाद!!
ता. क. - नीलकांत यांचा फोटो कदाचित पहिल्यांदा पाहिलाय. फोटोखाली नावे नसती तर पांढरा शर्ट घातलेले प्राडॉ आणि गॉगल घातलेले नीलकांत असा समज होऊ शकला असता :)
25 Mar 2023 - 7:09 pm | कंजूस
फोटोसह लेख आवडला.
25 Mar 2023 - 7:58 pm | Bhakti
छान लिहिलंय!
नदीतीरी भेटी सुंदर असतातच.
नीलकांतसेठ, महाराष्ट्रात शासनातील एका महत्त्वाच्या पदावर आहे
अच्छा आता त्यांचा ज्योतिबा यांचा वरच्या अभ्यासू लेखाची पार्श्वभूमी लक्षात आली :)
26 Mar 2023 - 9:53 am | कर्नलतपस्वी
प्रशांतची भेट पुणे कट्ट्यावर झाली होती. निलकांत यांची फोटो भेट झाली.
आपल्या गावाला पस्तीस वर्षा पासून दर वर्षीच येणे जाणे होते. प्रवरा संगमावर आजही आवर्जून थांबतो. मंदिर कधी बघीतले नाही. पुढच्या वेळेस नक्की बघेन.
26 Mar 2023 - 11:36 am | सर टोबी
अतिशय गर्भितपणे आपण बरेच संदेश दिले आहेत. राजकीय आणि धार्मिक विषयावरील चर्चेत मस्तवाल आणि मग्रूर प्रतिसाद (जसा नुकताच एका बोबड्या आय डी ने आपल्याला दिला आहे) देणारे यातून योग्य तो अर्थबोध घेतील असे वाटते.
बाकी मिसळीचं म्हणाल तर तेलकट लाल तर्री, निष्प्राण लिबलिबीत पाव असा प्रकार हौसेने मिसळ खायला गेल्यावर मिळतो असा अनुभव आहे. पोटार्थी यु ट्युबर्स हाच प्रकार डोळे मिटून, तर्जनी आणि अंगठा यांचा गोल करून ऑस्सम म्हणून खात असावेत.
26 Mar 2023 - 1:08 pm | टर्मीनेटर
वाह! भेटीसाठी ठिकाण पण अगदी रोमँटीक निवडले होतेत...
येत्या १ तारखेला ह्याची अधिकृत घोषणा होणार आहे पण तुम्ही आधीच 'टीजर' रिलीज केलात हे बरे झाले 😀 पण आता तुम्हाला संधी मिळेल तिथे शेठना शिव्या घालता येणार नाहीत त्याचे काय 😂
असो, जोक्स अपार्ट, असंख्य मिपाकरांनी केलेल्या मागणीचा आदर राखत हा निर्णय घेण्यात आलाय, त्यासाठी सर्वांचे सहकार्य अर्थातच अपेक्षित आहे!
बाकी
वाचल्यावर वर तुकाशेठ म्हणल्याप्रमाणे माझीही "उत्सुकता चाळवली गेली, पण पुढे काही डिटेल्स न आल्याने अंमळ निराशाच झाली. असो.." 😀
वृत्तांत आणि फोटोज आवडले हे.वे.सां.न.ल. 👍
26 Mar 2023 - 3:26 pm | श्रीगणेशा
मिपावर मी तसा नवीनच, येथील नियमित, हाडाच्या मिपाकरांसमोर तरी. पण माझ्या मते, प्राडॉन्नी एवढा सविस्तर लिहिलेला (आणि बहुधा मी वाचलेला) लेख विरळाच.
गोदातिरीच्या मिपाकर भेटीचा वृत्तांत अगदी स्थानमहाम्यासहित वाचून छान वाटलं!
26 Mar 2023 - 3:47 pm | टर्मीनेटर
केवळ माहितीसाठी...
मिपा सुरु झाले तेव्हा त्यावर सर्वात पहिला 'शाहीर ते शाहीर !' हा लेख प्रा.डॉ.दिलीप बिरुटे ह्यांनीच लिहिलेला आहे.
27 Mar 2023 - 8:50 am | श्रीरंग_जोशी
साक्षात नीलकांत, प्रशांत व प्राडॉ यांना एकत्र पाहून खूप आनंद झाला. मिपातिहासात सुवर्णाक्षरांनी लिहून ठेवला जाईल असा प्रसंग.
वृत्तांत व फोटो दोन्हीही आवडले.
27 Mar 2023 - 11:05 am | सौंदाळा
प्रा. डॉ होम पीचवर फुल फॉर्म मधे
गोदाकाठचा एक लेख लिहाच, गळाने मासे पकडणे वगैरे - मज्जा येते एकदम.
चालक-मालक एकदम बघून बरे वाटले.
27 Mar 2023 - 11:31 am | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
गळाने मासे पकडणे वगैरे. आमचे गळ प्रयोग. मासा गावेना.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2023 - 11:49 am | प्रचेतस
तुम्हाला प्रत्यक्षात मासोळ्या मिळो वा न मिळो मात्र मिपावर तुम्ही राजकारणावर टाकलेल्या गळात भरपूर मासोळ्या हाती लागतात असे निरिक्षण आहे.
27 Mar 2023 - 12:15 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
पुराणानुसार स्वर्गामध्ये देव राहतात आणि चांगले कर्म करणा-या माणसांच्या आत्म्याला तेथे स्थान मिळते असे म्हटले आहे. आणि वाईट लोक, खोडसाळ लोक थेट नरकात जातात म्हणे. आणि नरकात विविध प्रकारच्या भयंकर शिक्षाही सांगितल्या आहेत. मला लाख वाटतं, हजार-पाच हजार वर्षाच्या आपल्या इहलोकाच्या कार्यानंतर आपण स्वर्गात जावं, तिकडे लेणी-शिल्पांचा अभ्यास करावा पण आपला स्वभाव पाहता हे कठीण दिसत आहे तुमच्यासाठी. :/
-दिलीप बिरुटे
27 Mar 2023 - 1:27 pm | प्रचेतस
अहो सत्यकाम जाबाली स्वतः म्हणतात
स नास्ति परमित्येतत् कुरु बुद्धिं महामते ।
प्रत्यक्षं यत् तदातिष्ठ परोक्षं पृष्ठतः कुरु ॥
या लोकाशिवाय दुसरा लोक नाही तेव्हा तेथे फल भोगण्यासाठी येथे धर्मपालनाची आवश्यकता नाही, म्हणूनच पारलौकिक लाभाला ढकलून सध्या जो लाभ मिळतोय तो उपभोगावा.
27 Mar 2023 - 2:12 pm | कंजूस
ग्रीक पुराणांतील कथांमध्ये सर्व मानव मेल्यावर नरकात जातात. त्यांनी कथेमध्येही स्वर्ग ठेवला नाही. असं का? फार तर एखाद्यावर प्रसन्न झाल्यास झ्यूस त्या मानवास आकाशात तारा बनवायचा. पण स्वर्ग? छे!.
28 Mar 2023 - 10:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्रीक असे समजत असावे की इहलोकातील जीवन हेच स्वर्ग आहे.
नरकाची भिती दाखवली की माणसं इथे आदर्शवादी राहतील.
-दिलीप बिरुटे
27 Mar 2023 - 6:13 pm | चांदणे संदीप
अलौकिक!
सं - दी - प
29 Mar 2023 - 9:30 pm | प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
वेळात वेळ काढून प्रतिसाद लिहिणा-या सर्व मिपाकरांचे, वाचकांचे मनःपूर्वक आभार.
-दिलीप बिरुटे
31 Mar 2023 - 2:08 pm | नंदन
क्या बात!! नीलकांतसायबाला* अनेक वर्षांनी पाहून बरं वाटलं. केसांचा बदललेला रंग वगळता फारसा फरक नाही. कट्ट्याचा वृत्तांतही झकास!
(*हे खास तात्याचं संबोधन!)
31 Mar 2023 - 6:08 pm | चौथा कोनाडा
ग्रेट-भेट
भारी वृतांत लिहिला आहे. भारी वाटलं !
असे अधुन मधून मिपाकट्ट्याचे डोस उभारी देऊन जातात.
कायगाव-टोका हे उल्लेख पाहून इथं जायची इच्छा निर्माण झाली.